Tuesday, June 5, 2018

ईशावास्योपनिषद - १

तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |
या एका सूत्रातच या उपनिषदाला जे काही सांगायचे आहे ते सांगितलेले आहे. 'जो सोडतो तोच भोगतो' असा या सूत्राचा अर्थ आहे. आपण या सूत्राचा अर्थ नंतर विस्तृतपणे बघू.
शुक्ल यजुर्वेदाच्या कण्व शाखेच्या संहितेचा चाळिसावा अध्याय म्हणजे ईशावास्य उपनिषद होय. ह्या उपनिषदाचा मंत्र भागात समावेश होतो म्हणून ह्या उपनिषदाला जास्त महत्त्व आहे. सर्व उपनिषदांत ह्याला पहिले स्थान दिले जाते.
कर्म व ज्ञान या विरोधी द्वंद्वाचा समन्वय हा या उपनिषदाचा मुख्य विषय आहे. हे उपनिषद कर्मयोग सांगते असे आपल्याला म्हणता येईल. या उपनिषदाचा पहिला मंत्र "ईशावास्यमिदं" असा सुरू होतो म्हणून ह्याचे नाव ईशावास्योपनिषद् असे रूढ झाले. या संहितेला ईशोपनिषद, वाजसनेयी उपनिषद, मंत्रोपनिषद असेही म्हटले जाते. तसेच ते 'ईशावास्य' (ईश्वरच सर्व काही आहे) अशी घोषणा करते. म्हणूनही त्याला 'ईशावास्य उपनिषद' म्हणतात.

 खालील शांतीमंत्र हे उपनिषद सुरु होण्यापूर्वी येतो. या शांतीमंत्रात सर्वच उपनिषदांचे सार सामावलेले आहे.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

ते दूर असलेले (अदः) परब्रह्म पूर्ण आहे, तसेच हे (इदम् – इंद्रियगोचर) विश्वही पूर्ण आहे. पूर्ण असलेल्या परब्रह्मातून पूर्ण असलेल्या विश्वाचा उदय झाला आहे. एका पूर्णातून दुसरे पूर्ण काढून घेतल्यानंतर पूर्णच शिल्लक राहाते.ते दूर असलेले (अदः) परब्रह्म पूर्ण आहे, तसेच हे (इदम् – इंद्रियगोचर) विश्वही पूर्ण आहे. पूर्ण असलेल्या परब्रह्मातून पूर्ण असलेल्या विश्वाचा उदय झाला आहे.

खरेतर पूर्णवाद सांगणारे उपनिषद आणि शून्यवाद सांगणारा बुद्ध एकच गोष्ट सांगत आहेत. पूर्णवादात अन्य कोणी उपस्थित नसते आणि शून्यवादातही. अन्य दुसऱ्या कोणाच्या उपस्थितीशिवाय पूर्ण किंवा शून्य हे एकाच आहेत.

हे ब्रह्म पूर्ण आहे, त्यातून काहीही काढले तरी पूर्णच शिल्लक राहते. गणिती अथवा तार्किक बुद्धिवादाच्या विरोधी भासणारे हे विधान आहे. पण ते एका उदाहरणाने स्पष्ट करता येईल. हे ब्रह्म आणि त्याने निर्माण केलेले विश्व हे अमर्याद आहेत. त्यामुळे अमर्यादित गोष्टीतून काहीही काढले तरी ते अमर्यादितच राहणार. मनात फुलणारे प्रेम ही अशीच अमर्यादित भावना आहे. ते कोणालाही कितीही दिले तरी अमर्यादितच राहते.एका दिव्याने दुसरा दिवा पेटविला तरी पहिल्या दिव्याचा प्रकाश तेवढाच राहतो. अथवा आई मुलाला जन्म देते तरी ती आई पूर्ण आईच राहते.

ब्रह्म हे सत्य आहे आणि हे विश्व त्यावर आरोपित केलेले आहे. हे विश्व नष्ट झाले अथवा अशी अनेक विश्वे निर्माण केली (अनेक विश्वे एकाच वेळी अस्तिवात असू शकतील असे आधुनिक विज्ञान सांगते) तरी ब्रह्माला काहीच फरक पडणार नाही असा या शांतीमंत्राचा अर्थ आहे.

पुढील लेखात आपण या उपनिषदात काय सांगितले आहे ते पाहू.

1 comment: