Saturday, April 8, 2017

*नाथपंथीयांची वेशभूषा*


1) भस्म - भस्माला विभूती असेही म्हणतात. काही ठीकाणी क्षार असाही उल्लेख आढळतो. भस्म हे योग्याच्या वेशभूषेचे एक आवश्यक अंग आहे. ते काही असले तरी नाथपंथीयाने भस्म हे लावले पाहीजे. सर्व देहाचे अखेर भस्मच होणार आहे. यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्माकडे मन केंद्रित करा असा संदेशच जणू काही भस्म देत आहे. शिवाय भस्मधारणेमुळे त्या त्या ठिकाणची शक्तिकेंद्रेही जागृत होतात. भस्माचे असे महात्म्य असल्यानेच नाथपंथीयांनी त्याचा अगत्याने स्वीकार केल्याचे दिसते.
2) रूद्राक्ष - हे एका झाडाचे फळ असून त्यास रूद्र अक्ष म्हणतात. शिवाचा नेत्र असा शब्दाचा अर्थ आहे. जपासाठी रूद्राक्ष माळ वापरतात. लक्ष्मी स्थिरावणे, शस्त्राघात न होणे अशा काही हेतूंसाठीही रूद्राक्षांच्या माळा विशेष करून वापरल्या जातात. शिवाय रूद्राक्षांचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत.
3) मुद्रा - मुद्रा हे नाथपंथातील एक महत्वाचे साधन आहे. ही मुद्रा कानाच्या पाळीस छिद्र पाडून त्यात घातली जाते. ही बहूदा वसंत पंचमीच्या शुभ दिवशीच धारण केली जाते. अशा मुद्राधारक योग्यांनाच कानफाटे योगी असेही म्हणतात.कारण ते कानात छिद्र पाडून ती धारण केलेली असते.
4) कंथा - कंथा हे भगव्या रंगाचे वस्त्र. यालाच गोधडी अथवा गुदरी असेही नाव आहे, आपल्या वाकळेसारखे चिंध्यांचे हे बनविलेले असते.
5) मेखला - सूमारे 22 ते 27 हात लांबीची ही लोकरीची बारीक दोरखंडासारखी दोरी असून, नाथ योगी ही कमरेपासून छातीपर्यंत विशिष्ट पद्धतीने गुंडाळतात. ही कटिबंधिनी मोळ्याच्या दोरीची करतात. कधी ही मेंढीच्या लोकरीचीही असते.मेखला दुहेरी पदरात असून तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू लावलेले असते.
6)हस्तभूषण मेखली - बारीक सुतळीएवढ्या जाडीची ही लोकरीची दोरी असून ती मनगटावर बांधतात. चार फुटांच्या या मेखलीवर रूद्रमाळ बांधलेली असते.
7) शैली - ही सुद्धा लोकरीची असून दुपदरी शैली जानव्यासारखी घातली जाते. शैलीच्या टोकाला लोकरीचा गोंडा असतो.
8) शृंगी - जानव्याच्या शेवटी अडकवलेली हरणाच्या शिंगाची बनवलेली ही एक प्रकारची शिट्टीच होय. शृंगी बांधलेले जानवे ''शिंगीनाथ जानवे'' म्हणून ओळखले जाते. शृंगीची वा शिंगीची लांबी साधारणपणे एक इंच असते. भिक्षेचा स्वीकार केला , की शिंगी वाजविण्याचा प्रघात आहे.
9) पुंगी - ही सुद्धा हरणाच्या शिंगाची बनविलेली असते. साधु दारासमोर भिक्षेसाठी आला, की पुंगी वाजवितो. पुंगी शृंगीपेक्षा बरीच मोठी म्हणजे 7 ते 8 इंच लांबीची असते पुंगी डाव्या खांद्यात अडकवून ठेवलेली असते.
10) जानवे - नाथपंथीयांचे जानवे हा एक विशेष प्रकार आहे. ते लोकरीच्या पाच -सात पदरांचे असून त्यात शंखाची चकती अडकवलेली असते चकतिच्या छिद्रात तांब्याच्या तारेने एक रूद्राक्ष बसविलेला असतो.त्याच्या खालीच शृंगी अडकवलेली असते. हा गोफ म्हणजेच नाथपंथी जानवे होय.
11) दंडा - दिड हात लांबीची ही एक काठी असते.हीस गोरक्षनाथ दंडा असे नांव आहे. नाथपंथी साधूच्या हातात ती असते.
12) त्रिशूळ - साधनेत विशेष अधिकार प्राप्त झाला, त्रिशूळ वापरतात.नवनाथश्रेष्ठी त्रिशूळधारी होते सामरस्यसिद्धी ज्यांनी प्राप्त केली ते केवळ त्रिशूळधारी होत.
13) चिमटा - अग्निदीक्षा घेतलेला साधक चिमटा बाळगतो. याची लांबी साधरणतः 27, 32, 54, इंच अशी असते. चिमट्याच्या टोकाला गोल कडे असते.त्यात पुन्हा नऊ लहान कड्या असतात. नाथपंथीयांची चाल या विशिष्ट नादावर व धुंदीत असते. अग्निचे उपासक नाथपंथी धुनी सारखी करण्यासाठी चिमट्याचा उपयोग करतात.
14) शंख - शंखास फार पुरातन काळापासून महत्व आहे. भगवान विष्णूंच्या हातातील शंख हेच दर्शवितो. भिक्षेच्या अथवा शिवाच्या दर्शनाच्या वेळी नाथपंथीय साधू शंख वाजवितात. शंखनाद हा ओंकाराचा प्रतिक मानला आहे.
15) खापडी (खापरी) - नाथपंथी साधू फुटक्या मडक्याच्या तुकड्यावर भिक्षा घेतात. हा तुकडा म्हणजेच खापडी किंवा खापरी. कधी खापरी नारळाच्या कवटीची अथवा कांशाची बनवितात.
16) अधारी - लाकडी दांडक्याला खालीवर पाटासारख्या फळ्या बसवून हे एक आसनपीठ तयार केलेले असते. कोठेही बसण्यासाठी योगी याचा उपयोग करतात.
17) किंगारी - हे एक सारंगीसारखे वाद्य असून भिक्षेच्या वेळी नाथपंथी याच्यावर नवनाथांची गाणी म्हणतात.
18) धंधारी - हे एक लोखंडी वा लाकडी पटट्यांचे चक्र असून त्याच्या छीद्रातून मालाकार असा मंत्रयुक्त दोरा ओवलेला असतो. याचा गुंता सोडविणे अतिशय अवघड असल्याने त्याला " गोरखधंधा " असेही नांव आहे. गुरूकृपेने हा गुंता सुटला तर संसारचक्रातून सुटका होईल अशी कल्पना आहे.
19) कर्णकुंडले - जो कानफाट्या नावाचा संबंध नाथपंथाशी आहे. तो कानांस छिद्रे पाडून त्यात कुंडले अडकवितात. कुंडल धातुचे किंवा हरणाच्या शिंगाचे किंवा सुवर्ण गुंफित असते.

Sunday, April 2, 2017

आता मला जाउ द्या

मी उद्या असणार नाही
असेल कोणी दूसरे
मित्रहो सदैव राहो
चेहरे तुमचे हासरे

झाले असेल चांगले
किंवा काही वाईटही
मी माझे काम केले
नेहमीच असतो राईट मी

माना अथवा नका मानु
तुमची माझी नाळ आहे
भले होओ , बुरे होओ
मी फक्त " काळ " आहे

उपकारही नका मानु
आणि दोषही देऊ नका
निरोप माझा घेताना
गेट पर्यन्त ही येऊ नका

उगवत्याला " नमस्कार "
हीच रीत येथली
विसरु नका 'आज पर्यंत'
साथ होती आपली

शिव्या ,शाप,लोभ,माया
यातले नको काही
मी माझे काम केले
बाकी दूसरे काही नाही

निघताना " पुन्हा भेटु "
असे मी म्हणनार नाही
" वचन " हे कसे देऊ
जे मी पाळणार नाही

मी कोण ? सांगतो
" शुभ आशीष " देऊ द्या
" सरणारे वर्ष " मी
आता मला जाउ द्या।

मंगेश पाडगावकर