Monday, December 21, 2015

the-cultural-differences-between-east-and-west

प्राचीन भारतीय अंकगणित : डॉ भरत सरोदे,पुणे.


एक ‘ट्रिलियन’ म्हणजे किती ?

त्यात एकावर किती शून्ये येतात ?

थांबा ! थांबा !

सहस्र, कोटी किंवा शंभर अब्ज असे एकक वापरून सांगायचे नाही.

भारतीय दशमान पद्धत वापरून अथवा मराठी शब्द वापरून सांगायचे.

विचार करा.

जमतंय का ?

नाही जमत ना !

मग एकावर पन्नास शून्ये किंवा एकावर शहाण्णव शून्ये म्हणजे किती,

 हे सांगताच यायचे नाही.

 मग अशा संख्यांचा उच्चार तरी कसा करायचा ?

पण भारतीय अंकगणितात याला उत्तर आहे.

१. अंक हे सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक असणे
अतिप्राचीन भारतात गणितावर बरेच संशोधनझाले आहे.

त्याविषयी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार,

प्राचीन काळातील भारतियांनी गणितासाठीवापरलेल्या चिन्हांना ‘अंक’ म्हटले आहे.

हे अंक म्हणजे (१ ते ९ आणि ०) सध्याच्या दशमान पद्धतीचेजनक आहेत.

आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला.

 शून्य ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.

२. दशमान पद्धतीची संकल्पना
‘आसा' या वैदिक काळाच्या प्रारंभी असलेल्या वायव्य भारतातरहाणार्य
ा भारतीय गणिततज्ञांनी सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली.

अंकाच्या स्थानानुसारत्याची किंमत पालटेल, या ‘आसा' यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीचीदेणगी मिळाली.

अशा पद्धतीने लिहिलेले आकडे ‘हिंदासा’ नावाने ओळखले जाऊ लागले. साधारणतः वर्ष५०० मध्ये आर्यभट्टांनी दशमान पद्धती सगळीकडे रुजवली.

त्यांनी शून्यासाठी ‘ख' या शब्दाचा वापरकेला. नंतर त्याला ‘शून्य’ असे संबोधले गेले.

३. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक ऐकिवात असणे
इंग्रजीत संख्यांनासलग संज्ञा नाहीत.

 ‘थाऊजंड’,
‘मिलियन’,
‘बिलियन’,
‘ट्रिलियन’,
‘क्वाड्रिलियन’

अशा एक सहस्रांच्यापटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत.

 भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक अनेकदा ऐकिवातअसतात,

 उदा.

खर्व,
निखर्व,
पद्म,
महापद्म

 अगदी परार्धापर्यंत.

अर्थात आपण केवळ नावे ऐकून आहोत.

त्यानुसार नेमकी संख्या सांगणे शक्य होत नाही;

कारण त्याची आपल्याला सवयच नाही.

४. भारतीय दशमान पद्धतीनुसार असणारे आकडे
विविध कोशांमध्ये किंवा पुस्तकांत भारतीयदशमान पद्धतीनुसार खालीलप्रमाणे आकडे लिहिले जातात.

१ एक

१० दहा

१०० शंभर

१००० सहस्र

१०,००० दश सहस्र

१,००,००० लाख

१०,००,००० दहा लाख

१,००,००,००० कोटी

१०,००,००,००० दहा कोटी

१,००,००,००,००० अब्ज

१०,००,००,००,००० खर्व (दश अब्ज)

१,००,००,००,००,००० निखर्व

१०,००,००,००,००,००० पद्म

१,००,००,००,००,००,००० दशपद्म

१,००,००,००,००,००,००,०० नील

१०,००,००,००,००,००,००,०० दशनील

१०,००,००,००,००,००,००,००० शंख

१,००,००,००,००,००,००,००,००० दशशंख

५. एकावर शहाण्णव शून्य असणारी संख्या – दशअनंत !

आता यापुढील संख्या किती सांगता येईल का ?

प्रयत्न करून पहा.

एकावर शहाण्णव शून्य म्हणजे ही संख्या आहे दशअनंत;

पण ही संख्या मोजायची कशी ?

भारतीय पद्धतीत त्याचेही उत्तर आहे.

 अर्थात ते शब्द आता वापरात नाहीत.

या शब्दांची सूची कोणत्याही पुस्तकात आता उपलब्ध नाही. c

काही जुन्या पुस्तकांत त्यांचे संदर्भ आहेत.

अशाच एका    c  पुढील सूची पहा.

 एकं (एक),

दशं (दहा),

शतम् (शंभर),

सहस्र (हजार),

दशसहस्र (दहा हजार),

लक्ष (लाख),

दशलक्ष,

कोटी,

दशकोटी,

अब्ज,

दशअब्ज,

खर्व,

दशखर्व,

पद्म,

दशपद्म,

 नील,

दशनील,

शंख,

 दशशंख,

क्षिती,

 दश क्षिती,

क्षोभ,

दशक्षोभ,

ऋद्धी,

दशऋद्धी,

सिद्धी,

दशसिद्धी,

निधी,

दशनिधी,

क्षोणी,

दशक्षोणी,
कल्प,
दशकल्प,
 त्राही,
दशत्राही,
ब्रह्मांड,
दशब्रह्मांड,
रुद्र,
दशरुद्र,
ताल,
दशताल,
भार,
दशभार,
बुरुज,
दशबुरुज,
घंटा,
 दशघंटा,
मील,
दशमील,
पचूर,
दशपचूर,
लय,
दशलय,
 फार,
दशफार,
अषार,
दशअषार,
वट,
दशवट,
गिरी,
दशगिरी,
मन,
दशमन,
वव,
दशवव,
शंकू,
दशशंकू,
 बाप,
दशबाप,
बल,
दशबल,
झार,
दशझार,
भार,
दशभीर,
वज्र,
दशवज्र,
लोट,
दशलोट,
नजे,
दशनजे,
 पट,
 दशपट,
 तमे,
दशतमे,
डंभ,
दशडंभ,
कैक,
 दशकैक,
अमित,
दशअमित,
गोल,
दशगोल,
परिमित,
दशपरिमित,
अनंत,
दशअनंत.’

वर्ग संख्या ट्रिक्स
41 ते 50 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग :
41 चा वर्ग = 16  81
42 चा वर्ग = 17  64
43 चा वर्ग = 18  49
44 चा वर्ग = 19  36
45 चा वर्ग = 20  25
46 चा वर्ग = 21  16
47 चा वर्ग = 22  09
48 चा वर्ग = 23  04
49 चा वर्ग = 24  01
50 चा वर्ग = 25  00
वर्ग संख्यांच्या मांडणीकडे नीट लक्ष द्या
16,17,18,19,20,21,22,23,24,25  अशी चढत्या क्रमाची मांडणी तयार झालेली आहे, ती पहा. त्याचबरोबर
81,64,49,36,25,16,09,04,01,00 अशी उतरत्या क्रमाची 9,8,7,6,5,4,3,2,1,0 यांच्या वर्गाची मांडणी तयार झालेली आहे.
वरील दोन्ही मांडण्यांचा परस्पर संबंध ध्यानात ठेवणे सहज शक्य आहे.
51 ते 60 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग :
सोपी रीत
           51 ते 60 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग ध्यानात ठेवणे हा लेख वाचल्यानंतर सहज शक्य आहे.येथे केलेली मांडणी व थोडीशी स्मरणशक्ती वापरल्यास आपण कायमस्वरुपी 51 ते 60 चे वर्ग ध्यानात ठेवू शकतो व हवे तेव्हा आठवू शकतो.
        51 चा वर्ग =  26   01
        52 चा वर्ग =  27   04
        53 चा वर्ग =  28   09
        54 चा वर्ग =  29   16
        55 चा वर्ग =  30   25
        56 चा वर्ग =  31   36
        57 चा वर्ग =  32   49
        58 चा वर्ग =  33   64
        59 चा वर्ग =  34   81
        60 चा वर्ग =  36   00 (3500+100)
वरील मांडणीकडे लक्षपूर्वक पहा.
51 ते 59 च्या वर्गसंख्यांच्या मांडणीमद्ये 26,27,28,29,30,31,32,33,34 अशी क्रमवार चढती मांडणी तयार झालेली दिसते.त्याचबरोबर 01,04,09,16,25,36,49,64,81 अशी क्रमवार 1 ते 9 यांच्या वर्गाची चढती मांडणी दिसून येते.
60 च्या वर्गामद्ये क्रमवार पुढील साख्या 35 व क्रमवार पुढील 10 चा वर्ग 100 यांची बेरीज (3500+100= 36  00) अशी रचना तयार होते.
तसेच
91 चा वर्ग  82  81
92 चा वर्ग  84  64
93 चा वर्ग  86  49
94 चा वर्ग  88  36
95 चा वर्ग  90  25
96 चा वर्ग  92  16
97 चा वर्ग  94  09
98 चा वर्ग  96  04
99 चा वर्ग  98  01
100 चा वर्ग 100 00
अश्याप्रकारे आणखी निरीक्षणातून
सोप्या ट्रिक्स तयार करू शकतात .

लेख सौजन्य:डॉ  भरत  सरोदे,पुणे.

Wednesday, December 16, 2015

नियंत्रणमुक्त शिक्षण हेच महासत्ता बनवू शकेल : लेखक डॉ. विजय बेडेकर,

सोमवार, १६ नोव्हेंबर २०१५च्या इकॉनाॅमिक्स टाइम्सने पहिल्याच पानावर एक धक्कादायक बातमी छापली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ६ नोव्हेंबरच्या पत्रकाद्वारे भारतातल्या सुमारे दहा अभिमत किंवा स्वायत्त दर्जा असलेल्या उच्चशिक्षण संस्थांना, आपल्या नोंदणीकृत भौगोलिक परिसराव्यतिरिक्त स्थापन केलेल्या सर्व केंद्रांना बंद करण्याचा आदेश दिला. या दहा संस्थांमध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर), भुवनेश्वर येथील विज्ञान आणि संशोधनामध्ये काम करणारी होमी भाभा संस्था, मुंबईच्या नरसी मोंजीची बंगळुरू, हैदराबाद आणि शिवपूरची केंद्रे, बिट्स पिलानीची गोवा आणि हैदराबादमधील केंद्रे आणि अशाच महत्त्वाच्या काही संशोधन संस्थांचा या यादीमध्ये समावेश आहे.

आज भारतामध्ये सरकारी माध्यमातून हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करूनही यातल्या बहुतेक संस्थांचा शैक्षणिक दर्जा हा सुमार आहे. वर उल्लेख केलेल्या आणि यूजीसीने आक्षेप घेतलेल्या १० संस्थांचा मात्र याला अपवाद आहे. साहजिकच या संशोधन संस्थांना नवीन जागा शोधाव्या लागतात. अशा उच्च दर्जाच्या संशोधनाच्या सुविधा भारतासारख्या मोठ्या देशांमध्ये वेगवेगळे प्रांत आणि केंद्रांमध्ये करणे आवश्यक असते. या अपरिहार्य कारणाकरिता या संशोधन संस्था भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विकसित होत गेल्या. शिवाय यातल्या बहुसंख्य संस्थांमधील शिक्षण आणि संशोधन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. अणू आणि अंतराळ प्रकल्पांना या संशोधनांचा फार मोठा फायदाही झाला आहे. आयआयटी किंवा आयआयएम बुद्धिमान विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करतात, तर वर उल्लेखलेल्या संस्था प्रत्यक्ष संशोधनाकरिता या विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण करून देतात.
धोरणं जास्तीत जास्त पुरोगामी आणि प्रगतिशील दिसावीत म्हणून परीक्षा सोपी करणं, नापासांच्या मानसिक प्रकृतीची काळजी घेणे, गरीब, मागासलेले, दलित, स्त्रिया, ग्रामीण, शहरी या सगळ्या विशेषणांचा वापर करून समाजाला विभागण्यात येते आणि मग फुकटेपणाची खैरात करत हा धोरणांचा पाऊस पाडला जातो. आधी दिलेली आश्वासनं आणि धोरणांचं काय झालं? असा प्रश्न येथे विचारायचा नसतो. शिक्षकांचे पगार, पुस्तकांची छापाई, शैक्षणिक शुल्क, वर उल्लेखलेल्या सर्व घटकांचं आरक्षण, हे कमी पडतं म्हणून की काय, शाहू, फुले, आंबेडकर आणि आपल्या राजकीय सैद्धांतिक विचारांच्या जवळ असलेल्या व्यक्तींच्या जयंत्या आणि त्यांच्या नावांनी योजना यांचाही शिक्षणामध्ये समावेश असतो. तरीही आपले शिक्षण परिपूर्ण हाेत नसल्यामुळे नवीन धोरणांच्या घोषणांचा रतीब अखंडपणे चालू राहतो.
गेल्या साठ वर्षांत ही प्रक्रिया अव्याहतपणे चालू असल्यामुळे सगळ्याच शिक्षण प्रक्रियेचा विचका झाला आहे. परीक्षांचे निकाल ९० टक्क्यांच्या वर लागूनही शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत कुठलाच घटक समाधानी नाही. यामध्ये एका यंत्रणेचे मात्र चांगलेच फावले आहे, ते म्हणजे त्या त्या वेळचे राज्य आणि केंद्रातील शिक्षणमंत्री, त्यातूनच निर्माण झालेली प्रचंड नोकरशाही. मंत्री होण्याकरिता किंवा नगरपालिकांच्या शिक्षण विभागाचे सदस्य होण्याकरिता कुठल्याच किमान शैक्षणिक पात्रतेची अट अस्तित्वात नाही. शिक्षकाला, विद्यार्थ्याला, शैक्षणिक संस्थांना मात्र अनेक पात्रतांचे निकष आणि कायद्याची बंधने. यातूनच निर्माण होते ती बधीर आणि भ्रष्ट शिक्षण यंत्रणेतील नोकरशाही. सध्याच्या भारतातील बऱ्याच विद्यापीठांतील किंवा प्राथमिक शिक्षणाशी निगडित असलेल्या जिल्हा परिषदांमधील राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचार आणि बेजबाबदारपणा बघितल्यावर, आहे तो शैक्षणिक दर्जाही कमी नाही, असेच म्हणावे लागेल. आपल्या या सगळ्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्याकरिता मग दोषाचे धनी शोधण्याचे काम चालू होते. अर्थातच यामध्ये दोन घटक म्हणजे शिक्षक आणि शैक्षणिक संस्था यांच्या डोक्यावर हे खापर फोडण्यात येते.
भारताच्या शिक्षणाच्या संदर्भात १८८२ मध्ये मॅक्सम्युलरने केलेले निरीक्षण फार बोलके आहे. मॅक्सम्युलरने सांगितलेले शाळेबाहेरील शिक्षणाचे सर्व स्रोत आपण आज प्रदूषित करून टाकले आहेत. या सगळ्याच माध्यमांनी आपली निरागसता हरवली असून ती व्यापाराची केंद्रे झाली आहेत. सर्वच क्षेत्रांमध्ये आज अपवाद वगळता अनुकरणीय अशा चारित्र्यशील नेतृत्वाची दिवाळखोरी आहे.

शैक्षणिक धोरण म्हणजे जास्तीत जास्त नियंत्रण, हा विचार आता इतका दृढ झाला आहे की, त्यामुळे या प्रक्रियेतील सर्वच घटकांनी आपली स्वायत्तता हरवली आहे. भारताला एक महासत्ता बनवायचे असेल तर अशा स्वायत्त संस्थांची निर्मिती ही अपरिहार्य आहे. आपली विद्यापीठे काय किंवा संशोधनाचा दर्जा काय, संशोधनमूल्य आणि नावीन्य या दोन्हीही आघाड्यांवर ती अमेरिकन किंवा युरोपियन विद्यापीठांशी तुलना करू शकत नाही. तंत्रज्ञान, कौशल्य विकास किंवा नावीन्याच्या निर्मितीकरिता स्वायत्तता अपिरहार्य आहे. 
महाराष्ट्र राज्याच्या दोन लाख कोटी रुपये खर्चाच्या अर्थसंकल्पातील वीस टक्के म्हणजे ४०,००० कोटी रुपये शिक्षणाच्या नावाने खर्च केले जातात. अर्थात यातील ९० टक्के शिक्षक, प्राध्यापकांच्या पगारांवर खर्च होतात. या खर्चाच्या तुलनेत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांची कामगिरी फारच निराशाजनक आहे.
भारतातील सर्वात चांगल्या १० संशोधन संस्थांना आपली केंद्रे बंद करायला सांगणारा विद्यापीठ अनुदान आयोगाचा आदेश हा दुर्दैवीच नाही, तर नोकरशाहीच्या वसाहतवादी आणि अरेरावी मानसिक वृत्तीचे ते द्योतक आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या शिक्षणाशी निगडित असलेल्या नोकरशहांमध्ये हीच बधीरता दिसून येते. आज खरी गरज आहे ती राजकीय हस्तक्षेप, त्यातून निर्माण होणारी धोरणे आणि त्याचीच पुढची निर्मिती म्हणजे बधीर नोकरशहा यांच्यावर नियंत्रण आणण्याची. नियंत्रणमुक्त शिक्षण हेच भारताला महासत्ता बनवू शकेल.

  • डॉ. विजय बेडेकर,
  • प्रसिद्ध डॉक्टर आणि प्राच्यविद्येचे अभ्यासक, ठाणे
  • Dec 15, 2015, 07:28 AM Divyamarathi news paper

Saturday, December 12, 2015

बाबू गेनू

तयांचे व्यर्थ (!) बलिदान - हुतात्मा बाबू गेनू सैद ....एक अनटोल्ड फर्गोटन स्टोरी ......
१२ डिसेंबर १९३० रोजी मुंबईच्या कालबादेवीस्थित मँचेस्टर मिलमधून विदेशी वस्तू भरलेला ट्रक बाहेर पडत होता. मिलच्या बाहेरील चौकात स्वदेशीच्या भावनेने गोदी कामगारांचा मोठा जमाव जमला होता, या जमावाचा विदेशी कपडे घेऊन मिलबाहेर पडणारया कपड्यांना विरोध होता. हे सर्व जण स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते होते. ट्रक कर्कश्श हॉर्न वाजवत मिलच्या गेटबाहेर पडला आणि समोरच्या चौकात ट्रकला अडवले गेले. ट्रकचालकाला त्याच्या मालकाचे हुकुम होते, गाडी पुढे दामटण्याचे ! गोदी कामगारांनी घोषणा द्यायला सुरुवात केली.भारत माता की जय, वंदे मातरम् या गगनभेदी गर्जनांनी काळबादेवी परिसर दणाणून उठला होता व आंदोलनाची तीव्रता वाढत होती. आवाजाचा टप्पा वाढत गेला, हॉर्न देखील जोराने वाजत राहिला, ट्रकचालक ट्रक बंद करत नव्हता आणि ट्रकच्या समोर जमलेला जमाव मागे हटत नव्हता.अखेर त्या जमावाचे नेतृत्व करणारया तरुणाने ट्रकच्या पुढ्यात आडवी लोळण घेतली आणि आपला प्रखर विरोध दर्शविला. इंग्रज अधिकारी सार्जेण्टने ट्रकचा ताबा घेतला आणि या उद्दाम इंग्रजी ड्रायव्हरने तो ट्रक या २२ वर्षाच्या तरूणाच्या अंगावरून पुढे नेला.तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला. लगेच त्याला गोकुलदास तेजपाल रुग्णालयामध्ये दाखल केले आणि ४.३० वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर झाले. सळसळत्या रक्ताचा तो तरणाबांड मराठी पोर होता बाबू गेनू !पुढे सशस्त्र क्रांतिकारकांच्या काळात बाबू गेनूंचे 'अहिंसक अग्निदिव्य'- एखादा दिवा विझावा, तसे विझून गेले आणि आता तर त्यांच्या तसबिरीला एखाद्या पुष्पहाराचे दर्शन वर्षाकाठी होणे देखील दुरापास्त झाले आहे. १२ डिसेंबर १९३० रोजी मुंबईत काळबादेवी रोडवर झालेल्या सत्यागृह व प्रत्यक्ष बलिदानाच्या छायाचित्रासह बातम्या 'टाइम्स ऑफ इंडिया' व इतर दैनिकांमध्ये छापल्या होत्या, मात्र आजच्या मिडीयाला एक ओळ त्यांच्याविषयी छापणे टीआरपीच्या पिसाटस्पर्धेत अवघड वाटतेय ! किती हा दैवदुर्विलास !!
कुठलीही पार्श्वभूमी नसणारा आणि कसलाही भक्कम पाठिंबा नसणारा एखादा सामान्य माणूस काय करू शकतो याचे हे उत्कट उदाहरण आहे. मी एकटा काय करू शकणार ? एकट्याची किती ताकद असणार असले दुबळे प्रश्न त्यांच्या मनात कधी आले नसतील का ? बाबू गेनू हे मूळचे पुणे जिल्ह्यातील महाळुंगे पडवळ ता. आंबेगाव. एका अत्यंत गरीब घरात त्यांचा जन्म १९०८ साली झाला होता.त्यांच्या वडीलांचे नाव गेनबा सैद असे होते, तर आईचे नाव कोंडाबाई.बाबूंना तीन भावंडे होती, भीमा, कुशाभाऊ आणि नामी. एकूण चौघेजण, तीन भाऊ- एक बहीण. गावाकडच्या मातीत राबणारे हे एक कोरडवाहू शेतकरी कुटुंब होते. महाळुंग्याच्या सैदवाडीत त्यांचे पडवीवजा घर होते. या भावंडांपैकी कुशाभाऊंची महाळुंग्याच्या शाळेच्या रजिस्टरात नोंद सापडते. तीही '१०-८-१९०९ रोजी शाळेत घातले आणि ३०.४.१९१० रोजी नाव काढून टाकले' अशी त्रोटकच ! त्यांचा एक भाऊ भीमा दमेकरी होता. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट. दुष्काळी मुलुख आणि पोटापाण्याची उपासमार यामुळे या भागातील हजारो कुटुंबे मुंबईत पोट भरायला गेलेली. गिरणी कामगार, डबेवाले, कुल्फी मलई विकणारे, गोदीत हमाली करणारे 'माथाडी', क्रॉफर्ड माकेर्टात दलाली व हमाली करणारे असे कितीतरी 'जीव.' बाबू गेनूंचे मामा, चुलते अगोदरच मुंबईला गेलेले. बाबूंची आई कोंडाबाईने हीच वाट धरली. हा काळ १९२०-२५ च्या सुमाराचा. रशियन क्रांती यशस्वी होऊन लालतारा नुकताच उगवलेला. लोकमान्यांचे निधन होऊन नेतृत्व महात्मा गांधींकडे आलेले. तेंव्हा १९२१ साली नुकताच मुळशीचा ऐतिहासिक सत्याग्रह सुरू झालेला. १९२९ साली कोल्हापूरच्या छत्रपती श्री शाहू महाराजांचे निधन झाले. तर १९२५ साली पुणे नगरपालिकेत महात्मा फुले यांचा पुतळा उभारणीला विरोध करणारा ठराव मंजूर झाला. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला चवदार तळ्याचे पाणी पेटवले व पुढे १९३० सालात नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह झाला. हा सत्याग्रह ३-४ वर्षे सुरू होता. अशा आगळ्या वेगळ्या सामाजिक स्थित्यंतरातून काळ जात होता. या काळात गांधीजींच्या नेतृत्वाखाली अनेक लढे झाले. चौरीचुरा, सायमन गो बॅक, बारडोली, दांडीयात्रा हे त्यापैकी प्रसिद्ध लढे. याच काळात कामगार चळवळीला जोरदार गती मिळालेली होती. बाबू गेनू, प्रल्हाद राऊत, शंकर आवटे हे बालमित्र. तिथेही महाळुंग्याचे.त्यातूनच पुढे मजुरी करण्यासाठी आलेले बाबू गेनू आपल्या या मित्रांसह मुंबई येथे गिरणी कामगार म्हणून काम करू लागले.
नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्य करतानाच त्यांच्या मनात स्वातंत्र्याचा ध्यास भरला होता. सुरुवातीला मुंबईत बाबू गेनू यांनी मोदी विभागात काम केले. १९२४-२५च्या सुमारास बाबू गेनू काँग्रेसचे स्वयंसेवक बनले होते. त्यांचा स्वयंसेवक क्रमांक होता - ८१९४. काळबादेवी काँग्रेस कमिटीत प्रल्हाद राऊत नावाचे गृहस्थ अनेक वर्षांपासून पदाधिकारी होते. त्यांची बाबूंच्या विचारावर मोठीच छाप होती. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचे अंत:करण पेटलेले होते. सायमन परत जा' या मोहिमेत त्यांनी भाग घेतला व अटक करून घेतली. वडाळा येथे झालेल्या मीठ सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. लाठीमार सहन केला. तुरुंगवास पत्करला. मुंबईतील जातीय दंगलीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे काम केले. स्वातंत्र्य चळवळीतला त्यांचा सहभाग उत्तरोत्तर वाढत गेला आहे. हुतात्मे भगतसिंग, चंदशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, सुखदेव, शिवराम हरी राजगुरू इत्यादी क्रांतिकारकांची पिढी याच काळात उदयाला आली 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन' ही संस्था स्थापून त्यांनी जागोजाग सशस्त्र उठाव केले. हिंदुस्तान आमीर् हे नाव लोकप्रिय झाले. भगतसिंग-राजगुरू-सुखदेव फाशी गेले. म. गांधींना ते मानीत. मात्र, त्यांचे मार्ग सशस्त्र होते. 'बाबू गेनू सैद' यांनी म. गांधींच्या अहिंसाव्रताचे तंतोतंत पालन केले आहे. १९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले. पुढे गिरणी कामगार म्हणून काम करता करता स्वदेशी संकल्पना हे त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरले. तत्कालीन मुंबई कॉंग्रेसच्या वरिष्ठांनी स्वदेशी आंदोलनाच्या नेतृत्वाची जबाबदारीसुद्धा बाबू गेनू यांच्यावर टाकली होती.
१२ डिसेंबर १९३० रोजी स्वदेशीच्या उत्स्फूर्त भावनेने सामान्य कामगार असलेल्या बाबू गेनू यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये हौतात्म्य पत्करले. १३ डिसेंबर रोजी सोनापूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर हजारो देशभक्तांच्या उपस्थितीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. संध्याकाळी एसप्लेनेड मैदानावर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन करून श्रद्धांजली सभेत लीलावती मुंशी यांनी स्वदेशीचा वापर हीच बाबू गेनू यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार काढून श्रद्धांजली अर्पण केली.बाबू गेनूंच्या अंत्ययात्रेत व त्यानंतरच्या श्रद्धांजली सभेतील उपस्थितांच्या यादीत सर्वश्री कन्हय्यालाल मुन्शी, वीर नरीमन, युसूफ मेहरअली, शेठ जमनादास, भानुशंकर याज्ञिक, मदन शेट्टी इ. मंडळींची नावे वाचायला मिळतात. बाबू गेनूंच्या चितेला श्रीमती प्यारीबहन यांनी अग्नी दिल्याची नोंद आढळते. यापैकी कन्हय्यालाल मुन्शी यांनी 'भारतीय विद्या भवन' ही संस्था स्थापली होती. पुढे मुन्शींचे चरित्रही प्रसिद्ध झाले होते. त्यातही गेनुंचा उल्लेख त्रोटक आहे. युसूफ मेहेरअलींचे स्वातंत्र्य चळवळीवरील पुस्तक उपलब्ध आहे.या पुस्तकात 'बाबू गेनूं'च्या बलिदानाबद्दल नाममात्र दखल सोडून बाकी भाष्य शून्य आहे. म. गांधींच्या कानांवर बाबू गेनूंच्या सत्याग्रहाची हकीगत 'स्लोकंब' या स्वातंत्र्य चळवळीला साहाय्य करणाऱ्या इंग्रजाने घातल्याची नोंद आढळते. प्रत्यक्ष म. गांधी यांनी काय म्हटले ? यावर प्रकाश टाकण्यासाठी श्री.भालेराव यांनी महात्मा गांधी-स्लोकंब यांचा संवाद प्रसिद्ध केला आहे. मात्र, पुरावा दिलेला नाही. वास्तविक पाहता गेनुंच्या हौतात्म्यास जितके महत्व द्यायला पाहिजे होते वा त्याबाबत जितके औचित्य दाखवायला पाहिजे होते ते दिले गेले नाही हे सत्य आहे.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वदेशी संकल्पनेचे मोठे बलस्थान होते. स्वदेशीविषयी सामान्य माणसांमध्ये उत्सुकता होती. सामान्य माणूस सुद्धा स्वदेशी वापरण्यामध्ये गौरव अनुभव करत होता. कारण, देशामध्ये सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वदेशीसह सर्व चळवळीचे उद्दिष्ट स्वतंत्र हेच होते. तसेच स्वदेशीच्या माध्यमामधून समृद्ध करून स्वाभिमानी, स्वावलंबी राष्ट्र म्हणून गौरवाचे स्थान प्राप्त करण्याचे होते. त्यामुळेच गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीबरोबरच स्वदेशीचे रणशिंग फुंकले होते. त्यामधून तरुण वर्ग स्वदेशी चळवळीमध्ये सहभागी झाला आणि सामान्य कामगार असलेल्या बाबू गेनूने स्वदेशी आंदोलनामध्ये बलिदान स्वीकारले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गांधीजींच्या विचारांना तिलांजली देण्यात आली. पुढच्या काँग्रेसी राजवटीतच विदेशी कंपन्यांना खुली सूट देण्यात आली. आजच्या घडीला तर हजारोंच्या संख्येने विदेशी कंपन्या देशाचे आर्थिक शोषण करत आहेत. दुसरीकडे चीनी वस्तूंनी देखील आपल्या बाजारपेठावर मोठा हात मारल्याचे दिसत आहे.
'स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत' या लेखक ग. प्र. प्रधानांच्या ग्रंथात 'हुतात्मा बाबू गेनू' या शीर्षकाखाली १२ डिसेंबरची हकीकत दिली आहे. प्रधान स्वत: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आहेत. बाबू गेनूंचा बलिदान दिन त्यांना स्पष्ट आठवतो. त्यावेळी त्यांचा मुक्काम इंदापुरात होता. बाबू गेनूंच्या बलिदानाची बातमी कळताच सर्वत्र उत्स्फूर्त 'हरताळ' पाळला गेला. तेव्हा प्रधान प्राथमिक शाळेत होते. शाळेतील मुली-मुले रस्त्यावर आली. बाबू गेनूंच्या बलिदानामुळे स्वातंत्र्याचा मंत्र खेडोपाडी पोचला. अमानुष ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संतापाची लाट उसळली. सर्व देशभर उत्स्फूर्त हरताळ पाळला गेला. प्रधानांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या शेवटी मराठी तसेच इंग्रजी संदर्भ ग्रंथाची सूची दिली आहे. त्यातील उपलब्ध साहित्यातून बाबू गेनूंच्या समग्र जीवनपटावर प्रकाश टाकता येतो.
आजच्या घडीला विदेशी कंपन्यांमुळे कामगारांची समस्या आणि बेकारी, बेरोजगारीचा प्रश्‍न देशासमोर उभा आहे. देशात २५ ते ३० कोटी बेरोजगार तरुण क्षमता, बुद्धी असून सुद्धा बेरोजगार होऊन काबाडकष्ट करीत आहेत. देशातील बेकारी आणि बेरोजगारीच्या मुळाशी स्वदेशीचा विसर हे एकमेव कारण आहे. स्वदेशीचा वापर व विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यास हिंदुस्थानी कामगारांना, श्रमिकांना रोजगार मिळू शकतो. व्यापारामधून होणारे उत्पन्न म्हणजे शुद्ध नफा सुद्धा देशामध्येच राहतो. त्यामुळे देशहितासाठी आज स्वदेशी वस्तूचा वापर आवश्यक आहे. स्वदेशी वस्तूंबाबत योगी अरविंद यांचं सुंदर वचनआहे. योगी अरविंद म्हणतात-
‘स्वदेशी म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेची, राष्ट्राच्या इच्छाशक्तीची ओळख आहे. राष्ट्रासाठी त्याग करण्याची सिद्धता स्वदेशीतूनच प्रदर्शित होते. स्वदेशीमुळे स्वदेश अजिंक्य राहतो.’
योगी अरविंदांनी दाखविलेला स्वदेशीचा मार्ग बाबू गेनू यांनी प्रत्यक्ष जगून आपल्या बलिदानाने देशाला, समाजाला दाखविलेला मार्ग आहे.आजच्या काळात काहींना हा मार्ग पटणार नाही पण येणारया काळात याची महती सर्वांना खचितच पटेल.
साल २००८ मध्ये बाबू गेनूंची जन्मशताब्दी प्रसिद्धीचे ढोल बडवून साजरी केली गेली पण त्यानंतर पुढे काय घडले ? गेनुंच्या स्मृतिदिनी आज 'महाळुंगे पडवळ' व मुंबई येथे मोजके कार्यक्रम होत आहेत. मागे महाराष्ट्र सरकारने महाळुंग्याच्या विकासासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले होते. डिंभे धरणाला 'हुतात्मा बाबू गेनू प्रकल्प' असे नाव अगोदरच दिले गेले आहे. तेथे बाबू गेनू यांच्या नावे मोठ्या उद्यानाची योजना अजुनी साकारतेच आहे. बाबू गेनूंच्या घराची पडवी मूळ स्वरूपात डागडुजी करून साकारली गेली आहे. बाबू गेनू यांच्या छायाचित्राचे अनावरण मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते केले गेले होते. त्यांच्या जीवनावर राहुल सोलापूरकर यांनी चित्रपट काढण्यासाठी सादर केलेली योजनाही बारगळल्यात जमा आहे.गेनुंची जन्मशताब्दी राज्य सरकारने साजरी करून आपले कर्तव्य पार पाडल्याचे समाधान पदरी पाडून घेतले पण २००८ मध्ये तेंव्हा केल्या गेलेल्या घोषणा एव्हाना हवेत विरून गेल्या आहेत.
आपल्याकडे हुतात्म्यांचे वा शहिदांचे कार्यक्रम वा स्मृतीदिनानिमित्त, जयंतीनिमित्त काही कार्यक्रम - उपक्रम साजरे करताना राजकारणी मंडळी त्यांच्या भाषणात आणि पत्रकार मंडळी अशा घटनांचे वार्तांकन करताना एक वाक्य हमखास वापरतात. ते म्हणजे "तयांचे व्यर्थ ना हो बलिदान !" पार घासून घासून गुळगुळीत झालेले हे वाक्य फेकायचे म्हणून फेकलेले असते याची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. पण सर्व म्हणजे तरी कोण ? माझ्या तुमच्यासारखे नैमित्तिक देशभक्तीबाज पण अंतरीचे बधीर संवेदनाहीन सामान्य लोक ....
आज बाबू गेनू हयात असते तर त्यांनी हे वाक्य उच्चारणारया बाजारबुणग्यांना काय सुनावले असते ?
आम्ही त्यांचे नाव सडकेला दिले आहे, एखादा पुतळा उभारला आहे..फार तर एखादा सरकारी कार्यक्रम आणि तसबिरीला एखादा सरकारी हार व जोडीला घोषणांचा पाऊस या व्यतिरिक्त अजून काय देणार ?
- समीर गायकवाड .
हुतात्मा बाबू गेनूंच्या जीवनावर काही मुख्य पुस्तके-
'व्यर्थ न हो बलिदान' लेखक: प्रा. डी. डी. माने,
'सांडला कलश रक्ताचा' लेखक: वसंत भालेराव,
'क्रांतिरत्न हुतात्मा बाबू गेनू सैद, लेखक: जगजीवन बबनराव काळे.