Thursday, August 29, 2019

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-६

महाभारत युद्ध संपले. भारतवर्षातील आजवरचे सर्वात विनाशकारी युद्ध म्हणून हे युद्ध ओळखले जाते. महाभारत हा कुरु वंशाच्या सात पिढ्यांचा .(शंतनू-विचित्रवीर्य-पंडू-अर्जुन-अभिमन्यू-परीक्षित-जनमेजय ) इतिहास आहे. हा व्यासांच्या डोळ्यासमोर घडलेला आहे. व्यास हे शंतनूचे सावत्र पुत्र आणि धृतराष्ट्र-पांडू-विदुर यांचे जैविक पिता. यामुळे या लेखनाला वैधता प्राप्त होते. आपण या लेखमालेत त्यातील कृष्णाचा सहभाग फक्त पाहत आहोत. कृष्णाची धडपड ज्या यादव राज्यासाठी चालली होती त्याचे महाभारत युद्धानंतर काय झाले हे आपण या  लेखात पाहू. या लेखमालेतील हा शेवटचा लेख आहे.
भारतवर्षातील जवळपास सर्व  राज्ये यात सहभागी झाली होती. ब्रह्मास्त्राचा रणभूमीवर उपयोग कदाचित प्रथमच (आणि शेवटचा) झाला असावा. येथील सुमारे ८०% प्रौढ पुरुष जनसंख्या या युद्धात मृत्युमुखी पडली. या युद्धानंतर शेकडो वर्षे भारत अंधारयुगात चाचपडत होता. काहीजण या युद्धासाठी कृष्णाला जबाबदार ठरवितात. पण मला तसे वाटत नाही. त्यावेळची भारताची भूराजकीय परिस्थिती, येथील अनेक सामर्थ्यसंपन्न राष्ट्रे आणि त्यांच्यातील वैर पाहता महाभारत झाले नसते तरी एखादे असेच महाभयंकर युद्ध लवकरच झाले असते. कृष्ण हा मुक्त पुरुष होता. त्यामुळे त्याने या युद्धात अप्रत्यक्ष सहभाग घेऊन मानवजातीला पुढील कित्येक हजार वर्षे मार्गदर्शक ठरेल असे गीतेचे ज्ञान दिले. महाभारत लिहिणारे व्यासमुनी, त्यांचा शिष्य वैशंपायन आणि वैशंपायनाला सर्पसत्राच्या समारोपप्रसंगी महाभारत सांगण्याची विनंती करणारा अर्जुनाचा पणतू जनमेजय याच्यामुळे ही महाभारत कथा आपल्यापुढे आली.
महाभारत युद्धात कृष्ण स्वत: काही वीरांसह  पांडवांच्या बाजूने  उभा राहिला तर यादव सेना कौरवांच्या बाजूने लढली हे आपण पहिले. खरेतर यामुळे युद्धात कोणत्याही बाजूचा विजय झाला तरी यादव राज्याला धोका नव्हता. परंतु कृष्णाचा हा अंदाज चुकला. युद्धात सैन्य जीवावर उदार होऊन लढत असते. त्यामुळे ज्याच्या बाजूने लढते त्या बाजूची निष्ठा असल्याशिवाय असे जीवावर उदार होणे शक्य नसते. यादव सैन्याची निष्ठा कृष्णाच्या अशा दुहेरी धोरणामुळे विभागली गेली.
सात्यकी हा कृष्णाचा जीवाभावाचा मित्र होता. कृष्णाला सोडून कोठेही जाण्यास त्याने नकार दिला. त्यामुळे तो युद्धात पांडवांबरोबर होता. युद्धाआधी कृष्ण हस्तिनापूर येथे मध्यस्ती करण्यास गेला तेव्हाही कृष्ण फक्त सात्यकीला सोबत घेऊन गेला होता. यादव सेनेमध्ये अनेक शूर वीर होते. कृतवर्मा हा असाच एक 'अतिरथी' होता. युद्धात त्याने युधिष्ठिर, भीमसेन, धृष्टद्युम्न अशा अनेक वीरांना पराजित केले होते. त्यामुळे तो दुर्योधनाच्या अत्यंत विश्वासातील होता. युद्धाच्या दरम्यान अश्वत्थामाचा तो जवळचा मित्र बनला होता. त्यामुळे अश्वत्थामाचे पिता द्रोणाचार्यांना अधर्माने मारल्याचा त्याला राग आला होता. अश्वत्थाम्याचे पितृवियोगाचे दु:ख त्याने जवळून अनुभवले होते. युद्ध संपल्यावर अश्वत्थामाने रात्रीच्या वेळी पांडवांच्या छावणीवर हल्ला केला तेव्हा कृतवर्मा अश्वत्थामासोबत होता.
कृष्ण आणि यादव सैन्य द्वारकेत परतल्यावर नित्य व्यवहार सुरु झाले. द्वारका परदेशांशी व्यापार करून समृद्ध होत होती. अचानक आलेल्या समृद्धीमुळे काही दोष यादवांच्यात शिरले होते. गोकुळात दह्या-दुधाचा आस्वाद घेत रमलेले यादव आता दारूच्या पाशात अडकले होते. असेच एकदा दारूच्या नशेत असलेल्या कृतवर्मा आणि सात्यकी यांच्यामध्ये 'द्रोणाचार्य यांना ज्या प्रकारे मारण्यात आले त्यावरून' बाचाबाची झाली. यावेळी कृतवर्माने कृष्णाची निर्भत्सना केली. ते सात्यकीला आवडले नाही. त्याने कृतवर्माला ठार मारले. दारूने उन्मत्त झालेले यादव दिसेल ते शस्त्र घेऊन या मारामारीत सामील झाले. त्यांचे आपापसात घनघोर युद्ध झाले. या आपापसातील युद्धालाच 'यादवी' असे नाव आहे. या यादवीत कृष्णाच्या समोरच यादवराज्य नाश पावले.
आता आपले जीवितकार्य पूर्ण झाले हे ओळखून कृष्ण प्रभास नदीच्या काठी ध्यानास बसले असता त्यांचे पाऊल एका पारध्याला हरिणाच्या तोंडासारखे वाटले. त्याने बाण सोडला. तो श्रीकृष्णाला लागून श्रीकृष्णाने प्राण सोडला. एक महान तत्ववेत्ता, युगपुरुष जगाला गीतेसारखे अनमोल रत्न देऊन काळाच्या पडद्याआड गेला.
चक्रधर श्रीकृष्णाला वंदन करून ही लेखमाला येथेच संपवितो. 

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-५

महायुद्धात यादवसेने कौरवांच्या बाजूने लढणार आणि कृष्ण पांडवांच्या हे स्पष्ट झाले. यादवसेनेचा सेनापती कृष्णाचा मोठा भाऊ बलराम होता. बलराम अत्यंत शूर होता. तसेच त्याला कौरवांची बाजू पटत होती. कृष्णाने 'हे युद्ध अधर्माने लढले जाणार आहे. त्यामुळे बलरामाने त्यापासून दूर राहावे' असे त्याला पटविले. त्यामुळे बलराम युद्धाच्या काळात हिमालयात तपश्चर्येला निघून गेला. कृष्णाच्या मुत्सद्दीपणाने हे एक उदाहरण आहे.
युद्धाला सुरुवात होण्याआधी दोन्ही बाजूंकडून निरनिराळ्या राजांना आपल्या बाजूने ओढण्याचे प्रयत्न चालू होते. अशा प्रयत्नात काहीवेळा कृष्ण कमी पडल्याचे जाणवते. मद्रदेशाचा राजा शल्य हा माद्रीचा भाऊ - नकुल, सहादेवांचा मामा होता. त्यामुळे तो पांडवांच्या बाजूने युद्धात सहभागी होणार होता. परंतु वाटेतच त्याला गाठून कौरवांच्याकडून त्याचे आदरातिथ्य करण्यात आले. प्रथम हे आदरातिथ्य पांडवांच्या बाजूने आहे असा त्याचा समज झाला. नंतर वस्तुस्थिती कळल्यावर अतिथी परंपरेचा मान राखून त्याने कौरवांच्या बाजूने युद्ध करण्यास मान्यता दिली.
महाभारत युद्धाला सुरुवात झाली आणि कृष्णाचे युद्धकौशल्य पणाला लागले. या युद्धात भारतवर्षातील बहुसंख्य राज्ये सामील झाली होती. कौरवांची सेना संख्येने मोठी होती. तसेच कौरवांकडे भीष्म, द्रोण, कर्ण यासारखे युद्धात निपुण असलेले बुजुर्ग योद्धे होते. अर्जुन हा पांडवांचा प्रमुख योद्धा  होता. त्याचे सारथ्य कृष्णाने पत्करले. सारथ्य ही सोपी गोष्ट नव्हती. युद्धभूमीत योग्य त्या ठिकाणी आपला रथ सांभाळून नेणे हे कौशल्याचेच काम होते. कौरवांकडे शल्यराजा  हा असाच उत्कृष्ट सारथी होता. त्याने कर्णाचे सारथ्य स्वीकारले होते. युद्धभूमीत झालेल्या रक्ताच्या चिखलात तरीही कर्णाचा रथ रुतला. यावरूनच सारथ्याचे महत्व लक्षात येते. युद्धप्रसंगी एक बाण अर्जुनाच्या डोक्याचा वेध घेऊन आला. सावध असलेल्या कृष्णाने रथाच्या घोड्यांना त्याक्षणी खाली बसविले आणि अर्जुन वाचला. यावरून कृष्ण किती कसलेला सारथी होता हे लक्षात येते. सारथ्याला आणखीही एका गोष्टीमुळे महत्व आहे. युद्धाच्या धामधुमीच्या आणि अत्यंत तणावाच्या वातावरणात तो एकटाच त्या योध्याबरोबर असतो. योध्याचे मानसिक स्वास्थ्य सांभाळणे, प्रसंगी त्याला लढण्यास प्रोत्साहित करणे हे काम सारथीच करू शकतो. कृष्ण हे काम करण्यास किती योग्य होता हे आपल्याला युद्धाच्या प्रारंभीच त्याने अर्जुनाला धीर दिला त्यावरून लक्षात येते. याउलट शल्य हा मद्रदेशाचा राजा होता. तो उत्तम सारथ्य करू शके. म्हणून कर्णाने युद्ध करण्यास तयार होताना 'शल्य हाच सारथी असावा' अशी अट घातली. शल्य हा मद्रदेशासारख्या मोठ्या देशाचा राजा असल्याने त्याला सारथ्य करणे अपमानास्पद वाटले. परंतु त्याचा दुर्योधनापुढे नाईलाज झाला. 'मी काहीही बोललो तरी मला कोणी अडवता काम नये' अशा अटीवरच त्याने कर्णाचे सारथ्य स्वीकारले. युद्धाच्यावेळी तो सातत्याने कर्णाबद्दल अपशब्द उच्चारित होता, कर्णाचा 'सूतपुत्र' म्हणून अपमान करीत होता. यामुळे कर्णाची एकाग्रता भंग पावली. कदाचित स्वतः:शल्याचीही एकाग्रता भंग पावली असावी. त्यामुळेच कर्णाचा रथ रक्ताच्या चिखलात फसला.
युद्धाला प्रत्यक्ष तोंड लागण्याआधीच पांडवांच्या सेनापतीचा - अर्जुनाचा धीर खचला. यावेळी कृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला आणि त्याचे मन खंबीर केले. यावरून कृष्ण हा उत्तम युद्धमानसशास्त्रज्ञ होता हे ही लक्षात येते. कृष्णाने सांगितलेली ही भगवद्गीता आद्य शंकराचार्यांनी वेदांताच्या तीन आधार ग्रंथांपैकी - प्रस्थान त्रयींपैकी- एक म्हणून स्वीकारली यातच गीतेचे महत्व दिसून येते. आजही गीता हाच हिंदू धर्माचा आधारग्रंथ म्हणून मानण्यात येतो. कृष्ण हा ;ब्रह्मज्ञानी' माणूस होता, 'मुक्तावस्थेला पोचलेला' होता हे भागवद्गीतेवरून सहज लक्षात येते. (मी अद्वैत वेदांताचा पुरस्कर्ता आहे. आपण सर्वच 'ब्रह्म' आहोत. परंतु ब्रह्मज्ञान झालेले  थोडेच आहेत . त्यामुळे कृष्णाला 'देवत्व' न देता कृष्ण हा ब्रह्मज्ञानी माणूस होता असे मी मानतो).
आधी उल्लेख केल्याप्रमाणे कृष्णाला बालवयात आलेल्या अनुभवांमुळे 'वाईट लोकांशी वागताना अति चांगुलपणा दाखविला तर ते विनाशाला आमंत्रण असते ' याची जाणीव खूप आधीच झाली होती. त्यामुळे तथाकथित धर्माच्या नियमांना न जुमानता कृष्णाने या युद्धात पांडवांना सल्ले दिले.
कौरवांचे सेनापती भीष्म यांनी सर्व पांडवांचा दुसऱ्या दिवशी नाश  करण्याच्या प्रतिज्ञेची माहिती कृष्णाला त्याच्या गुप्तहेरांकरवी मिळताच तो द्रौपदीसह  त्यांना भेटला आणि भीष्मांना ठार करण्याचे रहस्य त्यांच्याकडूनच त्याने जाणून घेतले. भीष्म हे रणधुरंदर होते, तसेच त्यांना इच्छामरणाचा वर मिळाला होता हे येथे लक्षात घेतले पाहिजे. ही भीष्मांकडून रहस्य जाणून घेण्याची कथा आहे ती खूपच रोचक आहे, पण विस्तारभयास्तव येथे देत नाही.
द्रोणाचार्यांचे आपल्या एकुलत्या एक मुलावर -अश्वत्थामावर खूप प्रेम होते. द्रोणाचार्य त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे पांडवांना भारी पडत आहेत असे दिसताच त्यांना 'अश्वत्थामा युद्धात मेल्याचे' खोटे  सांगून ते विचलित होताच मारण्याचे कृष्णाने ठरविले. नेहमी सत्य बोलणाऱ्या धर्माला ही खोटी बातमी द्रोणाचार्यांपर्यंत पोचविण्यास सांगितले. द्रोणाचार्य धर्माने सांगितलेल्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवतील याची कृष्णाला खात्री होती. पण खोटे बोलण्यास धर्म तयार नव्हता. तेव्हा अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारून 'अश्वत्थामा मेल्याचे' द्रोणाचार्यांना सांगण्यास धर्माला सांगितले गेले. तरीही धर्म शेवटी 'नरो व कुंजरो वा' (माणूस अथवा हत्ती) असे सांगणार होता. पण कृष्णाने समयसूचकता वापरून यावेळी शंख जोरात वाजविला. त्यामुळे हा वाक्याचा शेवटचा भाग द्रोणाचार्यांना ऐकू गेला नाही. धर्मराजाच्या नेहमी खरे बोलण्याच्या प्रतिज्ञेला बाधा आली नाही.
महाभारत युद्धाचा शेवट अत्यंत भीषण झाला. युद्धात पांडवांचे सर्व वंशज मारले गेले. यामुळे द्रौपदी दु:खी झाली.अश्वत्थामाने सोडलेले ब्रह्मास्त्र परत घेण्याची आज्ञा व्यासांनी दिली. पण अश्वत्थामाला ते परत घेण्याची कला ज्ञात नव्हती. यावेळी अभिमन्यूची बायको उत्तरा गर्भवती होती. तिच्या गर्भावर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र वाळविल्याने तिचा पुत्र जन्मात:च मृतवत निपजला. कृष्णाने त्याला जिवंत केले (औषधी वनस्पतीचे ज्ञान होते?). परंतु तो शरीर आणि  मनाने दुबळा राहिला.  त्याला नागांच्या तक्षक राजाने मारले. परंतु परीक्षिताने पांडवांचा वंश पुढे चालू ठेवला. त्याचा मुलगा जनमेजय शूर निपजला.
युद्ध संपल्यावर कृष्ण आणि कौरवांच्या बाजूने लढणारी (युद्धात वाचलेली) यादव सेना द्वारकेला परतली. कृष्णाने आपले आयुष्य यादव राज्यासाठी समर्पित केले होते. पण त्याच्या डोळ्यासमोरच यादव राज्याचा अंत त्याला पाहावा लागला. पुढील भागात त्यासंबंधी. पुढील भाग या लेखमालेतील शेवटचा भाग असेल.

Tuesday, August 27, 2019

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-४

पांडवांकडे  साम्राज्याचा काही भाग आला. त्यांची राजधानी इंद्रप्रस्थ वसविली गेली. जरासंध, नरकासुर, शिशुपाल यासारखे प्रबळ विरोधक मारले गेले. पांडवांचा राजसूय यज्ञ संपन्न झाला. आता कृष्णाचे नियोजन यशस्वी ठरू लागले होते. पण कृष्णाला आपल्या जवळची माणसे त्यांच्या स्वभावामुळे गोत्यात आणू शकतील याचा अंदाज आला नाही. धर्मराज धर्माचे नियम पाळण्यात कोणतीही कसूर करीत नसे. परंतु 'मोह' या एका षड्रिपूपासून त्याची मुक्तता झाली नव्हती. राजसूय यज्ञामुळे कौरव दुखावले गेले होते. शकुनी हा हस्तिनापुरात ठाण मांडून बसला होता आणि आपल्या भाच्यांना मदत करीत होता. शकुनी हा पाताळयंत्री होता आणि मानसशास्त्रात प्रवीण होता. त्याने आपल्या बोलण्यात धर्मराजाला गुंतविले आणि द्यूत खेळण्याच्या भरास घातले. धर्मराजाने द्युतात आपल्या बायको भावांसह सर्वकाही पणास लावले आणि तो हरला. पांडवांच्या नशिबी तेरा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास आला. कृष्णाने केलेले नियोजन एका क्षणात उधळले गेले.
कृष्ण उत्तम नियोजनकार होता. अनपेक्षित घटनेने आधीचे नियोजन उधळले गेले तरी नाउमेद न होता नव्या परिस्थितीत नव्याने नियोजन करणे त्याला अवगत होते. पण आता किमान चौदा वर्षे थांबणे आवश्यक होते. आता पांडवांना परत राज्य मिळणे शक्य नाही हे त्याने ओळखले. कौरव-पांडव युद्धाशिवाय पर्याय नाही हे त्याच्या लक्षात आले. आता कृष्णाने या युद्धाच्या तयारीसाठी नियोजनाला सुरुवात  केली. येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने करायचे या भावनेने तो कामाला लागला. भारतवर्षातील राज्ये आपल्या बाजूला कशी राहतील हे कृष्णाने या काळात पाहिले. धर्म-द्रौपदी यांना एकांतात पाहिल्याने अर्जुनाला एक वर्ष द्रौपदीचा सहवास मिळणार नव्हता. या काळात येथील अनेक अवैदिक समूहांना पांडवांशी जोडून घेतले गेले. नागा कन्या उलुपी हिच्यापासून अर्जुनाला मुलगा झाला. मणिपूरची चित्रांगदा हिच्याशीही अर्जुनाने विवाह केला आणि तिच्यापासून त्याला बभ्रुवाहन हा मुलगा झाला. भीमाने हिमाचल प्रदेशमधील हिडिंबा हिच्याशी विवाह केला आणि तिच्यापासून घटोत्कच हा मुलगा झाला.  पांडवांच्या या पराक्रमी मुलांनी महाभारत युद्धात अतुलनीय कामगिरी केली. या चौदा वर्षांच्या काळात कृष्णाने हस्तिनापूरशी आपले संबंध चांगले ठेवले होते. राजनीतीत सर्वांशी संबंध चांगले ठेवणे गरजेचे असते हे कृष्ण जाणून होता.
पांडव वनवास-अज्ञातवास संपवून परतल्यावर त्यांना परत राज्य मिळावे म्हणून कृष्णाने शिष्टाई केली. पण ती  अयशस्वी झाली. युद्ध होणार हे निश्चित झाले. कृष्ण कौरव आणि पांडव या दोघांशीही चांगले संबंध ठेऊन असल्याने कौरव आणि पांडव या दोघांनाही त्याच्या मदतीची अपेक्षा होती.
आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्णाच्या मनात आपल्या यादव राज्याच्या हिताला प्रथम प्राधान्य होते. त्यामुळे कृष्णाने या युद्धात कोणा एकाचा पक्ष न घेता दोन्ही पक्षांना न्याय दिला. आपले सैन्य कौरवांच्या मदतीला दिले, तर आपण स्वतः: पांडवांच्या बरोबर राहिला. आता युद्धात कोणाचाही विजय झाला तरी यादव राज्याचे हित सांभाळणे कृष्णाला शक्य होणार होते. हा कृष्णाच्या मुत्सद्देगिरीचा हा कळस असावा. अर्थात यामुळे यादव राज्याचे हित सांभाळले गेले नाहीच, तर यादव राज्याचा विनाश झाला. या संबंधी आपण नंतर पाहू. 

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-३

कृष्णाने आपल्या आजोबांना आणि आई-वडिलांना तुरुंगात टाकणाऱ्या, आपल्या भावंडांना जन्मात:च ठार मारणाऱ्या आपल्या जुलुमी मामाचा, कंसाचा वध लहानपणीच केला. पण त्यामुळे कंसाचा सासरा आणि मगधेच्या बलाढ्य साम्राज्याचा सम्राट जरासंधाचा त्याने रोष ओढवून घेतला. जरासंध आता कृष्ण आणि यादव राज्याचा विनाश करण्यासाठी सर्व प्रयत्न करीत होता. त्यामुळे कृष्णाला गोकुळ सोडून  द्वारकेला प्रस्थान करावे लागले हे आपण पहिल्या भागात पहिले. आपल्या छोट्याशा यादव राज्याला वाचविण्यासाठी कृष्ण एका बलाढ्य राज्याच्या शोधात होता. त्याला वनवासातील पांडव भेटले. आता पुढील खेळी तो पांडवांच्या सहाय्याने करणार होता. पांडवांना कुरु साम्राज्याचा एक भाग मिळाला. कृष्णाच्या नियोजनाला आता फळे येऊ लागली होती. पांडवांना मिळालेला भाग खांडववाणाचे निबीड अरण्य होता. तेथे लढाऊ नागा समाजाची वस्ती होती आणि ते पांडवांचे वर्चस्व मान्य करण्याची शक्यता नव्हती. कृष्णाने हा प्रश्न सोडविण्यासाठी आपले कौशल्य वापरले. कृष्णाची गुप्तहेर यंत्रणा प्रभावी असावी. या यंत्रणेच्या साहाय्यानेच त्याने वनवासातील पांडवांचा शोध घेतला असावा. आता खांडववनातील नागा राजा तक्षक आपल्या सैन्यासह उत्तरेस गेला असल्याची बातमी कृष्णाने मिळविली आणि त्याचा फायदा घेऊन खांडववन जाळून टाकले. त्यातील सर्व नागा कुटुंबांचा बायकामुलांसह कृष्णाने संहार केला. फक्त मयासूर या स्थापत्यअभियंत्याला अभय दिले आणि त्याच्याकडून मयसभा हा राजवाडा पांडवांसाठी बांधून घेतला. नागांचा राजा तक्षक याला ही बातमी समजताच तो सुडाने पेटून उठला. त्यानंतर नागांबरोबर पांडवांचा संघर्ष चार पिढ्या चालू होता. त्यात अर्जुनाचा नातू परीक्षित याला आपले प्राण द्यावे लागले. शेवटी परीक्षिताचा मुलगा जनमेजय याने चालविलेले सर्पसत्र (नागांचा समूळ विनाश) आस्तिकऋषींच्या  मध्यस्तीने थांबले तेव्हाच हा संघर्ष थांबला. (आस्तिक ऋषींची आई नागा होती).
पांडवांसाठी 'इंद्रप्रस्थ' ही राजधानी तयार झाल्याबरोबर कृष्णाने पुढील खेळीला सुरुवात केली. बलाढ्य कुरु साम्राज्याचा एक भागच पांडवांना मिळाला होता. साम्राज्याची मूळ राजधानी हस्तिनापूर कौरवांकडेच होती. त्यामुळे बलाढ्य कुरु साम्राज्याचा वारसा आपल्याकडेच आला आहे हे अन्य राजांना दाखविणे पांडवांना भाग होते. यासाठी कृष्णाने धर्मराजाला राजसूय यज्ञ करण्यास सांगितले. 'राजसूय यज्ञ'' आणि 'अश्वमेध यज्ञ' हे जगज्जेते राजेच करू शकत होते. पांडवांनी हा यज्ञ करणे म्हणजे त्यांचे वर्चस्व सर्व राजांनी मान्य करण्यासारखे होते. हे कौरवांसाठी लाजिरवाणे होते. परंतु जवळचे नातेसंबंधी असल्याने आणि हस्तिनापूरचे राज्य अजूनही भीष्म-द्रोण-विदुर यांच्या सल्ल्याने चालत असल्याने कौरव या यज्ञात अनिच्छेनेच सहभागी झाले.
मात्र राजसूय यज्ञ करण्याआधी या यज्ञाला विरोध करू शकतील अशा राजांचा पाडाव करणे आवश्यक होते. कृष्णाने भीमाला आणि अर्जुनाला घेऊन मगध देशाची राजधानी गिरिव्रज गाठली. तेथे भीमाने मल्लयुद्धात जरासंधाचा वध  केला आणि त्याच्या मुलाला मगधाच्या गादीवर बसविले. जरासंधाने बंदी बनविलेल्या अनेक राजांना कृष्णाने सोडले. याच सुमारास कृष्णाने दूरवर आसामपर्यंत जाऊन नरकासुराचा वध  केला. या दोन शक्तिमान राजांचा पाडाव केल्यावरच राजसूय यज्ञ केला गेला.
राजसूय  यज्ञाचा उपयोग कृष्णाने आपल्या राजकारणासाठी पुरेपूर करून घेतला. कौरवाना यावेळी हलक्या दर्जाची कामे देऊन त्यांची जागा दाखविण्यात आली. आपल्या वैभवाचे प्रदर्शन पांडवानी या यज्ञात पुरेपूर केले. मयासुराने बांधलेली अद्भुत मयसभा सर्वानाच चकित करून गेली. मयसभेत जेथे पाणी दिसत होते तेथे जमीन होती तर जमीन दिसत होती तेथे पाणी होते. यामुळे दुर्योधन गोंधळून गेला. तेव्हा द्रौपदीला हसू आवरले नाही. हा अपमान समजून दुर्योधन रागावला.
राजसूय यज्ञात अग्रपूजा करण्याचा मान भीष्माने कृष्णाला देण्यास सुचविले. परंतु चेदी नरेश शिशुपाल याला हे रुचले नाही. कृष्ण हा कोणत्याही देशाचा राजा नसल्याने अथवा ब्राह्मण नसल्याने त्याला हा मान मिळू शकत नसल्याचे शिशुपालाचे म्हणणे होते. त्याने यज्ञमंडपातच अग्रपूजेचा मान असलेल्या कृष्णाला अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. यज्ञमंडपात कोणीही सैन्य अथवा शस्त्रे न्यायाची नाहीत, कोणालाही मारायचे नाही  असा दंडक होता. तसेच यज्ञमंडपात कोणी भांडण करू नये असाही संकेत होता. शिशुपालाने संकेत मोडल्याने कृष्णाने यज्ञमंडपातच शिशुपालाला ठार मारले. शिशुपालाचा संतापी स्वभाव कृष्णाला माहित होता. शिशुपाल कृष्णाचा द्वेष करतो (रुक्मिणी स्वयंवरात कृष्णाने रुक्मिणीला पळविले होते. तिचा शिशुपालाबरोबर विवाह व्हावा अशी तिच्या भावाची-रुक्मिची इच्छा होती) याची कृष्णाला कल्पना होती. त्यामुळे शिशुपालाला मारण्याची संधी मिळावी म्हणून कृष्णाने कदाचित भीष्मांकरवी हा डाव मुद्दाम खेळाला असावा.
यज्ञात कोणालाही मारू नये हा नियम कृष्णाने मोडला. नंतरच्या काळात असे तेव्हा घालून दिलेले अनेक दंडक कृष्णाने मोडलेले आढळतात. कृष्णाचे आजोबा उग्रसेन राजे हे धर्मात्मा समजले जात. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा उठवून जरासंध आणि कंसाने त्यांना आणि कृष्णाच्या आई-वडिलांना कैदेत टाकले हे कृष्णाने लहानवयातच पहिले होते. 'कपटी लोकांबरोबर अति चांगुलपणा करणे हे सर्वनाशाला आमंत्रण देते' हा धडा कृष्णाने तेव्हाच गिरविला असावा. म्हणूनच सर्व दंडकांना वळसा घालून आपल्याला हवे तेच करण्याचा कृष्णाचा स्वभाव आपल्याला महाभारतात सतत जाणवत राहतो. 

Sunday, August 25, 2019

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-२

कृष्णाने यादवांना द्वारकेला आणले आणि कालयवन याच्याबरोबर झालेल्या युद्धात योग्य रणनीती वापरून त्याला ठार मारले हे आपण मागील भागात पहिले. मात्र कृष्णाला याच वेळी यादव राज्यावर येऊ घातलेल्या संकटाची जाणीव झाली असावी. कंसाला मारल्याने त्याचा सासरा आणि अति बलाढ्य मगध साम्राज्याचा सम्राट जरासंध कृष्णावर रागावलेला होता. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जाऊन बसलेल्या कृष्णापर्यंत पोचण्याचा जरासंध प्रयत्न करणार हे स्पष्ट होते. मगध साम्राज्य आणि द्वारका यामध्ये कुरु साम्राज्य होते. त्याचा राजा धृतराष्ट्र होता. भीष्म, द्रोण इत्यादींच्या सल्ल्याने कुरु साम्राज्याचा राज्यकारभार चालू होता. त्यामुळे यादव राज्याला लगेच धोका नव्हता. परंतु धृतराष्ट्राच्या मुलांबद्दल काही सांगता येत नव्हते. मगध साम्राज्याने अनेक बलशाली राज्यांना आपले मित्र केले होते. हस्तिनापूर (येथे अजून दुर्योधनाच्या हातात राज्य आले नव्हते, पण येण्याची शक्यता होती), गांधार (शकुनीचा भाऊ राज्यकारभार पाहत होता), चेदी (शिशुपाल), विदर्भ (रुक्मि), सिंधूदेश (जयद्रथ), आसाम (नरकासुर), पौंड्र (वासुदेव), विराटाचे राज्य (सत्ता सेनापती किचकाच्या हातात) इत्यादी राज्यांची भक्कम फळी मगध साम्राज्याने उभी केली होती. यादव राज्य त्यासमोर कस्पटासमान होते. श्रीकृष्णाला कोणा भक्कम राज्याच्या आधाराची गरज होती आणि तो त्याच्या शोधात होता.
अशा वेळी द्रौपदी स्वयंवरात कृष्णाने प्रथम पांडवांना पाहिले. तेथे तो आगंतुक पाहुणा म्हणून आला होता. त्याला स्वयंवराचे आमंत्रण नव्हते (तो पुरु वंशाचा नव्हता तर यदु वंशाचा होता म्हणून ?). हे पांडवच आहेत हे त्याने ओळखले.  पांडवांचा उपयोग आपल्याला आपले राज्य राखण्यासाठी होऊ शकेल हे कृष्णाच्या चाणाक्ष नजरेने हेरले. तो पांडवांचा शोध घेत त्यांच्या घरी पोचला. 'आणलेली भिक्षा सर्व भावंडे वाटून घ्या' असा आदेश कुंती देत असतानाच तो तेथे पोचला. या आदेशाचे पालन कसे करायचे हे त्यानेच पांडवांना समजावून दिले. कुंतीला आपल्या नातेसंबंधांची जाणीव त्याने करून दिली आणि कुंतीचा विश्वास संपादन केला. सर्व पांडवांचे मनही त्याने जिंकले आणि अर्जुनाचा जवळचा मित्र झाला. पांडवांचा मित्र या नात्याने त्याने कौरवांशी मैत्री केली आणि भीष्म, द्रोण इत्यादींचा विश्वास प्राप्त केला. कृष्णाच्याच सल्ल्याने पांडवांनी राज्याची मागणी केली. कौरव त्यासाठी तयार नव्हते. शेवटी भीष्मांनी राज्याची फाळणी करून निबीड खांडववन पांडवांना दिले. ते जाळून कृष्णाने तेथे इंद्रप्रस्थ ही राजधानी पांडवांसाठी उभारली. तेथे नागा जमातीची वस्ती होती. नागा हे स्वतंत्र बाण्याचे लोक होते. त्यांनी पांडवांना सुखासुखी राज्य करून दिले नसते. नागा आणि कुरु /यदु वंशीय यांचा संघर्ष पूर्वीपासूनच चालू होता. म्हणून कृष्णाने तेथील नागांना मारण्याचा सल्ला अर्जुनाला दिला. वाडे बांधण्याची कला नागांना अवगत होती. नागांचा स्थापत्यशास्त्रद्न्य मयासूर याला कृष्णाने अभय दिले आणि पांडवांसाठी राजमहाल बांधण्याची आज्ञा दिली. हीच ती प्रसिद्ध मयसभा. महाभारत घडविण्यात या मयसभेचा महत्वाचा वाटा आहे. 

श्रीकृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट-१

श्रीकृष्ण हा खूप मोठा स्ट्रॅटेजिस्ट होता. 
कंस हा अति बलाढ्य मगध साम्राज्याचा राजा जरासंध याचा जावई. जरासंध याच्या दोन्ही मुलींची (आसित आणि प्रापित) लग्ने कंसाबरोबर झाली होती. प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत मगध हीच भारतभूमीची मध्यवर्ती सत्ता राहिली आहे. हिरण्यकश्यपू-प्रल्हाद-बळीराजा हे मगधेचेच सम्राट होते. जरासंध याने ८६ राजांना आपल्या कैदेत ठेऊन त्यांचे राज्य बळकाविले होते. उग्रसेन हे मथुरेचे राजे होते. ते धर्मात्मा म्हणूनच ओळखले जात जरासंध त्याच्या मुलींचे लग्न कंसाशी करण्याच्या निमित्ताने सैन्यासह मथुरेसी आला आणि त्याने उग्रसेनाना कैदेत टाकून मथुरेचे राज्य त्यांचा मुलगा आणि आपला जावई कंसाच्या हातात दिले. कंसाने त्याची बहीण देवकी आणि तिचा पती वसुदेव यांना कैदेत टाकले. त्यांची मुले तो मारून टाकी. अशा परिस्थितीत वसुदेवाने तुरुंगाच्या रक्षकांशी संधान बांधून पूर आलेली नदी ओलांडून कृष्णाला सुरक्षित स्थळी पोचविले. पण कंसाला हे कळताच त्याने कृष्णाला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले. अशा वातावरणात परक्या घरी वाढलेल्या या मुलाला किती तणावपूर्वक परिस्थितीतून जावे लागले असेल? नंद आणि यशोदेच्या ठाम पाठिंब्यामुळेच हा मुलगा असा असामान्य निपजला. अगदी लहान वयातच योग्य नियोजन करून कंसासाख्या पाताळयंत्री माणसाला बेसावध ठेऊन मारणे हे सोपी गोष्ट नव्हे. तेव्हापासूनच त्याने आपले नियोजनकौशल्य दाखविण्यास सुरुवात केली. यावेळी बंदिवासात ८६ राजांना कृष्णाने मुक्त केले. त्यामुळे या राजांचा पाठिंबा पुढील काळात कृष्णाला मिळाला. कंसाला मारल्यामुळे जरासंघ रागावला. जरासंघ भारतातील बलाढ्य साम्राज्याचा सम्राट होता. त्याचा सेनापती तशाच बलाढ्य सिंधू साम्राज्याचा राजा होता. सातत्याने यादव साम्राज्यावर हल्ले करून त्याचे लचके तोडण्यास जरासंघाने सुरुवात केली. बलाढ्य यवन साम्राज्याचा (वायव्य भारत) सम्राट कालयवन याला जरासंघाने मदतीला बोलाविले. आता एका बाजूने मगध सेना आणि दुसऱ्या बाजूला यवन सेना अशा कचाट्यात कृष्ण सापडला. एकाच वेळी या दोन्ही बलाढ्य शत्रूंशी सामना करणे छोट्या यादव राज्याला शक्यच नव्हते. अशावेळी कृष्णाचे नियोजन कौशल्य परत एकदा कामी आले. कृष्णाने यादव समाजाला धोक्यात टाकण्याऐवजी यादव राज्य दूर हलविण्याचे ठरवून केवळ आपल्या सैन्यासह या संकटाचा सामना करण्याचे ठरविले. हे राज्य हलवितानाही कृष्णाची दूरदृष्टी दिसली. आपले पेशाने गवळी असलेल्या यादवांचे राज्य दूधदुभत्याच्या गवताळ प्रदेशात न हलविता समुद्रकाठच्या उत्तम बंदर असलेल्या द्वारकेत हलविले. द्वारका ही खूप जुनी भरभराटीस आलेली नगरी होती (तिचे अवशेष सापडले आहेत). द्वारकेस गेल्यावर यादवांनी दुधाचा व्यवसाय केला नाही, तर समुद्रमार्गे पश्चिमी देशांशी व्यापार केला (याचे पुरावे सीरिया आदी देशांत सापडले आहेत. महाभारतात उल्लेख असलेल्या श्रीकृष्णाने वितरित केलेल्या तीन प्राण्याच्या मुद्रा तेथे सापडल्या आहेत). त्यामुळे द्वारका भरभराटीस आली (पूर्वीच्या भाषेत सोन्याची झाली).
यादवांना द्वारकेत पाठविल्यावर कृष्णाने कालयवनाशी सामना केला. इंद्राने वर दिलेला मुचकुंद राजा मथुरेजवळच्या टेकड्यांत झोपला असून त्याला जो कोणी उठवेल तो भस्म होईल अशी अफवा कृष्णाने उठविली. कालयवानाच्या मोठ्या सेनेला आपण घाबरलो आहोत असे दाखवून कृष्णाने त्याला एकट्यालाच लढण्याचे आव्हान दिले. बलाढ्य कालयवानाने ते लगेच स्वीकारले. मग घाबरल्याचे दाखवीत कृष्ण या टेकड्यांच्या बाजूला पळाला. कालयवन त्याच्या मागे टेकड्यात शिरला. आधीच पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात कालयवन ठार झाला. मुचकुंद राजाला उठविल्यामुळे कालयवन भासम झाला असे कृष्णाने उठविले. आपला राजा प्रत्यक्ष इंद्राच्या कोपाने भस्म झाल्याचे पाहून प्रचंड यवनसेना घाबरली आणि पळत सुटली.
पुढे महाभारत युद्धापूर्वी कृष्णाच्या नियोजनामुळे अनेक राजे पांडवांच्या बाजूने आले. तरीही कौरव सेना भारी होती. पण कृष्णाच्या मानसशास्त्रीय युद्ध खेळण्याच्या कौशल्याने ही सेने गलितगात्र झाली आणि शेवटी पांडवांचा विजय झाला.