Sunday, May 27, 2018

'घोंगड्या' ✍🏼 रवि वाळेकर, पुणे

"घोंगड्या लै डेंजर हाये बर्का" आमच्याच वाड्यात राहणाऱ्या सातवीतल्या सुनिलदादाने मौलिक माहिती पुरवली होती.

"त्याच्याशी एकदम नीट राहायचे. आमच्या वेळी ४६ जणांना त्याने पहिल्याचं घटक चाचणीत नापास केले होते"

"बाप रें! कितीजणं होते तुमच्या वर्गात?" मी भीतभीत विचारले.

"४७!"

पोटात गोळाचं आला!

त्या सरांचे आडनाव चांगले दोन अक्षरी होते. हे 'घोंगड्या' असे त्यांना का म्हणायचे, ठाऊक नव्हते. शाळेतले सगळेचं 'दादा' त्यांना 'घोंगड्या' म्हणायचे, म्हणून आम्हीही म्हणायला लागलो.

प्राथमिक शाळेची टेकडी पार करून नुकतीच माध्यमिक शाळेच्या डोंगरावर चढायला सुरूवात झाली होती. शाळेचा गणवेश, टैमटेबल, इंग्रजीत 'म्याय कम्मिंग, स्स्सर?' असे विचारणे याचे भलतेचं अप्रूप वाटत होते.

प्राथमिक शाळेतं, हे सारे नव्हते. गणवेश वगैरे फालतू भानगडी नव्हत्या, पुर्ण कपडे घालून जाणे, हेचं खुप होते. एक पवार गुरुजी एकटे सगळा वर्ग हाकायचे. सरकारी कामांमधून वेळ मिळाला, तर अधुनमधून शिकवायचे पण! 'पारथमिक शाळा' असा खरा ऊच्चार असलेल्या प्राथमिक या शाळेत - ४ वर्षात - मी, 'गायी पाण्यावरं काय म्हणूनी आल्या' ही कविता आणि १२ पर्यंतचे पाढे, एवढेचं शिकल्याचे आठवते. चार वर्षे वर्गात इतरं काय शिकलो, ते काहीच आठवतं नाही.

वर्गात नसेल, पण 'डबा खायच्या' आणि 'लघ्वीच्या' सुट्टीत मात्र बरेचं ज्ञानसंपादन व्हायचे.

रिठ्याच्या बिया घासून गरम करून चटका कसा द्यायचा, अंगठा चार बोटांच्या मध्ये घुसवून आणि अंगठ्याला थुंकी लाऊन बुक्की कशी मारायची, कागदी विमानाच्या शेपटात पोट खपाटीला जाईपर्यंत फुंक मारून सगळ्यांपेक्षा वरं कसे ऊडवायचे, भिंगाने कागद कसा जाळायचा, पडलेल्या दाताचा योग्य ऊपयोग कसा करायचा, रक्ताने भळभळणाऱ्या जखमेवर एका दिवसात खपली धरण्यासाठी काय करायचे, अशा अनेक गोष्टी गुरूजींनी न शिकवता आणि गुरूजींना न कळू देता शिकलो.

'मुली' नामक देवाने निव्वळ तिरस्कार करण्यासाठी बनवलेल्या प्राण्यापासून दुर कसे राहायचे, कधीकाळी एखाद्या 'फिंद्री'च्या मागे बसावेचं लागले, तरं त्या मुलीला कळूही न देता तिच्या वेण्यांच्या 'रिबणी' एकत्र करकचून कशा बांधायच्या, अशा बऱ्याच मौलिक गोष्टी शिकता शिकता शाळेतली पहिली ४ वर्षे कशी निघून गेली, ते कळलेही नव्हते.

पवार गुरूजींचे एक बरे होते. 'हजेरी' घेतली की एखादा धडा वाचायला वा कविता पाठ करायला सांगायचे आणि आपल्या लिखाणाच्या कामाला लागायचें. ते त्यांच्या कामात आणि आम्ही आमच्या कामात! एकमेकांना काडीचाही त्रास देत नव्हतो. वर्षातून एकदा 'इनसपेक्टर सायेब' नावाचा फाजील इसमं येई, तो यायच्या आधीचा आठवडा फक्त थोड्या हाल-अपेष्टा काढाव्या लागायच्या!

पवार गुरूजी अधुनमधून छड्या वगैरे मारायचे, पण त्याचे काही विशेष नव्हते. त्यांची खरी मोठी शिक्षा असायची, ती दोन मुलींमध्ये बसायची शिक्षा! सगळी मुले तिरप्या डोळ्यांनी बघतं तोंडावर हात ठेऊन हसायचे आणि शिक्षा मिळालेल्या मुलाला मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे! लहान होतो, समजं नव्हती.

त्या वयात ती शिक्षा वाटायची!

(पुढे कॉलेजात आल्यावर, पवारगुरूजींनी दोन बुके जास्त शिकून आपल्या वर्गावरं 'प्रोफेसर' म्हणून कमीतकमी या शिक्षेसाठी यायला हवे, असे राहून राहून वाटायचे!)

माध्यमिक शाळेला 'हाय्स्कूल' म्हणायचे, हे नव्या शाळेच्या पहिल्याचं दिवशी समजले. शाळेत कधी झिपऱ्यांची शुद्ध नसलेल्या गुरूजींच्या साऱ्या शिष्या इथे दोन वेण्या घालून, एकसारख्या लाल रंगाच्या रिबिणी लाऊन एकदमं झोकात! स्नो-पावडर लाऊन, कपाळावर टिकली लाऊन, डोक्याला खोबरेल तेल चोपडून आलेल्या, निळ्या गणवेशातल्या कित्येकींना तरं पहिल्या दिवशी आम्ही ओळखलेही नाही. मुलांची अवस्थाही वेगळी नव्हती. दोन्ही खिशातल्या गोट्या, चिंचा, विट्ट्या यांच्या वजनाने चड्डीची बटणे तुटली तरी, पर्वा न करणारी पोरं इथे स्वच्छ पांढरा शर्ट निळ्या चड्डीत खोचून, 'जंगणमन'ला चप्पल घालून रांगेत हजर!

संपुर्ण नाक स्वच्छ असलेल्या विजा ढगेला (मुळ ऊच्चार - इजा ढग्या) पवार गुरुजींनी सोडा, खुद्द इजाच्या टेलर बापानेसुद्धा ओळखले नसते!

"ही काही धर्मशाळा नाही. कधीही यायचे आणि कधीही जायचे चालणार नाही. वर्गात येताना 'म्याय कमिन सर' असे विचारायचे"

पहिल्याचं तासाला पहिलेच 'सर' कडाडले! गुरुजींचे इथे 'सर' झाले होते. 'काटकसर' हा शब्द त्याकाळी सगळीकडे ऐकू यायचा, त्यामुळे या 'हायस्कूला'त 'काटक' नावाचे एखादे सरं असावे, असे ऊगाचचं वाटले. नव्हते. काटक-सर कोणी नव्हते, पण हे पहिल्याचं तासाला आलेले सर मात्र भलतेचं राकट-सर होते.

इंग्रजीत बोलायला लागलो, या आनंदात पहिला दिवस मस्त गेला.

दुसऱ्या दिवशी 'जंगणमन' आणि 'पारथना' संपवून बेंचवर बसलोचं होतो, की सरं आले. मी नुकताच पाच काडिपेट्यांवरच्या चित्रांच्या बदल्यात दोन रिकाम्या सिगारेट पाकिटांचा 'व्यवहार' आटोपला होता. ही सिगारेटची पाकिटे वेगळी होती. आमच्या गावात ती सिगारेट कोणी पीत नव्हते, त्यामुळे दुर्मिळ खजिनाच मला मिळाला होता. व्यवस्थित 'डिल' झाल्याची खुशी दोन कानांमध्ये आरपार पसरली होती.

"हसतोय काय रे फिदीफिदी?"

सर मलाचं ऊद्देशून बोलतं होते. ते वर्गात आले तेव्हा मी ओणवा होऊन मागच्या बाकावरच्या एकाशी, '१२ चिंचोक्यांच्या बदल्यात ३ सागरगोटे' अशा महत्वाच्या वाटाघाटी करतं होतो. सर वर्गात आले तरी मी फारसे लक्ष दिले नाही. त्यांना सागरगोट्यांत काय इंटरेस्ट असणार?

"नाव काय रे तुझे?" मी खरेतरं कालचं नाव सांगितले होते, पण ऊगाच द्विपक्षीय संबंध बिघडू नये म्हणून परतं सांगितले. त्यांनी काल सांगितलेले त्यांचे नाव मी लक्षात ठेवले होते, आणि यांना माझे नाव आठवू नये? असतात, काही जण विसरभोळे!

त्यांचे खरे नाव आणि 'घोंगड्या' हे टोपणनाव, मला दोन्ही आठवत होते. 'घोंगड्यासर' म्हंटलो, असतो तरं मजाचं आली असती!

"घरी कोणी आले, तरं असेच दाताड दाखवतो का?"

मी 'नाही' म्हणालो खरां, कारण तेच ऊत्तर समोरून अपेक्षित होते, पण मी खरचं घरी कोणी आले तरं काय करतो, हेचं आठवतं नव्हते!

हे एवढे महत्वाचे असेल, असा कधी वाटले नव्हते.

"मग? मग काय करतो?"

मी खरेचं यावर कधीच विचार केला नव्हता.

"काहीच नाही!"

"काहीच नाही? तू मुर्ख आहेस"

हे घरी सकाळ-संध्याकाळ ऐकलेले असायचे, त्यामुळे अमान्य असायचे काही कारणचं नव्हते.

"आता तुम्ही सगळे मोठे झालात. हायस्कूलमध्ये आलाय. वर्गात सर आले की, 'गुड मॉर्निंग, सरं' असे म्हणायचे. काय?"

मग, त्या दिवशीची गुड मॉर्निंग पार गुड इव्हिनींग होईपर्यंत आम्ही सगळेजण सामुदायिक रित्या 'गुड मारनिंग, स्स्सर' घोकत होतो!

सर इंग्रजी शिकवायचें.

पुढचा आख्खा महिना या सरांनी आम्हाला सळो की पळो केले. घामाघूम केले.

या सरांचा वेग भन्नाट होता. आम्हीही त्यांच्या वेगाने पळावे ही अपेक्षा! आम्ही बैलगाडीत, तरं हे मोटारसायकलवरं!.

'चला, पळा माझ्या बरोबरीने!' मग त्यांच्या मोटारसायकलीची बरोबरी करता करता आम्हाला ते फरपटतं न्यायचे. आमची दाणाफाण व्हायची. घटोत्कच पडल्यावर कौरवसेनेची धावाधाव व्हायची, तशी आमची अवस्था व्हायची! बैल कुठे, गाडी कुठे, कासरा कुठे, चाबूक कुठे आणि आम्ही कुठे! अरारा! एकदमं दैन्यावस्था व्हायची! आम्हा मस्तवाल बैलांची पार केविलवाणी गोगलगाय व्हायची!

कुठून अवदसा आठवली आणि चौथी पास झालो, असे झाले! काही जण तरं संध्याकाळी पवारगुरूजींच्या घरी जाऊन, परतं चवथीचे काही जमते का, याची चाचपणी पण करून आले!

"ए, बी, सी, डी,... किती शिंपल आहे रे गधड्यांनो. तुमच्या क, ख, ग, घ पेक्षा किती सोपे. काय?"

सगळे 'गधडे' निमूटपणे माना डोलवायचे!

सिम्पल या साध्या शब्दाला हे 'शिंपल' का म्हणतात? पण, विचारायची सोय नव्हती!

"नंदिबैलासारखे मान काय डोलावताय?"

'गधडे' की 'नंदिबैल' यातले आपण नक्की कोण, याचा विचार करत असतानाचं फर्मान यायचे,

"परवा सोमवारी चार रेघी वहीत पाच वेळा सगळे अल्फाबेट्स लिहून आणा"

एक सुकलेला, धारातीर्थी पडलेला रविवार डोळ्यासमोर यायचा. खरेतरं रविवारी शेजारच्याच गल्लीतल्या पोरांबरोबर 'टेस्टमॅच' ठरवलेली असते. आता कॅन्सल केली, तर ती पोरं गावभरं 'शेपुट घातली रे' असा गवगवा करणार!

बरं, चार रेघी वही आणणे म्हणजे काही कमी दिव्य नसायचे! अगोदरं आईला पटवावे लागायचे. मग तिच्या, 'कोऱ्या पानांची वही आहे ना? त्यावर चार रेघा मारून घे', 'ताईच्या मागच्या वर्षीच्या वह्यांमध्ये काही पाने सापडतात का बघं', अशा अलौकिक सुचनांवर बाजीप्रभू देशपांडेंच्या थाटात खिंड लढवावी लागायची. जिंकलो, तर जेवताना वहीची केस हायकोर्टात पोहोचायची!

"शाळा सुरू होतानाचं घ्यायला काय होते रे? दररोज हे घ्यायचे आणि ते घ्यायचे. शाळेला सांग, वडिलांचा सगळा पगार शाळेतच जमा करून घ्या दर महिन्याला. घेत रहा काय घ्यायचे ते"

हे सगळे मुकाट्याने ऐकून घेऊन पैसे मुठीत घेऊन दुकानाकडे पळायचें! त्याच्याकडे तसली चार रेघी वही संपलेली नसेलं, तर हायसे होऊन जाताना केलेला नवस फेडायला, येताना मारुतीला जाऊन यायचे!

अल्फाबेट कसेबसे पाठ झाले, तर 'ए, ई, आय, ओ, यू' या पाच स्वरांनी 'आय' आठवायची! मग टेंशन द्यायला 'टेन्स' आले! त्यात प्रत्येक काळाचे तिन तिन प्रकार! खरेतरं, एकदा 'पास्ट' झाला म्हणजे पास्ट झाला, त्याचे तिन्ही प्रकार 'प्रेझेंट'मध्ये कशासाठी? 'फ्युचर'चे तिन प्रकार जेव्हा फ्युचर येईल तेव्हा बघू. प्रेझेंट मध्ये हा चोंबडा कशासाठी लुडबूड करतो?

हे सगळे बोलायची चोरी होती, कारण, "शिम्पल आहे रे, गधड्यांनो" असे ५४ गधड्यांचे सर तासाला दहादा म्हणायचे!

"एकदा तुम्हाला ए, ई, आय, ओ, यू समजले ना, की कोणाच्या बापाची तुम्हाला इंग्रजी येत नाही म्हणायची हिंमत नाही!"

हे जे कोणी, 'कोण आणि त्याचा बाप' होते, त्यांना आमच्या इंग्रजी शिकण्यात एवढा का रस होता, ते समजायचे नाही, पण ते बाप-लेक पुढच्या आठवड्यात परतं वर्गात हजर असायचे!

" हे एवढे, सी कधी वापरायचे, के कधी आणि एस कधी वापरायचे, एवढे आले ना, की कोणाच्या बापाची हिंमत नाही तुम्हाला इंग्रजी येत नाही म्हणायची!"

हे बाप-लेक परतं आमच्या मानगुटीवर!

पहिल्या काही महिन्यातचं आता झाले तेवढे शिक्षण पुरे करावे आणि कामधंद्याला लागावे, असे आमच्यातल्या बऱ्याच जणांना वाटू लागले. चौथी पास, हे काही कमी शिक्षण नाही. कित्येक जणं एवढेही शिकत नाहीत.

गोट्या, विटीदांडू, पतंग, लपाछपी, लिंगोरच्या आणि मुख्य म्हणजे क्रिकेट यांचा बळी देऊन पाचवीला आम्ही थोडेफार इंग्रजी शिकलो आणि सहाव्वीला आलो.

घोंगड्याला दिव्य सिद्धी प्राप्त आहे, यावरं आम्हा विद्यार्थ्यांमध्ये 'मे महिन्याच्या सुट्टी'त एकमतं झाले. ज्या पोराने अभ्यास केलेला नसतो, त्यालाचं नेमका प्रश्न कसा विचारतो? आपण रविवारी 'म्याच' ठरवली, की याला कसे कळते? नेमका त्याचं शनिवारी जास्तीचा 'एच.डब्ल्यू.' कसा देतो?

सहाव्वीला याने कहरचं केला. वर्गात म्हणे इंग्रजीत बोलायचे! दुसरी भाषा चालणारं नाही! वर्गात टॉयलेटला जाणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड घट झाली! ऊगाच इंग्रजीचा खुन नको आणि डोक्याला ताप नको, म्हणून बरेचं जण बेंबीला थुंकी लाऊन स्थितप्रज्ञासारखे बसायचे. बरेचं जण जबड्यात कापसाचा मोठा बोळा घालुन बसू लागले. सरांनी विचारले तर 'टिथ इज पेन' असे लिहून देऊन 'पेन' नसलेल्या बाजूला मुस्कडात खाऊ लागले. इंग्रजी बोलण्यापेक्षा एक मुस्कडात खाल्लेली कधीही बरी!

तरीही सर हिरिरीने शिकवतचं राहिले. सगळ्या वर्गाला 'शँपेन'चे स्पेलींग बरोबर आले, तेव्हा तरं ते नाचायचेच बाकी होते! त्या आनंदात त्यांनी दुसऱ्या दिवशी 'झेकोस्लोव्हाकीया'चे स्पेलींग पाठ करून यायला सांगितले!

त्या दिवशी रात्री विठ्ठलमंदिरात, विठ्ठलाच्या साक्षीने, 'घोंगड्या'वर कोणीतरी 'चेटूक' केलेचं पाहिजे, यावरं आम्हा ४-५ मित्रांमध्ये एकमतं झाले. पण हे 'चेटूक' नेमके कोण करतो, हे आमच्यापैकी कोणालाही माहिती नसल्याने 'घोंगड्या' वाचला!

सहावीच्या दिवाळीच्या सुट्टीत नागपूरला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून भाषण स्पर्धा होती. दोन गट. ५वी ते ७वी आणि ८वी ते १०वी.

सहामाहीच्या शेवटच्या परिक्षेनंतर सरांनी मला 'टिचर्स रुम'मध्ये बोलावले. एक चिठ्ठी माझ्या हातात देऊन सांगितले, "चिठ्ठी वडलांना दे. नागपुरात भाषणाची स्पर्धा आहे, तु भाग घे. जायचे भाडे आपल्याला भरायचे आहे, तुझ्या वडिलांना काही जास्त नाही'"

"सर! ते भाड्याचे ठिक आहे, पण..."

"तु काळजी करू नकोस. मी भाषण लिहून देतो. तु सुट्टीत सराव करं. एकदम शिंपल आहे रे......."

त्यांनी 'गधड्या' हा शब्द निग्रहाने घशातून परतं पाठवला होता, हे जाणवले.

घरच्यांनी ना म्हणायचा प्रश्नचं नव्हता. यथावकाश नागपूरला गेलो. मुखोद्गत केलेले 'सरांचे भाषण' पोपटासारखा तिथे बोललो. निर्णय नंतर देणार होते. मला पर्वा नव्हती. भुगोलात वाचलेले 'नागपूर' मी प्रत्यक्ष पाहिले होते. नागपूर पहाणारा शाळेतला मी पहिलाचं!

दुसरी सहामाही सुरु झाली. नागपुरहून काहीच ऊत्तर आले नव्हते. फक्त जिंकलेल्यांना कळवतं असावेत. नंतर मी ती स्पर्धा विसरूनही गेलो.

पंधरा-विस दिवस गेले असावेत. रात्री साडेदहाला तारवाला घरी आला. सगळे काळजीत. त्याकाळी तार येणे अशुभ सुचक! त्यात एवढ्या रात्री!

वडिलांनी तार घेतली.

वाचली.

माझ्याकडे डोळे रोखतं म्हंटले,

"नागपुरात जिंकलास रे तू! तुझ्या गटात तू राज्यात पहिला आला आहेस!"

आई तर आनंदाने रडायलाचं लागली! मला काहीच ऊमजेना.

वडिल ऊठले. मला म्हणाले, "चल, शाळेचा गणवेश घाल"

मग आईकडे वळून म्हणाले, "कागदात साखर बांधून दे!"

आम्हाला दोघांनाही काहीच कळले नाही! रात्रीचे अकरा वाजलेले.

"चलं, तुझ्या सरांच्या घरी जाऊ. ही बातमी पहिल्यांदा ऐकायचा मान त्यांचा आहे!"

सगळे गाव साडेआठ-नऊला झोपते. आमच्या मोटारसायकलच्या आवाजाने सरांची आख्खी गल्ली ऊठली. मोटारसायकल असणे, ही फार मोठी गोष्ट होती त्याकाळी. गावात फक्त २ मोटारसायकल. त्यातली एक आमची!

डोळे चोळतचं सरही बाहेर आले. फाटक्या बनियन आणि विटक्या पायजम्यात ते ओळखू येत नव्हते!

वडील बँकेत मोठ्या हुद्द्यावर होते. वडिलांकडे बघताचं ते म्हणाले,

"काय झाले साहेब?"

वडिलांनी साखरेची पुडी त्यांच्या हातात दिली.

"नाही समजले, साहेब!"

वडिलांनी तार त्यांच्या हातात दिली.

तार वाचताच सर ओक्साबोक्शी रडू लागले. भर ओसरल्यावर मला जवळ घेत, डोक्यावर हात फिरवत म्हणाले,

"तुला सांगितले नव्हते?, 'शिम्पल' आहे रे...."

आणि परत रडायला लागले.

वडिलांनी मला खुण केली. मी त्यांच्या पायाला हात लाऊन नमस्कार केला.

त्यांनी "नको रे नको रे" म्हणतं मला ऊचलतं, मला छातीशी कवटाळले.

"सर, आता कोणाचा बाप म्हणू शकत नाही, मला इंग्रजी येत नाही...."

"खरं आहे रे पोरा...."

एवढा कर्दनकाळ 'घोंगड्या' एखाद्या मुलीसारखा मुसमुसत होता! मनातल्या मनात का होईना, पण त्यांना ते 'घोंगड्या' म्हणणे, मला खुप खजिल करून गेले!

ते पाठीवर हात फिरवतं असताना जाणवले, आई-वडिलांनंतर मुलाला जवळ घ्यायचा हक्क खरचं शिक्षकाचा असतो!

शिम्पल आहे! नाही का?

Tuesday, May 22, 2018

उपसंहार

मित्रहो, गेले काही दिवस मी भारतीय प्राचीन दर्शनशास्त्रावर लिहित होतो. खरे तर मी यातील अधिकारी व्यक्ती नाही. पण तरीही यावर लिहिण्याचे औधात्य केले. आपण माझे हे औधत्य सहन केलेत. हे औधत्य करण्याला एकाच कारण होते की सध्याची सामाजिक स्थिती पाहून भारताची संस्कृती कशी सर्वसमावेशक आहे याची जाणीव करून द्यावी असे प्रकर्षाने वाटले. आपल्या विरुद्ध मताचे कोणी आहे असे दिसले की फेसबुकवर जी अर्वाच्य भाषा काहीजणांकडून वापरली जाते त्याने मनाला यातना होतात. आपल्या दर्शनांनी किती वेगवेगळे विचार मांडले आहेत. त्यांनी वाद-विवाद केले. पण ते समोरच्या मताचा आदर ठेऊनच. या वादविवादातून आवश्यक त्या सुधारणा करीत आपले दर्शन अधिक निर्दोष बनविले.

आपण आठ दर्शने पहिली. त्यातील तीन (जैन, बौद्ध आणि चार्वाक) नास्तिक दर्शने होती. नास्तिक याचा अर्थ वेदप्रामाण्य पूर्णपणे नाकारणारी. दोन दर्शने (पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा) वेदप्रामाण्याला महत्व देणारी होती.  तर अन्य तीन दर्शने (वैशेषिक, न्याय, सांख्य) वेदप्रामाण्य नाकारीत नाहीत. पण स्वीकारासंबंधी स्पष्टपणे सांगतही नाहीत. चार्वाक वगळता अन्य दर्शने मोक्ष/कैवल्य/ निर्वाण इत्यादी मनुष्याचे अंतिम लक्ष्य मानतात.

जैन आणि बौद्ध दर्शने वगळता अन्य सहा दर्शने (चार्वाक, वैशेषिक, न्याय, सांख्य, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा) हिंदू दर्शने (षटदर्शने) म्हणून परंपरेने मानली जातात. (अंबेच्या आरतीत 'साही विवाद करीता' असा या षटदर्शनांचा उल्लेख आहे) त्यांच्याकडे नजर टाकली असता हिंदू धर्माचा पाया किती विस्तृत आहे याची कल्पना येते. चार्वाकासारखे परलोक नाकारणारे , सांख्यांसारखे ईश्वर नाकारणारे, न्याय-वैशेषिक दर्शनासारखे अनेक ईश्वर आणि त्यांचा प्रत्येकाचा आत्मा मानणारे, वेदांतासारखे एकच ब्रह्म मानणारे दर्शन अशी ही विस्तृत परंपरा आहे. सांख्य दर्शन 'पुरुषाला' आपण अन्य पुरुषांपासून आणि प्रकृतीपासून वेगळे असण्याची जाणीव होणे (विवेक) म्हणजे मोक्ष असे समजते, तर वेदांत याच्या उलट, म्हणजे आत्म्याला आपण सर्व एकच ब्रह्मस्वरूप आहोत असे समजणे' म्हणजे मोक्ष असे समजते.

सध्या काही हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्वाचा अर्थ संकुचित करू लागल्या आहेत. त्यांना अपेक्षित असलेली जीवनपद्धती, खाणेपिणे म्हणजेच हिदुत्व अशी त्यांची भावना आहे.  अनेक दर्शनांच्या विस्तृत पायावरच आज हिंदुधर्म टिकून आहे. या अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांना कळकळीची विनंती की त्यांनी हिंदू धर्माचा हा विस्तृत पाया खिळखिळा करू नये.

दु:ख निवारण हे बौद्ध धर्माचे मुख्य उद्दिष्ट आहे. बुद्धाने त्यासाठी यादेशात अनेक वेळा उगम पावून लुप्त झालेली ध्यानाची विद्या परत परिश्रमाने शोधून काढली.  'अविद्या' हे सर्व दु:खांचे मूळ कारण आहे असे सांगितले. अविद्या म्हणजे 'मी' (अहंकार) आणि 'माझे' (ममत्व). सध्या फेसबुकवर अनेक पोस्ट वाचताना बौद्धधर्म समर्थकांची भाषा पाहून गौतम बुद्धाच्या या शिकवणुकीचा त्यांना विसर पडला आहे अथवा त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी समाजाचे धुरीण कमी पडताहेत असे वाटते. अशा पोस्टमधून 'अविद्येचीच' जोपासना होते आहे अशी भीती वाटते. हीच गोष्ट स्वत:ला हिंदू म्हणविणाऱ्या माझ्या काही बांधवांसाठी खरी आहे. 'अहंकार' आणि 'ममत्व' यांच्यामुळेच आपण मायेच्या आवरणाखाली येतो, बंधनात अडकतो असे अनेक उपनिषदांनी वारंवार सांगितले आहे. मग अहंकाराच्या आहारी जावून द्वेष जागवित ते धर्माचे कोठले काम करीत असतात?

आपण भारतीय आहोत. आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचा आदर करण्याची आपली परंपरा आहे. एवढे लक्षात आले तरी या लेखमालेचा फायदा झाला असे मी म्हणेन.

लवकरच दुसऱ्या विषयावर  एखादी लेखमाला घेऊन आपल्या समोर येईन.

  

Sunday, May 20, 2018

उत्तरमीमांसा (वेदांत दर्शन) : अद्वैतवाद

सांख्यदर्शनाखालोखाल भारतीय समाजावर अद्वैत दर्शनाचा प्रभाव आहे.

एका जुन्या सुभाषितकाराने अद्वैतवाद एका श्लोकात मांडला आहे
ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव, नापर: |

आपण आद्यशंकराचार्यांनी मांडलेला अद्वैतवाद थोडक्यात पाहू.
१>पहिला सिद्धांत म्हणजे ब्रह्म हेच सत्य होय. ब्रह्म म्हणजे जाणीव, आपणास एकसारखे होत राहणारे भान. ती स्वयंसिद्ध आहे. इतर पदार्थ आहेत अथवा नाहीत हे जाणीवेच्या सहाय्याने कळते. परंतु जाणीव आहे अथवा नाही हे आपणास कळण्यासाठी अन्य कशाचीही आवश्यकता नसते. अद्वैत्वाद्यान्च्या मते ब्रह्म हे सत्, चित् आणि आनंद स्वरूपी आहे.
२>दुसऱ्या सिद्धांतानुसार जग हे मिथ्या आहे. मिथ्या याचा अर्थ असा नाही की त्याला घनता, आकार नाही. जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी मिथ्या आहे असा त्याचा अर्थ आहे. दिशा, काल आणि कार्य-कारण संबंध या संदर्भातच या जगाला अर्थ आहे असाही त्याचा अर्थ आहे. काल हे परिमाण सापेक्ष आहे हे आता विज्ञानाने सिद्ध झाले आहे. दिशा/अंतर हे परिमाणेही सापेक्ष आहेत हे अत्याधुनिक पदार्थ विज्ञान सांगते. इतकेच नव्हे तर या विश्वासारखीच अनेक विश्वे एकाचवेळी अस्तित्वात असू शकतील असेही नवे विज्ञान सांगते. या सापेक्षतावाद सिद्धांताचा विचार केला तर 'जग हे मिथ्या आहे' या विधानाचा अर्थ थोडा थोडा उलगडू लागतो.
३>'जीवो ब्रह्मैव' हा तिसरा सिद्धांत आहे. 'जग हे मिथ्या' म्हटल्यावर काहीच उरणार नाही असा आपला समाज होतो. पण वेदांत दर्शन हे 'ब्रह्म सत्यं' अधिक उच्चरवाने सांगते. जीव म्हणजे ज्याला आपण 'मी' म्हणतो त्यातून 'अहंकार' काढल्यावर जे उरते ते. जीवाला आत्मा असेही म्हणतात. हा आत्मा म्हणजेच ब्रह्म होय. उपाधीमुळे आत्म्यास जीवत्व येते असे अद्वैतदर्शन सांगते. स्फटिकाशेजारी जास्वंदीचे फुल ठेवल्यास स्फटिकाला त्या फुलाचा लाल रंग आला आहे असे भासते. तसेच आत्म्याला उपाधी लावल्याने त्याच्यात जीवत्व भासते.
सर्वाचा आत्मा एकाच ब्रह्मस्वरूपी असूनही वेगवेगळे का भासतात याचे कारण देताना अद्वैतदर्शनकार घटाकाश आणि महाकाश यांचे उदाहरण देतात. घटामुळे घटात कोंडलेले आकाश आणि बाहेरील आकाश वेगळे भासते. अशाप्रकारे प्रत्येक घटातील आकाश स्वतंत्र भासते. पण तो घट फुटल्यास घटातील घटाकाश आणि बाहेरील महाकाश एकच आहेत याचे ज्ञान होते.
अद्वैत दर्शनाच्या (आणि उपनिषदांच्या) मते मोक्ष ही प्राप्त करून घेण्याची गोष्ट नव्हे. मोक्ष हा सिद्धच असतो. परंतु आत्म्याला त्याचे भान नसते. म्हणूनच संसार आणि बंध येतात. मायेमुळे आत्म्याला ते भान रहात नाही. म्हणून मायेचे आवरण दूर केल्यावर आत्म्याला तो मुक्त असल्याचे भान येते.
या संदर्भात एक मनोरंजक गोष्ट आहे. उंटांचा एक काफिला प्रवासास निघालेला असतो. रात्री एका ठिकाणी मुक्काम पडतो. काफिल्याच्या प्रमुखाच्या लक्षात येते की बांधण्यासाठी आणलेले दोरखंड अपुरे आहेत. एका उंटाला बांधण्यासाठी दोरखंड कमी पडत आहे. तो विचारात पडतो. पण त्याच्या काफिल्यातील एक शहाणा माणूस प्रश्न सोडवितो. तो त्या उंटाला दोरखंडाने बांधण्याचा अभिनय करतो. आश्चर्य म्हणजे तो उंट आपल्याला बांधले आहे असे समजून रात्रभर तेथेच बसून असतो. सकाळी काफिला पुढे जाण्यास निघतो. पण तो उंट काही जागेवरून हलत नाही. त्याला मारूनमुटकून पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. पण तरी तो काही हलत नाही. तेवढ्यात  या शहाण्या माणसाच्या लक्षात एक गोष्ट येते. तो त्या उंटाला बांधलेली दोरी सोडविण्याचा अभिनय करतो. उंट लगेच चालू लागतो. उंटाची जशी आपल्याला बांधले असल्याची समजूत झाली होती तशीच आपल्या आत्म्याची आपण बद्ध असल्याची समजूत झालेली असते. त्या शहाण्या माणसासारखे कोणीतरी आपल्याला सोडविण्याचा अभिनय करावा लागतो. उपनिषदे याचाच प्रयत्न करीत असतात.
वेदांत दर्शनातील नंतर आलेल्या आचार्यांनी शंकराचार्यांनी प्रतिपादिलेल्या अद्वैतमतात काही बदल सुचविले. परंतु आजही वेदांत दर्शनात शंकराचार्यांचे मत प्रमाण मानले जाते.

आपण आठ महत्वाच्या प्राचीन भारतीय दर्शनांची थोडक्यात माहिती गेले काही दिवस घेतली. पुढील लेखात या सर्व दर्शनांचा एकत्रित गोषवारा घेऊ. तसेच या दर्शनशास्त्राचा सध्याच्या आपल्या जीवनाशी काही संबंध आहे काय हे ही पाहू.


पॉझिटिव्ह_थॉट्स

हर्षद शामकांत बर्वे यांच्या फेसबुक पोस्टवरून


मला कधीही बरा न होऊ शकणारा कॅन्सर झाला होता, डॉक्टर म्हणाले या मुलाला घरी घेऊन जा, स्पेन्ड टाइम विथ हिम, आम्ही आता काहीही करू शकत नाही. ह्या जगात निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येकाला असतो, पण असा निर्णय जो आपले, आपल्यांचे, या जगाचे फ्युचर बदलू शकते असा निर्णय फार कमी लोक घेऊ शकतात. असाच एक निर्णय माझ्या आईने घेतला. माझ्या आईने डॉक्टरांना विचारले, माझ्या मुलाच्या जगण्याचे किती चान्सेस आहेत, डॉक्टरांनी ९६% माझा मृत्यू होईल असे सांगितले. माझ्या आईने त्या ९६% कडे न बघता उरलेल्या ४% कडे बघितले आणि मला घरी घेऊन आली.

अमेरिकेतून आलेल्या एका डॉक्टरांनी माझ्या आईची भेट घेतली. त्यांनी माझ्या आजारावर एक औषध टेस्ट करतो आहे असे सांगितले, अजून ते औषध माणसांवर ट्राय केलेले नव्हते, फक्त प्राण्यांवर ट्राय झाले होते. ते डॉक्टर केवळ २५ मुलांवर ते औषध ट्राय करणार होते, एकही क्षण न घालवता आईने तात्काळ होकार दिला. पहिल्या महिन्यात २५ पैकी २० मुले दगावली, काही दिवसात अजून चार गेली, मी एकटा उरला होतो. रोज डॉक्टर येत असत, आपली झिप बॅग उघडून औषध काढून देत. इंग्लिश डिक्शनरीत Love पेक्षा Hope हा शब्द जास्त पावरफुल आहे असे मला नेहमी वाटते. लोकांना वाटते मी वाचलो कारण मी लकी होतो, पण मी लकी नव्हतो मित्रांनो, माझ्या आईने मला लकी बनवले. ज्या औषधाने २४ मुलांचे प्राण वाचू शकले नाही, ते औषध हृदयावर दगड ठेवून ती रोज मला टोचत होती. मग तो दिवस उजाडला, डॉक्टरांनी मला मी बरा झालोय अशी बातमी दिली. पण मला सोडताना ते माझ्या आईला म्हणाले, हा मुलगा कधीही खेळू शकणार नाही, शाळेत जाऊ शकणार नाही, याने आपले टीनएज बघितले तरी तो एक चमत्कार असेल. पण आपण चमत्कारांवर विश्वास ठेवतोच. मी दवाखान्यात असतांना आईने मला एक वेलक्रो ग्लोव्ह आणि बॉल आणून दिला होता. तो मी तिच्याकडे फेकत असते, हळूहळू आईने अंतर वाढवले आणि माझ्यासमोर आव्हान उभे केले. मला त्या आव्हानांना चेस करून जिंकणे आवडू लागले. मग एक दिवस मी आईला म्हणालो, आई माझे एक स्वप्न आहे ,मी अमेरिकेत बेसबॉल खेळणार. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात काय करू शकता हे कोणीच सांगत नाही, तुम्ही काय करू शकणार नाही हे मात्र सगळेच सांगत सुटतात.

माझ्या स्वप्नात अनेक अडथळे आले, मला ताप यायचा, मला मेंदूज्वर झालेला, माझ्या आयुष्यात मला आलेला पहिला हार्ट अटॅक, मी फक्त १२ वर्षांचा होतो, लोक म्हणत होते, मी हे करू शकणार नाही, मी मात्र तेच करण्यासाठी झटत होतो. वयाच्या १७ व्या वर्षी मी अमेरिकेत बेसबॉल खेळायला गेलो, एक स्वप्न सत्यात उतरले. पण आयुष्य हे रोलर कोस्टर सारखे असते, क्षणार्धात तुम्ही करिअरच्या उत्तुंग शिखरावर असता आणि दुसऱ्या क्षणाला आयुष्य तुम्हाला जमिनीवर आणून आपटत. ज्या बेसबॉलसाठी मी झटलो, त्याच बेसबॉल ग्राउंडवर मला वयाच्या १८ व्या वर्षी माझे करियर संपवणारा दुसरा हार्टअटॅक आला. मला घरी परत पाठवण्यात आले. नियती माझ्याशी अत्यंत अनफेअर वागते आहे असे मला वाटायला लागले, मी डिप्रेशनमध्ये गेलो. रोज झोपतांना मी प्रार्थना करायचो, देवा, मला उचलून घे, पण दुसऱ्या दिवशी मला जाग येत असे. माझा तो परमेश्वर माझी ही प्रार्थना ऐकत नव्हता, मला मृत्यू येत नव्हता. पण परत एकादा मला माझा परमेश्वर इथेच भेटला, आईच्या रुपात. तिने मला या डिप्रेशनमधून बाहेर काढले.

मग मी बँकेची नोकरी जॉईन केली. एक दिवस एक उंचापुरा माणूस जो आमच्या बँकेचा सीइओ होता त्याचे मला बोलावणे आले, आपण बोलायला हवे. आम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये बसलो. त्याने प्रश्न विचारला, डाऊन द लाईन पाच वर्षे तू कुठे असशील. मी विचार केला आणि मला आईचे शब्द आठवले, दगड मारायचाच असेल तर चंद्राला मार, चंद्राला नाही लागला तर किमान कुठल्यातरी ताऱ्याला तरी लागेल. मी बॉसला म्हणालो, तुझ्या खुर्चीत. मित्रांनो, असे बॉसला म्हणू नये कारण ते कोणत्याही बॉसला आवडत नाही, माझ्या बॉसला पण आवडले नाही. त्याने माझा द्वेष करायला सुरुवात केली, मला त्रास द्यायला लागला. ओण मित्रांनो, हा द्वेष आणि होणारा त्रास माझ्या महत्वाकांक्षेचे फ्युएल ठरले. मी बेदम काम करायला लागलो. वर्षभरात मी ऑस्ट्रेलियाचा यंगेस्ट बँक मॅनेजर झालो, दोन वर्षात यंगेस्ट एरिया मॅनेजर, तीन वर्षांत यंगेस्ट स्टेट मॅनेजर, चार वर्षात यंगेस्ट नॅशनल मॅनेजर झालो. वयाच्या २३ व्या वर्षी माझ्या हाताखाली ६०० माणसे काम करत होती आणि मी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मिळून आमच्या बँकेच्या १२० बँक ब्रांचेस सांभाळत होतो. माझ्याकडे मिलियन डॉलरचे घर होते, अरमानीचे सुट्स होते, रोलेक्सच घड्याळ होते, लाखभर डॉलरची कार होती. पण हे यश मटेरियलास्टिक होते, आपण या जगात राहतो. जगाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण जगाला काय दिले याचा विचार करणे जास्त महत्वाचे नाही का? हे जग माणसांसाठी राहण्यासाठी जास्त चांगली जागा कशी होऊ शकेल याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचले त्यांना आपण काहीतरी द्यायला हवे. मागील १६ जूनला असा एक क्षण माझ्या आयुष्यात आला. जी माझ्यासाठी सर्वस्व होती, आहे, अश्या माझ्या आईसाठी मी एक आलिशान घर घेतले.

मी आईपासून एक गोष्ट लपवली होती, मी सात वर्षाचा असतांना डॉक्टरांनी आईला जे सांगितले होते ते मी ऐकले होते. पण मला काहीही माहीत नाही अश्या आविर्भावात मी आईला विचारले होते, आई डॉक्टर काय म्हणाले, त्यावर आई म्हणाली होतो, काही नाही, सर्व ठीक होईल. मला पहिला हार्टअटॅक आला तेंव्हा ही आई म्हणाली होती, सर्व ठीक होईल. "सर्व काही ठीक होइल" हे वाक्य माझ्यावर ऋण होते, पण दैव बघा, यावर्षी मला तिच हे ऋण फेडण्याची संधी मला मिळाली. माझ्या घश्यात चार ट्युमर डिटेकट् झाले, आईने विचारले, डॉक्टर काय म्हणाले, मी म्हणालो, सर्व ठीक होईल. यापूर्वी मी माझ्या बायकोला इतके रडताना मी कधीही बघितले नव्हते. डॉक्टर मला म्हणाले, आता कामाचा, आयुष्याचा थोडी स्पीड कमी कर कारण आता उद्याची गॅरंटी नाही. पण मित्रांनो, आयुष्याची हीच तर खरी गंमत आहे, या जगात कोणाच्याही आयुष्याची क्षणभराची देखील गॅरंटी नाही.

तुम्ही किती वेळ या पृथ्वीतलावर जगले याला महत्व नाही, इथे असतांना तुम्ही काय केले याला सर्वात जास्त महत्त्व आहे. तुमचे आयुष्य तुम्ही रिमार्केबल जगता की नाही हे महत्वाचे आहे. आपण घेतलेला एकूण एक श्वास, एकूण एक संधी महत्वाची आहे, आपल्याला मिळालेले हे आशीर्वाद आहेत. आपण या आशीर्वादांचे सोने करू शकतो की नाही हे महत्वाचे. आज इथे मी तुम्हाला आव्हान देतो, तुम्ही तुमच्या आयुष्याचे सोने करा, किमान माणसासारखे जगा. तुमच्या जगण्यावर तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला गर्व वाटेल असे काही करा.

मित्रांनो, मी आहे मायकल क्रॉसलँड !!!

http://michaelcrossland.com

#हर्षदशामकांतबर्वे

© हर्षद शामकांत बर्वे, औरंगाबाद पुणे प्रवास 

उत्तरमीमांसा (वेदांत) दर्शन

गौतम बुद्धाच्या भारतातील प्रभावास रोखण्यासाठी एका बाजूला यज्ञ-याग कर्मकांड यांच्या विधीत समन्वय साधणारे पण वेदांच्या तत्वज्ञानाच्या भागाला गौण समजणारे पूर्वमीमांसा दर्शन विकसित झाले तर दुसऱ्या बाजूला वेदांमधील तत्वज्ञान अंगाला प्राधान्य देणारे उत्तरमीमांसा हे दर्शनही विकसित झाले. वेदांमध्ये तत्वज्ञान विषयक (उपनिषदे) हा भाग शेवटी येत असल्याने त्याला वेदांत अशीही संज्ञा मिळाली. काहींच्या मते 'सर्व वेदांचे जे सार' या अर्थाने वेदांत हा शब्द आला आहे.
उपनिषदे अनेक आहेत त्या सर्वांचा समन्वय घडवून त्याचे सार सांगण्यासाठी 'ब्रह्मसूत्रे' रचण्यात आली. द्वैपायन कृष्ण व्यास (वेदांचे रचयिता : पराशरऋषी-मत्स्यगंधा यांचा मुलगा)  ब्रह्मसुत्रांची रचना केली असे मानण्यात येते. याशिवाय भागवतगीतेलाही वेदांत दर्शनात उपनिषदे आणि ब्रह्मसुत्राइतकीच मान्यता आहे. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भागवतगीता यांना वेदांतात 'प्रस्थानत्रयी' म्हणून मान्यता आहे. 'प्रस्थान' म्हणजे उगम. वेदविचारांची शुद्धता या तीन ठिकाणी तपासता येते असा त्याचा अर्थ आहे.
या प्रस्थानत्रयींवर वेदांतदर्शनातील आचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत. त्यातील महत्वाचे आचार्य
१> शंकराचार्य (इ.स. ७८८-८२०)  केवलाद्वैतवाद
२> रामानुजाचार्य (इ.स. १०५६-११३७) विशिष्टाद्वैतवाद
३> मध्वाचार्य (इ.स.११९९-१२७८) द्वैतवाद
४> वल्लभाचार्य (इ.स.१४८१-१५३३)  शुद्धाद्वैतवाद
५> निंबकाचार्य (१३वे शतक) द्वैताद्वैतवाद

यात सर्वाधिक मान्यता पावलेला म्हणजे शंकराचार्यांचा केवलाद्वैतवाद हा आहे. शंकराचार्यांना एवढी मान्यता मिळाली की तत्वज्ञान म्हणजे वेदांत म्हणजेच शंकराचार्यांचा अद्वैतवाद अशीच समजूत बहुसंख्य भारतीयांची झाली.
पुढील लेखात आपण शंकराचार्यांचा अद्वैतवाद काय आहे ते पाहू.

Saturday, May 19, 2018

पूर्वमीमांसा दर्शन

पूर्वमीमांसा दर्शन हे 'मीमांसा' या नावानेही ओळखले जाते. मीमांसासूत्रे रचणारा जैमिनी याचा काल इसवीसनाचे पहिले शतक आहे. इ.स.पूर्व ५६३ यावर्षी जन्मलेल्या बुद्धाच्या बुद्धदर्शनाने संपूर्ण भारतावर मोहिनी घातली होती. यावेळी वेदवाङ्मयावर श्रद्धा असलेले चिंताक्रांत झाले. अजूनही समाजाची वेदवाङ्मयावर काही प्रमाणात श्रद्धा शिल्लक होती. या श्रद्धेला प्रामाण्यआधार मिळवून देण्याचा मीमांसाकारांचा प्रयत्न दिसतो.
वेदांच्या कर्मकांडातील, म्हणजे संहिता आणि ब्राह्मणे यातील वचनांचा समन्वय करणारे जे शास्त्र आहे त्यास पूर्वमीमांसा (अथवा नुसते मीमांसा) म्हणतात. तर वेदांचा तत्वज्ञानविषयक भाग, म्हणजे प्रामुख्याने उपनिषदे यांचा समन्वय करणारे जे शास्त्र आहे त्यास उत्तरमीमांसा (अथवा वेदांत) म्हणतात. या लेखात आपण पूर्वमीमांसा अथवा मीमांसा या दर्शनासंबंधी माहिती घेणार आहोत.
वेदवाङ्मयातील अतिप्राचीन भाग हा देवतांची स्तुती करण्याचा, त्याची स्तुती असलेला आहे. त्यांची स्तुती करून, त्याना यज्ञात हवन देऊन त्यांच्यामार्फत आपली दु:खे, व्याधी कमी करावीत असा हा प्रयत्न आहे. (नंतरच्या काळात होमहवन आणि मंत्रांना अतिरिक्त महत्व येऊन देवतांचे महत्व कमी झाले) या साठी यज्ञविधी कसा करावा याचे विस्तृत वर्णन वेदांच्या ऋचात आहे. परंतु हे वर्णन निरनिराळ्या काळात तसेच निरनिराळ्या वेद, स्मृती, श्रुतींमध्ये आहे आणि काहीवेळा त्यातील विधाने परस्पर विरोधी आहेत, काही विधानांची एकमेकांशी संगती लागत नाही. अशावेळी या विधानांत सुसंगती आणणे हाही मीमांसाकारांचा प्रयत्न दिसतो.
यज्ञयागाचे तात्त्विक समर्थन करणे हाही मीमांसाकारांचा प्रयत्न राहिला आहे. मरणानंतर आत्म्याचे काय होते, परलोक, कर्म, कर्मफळ इत्यादींबद्दल मीमांसक माहिती देतात.
मिमंसेची मूळ वृत्ती तत्वज्ञानपार नाही. जैमिनीचे पहिलेच सूत्र 'अथतो धर्मजिज्ञासा' आहे. येथे 'धर्म' याचा अर्थ 'इष्ट आणि अलौकिक फळे देणारी यज्ञयाग इत्यादी कर्मे' हा आहे.
मीमांसकांच्या मते वेद हे मनुष्याने अथवा ईश्वराने निर्माण केलेले नाहीत, ते अपौरुषेय म्हणजेच नित्य आहेत. त्यांच्यामते धर्मासंबंधी वेद हेच परम प्रमाण आहेत.  इतर कोठल्याही प्रमाण स्मृतीतील वचनाच्या विरोधात जात असेल तर स्मृतीत लिहिलेलेच सत्य समजावे. स्मृतीने न सांगितलेला एखादा विधी श्रुतीने सांगितलेला असेल तर तो लुप्त स्मृतीतील आहे असे समजून त्याचे पालन करावे. धर्मासंबंधी श्रुती, स्मृती, पुराणे यांना उतरत्या क्रमाने प्राधान्य आहे. 
यज्ञ योग्यप्रकारे सिद्ध झाला आणि त्यातील मंत्रोच्चार योग्य प्रकारे झाले की त्याचे फळ आपोआपच मिळते, देवतांच्या कृपाप्रसादाने मिळत नसते अशी यज्ञविधीसंबंधी टोकाची भूमिका मीमांसकांची आहे. कोणते यज्ञ कधी आणि कसे करावेत, त्यांचे फळ काय आहे हे समजावून सांगणे हेच मीमांसेचे मुख्य काम आहे.
मीमांसक आत्मा मानतात पण ईश्वर मानत नाहीत. ईश्वराला मानण्याने वेदांना गौणत्व येते अशी त्यांची भूमिका आहे. एक ईश्वर मानीत नसले तरी इष्ट फळ देणाऱ्या देवता मानतात. मात्र यज्ञ योग्यप्रकारे केल्यावर देवतांना फळ द्यावेच लागते अशी ही भूमिका आहे.
यज्ञयागादी धर्माचे आचरण स्वर्गसुखासाठी करायचे असे मीमांसक सांगतात. मात्र नंतरचे मीमांसक अन्य दर्शनाच्या प्रभावामुळे 'मोक्षाची कल्पना' स्वीकारू लागले.
उपनिषदात येणारी तत्वज्ञानविषयक चर्चा मीमांसक गौण समजतात.
पुढील लेखात आपण 'उत्तरमीमांसा' अथवा 'वेदांतदर्शन' समजून घेण्याचा प्रयत्न करू.

Friday, May 18, 2018

सांख्यदर्शन

सांख्यदर्शन हे भारतीयांवर सर्वात प्रभाव टाकणारे दर्शन आहे. भगवतगीता सर्वच दर्शनांना सामावून घेणारी असली तरी तिच्यावर सांख्यदर्शनाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. सांख्यदर्शन भारताच्या पूर्व भागात खूपच प्रभावी आहे. या दर्शनाचा बुद्धधर्माच्या महायान पंथाबरोबर संयोग होऊन ते तिबेट आणि जगाच्या पूर्वेकडे पोचले.
सांख्य दर्शनाचा पहिला प्रवर्तक कपिल ऋषी मनाला गेला आहे. भगवतगीतेतील 'सिद्धानां कपिलो मुनि:'असा आदराने उल्लेख केलेला कपिल मुनी हाच असावा. परंतु कापिल ऋषींचा एकही ग्रंथ उपलब्ध नाही. त्यांनी आपले तत्वज्ञान आपला शिष्य आसुरी याला शिकविले. आसुरीने त्याचा शिष्य पंचशीख याला दिले. पंचशीखाने त्याचा विस्तार केला.  या दर्शनावरील 'माठरवृत्ती' ही टीका सर्वात प्राचीन आहे. तिचे भाषांतर इ.स. ४५० च्या सुमारास चीनी भाषेमध्ये (मँडरीन ??) भाषेमध्ये झाले आहे.
तंत्र, कुंडलिनीविद्या, पातंजलयोग, आयुर्वेद इत्यादी शास्त्रे सांख्यदर्शनातूनच उगम पावली आहेत.
चेतन आणि जड पदार्थ यांचे यथार्थ ज्ञान करून देणे यासाठी सांख्यदर्शन प्रयत्न करीत आहे. त्यांचे प्रमुख सिद्धांत असे
१> पुरुष (म्हणजे व्यवहारात आपण ज्याला आत्मा म्हणतो तो) आणि प्रकृती (आपले शरीर आणि सर्व बाह्य सृष्टी) ही मूलत: दोन भिन्न द्रव्ये आहेत.
२>सृष्टीतील नानाविध वस्तूंचे आणि घडामोडींचे एकमेव आदिकारण 'प्रकृती' आहे. ती 'सात्विक',  'रजस्' आणि 'तमस्' गुणांनी बनलेली आहे. ती 'जड' म्हणजे जाणीव नसलेली आहे.
३> पुरुष चेतन, निर्गुण आणि निष्क्रिय असून अनेक आहेत.
४>पुरुषाने प्रकृपासून आपल्या निराळेपणाचा बोध घेणे म्हणजेच 'कैवल्य' अथवा मोक्ष होय.

प्रकृतीविषयी आणखी काही गोष्टी मानण्यात आलेल्या आहेत.
१> इतर पुरुषांपासून अथवा प्रकृतीपासून स्वत:ला अलग समजण्याचा विवेक (जो पुरुषापाशी आहे) तो प्रकृतीपाशी नाही. ती अविवेकी आहे.
२>ती ज्ञानाचा विषय होते. ज्ञातृत्व तिच्याकडे नाही.
३>सामान्य पदार्थ तिच्यावर राहू शकतो.
४>तिला जाणीव नसते. ती अचेतन आहे.
५>तिचा विकास होतो. ती प्रसवधर्मी आहे. अशांत झालेली त्रिगुणात्मक प्रकृती दृश्य जग निर्माण करते. यापूर्वी तिच्यात अहंकार निर्माण होतो.

सांख्य परिभाषेत मोक्षाला 'कैवल्य' असे नाव आहे. पुरुषाला स्वत:च्या (अन्य पुरुषांपासून आणि प्रकृतीपासून) वेगळे असण्याची जाणीव नसणे (अविवेक) हे बंधनात पडण्याचे कारण आहे. (अद्वैत दर्शनाच्या बरोबर विरोधी असे हे मत आहे : द्वैतभावना हे बंधनात पडण्याचे कारण).

प्रकृतीचे हे सारे सर्जन पुरुषाच्या कैवाल्यासाठीच असते असे सांख्यांचे मत आहे. हा विश्वाचा पसारा प्रकृती मांडते तो पुरुषाच्या भोगाकरता.  पुरुषाच्या भोगातूनच प्रकृतीत सत्वगुण उत्पन्न होतो. हा सत्वगुणच पुरुषामध्ये विवेक उत्पन्न करतो आणि पुरुष कैवल्याप्रत जातो.

सांख्यांनी पुरुषार्थ (कैवल्याप्रत पोचणे) ही अन्तीम प्रेरणा मानली त्यामागे दु:खवाद दिसतो. आयुष्य हे दु:खमय आहे ही भूमिका त्यांनी ठामपणे घेतली.  त्यांची ही भूमिका बुद्धाच्या भूमिकेच्या जवळ जाते. या दु:खातून सुटका मिळविण्यासाठीच कैवल्यप्राप्ती आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते.

सांख्य दर्शनाने ईश्वर नाकारला आहे. पुरुष-प्रकृती सिद्धांतात त्यांना ईश्वराची गरज वाटली नाही. प्रकृती हे जड विश्व प्रसाविते. त्यात ईश्वराला स्थान नाही.

पुढील लेखात आपण पूर्वमीमांसा दर्शनाचा विचार करू.

Thursday, May 17, 2018

न्याय दर्शन

या आधीच्या लेखात आपण न्याय-वैशेषिक या जोडगोळीतील 'वैशेषिक दर्शन' पाहिले. आता न्याय दर्शनाकडे वळू. आपण पाहिले की न्याय-वैशेषिक दर्शने सामान्य माणसाच्या व्यावहारिक भाषेचा हिरीरीने पुरस्कार करतात. यापैकी वैशेषिक दर्शन हे प्रमेये मांडते तर न्याय दर्शन हे या प्रमेयाना प्रमाण देण्याचे काम करते.
गौतम ऋषी (मेघानिधी गौतम : इ.पू.५५०) हे न्याय दर्शनाचे प्रणेते मानले जातात. त्यांचा न्यायशास्त्र हा ग्रंथ न्याय दर्शनाचा आद्य ग्रंथ मानण्यात येतो. न्याय दर्शनाचे विपुल वाङ्मय आणि टीका उपलब्ध आहेत.
न्यायदर्शनाची मूलभूत प्रेरणा ही वादविवाद / चर्चेत उपयुक्त ठरतील अशी प्रमाणे ठरविण्याची आहे. 'न्याय' या शब्दाचा अर्थच 'उभय पक्षांना मान्य असणारा सिद्धांत' असा आहे. न्यायदर्शनात 'अनुमान' या प्रमाणाचा सखोल विचार झाला आहे. या दर्शनात यथार्थ ज्ञानाचे स्वरूप, भ्रम म्हणजे काय याचाही विचार झाला आहे. 'प्रमाणे' ठरविणे हाच मुख्य हेतू असल्याने प्रमाणांची चर्चा विस्तृतपणे केली आहे. ती आपण 'प्रमाण' या लेखात यापूर्वीच पाहिली आहे.
नैयायीकानी ईश्वर मानला. किंबहुना पाश्चात्य ज्याला theism म्हणतात त्याची व्यवस्थित मांडणी प्रथम त्यांनीच केली. नैयायीकांचा ईश्वर सृष्टीचा कर्ता आहे, तिचा नियंता आहे आणि भक्तांवर अनुग्रह करणारा आहे. जीवात्म्याप्रमाणे तो ही एक आत्मा आहे. मात्र तो सुख-दु:ख , पाप-पुण्य याना अलिप्त आहे. त्याने हे विश्व निर्माण केले. त्यासाठी इतस्तत: पसरलेले परमाणु ही सामग्री वापरून त्याने के कार्य केले. या मांडणीत अनेक त्रुटी दिसतात. परंतु सामान्य माणसाच्या समजुतींना आधार देणे न्याय-वैशेषिक दर्शनाने आपले कार्य मानल्याचे दिसते.
ईश्वराचे अस्तित्व नैयायीकानी जरी मानले असले तरी त्याचा आणि मोक्षाचा संबंध लावल्याचे दिसत नाही. तत्वज्ञानाने म्हणजे पदार्थांच्या सम्यक आणि यथार्थ ज्ञानाने मिथ्याज्ञान नाहीसे होते. हे मिथ्याज्ञान हे आत्मा, त्याचे स्वरूप या संबंधाने असते. यथार्थ ज्ञानाने रागद्वेष  (राग म्हणजे पूर्वीच्या भाषेत लोभ) नाहीसे होतात. त्यामुळे त्या गोष्टी मिळविण्यासाठी अथवा टाळण्याच्या प्रवृत्तीचा नाश होतो. ही प्रवृत्तीच पुनर्जन्मास कारणीभूत ठरते. मोक्ष हा सुखस्वरूप असून परमेश्वराच्या प्रत्यक्ष ज्ञानाने प्राप्त होतो असे नैयायिक मानतात.
मोक्ष म्हणजे आत्म्याने मूळच्या प्रवृत्तीत रहाणे हे अन्य दर्शनकारांचे मत नैयायीकाना मान्य आहे. पण या अवस्थेत आत्म्याला जाणीव नसते असे ते मानतात. जाणीव ही मनाच्या आत्म्याशी झालेल्या संयोगाने निर्माण होते असे त्यांचे मत आहे.
वैशेषिक आणि नैयायिक यांच्यात काही भेदही आहेत. उपमान हे प्रमाण नैयायिक मानतात, पण ते वैशेषिक नाकारतात. नैयायिक 'एक' हीच संख्या वास्तव सृष्टीत असे मानतात. अन्य संख्या एकच्या संयोगाने झाल्या आहेत असे त्यांचे मत आहे. हे वैशेषिकांना मान्य नाही. असे अन्य काही छोटे भेट आहेत.
पुढील लेखात 'सांख्य दर्शनाची' माहिती घेऊ. 

Wednesday, May 16, 2018

वैशेषिक दर्शन

जैन, बुद्ध आणि चार्वाक या 'नास्तिक' दर्शनानंतर आपण आता 'आस्तिक' दर्शनांकडे वळू. नास्तिक म्हणजे 'वेदप्रामाण्य' नाकारणारी दर्शने. वैशेषिक दर्शन वेदप्रामाण्य नाकारीत नसले तरी ठामपणे त्याचा पुरस्कारही करीत नाही.
दर्शनशास्त्रासंबंधी चर्चा करताना न्यायवैशेषिक अशा जोडगोळीचा उल्लेख करण्याची प्रथा आहे. कारण ही दोन दर्शने स्वतंत्र असली तरी कालौघात ती एकरूप झालेली आहेत. विश्वाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन जवळपास सारखाच झाला आहे. तरी त्यात थोडे फरकही आहेत. आपण या दोन्ही दर्शनान्चा  वेगळा विचार करू. कालदृष्ट्या वैशेषिक दर्शन हे न्याय दर्शनाच्या आधीचे आहे. म्हणून त्याचा प्रथम विचार करू.
वैशेषिक दर्शनाचा पहिला व्यवस्थित ग्रंथ म्हणजे कणाद ऋषींची 'वैशेषिक सूत्रे'. यामुळे कणाद ऋषींना वैशेषिक दर्शनाचे प्रथम प्रवक्ते मानण्यात येते.
सामान्य माणसांच्या व्यावहारिक दृष्टीचे समर्थन ही न्यायवैशेषिकांची मूलभूत प्रेरणा आहे. सर्वसाधारण तत्वज्ञान सामान्य माणसाच्या व्यावहारिक ज्ञानाला चीकीचे ठरविते. परंतु न्याय-वैशेषिक हिरीरीने सामान्य माणसाच्या व्यवहाराचे समर्थन करतात. याचा अर्थ असा नाही की ही दर्शने समजण्यास सोपी आहेत. त्यांचा व्यावहारिक पक्ष समजण्यास सोपा असला तरी त्या व्यावहारिक पक्षाला समर्थन देण्यासाठी असलेला तात्त्विक पक्ष अत्यंत जटील आहे. म्हणूनच आपण या लेखमालेत या तात्त्विक पक्षात फार खोलात जाणार नाही.
'वस्तूचे ज्ञान करून देण्यास आम्ही शेवटी अनुभवलाच शरण जातो' (संविदेव हि भगवती वास्तुपगमे न:शरणम्  | ) असे वैशेषिक दर्शन सांगते. वस्तुमधील द्रव्य आणि तिचे गुण वेगळे आहेत असे आपण सामान्यपणे समजतो. तसेच करणापासून उद्भवलेले कार्य स्वतंत्रपणे सुरु होते असे आपण व्यवहारात समजतो. वैशेषिक दर्शन यालाच तात्त्विक समर्थन देते.
वैशेषिकांचा परमाणु सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्याही द्रव्याचे (वस्तूचे) विभाजन केले असता शेवटी अत्यंत सूक्ष्म अविभाज्य परमाणु मिळतो. परमाणूचे गुण मूळ वस्तूपेक्षा वेगळे असू शकतात. परमाणु हा 'नित्य द्रव्य' आहे. अन्य अनित्य द्रव्यांप्रमाणे त्यात बदल होत नाही. दोन परमाणुंच्या संयोगाने एक 'द्वणूक' बनते.  तीनच्या संयोगाने एक त्रीणूक बनते. अशीच चतूरणूक वगैरे बनतात.  परमाणुंच्या संयोगानेच हा दृश्य विश्वाचा पसारा बनलेला आहे असे वैशेषिक सांगतात. हा सिद्धांत सध्याच्या Atomic सिद्धांताच्या अत्यंत जवळ जाणारा आहे.
प्राचीन काळी ग्रीक तत्ववेत्त्यांनीही परमाणु सिद्धांत मांडला होता. परंतु त्यांच्यामते कोणत्याही द्रव्याच्या परमाणु स्थितीत असलेले परमाणु एकाच प्रकारचे गुण असलेले असतात. वैशेषिकांनी मात्र वेगवेगळे गुण असलेले परमाणु मानले.
वैशेषिकांची प्रमुख प्रेरणा नितीमुल्ये समजावून सांगणे नव्हती तर सर्व ज्ञात गोष्टींचा खोलात जाऊन अभ्यास करण्याची होती. त्यामुळे त्यांच्या दर्शनात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांचा काही भाग डोकावतो. प्राचीन काळी विज्ञान हे तत्वज्ञानातच गणले जात होते. त्यामुळे वैशेषिक ग्रंथात 'उखळात टाकलेले मुसळ परत उसळून वर का येते', 'पक्षी आकाशात कसा उडू शकतो' अशासारख्या गोष्टीवरही विवेचन आढळते.
थोडक्यात सांगायचे तर जगातील सर्व ज्ञेय गोष्टींचा विचार वैशेषिक दर्शन करते. हे प्रामुख्याने प्रमेय शास्त्रआहे. यातील बहुसंख्य प्रमेये न्यायशास्त्राला मान्य आहेत. या प्रमेयशास्त्राला प्रमाणांची जोड देण्याचे महत्वाचे कार्य न्यायदर्शनाने केले आहे. त्याचा विचार पुढील लेखात करू.

Tuesday, May 15, 2018

चार्वाक दर्शन

जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन ही 'नास्तिक' दर्शने आपण पाहिली. 'वेदप्रामाण्य नाकारणारी' या अर्थानेच ती दर्शने नास्तिक आहेत. परंतु 'चार्वाक दर्शन' हे त्यापेक्षा पूर्णांशाने निराळे आहे. ते सध्याच्या अर्थानेही खरे 'नास्तिक' दर्शन आहे.
चार्वाक दर्शनाचे मंडन करणारा एकाही स्वतंत्र ग्रंथ दुर्दैवाने उपलब्ध नाही. विरोधकांनी लिहिलेल्या संकलन ग्रंथातून आणि विरोधकांनी लिहिलेल्या ग्रंथातील पूर्वपक्षातूनच आपल्याला हे दर्शन समजून घ्यावे लागते.
या दर्शनाचा आद्यप्रवर्तक बृहस्पती (देवगुरु?) आहे असे मानतात. म्हणून या दर्शनाला 'ब्राहास्पत्य दर्शन' असेही म्हणतात. 'लोकायत' असेही या दर्शनाचे नाव आहे. इसवीसनाच्या आठव्या शतकापासून मात्र हे दर्शन 'चार्वाक दर्शन' म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
इतर कोणत्याही दर्शनाप्रमाणे चार्वाक दर्शनाची उभारणी प्रमाण मतांवर झाली आहे. कोणती प्रमाणे मानायची आणि कोणती ताजी ठरवायची हे ठरविल्यावर आपोआपच पुढील सिद्धांतांची मांडणी करता येते. चार्वाक 'प्रत्यक्ष' हे एकमेव प्रमाण मानतो. शब्द (वेद, पुराणे) इत्यादी अथवा अनुमान हे प्रमाण मानण्याचे त्यांनी नाकारले.
अनुमान म्हणजे ज्ञाताच्या आधारावर अज्ञातापर्यंत पोचविणारी मानसिक क्रिया. 'सगळ्या गाढवांचे कान लांब आहेत म्हणून गोऱ्या कुंभाराच्या गाढवाचे कान लांब आहेत' हे अनुमान झाले. पण सर्व गाढवांचे कान लांब आहेत हे कसे ठरविले? जर सर्व गाढवांचे कान लांब आहेत हे सर्व गाढवे पाहून ठरविले असेल तर गोऱ्या कुंभाराच्या गाढवाचे कानही पहिले आहेत. म्हणजेच जे आधीच सिद्ध आहे ते परत सिद्ध करण्याचा हा खटाटोप आहे. काही गाढवे पाहूनच सर्व गाढवान्साम्बंधी विधान केले तर त्याची सत्यता शंकास्पद राहील. म्हणून अनुमान चार्वाकाना मान्य नाही.
पण अनुमानाशिवाय आपल्याला जगातच येणार नाही. त्यामुळे चार्वाकांवर खूप टीका झाली. शेवटी काही चार्वकांनी यावर मार्ग काढून नेहमीच्या जीवनात लागणाऱ्या गोष्टींसाठी अनुमान स्वीकारले. पण लोकोत्तर गोष्टींसाठी (या इन्द्रियांच्या  अनुभवपलीकडे असलेल्या) गोष्टींसाठी अनुमान वापरण्याचे नाकारले. त्यामुळे चार्वाक आत्मा, परलोक, पाप, पुण्य, कर्म इत्यादी काहीच मानीत नाहीत.
आत्मा आणि कर्मवाद नाकारून चार्वाकांनी ऐहीकवाद स्वीकारला. या जीवनात जी जी सुखे शक्य आहेत ती उपभोगावी आणि आनंदात राहावे असे सांगितले. सुखाशी दु:ख हे संलग्न असतेच, म्हणून दु:खाला घाबरून सुखाकडे पाठ फिरविणे योग्य नाही अशी त्यांची भूमिका होती. (बुद्धाने नंतर याच्या बरोबर उलट भूमिका मांडली). या भूमिकेमुळे चार्वाकांवर अतिरेकी सुखावादाचा आरोप केला गेला.
यावज्जीवं सुखम् जीवेत् ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत् |
असे चार्वाकांचे म्हणणे असल्याचे सांगितले गेले. पण हा त्यांच्यावर अन्याय आहे. 'सर्वसिद्धांतसंग्रह' या ग्रंथात स्पष्ट उल्लेख आहे की चार्वाकांच्या मते शहाण्या, जाणत्या माणसाने शेती, गोपालन, व्यापार, शासनव्यवस्था या सारख्या दृष्ट असलेल्या 'सत्' उपायांनी पृथ्वीवरील भोग उपभोगावेत.
अग्निहोत्र, वेदापठाण इत्यादींचे स्तोम माजवून पौरोहीत्यादी उपायांनी उपजीविका करणार्यांची त्यांनी निंदा केली आहे. त्यांची गणना 'भंड-धूर्त-निशाचारांत' केली आहे.
म्हणजेच चार्वाकांना एक नीतिशास्त्र होते. त्यांनी प्राण्यांना मारून त्याचे मांस खाण्याचीही निंदा केली आहे. अर्थात नीती-अनीती या इंद्रिय संवेदना नाहीत. त्यामुळे त्यांचे नीतिशास्त्र कोणत्या आधारावर बेतले होते याचा पत्ता लागत नाही.
या नंतर आपण 'वैशेषिक दर्शनाचा' विचार करू.

Monday, May 14, 2018

बौद्ध दर्शन : अव्याकृते

बौद्ध दर्शनाची  मुख्य प्रेरणा दु:खमुक्ती हेच आहे. त्यामुळे तात्विक काथ्याकूट करण्यात बुद्धाला रस नव्हता. मृत्युनंतर निर्वाणाप्रत पोचलेल्या व्यक्तीचे काय होते, हा लोक शाश्वत आहे की अशाश्वत अशा प्रश्नांची उत्तरे देणे बुद्ध टाळत असे. ही उत्तरे कळून काही फायदा नाही. दु:ख कसे निवारण होईल याकडेच लक्ष दिले पाहिजे अशी त्याची अत्यंत व्यवहारी भूमिका होती. अशा प्रश्नांना 'अव्याकृते' म्हणून संबोधण्यात येते. अव्याकृते म्हणजे बुद्धाने कधीही ज्या सम्बंधात काही वक्तव्य केले नाही. अशी दहा अव्याकृते आहेत.

  1. जग शाश्वत आहे
  2.  जग अशाश्वत आहे
  3. जगाला अंत आहे
  4. जग अनंत आहे
  5. जीव आणि शरीर एकाच आहेत
  6. जीव आणि शरीर वेगळे आहेत
  7. तथागत मरणानंतर असतो
  8. तथागत मरणानंतर नसतो
  9. तथागत मरणानंतर असतोही आणि नसतोही
  10. तथागत मरणानंतर असतोही आणि नसतोही असे नाही
पुढील लेखात आपण चार्वाक दर्शनासंबंधी (लोकायत) माहिती घेऊ.

Sunday, May 13, 2018

बौद्ध दर्शन : प्रतीत्यसमुत्पाद

प्रतीत्यसमुत्पाद किंवा द्वादश-निदान ही गौतम बुद्धाची सर्वात मोठी उपलब्धी आहे असे त्याचे मत होते.  आपण हा प्रतीत्यसमुत्पाद सध्याच्या भाषेत समजून घेऊ.
माणसाचे मन खूप मोठे असते. आपल्याला जाणविणाऱ्या मनाच्या भागाला आपण बहिर्मन म्हणतो. त्यापलीकडे खूप मोठे अंतर्मन असते. काही बाह्यगोष्टींमुळे ही अंतर्मनातील खळबळ बाह्य मनावर येऊ शकते. त्यामुळे आपण अस्वस्थ होतो हे आपण सगळे जाणतो.
अंतर्मनात आपले पूर्वीचे बरे-वाईट अनुभव (बुद्धाच्या भाषेत 'संस्कार') एकत्र साठविलेले असतात. एखाद्या बाह्य गोष्टीचा स्पर्श आपल्या पंचेन्द्रीयांपैकी एकाला होतो अथवा मनात एखादा विचार येतो. पंचेंद्रिये ही केवळ एखाद्या उपकारणासारखी असतात. ज्याचा स्पर्श  झाला (दिसणे, ऐकणे, चव, स्पर्श, गंध, विचार इ.)  ती गोष्ट ही इंद्रिये निरपेक्षपाने मेंदूला पोचवितात. पुढच्या क्षणी मेंदूचा एक हिस्सा जागृत होतो आणि या आलेल्या अनुभवाचे परीक्षण करतो. आलेल्या अनुभवासारखा (स्पर्श, चव इत्यादी) अनुभव पूर्वी कधी आला होता काय हे स्मृतीतून शोधतो. हा पूर्वीचा अनुभव चांगला असेल तर शरीरावर सुखद संवेदना निर्माण करतो. जर पूर्वीचा अनुभव वाईट असेल तर शरीरावर दु:खद संवेदना निर्माण होतात. या सुखद अथवा दु:खद संवेदनांना आपण प्रतिसाद देतो. सुखद संवेदना परत परत अनुभवाव्याश्या वाटतात. दु:खद संवेदानांपासून आपण दूर पळतो. अशी संवेदना परत अनुभवण्यास लागू नये असे वाटते (बुद्धाच्या भाषेत 'तृष्णा').  परत आपला प्रतिसाद परत अंतर्मनात जातो. आपला प्रतिसाद किती तीव्र होता यावर अंतर्मनात हा प्रतिसाद किती खोलवर जाईल आणि किती काल तसाच राहील हे ठरते. ही क्रिया वारंवार घडल्याने अंतर्मनात या अनुभवाबद्दलचा प्रतिसाद तीव्र रूप घेतो आणि आपल्याला प्रत्येकवेळी अधिकाधिक अस्वस्थ करतो. मृत्युच्या वेळी यातील एखादी तीव्र इच्छा डोके वर काढते. हीच इच्छा हा संस्कारांचा पुंज घेऊन नव्या शरीराला चिकटते आणि पुनर्जन्म होतो (भव).
माणूस या भावाचाक्रात असाच असहाय्यपणे फिरत रहाणार काय हा प्रश्न बुद्धाला पडला. पण ही साखळी तोडण्याचा एक मार्ग त्याला दिसला. शरीरावर सुखद अथवा दु:खद संवेदना निर्माण झाल्यावर त्याला प्रतिसाद न देणे, त्या परत परत अनुभवण्याची अथवा कधीच न अनुभवण्याची इच्छा मनात येऊ न देणे. यामुळे मनातील 'संस्कार' बहिर्मानावर येऊन नष्ट होतील (निर्जरा होतात), त्यांना बळ मिळून ते परत अंतर्मनात जाणार नाहीत. हळू हळू अंतर्मनातील सर्वच संस्कारांची निर्जरा होईल. याला बौद्ध भाषेत 'निर्वाण' म्हणतात. मग मृत्यूच्यावेळी कोणतीच इच्छा डोके वर काढणार नाही, संस्कारांचा पुंज शून्य झालेला असेल. अशावेळी काहीच उरणार नाही. आत्मा सदृश काहीही नसेल. शून्य शून्यात विलीन होईल.
शरीरावर सुखद अथवा दु:खद संवेदना निर्माण झाल्यावर त्याला प्रतिसाद न देण्याची कला म्हणजे ध्यान होय.
ध्यानात खोलवर गेल्यावर या सुखद अथवा दु:खद संवेदनाची जाणीव स्पष्टपणे होऊ लागते. आपण प्रतिसाद न दिल्याने त्याची निर्जरा कशी होते हेही जाणवते. विपश्यनेचा संपूर्ण मार्ग हा स्वानुभवाचा मार्ग आहे. प्रतीत्यसमुत्पाद ही कल्पनेतील गोष्ट नाही हे जाणवते.
आधुनिक शास्त्रही सांगते की अंतर्मनातील गोष्टी बहिर्मानावर येऊ लागल्या की आपल्याला मोकळे वाटू लागते. प्रतीत्यसमुत्पाद हीच गोष्ट वेगळ्या भाषेत सांगतो आणि मन मोकळे करण्यासाठी ध्यान हे एक साधनही आपल्या हाती देतो.
पुढील लेखात बुद्धाने सांगितलेली दहा अव्याकृते पाहू.

Saturday, May 12, 2018

बौद्धदर्शन : द्वादश-निदान

दु:खकारण या आर्यसत्याचे निरुपण करताना भगवान बुद्धांनी दु:खाला कारणीभूत असलेली बारा कारणांची मालिका सांगितली. यातील प्रत्येक दुव्याला बुद्धांनी 'निदान' असे म्हटले आहे. त्यामुळे ही मालिका 'द्वादश-निदान' या नावाने ओळखली जाते. ही बारा निदाने पुढीलप्रमाणे : अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाति, जरामरण.
जरामरणाच्या अनुषंगाने शोक-परिवेदना-दु:ख-दौर्मनस्य येतात असेही सांगितले आहे.
अविद्येमुळे (अविद्येचा अर्थ मागील लेखात स्पष्ट केला आहे) आपल्या मनात विकार निर्माण होतात. यालाच बौद्ध दर्शनात 'संस्कार' (पाली भाषेत 'संखारा') म्हटले आहे. या विकारातून 'मी आहे' अथवा 'पदार्थ आहेत' अशी अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. यालाच बौद्ध दर्शनात 'विज्ञान' म्हटले आहे. विज्ञानामुळेच 'नामरूपाची' निर्मिती होते. 'नाम' म्हणजे मन:पिंड आणि रूप म्हणजे शरीरपिंड. या नामरूपामुळे सहा इंद्रिये (पाच ज्ञानेंद्रिये आणि मन) तयार होतात. या सहा इंद्रियांना बाहेरील कोणत्याही गोष्टीचा स्पर्श होतो. डोळ्यांना वस्तू दिसतात, कानाला ऐकू येते, मनात विचार येतात इत्यादी. त्यामुळे सुख-दु:ख इत्यादी भावना निर्माण होतात. त्यांना 'वेदना' म्हटले आहे. या सुखद वेदना पुन्हा पुन्हा अनुभवाव्या, दु:खद वेदना परत अनुभवण्यास लागू नये अशी भावना म्हणजे 'तृष्णा' निर्माण होते. या तृष्णेची अत्यंतिकता म्हणजे 'उपादान' (यालाच 'आसक्ती' असेही म्हणता येईल). उपदान मृत्युनंतर पुढील जन्मास ('भव') कारणीभूत ठरते. त्यामुळे पुढील आयुष्याला ('जाती') सामोरे जावे लागते. आयुष्य आले की वृद्धत्व आणि मृत्यू ('जरामरण') आलेच. त्यामुळेच दु:खाची निर्मिती होते. अशी ही दु:खनिर्मितीची साखळी आहे. या मालिकेतील आधीच्या दुव्यामुळे पुढील गोष्ट घडते. याला 'प्रतीत्यसमुत्पाद' असेही नाव आहे.
ही शृंखला तोडणे मानवाला शक्य आहे. 'तृष्णा जागविणे-न जागविणे' माणसाच्या हातात आहे. समाधी अवस्थेत (समाधीचा अर्थ मागील लेखात स्पष्ट केला आहे) मनाच्या समतोल अवस्थेमुळे नवी तृष्णा जागत नाही आणि मनुष्य या दु:ख निर्माण करणाऱ्या साखळीतून मुक्त होऊ शकतो असे बुद्धाचे प्रतिपादन आहे.
ही मालिका थोडी किचकट आणि ओढून-ताणून आणली आहे असे प्रथमदर्शनी वाटते. पण ध्यानात खोलवर गेले असता या दुव्यातील अनेक गोष्टींचा अनुभव येतो.
पुढील लेखात प्रतीत्यसमुत्पाद आपण अधिक सोप्या शब्दात समजून घेऊ आणि आपल्या जीवनातील दु:खे कमी करण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हे पाहू. प्रतीत्यसामुत्पादाचा आणि ध्यान-समाधीचा काय संबंध आहे ते ही पाहू.

Friday, May 11, 2018

बौद्ध दर्शन : आर्यअष्टांगिकमार्ग

दु:खनिरोध शक्य आहे आणि त्यासाठी एक निश्चित मार्गही आहे असे ठाम प्रतिपदन गौतम बुद्धाने केले. या मार्गाला आर्यअष्टांगिकमार्ग असे नाव आहे. ही आठ अंगे पुढीलप्रमाणे

  1. सम्यक दृष्टी
  2. सम्यक संकल्प
  3. सम्यक वाचा
  4. सम्यक कर्म
  5. सम्यक आजीविका 
  6. सम्यक व्यायाम
  7. सम्यक स्मृती
  8. सम्यक समाधी
आटोपशीर व्हावे म्हणून अनेकवेळा या आठ अंगांचा समावेश शील, प्रज्ञा आणि समाधी या तीन भागात केलेला असतो. आपणही या तीन भागातच याचे विवेचन करू.
  1. शील: शील म्हणजे सदाचार. वागण्याचे नैतिक नियम. भिक्खुंसाठी असे दहा नियम आहेत. इतरांसाठी यातील पाच आहेत. यालाच 'पंचशील' असे म्हणतात. जैनांच्या 'अनुव्रत' आणि पातंजल योगाच्या 'यमनियम' याच्याशी साम्य असणारे आहेत.
  2. प्रज्ञा : सर्व पदार्थ अनित्य आहेत असे मनात पुरेपूर ठसणे यालाच 'प्रज्ञा' असे नाव आहे. जगात 'नित्य' असे काहीच नाही. नित्यतेच्या आभासामुळेच दु:ख अनुभवाला येते असे बुद्धाचे प्रतिपादन आहे. उपनिषदांच्या अविनाशी आत्म्याच्या प्रतिपादनाच्या बरोबर विरुद्ध हे प्रतिपादन आहे. अविनाशी आत्म्याच्या कल्पनेमुळेच अहंकार ("मी") आणि ममत्व ("माझे") हे भाव निर्माण होतात आणि अंतिमत: दु:खाला कारणीभूत ठरतात असे बुद्धाचे मत आहे.  
  3. समाधी: शील आणि प्रज्ञा यानंतर समाधीचा टप्पा येतो. समाधी म्हणजे चित्ताची अत्यंत समतोल अवस्था. ध्यानाने चित्ताची अशी अवस्था प्राप्त होऊ शकते. अशी समतोल अवस्था प्राप्त करण्यासाठी गौतम बुद्धांनी 'विपश्यना' ध्यानपद्धतीचा अवलंब करण्यास सामान्य नागरिकांना शिकविले. त्या काळी अशी ४५ दिवसांची ध्यानशिबिरे स्वत: बुद्ध घेत असत आणि त्यात एकावेळी दहा हजारापर्यंत नागरिक सहभागी होत असत. 'राजगृह (बिहार)' येथे त्यासाठी भव्य सभागृह बांधले होते. आता गोएंकागुरुजी ही ध्यानपद्धती शिकविण्यासाठी दहा दिवसांची नि:शुल्क शिबिरे आयोजित करतात. (http://www.dhamma.org)
दु:खकारण या आर्यसत्याचे निरुपण करताना भगवान बुद्धांनी 'द्वादशनिदान सिद्धांत' आणि 'प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत'  मांडला. पुढील भागात आपण हे द्वादशनिदान आणि प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत समजून घेऊ. 



Thursday, May 10, 2018

बौद्ध दर्शन : आर्यसत्ये


गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यावर पहिले प्रवचन त्यांनी सारनाथ येथे त्यांच्याबरोबर आधी मुक्तीचा मार्ग शोधत असलेल्या पाच श्रमणांना दिले. हे प्रवचन 'धम्मचक्र प्रवर्तन' या नावानेही ओळखले जाते.  अशोकचक्र याच धम्मचक्राचे प्रतीक आहे.
यावेळी गौतम बुद्धांनी चार आर्यसत्ये सांगितली. ('आर्यसत्ये' म्हणजे 'शाश्वत सत्ये').

  1. दु:ख आहे : या जगात दु:ख आहे हे भगवान बुद्धांनी ठामपणे सांगितले. म्हणूनच काही टीकाकार 'दु:खवादी' अशी या धर्मावर टीका करतात. 'सुख पाहता जवापडे, दु:ख पर्वताएवढे' किंवा 'अधिक सुख मिळवावे' अशी बुद्धाची भूमिका नाही. एखाद्या गोष्टीत काही काल सुख वाटले तरी नंतर ती गोष्ट नाहीशी झाल्यावर दु:खच वाट्याला येते. त्यामुळे सुखाचे अंतिम पर्यावसान दु:खातच होते अशी ही भूमिका आहे. एखादा वैद्य रोगावर औषधोपचार करण्यापूर्वी रोग असल्याची खात्री करून घेतो त्याप्रकारची ही भूमिका आहे.
  2. दु:ख समुदाय (दु:ख कारण) : एखादा निष्णात वैद्य रोगाची खात्री करून घेतल्यावर त्या रोगाच्या मूळ कारणांचा शोध घेतो. मूळ कारण सापडल्यावरच त्यावर इलाज करणे शक्य होते. अन्यथा हे इलाज वरवरचे तात्कालिक होतील. दु:खाचे मूळ कारण अविद्या आहे. अविद्या म्हणजे अहंकार ('मी') आणि ममत्व ('माझे') यातून उगम पावलेली आत्मकल्पना. अविद्येतून तृष्णा आणि तृष्णेतून दु:ख जन्माला येते असे बुद्धाने प्रतिपादन केले. अविद्येतून दु:खाचा जन्म कसा होतो याचे विस्तृत विवेचन बुद्धाने केले आहे. त्याला द्वादश-निदान असे म्हणतात. आपण द्वादश-निदान या लेखमालेत नंतर समजून घेऊ. 
  3. दु:ख निरोध : रोगाच्या मूळ कारणांचा शोध घेतल्यावर त्यावर काय इलाज करता येईल याचा वैद्य शोध
    घेतो. मूळ कारण कळल्याने इलाजाची दिशा मिळते. बुद्धाने 'अविद्येचा नाश केल्यास दु:खापासून मुक्ती मिळते' असे सांगितले. दु:खापासून मुक्ती ही केवळ कल्पना नाही तर आपण स्वत: दु:खापासून मुक्ती मिळविली असल्याचे ठाम प्रतिपादन केले.
  4. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा (दु:ख निरोधचा मार्ग) : रोगावर इलाज ठरविला की वैद्य औषध कसे घ्यायचे हे विस्तृतपणे सांगतो. तसेच भविष्यात पुन्हा हा रोग उद्भवू नये म्हणून काय काळजी घ्यायची याची माहिती देतो.  गौतम बुद्धाने हा दु:खापासून मुक्ती मिळविण्याचा मार्ग टप्प्याटप्प्याने विषद केला. आज अडीचहजार वर्षानंतरही सामान्य संसारी माणूस या मार्गाने जाऊन जीवनातील दु:खांवर मात करू शकतो. 'आर्यअष्टांगमार्ग' असे त्या मार्गाचे नाव आहे.
पुढील लेखात या 'आर्यअष्टांगमार्गाचा' विचार करू.

Wednesday, May 9, 2018

बौद्धदर्शन

बौद्धदर्शन हे अनेक अंगांनी विस्तारले आहे. भारतातून बुद्धधर्म अनेक देशांत पसरला. त्यामुळे बौद्धदर्शनात अनेक प्रवाह येऊन मिसळले. आपण विस्तारभयापोटी गौतम बुद्धाने प्रतिपादित केलेल्या दर्शनाचाच विचार करणार आहोत.
राजपुत्र सिद्धार्थ याला त्याच्या वडिलांनी अत्यंत सुखात ठेवले. दु:खाचा स्पर्शही होणार नाही याची काळजी घेतली. पण यथावकाश त्याला वार्धक्य, रोग, मृत्यू याची माहिती झालीच. यामुळे त्याचे हृदय पिळवटून गेले. संपूर्ण बौद्धदर्शनावर या प्रसंगाची छाया स्पष्टपणे जाणवते.  दु:खाचे निराकरण करण्याचा मार्ग शोधण्यासाठी सिद्धार्थाने गृहत्याग केला.
बुद्धाच्या महानिर्वाणानंतर सुमारे शंभर वर्षांनी एक धर्मसभा (संगती) बोलाविण्यात आली. यात बुद्धाच्या जवळच्या लोकांच्या आठवणीत असलेली वचने शब्दबद्ध करण्यात आली. ही वचने तीन पेट्या अथवा टोपल्यांमध्ये जतन करण्यात आली. त्याला त्रिपिटक असे म्हणतात. या संगतीनंतर बुद्ध धर्मात दोन तट पडले. एका गटाच्या म्हणण्यानुसार बुद्धाची शिकवण जशीच्या तशी पाळणे आवश्यक आहे. या गटाला 'थेरवादी' असे नाव मिळाले. दुसरा गट स्थानिक संस्कृती आणि गरजा यांच्याशी बुद्ध शिकवणुकीचा मेळ घालावा या मताचा होता. त्यांच्या पंथाला 'महायान' अशी संज्ञा मिळाली. महायानपंथीय बुद्धमूर्तीची पूजाअर्चा करू लागले. काही प्राचीन बौद्ध स्तुपांमध्ये बुद्धाची मूर्ती दिसते तर काही स्तूपात सभागृहासमोर केवळ स्तूप दिसतो. याचे कारण काही लेणी थेरवादी बुद्धांची तर काही महायानवादी बुद्धांची आहेत. स्थानिक संस्कृतीशी मेळ घालण्याच्या सुविधेमुळे महायानपंथ अनेक देशांत पसरला. थेरवादीपंथ श्रीलंका, म्यानमार, कंबोडिया आदी भारताच्या शेजारी देशांमध्ये पसरला.
आपण पुढील लेखात बौद्ध दर्शनाचा विचार विस्ताराने करू.

Tuesday, May 8, 2018

जैन दर्शन : स्यादवाद

अनेकांतवाद हा जैन दर्शनाचा पाया आहे. नयवाद आणि स्यादवाद हे अनेकांतवादाचे दोन मुख्य पैलू आहेत. मागील लेखात आपण नयवादाची माहिती घेतली. आता स्यादवादाकडे वळू.
एखादे विधान करण्याच्या दृष्टीने अनेकांतवादाकडे पाहिले असता स्यादवाद निष्पन्न होतो. 'स्याद' चा अर्थ हिंदीतील 'शायद' या शब्दाच्या जवळ जातो. येथे त्याचा अर्थ 'एका विशिष्ट संदर्भात' असा होतो. आपण एखादे विधान केले तर ते विशिष्ट संदर्भातच खरे असते. संदर्भ बदलला तर त्याच्या अगदी विरुद्ध विधानही खरे असेल असे स्यादवादाचे तात्पर्य सांगता येईल. संदर्भ बदलून एखादे विधान करण्याच्या सात आणि फक्त सातच तऱ्हा आहेत.
 'येथे एक घट आहे' हे विधान सत्य असले तरी त्याच्या सत्यतेच्या संदर्भात काही मर्यादा आहेत. हा घट या खोलीबाहेर नसेल. तसेच येथेही हा घट काही वर्षांपूर्वी नव्हता. म्हणजेच माझ्या विधानाच्या सत्यतेला स्थळ-काळाच्या मर्यादा आल्या. या स्थळ-काळाच्या मर्यादांची जाणीव आहे हे दर्शविण्यासाठी जैन दर्शनात 'स्याद' या शब्दाचा वापर केला जातो. जसे 'स्याद अस्ति'. याला पहिला भंग म्हणतात.
हा घट या खोलीच्या बाहेर नाही हेही खरेच आहे. म्हणून 'स्याद नास्ति' हा दुसरा भंग होतो.
ही दोन्ही विधाने खरी असल्याने 'स्याद अस्ति च नास्ति च' ही एकाच गोष्टीसंबंधी विधान करण्याची तिसरी पद्धत.
आता ही 'अस्ति' आणि 'नास्ति' ही दोन्ही विधाने आपण एकाचवेळी करू शकतो. याचा अर्थच त्या वस्तूचे स्वरूप शब्दांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येत नाही. म्हणूनच चौथा भंग येतो. 'स्याद अवक्तव्यम्'
यातूनच पाचवा भंग जन्म घेतो. 'स्याद अस्ति च नास्ति च अवक्तव्यम्'
सहावा भंग  'स्याद अस्ति च  अवक्तव्यम्' आणि सातवा भंग  'स्याद नास्ति च अवक्तव्यम्' हेही आपोआपच येतात.
या सात प्रकारे विधान करण्याच्या पद्धतीला 'सप्तभंगीनय' म्हणतात.
म्हणजेच कोणतेही विधान केवळ काही संदर्भातच सत्य असते असे जैन दर्शन मानते. सर्वकालीन सत्य असे काही असण्याची शक्यता हे दर्शन नाकारते.

Monday, May 7, 2018

जैन दर्शन - नयवाद

अनेकांतवाद हा जैन दर्शनाचा पाया आहे हे आपण मागील लेखात पहिले. अनेकांतवाद हा नयवाद आणि स्यादवाद यांनी बनलेला आहे. नयवादाचा आता विचार करू.
नय म्हणजे अंश किंवा बघणाऱ्याचा विशिष्ट अभिप्राय. नयो ज्ञातुरभिप्राय: |  एकाच गोष्टीकडे आपण निरनिराळ्या संदर्भात पाहू शकतो. त्यामुळे त्या वस्तूच्या वेगवेगळ्या अंगांचे ज्ञान होते.अशाप्रकारे एका संदर्भात झालेल्या ज्ञानाला 'तेच खरे' म्हणून चिकटून राहून अन्य संदर्भात झालेल्या ज्ञानाला नाकारणे हे जैन दर्शनाला मान्य नाही. अशा चुकीस जैन परिभाषेत 'नयाभास' म्हणतात.
नयाची अनेक वर्गीकरणे केलेली आहेत. त्यातील एक म्हणजे 'द्रव्यनय' आणि 'पर्यायनय'.
प्रत्येक वस्तू एका मुलभूत गोष्टीपासून बनलेली असते. तिच्यात अवस्थांतर झाले तरी मूलभूत गोष्ट तशीच रहाते. या मूलभूत गोष्टीने ती वस्तू ओळखणे हा द्रव्यनय झाला. उदाहरणार्थ माझा सुती सदरा हा कापसाचा बनलेला आहे. कापसाचे नंतर धागे बनले, कापड बनले आणि त्याचा सदरा बनला. तरी त्यातील कापूस हे द्रव्य तसेच राहते. त्यामुळे सदऱ्याला कापूस म्हणून ओळखणे हा द्रव्यनय झाला. सध्या महाराष्ट्र शासन प्लास्टिकवर बंदी आणीत आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, कापड, चमचे इत्यादी 'प्लास्टिक' म्हणूनच ओळखले जाईल. हा द्रव्यनय आहे.
जैन परिभाषेत वस्तूच्या निरनिराळ्या अवस्थांना 'पर्याय' म्हणतात. जेव्हा वस्तूचे ज्ञान होताना या अवस्थांचे प्रामुख्याने ज्ञान होते तेव्हा तेथे पर्यायनय होतो असे मानतात. या पर्यायनयाचेही अनेक उपविभाग जैन दर्शनामध्ये होतात. परंतु आपण तेवढ्या खोलात सध्यातरी जाणार नाही.
मी पुस्तक वाचतो असे म्हणताना आपण पुस्तकाची एक ओळच वाचत असतो. त्यामुळे कोणी म्हणेल मी ही ओळ वाचतो, तर कोणी म्हणेल मी हा धडा वाचतो. ही विविध नयाची उदाहरणे झाली. जैन दर्शनाच्या मते सांख्यदर्शन, अद्वैतदर्शन (उत्तरमीमांसा) इत्यादी दर्शने कोणत्यातरी एकाच नयावर भर देतात. यामुळे ती स्वत:ला इतरांपासून वेगळी समजतात. पण हा केवळ नयाभास आहे. त्यामुळे या कोणत्याही दर्शनाला (अथवा नयाला) ताज्य ठरविता येत नाही. सत्याचे ते विविध अंगांनी झालेले दर्शन आहे.
पुढील लेखात आपण 'स्यादवादा'चा विचार करू.           

Sunday, May 6, 2018

जैन दर्शन


जैन दर्शन हे अन्य सर्व दर्शनांपेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. अन्य दर्शने आपल्याला जे मत मांडायचे आहे ते निरनिराळ्या प्रमाणांच्या सहाय्याने मांडण्याचा प्रयत्न करतात. पण जैन दर्शन हे कोठलेही मत अथवा भूमिका ठामपणे मांडत नाही, तर 'प्रत्येक मत अथवा भूमिका आपापल्या परीने योग्यच असते' असा सिद्धांत मांडते. 'अनेकांतवाद' हा जैन धर्माचा पाया आहे. खरेतर अनेकांतवाद हा जैन धर्माच्या आत्यंतिक अहिंसावादाची तार्किक परिणीती आहे. बौद्धिक पातळीवर अहिंसा अथवा भिन्नमतसहिष्णुता म्हणजेच अनेकांतवाद. यासंबंधी अधिक माहिती नंतर घेऊ.
चार्वाक आणि बौद्ध दर्शनांप्रमाणे जैन दर्शन हे 'नास्तिक' दर्शन म्हणून ओळखले जाते. जी दर्शने वेदप्रामाण्य मानत नाहीत ती दर्शने प्राचीन मान्यतेप्रमाणे 'नास्तिक' दर्शने म्हणून ओळखली जातात. 'देव आहे अथवा नाही' असे मानण्याचा आणि या 'नास्तिक' शब्दाचा काहीही संबंध नाही. जैन परंपरा वेदपूर्व कालापासुनाची आहे असे काहींचे मत आहे. यज्ञयाग करून देवतांना प्रसन्न करून त्यांच्या कृपाप्रसादाने मोक्ष मिळविण्याची वैदिक परंपरा येथे होती तशीच गृहत्याग करून स्वत:च्या तपोबलाने मोक्षप्राप्ती करण्याची श्रमण परंपरासुद्धा येथे नांदत होती. जैन आणि बौद्ध दर्शने ही परंपरा मानतात.
जैन परंपरेनुसार वस्तूंचे 'जीव' आणि 'अजीव' असे प्रकार आहेत. जीवांचे 'संसारी' आणि 'मुक्त' असे प्रकार आहेत. 'संसारी' जीव हे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात 'सरत' जाणारे जीव होत. 'मुक्त' जीव यातून बाहेर आले आहेत. पण त्यांचे ही दोन प्रकार आहेत. 'सिद्ध' आणि 'तीर्थंकर'. सिद्धजीव हे 'संसारी सुखदु:खे' यापासून पूर्णत: अलिप्त असतात तर तीर्थंकर (अथवा अर्हत) जीव काही काल संसारी जीवांना मार्गदर्शन करतात. भगवान महावीर हे जैन परंपरेतील चोविसावे आणि शेवटचे तीर्थंकर होत. त्यापूर्वी २५० वर्षे आधी भगवान पार्श्वनाथ हे तेविसावे तीर्थंकर  होऊन गेले.
जैन धर्माच्या धर्मग्रंथांच्या खोलात न जाता आपण दर्शनशास्त्राच्या दृष्टीने महत्वाच्या अनेकांतवादाचा विचार करणार आहोत. हा अनेकांतवाद 'नयवाद' आणि 'स्यादवाद' यातून स्पष्ट होतो.  त्याचा विचार पुढील लेखात करू.

परस्परावलंबन

भारतीय तत्वज्ञान ही एकसंघ, एकरंगी वस्तू नाही, तर हे तत्वज्ञान अनेक अंगांनी फुलत गेलेले आहे. येथे अनेक दर्शने विकसित झाली. ही दर्शने स्वतंत्रपणे एका हवाबंद कप्प्यात विकसित न होता एकाचवेळी हातात हात घालून विकसित झालेली आहेत. अन्य देशांत एखादा तत्ववेत्ता होऊन एखादे तत्वज्ञान विकसित करतो. त्याच्यानंतर अनेक वर्षांनी अन्य कोणी तत्ववेत्ता येऊन आधीच्या तत्वज्ञानातील उणीवा दाखवितो आणि नवे तत्वज्ञान जन्माला घालतो. येथेमात्र सर्व तत्वज्ञाने एकमेकांवर आघात-प्रत्याघात करीत एकाचवेळी विकसित होत होती. कोठल्याही तत्वज्ञानाचा उच्छेद झाला नाही.
कोणत्याही दर्शनाची मांडणी करताना प्रथम अन्य दर्शनाच्या मताचा परामर्श घेतला जातो. कोणी त्या दर्शनाच्या मताच्या विरोधात नवा युक्तिवाद मांडल्यास त्या दर्शनाचे पुढील भाष्यकार आपली मूळची भूमिका न सोडता या विरोधी युक्तिवादाचे खंडन करण्यास काही उत्तर शोधून काढतात आणि आपले दर्शन अधिक निर्दोष बनवितात. विविध दर्शनाच्या भाष्यकारांच्या होणाऱ्या वादविवादामुळे या सर्वच दर्शनांची वाढच झाली, एकमेकांच्या वाढीला ही विविध दर्शने उपकारक ठरली.
याचाच परिणाम म्हणू येथे आपले मत मांडण्याची पूर्वपक्ष-उत्तरपक्ष पद्धती रूढ झाली. या पद्धतीत प्रतिस्पर्धी दर्शनाची भूमिका प्रथम विस्ताराने मंडळी जाते आणि मग तिचे खंडन केले जाते. विशेष म्हणजे कोणीही प्रतिपक्षाचे मत विकृत करून मांडलेले नाही. प्रतिपक्षाच्या मताला योग्य मान देऊनच त्याचे खंडन केले जात असे. अनेकदा असे घडले आहे की प्रतिपक्षाहून अधिक चांगल्या पद्धतीने त्या पक्षाचे मत पुर्वपक्षात मांडले जाते. उदा. रामाजुनाचार्य यांनी आपल्या 'श्री भाष्यात' शंकराचार्य यांच्या मताची सुंदर मांडणी केली आहे.
सध्या आपल्या देशात प्रतिपक्षाचे मत विकृत करून मग त्यावर टीका केली जाते. या पार्श्वभूमीवर आपली प्राचीन परंपरा किती उज्ज्वल होती हे लक्षात येते.

प्रमाण

यथार्थ (सत्य) ज्ञान होण्यास उपयुक्त अशा गोष्टीला प्राचीन भारतीय तत्वज्ञानात 'प्रमाण' म्हटले आहे. न्यायदर्शनाचा 'प्रमाण' हा प्रमुख विषय आहे. न्यायदर्शनाचा उद्गाता गौतम ऋषींनी चार प्रमाणे सांगितली आहेत.

  1. प्रत्यक्ष प्रमाण
  2. अनुमान प्रमाण
  3. उपमान प्रमाण
  4. शब्द प्रमाण
इंद्रियांशी प्रत्यक्ष संबंध आल्याने जे ज्ञान होते ते प्रत्यक्ष प्रमाण होय.
इंद्रियांना जाणवलेल्या लक्षणांवरून जे ज्ञान होते ते अनुमान प्रमाण होय.
इंद्रियांना जाणवलेल्या वस्तूवरून संबंधित तशाच गोष्टीचे ज्ञान होते ते उपमान प्रमाण होय. उदा. गायीवरून नीलगायीचे ज्ञान.
आप्त अथवा विश्वासपात्र व्यक्तीकडून/ ग्रंथातून जे ज्ञान होते त्याला शब्द प्रमाण म्हटले जाते.

काही दर्शने या चार प्रमाणाव्यतिरिक्त अन्य चार प्रमाणेही मानतात.
  1. ऐतिह्य, 
  2. अर्थापत्ति, 
  3. संभव, 
  4. अभाव 

जी गोष्ट केवळ परंपरेने मान्यता पावली आहे तिला ऐतिह्य प्रमाण म्हणतात.
जी गोष्ट पाहून अथवा ऐकून तिच्यात काही विरोधाभास जाणवल्याने तो विरोधाभास नष्ट करण्यासाठी जे ज्ञान होते ते 'अर्थापत्ति प्रमाण' होय. उदा. एखादा माणूस जादा आहे, परंतु तो दिवसा खात नसेल तर रात्री भरपूर खातो हे अर्थापत्ती प्रमाण होय.
एखाद्या वस्तूच्या आत दुसरी वस्तू असणारच हे संभाव प्रमाण आहे.
तर एखाद्या गोष्टीमुळे कोणत्या तरी गोष्टीचा अभाव काळात असेल तर ते अभाव प्रमाण आहे. उदा. उंदीर फिरत असतील तेथे मांजरे नाहीत हे अभाव प्रमाण आहे.



तीन प्रमुख प्रमाणांमध्ये 'प्रत्यक्ष प्रमाण' हे पहिले प्रमाण होय. 'प्रत्यक्ष' या शब्दाची फोड प्रती+अक्ष अशी करता येईल. प्रत्यक्ष म्हणजे जे डोळ्यासमोर घडले आहे ते किंवा जे डोळे अथवा पंचेंद्रियांना प्रतीत होते ते.
यात इंद्रियांचा पदार्थाशी प्रत्यक्ष संबंध असला पाहिजे. 'वस्तू जळत आहे' (डोळ्यांना दिसत आहे), 'मला त्याची धग जाणवते आहे' हे प्रत्यक्ष प्रमाण झाले. परंतु 'हा ग्रंथ प्राचीन आहे' हे प्रत्यक्ष प्रमाण नाही. कारण यात ज्ञान हे फक्त शब्दांद्वारे झाले आहे. पण तो ग्रंथ जुनाट दिसतो आहे, पाने जीर्ण-शीर्ण होऊन फाटली आहेत असे दिसत असेल तर ते प्रत्यक्ष प्रमाण होईल.

प्रत्यक्ष प्रमाण ६ प्रकारचे असते

  • चाक्षुष प्रत्यक्ष प्रमाण : एखादा पदार्थ डोळ्यासमोर आल्यावर होते ते. उदा. 'हे पुस्तक नवे आहे'.
  • श्रावण प्रत्यक्ष प्रमाण : ध्वनीच्या सहाय्याने होते ते. उदा. घंटेचा आवाज ऐकल्यावर कळते की 'घंटेचा आवाज आला'.
  • स्पर्श प्रत्यक्ष प्रमाण : स्पर्शाच्या सहाय्याने होते ते. उदा. बर्फ हातात घेतल्यावर ज्ञान होते की 'बर्फ थंड आहे'.
  • रसायन प्रत्यक्ष प्रमाण : जिव्हेच्या सहाय्याने होणारे ज्ञान. उदा: मीठ खाल्ल्यावर ज्ञान होते की 'मीठ खारट आहे'
  • घ्राणज प्रत्यक्ष प्रमाण : नाकाच्या सहाय्याने होणारे ज्ञान . उदा. फूल हुंगाल्यावर ज्ञान होते की 'हे फूल सुवासिक आहे'
  • मानस प्रत्यक्ष प्रमाण : उदा. सुख, दु:ख, दया इत्यादींचे अनुभव.

दर्शनशास्त्र : प्रस्तावना

दर्शनशास्त्र हे निसर्गनियमांचा अभ्यास करून परम सत्याचा शोध घेण्याचे शास्त्र आहे. अर्थातच दर्शनशास्त्र आपणास आलेल्या/येत असलेल्या अनुभवांचे एका विशिष्ट पद्धतीने विश्लेषण करणे आणि त्यातून काही निष्कर्षाप्रत येणे याची कला आहे. प्रत्येकाचे अनुभवाचे क्षेत्र वेगळे असते, तसेच या अनुभवांचे विश्लेषण करण्याच्या पद्धतीही भिन्न असू शकतात. अनुभवांचे विश्लेषण करताना काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात, विश्लेषणाचे काही नियम मान्य करूनच पुढे जावे लागते. या भिन्नतेमुळेच येथे अनेक दर्शनशास्त्रे विकसित झाली. ही दर्शशास्त्रे विकसित होताना अनेक ऋषींनी त्यात योगदान दिले. यामुळे त्यांचा विकास झाला आणि अनुभव/नियमांना स्पष्टता आली. हळूहळू काही दर्शनशास्त्रे परिपूर्ण होत गेली आणि प्रमुख दर्शनशास्त्रे म्हणून मान्यता पावली.
Image result for ऋषिमागील लेखात म्हटल्याप्रमाणे आठ दर्शने महत्वाची मानली जातात. सांख्य, वैशेषिक, न्याय, चार्वाक (लोकायत), पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, बौद्ध आणि जैन ही ती आठ दर्शने होत. आजचे भारतीय मानस सांख्य दर्शनावर (ज्यावर भगवतगीता आधारलेली आहे) पोसलेले आहे. याशिवाय आद्य शंकराचार्यांचे उत्तमीमांसा (वेदांत दर्शन) हे ही भारतीयांवर प्रभाव टाकते.
काहीजण लोकायतदर्शन हे महत्वाचे न मानता आठ दर्शनांत योगदर्शनाला स्थान देतात. पण दर्शनाच्या 'प्रमाण' वगैरे अंगांचा विकास योगात दिसत नाही. म्हणून बहुसंख्य अभ्यासक 'योग' हे स्वतंत्र दर्शन मानत नाहीत. योग हा 'सांख्यदर्शनातून' विकसित झाले आहे असे मानतात.
दर्शनशास्त्र आणि इंग्रजी Philosophy हे शब्द समानार्थी नाहीत. दर्शनशास्त्र हे मानवी चेतनेचा वेध घेते, चेतनेचा अभ्यास करते. Philosophy मध्ये याचा अंतर्भाव नाही. सर्व दर्शनांचे उद्दिष्ट मानवाच्या चेतनेचा वेध घेत मानवी जीवनातून दु:ख नष्ट करणे आहे. प्राचीन ऋषींना भौतिक संपत्तीतून सुख मिळतेच असे नाही याची जाणीव झाली. म्हणूनच मानवी चेतनेच्या डोहात खोलवर शिरून मानवी जीवनाच्या सुखाचा त्यांनी शोध घेतला. यातूनच दर्शनशास्त्राचा जन्म झाला.
दर्शनशास्त्रात 'प्रमाण' या गोष्टीला खूप महत्व आहे. एखादीगोष्ट योग्य आहे अथवा नाही हे प्रमाणावरून ठरविले जाते. दर्शनशास्त्रात अशी अनेक प्रमाणे आहेत. प्रत्येक दर्शनशास्त्र यातील कोणती प्रमाणे त्यांना मान्य आहेत हे सांगते.
'वेदांत सांगितले तेच खरे' असे 'शब्दप्रमाण' मानते. जर एखादी गोष्ट वेदात सांगितली असेल तर अन्य काही शहानिशा करण्याची गरज नाही असा त्याचा अर्थ आहे. 'शब्दप्रमाण' मानणाऱ्या दर्शनास भारतीय दर्शनशास्त्राप्रमाणे 'आस्तिक दर्शन' म्हणून संबोधले जाते. याचा देव आहे अथवा नाही असे मानण्याशी काहीही संबंध नाही. आठ प्रमुख दर्शनांपैकी केवळ उत्तरमीमांसा (वेदांत) हेच दर्शन या व्याख्येप्रमाणे आस्तिक दर्शन आहे.  बाकी सर्व दर्शने 'नास्तिक दर्शने' आहेत.

Tuesday, May 1, 2018

संयुक्त महाराष्ट्र चळवळ : आढावा

संयुक्त महाराष्ट्र चळवळ : आढावा - लेखक चिंतामणी कारखानीस.

१ मे हा दिवस आपण 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा करतो. हा दिवस सर्व जगभरात 'कामगार दिन' म्हणूनही साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे या दिवशी का केली गेली? त्यामागे काय भूमिका होती? 'संयुक्त महाराष्ट्र' म्हणजे काय? या चळवळीची गरज काय? भाषावार प्रांतरचना का व कशी? या सर्व मुद्द्यांचा विचार आपण या लेखातून करणार आहोत. विस्तारभयामुळे अनेक घटनांचा आढावा घेता आला नाही, पण सर्व ठळक घटनांचा धावता आढावा मात्र जरुर घेतला आहे.
६५ वर्षांपूर्वी 'मुंबई कुणाची?' हा वाद गाजला. त्यात १०६ लोक हुतात्मे झाले. आजही तोच वाद गाजत आहे, पण वेगळ्या कारणाने. या 65 वर्षांत मुंबईसाठी खरेच काही बदलले की नाही? हा प्रश्न आजही पडावा इतका तो प्रश्न चिघळत जात आहे. तूर्तास आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीकडे बघू.

पार्श्वभूमी :

लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करताना मुख्यतः 'सरकारचे त्या भागावर नियंत्रण व आखणी' हे कारण दिले असले, तरी भाषेवरून व धर्मांवरून (हिंदू-मुस्लिम) त्या भागात असंतोष निर्माण झाला होता. पूर्व व पश्चिम बंगाल यांची भाषा एकच होती. फक्त व्यवस्थापन हाच भाग गृहित धरला, तर त्याचवेळी बिहारदेखील बंगालपासून वेगळा करता आला असता व विदर्भ मध्यप्रदेशातून काढून तत्कालीन 'मुंबई प्रांता'मध्ये सामील करता आला असता. पण ब्रिटिश लोकांना वेगळेच राजकारण खेळायचे होते. बिहारी - बंगाली लोकांनी गप्प न बसता याविरुध्द आवाज उठवल्यामुळे १९११ साली परत एकदा बंगालचे एकत्रीकरण केले गेले. पण त्यात बिहार, ओरिसा व आसाम हे बंगाली न बोलणार्‍या लोकांचे एक वेगळे राज्य तयार केले गेले. अनवधानाने ही पुढे होणार्‍या भाषिक संघर्षांची एक पायरीच ठरली.
बिहारला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यामुळे १९१७ मध्ये ओरिसाच्या नेत्यांनी 'माँटेग्यू व चेम्सफर्ड' कमिशनपुढे स्वतंत्र ओरिसा राज्याची कल्पना मांडली. बिहारी व ओरिसाच्या नेत्यांपासून प्रेरणा घेऊन १९१७ च्या काँग्रेसच्या अधिवेशनातच डॉ. पट्टाभी सीतारामय्या यांनी तेलुगू भाषेवर आधारित आंध्रप्रदेश हे स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे असा ठराव मांडला. या ठरावात 'मद्रास' हे शहर 'महा-तेलुगू' राज्यात सामील केले जावे, असादेखील उपठराव मांडला गेला.
लोकमान्य टिळक वगळता बाकी सर्व पदाधिकार्‍यांनी (म. गांधी, अ‍ॅनी बेझंट, पं. मदनमोहन मालवीय) हा ठराव नाकारला. टिळकांनी मात्र त्याला सहमती देताना सांगितले, की सर्वसाधारण भारतीय माणूस त्याच्या मातृभाषेलाच हिंदी किंवा इंग्रजीपेक्षा मान देईल. अशिक्षित भारतीयांशी संवाद साधताना, त्याला स्वतंत्र भारताचे महत्त्व पटवून देताना, इंग्रजीमध्ये बडबड करून मनांशी जो संवाद साधला जाणार नाही, तो मातृभाषेतून सहजी साधला जाईल. यासाठी भाषेवर आधारित तेलुगू राज्य निर्माण झाले, तर ते चांगलेच होईल असे त्यांचे मत होते. म. गांधीनी याला आरंभी विरोध केला; पण १९२० मध्ये त्यांनाही हे पटले, की शिक्षण मातृभाषेतून दिले तर ते अधिक परिणामकारक ठरेल. त्यांनी सर्व राज्यांची निर्मिती भाषेवर आधारित व्हावी असा विचार मांडला.
'माँटेग्यू व चेम्सफर्ड कमिशन'ने असा एक अहवाल सादर केला, की ज्यात प्रामुख्याने भाषा व धर्मावर आधारित काही राज्ये निर्माण केली जावीत. पण त्या कमिशनमधे सामील असणार्‍या कर्टिस यांनी एक उपसूचना मांडली, की धर्माधिष्ठित राज्यनिर्मिती न करता ती केवळ भाषेच्या आधारावर करावी. ही सूचना माँटेग्यू व चेम्सफर्ड यांनी फेटाळली. १९२७ मध्ये आलेल्या 'सायमन कमिशन'नेसुद्धा ( 'सायमन गो बॅक' अशी प्रसिद्धी मिळालेले) फक्त भाषा विचारात न घेता, धर्म, जात, भाषा, आर्थिक व भौगोलिक परिस्थिती या सर्वांचा विचार करून राज्यनिर्मिती व्हावी असे सुचवले.
'सिंध प्रांत' हा तत्कालीन 'मुंबई इलाख्या'ला जोडलेला होता. त्यांनीदेखील स्वतंत्र 'सिंध'ची मागणी केली. ती १९३१ मध्ये ओडोनिल यांनी फेटाळून लावली. पण मुस्लिम नेत्यांनी काँग्रेसी लोकांना हाताशी धरले. मुस्लिम नेत्यांच्या प्रभावामुळे सिंध प्रांत मुंबईपासून तोडला जाईल असे घोषित झाले. त्यामुळे १९३५ मध्ये 'सिंध', 'ओरिसा' आणि 'वायव्य सरहद्द' असे तीन नवीन प्रांत निर्माण केले गेले.

संयुक्त महाराष्ट्राची संकल्पना

लोकमान्य टिळक हे भाषेवर आधारित राज्यनिर्मितीच्या बाजूने होते हे वर आलेच आहे. त्यांनी त्यांची ही भूमिका १७ नोव्हेंबर १८९१ च्या अग्रलेखात मांडली होती. अर्थात त्यात 'महाराष्ट्र' कसा असावा हे न मांडता, त्यांनी एकूणच पुढील 'स्वतंत्र भारत' कसा असावा हे मांडले होते. पुढे टिळक तुरुंगात गेल्यावर त्यांची ही बाजू 'केसरी'चे तत्कालीन संपादक न. चिं. केळकरांनी वेळोवेळी मांडली. सरकारचे अभिनंदन करतानाच केसरीने मराठीचा प्रश्न बंगालीच्या प्रश्नापेक्षा जुना आहे याची आठवण करून दिली.
मात्र संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पाहण्याचे श्रेय जाते ते श्री. विठ्ठल वामन ताम्हणकरांना. त्यांनी त्यांच्या १९१७ मधील 'थ्री डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र' या लेखात मराठी लोक हे मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ, हैदराबाद व गोवा येथे पसरले आहेत, त्या सर्वांचा मिळून महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे असे प्रतिपादन केले. श्री. जनार्दन विनायक ओक यांना या लेखाचे महत्त्व खूप पटले व त्यांनी त्यांच्या 'लोकशिक्षण'मधून याचा वेळोवेळी पाठपुरावा करावयास सुरुवात केली.
साधारण १९२७-२८ मध्ये भाषेवर आधारित महाराष्ट्र कसा असावा यावर परत विचार केला गेला. शेतकरी - कामगार पक्षाने पं. मोतीलाल नेहरूंसमोर मराठी महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश यांमधील मराठी जिल्हे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, खानदेश इत्यादी भाग असावा असे मांडले व नेहरूंनी त्याला मान्यता दिली. त्या समितीने जाणता-अजाणता आजचा महाराष्ट्रच मांडला होता. पण इतर राज्यातील नेत्यांसारखे राज्यनिर्मितीला प्राधान्य न देता, महाराष्ट्रीय नेत्यांनी त्या काळी देश स्वतंत्र व्हावा यावर जास्त भर दिला. मधल्या काळात मात्र विदर्भाबद्दल परत एकदा वाद चालू झाला. विदर्भ हा जरी मराठी असला, तरी तो मध्यप्रदेशाला जोडून आहे. मध्यप्रदेशातील अर्थकारणाचा एक महत्त्वाचा भाग विदर्भ होता. त्याचे काय झाले, हे आपण पुढे पाहू; पण तूर्तास आपण कालानुक्रमे इतर घडामोडी पाहू या.
१९३८च्या मराठी साहित्य संमेलनात वीर सावरकरांनी मराठी मुद्दा मांडून 'वर्‍हाड' हा मराठी भाग महाराष्ट्रातच सामील होईल, विदर्भाशिवाय महाराष्ट्र होणार नाही अशी घोषणा दिली. त्याला सर्व मराठी साहित्यिकांनी उचलून धरले. १९३९च्या नगर अधिवेशनात रामराव देशमुखांनी सर्वांत प्रथम 'संयुक्त महाराष्ट्रा'चा उच्चार केला व 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापण्यात आली.
साधारणपणे पाहिले तर असे दिसते, की राजकारणी लोक अशी क्रांती घडवून आणतात. पण महाराष्ट्रात चित्र वेगळे दिसू लागले. पुढे होणार्‍या सर्व साहित्य संमेलनांत 'संयुक्त महाराष्ट्र' हा घोषमंत्र गायला जाऊ लागला. एका अधिवेशनात, 'महाराष्ट्र हा मुंबई, वर्‍हाड, गोमंतक इत्यादींसह झालाच पाहिजे' असे ठरविले गेले. काँग्रेसमध्ये असणारे राजकारणी मात्र या विषयावर एक नव्हते. साहित्यिक विरुद्ध राजकारणी असे फड रंगायला सुरुवात झाली. १९४६च्या सुमारास शंकरराव देवांनी 'संयुक्त महाराष्ट्र परिषदे'मध्ये सर्वपक्षीय सहभाग असावा हे धोरण स्वीकारले. 'काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टी'चे ना. ग. गोरे, 'कम्युनिस्ट पार्टी'चे कॉम्रेड अण्णा डांगे, डॉ. आंबेडकर असे सर्व पक्षांतील लोक संयुक्त महाराष्ट्र परिषदेत सहभागी झाले. शंकरराव देव परिषदेचे अध्यक्ष होते. डांग्यांना व आंबेडकरांना देवांच्या नेतृत्वाबद्दल शंका होती, कारण देव काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरदेखील काम करत. तिथे त्यांनी भाषेवर आधारित राज्यनिर्मितीला पट्टाभी सीतारामय्यांसारखा उघड पाठिंबा दर्शविला नव्हता. देव हे गांधीभक्त होते. गांधींनी मुंबई महाराष्ट्रात सामील करायला नकार दिला होता. पटेल आणि नेहरूदेखील मुंबई महाराष्ट्रात सामील करण्याच्या विरोधात होते.
अशातच १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला.

महाविदर्भ मागणी व अकोला करार.

विदर्भाचे काही जिल्हे, मध्य प्रदेशातील मराठी भाग असा मिळून एक महाविदर्भ करण्यात यावा, अशी मागणी स्वातंत्र्यपूर्व काळात जोर धरू लागली होती. विदर्भ काँग्रेसचे अध्यक्ष बृजलाल बियाणी व पंजाबराव देशमुख हे उघड उघड संयुक्त महाराष्ट्र न करता, 'विदर्भ' व 'उर्वरित महाराष्ट्र' अशी दोन मराठी राज्ये निर्माण केली जावीत अशा मताचे होते. बियाणी यांची महाविदर्भाची मागणी अल्पावधीत लोकप्रिय झाली व मराठी नेत्यांत विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र असा कलह निर्माण झाला. विदर्भातील काही भाग निजामाच्या अख्यत्यारीत होता. निजामाच्या पंतप्रधानाने गरज पडली, तर विदर्भावर आक्रमण करू अशी धमकी दिली. शंकरराव देवांनी रामराव देशमुख, धर्माधिकारी, गोपाळराव काळे इत्यादी वैदर्भीय नेत्यांशी चर्चा केली व तसे काही घडणार नाही असे सांगितले. या चर्चेत बहुतांश वैदर्भीय नेते 'संयुक्त महाराष्ट्रा'ला पाठिंबा देण्यास राजी झाले. पुढे अकोल्यात ७ व ८ ऑगस्ट १९४७ रोजी चर्चा होऊन असे ठरले, की "मराठी लोकांचे एकच राज्य असावे, पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भाला एक उपविभाग म्हणून मान्यता द्यावी." ही चर्चा 'अकोला करार' म्हणून ओळखली जाते.
बियाणी लोकप्रिय असेपर्यंत अकोला करार झाला, तरीही स्वतंत्र विदर्भाची मागणी जोरात होती. ह्याला कलाटणी मिळाली 'नागपूर करारा'नंतर. २३ ऑक्टोबर १९४८ रोजी नागपूर येथे चर्चा सुरू झाली. बियाणी यांनी अकोला करार धुडकावून देत, संयुक्त महाराष्ट्राच्या कुठल्याही चर्चेला उपस्थित राहायचे नाही असे ठरवल्यामुळे नागपूर येथे परत विदर्भ काँग्रेसने बैठक भरवली. पंजाबराव देशमुखांनी तर बृजलाल बियाण्यांवर टीका करताना असेही मत मांडले, की "बियाणी यांना ना संयुक्त महाराष्ट्रात रस आहे, ना स्वतंत्र विदर्भात. ते फक्त स्वतःचे हित पाहत आहेत." या बैठकीमध्ये परत एकदा ठराव मांडण्यात आला व तो २८ विरुद्ध १३ मतांनी मंजूर करण्यात आला. बृजलाल बियाण्यांच्या कारकिर्दीची घसरण येथूनच सुरू झाल्याचे मानले जाते. यानंतरच्या काळातही विदर्भाची मागणी होती; पण बहुतांश नेते संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा देणारे होते, त्यामुळे हा जोर कमी झाला.
मराठवाड्यात स्वामी रामांनदतीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, देवीसिंग चव्हाण इत्यादी नेते आधीपासूनच संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने होते. पण येथील नेत्यांना मराठवाडा हा पश्चिम महाराष्ट्रीय नेत्यांकडून दुर्लक्षिला जाईल, मराठवाड्याचा विकास होणार नाही, असे वाटत होते. पुढे SRC च्या अहवालानंतर (१९५५) स्वामी रामानंदतीर्थांनी हैदराबाद राज्यात 'मुंबई महाराष्ट्रास जोडली जावी' असा ठरावही मांडला. त्यावर ८ दिवस चर्चा होऊन १४७ पैकी ११८ जणांनी मुंबई महाराष्ट्राला जोडली जावी या बाजूने मतदान केल्यावर हैदराबाद विधानसभेत तो ठराव मंजूर झाला.

दार व जेव्हीपी समित्या :

राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांनी भाषावार प्रांतरचनेसाठी दार कमिटी स्थापन केली.
'मुंबई कुणाची?'
हा प्रश्न आजही आपल्याला पडला आहे, पण सर्वप्रथम ही घोषणा दिली अण्णाभाऊ साठ्यांनी. "मुंबई महाराष्ट्राची" हे उत्तर दिले जनतेने. 'दार कमिटी'ने तत्कालीन काँग्रेस पुढार्‍यांचे मत एका पत्रिकेद्वारे विचारले. गुप्त मतदानाचीही सोय होती. डॉ. आंबेडकरांनीसुद्धा दार कमिटीला 'मुंबईत मराठी बोलली जाते, तर मुंबई महाराष्ट्रातच जावी' असे मत दिले. पण दार कमिटीने 'मुंबई महाराष्ट्रात नसावी' असे भाष्य केले.
दार कमिटीचे सदस्य असलेले श्री. के. एम. मुन्शी यांनी एक पुस्तिका प्रसिद्ध केली. तिचे नाव होते, 'Linguistic Provinces and The Future of Bombay'. या पुस्तिकेची मते व दार कमिटीचा अहवाल यांत इतके साम्य होते, की इतर सदस्यांनी काही काम केले की नाही अशी शंका यावी. कमिटीने एक मुद्दा असाही मांडला की, संयुक्त महाराष्ट्र समितीची मते म्हणजे 'पूना स्कूल ऑफ थॉट'वाल्या मंडळींची मते आहेत. याशिवाय ब्राह्मण जातीवर ते विनाकारण घसरले. भाषावार राज्यनिर्मिती करताना 'पूना स्कूल ऑफ थॉट' आणि ब्राह्मण जातीला मध्ये आणण्याची गरज नव्हती. शिवाय ह्या समितीचे ते कामही नव्हते. भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत 'पूना स्कूल ऑफ थॉट'चे योगदान लक्षात घेता, विनाकारण एखाद्या जातीला बदनाम करण्याचे कार्य जणू मुद्दाम केले गेले असे लोकांना वाटले.
दार कमिटीचा गोंधळ लक्षात घेता, जवारहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या हे एकत्र आले व त्यांनी 'जेव्हीपी समिती' स्थापन केली. समितीने असा निष्कर्ष काढला, की मुंबई हे बहुभाषी शहर असून येथील पूर्ण विकास हा गुजराती लोकांच्या भांडवलामुळे व कारखानदारीमुळे झाला आहे; तस्मात् गुजराती लोकांचा मुंबईवर प्रथम हक्क आहे व तो अबाधित ठेवण्यासाठी मुंबई ही महाराष्ट्रात सामील होता कामा नये. मुंबईमध्ये तेव्हा मराठी बोलणारे लोक ४३ टक्के होते. सर्व गिरण्यांमधून व कारखान्यांमधून मराठी मजूर मोठ्या संख्येने होते. सर्व कामगार मराठी, पण कारखानदार गुजराती अशी गत. या जेव्हीपी समितीच्या निर्णयामुळे सगळेच चिडले. निदर्शने, सभा यांना प्रारंभ झाला.
आचार्य शंकरराव देव हे तेव्हा राष्ट्रीय पातळीवरचे काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते, तसेच ते तेव्हा अस्तित्वात असलेल्या 'संयुक्त महाराष्ट्र परिषदे'चे अध्यक्षही होते. त्या परिषदेचा समितीमध्ये बदल १९५६ साली झाला. साहित्यिक लोक जेव्हा उघड उघड 'मुंबईसह महाराष्ट्र' म्हणू लागले, तेव्हा राजकारणी लोकांना मात्र त्यांची भूमिका काय असावी याचा निर्णय घेता येत नव्हता. खाजगीत ते मुंबईसह महाराष्ट्र म्हणायचे, तर राष्ट्रीय पातळीवर मात्र त्यांना मुंबईविना महाराष्ट्र अशी भूमिका घ्यावी लागे. देवांनी या सर्व प्रकाराला वैतागून राष्ट्रपती राजेद्रबाबूंना एक पत्र पाठवले, ते पत्र मी इथे देतो. त्यावरून राजकारण्यांची भूमिका लक्षात यावी. मूळ पत्र इंग्रजीत आहे. माझ्या भाषांतराने अर्थ बदलण्याचा धोका संभवतो, त्यामुळे मी ते इंग्रजीतच देत आहे.
त्या पत्रातील काही भाग :

रेफ. G-2/४६६९
Dear Rajendra Babu,
I am writting this letter to you specially because I would like to know what are your personal views regarding the attitude Congress Commitees and Congressmen should take on the question of formation of linguistic Provinces. You know that since more then one year I have been closely associating myself with the movement of the formation of Samyukta Maharashtra. I may tell you that if I had not taken up this problem in my hand the movement of Samyukta Maharashtra would not have reached that development which it has reached today. We congressmen of Maharashtra kept aloof from the movement of Samyukta Maharashtra so long because we felt that the time for taking up this question will come only after India becomes free. So I entered into this movement only in 1946-47 when I thought that the question of framing the Constitution of India was an immediate task before the country and the Congress. The Congress has accepted the principle of linguistic Provinces since 1920, if not earlier.
I knew there was possibility of myself unconsciously making use of my position in Congress to help this other work or the general public might misunderstood it. So I always was very careful when once I was asked the direct question whether, when I said that Bombay should be included in Maharashtra, it was in the capacity of General Secretary of the Congress, I said NO.
The most critical position would be Bombay. You know the demand of Samyukta Maharashtra Parishad is to include Bombay in Maharashtra, as it naturally belongs to that province. I think the overwhelming majority of Maharashtra, either in Bombay or outside will be in favour of this proposal.

वरील पत्रावरून हे सिद्ध होते, की तत्कालीन मराठी काँग्रेस पुढार्‍यांना कात्रीत पकडल्यासारखे झाले होते. काही जण मनातून मुंबई महाराष्ट्राला मिळावी या मताचे होते, पण त्यांना ते उघड उघड बोलून दाखवता येत नव्हते. १९२०च्या आधी काँग्रेसमध्ये मराठी पुढारी भरले होते (लोकमान्य टिळक वगैरे). पण नंतरचे पुढारी आपला प्रभाव अमराठी पुढार्‍यांवर टाकू शकले नाहीत. त्यामुळे एक पोकळी निर्माण झाली होती, त्याचाही फटका या मुंबई प्रकरणामध्ये मराठी लोकांना बसत होता.
सन १९५२च्या सुमारास संयुक्त आंध्र प्रदेशाची मागणी जोर धरू लागली. पोट्टी श्रीरामुलू या गांधीभक्ताने संयुक्त आंध्र प्रदेशासाठी आमरण उपोषण सुरू केले. त्यातच ते हुतात्मा झाले. आंध्र प्रदेश व तेलुगूभाषिक पेटले. लगेच दोन दिवसांत जवाहरलाल नेहरूंना आपले म्हणणे मागे घेऊन आंध्र प्रदेशाची निर्मिती करावी लागली.

१९५०-५५च्या आसपासची महाराष्ट्र, गुजरात, विदर्भाची आर्थिक स्थिती

ब्रिटिशकाळात महाराष्ट्रात मुंबई व पुणे विभागांत पडीक जमिनी पाण्याखाली आणल्या गेल्या. पण गुजरातमध्ये तसे घडले नाही. पूर्वीच्या राजे-रजवाड्यांनी ज्या काही सोयी केल्या होत्या, त्यावरच गुजराती माणूस जगत होता. पुण्या-मुंबईत शेतीबरोबरच कारखानदारीदेखील अस्तित्वात होती. मुख्य भांडवलदार हे गुजराती, तर कामगार मराठी अशी विभागणी. गुजरातच्या वाढीसाठी सन १९४८नंतर प्रयत्न सुरू झाले. मागासलेल्या भागांत वर्गीकरण झाल्यामुळे अनेक धरण प्रकल्प व इतर सिंचनप्रकल्प गुजरातला मिळाले. महाराष्ट्राला कोयना प्रकल्प मिळाला, पण तो सुरू होण्यास अक्षम्य उशीर झाला. महाराष्ट्रीय जनतेला हा त्यांच्यावर अन्याय वाटला. उत्पादन करणार मुंबई, पण त्याचा फायदा गुजराती जनतेला होत आहे अशी भावना निर्माण झाली व त्यातच कोयनेचे प्रकरण उद्भवले. त्यामुळे सामान्य लोक चिडले. विदर्भात ज्वारी, तेल व गहू ही उत्पादने होत होती. तुलनेने मध्य प्रदेशात काही कारखानदारी नव्हती. तत्कालीन मध्य प्रदेशात विदर्भ येत असल्यामुळे, मराठी पैसा हिंदीभाषिकांसाठी खर्च होत आहे असे वैदर्भीय जनतेला वाटत होते. मराठवाड्याचे उत्पादनदेखील ज्वारी, तेल व गहू हेच होते. त्यामुळे महाविदर्भाच्या वेळेस मराठवाडा हा वर्‍हाडाला जोडून व मध्य प्रदेशातील मराठी भाग घेऊन त्यांचा महाविदर्भ तयार करण्यात यावा असे 'फाजल अली आयोगा'ला वाटले.

फाजल अली आयोग

आंध्र प्रदेशाची निर्मिती झाल्यामुळे मुंबईचा प्रश्न परत ऐरणीवर आला. एकदाचा सोक्षमोक्ष लागावा म्हणून नेहरू सरकारने 'फाजल अली आयोग' स्थापन केला. राज्य पुनर्रचना समितीने (States Reorganisation Committee (SRC) ) आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू अशी राज्ये स्थापन करण्याची शिफारस केंद्राला केली. संयुक्‍त महाराष्ट्र परिषदेसारख्या संयुक्त कर्नाटक, हरियाणा-पंजाब अशाही काही परिषदा तेव्हा आपापल्या भाषांसाठी लढा देत होत्या. मुंबईबद्दल समितीचा निर्णय होत नव्हता. 'बाँबे सिटिझन कमिटी' नावाची एक कमिटी मुंबईत असलेल्या कारखानदारांनी स्थापली होती. त्याचे अध्यक्ष सर पुरुषोत्तमदास ठाकुरदास हे प्रसिद्ध गृहस्थ होते. त्या कमिटीत जे. आर. डी. टाटांसारखे व्यक्तिमत्त्वही होते. या कमिटीचे एकच उद्दिष्ट होते, ते म्हणजे काहीही करून मुंबईला महाराष्ट्रात सामील होऊ न देणे. त्यांनी एक दोनशे पानी अहवाल तयार करून, मुंबई ही महाराष्ट्रापासून कशी वेगळी आहे, भांडवलदारांनी व परप्रांतीयांनी कसे मुंबईला वाढवले आहे वगैरे मुद्दे मांडले. शिवाय मुंबई ही भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रात सामील होण्यासारखी नाही असाही दावा केला. मुंबईच्या एकूण लोकसंख्येत फक्त ४३ टक्के मराठी होते, तर उरलेले गुजराती, ख्रिश्चन (पूर्वाश्रमीचे मराठी हिंदू) व उत्तर भारतीय. या कमिटीच्या मते उरलेले ५७ टक्के महत्वाचे, तर मराठी बोलणारे ४३ टक्के हे अल्पसंख्याक ठरले. भांडवलदार पारशी व गुजराती असल्यामुळे त्यांना एक भीती होती, की एकदा का मुंबई महाराष्ट्रात सामील झाली की तिच्यावर राज्य करणारे मराठीभाषिक असतील आणि त्यांच्या हाती वित्तीय नाड्या गेल्या, तर मुंबईमधून गुजरात्यांचे उच्चाटन होईल. अशाच विचाराचे मोरारजी देसाईदेखील होते.
यावर उत्तर म्हणून 'परिषदे'ने तसाच २०० पानी अहवाल सादर केला. मुख्यत्वे भाषा, वेषभूषा व राहणीमान, एकाच पद्धतीचे देव, संत आणि महात्मे यांवर विचार करण्यात आला. विद्यमान स्थितीत हैदराबाद, मुंबई, कोकण, विदर्भ, मध्य प्रदेशातील काही जिल्हे व उर्वरित महाराष्ट्र येथे असे लोक राहतात. या सर्वांचे एक राज्य निर्माण करून त्याची राजधानी मुंबई असावी, असे मत परिषदेने नोंदवले. मुंबईत शाळा, वृत्तपत्र, वादविवाद, चर्चा, नाटके व इतर कला या सर्व मराठी भाषेतून होतात. मराठी साहित्यिक मंडळी मुंबईत जास्त संख्येने राहतात, तेव्हा 'मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे' असे निवेदन या फाजल अली कमिटीला परिषदेने सादर केले.
दोन्ही बाजूंनी एकदा भेटायचे ठरले व तशी एकत्र चर्चा १९५४च्या जून महिन्यात मुंबईत झाली. चर्चा होऊन काहीही तोडगा निघाला नाही. मराठी लोकांनी मुंबई सोडून जनहित व देशहित साधावे, अशी बाँबे सिटिझन्स कमिटीने मागणी केली. काकासाहेब गाडगीळ या मागणीने भडकले.
आता जो काही उपाय काढेल, तो राज्य पुनर्रचना आयोगच असे दिसू लागले.
अनेक दिवस मुंबईचे एक 'सब-फेडरेशन' निर्माण करावे व मुंबई स्वतंत्र ठेवावी (Bombay Citizens' Committee Files 1954) या कल्पनेला अलीसाहेब धरून बसले. या 'ग्रेटर बाँबे सब-फेडरेशन' मध्ये डहाणू, पालघर आणि बोरीवली हे भागही एकत्र करावेत अशी योजना होती. पण कारखानदारांनी ती कल्पना मोडीत काढली. नंतर 'मुंबई स्वायत्त असावी व महानगरपालिकेला काही उच्चाधिकार द्यावेत ' अशी कल्पना मांडली गेली; पण ती कल्पनाही लगेच बारगळली. फाजल अली हे मुंबईहून पुण्याला रवाना झाले. तिथ भाऊसाहेब हिरे, काकासाहेब गाडगीळ आणि शंकरराव देव यांची अनौपचारिक भेट घेऊन त्यांनी एक कच्चा मसुदा मांडला. त्यानुसार मुंबई महाराष्ट्रात सामील होणार होती. अलींचे हे वैयक्तिक मत होते व इतर सभासदांपुढे ते मांडणार होते. मुंबई महाराष्ट्रात सामील होणार अशी अंधुकशी आशा दिसू लागली.
१९५५मध्ये या समितीने आपला अहवाल सादर केला. त्यातील काही मुद्दे :

  1. मुंबई महाराष्ट्राला जोडण्यात येऊ नये.
  2. मुंबईत एक भाषा नाही, तर मुंबई ही द्वैभाषिक असावी.
  3. मुंबई प्रांतात कच्छ व सौराष्ट्र सामील करुन घ्यावा.
  4. मराठी विदर्भ, मध्य प्रदेशातील काही मराठी जिल्हे, मराठवाडा यांचा 'महाविदर्भ' तयार करण्यात यावा.
  5. बेळगाव-कारवार कर्नाटकास जोडावेत.

अहवाल सादर झाल्यावर भाऊसाहेब हिरे, काकासाहेब गाडगीळ, शंकरराव देव भडकले. कच्च्या मसुद्यात जे दाखवले, ते अहवालात नव्हते. ऐनवेळी काही गडबड होऊन मुंबई ही द्वैभाषिक ठेवण्यात आली. राजकारण्यांमध्ये फूट पडली. काही राजकारणी सरळ सरळ 'नेहरू, नेहरू' करू लागले, तर काही जण 'मुंबईसहित महाराष्ट्र, नाहीतर जनआंदोलन' या मुद्द्यावर कायम राहिले. 'महाराष्ट्र की नेहरू' यावर यशवंतराव चव्हाणांनी 'नेहरू' असे उत्तर देऊन सामान्य कार्यकर्ते व सामान्य माणसाची निराशा केली. गाडगीळ, हिरे प्रभृती लोकांनी अलींसोबत पत्रव्यवहार करून नेहरूंकडे तक्रार नोंदवली. पण तिचे पुढे काही झाले नाही.
मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीने अहवाल प्रसिद्ध होताच लगबगीने (१२ ऑक्टोबर १९५५) हा अहवाल 'पास' करून घेतला. अहवालात बदल करावा व संयुक्त महाराष्ट्रात मुंबई असावी असे त्र्यंबक रामचंद्र नरवणे यांनी सुचवले व तसा ठराव मांडला. पण प्रदेश काँग्रेसने ३५ विरुद्ध ५ मतांनी नाकारला. प्रदेश काँग्रेसचे ३० सदस्य मुंबई महाराष्ट्रात सामील करण्यास राजी नव्हते. ७ नोव्हेंबर १९५५च्या काँग्रेस कार्यकारिणीच्या (Congress Working Committee - CWC) बैठकीमध्ये हा मुद्दा परत एकदा निघाला. त्रिंबक रघुनाथ देवगिरीकरांनी पुन्हा 'मुंबई महाराष्ट्रात सामील व्हावी' असा बदल करायला सुचवले. एक विरुद्ध बाकी सर्व असा प्रस्ताव होता. नेहरूंनी तो नाकारला. इतकेच नव्हे, तर काँग्रेस कार्यकारिणीच्या नोंदणी पुस्तकातून या ठरावाची नोंदही काढून टाकली गेली.
१६ नोव्हेंबर १९५५ रोजी संसदेत या अहवालावर चर्चा सुरू झाली.
स.का. पाटलांनी 'मुंबई स्वतंत्र राहिली पाहिजे' या विषयावर भाषण दिले, त्यांचा मते, "Mumbai will be a miniature India run on international standards, melting pot which will evolve a glorious new civilisation". "देशाच्या विकासासाठी मराठी लोकांनी मुंबईचा त्याग करावा" असे त्यांचे मत होते.
धनंजय गाडगिळांनी त्यांना तिथेच विरोध दर्शवला. गाडगीळ उत्तरले, "There is a limit. That limit is, nobody can compromise one's self-respect, no woman can compromise her chastity and no country its freedom. That anything short of Samyukta Maharashtra with the city of Bombay as capital will not be acceptable. The future of Bombay would be decided on the streets of Bombay. To ask us to serve the nation is to ask chandan to be fragrant."
नोव्हेंबर १९५५पासून संयुक्त महाराष्ट्राच्या एका वादळी पर्वाचा आरंभ झाला. सेनापती बापटांनी एक मोर्चा या संदर्भात नेला. मोर्चात कसल्याही प्रकारचा दंगा झाला नाही. लोकांनी अगदी शांततापूर्वक 'मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे' अशा घोषणा दिल्या. सेनापती बापट, आचार्य अत्रे इत्यादी नेत्यांना अटक झाली. एस. एम. जोशी, भाई वैद्य, पाटकर इत्यादी नेत्यांनी याला विरोध करण्याकरता २१ नोव्हेंबर रोजी 'मुंबई बंद'ची घोषणा दिली. मोरारजी देसायांनी या काळात एक प्रतोद (व्हिप) जारी केला - 'ज्या कोणाला या तीन राज्यांविषयी बोलायचे आहे, त्यांनी केवळ आणि केवळ सरकारच्या बाजूनेच बोलले पाहिजे, अन्यथा नाही.' जणू हुकूमशाहीच! काँग्रेसमध्ये असणार्‍या मराठी नेत्यांनाही हा प्रतोद आवडला नाही, हे सांगणे न लगे.
२० नोव्हेंबरला मोरारजींनी चिडून एक सभा घेतली. स. का. पाटलांनी 'येत्या ५००० वर्षांत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. निदान काँग्रेस सरकारात तर नाहीच नाही.' अशी घोषणा केली. त्यामुळे मोरारजी देसाई व इतर नेत्यांवर लोकांनी दगडफेक करायला सुरुवात केली.
गाडगिळांचे संसदेतील भाषण, पाटलांची मुलाखत व मोरारजींचे तेल यांचा एकत्र भडका २१ नोव्हेंबर रोजीच्या संपाच्या दिवशी उडाला. लोकांनी उत्स्फूर्तपणे संयुक्त महाराष्ट्र परिषदेची एक सभा भरवली. फ्लोरा फांउटन परिसराला जणू युद्धभूमीचे स्वरूप आले होते. मोरारजींनी चिडून सभेवर आधी लाठीमार व नंतर लगेच गोळीबार करवला. या गोळीबारात पंधरा लोक मृत्युमुखी पडले. २२ नोव्हेंबरला ११६ मराठी आमदारांनी हिर्‍यांकडे आपले राजीनामे पाठवले. २९ नोव्हेंबरला शंकरराव देव व भाऊसाहेब हिरे नेहरूंची भेट घ्यायला गेले. पण तिथे वेगळेच राजकारण शिजत होते. यशवंतराव चव्हाण, नाईक-निंबाळकर आणि तापसे या नेत्यांनी राजीनामे दिले नव्हते. राजीनामा देऊन काहीही साध्य होणार नाही, असे त्यांचे मत होते. त्या तिघांनी शंकरराव देव, हिरे वगैरे संयुक्त महाराष्ट्रवादी नेत्यांना उघडे पाडण्याच्या प्रयत्न केला. देवांनी काँग्रेस सोडली. "संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही मला नेहरूंपेक्षा जवळ आहे, मुंबई नसलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मला दिले, तरी ते मी स्वीकारणार नाही." अशी भूमिका त्यांनी घेतली. १२ जानेवारी १९५६च्या शांततापूर्ण सभेनंतर मोरारजी देसायांनी १२ नेते व इतर ४३५ लोकांना अटक केली.
१६ जानेवारीला जवाहरलाल नेहरूंनी वेगळाच पवित्रा घेतला व मुंबई आता केंद्रशासित प्रदेश राहील अशी घोषणा केली. तीन राज्यांऐवजी दोन राज्ये घोषित केली गेली. महाराष्ट्रात विदर्भाचा समावेश करण्यात आला, तर गुजरातमध्ये सौराष्ट्र व कच्छ यांचा. मुंबई ही केंद्राच्या अखत्यारीत गेली. हा नवीन महाराष्ट्र द्वैभाषिक राहील असेही सांगण्यात आले. बेळगाव-निपाणीला कर्नाटकात विलीन करून टाकले गेले.

"लाठी गोली खायेंगे, फिरभी बम्बई लेयेंगे"

१६ जानेवारी रोजी कसलाही बंद पुकारण्यात आला नव्हता. नेहरूंच्या रेडिओवरील घोषणेमुळे लोक रस्त्यांवर उतरले. मोरारजींनी सरकारी अहवालात नमूद केल्याप्रमाणे, "लोक रात्री १०.३० वाजता घरांबाहेर पडले व त्यांनी जाळपोळ करायला सुरुवात केली. त्यामुळे परत गोळीबार करावा लागला." सरकारने किती गाड्या जाळपोळीत नष्ट झाल्या हे अजूनही गुलदस्त्यातच ठेवले आहे, कारण हा अहवाल खरा नसावा असे बर्‍याच इतिहासकारांचे म्हणणे आहे. लोकांनी आंदोलन सुरू केले. गोळीबारानंतर "लाठी गोली खायेंगे, फिरभी बम्बई लेयेंगे" ही घोषणा प्रत्येक मराठी माणसाच्या तोंडात होती. १६ ते २२ जानेवारी दरम्यान आणखी ६७ लोक या गोळीबारात हुतात्मे झाले. गाडगिळांनी म्हटल्याप्रमाणे लोक रस्त्यांवर उतरले, एकत्र झाले, हुतात्मे झाले, पण मुंबई सोडली नाही. एकूण १०६ जण या चळवळीत हुतात्मे झाले.
संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या राजकारणाचा घोळ चालूच राहिला. इतर पक्षीय लोकांना शंकरराव देवांवर विश्वास नव्हता, तर मध्येच देवांनी, संयुक्त महाराष्ट्र होईपर्यंत आमरण उपोषण करणार, अशी घोषणा केली. पण नंतर तो विचार त्यांनी सोडला. आचार्य जावडेकरांनी देवांना, विनोबा भावे व दादा धर्माधिकार्‍यांनी दिलेला सल्ला मानायला सांगितले. त्या दोघांनी देवांना 'नेतृत्व सोडून देऊन सर्व पक्षांना या लढ्यात सामील करा' असे सांगितले. २३ ऑक्टोबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्र परिषद बरखास्त झाली.

संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापना

६ फेब्रुवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. परिषदेचे विलीनीकरण या समितीत झाले. त्या समितीचे अध्यक्ष केशवराव जेधे होते, तर आचार्य अत्रे, सेनापती बापट, कॉम्रेड डांगे, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे इत्यादी लोक समितीत होते. शाहीर अमर शेखांनी तर गावोगावी पोवाडे गाऊन जनजागरण चालवले.
१९५७ला समितीने निवडणूक लढवली. अत्र्यांचा 'झालाच पाहिजे' हा अग्रलेख विशेष गाजला. यशवंतराव चव्हाणदेखील ही निवडणूक फक्त १७०० मतांनी जिंकले. आपल्या द्वैभाषिक राज्याच्या भूमिकेमुळे लोकांनी आपल्याला निवडून दिले, असे त्यांना वाटत होते. पण एकूण ही निवडणूक म्हणजे काँग्रेस नेतृत्वाला एक प्रकारचा धक्काच होता. कारण समितीच्या १०१ जागा निवडून आल्या. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे समितीचे लोक निवडून आले. १९५८मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही समितीचेच लोक निवडून आले. या सर्वांचा परिणाम म्हणून नेहरूंना परत एकदा मुंबईच्या मुद्द्याबद्दल काहीतरी केले पाहिजे असे वाटू लागले. त्यांनी मुंबई प्रदेश काँग्रेससोबत परत बैठका घ्यायला सुरुवात केली. नेहरूंनी स्वतःच यावर तोडगा काढला होता. त्यांना मुंबई व उर्वरित महाराष्ट्रातील मराठी नेत्यांचे सहकार्य नंतरही हवेच होते. चव्हाण, नाईक-निंबाळकर यांची बोलणी सुरू झाली. गाडगीळ प्रभृती इतर संयुक्त महाराष्ट्रवादी काँगेसी नेत्यांना मात्र यांतील काहीच माहीत नव्हते. एवढेच नव्हे, तर मोरारजी देसायांनाही या बाबतीत अंधारात ठेवल्यासारखे वाटले, असे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे.
चिंतामणराव देशमुखांनी भारताच्या अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बहुतेक सर्व राजकारणी आता मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे यावर ठाम होते. या काळात 'मराठा' खास गाजत होता. आचार्य अत्र्यांनी १९५६ ते १९६० या कालावधीत 'मराठा'मधून १०६ हुतात्म्यांना जिवंत ठेवले. देसाई यांना 'कसाई' हे विशेषण बहाल केले, तर नेहरूंना 'औरगंजेब' ही पदवी बहाल केली. काँग्रेसचे मराठी पुढारी यशवंतराव चव्हाण हेही या पदवीदानातून सुटले नाहीत.
१ मे १९६० रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये अस्तित्वात आली. अशा प्रकारे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्याचे तमाम मराठी जनतेचे स्वप्न अखेरीस साकार झाले. द्वैभाषिक मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले.