Tuesday, March 30, 2021

मुक्तीच्या दिशेने......

 उंटांचा काफिला वाळवंटातून चालला होता. संध्याकाळ झाली. मुक्कामाची जागा निवडली गेली. तंबू ठोकले गेले. उंटांच्या पाठीवरील सामान उतरवले गेले. आता उंटांना बांधण्याची तयारी झाली. उंटांना दोरीने खुंटीला बांधले. पण शेवटचा उंट राहिला. लक्षात आले की एक दोरी कमी पडत आहे. जर उंटाला बांधले नाही तर रात्री तो कोठेतरी निघून जाण्याची शक्यता होती. काफिल्याचा प्रमुख विचारात पडला. तेवढ्यात त्या काफील्यातील एक हुशार माणूस पुढे आला. त्याने त्या शेवटी राहिलेल्या उंटाला काल्पनिक दोरीने खुंटीला बांधण्याचा अभिनय केला. तो उंट रात्रभर तेथेच बसून होता. सकाळी काफिला निघण्याची तयारी झाली. पण तो उंट हलायला तयार नव्हता. त्याने पुढे जावे म्हणून त्याला काठीने रट्टे दिले. तरी तो हालत नव्हता. त्या हुशार माणसाच्या लक्षात आले. त्याने त्या उंटाला आदल्या रात्री बांधलेली काल्पनिक दोरी सोडविण्याचा अभिनय केला आणि तो उंट चालू लागला. उंट मोकळाच होता पण त्याला आपल्याला बांधले आहे असे वाटत होते. म्हणून तो मुक्तीचा आनंद घेऊ शकत नव्हता. 

ही त्या उंटाची नाही तर आपलीच कहाणी आहे. उपनिषदे वारंवार उद्घोषणा करीत आहेत की आपण मुक्त आहोत. तरीही आपल्याला मुक्तीचा अनुभव येत नाही. आपण बद्ध आहोत अशी आपण आपलीच समजूत करून घेतली आहे. आपल्या मुक्ततेची ग्वाही देण्यासाठी अनेक संत-महात्म्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. पण उपयोग झाला नाही. आपण मुक्तच आहोत हे ऐकायला खूप छान वाटते. आपण मुक्तच आहोत म्हणजे आता अध्यात्मिक वाटेवर आपल्याला काहीच करण्याची आवश्यकता नाही असे वाटून आपल्याला खूप आनंद होतो. पण आपण मुक्त आहोत हे सैद्धांतिक पातळीवर चांगले समजूनही आपण जीवनात येणाऱ्या सुख-दु:खात बुडून जातो. मुक्ततेत येणाऱ्या नि:संगपणाचा, असीम आनंदाचा  किंचितही अनुभव आपल्याला येत नाही. असे का होते हे समजून घेऊ. 

अद्वैत वेदांत असे सांगते की तुम्ही स्वभावत: ब्रह्मच आहात. त्यामुळे तुम्हाला काही वेगळे होण्याची आवश्यकताच नाही. तुम्ही मुक्तच आहात. येथे आणि या क्षणी तुम्ही मुक्त आहात. काही व्रत-कैवल्ये करण्याची गरजच नाही. तुमची मुक्ती ही या क्षणी झालेली गोष्ट आहे, मेल्यानंतर स्वर्गात जाणार अशी भविष्यकाळाची हमी नाही. तुम्ही जेथे आहात तेथेच तुमचा असीम आनंद लपलेला आहे. त्यासाठी कोठल्या वेगळ्या स्वर्ग लोकाची गरज नाही. पण मग आपल्याला त्याचा अनुभव का येत नाही?

आपण ब्रह्म आहोत, हे विश्वही ब्रह्म आहे. पण या दोन्हींवर मायेने पांघरूण घातले आहे. त्यामुळे आपल्याला आपण ब्रह्म असल्याचे अनुभवाला येत नाही.  ब्रह्माचे सत्, चित् आणि आनंद हे गुण आहेत. ते आपल्यात आणि विश्वात आहेतच.  पण मायेने नाम-रूपाचे  पांघरूण टाकल्याने आपण ब्रह्माला पटकन ओळखू शकत नाही. ते आपले अज्ञान आहे. यावर उपाय काय? अज्ञानावर उपाय अर्थात ज्ञान मिळविणे हा आहे. ज्ञानाच्या सहाय्याने हे मायेचे पांघरूण बाजूस सारून आपल्याला ब्रह्माचे दर्शन होऊ शकेल. मायेने कितीही पांघरूण घातले तरी ब्रह्म त्यातून डोकावत असते. आपण सजग चित्ताने अनुभव घेतले तर मायेच्या पांघरुणाडून होणारे हे ब्रह्माचे दर्शन आपल्याला होऊ शकेल. हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, केवळ उपनिषदे वाचून येणारे ज्ञान नाही तर अनुभवातून येणारे ज्ञान आहे. आपण रोज अनेक अनुभव घेत असतो. तरी आपल्याला ज्ञान का होत नाही?  आपण जेव्हा विविध अनुभव घेतो तेव्हा आपले चित्त विचलित झालेले असते. त्यामुळे आपण अनुभव पूर्णतः: घेऊ शकत नाही. त्यामुळे ज्ञान मिळत नाही आणि आपण  मुक्ततेचा - ब्रह्म असल्याच्या अनुभवाला मुकतो. असीम आनंदाचा साक्षात्कार आपल्याला होऊ शकत नाही.    

मग या अस्थिर चित्तावर उपाय काय? चित्त कसे स्थिर करायचे? यावर उपाय उपासना हा आहे. उपासना ही दोन मार्गांनी होऊ शकते. ध्यानमार्ग अथवा भक्तिमार्ग. साधक आपल्या वृत्तीनुसार, पूर्वजन्मातील साधनेनुसार कोठलाही मार्ग निवडू शकतो. ध्यानमार्गात आपणच ब्रह्म असल्याची साधकाला पूर्ण श्रद्धा असते. त्यानुसार ध्यानाच्या निरनिराळ्या पद्धती वापरून साधक चित्त स्थिर करू शकतो.  या मार्गात आपल्या जीवनात घडणाऱ्या सर्व प्रसंगांची जबाबदारी साधकाला पूर्णपणे उचलावी लागते. म्हणून अनेकांना हा मार्ग कठीण वाटतो. भक्तीमार्गात इष्ट देवतेला पूर्णपणे समर्पण करायचे असते. इष्ट देवतेत पूर्णपणे विलीन व्हायचे असते. आपल्या अहंकाराचे पूर्णपणे दहन झाल्याशिवाय हे समर्पण शक्य नसते. हा मार्ग सुरुवातीला सोपा वाटलं तरी पुढे कठीण होत जातो. काही साधक या दोन्ही मार्गांवरून एकाच वेळेला जाण्याचा प्रयत्न करतात. ते ही योग्य आहे. साधनेत प्रगती झाली की आपोआप आपला मार्ग कळून  येतो  - जन्मोजन्मी आपण कोठल्या मार्गाने जात होतो ते कळते. हे दोन्ही मार्ग साधनेसाठी सारखेच योग्य आहेत.  'आपण ब्रह्म असल्याचा साक्षात्कार होणे' अथवा 'आपण  ब्रह्मात विलीन होण्याचा साक्षात्कार होणे' असे हे दोन्ही मार्ग अंतिमतः: एकाच उद्दिष्टाकडे जातात. चित्त स्थिर केल्याशिवाय असीम आनंदाचा अनुभव येत नाही, मुक्ततेचा अनुभव येत नाही. 

अनेक साधकांना साधनेत चित्त खूप अस्थिर असल्याचा अनुभव येतो. कितीही साधना केली तरी चित्त स्थिर होत नाही. याचे कारण आहे मलीन चित्त. मलीन चित्त कधीही स्थिर होऊ शकत नाही. यावर उपाय अर्थातच चित्ताची मलिनता धुवून काढणे. ही मलिनता दूर करण्यासाठी समाजासाठी काहीतरी निस्वार्थ बुद्धीने करणे आवश्यक आहे. नेहमी सत्य बोलणे-वागणे याचा आग्रह धरणे आवश्यक आहे. दिलेला शब्द पाळणे आवश्यक आहे.  प्राणिमात्रांबद्दल-वृक्षवल्लीबाबत आत्मीयता अंगी बनविणे आवश्यक आहे. अनेक जण संतांची चरित्रे वाचताना मी पाहतो. हे संत जसे वागले तसे वागण्याचा प्रयत्न करणे ही मलिनता धुवून काढण्याची पहिली पायरी होऊ शकेल. सुरुवातीला कदाचित ही फक्त संतांचे शारीरिक अनुकरण करण्याची कृती असेल, पण हळूहळू त्यातील भाव लक्षात येऊ लागेल आणि आपल्या हातून अशा कृती नकळत घडू लागतील  आपले चित्त निर्मल होऊ लागेल. कर्म करताना ते आपोआप घडेल, त्यामागील कर्ता भाव लुप्त होऊ लागेल, फळाची अपेक्षा राहणार नाही.  गीतेत सांगितलेला कर्मयोग तो हाच. 

याचंच अर्थ मुक्तीच्या दिशेने चालताना आपल्याला या तीन पायऱ्यांवरून जावे लागेल. प्रथम आपले चित्त निर्मल करावे लागेल. यासाठी सर्व भारतीय धर्मांत विविध पद्धती सांगितल्या आहेत. पातंजल योगात यम-नियम आहेत, बौद्ध धर्मात दशपारमी आहेत, जैन धर्मात अणूव्रत आहे. 

चित्त निर्मल होऊ लागले की आपले चित्त स्थिर करावे लागेल. त्यासाठी  उपासना अथवा साधना करावी लागेल. ही उपासना ध्यानमार्ग अथवा भक्तिमार्गाने करता येईल. चित्त स्थिर झाले की उपनिषदातील-गीतेतील  उपदेशाने आपल्या मनातील अंधार दूर होऊन आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल, आपल्याला मुक्तावस्थेची जाणीव होईल. आपण परम आनंदात न्हाऊन निघू. 


Sunday, March 21, 2021

असङ्गो अहम् | भाग ७ : उपसंहार

 आपण अद्वैत वेदान्तातील 'साक्षी', 'उपाधी', 'अधिष्ठान' आणि 'विवर्त' या महत्वाच्या संकल्पना जाणून घेतल्या.  

प्रकाश आणि चित्रपटाचा पडदा यात मूलभूत फरक आहे. प्रकाश वस्तूंचे अस्तित्व दाखवितो. चित्रपटाचा पडदा त्या चित्रपटाला अस्तित्व देतो.  पडदा नसेल तर चित्रपट दिसणार नाही. अस्तित्वात असलेल्या कोऱ्या  पडद्याच्या पार्श्वभूमीवर आपण आभासी स्वरूप असलेला चित्रपट पाहू शकतो. आपले चैतन्य - जे ब्रह्म म्हणूनही ओळखले जाते- ते असेच अस्तित्वात आहे आणि त्याच्या कोऱ्या पडद्यावरच आसपासचे विश्व दृश्यमान होते. आपल्या अस्तित्वाच्या आधारेच हे विश्व उभे राहिले आहे. माझे चैतन्य हे या विश्वाचे आधिष्ठान आहे. एवढेच नव्हे तर माझे शरीर-मन आणि आसपासचे विश्व हे माझ्या चैतन्याचे विवर्त आहे. म्हणूनच मी - माझे अस्तित्व या चित्रपटाच्या पडद्यासारखेच 'असंग' - 'निर्लेप' आहे. माझ्या आसपास घडणाऱ्या घटना, येणारी-जाणारी माणसे, मनात येणारे आणि जाणारे विचार, सुखदुःखाची भावना  हे केवळ माझ्या अस्तित्वाच्या आधारावर आले आणि गेले. माझ्यावर म्हणजेच माझ्या चैतन्यावर- माझ्या अस्तित्वावर त्याने कोणताही परिणाम झाला नाही आणि होणारही नाही. 

एकदा ही गोष्ट लक्षात आली की आपण तणावहीन होतो. जगातील कोणत्याही समस्या आपल्यापुढे आल्या तरी तणावग्रस्त न होता त्या सोडविण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. तणावग्रस्त न होता एखाद्या समस्येला तोंड दिले तर त्या समस्येतून सुटण्याचे मार्गही दिसू लागतात. अध्यात्मातील 'असंग' होण्याची कल्पना म्हणजे दैनंदिन जीवनातील समस्यांपासून दूर पळणे नव्हे तर या समस्यांना शांतपणे सामोरे जाणे आहे. या समस्या कदाचित सुटतील अथवा सुटणारही नाहीत, परंतु या समस्या तुमच्यावर म्हणजेच तुमच्या चैतन्यावर एकही ओरखडा उमटवू शकत नाहीत. या समस्यांच्यावेळी मनावर येणार ताण साक्षीभावाने अनुभवा, शारीरिक वेदना साक्षीभावाने अनुभवा. मनावरील ताण, शारीरिक वेदना यांचा त्रास कमी होऊ लागेल. हीच 'असंग' होण्याची प्रक्रिया आहे. 

'असंग' होण्याची ही प्रक्रिया सोपी आहे. निदान आपण सुरुवात तर निश्चित करू शकतो. मात्र त्यासाठी या लेखाच्या सुरुवातीस सांगितलेल्या चार संकल्पना नीट समजून घेतल्या पाहिजेत. 

'असंग' होण्याच्या प्रवासात तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

लेखमाला समाप्त 


Saturday, March 20, 2021

असङ्गो अहम् | भाग ६ : विवर्त

 मागील लेखात आपण 'आधिष्ठान' या संकल्पनेसंबंधात जाणून घेतले.  या विश्वाला - माझ्या शरीराला-मनाला  माझ्या चैतन्याचे अधिष्ठान आहे हे आपल्याला समजले.  त्यामुळे विश्वात  घडणाऱ्या घटनांनी, माझ्या शरीराला मनाला होत असलेल्या संवेदनांमुळे माझ्यावर - माझ्या चैतन्यावर परिणाम होणार -  असे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच आता आपण 'विवर्त' ही संकल्पना समजून घेत आहोत. 

'विवर्त' म्हणजे 'सत्याचे भिन्न पातळीवरील प्रकटीकरण'. ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण चित्रपटाच्या पडद्याचे उदाहरण घेऊ.  चित्रपटात अनेक प्रसंग घडतात. नायिका-नायक नाच करतात, नायकाच्या दुष्ट लोकांबरोबर मारामाऱ्या होतात, आगी लागतात, भूकंप होतात. पण चित्रपटाचा पडदा या सर्व गोष्टींपासून 'असंग' असतो, 'निर्लेप' असतो. चित्रपटात आग लागल्याने तो जळत नाही, चित्रपटातील पावसाने तो ओला होत नाही. तो पडदा तेथेच असतो. यात  पडद्याचे प्रकटीकरण चित्रातील दृश्यात होते. पडद्याच्या ठिकाणी सुंदर दृश्ये, धरणीकंप, आग, पाऊस वगैरे प्रकट होतात. हे प्रकटीकरण निश्चित सत्य आहे. पडदाही सत्य आहे. पण ही दोन्ही सत्ये वेगळ्या पातळीवर आहेत. म्हणूनच आग, पाऊस, धरणीकंप वगैरे चित्रपटात घडणाऱ्या गोष्टींचा त्या पडद्यावर परिणाम होत नाही . चित्रपट हे त्या पडद्याचे 'विवर्त' आहे.  

आपल्याला अंधाऱ्या जागी असलेला दोर सापासारखा भासतो. तेव्हा तो दोर आणि साप हे दोन्ही सत्य असतात. पण त्या दोन्हीच्या सत्याची पातळी वेगळी असते. त्या दोराचे प्रकटीकरण सापात होत असते.  साप हा दोराचा 'विवर्त' असतो. जेव्हा वाळवंटात मृगजळ दिसते तेव्हा ते मृगजळ सत्य असते - आपल्या डोळ्यांना ते दिसत असते. पण त्या सत्याची पातळी वेगळी असते. त्याला आपण आपल्या भाषेत 'भासमान' म्हणू, पण ते सत्यच असते. वाळवंटाचे विवर्त असते. वाळवंटाचे विवर्त असलेले मृगजळ त्याचे अधिष्ठान असलेल्या वाळवंटातील वाळूचा एक कणही ओला करू शकत नाही. कारण विवर्त आणि आधिष्ठान हे सत्याच्या एका पातळीवर नाहीत. 

चित्रपट हा त्या पडद्याचा विवर्त आहे, तो पडदा 'असंग' आहे म्हणूनच त्या पडद्यावर तो चित्रपट दाखविता येतो. चित्रपटातील आगीने तो पडदा जळला असता तर अनावस्था प्रसंग आला असता. जर त्या पडद्याला अमिताभ बच्चन आवडला म्हणून त्याने अमिताभच्या प्रतिमेला पकडून ठेवले असते तर तो चित्रपट पुढेच जाऊ शकला नसता.  चित्रपटातील खलनायकाची गुंडगिरी आवडली नाही म्हणून पडद्याने खलायकाला पडद्यावर दाखवायचेच नाही असे ठरविले असते तर चित्रपटाचे काय झाले असते? तो पडदा चित्रपटातील कोणताही प्रसंग दाखविण्यास सज्ज आहे, कोणताही प्रसंग दाखविण्यास त्याचा आक्षेप नाही आणि तरीही तो चित्रपटातील प्रत्येक प्रसंगात पूर्णपणे 'असंग' आहे, 'निर्लेप' आहे. एवढेच नाही, जर त्या पडद्यावर कोणताच चित्रपट दाखविला जात नसेल तर त्या पडद्याला त्याचा खेद नाही. अशावेळी संपूर्ण कोरा असण्याचीही त्याला वैषम्य नाही.  

'विवर्त' हे सत्याचे भिन्न पातळीवरील प्रकटीकरण आहे. जेव्हा बीजाचे प्रकटीकरण रोपात होते तेव्हा ते सत्याचे एकाच पातळीवरील प्रकटीकरण असते. त्याला 'विवर्त' म्हणता येणार नाही. 

जेव्हा आपण एखादे स्वप्न बघतो तेव्हा ते स्वप्न पूर्णतः: सत्य असते. म्हणूनच आपण त्या स्वप्नात घाबरतो, आनंदित होतो. पण त्या स्वप्नाच्या सत्यतेची पातळी वेगळी असते. केवळ आपल्या मनाने आपल्यापुढे उभे केलेले ते सत्य असते. त्याचा  आपल्या सध्याच्या पातळीवरील जीवनाशी तसा संबंध नसतो. ते आपल्याच मनाचे 'विवर्त' असते. 

सत्याच्या या भिन्न पातळीवर - विवर्त पातळीवर - झालेल्या गोष्टींचा परिणाम मूळ आधिष्ठानावर होत नाही ही अद्वैत वेदान्तातील खूप महत्वाची संकल्पना आहे.  ही संकल्पना नीट समजावून घेऊन आपण पुढील लेखाची वाटचाल करणार आहोत. 

असङ्गो अहम् | भाग ५ : आधिष्ठान

 मागील भागात आपण 'उपाधी' या संकल्पनेविषयी जाणून घेतले. आता आधिष्ठान या संकल्पनेसंबंधी जाणून घेऊ. 

मागील काही लेखांत आपण प्रकाश आणि त्याचे साक्षी चैतन्याशी साम्य याचा परिचय करून घेतला. परंतु त्यालाही मर्यादा आहे. प्रकाश हा फक्त तेथे असलेल्या वस्तूंची जाणीव करून देतो. परंतु प्रकाशामुळे त्या वस्तू अस्तित्वात येत नाहीत. चैतन्याचे तसे नाही. आपण थोड्या खोलात जाऊन बघू. 

एखाद्या गोष्टीचे अस्तित्व दुसऱ्या गोष्टीला अस्तित्व प्रदान करीत असेल तर पहिली गोष्ट त्या वस्तूचे आधिष्ठान आहे असे म्हणतात. उदाहरणार्थ टेबल हे लाकडाने बनलेले आहे. जर त्या लाकडाचे अस्तित्व काढून घेतले तर त्या टेबलालाही अस्तित्व राहणार नाही. 

सोन्याच्या पाटल्या आहेत. त्यांचे अस्तित्व सोन्यामुळे आहे. उद्या या पाटल्या वितळवून त्याच्या बांगड्या केल्या तर सोन्याचे अस्तित्व तसेच राहील. कारण सोन्याचे अस्तित्व पाटल्यांवर अवलंबून नाही.  जर पाटल्यांमधील सोने काढून घेतले तर पाटल्या अस्तित्वात राहणार नाहीत. म्हणून सोने हे पाटल्यांचे आधिष्ठान आहे. 

मातीचा घट आहे. त्याचे अस्तित्व मातीमुळे आहे. जर तो घट फोडून त्याचे चूर्ण बनविले तर घटाचे अस्तित्व संपेल, पण मातीचे अस्तित्व तसेच राहील. माती त्या घटाचे 'अधिष्ठान' आहे. 

समुद्रात लाटा येतात. लाटांचे अस्तित्व समुद्राच्या पाण्यामुळे आहे. जर समुद्रात पाणी नसेल तर लाटा निर्माण होणार नाहीत. समुद्राच्या पाण्याचे अस्तित्व मात्र लाटांवर अवलंबून नाही. म्हणजेच समुद्राचे पाणी हे समुद्राच्या लाटांचे आधिष्ठान आहे. 

आधुनिक युगातील अधिष्ठानाचे उदाहरण हे चित्रपटाच्या पडद्याचे आहे. सिनेमाचा पडदा हा चित्रपटातील प्रसंगांना अस्तित्व देतो. जर चित्रपटाचा पडदाच नसेल तर चित्रपट बघता येणार नाही. परंतु चित्रपटाचे प्रक्षेपण होत नसतानाही त्या पडद्याला अस्तित्व आहे. म्हणजेच चित्रपटाचा पडदा हे चित्रपटाचे 'आधिष्ठान' आहे. 

तसेच 'मी' अथवा 'माझे चैतन्य' हे माझ्या देह-मन आणि आसपास असणाऱ्या गोष्टींचे अधिष्ठान आहे. जर माझा देह-मन यांना चैतन्याचा स्पर्श नसेल तर त्यांना कोणत्याच गोष्टींची जाणीव नसेल - त्यांचे अस्तित्व शून्यवत असेल. मात्र माझ्या चैतन्याच्या अस्तित्वासाठी देह-मनाची आवश्यकता नाही. म्हणजेच माझे चैतन्य हे माझ्या देह-मनाचे अधिष्ठान आहे. 

जर मी म्हणजे माझे चैतन्य माझ्या आसपास घडणाऱ्या घटनांचे, माझ्या मनात उठणाऱ्या तरंगांचे आधिष्ठान असेल तर या सर्व गोष्टींपासून असंग अथवा अलिप्त कसे राहू शकेल? टेबलाचे लाकूड त्या टेबलाचे आधिष्ठान आहे.  मी टेबलावर ओरखडा ओढला तर त्या लाकडावरही ओरखडा उठणारच. समुद्राचे पाणी हे समुद्राच्या लाटांचे आधिष्ठान आहे. मी त्या लाटांत थोडा रंग मिसळला तर पाण्यालाही तो रंग येणारच. मग माझे चैतन्य जर या विश्वाचे आधिष्ठान असेल तर विश्वात घडणाऱ्या घटनांचा परिणाम चैतन्यावरही होणारच. ते असंग-निर्लेप कसे राहू शकेल?

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आणखी एका संकल्पनेसंबंधात जाणून घ्यावे लागेल. पुढील लेखात आपण 'विवर्त' या संकल्पनेसंबंधी जाणून घेऊ. 

Friday, March 19, 2021

असङ्गो अहम् | भाग ३ : साक्षी

.मागील भागात आपण म्हणजे आपले शरीर, मन नाही तर चैतन्य आहोत हे पहिले. या भागात आपण साक्षित्व समजून घेऊ. त्यासाठी आपल्या चैतन्याचे प्रकाशाशी काय साम्य आहे ते पाहू.  

 प्रकाशाची जाणीव होण्यासाठी प्रकाशाच्या मार्गात अन्य कोठलीतरी वस्तू यावी लागते. आपल्याला मग त्या वास्तूच्या अस्तित्वाची जाणीव होते तसेच तेथे असलेल्या प्रकाशाचीही जाणीव होते. अंतराळात निर्वात पोकळीत एखादी वस्तू असेल तरच प्रकाशाची जाणीव होते, अन्यथा सर्वत्र अंधार भासतो. आपल्या चैतन्याची जाणीवही आपल्या शरीर-मनाला होणाऱ्या संवेदनांतून होते. या संवेदना आपले चैतन्य प्रकट करते. संवेदनाच नसतील तर चैतन्य तेथे असूनही चैतन्याचे प्रकटीकरण होणार नाही. 

आपल्या आसपास सूर्यप्रकाश पसरलेला आहे. हा प्रकाश ज्यावर पडेल ती वस्तू प्रकाशित करतो.  ती वस्तू घाणेरडी असेल तर तसे दाखवितो, स्वच्छ असेल तर तसे दाखवितो. पण त्यामुळे तो प्रकाश घाणेरडा अथवा स्वच्छ होत नाही. हा प्रकाश त्या वस्तूंपासून 'असंग' असतो. त्या वस्तू त्या प्रकाशाला सुंदर अथवा बेढब करू शकत नाहीत. जे आहे, जसे आहे तसे दाखविण्याचे काम प्रकाश करतो. प्रकाश त्या कोठल्याही वस्तूला चिकटून राहत नाही. ती वस्तू त्या खोलीतून बाहेर नेली तर तो प्रकाश त्या वस्तूबरोबर चिकटून बाहेर जाणार नाही. ती सुंदर वस्तू आता बेढब केली तर  तो प्रकाश आधीच्याच सुंदरपणाला चिकटून राहण्याचा आग्रह धरणार नाही. 

या प्रकाशासारखेच जे काही या चैतन्याच्या परिक्षेत्रात येते त्याला हे चैतन्य आपल्यासमोर ठेवते. आपल्या पंचेंद्रियांना जे जाणवते त्याची सूचना देते. त्या क्षणी जे जाणवते तेच सांगते, आधीच्या अनुभवाला धरून बसत नाही.  जर माझ्या चैतन्याला आरोग्यपूर्ण शरीराचा अनुभव येत असेल तर माझ्या चैतन्याने (म्हणजे मी) आरोग्यपूर्ण शरीर धारण केले आहे असे हे चैतन्य दाखविते. 'मी धट्टाकट्टा आहे' असे आपण व्यवहारात म्हणत असलो तरी त्याचा खरा अर्थ 'हे शरीर' धट्टेकट्टे आहे असाच होतो. मी-म्हणजे माझे चैतन्य- जसे आहे तसेच दाखवते आणि दाखवत राहील. मी उद्या रोगग्रस्त झालो तरी माझे चैतन्य रोगग्रस्त कसे होईल? माझे मन खिन्न झाले आहे हे चैतन्य दाखवून देईल. पण त्यामुळे माझे चैतन्य खिन्न कसे होईल? माझ्या शरीराच्या, मनाच्या बदलत्या अवस्थांचा मी केवळ साक्षी आहे. पण त्या अवस्थांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही, होणार नाही.  मी 'असंग' आहे.  

ही 'असंगत्वाची' भूमिका अधिक खोलात जाऊन समजून घेण्यासाठी आपल्याला काही संकल्पना समजून घ्याव्या लागतील. पुढील लेखात आपण 'उपाधी' ही संकल्पना समजून घेऊ.  

Thursday, March 18, 2021

असङ्गो अहम् | भाग ४ : उपाधी

 'असंग' होणे म्हणजे केवळ शरीराने अथवा मनाने आसपास घडणाऱ्या घटनांपासून अलिप्त राहणे नव्हे.  'असंग' या शब्दात खूप खोलवर अर्थ दडला आहे. हा अर्थ समजून घेण्यासाठी आपण प्रथम 'मी कोण आहे' याचा शोध घेत आहोत. 

दुसऱ्या भागात आपण पहिले की साक्षी चैतन्याची प्रतिमा आपल्या मनावर उमटते आणि अहंकाराच्या साहाय्याने ही ही प्रतिमा आपल्या शरीराच्या रोमारोमात पसरते. आपल्याला आपले शरीर चैतन्यमय भासते. आपण या चैतन्यालाच 'मी' समजू लागतो. हे चैतन्य प्रकाशासारखे असते हे आपण तिसऱ्या भागात पहिले. अर्थात प्रकाशाचे साम्य चैतन्याशी दाखविताना प्रकाश आणि चैतन्य यांचे सर्वच गुण सारखे नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. 

आपण आता आपल्या प्राचीन ग्रंथातील 'उपाधी'ची संकल्पना समजून घेऊ.  एखाद्या सानिध्यात असलेल्या वस्तूचे गुण सानिध्यामुळे त्याच वस्तूचे आहेत असे वाटणे म्हणजे 'उपाधी'. एखाद्या अत्यंत पारदर्शक अशा स्फटिकाच्या गोळ्याच्या मागे आपण लाल रंगाचे फुल ठेवले असता आपल्याला तो गोळा लाल रंगाचा आहे असे वाटते. तो लाल रंग त्या गोळ्याचा नसतो, परंतु सानिध्यामुळे त्या गोळ्याला तसा रंग आहे असे भासते. हे फुल बाजूस केले असता गोळा परत पारदर्शकच भासतो. हे उपाधीचे एक उदाहरण आहे. 

मन-शरीराच्या सानिध्यामुळे चैतन्यात हेच घडते. शरीराला - मनाला झालेल्या संवेदनांचे प्रतिबिंब आपल्या चैतन्यात उमटते.  त्या पारदर्शक स्फटिकाच्या गोळ्यात  कोठलाही रंग उतरलेला नाही. तो तसाच पारदर्शक आहे. मात्र केवळ लाल फुलाच्या सानिध्यामुळे तसे भासते. तसेच आपल्या शरीरातील चैतन्यात काहीही बदल झालेला नसतो,  मात्र तसे भासते. मग आपण 'मला दु:ख झाले', 'मला आनंद झाला' अशी भाषा बोलू लागतो. केवळ भाषा नव्हे, आपल्याला तसेच वाटते. सानिध्यामुळे चैतन्याने हे 'रंग' धारण केले आहेत - चैतन्यात बदल झाला आहे असे भासते. उपाधीमुळे झालेला हा भ्रम आहे. पण चैतन्य 'निरामय' आहे, 'नि:संग' आहे.  

'उपाधी'  या संकल्पनेसारखीच 'अधिष्ठान' ही संकल्पना आपण पुढील भागात समजून घेऊ.  



Wednesday, March 17, 2021

असङ्गो अहम् | भाग २ : चैतन्य

'असंग' होणे ही ब्रह्मज्ञान होण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट समजली जाते. पण ही गोष्टच अत्यंत कठीण आहे. पैसा, मानमरातब यापासून ऐहिकदृष्ट्या असंग राहणे सोपे आहे. पण 'ममत्व' ही गोष्टच अशी आहे की ती साधू-संतांनाही  या जगाशी बांधून ठेवते. अष्टावक्र गीतेतही जनक राजा तथाकथित संतांना 'ममत्वापासून मुक्ती' न मिळाल्याचे आश्चर्य व्यक्त करतो. 

आपण म्हणजे आपले शरीर अथवा आपले मन असे वाटते त्यांच्यासाठी 'असंग' होणे खरेच खूप कठीण आहे. प्रथम आपल्याला 'मी' म्हणजे हे शरीर अथवा मन नाही तर त्यापासून वेगळे असे चैतन्य आहे हे समजून घ्यावे लागेल. त्यासाठी अद्वैत वेदांतात 'दृक-दृश्य विवेक', 'अपरोक्षानुभूती', 'पंचदशी' या सारखे अनेक ग्रंथ आहेत. त्यातून आपण स्वतः आपल्या शरीर-मनापासून वेगळे चैत्यन्य आहोत याचे भान येते. या पैकी काही ग्रंथांचा थोडक्यात गोषवारा या ब्लॉगवर अन्यत्र घेतलेला आहे. 

आपण म्हणजे शरीर-मनापासून वेगळे चैतन्य आहोतच, परंतु आपले चैतन्य अन्य कोणा जीवाच्या चैतन्यापेक्षा वेगळे नाही. आपल्याला जाणवणारे चैतन्य हे केवळ वैश्विक चैतन्याचे आपल्या मनात उमटलेले प्रतिबिंब / प्रतिमा आहे. आपल्या मनाच्या 'अहंकार' या भागाशी ही चैतन्याची प्रतिमा एकरूप होते आणि अहंकाराच्या साहाय्याने आपल्या शरीराच्या रोमारोमात पसरते. म्हणूनच आपल्याला आपल्या शरीरात पसरलेल्या चैतन्याची आपले शरीर ही सीमा असल्याचा भास होतो. तसेच ही चैतन्याची प्रतिमा आपल्या अहंकाराशी एकरूप झालेली असल्याने हे चैतन्य 'माझे' आहे अशी आपली समजूत होते. सर्व प्राणिमात्रांत ही एकाच चैतन्याची प्रतिमा असते. बागेत ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या अनेक बालद्यांत एकाच सूर्याची प्रतिमा उमटते, पण  प्रतिमा अनेक असतात तसेच काहीसे हे आहे. पाणी मलीन  झाले की सूर्याची प्रतिमाही झाकोळल्यासारखी दिसते, पाणी डुचमळाले की त्या प्रतिमेचे तुकडे झाल्यासारखे भासतात. तसेच कधी कधी आपल्यामधील चैतन्य झाकोळते, कधी ते छिन्नविच्छिन्न झाल्यासारखे भासते. पण चैतन्याचा सूर्य त्याच तेजाने अखंड तळपत असतो. 

आपण म्हणजे शरीर-मनापासून वेगळे चैतन्य आहोत, केवळ अहंकाराशी एकरूप झालेली चैतन्याची प्रतिमा नसून त्या प्रतिमेचा स्रोत असलेले चैतन्य आहोत हे एकदा ध्यानात आले की आपला 'असंग' होण्याकडे प्रवास वेगाने होतो. 

आपण पुढील प्रवासास पुढील भागात सुरुवात करू. 

Saturday, March 13, 2021

असङ्गो अहम् | भाग १ : वेदान्ताचे चार आधारस्तंभ

 आज अनेक महिन्यांनी परत अद्वैत वेदांत या विषयाकडे वळत आहे. नुकताच  स्वामी सर्वप्रियानंद यांचा अत्यंत सुंदर व्हिडीओ https://www.youtube.com/watch?v=jID0akelFB0  पाहण्यात आला. 

वेदान्ताचे चार आधारस्तंभ विवेकानंदांनी सांगितले आहेत. अभय, अहिंसा, असंग आणि आनंद. यातील तिसरा आधारस्तंभ 'असंग' हा आहे. किंबहुना आपला अध्यात्मिक प्रवास आपण केवळ 'असंगाच्या' साहाय्याने करू शकतो.  असंग म्हणजे केवळ धन-संपत्ती यांचा निर्मोह नव्हे, समाजापासून दूर राहणे नव्हे. असंग या शब्दाचा अर्थ वेदान्ताच्या परिभाषेत खूप गहन आहे. असंग ही केवळ संन्यासींसाठीची आवश्यक गोष्ट नव्हे, संसारी माणसालाही आनंदी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. 

संसारी माणूस संपत्ती, नोकरी-व्यवसाय, नातेसंबंध अशा अनेक गोष्टीत ताण-तणाव सहन करीत असतो. या ताण-तणावाचे चांगले नियोजन करण्यासाठी 'असंगभाव' मनात रुजणे आवश्यक आहे. 

विवेचनाला सुरुवात करण्यापूर्वी उपनिषदातील एका ऋचेचा परामर्श घेऊ 

त्वमेव भान्तं अनुभाति सर्वं |
तस्य भासा सर्वमिदं विभाति |

'जेव्हा ते प्रकाशाते  तेव्हाच बाकी सर्व प्रकाशते - त्याच्याच प्रकाशात सर्व काही प्रकाशते ' असे आपले हे वर्णन आहे. 'मी आहे म्हणूनच हे विश्व आहे' असे म्हणता येईल. हा 'मी' कोण आहे याचाच वेध घेण्याचा उपनिषदांचा आणि पर्यायाने अद्वैत वेदांताचा प्रयत्न आहे. 

हा 'मी' कोण आहे आणि तो 'असंग' आहे असे का म्हटले आहे ते पुढील भागात पाहू या.