Friday, May 31, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग ५

आतापर्यंतच्या विवेचनावरून हे लक्षात येते की येथे तीन प्रकारच्या गोष्टी आहेत. आपले (स्थूल आणि सूक्ष्म) शरीर, परावर्तित चैतन्य (आपल्याला जाणवणारे चैतन्य) आणि साक्षी चैतन्य. या तिघांशी आपला (आपल्या अहंकाराचा) संबंध काय?

  1. आपला आणि आपल्या शरीराचा (स्थूल आणि सूक्ष्म)
  2. आपला आणि या परावर्तित चैतन्याचा
  3. आपला आणि साक्षी चैतन्याचा 
आपला (आपल्या अहंकाराचा) आणि परावर्तित चैतन्याचा संबंध हा 'नैसगिक' आहे. एखाद्या गोष्टीसमोर आरसा धरावा आणि नैसर्गिकपणाने त्या वस्तूचे त्यात प्रतिबिंब पडावे असा हा संबंध आहे. आपला अहंकार हा आरशासारखा आहे. आरशात प्रतिबिंब दिसणे नैसर्गिक आहे. म्हणूनच आपल्याला आपल्यातील चैतन्याची नेहमीच जाणीव असते. त्याचे आणि अहंकाराचे तादात्म्य झालेले असते. तळपत्या साक्षी चैतन्याचे ते केवळ प्रतिबिंब आहे. 
आपला आणि आपल्या शरीराचा संबंध 'कर्मज' आहे. वेदांताप्रमाणे आपले शरीर हे पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे. या कर्मातील काही भाग (पुण्य आणि पाप कर्म) या जन्मात फलित होणार आहे. त्याला वेदांतात 'प्रारब्ध' म्हटले आहे. हे प्रारब्ध संपवून आपण या स्थूल शरीराचा त्याग करणार आहोत. 
आपला आणि साक्षी चैतन्याचा संबंध 'भ्रान्तिजन्य' आहे. आपला म्हणजेच आपल्या अहंकाराचा आणि साक्षी चैतन्याचा काहीही संबंध नाही. तो केवळ एक आरसा आहे. केवळ अपघाताने त्यात साक्षी चैतन्याचे प्रतिबिंब पडले आहे. म्हणूनच आपल्याला मुक्ती मिळणे हा भ्रम आहे असे वेदांत मानते. आपण मुक्तच आहोत. आपले तादात्म्य अहंकाराशी झाल्याने आपल्याला आपण बद्ध झाल्यासारखे वाटते. आपला आणि आपल्या अहंकाराचा हा भ्रांतीजन्य संबंध लक्षात आला की आपल्याला मुक्तीचा अनुभव येतो (आपण कायम मुक्तच आहोत, अनुभव तेव्हा येतो) असे वेदान्ताचे उच्चारवाने प्रतिपादन आहे. ही मुक्ती 'आपल्याला' म्हणजे आपल्या 'अहंकाराला' मिळत नाही तर अहंकाराने निर्माण केलेल्या भ्रमापासून आपली मुक्ती असते. आपल्याला आपल्यापासूनच (आपल्या अहंकारापासून) मुक्ती मिळते. त्यानंतरही अहंकार असतोच, त्यात साक्षी चैतन्याचे प्रतिबिंबही असते. हाच अहंकार आपल्याला आपल्या पुढील आयुष्यात उपयोगीही असतो. मात्र आता त्याचे खरे स्वरूप आपल्याला समजलेले असते.  त्यामुळे हा अहंकार आता आपल्या जीवनात नव्या समस्याच उभ्या करीत नाही तर आपल्याला उपयोगी कामे करतो. एखादा रानटी हत्ती खूप उपद्रवी असतो, पण माणसाळविला की तोच आपली मोठी कामे करतो तसेच या अहंकाराचे आहे.  
अंधाऱ्या ठिकाणी एक दोर  पडलेला  असतो. आपण त्याला साप समजतो आणि घाबरतो. ही भ्रांती दूर  करण्यासाठी कोणत्या काठीची गरज नाही, तर हा साप नसून दोर आहे या ज्ञानाची गरज असते. हे ज्ञान झाल्यावर तो दोर तेथेच असतो, पण आता त्याची भीती वाटत नाही. तसेच आपला अहंकार म्हणजे 'मी' नव्हे हे समजण्यासाठी केवळ ज्ञानाची गरज असते. हे समजल्यावर तो अहंकार तेथेच असतो, पण आपल्यापुढे समस्या उभ्या करत नाही असे वेदांत सांगते. हाच तो वेदांतात सांगितलेला ज्ञानयोग!
आता आपण (अहंकार) आणि आपले शरीर, आपण आणि हा परावर्तित चैतन्य, आपण आणि साक्षी चैतन्य यातील संबंध कसा तोडायचा हे आपण पाहू. 
  1. आपला (अहंकाराचा) आणि परावर्तित चैतन्याचा संबंध हा नैसर्गिक आहे हे आपण पहिले. जेव्हा या अहंकाराच्या आरशासमोर साक्षी चैतन्य येईल तेव्हा त्या आरशात त्याचे प्रतिबिंब दिसणारच. जेव्हा जेव्हा आपले मन कार्यरत असते तेव्हा मनाचा भाग असलेला अहंकारही कार्यरत असणार आणि तो स्वत:ला या प्रवर्तित चैतन्याशी एकरूप करणार. फक्त गाढ झोपेत (सुषुप्ती) मन कार्यरत नसणार आणि तेव्हाच अहंकार कार्यरत नसेल आणि हा संबंध तुटेल. अन्य वेळी हा संबंध तोडणे शक्य नाही.
  2. आपला (अहंकार) आणि आपल्या स्थूल शरीराचा संबंध कसा तोडता येईल? हा संबंध 'कर्मज' आहे. ज्यावेळी आपली सर्व प्रारब्ध कर्मे नष्ट होतील तेव्हा आपले सूक्ष्म शरीर हा देह सोडून अन्य देहाशी संलग्न होईल आणि आपला या देहाशी संबंध तुटेल.
  3. आपला (अहंकार) आणि  साक्षी चैतन्याचा संबंध कसा तुटेल?  हा संबंध भ्रांतीजन्य आहे. म्हणजेच अहंकारामुळे मला माझ्या स्वत्वाची जाणीव नाही. मी खरा साक्षी चैतन्य आहे याची जाणीव नाही. केवळ ज्ञानाने, जागृतीमुळे  हा भ्रांतीजन्य संबंध तुटेल आणि आपल्याला आपल्या स्वत्वाची जाणीव होईल असे वेदांत मानते.  ही जागृती आपली नसेल, आपल्या भासमान अस्तित्वाची - अहंकाराची - नसेल तर या भासमान अस्तित्वाची जाणीव असेल, आपण म्हणजे अहंकार नव्हे याची जाणीव असेल. मी या देहात बद्ध नाही तर मी हे अनंत, निराकार अस्तित्व आहे याची ती जाणीव असेल. या देहाला मुक्ती नाही, या अहंकाररुपी स्वत्वाच्या जाणिवेला मुक्ती नाही. हा देह, ही अहंकाराची जाणीव नाशवंत आहे. आपण सदा सर्वकाळ मुक्तच आहोत, अनादी-अनंत आहोत.
    ज्ञानाच्या साहाय्याने आपण अज्ञानाचे दोर कापू शकतो. याने आपला अहंकार (व्यावहारिक अर्थाने आपण) आणि परावर्तित चैतन्य यांचा संबंध तुटणार नाही. परंतु आपल्याला आपल्या स्वत्वाची जाणीव झाल्याने हा अहंकार आपल्याला मदतच करेल, बाधा आणणार नाही.
    हे अज्ञानाचे दोर कसे कापायचे हे आपण नंतरच्या लेखात पाहू. 

Friday, May 24, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग ४

आपल्या शरीराच्या रोमारोमात आपल्याला चैतन्याचा अनुभव येतो. आपले मनही चैतन्यमय आहे हे जाणवते. हे चैतन्य आपल्यात कोठून येते?

भारतीय तत्वज्ञानात मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे सर्व सूक्ष्म शरीराचे भाग आहेत. आणि त्या पलीकडे आत्मा आहे. म्हणजेच माणसाच्या व्यक्तिमत्वाचे तीन भाग आहेत. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आत्मा. पाश्चात्य तत्वज्ञान सूक्ष्म शरीर आणि आत्मा यांचा वेगळा विचार करीत नाही. दोन्हीला soul हा एकाच शब्द तेथे आहे.

आकाशात सूर्य तळपत असतो.  सूर्यासमोर असलेल्या सर्व वस्तूंवरून सूर्यप्रकाशाचे परिवर्तन होते.  पण काही वस्तू विशेष असतात. त्यात सूर्याचे स्पष्ट प्रतिबिंब पडलेले दिसते, उदाहरणार्थ आरसा, चकचकीत धातूचा तुकडा अथवा पाण्याचे डबके यात सूर्याचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. वस्तूंवरून परावर्तित होणारा प्रकाश परत अन्य वस्तूंवर पडून तेथूनही परावर्तित होतो.

आपल्या मनात या साक्षी चैतन्याचे आरशासारखेच स्पष्ट प्रतिबिंब पडलेले असते. मनाच्या आरशात साक्षी चैतन्याचे प्रतिबिंब उमटल्यावर मनाचे द्विभाजन होते. एक भाग हा अहंकार अथवा 'मी'त्वाची भावना बनून येतो तर बाकी मन बुद्धी, चित्त इत्यादी रूपात राहातो. अहंकार हा साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबाशी एकरूप होतो. हा अहंकार साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबातून परावर्तित होणारे चैतन्य प्रथम आपल्या ज्ञानेंद्रियांमध्ये पसरवितो. तेथून ते स्थूल शरीरात पसरते आणि आपल्याला आपले शरीर चैतन्यमय असल्याचे जाणवते. हा परावर्तित चैतन्यासह असलेला अहंकार आपल्या शरीराच्या मर्यादेपर्यंत पसरत असल्याने आपल्याला आपण म्हणजे आपले शरीर-मन  असे भासते. आपला अहंकार हा चैतन्याचा मोठा स्रोत भासतो ते यामुळेच.

या परावर्तित चैतन्याशी एकरूप होऊन चैतन्याचे आपल्या शरीरात प्रसारण करणाऱ्या अहंकाराला या ग्रंथात तप्त लाल-पिवळ्या लोहगोलाची उपमा दिलेली आहे. भट्टीतून काढलेला तप्त लोहगोल प्रकाश फेकत असतो. लोहगोलाचे लोखंड, आकार गोळ्याचेच असले तरी त्याची उष्णता, परावर्तित होणार प्रकाश हा गुणधर्म त्याचा स्वत:चा नसतो, तो त्याने आगीतून 'उधार' घेतलेला असतो. ही उष्णता, प्रकाश आगीचा अंगभूत गुणधर्म आहे. वजन, आकार हा त्या लोहगोलांचा अंगभूत गुणधर्म आहे. प्रकाश हा त्या गोळ्याने आगीपासून उधार घेतलेला आहे. म्हणजेच त्या तप्त गोळ्याचे काही गुणधर्म अंगभूत आहेत तर काही उधार आहेत. (या तप्त लोहगोलाचे अंगभूत गुणधर्म आणि उधार गुणधर्म वेगळे ओळखणे हाच 'विवेक' आहे). तसेच अहंकाराचा चैतन्य हा अंगभूत गुणधर्म नाही, त्याने तो साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबाकडून उधार घेतला आहे. साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबाचाही तो अंगभूत गुणधर्म नाही. त्याने तो साक्षी चैतन्याकडून उधार घेतला आहे. साक्षी चैतन्याचा मात्र तो अंगभूत गुणधर्म आहे.

मनात पडलेल्या साक्षी चैतन्याच्या स्पष्ट प्रतिबिंबालाच आपले मन आपला चैतन्यदायी आत्मा समजते. खरेतर या चैतन्याचा उगमस्रोत साक्षी चैतन्य आहे. रात्री आकाशात चंद्र असतो. चंद्र परप्रकाशी आहे. पण चंद्राच्या प्रकाशात पौर्णिमेला आपल्याला आसपासचे दिसू शकते. हा प्रकाश चंद्राचा नसतो, तर चंद्रावरून परावर्तित होणारा सूर्याचा प्रकाश असतो. तसेच या परावर्तित चैतन्याने मन-शरीर उजळून निघते. शरीराचे हे चैतन्य परावर्तित आहे, उधार आहे. म्हणूनच मृत्यूनंतर शरीरातील चैतन्य नाश पावते.

आपण म्हणजे साक्षी चैतन्य आहोत. जसा सूर्य कायम तळपत असतो, तसेच हे साक्षी चैतन्य कायम तळपत असते, कायम स्वच्छ असते, निरंजन असते. आरशावर मळ साठला की सूर्याचे प्रतिबिंब अस्पष्ट दिसू लागते. तसेच आपल्या मनावर मळभ आल्यास चैतन्यावरच मळभ आले आहे असे भासते. आपण दु:खी होतो. खरे तर आपण (साक्षी चैतन्य) कायम निरंजनच असतो, पण मनाच्या आरसा आपण सुखी आहोत, दु:खी आहोत, त्रासलेले आहोत अशी भावना निर्माण करतो. हा मनाचा आरसा उलटा ठेवला की साक्षी चैतन्याचे प्रतिबिंब उमटत नाही. मग आपल्यातले चैतन्य हरवते. प्रगाढ निद्रेत (सुषुप्तावस्थेत) मनाचे व्यवहार थांबल्याने चैतन्य हरवल्यासारखे भासते (पण साक्षी चैतन्य तसेच असल्याने झोप गाढ लागली होती याची उठल्यावर जाणीव होते).
सूर्य एकच असतो, पण अनेक आरशात त्याचे वेगळे प्रतिबिंब दिसते. तसेच आपण सर्वात चैतन्य एकाच साक्षी चैतन्य आहे, पण प्रत्येकाच्या मनाचा आरसा वेगळा असतो. त्यामुळे आपल्याला आपला आत्मा अन्य आत्म्यांपासून वेगळा भासतो. 

Saturday, May 18, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग 3

'दृक्-दृश्य विवेक' या अद्वैत वेदान्ताच्या प्रकरण ग्रंथाचे (Introductory Text) आपण विवेचन करीत आहोत.

दृश्य आणि द्रष्टा यातील संबंधांबाबत आपण मागच्या भागात पहिले. दृश्य आणि द्रष्टा हे नेहमीच भिन्न असतात हे प्राथमिक गृहीतक समोर ठेऊन आपण या ग्रंथाचा अभ्यास करत आहोत.

'अहम् ब्रह्मास्मि ।' हे उपनिषदांतील एक ब्रह्मवाक्य आहे याची आपणास कल्पना आहेच. मी 'ब्रह्म' आहे हे वेदांत उच्चारवाने सांगते. पण आपला सामान्य अनुभव तसा नाही. आपली स्वत:बद्दलची कल्पना आपले शरीर अथवा आपले मन यापुरती सीमित केलेली असते. म्हणूनच  आपण म्हणजे ब्रह्मच आहोत हे दाखवून देणे हे कोठल्याही वेदान्ताच्या शाखेपुढील पहिले आव्हान असते. आपण म्हणजे ब्रह्म आहोत हे दाखविण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला गेला आहे. 'दृक्-दृश्य विवेक' या ग्रंथात त्यातील एक दिशा पकडलेली आहे.
दृश्य आणि ते बघणारा द्रष्टा, एखादा अनुभव आणि तो अनुभवणारा हे दोन वेगळे असतात हे आपण सर्वच जाणतो. या आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आपण आपले शरीर आणि मन यापासून वेगळे असल्याचे हा ग्रंथ दाखवितो.  आपले डोळे (अथवा ज्ञानेंद्रिये) एखादी गोष्ट बघतात. म्हणजे आपले डोळे त्या वस्तूपासून वेगळे आहेत. या डोळ्यांची जाणीव आपल्याला मनाद्वारे होते. म्हणजेच डोळे आणि मन हे वेगळे आहेत. मनाची जाणीव आपल्याला होते. म्हणजे आपण आणि मन वेगळे आहेत. हा मनाची जाणीव असणारा द्रष्टा अथवा साक्षी चैतन्य म्हणजेच आपण आहोत.
पण आपला नेहमीचा अनुभव काही वेगळे सांगतो. समोरील वस्तू म्हणजे आपण आहोत असे आपल्याला कधीच वाटत नाही, परंतु शरीराचा अवयव आपला वाटतो, आपले शरीर आपल्याशी घट्ट निगडित असते. मी उंच आहे, बुटका आहे, सुंदर आहे, गोरा आहे इत्यादी गोष्टी आपल्या शरीराशी निगडित आहेत. परंतु आपण त्या आपल्याशी निगडित केलेल्या आहेत. याचे एक कारण आहे. शरीराला इजा पोचल्यास तेथे वेदना जाणवते. आपल्या शरीरात आपल्याला चैतन्य जाणवते. इतकेच नाही तर माझी ज्ञानेंद्रिये ही चैतन्याच्या प्रवाहाने पुलकित झालेली असतात. माझया मनात येणारे विचार हे चैतन्याचाच अविष्कार असतात. त्यामुळे साहजिकच माझे शरीर/मन  हा माझाच एक भाग असल्याचा अथवा मी म्हणजेच शरीर/मन असल्याचा माझा समज पक्का होतो. (अन्य माणसे, प्राणी यांच्यातही चैतन्य असल्याचा मी निष्कर्ष काढू शकत असलो तरी त्यांच्यातील चैतन्य मला प्रत्यक्ष जाणवत नाही). जर आपण म्हणजे साक्षी चैतन्य आहोत, शरीर/मनापेक्षा वेगळे आहोत, तर हे चैतन्य आपल्या शरीरात/मनात येते कुठून याचा शोध आपण पुढील भागात घेऊ.

Saturday, May 11, 2019

'दृक्-दृश्य विवेक' भाग २

 दृश्य आणि द्रष्टा यातील संबंधांबाबत आपण मागच्या भागात पहिले. दृश्य आणि द्रष्टा हे नेहमीच भिन्न असतात हे प्राथमिक गृहीतक समोर ठेऊन आपण या ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत.
आपण डोळ्यांनी अनेक वस्तू पाहतो. म्हणजे या वस्तू 'दृश्य' आहेत तर डोळे ते दृश्य पाहणारे 'द्रष्टा' आहेत. म्हणूनच ते भिन्न आहेत. आपण कानांनी अनेक आवाज ऐकतो. हे आवाज 'दृश्य' आहेत तर कां हे या ठिकाणी 'द्रष्टा' आहेत. असेच सर्व ज्ञानेंद्रियांसंबंधी सांगता येईल.
आपण आपल्या मनाने डोळे अनुभवू शकतो, डोळे कधी मिटलेले असतात, कधी उघडे असतात, डोळ्यांना कधी काही खुपते ते मनाला कळते. म्हणजेच येथे डोळे दृश्य आहेत तर मन दृष्टया आहे. म्हणजेच डोळे आणि मन हे वेगळे आहेत. तसेच इतर सर्व ज्ञानेंद्रिये दृश्य आहेत तर मन द्रष्टा आहे. म्हणूनच सर्व ज्ञानेंद्रिये मनापेक्षा वेगळी आहेत.
आपलय मनात अनेक विचार येत असतात, कधी आपण आनंदी असतो तर कधी खिन्न. मनाचे हे विकार आपण अनुभवतो. म्हणजेच मन हे येथे दृश्य बनते तर आपण स्वत: द्रष्टा. म्हणजेच आपण मनापासून भिन्न असा एक द्रष्टा आहोत. ही साखळी येथेच थांबते. आपण शरीराचे अवयव नाही, मन नाही, तर या पलीकडे आपण एक द्रष्टा आहोत आणि हीच आपली खरी ओळख आहे. हाच अंतिम द्रष्टा 'चैत्यन्य' स्वरूपात प्रकट होतो. त्याला आपण पुढील विवेचनात 'चैतन्य' म्हणूया.
याच चैतन्याची ओळख करून घेण्याचा अद्वैत वेदांताचा प्रयत्न आहे. पण हे चैतन्य सर्व ज्ञानाच्या परिघाच्या पलीकडे आहे असे हा ग्रंथ प्रतिपादन करतो. मग या चैतन्याचे  ज्ञान कधीच होऊ शकणार नाही काय? तसेही नाही. आपल्या प्रत्येक कृतीतून हे चैतन्य प्रतीत होत असतो. कसे ओळखायचे हे चैतन्य?
आपण डोळ्यांनी बघतो. या प्रक्रियेत आपण बघतो त्या वस्तू असल्याची आपल्याला जाणीव होतेच, पण बघणारे डोळेही आहेत याचीही जाणीव होते. आपल्या मनात विचारांचे तरंग उमटतात तेव्हा आपले मन असल्याची जाणीव होतेच, परंतु मनाला बघणारा द्रष्टा.. चैतन्य त्यामागे उभे असल्याचीही जाणीव होते. आपल्या प्रत्येक अनुभवातून हाच साक्षी, हेच चैतन्य प्रकट होत असते. अमर्याद चैतन्याच्या प्रकटीकरणाच्या अनुभवासाठी कोठे देवळात जाण्याची गरज नाही, समाधिस्त होण्याचीही गरज नाही. प्रत्येक क्षणी ते प्रकट होत असते. सामान्य माणसाला कोठल्याही साधनेशिवाय प्रतीत होणारी ही घटना आहे.
आपण म्हणजे देह नाही, मन नाही. या सर्वांपाठीमागे या सर्वांचे साक्षी असलेले चैतन्य आहे तीच आपली ओळख आहे.