Tuesday, June 18, 2019

शोध सुश्रुताचा - भाग ५

ऑगस्टस फ्रेडेरिक रुडॉल्फ हर्न्ले (Hoernle) - आपल्यापैकी किती जणांनी ऐकलय हे नाव? माझी खात्री आहे की बहुतेकांनी नाही.
हर्न्लेचा जन्म सन १८४१ चा. उत्तर भारतातल्या आग्र्यात एका प्रोटेस्टन्ट जर्मन मिशनऱ्याच्या घरात. त्या वेळेच्या प्रथेनुसार वयाच्या ७ व्या वर्षी हर्न्लेला शिक्षणासाठी युरोपमध्ये पाठविण्यात आले. ह्याचे शालेय शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये झाले. त्याला संस्कृत भाषेत विशेष रस होता म्हणून त्यानंतर पुढे तो लंडनमध्ये त्यावेळेचा संस्कृत भाषेचा पंडित थिओडोर गोल्डस्टूकर (हा पण जर्मन होता!) ह्याच्याकडे संस्कृत शिकायला गेला. संस्कृतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर हर्न्ले १८६५ मध्ये भारतात परत आला. बनारस हिंदू विश्वविद्यालयातील क्वीन्स कॉलेजात संस्कृतचा प्रोफेसर म्हणून ह्याने आपली कारकीर्द सुरु केली. बनारसमध्ये हिंदू धर्मसुधारक आणि धर्मशास्त्रपारंगत दयानंद सरस्वतींचा हर्न्ले चांगला मित्र बनला. दयानंद सरस्वतींवर एक पुस्तकही त्याने लिहिले होते. बनारसला अनेक वर्षे राहून हर्न्ले नंतर १८८५ च्या सुमारास कलकत्ता विश्वविद्यालयात नोकरी करायला गेला.
मागील लेखात आपण पाहिले की हॅमिल्टन बॉवरने ती हस्तलिखित पोथी कलकत्त्यात एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालला सुपूर्द केली. बॉवरने आणलेले म्हणून ह्या हस्तलिखिताचे नामकरण झाले 'बॉवर मॅन्युस्क्रीप्टस'. हर्न्ले त्यावेळी कलकत्त्याला होता. संस्कृतबरोबर मध्य आशियात बोलली जाणारी खोतानी भाषादेखील हर्न्लेला अवगत होती. त्यामुळे ते हस्तलिखित साहजिकपणे त्याच्याकडे भाषांतरासाठी सोपविण्यात आले. हे वर्ष होते सन १८९१.
हर्न्लेने ह्या बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचा अभ्यास सुरु केला. सर्वात प्रथम अडचण होती भाषेची. त्या हस्तलिखिताची भाषा संस्कृतसम होती पण संस्कृत नव्हती. लिपीपण नेहमीपेक्षा वेगळी होती. भाषा अगम्य आणि लिपी अगम्य! भाषा वेगळी आणि लिपी वेगळी - असे कसे शक्य आहे? उदाहरण देतो: 'एक्झाम्पल' - इंग्रजीत हा शब्द 'Example' असा लिहिता आला असता पण हा इंग्रजी 'भाषे'तला शब्द मी देवनागरी 'लिपी'त लिहिलाय. हर्न्लेची समस्या नक्की समजण्यासाठी हेच उदाहरण आपण पुढे नेऊया. समजा मी देवनागरीत लिहिले 'बाएश्पीएल' आणि सांगितलं की इंग्रजीत भाषांतर करा - तर तुम्हाला काय समजेल? तुम्हाला मराठीत वाचता येतंय पण अर्थ लागत नाही - मग काय करणार तुम्ही ह्याचे भाषांतर? जोपर्यंत तुम्हाला हे माहित नाहीये की मी देवनागरी लिपीतून जर्मन भाषेत हा शब्द लिहिलाय तोपर्यंत तुम्ही त्याचे भाषांतर करूच शकणार नाही. आणि ह्यासाठी मराठी (लिपी), जर्मन (भाषा) आणि इंग्रजी (भाषांतर भाषा) ह्या तिन्ही भाषा जाणणारा माणूस लागेल. (जाता जाता सांगतो 'बाएश्पीएल' म्हणजे जर्मनमध्ये 'उदाहरण' आणि इंग्रजीत 'Example'). नेमका असाच प्रश्न हर्न्लेला पडला होता आणि त्या वेळेला इंटरनेट अथवा गुगल वगैरे काही नसल्याने हाताशी असेल तेवढेच संदर्भ वापरून त्याला त्या हस्तलिखितांचे भाषांतर करायचे होते. त्यात अजून ती हस्तलिखिते लिहिलेली होती बर्च झाडाच्या पानांवर. बरेचसे भाग पुसट झालेले होते - काही भाग वाचण्याच्या परिस्थितीत नव्हते हापण एक त्रास होताच. हर्न्लेला अनेक जुने संदर्भग्रंथ अभ्यासावे लागले. त्याला तेव्हा कळाले की ती लिपी 'गुप्त ब्रह्मी' लिपी होती. भारतात गुप्त साम्राज्याच्या काळात (ई स २४० ते ई स ५५०) ही लिपी संस्कृत आणि तत्सम भाषा लिहिण्यासाठी वापरली जात असे. त्या हस्तलिखिताची लिपी जरी 'गुप्त ब्रह्मी' लिपी असली तरी भाषा नक्की कोणती होती ते हर्न्लेला नीट समजत नव्हते. पण त्याला ही माहिती मिळाली की बौद्ध धर्माचे बरेचसे साहित्य ब्रह्मी लिपीत आहे आणि ह्यासाठी त्याने बौद्ध धर्माचा अभ्यास सुरु केला.
असं मानतात की ई स पूर्व चौथ्या शतकात पाणिनीने वैदिक भाषेवरून संस्कृत भाषेचे नियम निश्चित केले. संस्कृत ह्या शब्दाचा अर्थच मुळी 'संपूर्णपणे बनलेली' / 'नियमांनी बांधलेली' असा होतो. गौतम बुद्धाचा काल पाणिनीच्याच आसपासचा मानतात. पण त्या काळी संस्कृत भाषा उच्चवर्णीयांची आणि कर्मकांडाची भाषा झाल्याने बुद्धाने त्याचे तत्त्वज्ञान सामान्यांच्या ब्रह्मी आणि पाली भाषांत सांगितले. पण काही वर्षांनंतर संस्कृत हीच सामान्यांची मुख्य प्रचलित भाषा बनली आणि त्यामुळे त्यावरून बौद्ध भिक्षूंनी त्यांची स्वतःची अशी संस्कृतोद्भव संकरीत भाषा बनवली. हे बॉवर मॅन्युस्क्रीप्टस ह्या संस्कृतोद्भव संकरीत भाषेत पण 'गुप्त ब्रह्मी' लिपीत लिहिलेले होते. चार वर्षे - होय - चार वर्षे अथक परिश्रम करून हर्न्लेने शेवटी शोधून काढले की ती लिपी आणि भाषा नेमकी कोणती होती! फक्त कल्पना करा चार वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जेव्हा हर्न्लेला ह्याचा शोध लागला असेल तेव्हा त्याला किती अफाट आनंद झाला असेल! त्यानंतर पुढे बारा वर्षे बसून हर्न्लेने ते बॉवर मॅन्युस्क्रीप्टस इंग्रजीत भाषांतरित केले आणि त्याचे थोडे थोडे भाग दर दोन तीन वर्षांनी प्रकाशित केले. आयुष्यातली एकूण अठरा ते वीस वर्षे हर्न्लेने बॉवर मॅन्युस्क्रीप्टसवर खर्च केली.
हर्न्लेने हे पण सिद्ध केले की ती हस्तलिखिते ई स ६०० च्या आसपासच्या काळातली आहेत. त्या वेळेपर्यंत भारतात सापडलेली सर्वात जुनी कागदपत्रे हीच होती. लंडनमध्ये अनेक वर्तमानपत्रांत ह्याच्या बातम्या आल्या. (सध्याचे कार्बन डेटिंग तंत्र वापरून हे सिद्ध झाले आहे की ती हस्तलिखिते ई स ६५० च्या आसपासचीच आहेत. म्हणजे त्याचा अंदाज बरोबरच होता!) त्यामध्ये एकूण ७ खंड होते - २ ज्योतिषविषयक खंड होते, २ बौद्ध रीतीरिवाजविषयक खंड होते, आणि ३ पुरातन वैद्यकीय विषयक. दुर्दैवाने हे वैद्यकीय खंड अपूर्ण होते. जर ते का पूर्ण असते तर संपूर्ण जगातले सर्वात प्राचीन आणि सर्वसंपूर्ण असे ठरले असते. ह्या अपूर्ण खंडांमध्येपण भरपूर वैद्यकीय ज्ञान भरलेले होते - इतके की हर्न्लेच्या ह्या वैद्यकीय खंडांच्या भाषांतरांची दखल चक्क जून १८९५ च्या ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये पण "The Most Ancient Sanskrit Medical Treatise Extant" ह्या मथळयाने घेतली गेली. त्यातल्या भारतीय वैद्यकीय ज्ञानाने त्यांच्या इतकं 'पोटात दुखलं' की ह्या लेखाचा शेवट असा केला आहे - "No doubt many of the articles of the Hindu materia medica are of important therapeutic character and might with advantage be tested in hospitals; but a collection of complex farragos prescribed according to a fanciful and erroneous pathology is practically useless."
असं नक्की काय होतं त्या वैद्यकीय खंडांमध्ये? सुश्रुताचा आणि त्याच्या प्लॅस्टीक सर्जरीच्या पध्दतींचा ह्यात काही संदर्भ मिळाला का? १७९४ मध्ये पुण्यात त्या कुंभाराने वापरलेली पध्दत त्यात सांगितलेली होती का? पाहूया पुढच्या आणि शेवटच्या भागात!
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut

Thursday, June 13, 2019

दृक्-दृश्य विवेक : समारोप

आपण गेला एक महिन्याहून अधिक काळ 'दृक्-दृश्य विवेक' या ग्रंथाचे परिशीलन करीत आहोत. 'अद्वैत वेदांत' दर्शनाचा हा एक प्रकरण ग्रंथ (Introductory Text) म्हणून मानला जातो. याचे कर्ते कोण आहेत ते स्पष्ट नाही. परंतु आद्य शंकराचार्य अथवा विद्यारण्यस्वामी असावेत.
दोन सारख्या दिसणाऱ्या गोष्टी एकत्र केल्या असता त्या वेगळ्या ओळखण्याची क्षमता म्हणजे विवेक. आपल्याला दिसणारे दृश्य आणि ते पाहणारा द्रष्टा हा वेगळा ओळखणे या 'विवेकापासून' ग्रंथाची सुरुवात होते. हा ग्रंथ आपणाला आपले खरे स्वरूप म्हणजे ब्रह्म अथवा साक्षी चैतन्य आहे हे स्पष्टपणे दाखवून देतो.
त्यानंतर हा ग्रंथ 'माया' म्हणजे काय हे सांगतो. 'विक्षेप' आणि 'आवरण' शक्ती या मायेच्या शक्ती आहेत. माया स्वत: ब्रह्माची शक्ती आहे. 'सत्-चित-आनन्द' स्वरूपात असलेल्या विश्वरूपी ब्रह्मावर माया 'नाम-रूपाचे' आवरण घालते. तरीही  'सत्-चित-आनन्द' हे ब्रह्माचे स्वरूप त्यातून डोकावत असते. या ' 'सत्-चित-आनन्द' स्वरूपाला 'नाम-रुपापासून' वेगळे ओळखणे हा विवेक.
आपली विवेकशक्ती जागरूक करून ब्रह्माला कसे ओळखायचे हे हा ग्रंथ शेवटी सांगतो.

या लेखमालेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अजून निवडणुकांचा धुराळा खाली बसलेला नाही हे ही एक कारण असेल. तरीही दहा-बारा मित्रांचा प्रतिसाद मिळत होता. या क्लिष्ट विषयासाठी दहा-बारा जणांचा प्रतिसादही महत्वाचा आहे.

आपल्यापैकी प्रत्येकजण पूर्वजन्मातील साधनेमुळेअध्यात्माच्या एका टप्प्यावर आलेला आहे.  आपल्याला त्याची जाणीव  नसते इतकेच. आपल्याला या मालिकेमुळे कदाचित त्याची जाणीव झाली आणि आपण अध्यात्माच्या मार्गात प्रगती करू लागलात तर या लेखमालेचा खरा उपयोग होईल. न जाणो, कोणी याच जन्मात ब्रह्मज्ञानी होईल.

आपले प्राचीन तत्वज्ञान काय आहे हे कळले तर जगात वावरताना आपली कुचंबणा होत नाही. मी परदेशात वावरताना अनेक परदेशी लोकांना आपल्या तत्वज्ञानाबद्दल कुतुहूल असल्याचे जाणवले. आपल्यालाच या संबंधी काही माहित नाही असे जाणवल्यास त्यांना आश्चर्य वाटते. म्हणून आपल्याला यासंबंधी किमान माहिती असावी या हेतूने ही मालिका लिहिली. वाचकांना अधिक माहिती हवी असल्यास स्वामी सर्वप्रियानंद यांची युट्यूबवर असलेली अमेरिकेत दिलेली प्रवचने ऐकावीत.

आता मी 'अपरोक्षानुभूती' या आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या अद्वैत वेदान्तावरील प्रकरणग्रंथाचा अभ्यास सुरु केला आहे. हा ग्रंथ मोठा असून अधिक खोलात जाणारा आहे.  त्याचा अभ्यास झाला की मी त्यावर लिहिता होईन.

धन्यवाद !

Tuesday, June 11, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग १०

मागील काही भागात आपण आपले खरे स्वरूप 'साक्षी चैतन्य' आहे हे पहिले. साक्षी चैतन्याची प्रतिमा आपल्या मनावर उमटते. त्यामुळे मनाचे दोन भाग होतात. एक भाग अहंकार तर दुसरा बाकी बुद्धी, चित्त इत्यादी. आपला अहंकार या साक्षी चैतन्याच्या प्रतिमेशी एकरूप होतो आणि शरीरभर पसरतो. म्हणूनच आपल्याला शरीर चैतन्यमय भासते. अहंकाराशी एकरूप झालेली साक्षी चैतन्याची प्रतिमा आपल्याला चैतन्याचा मूळ स्रोत भासते. तिलाच आपण आपला आत्मा समजतो. खरे तर आपण साक्षी चैतन्य आहोत. हे साक्षी चैतन्य सर्व जीवांसाठी एकाच असल्याने 'सर्वांभूती एकच ब्रह्म' आहे असे अद्वैत वेदांत प्रतिपादन करते.
आपण स्वत: साक्षी चैतन्य असल्याने 'मुक्ती'ची संकल्पना अद्वैत वेदांतला मान्य नाही. आपण सदा सर्वकाळ मुक्तच असतो असे अद्वैत वेदांत मानते. स्वत:ला आपल्या अहंकाराशी एकरूप झालेली साक्षी चैतन्याची प्रतिमा मानल्याने आपल्याला आपण बद्ध झाल्यासारखे वाटते. हा एकरूप झालेला अहंकार आपल्या शरीराच्या मर्यादेपर्यंत पसरत असल्याने शरीर हे आपल्याला आपली मर्यादा वाटते. मुक्ती मिळवायचीच असेल तर आपल्या स्वत:बद्दलच्या या भ्रामक कल्पनेपासून मुक्ती मिळवली पाहिजे. अद्वैत वेदांताची ही मुक्तीची संकल्पना 'अष्टावक्र गीता' या ग्रंथात अत्यंत चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेली आहे.
आपण आपल्या साक्षी चैतन्याच्या प्रतिमेशी एकरूप झालेल्या अहंकारालाच 'आपण स्वत:' असे मानत असतो.    हे अज्ञान दूर करण्यासाठी अद्वैत वेदांत 'ज्ञानमार्गाचा अवलंब करावा' असे सुचविते. म्हणजे प्रत्येक क्षणी आपल्याला येत असलेला अनुभव नक्की कोणाला येत आहे, ज्ञानेंद्रियांना की त्यापाठच्या मनाला की त्यापाठच्या साक्षी चैतन्याला याबद्दल सजग राहावे. यातूनच आपल्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान होईल असे अद्वैत वेदांत सुचविते.
मायेची ओळख पटविण्यासाठी वेदांत हाच मार्ग सांगते. आपण आसपासच्या विश्वाची आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत माहिती मिळविताना सतत सजग राहून त्यातील सत्-चित-आनन्द स्वरूपाला वेगळे ओळखण्यास शिकलो तर मायेचे आवरण दूर होईल.
अर्थात हा मार्ग सोपा नाही. यासाठी अत्यंत स्थिर मनाची आवश्यकता आहे. माझ्या मते या अवस्थेपर्यंत येण्यासाठी कोठल्यातरी साधनेची आवश्यकता आहे. अद्वैत वेदांत अशा साधनेच्या विरोधात नाही. एखादा साधक पूर्वजन्मातील साधनेमुळे आधीच या अवस्थेपर्यंत आलेला असू शकतो. बाकी साधकांना साधनेची आवश्यकता भासते. कोठली साधना साधकाला अशा अवस्थेपर्यंत आणण्यास मदत करेल हे त्या त्या साधकाने पूर्वायुष्यात कोणती साधना केली आहे यावर अवलंबून असेल. ते ज्याने त्यानेच शोधून काढायचे आहे. मनावर बालपणी कोठल्याही 'संस्कारांचे लेप' लागले नसतील तर अंत:प्रेरणेने हा मार्ग लवकर सापडू शकतो. अन्यथा हे लेप खरवडून काढावे लागतात. म्हणूनच हा मार्ग शोधून काढण्याचा प्रवास खडतर आहे. बुद्धाला ते शोधण्यास सहा वर्षे खडतर तपश्चर्या करावी लागली. पण हा मार्ग सापडला की अध्यात्माचा प्रवास झपाट्याने आणि सुखकर होतो. आपल्यात अद्वैत वेदान्तातील 'ज्ञानमार्गाने' जाण्याची क्षमता निर्माण होते.
पुढील लेख या लेखमालेतील शेवटचा लेख असेल. या लेखमालेतील विचारांचे थोडक्यात सार आपण त्या लेखात पाहू.

Monday, June 10, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग ९

मागील लेखात आपण मायेच्या अंगी असेलेली 'विक्षेप शक्ती' आणि 'आवरण शक्ती' यांची माहिती घेतली. माया ही स्वत: ब्रह्माची शक्ती असून तिच्यात या दोन शक्ती अंतर्भूत असतात. यातील विक्षेप शक्तीमुळे फारसे बिघडत नाही, परंतु आवरण शक्तीमुळे ब्रह्माची ओळख पटविणे कठीण होते.

आपल्या सभोवालच्या विश्वाने त्याचे अस्तित्व ब्रह्माकडून घेतलेले आहे. जसे टेबलाचे अस्तित्व त्याने लाकडातून घेतलेले आहे, दागिन्यांचे अस्तित्व सोन्याकडून घेतलेले आहे तसेच हे आहे. जर टेबलातील लाकूड काढले तर टेबल उरणार नाही, दागिन्यांमधील सोने काढले तर दागिना उरणार नाही. तसेच आपले अस्तित्व काढून घेतले तर काहीच उरणार नाही. आपले सूक्ष्म शरीर ब्रह्माकडून अस्तित्व घेते, पण त्या बरोबर ते चैतन्यही घेते.

ब्रह्माचा 'सत्' (अस्तित्व) हा गुण सर्व विश्वात आपल्याला दिसतो. 'चित्' हा गुण आपल्याला सर्व प्राणिमात्रांच्या सूक्ष्मदेहात दिसतो. हे चैतन्य विश्वात सर्वत्र भरून राहिले आहे. परंतु आपल्या मनातून त्याचे पुनःप्रक्षेपण होते. हे पुनर्प्रक्षेपीत चैतन्य आपल्या शरीराच्या रोमारोमात पसरते. आपली ज्ञानेंद्रिये या चैतन्याने चैतन्यमय होतात. त्यामुळे आपले पुनः क्षेपित चैतन्य  'प्रमाता' (Knoewer) आहे हे आपल्याला जाणवते. आपल्याशिवाय अन्य गोष्टींचे आपल्याला ज्ञान होते, विश्व आपल्यासाठी 'प्रमेय' (Known) बनते. विश्व आपल्यासाठी ज्ञानेंद्रियांना जाणवणारे 'रूप आणि नाम' यांचे बनलेले दिसते. हे मायेने घातलेले 'रूप आणि नाम' रूपी आवरणामुळे आपल्याला सहजासहजी त्यातील अस्तित्वाचा गुण दिसत नाही, ब्रह्म दिसत नाही. साक्षी चैतन्याचे मनात पडलेले प्रतिबिंब 'प्रमाता' म्हणून जाणवत असल्याने त्यालाच आपण 'मी' समजतो आणि आपले मूळ स्वरूप जे ब्रह्म अथवा साक्षी चैतन्याचा आपल्याला सहजासहजी बोध होत नाही. म्हणजेच आपले सूक्ष्म शरीर आणि ब्रह्म यांच्यातील जो फरक आहे त्यावर माया आवरण टाकते.

यात एक महत्वाची गोष्ट  अशी आहे की ब्रह्माला माया कधीही झाकू शकत नाही, त्यावर आवरण घालू शकत नाही. ब्रह्म हे सतत तळपत असते. मात्र आपल्याला ब्रह्म आणि आपले मन यातील फरक कळत नाही. मायेच्या आवरणामुळे आपल्याला या विश्वात असलेल्या अस्तित्वरूपी ब्रह्म आपण सहज ओळखू शकत नाही.   काळोखात पडलेल्या दोराला आपण साप समजतो तेव्हा तो दोर झाकलेला नसतो. पण दोर आणि साप यातील फरक झाकलेला असतो. सापाची आकृती, लांबी इत्यादी त्या दोराचा गुणधर्म असते. मात्र सापाचे विष, त्याचा जिवंतपणा हे मायेने निर्माण केलेले असते.

पुढील लेखात आपण मायेचे आवरण दूर करून ब्रह्माला असे बघायचे हे पाहू. 

Saturday, June 8, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग ८

मागील काही लेखात आपण आपले खरे स्वरूप 'साक्षी चैतन्य' अथवा 'ब्रह्म' आहे हे पहिले. या लेखात आपण 'माया' या संकल्पनेसंबंधी अधिक जाणून घेऊ. 
ब्रह्म हे सत्-चित्-आनन्द या स्वरूपात व्यक्त होते.  'सत्' म्हणजे अस्तित्व हा ब्रह्माचा अथवा साक्षी चैतन्याचा अंगभूत गुणधर्म आहे हे आपण मागील लेखात पहिले. हा साक्षी चैतन्याचा अंगभूत गुणधर्म त्याच्या प्रतिबिंबात उधार (aquired) गुणधर्म म्हणून दिसतो. साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबाशी आपला अहंकार एकरूप होतो. अहंकार आपल्या शरीराच्या सर्व भागात पसरतो. आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत 'सत्' हा उधार गुणधर्म आपल्या आसपासच्या विश्वात पसरतो. ' चित्' म्हणजे चैतन्य हा ही साक्षी चैतन्याचा अंगभूत गुण आहे हे ही आपण पहिले. 'आनंद' हा ही साक्षी चैतन्याचा अंगभूत गुण आहे. आनंद हा साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबातून आपल्या मनात सतत पाझरत असतो. मनावर मळभ आल्याने कधी कधी जाणवत नाही.
जर ब्रह्म (साक्षी चैतन्य)  सर्वकाही असेल तर हे शरीर, हे विश्व कोठून आले हा प्रश्न पडणे  सहाजिक आहे. ब्रह्म हे सत्-चित्-आनन्द या स्वरूपात व्यक्त होते. आपले शरीर, मन , विश्व हे 'माया' आहे असे वेदांत सांगते.
ब्रह्माची संकल्पना समजून घेण्यास सोपी आहे.  'माया' ही संकल्पना तेवढी सोपी नाही.
माया ही ब्रह्माची एक शक्ती आहे. ही शक्ती ब्रह्माला विश्वरूपात आपल्यापुढे ठेवते. देवाने हे विश्व निर्माण केले असे जगातील बहुसंख्य धर्म मानतात. पण अद्वैत वेदान्ताच्या मते देवाने (ब्रह्माने) हे विश्व निर्माण केलेले नाही, मायेच्या शक्तीमुळे ब्रह्मच विश्व रूपात आपल्यासमोर प्रकट झाले आहे. माया ही या ब्रह्माचीच शक्ती आहे. ती ब्रह्मापासून वेगळी नाही.
माया ही ब्रह्माची एक शक्ती आहे. पण खरेतर तिच्यात दोन शक्ती अंतर्भूत आहेत.
  1. विक्षेपशक्ती : माया आपले शरीर, मन, विश्व यांचा विक्षेप करते, Project करते.
  2. आवरणशक्ती : आपण (आणि विश्व) ब्रह्म असल्याच्या वस्तुस्थितीवर माया आवरण घालते.

अद्वैत वेदांतात रज्जू-सर्प उदाहरण नेहमी देतात. अंधाऱ्या कोपऱ्यात एक दोर (रज्जू) पडलेला आहे. पण अंधारामुळे आपल्याला तो 'साप' वाटतो. आपण घाबरतो. दोर असल्याच्या वस्तुस्थितीवर माया पांघरूण  घालते. ही झाली आवरणशक्ती. तो दोर आपल्याला सापासारखा वाटतो. ही झाली विक्षेपशक्ती.
यातही आवरणशक्ती संपूर्ण वस्तुस्थितीवर आवरण घालू शकत नाही. आपल्याला भासणाऱ्या सापाचा आकार, लांबी ही प्रत्यक्षातील दोराची लांबी आणि आकार असतो. मात्र तो साप, त्याचे विषारी दात वगैरे माया आपल्यापुढे ठेवते.
ज्यावेळी माया ब्रह्माला आपल्यापुढे विश्व स्वरूपात उभे करते त्यावेळी ब्रह्माला संपूर्ण  आवरण घालू शकत नाही. ब्रह्माचे  सत्-चित्-आनन्द हे स्वरूप त्यातून डोकावतच असते. या सत्-चित्-आनन्द स्वरूपाला माया 'रूप आणि नामाची' जोड देते. सत्-चित्-आनन्द-रूप-नाम अशा स्वरूपात असलेल्या विश्वातील सत्-चित्-आनन्द स्वरूप आपण ओळखू शकलो तर आपल्याला येथे या क्षणी मायेच्या आवरणाखाली दडलेल्या ब्रह्माचे दर्शन होईल.
अद्वैत वेदांतानुसार विक्षेप शक्ती आपल्या ब्रह्मज्ञानात अडथळा ठरत नाही तर आवरण शक्ती हीच अडथळा ठरते. विवेकानंद एकदा राजस्थानमधील वाळवंटातून प्रवास करीत होते. समोर मृगजळ दिसत होते. विवेकानंद त्या जागेपर्यंत पोचले. त्यांनी मागे वळून पहिले. आता मगाशी ते जेथे होते तेथे मुगजळ दिसत होते. पण तेथे पाणी नाही हे विवेकानंदाना आता माहित होते. त्यामुळे जरी मृगजळ भासले तरी ते त्यांना फसवू शकत नव्हते. म्हणूनच विक्षेप शक्ती हा ब्रह्मज्ञानात अडथळा नाही. परंतु आवरणशक्ती बरोबर विक्षेप शक्ती असेल तर त्याचे परिणाम भयानक असू शकतात. एखादे भयाण स्वप्न, स्वप्न आहे हे न कळल्याने आपली बोबडी वळवू शकते. एकदा ब्रह्मावरचे आवरण निघाले, हे विश्व ब्रह्म आहे याची आपणास जाणीव झाली की हे विश्व आपल्या डोळ्यापुढे येऊनही आपण फसत नाही. आकाश निळे नाही तर काळे आहे. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे ते निळे भासते हे आपण भौतिकशास्त्राच्या पुस्तकात शिकतो. पण हे ज्ञान होऊनही आकाश निळेच दिसते. तसेच ब्रह्मज्ञान होऊनही महात्म्यांना हे जग आपल्याला दिसते तसेच दिसते. पण आता मायेचे आवरण गाळून पडल्याने हे महात्मे फसत नाहीत. अर्थात त्यांचे या जगातील व्यवहार तसेच चालू राहातात.
विक्षेप शक्ती प्रथम सत्-चित्-आनन्द रूपी ब्रह्माच्या भोवती मनाची निर्मिती करते. मग शरीर, ज्ञानेंद्रिये आणि त्यानंतर हे विश्व आपल्यापुढे उभे करते. आवरणशक्तीमुळे आपण आपल्या खऱ्या स्वरूपाला विसरतो आणि आपले मन-शरीर यालाच आपण 'मी' मनू लागतो.
पुढील लेखात आपण 'मायेसंबंधी' अधिक विचार करू.

Friday, June 7, 2019

अध्यात्माचे दोन प्रमुख मार्ग

सध्याच्या जीवनात अनेक ताण-तणावांना सामोरे जावे लागते. यावर मार्ग म्हणून कित्येकवेळा अध्यात्माचा मार्ग सांगितलं जातो. अध्यात्म म्हणजे भक्तिमार्ग अशी अनेकांची समजूत असते.  माझ्यासारख्या काही जणांना 'भक्ती' ही संकल्पना आत्मसात होत नाही. मग अशांनी काय करावे?
खरेतर अध्यात्माचे दोन स्पष्ट मार्ग आहेत. एक मार्ग खूप जणांना भावतो. तो आहे भक्तिमार्ग. यात सुरुवातीलाच देवावर अपार श्रद्धा असावी  लागते. या देवावरील श्रद्धेनेच अध्यात्मात प्रगती होत असते. देव हा सर्वशक्तीमान आहे, आपल्या सर्व समस्यांवर तोच उपाय करू शकेल ही श्रद्धा आहे. त्यामुळे जीवनातील समस्या सोडविण्याची जबाबदारी देवावर येते आणि त्या माणसाच्या डोक्यावरील भार हलका होतो. माणूस जीवनात आनंदी होतो. हा मार्ग सोपा वाटतो. पण यात एक धोका संभवतो. देवावरील विश्वास- देव अस्तित्वात आहे काय या वरील विश्वास एखाद्या कसोटीच्या क्षणी डळमळीत होऊ शकतो. अशा वेळी हा माणूस मानसिकदृष्ट्या कोसळून पडू शकतो. हा मार्ग जगातील बहुतेक सर्व धर्मांनी स्वीकारलेला दिसतो. ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू धर्मातील अनेक शाखा यांनी हा मार्ग स्वीकारलेला दिसतो. सध्याच्या भारतीय मनावर प्रभाव असलेले 'सांख्य दर्शन' या मार्गावर विश्वास ठेवते. भगवतगीतेत कृष्ण अर्जुनाला 'माझ्यावर विश्वास ठेव' सांगतो तेव्हा हाच मार्ग दाखवितो.
पण काही माणसे अशीही असतात ज्यांना सुरुवातीलाच अंधपणे देवावर विश्वास ठेवणे जमत नाही. परंतु त्यांच्या मनात 'मी कोण' हा प्रश्न उपस्थित होतो. मग या 'मी कोण' याचा शोध सुरु होतो. ही शोध घेण्याची प्रक्रिया अध्यात्मातच मोडते. या प्रक्रियेच्या वेळी त्याला आपल्यातील आनंदाचा शोध लागतो. या प्रक्रियेत संशयाचा भाग नसतो. 'मी आहे' यात संशयाला जागाच नसते. मात्र माझ्या भोवती असणाऱ्या समस्या सोडविण्याची जबाबदारीही माझीच ठरते. त्यामुळे या काळात ताण-तणावांना सामोरे जावे लागू शकते. ही शोध घेण्याची प्रक्रिया पुढे गेली की आपणच 'ब्रह्म' असल्याचा पत्ता लागतो.  मग कितीही समस्या आल्या तरी तो माणूस आनंदात राहतो. हा 'मी कोण' चा शोध घेण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान होय. बौद्ध धर्म, हिंदू धर्मातील काही पंथ (उदा. अद्वैत वेदांत) हे या दुसऱ्या प्रकारच्या माणसांना मार्ग दाखवितात.
सध्याच्या युगात विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेकांना देवावर विश्वास ठेवणे जमत नाही. अशांनी 'मी कोण' याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा.
भक्तिमार्ग किंवा ध्यानमार्ग यात प्रगती झाली की दोन्ही मार्गात फारसा फरक नाही असे लक्षात येते. दोन्ही मार्ग शेवटच्या टप्प्यात एकत्र येतात. 

Thursday, June 6, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग ७

अद्वैत वेदान्ताच्या प्रांतात आता आपण अधिक खोलात शिरत आहोत.
पुढील विवेचनाला सुरुवात करण्यापूर्वी कोणत्याही वस्तूतील अंगभूत गुण आणि उधार (Acquired) गुण यातील फरक ओळखणे महत्वाचे आहे. जेव्हा एखादे पाण्याने भरलेले भांडे चुलीवर ठेवले आहे आणि त्यातील पाणी उकळत आहे तेव्हा त्या पाण्याचे वस्तुमान, तरलता इत्यादी गुणधर्म पाण्याचे अंगभूत गुणधर्म असतात. परंतु त्याची उष्णता आणि आकार हा गुणधर्म त्याने भांड्याकडून उधार घेतलेला असतो. भांड्याकडे त्याचे वस्तुमान आणि आकार हे अंगभूत गुणधर्म असतात, परंतु उष्णता हा गुणधर्म त्याने चुलीतील आगीकडून घेतलेला असतो. आगीचा उष्णता हा अंगभूत गुणधर्म आहे.
लोहार आगीतून तप्त लोखंडाचा गोळा काढतो तेव्हा त्या गोळ्याचे वस्तुमान, आकार हा गोळ्याचा अंगभूत गुणधर्म असतो, पण उष्णता, त्यातून बाहेर पडणारा पिवळा प्रकाश हा तो ज्या आगीतून काढला आहे तिच्यातून त्याने उधार घेतलेला असतो. 
आपल्या आजूबाजूचे हे जे विश्व आहे त्याच्या गुणधर्मांपैकी अस्तित्व (सत) हा गुणधर्म ब्रह्माकडून घेतलेला आहे. जर ब्रह्मच नसेल (म्हणजे त्या वस्तूची जाणीव असणारे आपण नसू) तर त्या वस्तूच्या अस्तित्वाला अर्थच राहणार नाही. म्हणूनच अस्तित्व हा त्या वस्तूचा अंगभूत गुणधर्म नसून उधार गुणधर्म आहे. आपल्या पंचेंद्रियांनी (आणि मनाने) अस्तित्व हा गुणधर्म ब्रह्माच्या (साक्षी चैतन्याच्या) प्रतिबिंबापासून घेतला आहे आणि आपल्या पंचेंद्रियांना (आणि मनाला)जाणवणाऱ्या गोष्टींनी तो गुणधर्म आपल्या पंचेंद्रियांकडून घेतला आहे. साक्षी चैतन्याच्या प्रतिबिंबाने तो गुणधर्म साक्षी चैतन्याकडून घेतला आहे. साक्षी चैतन्याचा मात्र अस्तित्व हा अंगभूत गुणधर्म आहे. 
हे अंगभूत गुण आणि उधार गुण वेगळे ओळखणे हाच 'विवेक' आहे. आपला विवेक जागृत करणे हेच या ग्रंथाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 
विवेकाचे हे लक्षण लक्षात ठेऊन आपण पुढील लेखात 'माया' या संकल्पनेची ओळख करून घेऊ. 

Tuesday, June 4, 2019

दृक्-दृश्य विवेक भाग ६

अद्वैत वेदान्ताच्या प्रांतात आपण 'मी कोण? को अहं ? ' या मूलभूत प्रश्नाचा शोध घेत आहोत.
आपण माणसाच्या जन्ममृत्यूच्या अवस्थांचे वर्णन बादल्यांच्या रूपकाने करू शकू. एका माळ्याच्या बागेत पाण्याने भरलेल्या बादल्या ठेवलेल्या होत्या. काही बादल्या लहान, काही मोठ्या, काही नव्या, काही जीर्णशीर्ण, काही पांढऱ्या, काही काळ्या, काही लाल वगैरे. प्रत्येक बादलीत पाणी भरले होते. त्या पाण्यात आकाशात तळपणाऱ्या सूर्याचे प्रतिबिंब पडले होते. प्रत्येक बादलीला वाटायचे तिचे पाणी म्हणजे ती बादली, तिच्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब म्हणजेच तिचा आत्मा. नव्या बादलीला आपल्या सुंदर असण्याचा गर्व होता, जुन्या बादल्यांना आपण जीर्ण असल्याची खंत होती. काही बादल्यातील  पाणी ढवळले गेल्याने गाळ वर येऊन गढूळ झाले होते. त्यातील सूर्याचे प्रतिबिंब क्षीण झाले होते. या बादल्यांना आपण क्षीण झाल्याचे वाटल्याने खूप दु:ख होत असे. जीर्ण झालेली बादली कधीकधी गळू लागे. मग माळी त्यातील पाणी दुसऱ्या बादलीत ओतत असे. जीर्ण बदलीला आपण मृत्यू पावल्याचे जाणवत असे. पण त्यातील पाणी दुसऱ्या बादलीत ओतल्यावर आणि त्या पाण्यात परत सूर्याचे प्रतिबिंब पडल्यावर पुनर्जन्माचा आनंद होत असे. बादल्यांना कळात नव्हते की आसपासच्या सर्व बादल्यांत एकाच सूर्याचे प्रतिबिंब पडले आहे. गढूळ पाण्याने प्रतिबिंब क्षीण झाले असले तरी सूर्य क्षीण झालेला नाही. आपली अवस्था त्या बादल्यांसारखीच झालेली असते.

आपण मागील लेखात पहिले की आपण म्हणजे स्थूल-सूक्ष्म शरीर नाही, आपण म्हणजे मन नाही तर आपण म्हणजे साक्षी चैतन्य आहोत. हे साक्षी चैतन्य सतत आपल्या विश्वावर चैतन्याचा वर्षाव करीत असते. हे साक्षी चैतन्य मनातून परिवर्तित होते. मनातील अहंकार त्याला पकडून त्याच्याशी तादात्म्य पावतो. हा चैतन्याशी तादात्म्य पावलेला अहंकार आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांमार्फत सर्व शरीरात आणि मनात पसरतो. यामुळे सर्व शरीर चैतन्यमय होते. मनात पडलेल्या या साक्षी चैतन्याच्या प्रतिमेलाच आपण 'मी' मानू लागतो.

प्रतिमेचे एक वैशिष्ट्य असते. जर आरसा धुळीने भरलेला असेल तर प्रतिमा अस्पष्ट दिसते. आरसा वेडावाकडा असेल तर प्रतिमा वेडीवाकडी दिसते, फुटलेल्या आरशात प्रतिमा भंग पावलेली दिसते. जत्रेत असलेल्या 'हंसी घर' मध्ये ठेवलेल्या अंतर्वक्र, बहिर्वक्र आरशावर आपली विचित्र प्रतिमा पडलेली पाहून आपल्याला हसू येते. म्हणजे आपली प्रतिमा आपल्यापेक्षा आरसा कसा आहे हे दाखविते. पण या प्रतिमेला जर आपण खरी मानू लागलो तर अनावस्था प्रसंग येईल. दुर्दैवाने आपली हीच अवस्था झालेली असते. आपण, म्हणजे साक्षी चैतन्य कायम शुद्ध, निरंजन असते. पण मनाच्या /अहंकाराच्या अवस्थेप्रमाणे आपल्याला त्यात प्रतिमा दिसते. आपण मग कधी दु:खी होतो तर कधी निराश तर कधी आनंदी.

आपले खरे स्वरूप म्हणजे 'सतत तळपणारे साक्षी चैतन्य ' हे आहे हे आपण पहिले. पण आपल्याला असा अनुभव येत नाही. सकाळी उठल्यावर झोप पूर्ण झाली असेल तर आपण चैतन्याने मुसमुसलेलो  असतो. संध्याकाळी दमून भागून आल्यावर हाच चैतन्याचा झरा आटलेला वाटतो. खरे तर आपले साक्षी चैतन्य तसेच तळपते असते, पण मनावर मळभ आल्याने आपल्याला हा चैतन्याचा स्रोत आटलेला भासतो.

यामुळेच आपण (अहंकारासोबतची आपली प्रतिमा) आणि साक्षी चैतन्य यातील संबंध म्हणजे एक भ्रांती असल्याचे हा ग्रंथ प्रतिपादन करतो. आपला चेहरा आणि आरशातील प्रतिबिंब यांचा संबंध भ्रांतीजनक आहे. ते प्रतिबिंब त्या आरशाची अवस्था सूचित करते, चेहऱ्याची नाही. आरसा नसेल तरी चेहरा तसाच असेल. म्हणजे चेहऱ्याचा आणि आरशातील प्रतिबिंबाचा काहीही संबंध नाही.

हा आपण (अहंकारासोबतची आपली प्रतिमा) आणि खरे आपण (साक्षी चैतन्य) यातील हा भ्रांतीजन्य संबंध तोडण्याचे काम वेदांत करते. केवळ यथार्थ ज्ञानाने हा संबंध तोडता येतो असे वेदांत सांगते. यालाच 'ज्ञानमार्ग' म्हणतात.

आपण म्हणजे हे साक्षी चैतन्य किंवा ब्रह्म आहोत हे आपण पहिले. पण मग आपले शरीर, आपल्या आसपासचे विश्व काय आहे ते पुढील लेखात पाहू.