Sunday, September 4, 2022

माझे ठाणे

 १> इसवी सनाच्या नवव्या शतकात शिलाहार साम्राज्याच्या बिंब राजाने आपली राजधानी महिकावतीहून (केळवे माहीम) ठाण्याला हलविली. 

२> राजाने आपल्या हत्तींना पोहण्यासाठी तेथील तलाव खोदून मोठा केला. तोच सध्याचा मासुंदा तलाव. त्याच्या काठाशी असलेलया भव्य शिवमंदिरासमोर आपला राजवाडा बांधला. मासुंदा तलावाची हद्द पूर्वी (स्वातंत्र्याच्यावेळी) पूर्वेला कौपिनेश्वर मंदिरापासून पश्चिमेला हनुमान व्यायामशाळेपर्यंत आणि उत्तरेला मुंबई रस्त्यापासून दक्षिणेला मो.ह.विद्यालयापर्यंत होती. मुंबई रस्ता हा देवळांचा रस्ता होता. हा रस्ता प्राचीन काळापासून ठाणे बंदराला उत्तर भारताशी जोडणारा रस्ता होता. याच रस्त्यावर सम्राट अशोकाने अशोक स्तंभ बसविला होता. स्वातंत्र्यानंतर मासुंदा  तलावाचा पूर्वेकडील भाग बुजवून तेथे उद्यान आणि शिवाजी पथ करण्यात आला. तसेच तलाव  काही प्रमाणात बुजवून तलावाच्या सर्व बाजूस रस्ता करण्यात आला. तसेच तलावाच्या मध्यभागात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. 

३> बिंब राजा शिवभक्त  असल्याने त्याने ठाण्यात साठ तलाव खोदून त्याकाठी शिवमंदिरे बांधून घेतली. तेव्हापासून ठाणे 'षष्टीस्थानाक' म्हणून ओळखले जाऊ लागले. १९७५ च्या सुमारास यातील अनेक तलाव महानगरपालिकेने बुजवून त्यावर रस्ते/बागा/इमारती बांधल्या. उदारणार्थ घंटाळी देवीच्या बाजूचे मैदान हा एक विस्तीर्ण तलाव (घंटाळी तलाव) होता. तो सहयोग मंदिरापर्यंत पसरलेला होता. आजचे रंगायतन आणि शिंदे तरणतलाव याच सुमारास तळे (मासुंदा तलाव) बुजवून बांधला गेला आहे. 

४> पोर्तुगीज राजवटीत मुंबई रस्त्यावरील देवळे पाडून त्यातील मूर्ती मासुंदा तलावात टाकून त्यावर 'सेंट जॉज चर्च' बांधण्यात आले. आजही मुंबई रस्त्यावरील घरांचे पुनर्बांधणी होताना जमिनीत गाडल्या गेलेल्या प्राचीन मूर्ती सापडतात. 

५> पहिल्या बाजीरावाचे भाऊ चिमाजीअप्पा यांनी ठाणे-वसई यावरील पोर्तुगीज राजवट समाप्त करण्याचे ठरविले. तेव्हा ठाण्यातील येऊर येथील एका टेकडीवरून या किल्ल्याची आणि परिसराची पाहणी केली होती. आजही या ठिकाणावरून वसईचा किल्ला दिसतो. याच लढाईच्या वेळी मराठ्यांचे 'महागिरी' हे जहाज ठाण्याच्या खाडीत रुतून बसले. त्या भागाला नंतर महागिरी हेच नाव पडले. 

६> ठाण्याचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला. हा एक भक्कम किल्ला म्हणून ओळखला जात होता. तो ब्रिटिशांचे हातात आल्यावर त्याचा तुरुंग म्हणून वापर झाला. या किल्ल्याचे एक दार (त्या काळी) थेट खाडीत उघडत असल्याने या किल्ल्यातून अंदमानला नेले जाणारे कैदी नेत असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना याच किल्ल्यातून अंदमानला नेले होते. अनंत कान्हेरे आणि त्यांच्या क्रांतिकारक साथीदारांना याच किल्ल्यात इंग्रजांनी फाशी दिले होते. या किल्ल्यात आजही खतरनाक कैदी ठेवले जातात. 

७> ठाण्याचे मीठबंदर हे एके काळी अत्यंत नावाजलेले बंदर होते. येथून मुख्यतः: मीठाचा व्यापार चालत असे. ठाण्यातील घोडबंदर येथे अरबी घोडे उतरवून घेतले जात. घोडबंदर येथे एक किल्लाही आहे. 

८> ठाण्यातील मूळ जमात म्हणजे आगरी आणि कोळी. चेंदणी भागात कोळीवाडा आहे. तेथेच ठाण्याची मूळ ग्रामदेवता आहे.  बिंब राजाने राज्यकारभार सांभाळण्यासाठी त्यात प्राविण्य मिळविलेल्या काश्मीरमधील चिनाब नदीच्या (चांद्रशोणा) खोऱ्यातील कायस्थांना आणि गुजरातमधील पाठारेंना येथे आणले. त्यांना 'प्रभू' ही पदवी दिली. त्यातील कायस्थ (चांद्रसेनीय कायस्थ प्रभू) ठाण्यात आणि आसपासच्या परिसरात स्थायिक झाले. पाठारे प्रभू मुंबईला स्थायिक झाले. 

९> ठाणे हे अर्वाचीन युगात महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखले जाते. जनकवी पी. सावळाराम हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते. नावाजलेले क्रिकेटपटू खंडू रांगणेकर हे ठाण्यातीलच. ठाण्याचे मराठी ग्रंथ संग्रहालय हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या मराठी वाचनालयांपैकी एक आहे.