Friday, October 18, 2019

वेदांत

आपण गेले काही महिने वेदांताचा अभ्यास करीत आहोत.
वेदांताची मध्यवर्ती भूमिका ही 'को अहं ?' अथवा "मी कोण आहे?' या प्रश्नाचा शोध घेण्याची आहे.  "मी कोण" याचा शोध घेणे हा काही रिकामपणाचा उद्योग नाही. आपल्याला दैनंदिन आयुष्यात जे मानसिक अस्वास्थ्य अनुभवास येते, जी दु:खे सहन करावी लागतात त्याचे मूलभूत कारण "मी कोण आहे" याचा शोध न लागणे हे आहे असे वेदांत मानते.  आपण स्वत:ला आपले शरीर किंवा फार तर आपले मन समजतो. या
मुळे आपण स्वतः:ला या शरीरात बद्ध करून घेतो. आपल्या दु:खाचे, अस्वस्थतेचे कारण ही बंधनाची जाणीव आहे. 
आपण आपल्याला आपले शरीर अथवा मन समजतो याचे कारण आपल्याला आपल्यात असलेल्या चैतन्याचा अनुभव आपल्या शरीराच्या मर्यादांपर्यंत सीमित असतो. त्यामुळे साहजिकच आपण आपल्याला आपले शरीर समजतो. आपले मन या चैतन्याशी एकरूप झालेले असल्याने आपण कधीकधी आपल्याला आपले मन समजतो. परंतु आपल्या मनाला आपल्या शरीरापर्यंतच सत्ता गाजविता येते. त्यामुळे स्वत:ला आपले मन समजणे हे ही आपल्याला एका मर्यादेत जखडणे असते. 
वेदान्ताचे प्रतिपादन आहे (आणि खोलात गेल्यावर आपल्याला त्याचा अनुभव येतो) की आपण आपल्या शरीर अथवा मनापुरते मर्यादित नाही. आपले चैतन्य हे चैतन्याचा महासागर पसरलेला आहे त्याचाच एक भाग आहे. किंबहुना चैतन्याचा स्रोत (ज्याला वेदांत बह्म या नावाने संबोधते) तळपत असतो.  या स्रोतातून सातत्याने पाझरणाऱ्या चैतन्यसोबत आपले मन एकरूप होते. आपल्या मनाच्या साहाय्याने हे चैतन्य आपल्या शरीराच्या मर्यादांपर्यंत पसरते. आपल्या ज्ञानेंद्रियांना चेतना देते. म्हणजेच आपण हे आपला देह अथवा मन नसून हा चैतन्याचा स्रोत म्हणजेच ब्रह्म आहोत. 
मग आपल्या या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान आपल्याला का होत नाही? आपली ज्ञानेंद्रिये सातत्याने आपल्या शरीराच्या बाहेरील अनुभवात गुंतलेली असतात. आपल्या मनाच्या आरशात पडलेल्या चैतन्याचे प्रक्षेपण सातत्याने शरीराच्या बाहेर करीत असतात. जर या चैतन्याचे प्रक्षेपण आपल्याच शरीरात अथवा ब्रह्माच्या विचारात केले तर ब्रह्मज्ञान होऊ शकते.  ध्यानाच्या विविध पद्धतीत चैतन्याचे प्रक्षेपण आपल्याच शरीरात/मनात होते.
गौतम बुद्धाने विकसित केलेल्या विपश्यना ध्यान पद्धतीत आपल्याच शरीराचा वेध घ्यायचा असतो.  गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरात (http://www.dhamma.org) ही ध्यान पद्धती टप्प्याटप्प्याने शिकविली जाते.  गौतम बुद्धाला  "को अहं" या प्रश्नाचे उत्तर वेदान्ताच्या उत्तरापेक्षा वेगळे मिळाले. पण गौतम बुद्धाची ध्यानपद्धती ही वेदांच्या ध्यानपद्धतीशी मिळतीजुळती होती. गौतम बुद्ध हे भारतीय परंपरेतूनच आलेले होते.
वेदांताचा आपण अधिक खोलात शिरून अभ्यास करणार आहोत. 

Wednesday, October 16, 2019

अपरोक्षानुभूती : निराभास-1

आद्य शंकराचार्यांचा 'अपरोक्षानुभूती' हा वेदांताच्या प्रकरण ग्रंथाचा  (Introductory Text)  अभ्यास सध्या सुरु आहे.  पूर्ण होण्यास अजून सुमारे एक वर्ष लागेल असा अंदाज आहे. नंतर त्यावर विस्तृत लिहीनच.
परंतु या ग्रंथाचा २६वा श्लोक आणि त्यातील एक शब्द खूपच महत्वाचा वाटला. म्हणून त्यावर लिहितो आहे. हा आणि याच्या आधीच्या श्लोकांत आपण देहापासून कसे वेगळे आहोत हे आद्य शंकराचार्य समजावून सांगत आहेत. यापूर्वी द्रष्टा-दृश्य विवेक या गंथाचे परिशीलन करताना आपण देहापासून आपण कसे वेगळे आहोत याची विविध प्रकारे केलेली कारणमीमांसा पहिली आहे.  आपण म्हणजे हा देह नाही, मन नाही हे वेदान्ताचे प्रथम सांगणे आहे. जर आपण देह-मन नाही तर आपण कोण आहोत हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या श्लोकात शंकराचार्य आपण कोण आहोत हे समाजविण्याची सुरुवात करीत आहेत.
या श्लोकातील 'निराभास' हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. आपण 'निराभास' आहोत असे शंकराचार्य सांगतात. 'निराभास' या शब्दाचा शब्दाश: अर्थ 'कोठल्याही भासाशिवाय' म्हणजे 'without reflection' असा होतो. या शब्दात अद्वैत वेदान्ताचे सार सामावलेले आहे. 
आपण आधी आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान कसे होते हे जाणून घेऊ. अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे ही प्रक्रिया दोन भागात होते. याला वृत्तिव्याप्ती आणि फलव्याप्ती अशी नावे आहेत.
आपली पंचेंद्रिये ही केवळ बाह्यजगताशी संपर्क साधणारी साधने आहेत. ही पंचेंद्रीये प्रत्येक क्षणी कित्येक हजार बाइट्स डेटा मेंदूला पाठवीत असतात.  उदाहरणार्थ डोळे. आपल्याला वस्तू दिसते म्हणजे ती वस्तू आपल्या डोळ्यात शिरत नाही. या वस्तूपासून येणारे प्रकाशकिरण आपल्या डोळ्यात शिरतात. नेत्रपटलावर त्याची प्रतिमा उमटते. या प्रतिमेचे रूपांतर विद्युत स्पंदनांत होते. ही स्पंदने मेंदूच्या विशिष्ट भागातील पेशी उद्दिपित करतात. या पेशी या विद्युत स्पंदनांचे परत चित्रात रूपांतर करतात. आणि आपल्याला त्या वस्तूच्या रूपाचे ज्ञान होते. ही प्रक्रिया अत्यंत जटील आहे आणि विज्ञानालाही ही प्रक्रिया कशी घडते याचा संपूर्ण शोध लागलेला नाही.
परंतु यातही एक गमतीचा भाग असा, की डोळे प्रतिक्षणी खूप माहिती मेंदूकडे पाठवीत असतात. पण ही सर्व माहिती गोळा करण्याची मेंदूची क्षमता नाही. या माहितीपैकी कोणती माहिती घ्यायची हे मेंदू ठरवितो. येथे वृत्तिव्याप्तीचा संबंध येतो.
मेंदू अथवा मन एखाद्या गोष्टीबाबतच्या अनुभवांचे अथवा एखाद्या विचारांचे ग्रहण करण्यास सिद्ध झाले असेल तर ते त्या 'वृत्तीने व्याप्त झाले आहे' असे अद्वैत वेदांत मानते.  एखादे पाण्याने भरलेले पात्र आपण पहात असू तर आपले मन  'पात्रवृत्ती'ने भरले आहे असे म्हणता येईल. एखादा विद्यार्थी वर्गात उपस्थित असतो, पण मन भरकटल्याने त्याचे शिक्षक काय बोलत आहे याकडे लक्ष नसते. हे त्या विषयाच्या ठिकाणी वृत्तिव्याप्ती नसल्याचे उदाहरण आहे.  एखाद्या वस्तूचे / विचाराचे ज्ञान होण्यासाठी त्या वस्तूची / विचाराची 'वृत्तिव्याप्ती' असणे आवश्यक आहे.
एखादी गोष्ट मेंदूपर्यंत ज्ञानतंतूंद्वारे (नर्व्हजच्या साहाय्याने) पोचल्यावर वृत्तिव्याप्तीअसेल तर मेंदू ती  माहिती स्वीकारतो आणि यानंतर त्या माहितीचे पृथ:करण चालू होते. ही मिळालेली माहिती आधीच्या ज्ञानाशी कोठे मिळते का याची चाचपणी होते. त्यानुसार मेंदू पुढील सूचना देतो. या प्रक्रियेला 'फलव्याप्ती' असे नाव आहे.
पुढील लेखात आपण या वृत्तिव्याप्ती आणि फलव्याप्तीसंबंधी अधिक माहिती घेऊ.  

अपरोक्षानुभूती : निराभास -2

आपण मागच्या लेखात वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती म्हणजे काय हे पहिले.  त्यासंबंधी थोडे आणखी जाणून घेऊ.
आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत आहोत. खोलीला खिडकी आहे, परंतु खिडकीच्या विशिष्ट दिशेमुळे सूर्यकिरण आत पोचत नाहीत. आपण खिडकीजवळ छोटा आरसा घेऊन उभे राहिलो आणि सूर्यकिरणांचा कवडसा त्या खोलीत पाडला तर तेवढा भाग प्रकाशित होतो.  म्हणजेच एखादी वस्तू दिसण्यासाठी आपल्याला आरशाला त्या वस्तूच्या दिशेने वळवावे लागते. ती वस्तू प्रकाशित व्हावी लागते.
आपले असेच असते.  स्वयंप्रकाशी ब्रह्म  अथवा साक्षी चैतन्य आकाशात तळपत असते. आपल्या मनाच्या आरशाच्या साहाय्याने हे चैतन्य आपल्या ज्ञानेंद्रियांत प्रकटते. हा मनाचा आरसा ज्या वस्तूच्या अथवा विचाराच्या  दिशेने चैतन्य परावर्तित करतो त्या वस्तूचे / विचाराचे आपल्याला त्या त्या ज्ञानेंद्रियांमार्फत ज्ञान होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्या वस्तूसंबंधी वृत्ती आपल्या मनात निर्माण होते. मग आपले चैतन्य ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला त्या वस्तूचे/विचाराचे ज्ञान करून देतात. ती वस्तू आपल्या मनातून परावर्तित झालेल्या चैतन्याने प्रभावित होते/ प्रकाशित होते. प्रकाशित झाल्यावर आपल्याला त्या वास्तूचे ज्ञान हेते. ही झाली त्या वस्तूची/ विचाराची फलव्याप्ती.  वृत्तिव्याप्ती ही प्रथम आपल्या मनात होते, वृत्तिव्यापीमुळे चैतन्याने प्रकाशित झालेल्या वस्तूचे ज्ञान आपल्याला होते. ही झाली फलव्याप्ती  . ज्ञान होण्यासाठी वृत्तिव्याप्ती आणि फलव्याप्ती या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात.
आपल्याला सूर्याचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर आरसा सूर्याच्या दिशने वळवावा लागेल. तरच त्या आरशात  आपल्याला सूर्याची प्रतिमा दिसेल. मात्र या आरशाच्या कवडशाच्या साहाय्याने सूर्याला प्रकाशित करण्याची गरज नाही. सूर्य स्वयंप्रकाशित आहे. तसेच आपल्याला ब्रह्माचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर केवळ वृत्तिव्याप्ती पुरेशी आहे, फलव्याप्तीची गरज नाही. आपल्याला आपल्या 'चित्तवृत्ती' ब्रह्माकडे वळवाव्या लागतील, ब्रह्माकार कराव्या लागतील. केवळ तेवढे पुरेसे आहे. ज्या क्षणी चित्तवृत्ती ब्रह्माकार होतील त्याक्षणी ब्रह्म आपल्यापुढे प्रकट होईल.
विविध प्रकारच्या अध्यात्मिक साधना या आपली 'वृत्ती' ब्रह्माकार करण्याच्या साधना आहेत. मग ती भक्तिमार्गातील भक्तीची साधना असो, योगमार्गातील चित्तवृत्तींना शांत करण्याची ध्यानाची साधना असो अथवा अद्वैत वेदान्तातील आपले अज्ञान दूर करून ज्ञानाची कवाडे उघडण्याची ज्ञानसाधना असो.
ब्रह्माचे आकलन होण्यासाठी चैतन्याचे ब्रह्मावर प्रक्षेपण होण्याची गरज नाही. केवळ मनाचा आरसा ब्रह्माकडे वळविला तरी पुरेसे आहे. यालाच 'निराभास' असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याच्या जवळ जाणारा शब्द समूह 'without reflection' असू शकेल. अद्वैत वेदान्ताचे सार या एका शब्दात सामावलेले आहे.
मागच्या भागाची लिंक : https://www.facebook.com/photo.php?fbid=10218039445771927


Tuesday, October 8, 2019

चीन-३

चीनचे कॅलेंडर आपल्यासारखेच चंद्राच्या कलांवर आधारलेले आहे.  त्याला ते Lunar Calendar असेच म्हणतात. कोरिया आदी चीनच्या जवळपासच्या काही देशांत ते वापरले जाते. त्यांचे नववर्ष आपल्या एक ते दोन महिने आधी सुरु होते (अधिक महिना कधी येतो त्यावर अवलंबून). आपल्याकडे नववर्ष जसे सृष्टीचा नव्याने पाळावी फुटण्याचा महोत्सव असतो तसेच चीनमध्येही यावेळी कडाक्याची थंडी संपून झाडांना नवी पालवी येऊ लागलेली असते.  नववर्ष महोत्सव हा चीनमधील अत्यंत मोठ्या उत्सवांपैकी एक आहे.  राष्ट्रीय दिवसाप्रमाणे (१ ऑक्टोबर) या दिवशीही चिनी लोक आपापल्या गावी येतात. हा उत्सव त्याचे कुटुंबीयांची पुनर्मीलन असते. सर्वसाधारणपणे यावेळी सर्व कंपन्यांना पंधरा दिवस सुट्टी असते. बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते.
छेनामध्ये या वेळी भरपूर फटाके उडविले जातात. आपल्यासारखेच रस्त्यात फटाके उडविले जात असतात. मोठ्या शहरात आता रस्त्यांवर फटाके उडविण्यास बंदी आहे.  यावेळी घराघरांवर चिनी पद्धतीचे कागदी लाल कंदील लावले जातात. या कंदिलांवर शुभेच्छादर्शक वचने असतात. यावेळी घरातील लहान मुलाला छोटा रेशमाचा लाल कंदील भेट म्हणून दिला जातो. हा कंदील घराच्या दारावर लावायचा असतो. मोठा झाल्यावर मुलीला लग्नासाठी मागणी घालताना हा कंदील त्याने त्या मुलीला द्यायचा अशी पद्धत आहे.  माझया मुलासाठी माझया चिनी सहकाऱ्यांनी हा कंदील मला दिला होता आणि त्याचे काय करायचे हे सांगितले होते.
नववर्षदिनी घरासमोर फळे धरलेले संत्र्याचे झाड असणे खूप शुभ समजले जाते. त्यामुळे यावेळी मॉलमध्ये फळे लगडलेली संत्र्याची कुंडीतील झाडे विकण्यासाठी ठेवलेली असतात. मँडरिन भाषेत लिहिलेली लाल रंगाची शुभेच्छापत्रे एकमेकांना देतात. लाल रंग हा शुभ समाजाला जात असल्याने सर्वत्र लाल रंगाचे साम्राज्य दिसते. (मात्र कोणाचे नाव लाल रंगात लिहिणे खूप अशुभ समजतात. लाल रंगात कोणाचेही नाव आपण लिहिले तर आपण त्या माणसाच्या मृत्यूची इच्छा करीत आहोत असे समजले जाते. आम्हाला चीनमध्ये गेल्यावर ही काळजी घेण्यास सांगितले होते) नववर्षदिन पक्वान्न होतात. नववर्षाच्या आसपास मित्रमंडळींना घरी बोलावितात. गावात ड्रॅगॉन डान्स होतात. घरासमोर, दुकानासमोर ड्रॅगन डान्स झाल्यास अशुभ शक्ती दूर  पाळतात आणि भरभराट होते असा समज आहे. ड्रॅगॉन डान्स करणारी मंडळे असतात. त्यांना मुद्दाम बोलावून भरपूर पैसे देतात. हा ड्रॅगॉन डान्स पाहण्यासारखा असतो.
नववर्षदिनी घरातील मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेतात. मोठी माणसे त्यांना आशीर्वाद देतात तसेच लाल रंगाच्या कागदात गुंडाळलेली भेटवस्तू अथवा लाल पाकिटात काही पैसे घालून लहान मुलांना देतात.
चीनमध्ये प्रत्येक वर्षाला एका प्राण्याचे नाव असते. त्या त्या नावाच्या वर्षात जन्मलेल्या माणसाची ती 'जन्मरास' असते असे ते मानतात. पहिली रास 'उंदीर', दुसरी 'बैल' तर बारावी 'डुक्कर' आहे. त्यांच्या पौराणिक कथेप्रमाणे १२ प्राणी परमेश्वराकडे गेले. बैल शक्तिवान असल्याने तो सर्वात पुढे होता. पण देवासमोर जाण्याच्या क्षणी बैलाच्या पाठीवरून उंदराने उडी मारली आणि तो सर्वात प्रथम देवापुढे पोचला. म्हणून उंदीर ही पहिली रास आहे. त्या त्या राशींच्या प्राण्याच्या स्वभावावरून त्या त्या जन्मराशींच्या माणसांचे स्वभाव ठरतात असे ते मानतात.  ड्रॅगॉन राशी सर्वात शुभ मनाली जाते. या राशीच्या माणसांना राजयोग असतो अशी समजूत आहे.  ५ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरु झालेल्या चिनी वर्षाची राशी 'डुक्कर' आहे.
चिनी राशी दर बारा वर्षांनी परत येतात.  प्रत्येक चक्रातील बारा राशींना (उंदरापासून डुकरापर्यंत) एका चक्रात गुंफिले आहे. अशी पाच चक्रे असतात. प्रत्येक चक्र चिनी पंचमहाभूतांशी जोडलेले आहे. ही पंचमभूते म्हणजे जल, काष्ठ, अग्नी, सुवर्ण, पृथ्वी.  यापैकी सुवर्णचक्र हे अतिशय भाग्यवान समजले जाते. सध्या पृथ्वीचक्रातील शेवटचे वर्ष चालू आहे.  सुवर्णड्रॅगनच्या वर्षी जन्मलेले मूल अत्यंत भाग्यवान मानले जाते. त्यामुळे अनेक चिनी कुटुंबनियोजन करून आपले मूल सुवर्णड्रॅगनच्या वर्षी जन्माला येईल अशा प्रयत्नात असतात. त्यामुळे चिनी समाजात २००० साली सुवर्णड्रॅगन वर्षी  'बेबीबूम' आली होती.
ज्यांना शक्य असेल त्यांनी चिनी नववर्षदिनी चीनला अथवा सिंगापूरला भेट द्यावी आणि हा चिनी नववर्षाचा उत्साह अनुभवावा. आता येऊ घातलेला  चिनी नववर्षदिन  २५ जानेवारी २०२० रोजी आहे. 

Friday, October 4, 2019

चीन-2

चीनी क्रांतीचा सत्तरावा वर्धापनदिन नुकताच पार पडला. त्या निमित्ताने मी काल  चिनी खाद्य संस्कृतीवर लिहिले होते. आता थोडे चिनी संस्कृतीवर.
चीनमध्ये अनेक प्रांत आहेत. प्रत्येक प्रांताची संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि भाषा वेगळी आहे. परंतु चिनी सरकारला ही 'विविधतेत एकता' मजूर नाही. त्यामुळे चीनने सर्व चीनवर 'मँडरिन' ही एकाच भाषा लादली आहे (जिला आपण चिनी भाषा म्हणून ओळखतो).  सर्व शिक्षण याच भाषेत असते. महाविद्यालयीन शिक्षणही याच भाषेत असते. सर्व सरकारी कागदपत्रेही याच भाषेत असतात. त्यामुळे नवी पिढी त्यांची मूळ भाषा विसरू लागली आहे.  १९९६ साली माझ्यासोबत काम करणारी माझी तरुण मित्रमंडळी त्यांची मूळ भाषा बोलू शकत नव्हती, पण समजू शकत होती. त्यांचे आजी-आजोबा ती  भाषा बोलत असल्याने त्यांना ती जेमतेम समजत होती.
चीनमध्ये ५७ 'नॅशनॅलिटीज ' आहेत. म्हणजेच ५७ भिन्न वांशिक समूहांचे लोक राहातात.  यात ९१. ५९% हे 'हान' समूहाचे आहेत तर ८.४१% हे बाकी ५६ वंशाचे आहेत.  त्यामुळे सर्व निर्णयांवर हान वंशाचा पगडा दिसतो.  अनेक अल्पसंख्य वांशिक समूहांवर 'हान' समूहाकडून अन्याय होत असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात.  उइगर वंशाच्या मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. तिबेटी वांशिक नागरिकांवर अत्याचाराच्या बातम्या भारतीय वृत्तपत्रात येत असतात.
चिनी भाषेच्या दोन लिप्या आहेत. यात अक्षरे नसतात, तर ही चित्रलिपी आहे.  एक लिपी प्राचीन आहे. त्यात सुमारे तीन हजार चित्रे आहेत. सध्या बहुसंख्य ठिकाणी सोपी केलेली लिपी वापरली जाते. त्यात थोडीशी चित्रे आहेत. चित्र लिपी असल्याने आपले नाव वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येते. आपल्या नावाचे भाग करून उच्चारानुसार (तसा  उच्चार असलेल्या वस्तूंची चित्रे एकासमोर एक ठेऊन) आपले नाव लिहिले जाते. अक्षरांची सवय असलेल्या आपल्याला हे थोडे विचित्र वाटते.
चीन आणि त्याच्या पूर्व सीमेवर असलेला कोरिया यांच्यात पूर्वापार वैर आहे.  कोरियन लोकांनी चिनी सम्राटांना जेरीस आणले होते. म्हणून पूर्वीच्या कोरिया-चीन सीमेवर कोरियन लोकांपासून बचाव करण्यासाठी अजस्त्र चिनी भिंत बांधली होती. आजही कोरियन वंशाचे काही लोक चीनमध्ये राहतात. ५६ अल्पसंख्य वांशिक गटांपैकी कोरियन हे एक आहेत.
या विविध वांशिक गटांच्या संस्कृतीचे प्रदर्शन चीनने शेनझन या 'विशेष औद्योगिक क्षेत्रात' उभे केले आहे. शेनझन हे चीनच्या मुख्य भूमीत असलेले हाँग काँगचे जुळे शहर आहे. हाँग काँगला भेट देणाऱ्या पर्यटकांनी शेनझनला अवश्य भेट द्यावी. या प्रदर्शनात ता विविध वांशिक गटांच्या राहण्याच्या, खाण्याच्या आणि लग्नसमारंभ इत्यादींच्या पद्धती दाखविलेल्या आहेत. भारतातही अनेक जातिसमूहांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती आहेत. त्या कालौघात नष्ट होत आहेत. त्यांचे असेच एखादे कायमस्वरूपी प्रदर्शन का असू नये?
या प्रदर्शनात एका वांशिक समूहाने माझे लक्ष वेधून घेतले. या समूहाच्या विभागासमोर काहीजण सनई-चौघडा वाजवीत होते. हे वाद्य मंगलसमयी वापरतात असे तेथे लिहिले होते. तसेच या ठिकाणी एक जाते ठेवलेले होते. हे यंत्र पीठ करण्यासाठी वापरले जाते अशी माहिती होती. तसेच एका विहिरींची प्रतिकृती असून त्यावर रहाट होता. हा समूह निश्चितच भारतातून चीनमध्ये स्थलांतरित झालेला असावा. यावर कोणीतरी अधिक संशोधन करणे गरजेचे आहे. (या गोष्टीला आता वीस वर्षे झाली. मी त्या वांशिक समूहाचे नाव विसरलो).
याच प्रदर्शनात विविध वांशिक गटांच्या खाद्यपदार्थांचा एक विभाग होता. तेथे मला 'Goat Meat Available' अशी पाटी  दिसली. चीनमध्ये बकऱ्याचे मांस मिळत नसल्याने मी लगेच तेथे धावलो. तेथील माणूस प्रथमतः: मला पाकिस्तानी समजला. मी भारतीय असल्याचे कळल्यावर त्याने माझ्याशी हिंदीत बोलणे चालू केले.  मी आश्चर्याने थक्क झालो. तो कस्तगरचा असल्याचे मला परत परत सांगत होता. मला हे कस्तगर कोठे आहे तेच माहित नव्हते. नंतर शोध घेता हे ठिकाण तिबेटजवळ सिल्क रूटवर असल्याचे आणि त्या प्रदेशाशी भारतीय व्यापाऱ्यांचे येणेजाणे चीन राज्यक्रांतीपर्यंत होते असे लक्षात आले. त्यामुळेच तेथील रहिवाशाना अजूनही हिंदी चांगले बोलता येते.
चीनमध्ये अनेक लोक बुद्धाला मानतात. बुद्धाला तेथे शुकमुनि या नावानेही ओळखतात. हे नाव शाक्यमुनी शब्दाचा अपभ्रंश असावा. बुद्ध शाक्यवंशीय होता.  चीनमध्ये धर्माचे पालन जाहीरपणे करता येत नसल्याने बौद्धमंदिरे नाहीत. परंतु हाँग काँग मध्ये आहेत. मी तेथील एका मंदिरात गेलो होतो. पूजाविधीची पद्धत आपल्याशी जुळणारी आहे. जाड अगरबत्त्या देवाला वाहण्याची प्रथा आहे.  देवळात चिठ्ठीच्या साहाय्याने तुमचे भविष्य सांगणारे बसलेले असतात. नुकतेच चिनी सरकारने कन्फ्यूशियम हा चीनचा अधिकृत धर्म म्हणून जाहीर करण्याचे ठरविले आहे.
चीनमध्ये कायदे पालनाची व्यवस्था अत्यंत चांगली आहे. एकदा एका टॅक्सीचालकाने माझ्याकडून जास्त पैसे घेतले.  तेथे टॅक्सी इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या आहेत.  आपल्या नियोजित स्थळी पोचताच छापील बिल येते. त्यावर बाकी सर्व त्यांच्या लिपीत असले तरी आकडे रोमन असतात. टॅक्सिवाल्याने बळजबरीने जास्त पैसे घेतले. माझ्या कार्यालयातील लोकांना हे समजताच त्यांनी पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. जर मी तक्रार केली असती तर त्या टॅक्सीवाल्याचा परवाना गेला असताच, पण परदेशी प्रवाशांना त्रास दिल्याबद्दल कडक शिक्षा झाली असती.  मला त्या टॅक्सीवाल्याची  दया आली आणि मी तक्रार केली नाही.
एकदा मी चीनमध्ये असताना चाच्यांनी पळवलेले  इंडोनेशियन जहाज चीनने नजीकच्या समुद्रात पकडले.  त्याची न्यायव्यवस्था एवढी जलद आहे की चार महिन्यात त्या सर्व चाच्यांना मृत्युदंड दिला जाऊन त्याची अंमलबजावणीही झाली.
जगातील अन्य राष्ट्रात मिळून दहा वर्षात जितक्या लोकांना मृत्युदंड दिला जात नाही एवढ्या लोकांना चीनमध्ये एका वर्षात दिला जातो.  चीनमधील प्रमुख सणांच्या काही दिवस आधी (वर्षातून चार वेळा) एकाच दिवशी सर्व मृत्युदंडाची शिक्षा झालेल्याना गोळी घालून मारले जाते. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्यांच्या शरीरावर त्यांच्या नातेवाईकांचा हक्क नसतो. या मारलेल्या कैद्यांच्या शरीरातील अवयव काढून ते इच्छुक रुग्णांना दिले जातात. यामुळे चीनमधील डॉक्टर्स हे अवयव प्रत्यारोपण करण्यात जगात सर्वात अनुभवी समजले जातात.
या प्रकारच्या कायद्याच्या अत्यंत कडक अंमलबजावणीमुळे चीनमध्ये रात्री-बेरात्री फिरतानाही सुरक्षित वाटते.  शेनझन शहरात आम्ही अनेक वेळा एकटेच चालत सबवे पार करून मध्यरात्री आमच्या कंपनीत जात असू. पण कोणालाच कधी भीती वाटली नाही. अगदी अमेरिकेतही आम्ही असे निर्धास्त फिरू शकलो नाही.
चिनी नागरिक या वातावरणात आनंदी आहेत. १९८९ साली लोकशाहीच्या मागणीसाठी चिनी विद्यार्थ्यांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन चिनी सरकारने रणगाडे विद्यार्थ्यांच्या अंगावर घालून तो उठाव मोडून काढला होता. पण त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे सध्याचा तरुणवर्ग त्यांच्या राजकीय पद्धतीबद्दल समाधानी दिसतो. १९८९ चा उठाव ही मोठी चूक होती असे बहुसंख्य लोकांचे मत दिसते.
पुढील लेखात चिनी कॅलेंडर आणि नववर्ष उत्सव या संदर्भात.


Thursday, October 3, 2019

China - 1

काल चीनच्या राज्यक्रांतीला सत्तर वर्षे झाली. १९७९ पर्यंत जवळपास आपल्याचसारखी आर्थिक स्थिती असलेला हा देश नंतरच्या काळात आपल्याला खूपच मागे टाकून पुढे गेला. यामुळे मला चीनबद्दल नेहमीच कुतुहूल वाटत आले आहे. मी जेव्हा आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली तेव्हा कधीतरी चीनमध्ये काम करण्यास मिळावे अशी सुप्त इच्छा होती. ती फलद्रुप होऊन मला प्रत्येकी सुमारे सहा महिन्यांचे तीन प्रोजेक्ट चीनच्या मुख्य भूमीवर आणि एक हाँग काँग मध्ये करण्यास मिळाला. या निमित्ताने मला चीनची अर्थव्यवस्था, संस्कृती, इतिहास, जीवनपद्धती आणि तेथील लोकांची स्वभाववैशिष्ट्ये यांचा जवळून अभ्यास करता आला.
चिनी माणसांचा स्वभाव खूपच आतिथ्यशील आहे. 'अतिथी देवो भव ' ही परंपरा सर्वच आशियायी देशांत आहे, पण चीनमध्ये मला ती प्रत्येकाच्या स्वभावात मुरलेली जाणवली. मी कुटुंबाशिवाय एकटा राहत आहे याची जाणीव सर्व सहकाऱ्यांना होती. शनिवार-रविवार मला कंटाळा येऊ नये म्हणून ते आवर्जून प्रयत्न करीत. मात्र एखाद्या चिनी पारंपरिक लग्नसमारंभास जावे अशी माझी इच्छा होती. ती पूर्ण झाली नाही.
No photo description available.'चीनमध्ये मी काय खात होतो' हा प्रश्न मला भारतात अनेकदा विचारला गेला. चिनी लोक काहीही खातात अशी आपली समजूत आहे. ही समजूत काही प्रमाणातच खरी आहे. चीन भारतासारखाच विशाल देश आहे. त्याचे अनेक प्रांत आहेत. प्रत्येक प्रांताची (भारतासारखीच) वेगळी संस्कृती, भाषा आणि खाद्य संस्कृती आहे. चीनच्या कँटोन प्रांतातील लोक निरनिराळे प्राणी/कीटक खातात. कँटोन हा चीनच्या आग्नेय दिशेला (दक्षिण-पूर्व) असलेला प्रांत आहे. हाँग काँग कँटोनमध्येच येते. चीनच्या उत्तरेला 'हान' वंशाचे लोक राहतात. ते चीनमध्ये बहुसंख्येने आहेत. ते असे कोठलेही प्राणी-कीटक खाणे निषिद्ध समजतात. चीनमध्ये प्रामुख्याने डुक्कर खाल्ले जाते. परंतु पश्चिमेला असलेल्या प्रांतात मुस्लिम बहुसंख्य आहेत. ते डुक्कर खात नाहीत तर बीफ खातात. त्यामुळे चीनच्या कंपन्यांतील कॅंटीनमध्ये मुस्लिमांसाठी वेगळा काउंटर असतो. त्यावर डुक्कराचे पदार्थ मिळत नाहीत. मी 'सर्वहारी' असल्याने आणि मला नव्या चवी घेऊन बघण्याची आवड असल्याने चीनमध्ये मला कोठेच खाण्याची समस्या आली नाही. चिनी पदार्थात मसाले असतात. पण ते आपल्या मसाल्यांपेक्षा वेगळे असतात. आपल्याकडे मिळणाऱ्या चिनी पदार्थांची चव आपल्या जिभेला सोयीची केलेली असते. मूळ चिनी पदार्थांची चव पूर्णतः: वेगळी असते. मला भारतीय चिनी पदार्थांपेक्षा मूळ चिनी चवीचे पदार्थ आवडतात. त्यामुळेही मी चीनमध्ये आरामात राहू शकलो आणि सर्वसामान्य लोकांत सहज मिसळू शकलो. मी बेजिंगमध्ये राहत असताना माझ्या जवळच चीनची सुप्रसिद्ध 'खाऊ गल्ली ' होती. तेथे अनेक प्रकारचे कीटक खाण्यास मिळतात. पण असे कीटक खाणे सर्वसामान्य चिनी लोकांस कमीपणाचे वाटत असल्याने बहुदा मी बेजिंगमध्ये असेपर्यंत मला त्याचा पत्ता माझया चिनी मित्रांनी लागू दिला नाही. त्यामुळे या नव्या खाद्यानुभवाला मी मुकलो.
चीनमधील मध्यम आकाराच्या गावात हॉटेलांत पिंजरे ठेवलेले असतात. त्यात अनेक जिवंत प्राणी असतात. एखादे प्राणीसंग्रहालय वाटावे असे चित्रविचित्र जिवंत प्राणी ठेवलेले असतात. मी त्यात मुंगूस, मोर, हरीण, साप,नाग, कोंबडी असे अनेक प्राणी पहिले. मोठ्याल्या फिश टॅंकमध्ये मासे असतात. तुम्हाला जो प्राणी / मासा हवा तो दाखवायचा. मग तो प्राणी शिजवून आणून देतात. मात्र त्या पूर्ण प्राण्याची ऑर्डर द्यावी लागते. मला साप खाऊन बघण्याची इच्छा होती. पण 'एका सापाचे सूप पाच माणसांसाठी असते' असे मला सांगितले गेले. माझ्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांपैकी (चिनी, भारतीय, युरोपियन, अमेरिकन) कोणीही हे सूप घेण्यास तयार न झाल्याने मला साप खाऊन बघता आला नाही.
चीन संस्कृतीसंबंधी पुढील लेखात.