Monday, January 26, 2015

भीष्माष्टमी

२७ जानेवारी २०१५ रोजी भीष्माष्टमी आहे. रथसप्तमीच्या पुढील दिवस भीष्माष्टमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी तत्वचिंतन करावे अशी प्रथा आहे.
महारथी भीष्म हे महाभारत युद्धातील सर्वात वयोवृद्ध कौरव सेनानी होते. ते कौरव-पांडवांचे चुलत आजोबा होते, गंगापुत्र होते. राजा शंतनुला गंगेपासून आठ पुत्र झाले. प्रत्येक पुत्रजन्माच्यावेळी गंगा त्यांना जलसमाधी देत असे (हे शापित गंधर्व होते). वचन दिल्याप्रमाणे शंतनू तिला तिच्या कृत्याचे कारण विचारात नसे. शेवटी आठव्या पुत्रालाही गंगा जलसमाधी देण्यास निघाली तेव्हा शंतनू राजाने तिला अडविले. वचनभंग झाल्याने त्या पुत्राला शांतानुकडे सोडून गंगा स्वर्गात निघून गेली. हाच तो देवव्रत, जो पुढे भीष्म या नावाने प्रसिद्ध झाला. देवव्रत अत्यंत कुशल योद्धा म्हणून तारुण्यातच प्रसिद्धी पावला होता.
राजा शंतनू एक दिवस जंगलात फिरत असताना त्याच्या नजरेस मत्स्यगंधा (सत्यवती) पडली आणि तो तिच्यावर मोहित झाला. सत्यवतीने त्याच्याशी लग्न करण्यासाठी तीन अटी घातल्या.
  1. तिच्यापासून झालेला मुलगाच हस्तिनापुरच्या गादीवर बसेल (सर्वात मोठा मुलगा-गादीचा वारस-देवव्रत नव्हे.)
  2. (देवव्रताची मुले पुढे गादीवर हक्क सांगतील म्हणून) देवव्रत आजन्म ब्रम्हचारी राहील.
  3. (देवव्रत हा शूर योद्धा होता- त्याच्याकडून सत्यवतीच्या वारसांना धोका होऊ नये म्हणून) देवव्रत आजन्म हस्तिनापुरच्या गादीची सेवा करेल.  
शंतनुला या अटी देवव्रतावर (भीष्मावर) अन्याय करणाऱ्या असल्याने मान्य नव्हत्या. तो दुर्मुखलेला राहू लागला. देवव्रताला हे कळल्यावर त्याने सत्यवतीची भेट घेऊन या अटी मान्य असल्याचे कळविले. यालाच भीष्मप्रतिज्ञा असे म्हणतात.

सत्यवतीपासून शंतनुला विचित्रवीर्य नावाचा अल्पायुषी पुत्र झाला. विचित्रवीर्यासाठी भीष्माने स्वयंवरातून काशिराजाच्या कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका या तीन बहिणीना पळवून आणले.  यापैकी अंबिका आणि अंबालिका यांच्यापासून  सत्यवती-पराशर ऋषी यांचा मुलगा व्यासमुनी यांच्या नियोगाने धृतराष्ट्र आणि पंडू राजांचा जन्म झाला. 

ज्येष्ठ बहिण अंबा  हिने आधीच राजा शाल्वाला वारले होते. भीष्म तिला घेऊन त्या राजाकडे गेला. परंतु भीष्माने तिला स्वयंवरतून पळविल्याने तिच्याशी विवाह करण्यास त्याने असमर्थता दर्शविली. ती यासंबंधी तक्रार घेऊन पराशुरामांकडे गेली. परशुरामांनी भीष्मांना अम्बेशी विवाह करण्यास सांगितले. परंतु आपल्या प्रतीज्ञेनुसार असे करण्यास त्यांनी नकार दिला. पराशुरामांबरोबर भीष्मांचे युद्ध झाले. परंतु दोघेही तुल्यबळ होते. शेवटी परशुरामांनी युद्ध थाबवून अम्बेला शंकराची साधना करण्यास सांगितले. भीष्मांच्या मृत्यूसाठी तिने कठोर साधना केली. शंकराने तिला पुढील जन्मात भीष्मांच्या मृत्यूस कारानिभून होण्याचा वर दिला.अंबेने अग्निकाष्ठे भक्षण करून प्राण सोडला आणि पुढील जन्मी पांचाल नरेश द्रुपद याच्या घरी शिखंडीच्या रुपात जन्माला आली.

मुलगी म्हणून  शिखंडीचा जन्म झाला. परंतु द्रुपदाने तिचा सांभाळ मुलगा म्हणून केला. तिला शस्त्रास्त्रांचे ज्ञान दिले. परंतु लग्नानंतर शिखंडीच्या पत्नीला खरी गोष्ट कळल्यावर तिने शिखंडीचा त्याग केला. शिखंडी पांचाल सोडून पळून चालली असता तिला एक यक्ष भेटला आणि त्याने आपले पुरुषत्व शिखंडीला दिले. (शिखंडीच्या मृत्युनंतर यक्षाला पुरुषत्व परत मिळाले).

भीष्म थोर धनुर्धारी होते. परंतु स्त्रीवर शस्त्र न चालविण्याची त्यांनी शपथ घेतली होती. भीष्म प्रतीज्ञेनुसार (हस्तिनापुर गादीशी इमान राखण्यासंबंधी) ते कौरवांच्या बाजूने लढत होते, कौरवांचे पहिले सेनापती होते. परंतु त्यांची सहानुभूती पांडवांकडे होती. महाभारत युद्धात अर्जुनाने प्रयत्नांची शिकस्त केली. परंतु भीष्मांच्या सामर्थ्यापुढे पांडवांचा टिकाव लागत नव्हता. भीष्मांना मारल्याशिवाय पांडवांना युद्ध जिकता येणार नाही हे कृष्णाने ओळखले. युद्धाच्या नवव्या दिवशी संध्याकाळी युद्ध संपल्यावर कृष्ण आणि अर्जुन भीष्मांना भेटण्यास गेले. कृष्णाने भीष्मांना त्यांना मारण्याचा उपाय विचारला. भीष्मांनी शिखन्डीस पुढे उभे करून त्यामागून अर्जुनाने बाण मारण्याचा उपाय सुचविला. शिखंडी जन्माने स्त्री असल्याने स्त्रीवर शस्त्र न चालविण्याच्या प्रतीज्ञेनुसार भीष्म अर्जुनावर बाण सोडणार नाहीत असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे युद्धाच्या दहाव्या दिवशी अर्जुनाने शिखंडीच्या मागून भीष्मांवर बाणांचा वर्षाव केला. भीष्मांच्या अंगावर बोटभरही जागा नव्हती की जेथे बाणाने जखम झालेली नाही.   भीष्म अशा प्रकारे शरपंजरी पडले, बाणांच्या शय्येवर पडले. 

परंतु भीष्म इच्छामरणी होते. त्यांना त्यांच्या इच्छेनुरूप मरण येण्याचा वर मिळाला होता. त्यावेळच्या कल्पनेप्रमाणे उत्तरायणात मरण येणे चांगले असते. उत्तरायणाला काहीदिवस बाकी होते. या काळात भीष्म शरपंजरी पडून होते. भीष्म हे त्या काळातील सर्वात ज्ञानी पुरुष म्हणून ओळखले जात. रोज संध्याकाळी युद्ध संपल्यावर कृष्ण आणि अर्जुन त्यांच्या बरोबर तत्वचिंतन करण्यास येत असत.

रथसप्तमीला सूर्याचे उत्तरायण सुरु होते. भीष्मांनी रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी प्राण सोडले. या दिवसाला भीष्माष्टमी म्हणून ओळखले जाते. भीष्म-कृष्ण तत्वचिंतनाची आठवण म्हणून या दिवशी थोडे तरी तत्वचिंतन करावे अशी प्रथा आहे.