Sunday, July 29, 2018

आषाढाच्या पहिल्या दिवशी : वसंत बापट

आषाढाच्या पहिल्या दिवशी
चिंब भिजून गेली धरित्री
(कैक दिसांनी न्हाऊन माखून
प्रसन्न झाली तुटकी छत्री)

स्वर्गधरेचे मीलन झाले
सांगत फिरतो गंधित वारा
(जाने दो जी, मारो गोली
आज कचेरीस दांडी मारा)

हिरवळ हसली खडकावरुनि
झरे लागले थयथय नाचू
(गरम भजी आणि चहा भूरकुनी
आपण फिल्मी मासिक वाचू)

आषाढाच्या पहिल्या दिवशी
जलधाराना कशास भेटा
(खरे सांगु का? कवितेतच
तो निसर्ग सुंदर दिसतो बेटा)