Saturday, October 7, 2023

घटस्थापना

 आज शक्तीच्या महोत्सवाला सुरुवात होणार.

आपल्या सर्व देवतांच्या हातात शस्त्र आहे. देवतांच्या कहाण्यांमध्ये दुष्ट शक्तीवर प्रहार ही प्रमुख गोष्ट आहे. याचाच अर्थ आपल्या आपल्या संस्कृतीत ध्यानमार्ग-भक्तिमार्गाद्वारे आपल्या अध्यात्मिक प्रगतीला जेवढे महत्व आहे तितकेच आपल्या संस्कृतीवर प्रहार करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांविरद्ध आवश्यक असेक तर हिंसेचा वापर करण्याला महत्व आहे. आपली संस्कृती कोठेच अतिरेकी हिंसेला अथवा अहिंसेला प्रोत्साहन देत नाही. मात्र अशावेळी मनात द्वेषबुद्धी नसावी, तर त्या शत्रूला चांगली बुद्धी पुढील जन्मात मिळावी, चांगली गति मिळावी असा भावही असावा. आपले कर्तव्य म्हणूनच ही हिंसा करावी, मनाचे संतुलन न घालविता करावी असे भगवान श्रीकृष्णही सांगतात.
मी सिंगापूरला गेलो असता आमच्या गाईडने एक महत्वाची गोष्ट सांगितली. सिंगापूर या छोट्याश्या देशाकडेही उत्तम लष्करी सामर्थ्य आहे. तेथे १८ वर्षांवरील सर्वांना लष्करी शिक्षण घ्यावे लागते. सिंगापूरचे असे म्हणणे आहे की आपल्याकडील समृद्धी टिकविण्यासाठी, तिचे संरक्षण करण्यासाठी लष्करी सामर्थ्याचीही आवश्यकता आहे. एकाच गाडीची ही दोन चाके आहेत. मला सिंगापूरचे हे विचार आपल्या धर्माच्या/प्राचीन भारतीय संस्कृतीच्या बाबतीतही योग्य वाटतात. आपली हजारो वर्षांची समृद्ध संस्कृती आहे. संस्कृतीच्या या समृद्धतेचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला बलशाली व्हावे लागेल, आवश्यक असेल तेव्हा या बळाचा वापरही करावा लागेल. कालीमातेच्या आणि अन्य देवतांच्या कथा याकडेच निर्देश करतात.
आज आपल्या संस्कृतीवर प्रहार होत आहेत. काहीशे वर्षे आपण गीतेतील हा उपदेश, शस्त्रसज्ज देवता देत असलेला संदेश विसरलो होतो. आता जागृत होऊ. जे आपल्या संस्कृतीवर प्रहार करीत नाहीत (उदा. पारशी, ज्यू समुदाय) त्यांना त्यांची संस्कृती जपण्यासाठीही आपण मदतच करू. जे अन्य धर्माचे पण भारतीय वंशाचे आहेत आणि आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दल अभिमान बाळगतात ते ही आपलेच आहेत. मात्र विनाकारण जे आपल्या संस्कृतीवर प्रहार करतात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. या वर्षीच्या या शक्तीच्या महोत्सवाचा हाच संकल्प.
आपली सर्वांची आंतरिक शक्ती जागृत होवो आणि त्याद्वारे आपल्याला मानसिक शांतता, प्रसन्नता लाभो ही कालीमातेच्या चरणी प्रार्थना.

Sunday, October 1, 2023

मृत्यूचा अनुभव

 ३१ ऑक्टोबर १९९१ रोजी रात्री मला काही वेगळे अनुभव आले. मी तेव्हा आजारी होतो. आजाराचे निदान झाले नव्हते. खूप ताप होता. मी शांतपणे मला काय संवेदना होत आहेत याकडे लक्ष ठेऊन होतो. मी IIT मध्ये असल्यापासून (१९७८-८३) संवेदनांवर लक्ष ठेऊन शरीर शिथिल करण्याची सवय लावून घेतली होती. हा त्याचाच एक भाग होता. मला अचानक शरीरातील रक्तप्रवाह कमी होत असल्याची जाणीव झाली. मी आता माझ्या शरीर संवेदनांबाबत अधिक जागरूक झालो.

एका क्षणी मला मी माझ्या शरीरातून (टाळूकडून) बाहेर पडल्याची जाणीव झाली. मला माझे पलंगावर विसावलेले शरीर दिसत होते. मी घरात फिरून घरातील माणसे पाहू शकत होतो, त्यांचे संवाद ऐकू शकत होतो. घरच्यांना काही काळाने मी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही याची जाणीव झाली. ते घाबरले. मला माझ्या शेजाऱ्यांनी त्यांच्या कारमधून हॉस्पिटलमध्ये नेले. हे सर्व मी बघत होतो.
नंतर मात्र मी पुढील प्रवासास सुरुवात केली. अनेक प्रकारचे अनुभव घेत पुढे गेलो. अचानक मला माझी पत्नी गर्भवती असल्याचे आठवले. माझ्या बाळासाठी मला परत जाणे आवश्यक आहे हे प्रकर्षाने जाणवले. एका क्षणात मी माझ्या शरीरात आलो. माझा ताप गेला होता. नंतर तपासण्या करूनही काय झाले होते ते समजले नाही. मात्र या दिवसापासून पुढे दोन-तीन दिवस मी वेगळ्या अनुभवांतून जाताच होतो. मी मूळचा अतिनास्तिक. त्यामुळे हे अनुभव म्हणजे मला होणारे भास आहेत असे वाटले. सतत येणाऱ्या अनुभवांमुळे मी ठाण्यातील नामांकित सायक्रियाटिस्ट गाठला. त्यांनी मला काहीही मानसिक आजार नसल्याची ग्वाही दिली. हळूहळू हे अनुभव येणे बंद झाले.
मला नक्की काय झाले असावे या संबंधी मी अनेक वर्षे संभ्रमात होतो. नास्तिक असल्याने याचा संबंध कोठे अध्यात्माशी लावण्यास मन तयार नव्हते. पण हे भासही नसावेत असे अंतर्मन कोठेतरी सांगत होते. अशावेळी २००२ साली मला एका कार्यक्रमात आनंदऋषी भेटले. मी त्यांना माझे अनुभव सांगितले. त्यांनी याविषयी काहीही न बोलता मला त्यांनीच संकलित केलेले मृत्यूला स्पर्श करून आलेल्यांचे (विविध देश/धर्मातील व्यक्तींचे) अनुभव असलेले पुस्तक मला वाचण्यास दिले. यातील अनुभव आणि मला पहिल्या दिवशी आलेले अनुभव शब्दश: सारखे होते. आता मला काय झाले होते ते अकरा वर्षांनी समजले. मी मृत्यूला स्पर्श करून आलो होतो.
नंतर आनंदऋषींनी माझ्याकडे 'मी काय करत होतो' याची चौकशी केली. मी करीत असलेला संवेदनांचा अभ्यास हे 'विपश्यना ध्यान' असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मी मागील जन्मातून विपश्यना ध्यान घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले आणि मला ताबडतोब गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरात जाण्यास सांगितले.
मात्र नंतरचे दोन-तीन दिवस येणाऱ्या अनुभवांची संगती लागत नव्हती. जेव्हा मी स्वामी सर्वप्रियानंद यांची youtube वरील भाषणे ऐकली तेव्हा त्याचीही संगती लागली. मला येणारे अनुभव हे 'अद्वैत वेदांत' च्या मांडणीशी जवळ जाणारे होते.
अंधारात चाचपडत असलेल्या मला विपश्यनेचा मार्ग दाखविणारे आणि नंतरही वेळोवेळी मार्गदर्शन करणारे स्वामी आनंदऋषी यांना प्रणाम.