Saturday, December 10, 2022

माया-ब्रह्म

 मायेच्या पांघरुणासंबंधी लिहिण्याचे मी आश्वासन दिले होते. प्रथमदर्शनी 'मायेचे पांघरूण' ही काहीशी गूढ संकल्पना वाटते. पण त्यासंबंधी जाणून घेतल्यावर तो आपला नित्याचा अनुभव आहे हे लक्षात येते.  अद्वैत वेदांत कोणत्याही गूढ गोष्टी सांगत नाही. आपल्या रोजच्या अनुभवांचे विश्लेषण करते. मायेच्या पांघरुणासंबंधी आणि त्यातून ब्रह्म कसे डोकावत असते हे समजण्यासाठी आपण प्रथम ब्रह्म म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. 

'सत्-चित्-आनन्द' हे ब्रह्माचे त्रिगुण स्वरूप आहे. विश्वातील प्रत्येक गोष्टीत (Object) हे गुण आपल्याला ओळखता येतात. सत् ची ओळख करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. 

सोन्याचा दागिना हा मुलत: केवळ सोने आहे. या दागिन्यातून काही पद्धतीने सोने काढून घेतले तर तो दागिना राहणार नाही. जर ते सोने वितळले तर तो दागिना राहणार नाही. त्या सोन्यापासून अन्य दागिनेही घडविता येतील. म्हणजेच दागिना नष्ट केला तरी सोने तसेच राहाते. म्हणजेच सोन्याचा उपयोग व्हावा म्हणून त्याला एक रूप दिलेले आहे आणि एक नाव दिलेले आहे. वस्तूत: ते केवळ सोने आहे. तसेच मातीचा घट ही केवळ माती आहे. मातीला उपयोगासाठी एक रूप दिलेले आहे आणि नाव दिलेले आहे. समुद्रातील लाट ही केवळ समुद्राचे पाणी आहे. तिच्या त्या रुपाला आपण 'लाट' असे संबोधतो. त्यातून पाणी काढले तर त्या लाटेला अस्तित्व उरणार नाही. परंतु ती लाट फुटल्यावर पाणी तसेच राहाते. 

तसेच हे विश्व म्हणजे केवळ 'सत्' म्हणजे अस्तित्व आहे.  विश्वातील प्रत्येक गोष्ट (Object) म्हणजे अस्तित्वाला दिलेले नाम-रूप आहे. त्या गोष्टींतू अस्तित्व काढून घेतले तर ती वस्तू राहणार नाही. ही गोष्ट प्रथमदर्शनी विचित्र (Absurd) वाटते. कारण प्रत्येक गोष्टीचा 'अस्तित्व' हा गुण आपण गृहीतच धरलेला असतो.

या वस्तूला 'अस्तित्व' हा गुण आपणच प्रदान केलेला असतो.  विस्तवावर एक भांडे ठेवले आहे. त्यात पाणी आहे आणि त्या पाण्यात काही बटाटे उकडत ठेवले आहेत. बटाटे आता गरम झाले आहेत. बटाट्यामधील उष्णता हा बटाट्याचा अंगभूत (Intransic Property) गुणधर्म नाही. हा गुणधर्म बटाट्याने पाण्याकडून उधार (Incidental Property) घेतला आहे. बटाटा गरम पाण्यातून बाहेर काढला तर थोड्याच वेळात थंड होईल. बटाट्याचा आकार आणि वस्तुमान मात्र त्याचा अंगभूत गुणधर्म आहे. तसेच भांड्यातील पाण्याचाही उष्णता हा अंगभूत गुणधर्म नाही. पाण्याने ती उष्णता भांड्याकडून घेतली आहे. पाण्याचा आकारही पाण्याने भांड्याकडून घेतला आहे. पाण्याचे वस्तुमान हा मात्र पाण्याचा अंगभूत गुणधर्म आहे. विस्तवावर ठेवलेल्या भांड्याचाही उष्णता हा मूलभूत गुणधर्म नाही. त्याने तो अग्नीकडून उधार घेतलेला आहे. मात्र आकार आणि वस्तुमान हा भांड्याचा मूलभूत गुणधर्म आहे. अग्नीचा मात्र उष्णता हा मूलभूत गुणधर्म आहे. उष्णता काढून घेतली तर अग्नी राहणार नाही. 

तसेच अस्तित्व हा गुण प्रत्येक गोष्टीला आपणच प्रदान केलेला असतो. आपल्या ज्ञानेंद्रियांना ती वस्तू जाणवते म्हणून ती तेथे असते. अन्यथा ती वस्तू तेथे आहे असे आपण केवळ तर्काने सांगू शकतो.  त्या वस्तूचे अस्तित्व केवळ आपल्या अस्तित्वाच्या परिक्षेत्रात असते.  अस्तित्व हा आपला म्हणजेच ब्रह्माचा मूलभूत गुण आहे. या विश्वातील प्रत्येक गोष्ट हा गुण आपल्याकडून उधार घेत असते. 

आता ब्रह्माच्या दुसऱ्या गुणांचा म्हणजेच चित् या गुणाचा विचार करू. चित् म्हणजे चैतन्य. चैतन्य हे विश्वात सगळीकडे भरलेले आहे. खरे तर 'भरलेले' हा शब्दच चुकीचा आहे. विश्व म्हणजे एखाद्या भांड्यासारखे असून त्यात चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे असा त्याचा अर्थ नाही. हे विश्व म्हणजे मूलभूत चैतन्यच आहे असा याचा अर्थ आहे.  आपण स्वप्न बघतो. स्वप्नातील विश्व आपल्यापुढे आकार घेते. स्वप्नाच्या पातळीवर त्या विश्वातील सर्व घटना 'सत्य' असतात. हे स्वप्न आपल्या 'मनात' घडत असते. स्वप्नाला कच्चा माल आपले मन पुरवीत असते. म्हणजेच स्वप्नातील विश्व हे आपले केवळ मन असते.  तसेच आपले जागृतीतील विश्व चैतन्यात आकार घेत असते. या विश्वातील सर्व दृश्ये, गोष्टी (Objects) यांचा कच्चा माल (Raw Material) केवळ आपले चैतन्य असते.  मग आपल्याला हे चैतन्य सर्व गोष्टीत जाणवत का नाही? आकाशात सर्वत्र प्रकाश पसरलेला असतो. पण अवकाशात गेले की सर्वत्र अंधार पसरलेला दिसतो. मात्र एखादी वस्तू या  प्रकाशाच्या वाटेत आली तर त्या वस्तूवरून प्रकाश परावर्तित होतो आणि आपल्याला प्रकाशाचे अस्तित्व जाणवते. म्हणजेच प्रकाशाचे अस्तित्व जाणण्यासाठी एखादी वस्तू तेथे असणे आवश्यक आहे. तद्वतच चैतन्याचे अस्तित्व जाणण्यासाठी तेथे सजीव वास्तूचे अस्तित्व आवश्यक आहे.  एखादी सजीव वस्तू असेल तर तेथे चैतन्य प्रकट होते, आपल्याला ते जाणवते. 

'आनंद' हा ब्रह्माचा तिसरा गुण. ब्रह्माचा अनुभव झाल्यावर सर्व चिंता नाहीशा होतात. आनंदाचे झरे फुटतात. 

अशा या 'सत्-चित्-आनन्द' रुपी ब्रह्मावर मायेने पांघरूण टाकले आहे. माया ही ब्रह्माचीच एक शक्ती आहे. या शक्तीत 'आवरणशक्ती' आणि 'विक्षेपशक्ती' या दोन शक्ती अंतर्भूत आहेत. आवरणशक्ती ब्रह्मावर आवरण टाकते. यातुन ती ब्रह्माला झाकून टाकण्याचा प्रयत्न करते. (परंतु ब्रह्म पूर्णपणे झाकले जात नाही). विक्षेपशक्ती ब्रह्माच्या ठिकाणी अन्य काहीतरी आहे असा आभास निर्माण करते. अंधाऱ्या खोलीत दोर (रज्जू) पडलेला आहे. अंधारामुळे आपल्या सापाच्या खऱ्या स्वरूपाचा बोध होत नाही. मात्र तेथे साप (सर्प) असल्याचा भास होतो. तसेच हे आहे. आपल्यासमोर मातीचे भांडे (घट) ठेवले असता खरे तर केवळ घटाचा आकार दिलेली माती ठेवलेली असते. अन्य काहीही नसते. या मातीला घटाचे रूप दिलेले असते आणि त्या रुपाला 'घट' असे नाव दिलेले असते. त्याकडे बघताना आपण मातीकडे बघत आहोत हे आपल्या झटकन लक्षात येत नाही. हीच ती आवरणशक्ती. आपले त्या मातीच्या रुपाकडे लक्ष जाते आणि आपण त्याला 'घट' असे संबोधतो. हीच ती विक्षेपशक्ती. या विश्वातील विविध गोष्टींकडे बघताना त्या गोष्टींचे  'सत्-चित्-आनन्द' असे ब्रह्मस्वरूप आपल्या झटकन लक्षात येत नाही. आपण त्या गोष्टींच्या नाम-रूपातच अडकतो. यालाच 'मायेचे पांघरूण' असे म्हणतात. अर्थात या सर्व गोष्टींतून  'सत्-चित्-आनन्द'रुपी ब्रह्म डोकावत असतेच. आपण ध्यानपूर्वक पाहिले तर ते लक्षात येते. 

माझ्यात आणि आपण सर्वांच्यात या मायेच्या पांघरुणाआडून डोकावणाऱ्या ब्रह्माला ओळखण्याची क्षमता प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 

Friday, December 9, 2022

भारतीय कालगणना- पंचांग व दिनदर्शिका ! ——- दा. कृ. सोमण

 भारतीय कालगणना- पंचांग व दिनदर्शिका !

——- दा. कृ. सोमण
( पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण मागील पन्नास वर्षे पंचांग - दिनदर्शिका तयार करीत आहेत. भारतीय पंचांगे तयार करण्यात कसा कसा चांगला बदल होत गेला ते या लेखात त्यांनी सांगितले आहे . सध्या भारतीय पंचांगे ही दृक् गणितावर आधारलेली आहेत. जसे आकाशात दिसते तसे पंचांगात दिलेले असते आणि जसे पंचांगात दिलेले असते तसेच आकाशात प्रत्यक्ष दिसते. सध्या पंचांगांबरोबरच ग्रेगोरियन वर्षारंभाप्रमाणे दिनदर्शिकाही प्रसिद्ध होतात. प्रत्येक इंग्रजी तारखेपाशी त्या त्या दिवसाचे पंचांग आणि सण-उत्सव दिलेले असतात.)
सण-उत्सव कशासाठी असतात ? असा प्रश्न काही लोक विचारतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य ! शरीराचे आरोग्य मुख्यत्वे करून आहारावर अवलंबून असते. ठराविक ऋतूत ठराविक आहार घेतला तर माणसाचे आरोग्य चांगले राहण्यास खूप मदत होते. सणांप्रमाणे आपण आहार करतो. म्हणून ठराविक सण सण ठराविक ऋतूंमध्ये साजरे केले जातात. म्हणजे पहा. उपवासाचा श्रावण मास हा पावसाळयात येतो. पावसाळयात शरीराचे चलनवलन कमी होते, भूक कमी लागते. हलक्या आहाराची शरीराला आवश्यकता असते. थंडीमध्ये भूक जास्त लागते. शरीराला तेल-तुपाची जास्त आवश्यकता असते म्हणून दिवाळी, मकर संक्रातीसारखे सण थंडीत येतात. परंतू सण हे चंद्रावर अवलंबून असतात आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सण आणि ऋतू यांची सांगड घालण्यासाठी आपल्या पंचांगात चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. परंतू कधीकधी एका राशीत सूर्य असतांना दोन चांद्रमहिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिकमास व दुसरा तो निजमास धरला जातो. या नियमाप्रमाणे पुढच्यावर्षी सन २०२३ मध्ये श्रावण अधिकमास येणार आहे.
उत्सवांमध्ये आप्तेष्ट-मित्रमंडळी एकत्र येत असतात. त्यामुळे आपणास आनंद प्राप्त होतो. दु:ख- चिंता आपण विसरून जातो. मनाचे आरोग्य उत्सवांमुळे चांगले राहते. तसेच देव-देवतांचे आदर्श गुण आपल्या अंगी यावेत यासाठी त्यांची जयंती आपण साजरी करीत असतो. त्यांचे पूजन करीत असतो. समाजातील गरीबांना मदत व्हावी यासाठी आपल्या कमाईतून दान करण्यास सांगितले आहे. पाप-पुण्याची व्याख्या महर्षी व्यास आणि संत तुकारामानी सांगितली आहे. इतरांना त्रास देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य ! पंचांग म्हणे फलज्योतिष नव्हे ! पंचांग म्हणजे खगोल गणिताने सिद्ध केलेले आकाशाचे वेळापत्रक आहे म्हणून पंचांग आणि सण-उत्सव या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहायला पाहिजे.
पंचांगातील दृक् गणित
समजा पंचांग- दिनदर्शिकेत एखाद्या दिवशी ग्रहण दिसेल असे लिहीलेले आहे आणि प्रत्यक्ष आकाशात ते त्या दिवशी दिसले नाही तर काय होईल ? अमावास्येनंतर अमुक दिवशी नूतन चंद्रकोर दिसेल असे लिहीलेले आहे आणि ती दिसली नाही तर काय होईल ? अमुक दिवशी दोन ग्रहांची युती होईल असे लिहीले आहे आणि त्या दिवशी ती युती आकाशात दिसली नाही तर काय होईल ? तुमचा पंचांग दिनदर्शिकेवरचा विश्वास उडेल ना ? नेमकी असेच आपल्या पंचांग - दिनदर्शिकांच्या बाबतीत होणार होते. परंतू तसे ते झाले नाही. सध्या जसे पंचांग- दिनदर्शिकेत दिलेले असते तसेच आकाशात दिसते आणि जसे आकाशात घडते तसेच पंचांग-दिनदर्शिकेत दिलेले असते. याला कारणीभूत आहेत श्री. गणेश दैवज्ञ आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ! या दोन विद्वानांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आत्ताच्या पंचांग-दिनदर्शिका या दृक् गणितानुसार तयार केल्या जात आहेत.
प्रथम आपण पंचांग म्हणजे काय ते पाहूया. (१) तिथी (२) वार (३) नक्षत्र (४) योग आणि (५) करण या पाच गोष्टी यामध्ये प्रामुख्याने दिलेल्या असतात म्हणून याला ‘ पंचांग ‘ म्हणतात. दिनदर्शिकेत पंचांगातील माहिती ही ग्रेगोरियन म्हणजे इंग्रजी तारखेनुसार दिलेल्या असतात. पंचांग अगोदर तयार केले जाते आणि त्यावरूनच दिनदर्शिका तयार केली जाते. परंतू कालगणनेमध्ये या पाच गोष्टी एकदम प्रचारात आलेल्या नाहीत. कालगणनेत ‘तिथी ‘ या इसवीसनपूर्व १५०० वर्षांपासून प्रचारात आल्या. ‘वार ‘ हे इसवीसनपूर्व १००० वर्षांपासून प्रचारात आले. भारतीयांना नक्षत्राचे ज्ञान इसवीसनपूर्व तीन हजार वर्षांपासून होते. कालगणनेत ‘ नक्षत्रांचा ‘वापर इसवीसनपूर्व १५०० वर्षांपासून प्रचारात आल्या असे काही संशोधकांचे मत आहे. कालगणनेत ‘ योग ‘ हे उशीरा म्हणजे इसवीसन ७०० वर्षांनंतरच प्रचारात आले.’ करण ‘ कालगणनेत इसवीसनपूर्व १५०० पासून प्रचारात आले असे ‘ भारतीय ज्योति:शास्त्राचा इतिहास ‘ या ग्रंथाचे लेखक ज्योतिर्विद् शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनी सांगितले आहे. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षांत आली असेल प्राचीनकाळी पंचांग हे पाच अंगांची माहिती देणारे नव्हते. ते एकांग, द्व्यंग, त्र्यंग आणि चतुरंगही होते . मेषादी राशी भारतात इसवीसनपूर्व ४०० वर्षांपासून प्रचारात आल्या. पंचांगाचे गणित ज्या ग्रंथांवरून करतात त्या ग्रंथाना ‘ करण ग्रंथ ‘ म्हणतात.
पूर्वी मुद्रणकला नव्हती, त्यावेळी करण ग्रंथांवरून हस्तलिखित पंचांग तयार करून ग्रहण, संक्रांत इत्यादी माहिती तोंडी करून दिली जात असे. दि. १६ मार्च १८४१ रोजी मुंबई येथून गणपत कृष्णाजी पाटील यांनी शिळाप्रेसवर छापलेले पहिले मराठी पंचांग प्रसिद्ध केले. या पहिल्या पंचांगाचे गणित रखमाजी देवजी मुळे यांनी तयार केले होते. त्या वर्षापासून दरवर्षी पंचांगे छापील रूपात प्रसिद्ध होऊ लागली.
पंचांग म्हणजे खगोलगणित
पंचांग म्हणजे खगोल गणित ! चांद्र महिने आणि आकाश याचा कसा संबंध आहे तो पहा. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवून रात्रभर आपणास दर्शन देऊन पहाटे पश्चिमेस मावळते. चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो. वैशाख महिन्यात विशाखा, ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठा, आषाढ महिन्यात पूर्वाषाढा, श्रावण महिन्यात श्रवण, भाद्रपद महिन्यात पूर्वा भाद्रपदा, आश्विन महिन्यात अश्विनी, कार्तिक महिन्यात कृत्तिका, मार्गशीर्ष महिन्यात मृगशीर्ष, पौष महिन्यात पुष्य, माघ महिन्यात मघा आणि फाल्गुन महिन्यात पूर्वा फाल्गुनी नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळते. तसेच त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र त्या त्या नक्षत्रात असतो. असे जानेवारी, फेब्रुवारी या इंग्रजी महिन्यांचे नसते.
भारतात पंचांगामुळे खगोलगणित संशोधनात आणि खगोलगणित संशोधनामुळे पंचांगात सुधारणा होत गेल्या हे खूप महत्वाचे आहे. ठराविक ऋतूमध्ये ठराविक धार्मिक विधींचे पालन करावे हा मूळ उद्देश आहे. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सण हे चंद्रावर अवलंबून असतात. म्हणून अगदी पहिल्यापासून भारतीय पंचांग हे चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेले आहे. विशेष म्हणजे भारतीय कालगणनेत वसंत संपात बिंदूला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ज्या ग्रंथावरून पंचांगाचे गणित करतात त्या ग्रंथाला ‘ करणग्रंथ ‘ असे म्हणतात.
पंचांग विकासाचे तीन प्रमुख टप्पे मानले जातात.
(१) वैदिक कालखंड - अज्ञात भूतकाळापासून इ. सन पूर्व १५०० पर्यंतचा काळ. या काळात ऋग्वेद, संहिता, ब्राह्मण ग्रंथ लिहीले गेले. वेदांमध्ये वर्ष सौर आहे. महिने चांद्र आहेत. एका वर्षाचे ३६० दिवस व त्यांची १२ महिन्यात विभागणी करण्यात आली होती. चांद्र महिन्यांना त्या काळी मधू, माधव, शुक, शुची, नभ, नभस्य, ईश, ऊर्जा , सहस, सहस्य, तपस्, तपस्य अशी नांवे होती. उत्तरायण आणि दक्षिणायन अशी दोन अयने, सहा ऋतू व क्रांतीवृत्तावरील २७ नक्षत्रे निश्चित करण्यात आली होती. त्यावेळी पंचांग चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेले होते.अधिक महिना ( म्हणजे इंटर कॅलरी मंथ ) घेऊन ऋतूशी सांगड घालण्यात येत होती. त्याकाळी वर्षारंभ वसंत संपात बिंदूपासूनच होत असे. यज्ञयागादी धार्मिक विधी अवष्टंभ बिंदूवर ( विंटर सोल्स्टाइस ) केले जात असत. त्याकाळी वसंत संपात बिंदू कृत्तिका नक्षत्रात होता. म्हणून तैत्तिरिय संहितेत कृत्तिकेला पहिले स्थान देण्यात आले आहे. सध्या वसंतसंपात बिंदू उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात आहे हे आपणास माहित असेलच.
(२) वेदांग ज्योतिष कालखंड- इ. सन पूर्व १५०० ते इ. सन ४०० पर्यंतचा हा काळ मानला जातो. इ.सन पूर्व १४०० वर्षांपूर्वी म्हणजे आजपासून किमान साडेतीन हजार वर्षांपूर्वी लगध ऋषींनी ‘ वेदांग ज्योतिष ‘ या करणग्रंथाची रचना केली. या ग्रंथातील गणितावरून लगध ऋषी हे काश्मीरमध्ये रहात होते असे दिसून येते. वेदांग ज्योतिषाच्या दोन संहिता उपलब्ध आहेत. ऋक् ज्योतिष म्हणजे ऋग्वेदीय वेदांग ज्योतिष आणि याजुष ज्योतिष म्हणजे यजुर्वेदीय वेदांग ज्योतिष. ऋग्वेदीय वेदांग ज्योतिषात ३६ श्लोक आहेत. यजुर्वेदीय वेदांग ज्योतिषात ४४ श्लोक आहेत त्यापैकी ३० श्लोक हे ऋक् ज्योतिषाप्रमाणेच आहेत. यामध्ये सूर्य अवष्टंभ बिंदूत ( म्हणजे विंटर सोल्स्टाइस) प्रवेश करतो असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे अनेक पाश्चात्य विद्वानांना या ग्रंथाविषयी आश्चर्य वाटले. अनेक संशोधकांनी वेदांग ज्योतिषामधील श्लोकांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. लोकमान्य टिळकांनी वेदांग ज्योतिष संहितेचे विशेष संशोधन करून दोन भागात ग्रंथ लिहिला. पाश्चात्य पंडितानी लावलेल्या अर्थात त्रुटी आहेत हे त्यांना समजावे यासाठी हा ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिला. वेदांग ज्योतिषात युग पाच वर्षांचे मानले आहे. एका युगात १८३० सावन दिवस व १८६० तिथी मानल्या जात. एका युगात ६० सौरमास व ६२ चांद्रमास असत. पाच वर्षात दोन अधिकमास येत. वेदांग ज्योतिष हा करणग्रंथ अभ्यासकांना आजही उपलब्ध आहे.
(३) सिद्धांत ज्योतिष कालखंड - या कालखंड इ. सन ४०० पासून आधुनिक काळापर्यत मानला जातो. या कालखंडामध्ये सन ४९९ मध्ये आर्यभट यांचा ‘ आर्यभटीय ‘ आणि वराहमिहीर यांचा ‘ पंचसिद्धांतिका ‘ हे ग्रंथ निर्माण झाले. त्यानंतर ‘ सूर्यसिद्धांत ‘ हा करणग्रंथ प्रचारात आला. या ग्रंथाचा कर्ता मात्र अज्ञात आहे. काही संशोधकांच्या मते हा लाटकृत असावा. काहीना या ग्रंथकर्त्याचे नाव सूर्य असावे असे वाटते. सूर्यसिद्धांत हा करणग्रंथ सन ४७५ मधील असावा. या ग्रंथात १४ प्रकरणे असून ५०० श्लोक आहेत. ग्रहगती, चंद्र-सूर्याची ग्रहणे, चंद्रसूर्याचे उदयास्त यांची गणिते या ग्रंथात आहेत. आजही हा ग्रंथ अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. या करणग्रंथावरून तयार केल्या जाणार्या पंचांगांना ‘ सूर्यसिद्धांतीय पंचांगे ‘ म्हणून ओळखले जाई.
विशेष म्हणजे सुमारे एक हजार वर्षे या करणग्रंथावरून पंचांगे तयार केली जात. गंमत म्हणजे या करणग्रंथावरून केलेल्या पंचाग गणित आणि प्रत्यक्ष आकाश याविषयी कुणीही पडताळणी केलेली नसावी. किंवा पंचांगकर्ते या ग्रंथावरून केलेल्या गणितात वैयक्तिक अनुभवातून बदल करीत असावेत. सूर्यसिद्धांत ग्रंथावरून केलेले गणित आहेना, तेच खरे ! प्रत्यक्ष आकाशात काहीही होवो अशी मानसिकता देखील झाली असावी.
गणेश दैवज्ञांचे कार्य
सूर्यसिध्दांत करणग्रंथावरून केलेले पंचांग आणि प्रत्यक्ष आकाश यांची फारकत होतच राहिली. महाराष्ट्रातील कोकणात मुरुड- जंजिरा जवळ ‘ नांदगाव ‘ नावाचे एक गाव आहे. तेथे एक सिद्धिविनायक मंदिरही आहे. तेथे केशव दैवज्ञ नावाचे एक विद्वान पंडित रहात होते. ते सिद्धिविनायक मंदिरात रोज श्रीगणेशाची पूजा करीत असत. तसेच ते सूर्यसिद्धांत ग्रंथावरून पंचांग तयार करून गावात सांगत. त्यांनी पंचांगगणिताचा ‘ ग्रहकौतुक ‘हा करणग्रंथ आणि मुहूर्तशास्त्रावर ‘ मुहूर्ततत्त्व ‘ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या लक्षात आले की सूर्यसिद्धांतावरून केलेले पंचांग आणि प्रत्यक्ष आकाश यात फरक पडत आहे. केशव दैवज्ञ यांचा मुलगा गणेश दैवज्ञ याने सूर्यसिद्धांत करणग्रंथाचा सखोल अभ्यास केला. तसेच आकाशातील ग्रहगोलांचे प्रत्यक्ष वेध घेतले. त्याने सूर्यसिद्धांत करणग्रंथावर संस्कार करून म्हणजेच त्या गणितात काही बदल करून सन १५२० मध्ये दृकप्रत्ययतुल्य गणित देणारा ‘ ग्रहलाघव ‘ हा करणग्रंथ लिहिला. ग्रहलाघव प्रमाणे तयार होणारे पंचांग आणि प्रत्यक्ष आकाश यांचे नाते जुळून आले. त्रिकोणमिती ऐवजी ११ वर्षीय चक्रावरून गणित करण्याची अभिनव युक्ती त्याने शोधून काढली. गणेश दैवज्ञांनी एकूण १४ ग्रंथ लिहिले आहेत. ग्रहलाघव करणग्रंथावरून केलेले गणित आकाशाशी जुळू लागल्याने भारतातील अनेक पंचांगकर्त्यांनी आपापली पंचांगे तयार करण्यासाठी ‘ ग्रहलाघव ‘ ग्रंथ वापरायला सुरुवात केली.ग्रहलाघव करणग्रंथावरून केलेल्या पंचांगाला लोक ‘ ग्रहलाघवीय पंचांग ‘ म्हणून संबोधू लागले. लोकांची या ग्रंथावर श्रद्धा बसली.
लोकमान्य टिळकांचे कार्य !
सुमारे ४०० वर्षानी ग्रहलाघव करणग्रंथावरून केलेले पंचांग व प्रत्यक्ष आकाश यात यात फरक पडू लागला. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच ही गोष्ट लोकमान्य टिळकांच्या लक्षात आली होती. पंचांग आणि प्रत्यक्ष आकाश यामध्ये फरक पडता कामा नये असे त्यांना वाटत होते. खगोलगणित हे नेहमी अद्ययावत करावे लागते. गतीमध्ये होणार्या बदलांमुळे ग्रहलाघव करणग्रंथावरून केलेले गणित चुकते हे लोकमान्य टिळकांना समजले होते. परंतू बरीच मंडळी ग्रहलाघव सारखे जुने परंपरागत ग्रंथ सोडायला तयार नव्हती. भारतात वेधशाळा हवी. त्यावरून ग्रहगोलांचे अचूक वेध घेऊन नव्याने दृक् गणित देणारे करणग्रंथ तयार करायला हवेत असे लोकमान्यांना वाटत होते. तसे त्यांनी अनेकांजवळ बोलूनही दाखविले होते.
शेवटी लोकमान्यांनी पंचांगकर्त्यांना व लोकांना पटवून देण्यासाठी पंचांग संमेलने घेतली. पहिले अधिवेशन सन १९०४ मध्ये मुंबईत झाले.या संमेलनाचे अध्यक्ष श्रीशंकराचार्य होते. परंतू दृक् गणित स्वीकारायला लोकांची तयारी नव्हती. ग्रहलाघवीय पंचांगेच हवीत असे लोकांचे मत झाले. पंचांगात दृक् गणित आणि अयनांशात एकवाक्यता यावी यासाठी १९१७ साली पुणे येथे दुसरे ज्योतिष अधिवेशन झाले. त्यावेळी अयनांशाबाबत एकमत होऊ शकले नाही.विशेष समाधानाची गोष्ट म्हणजे सन १९२० मध्ये सांगली येथील अधिवेशनात लोकमान्यांच्या प्रयत्नांना यश आले. पंचांगे ही दृक् गणितावरच आधारित हवीत असा ठराव मंजूर करण्यात आला.
मात्र त्यासाठी दृक् गणिताचा भारतीय करणग्रंथ निर्माण होण्याची गरज होती. वेंकटेश बापूजी केतकरांसारखे गणिती त्यासाठी तयार होते. सन १९२० मध्ये लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध केली. ‘ जो कोणी दृक् गणिताचा करणग्रंथ लिहून देईल त्यास एक हजार रुपये बक्षीस मिळेल ‘ असे त्या जाहिरातीत छापले होते. लोकमान्यांनी प्रथम ज्योतिर्गणिती वेंकटेश बापूजी केतकर यांना विचारले. परंतू ते चित्रापक्षाचे आग्रही होते. शेवटी नागपूरचे डाॅ. केशव लक्ष्मण दफ्तरी यांनी दृक् गणित देणारा ‘ करणकल्पलता ‘ हा करणग्रंथ लिहिला. हा ग्रंथ दोन भागात असून तो मराठी व संस्कृतमध्ये आहे. या ग्रंथावरून केलेल्या गणिताप्रमाणेच आकाश दिसते. लोकमान्यांचे पंचांगातील दृक् गणिताचे स्वप्न साकार झाले. हा ग्रंथ सन १९२४ मध्ये प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने १ आॅगस्ट १९२० रोजी लोकमान्यांचे दु:खद निधन झाले. स्थूल गणिताचा ग्रहलाघव हा ग्रंथ सोडून अनेक पंचांगकर्ते करणकल्पलता करणग्रंथावरून आपापली पंचांगे तयार करू लागले. महाराष्ट्रातील सर्व पंचांगकर्त्यांनी शके १८७२ ( सन १९५०-५१ ) पासून दृक् गणित स्वीकारले. याचे सर्व श्रेय लोकमान्य टिळकांच्या अथक मेहनतीस जाते.
आकाश दर्शनासाठी !
आता आपण पंचांग-दिनदर्शिकांचा आकाशदर्शनासाठी कसा उपयोग करायचा ते पाहूया. चंद्रमहिन्यांच्या नावावरून रात्रीच्या प्रारंभी कोणते नक्षत्र पूर्व आकाशात दिसेल ते समजते. चैत्र महिन्यात चित्रा वगैरे ! तिथीवरून चंद्राची स्थिती कळते. शुक्ल अष्टमीला सूर्यास्ताच्यावेळी चंद्र मध्य आकाशापाशी असतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सूर्यास्ताच्यावेळी उगवतो. कृष्ण अष्टमीला चंद्र सूर्यास्तानंतर साधारण सहा तासांनी उगवतो. चंद्रप्रकाशाचा आकाशदर्शनात अडथळा होऊ नये म्हणून तिथी म्हणजेच चंद्राची स्थिती माहीत असणे आवश्यक आहे.
दररोज चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे ते पंचांग-दिनदर्शिकेत दिलेले असते. त्यावरून नक्षत्रज्ञान आपणास होऊ शकते. चंद्रग्रहणे व सूर्यग्रहणे याविषयी माहिती पंचांगात दिलेली असते. त्याप्रमाणे ग्रहणांचे खगोलप्रेमीना निरीक्षण करता येते. ग्रह सूर्याच्या जवळ आला की सूर्यप्रकाशामुळे आपणास दिसत नाही. ग्रहांच्या लोप-दर्शनांचे दिवस पंचांग दिनदर्शिकेत दिलेले असतात. पंचांगात दिलेल्या लग्न कोष्टकात वर्षभरात कोणत्याही वेळी पूर्व क्षितिजावर कोणती राशी उगवत असते ते दिलेले असते. तसेच प्रत्येक ग्रह कोणत्या राशीत आहे ही माहिती दिलेली असते. त्यावरून कोणता ग्रह कुठे दिसेल तेही समजू शकते. पंचांग -दिनदर्शिकेत ग्रह , तारका आणि चंद्र यांच्या युतींचे दिवस दिलेले असतात. या युत्या त्या त्या दिवशी निरीक्षण करणे खगोलअभ्यासकांना त्यामुळे शक्य होते.
काही पंचांगात उल्कावर्षावांच्या तारखाही दिलेल्या असतात. तसेच कोणत्या महिन्यात आकाशात काय दिसेल याचीही माहिती दिलेली असते तीही खगोलप्रेमींना उपयुक्त असते.
पंचांग-दिनदर्शिका म्हणजे आकाशाचे वेळापत्रक ! हे वर्षभराचे आकाशाचे वेळापत्रक तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात पंचांग- दिनदर्शिकेच्या स्वरूपात असतेच परंतू त्याचा उपयोग कसा करायचा हे आपणास माहीत नसते. ती माहिती जर आपण करून घेतली तर दूरवर असणारे आकाश नक्कीच आपल्याजवळ येईल.
पंचांग सुधारणा
पंचांगात पूर्वी सर्व वेळा या घटिकापळात देण्यात येत होत्या. आपण सर्वजण भारतीय प्रमाणवेळ दाखविणारी घड्याळे वापरतो. लोकाना समजायला सुलभ व्हावे म्हणून पंचांगातही तशीच भारतीय प्रमाणवेळ देण्यात येऊ लागली. संपूर्ण भारतात अनेक पंचांगे प्रसिद्ध होत असतात. पूर्वी पंचांगे प्रसिद्ध झाल्यावर मतभिन्नतेवर वृत्तपत्रातून बातम्या येत होत्या. आता महाराष्ट्रातील पंचांगे प्रसिद्ध होण्यापूर्वी सर्व पंचांगकर्त्यांची बैठक होते. काही मतभिन्नता असेल तर चर्चा होते. नंतर पंचांगे प्रसिद्ध होतात. महाराष्ट्रात निर्णयसागर, दाते, कालनिर्णय, रूईकर, लाटकर, राजंदेकर, ढवळे, जन्मभूमी, बम्बई समाचार इत्यादी प्रमुख पंचांगे प्रसिद्ध होत असतात.
संपूर्ण भारतात प्रकाशित होणा-या पंचांगामध्ये अजुनही काही मतभेद आहेत. इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना भारतातील सर्व पंचांगकर्त्यांची सभा नवी दिल्ली येथे बोलावण्यात आली होती. मी त्या सभेला उपस्थित होतो. परंतू विद्वान पंचांगकर्त्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. उत्तर भारतात चांद्रमास हे पूर्णिमांत धरले जातात. त्यांच्या पंचांगातील चांद्रमास हा कृष्ण प्रतिपदेपासून शुक्ल पौर्णिमेपर्यंत असतो. तर महाराष्ट्र व दक्षिण भारतात चांद्रमास अमांत असतो. तो शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होऊन अमावास्येला संपतो. वर्षारंभाविषयी असेच आहे. काही राज्यांत चैत्र शुक्ल प्रतिपदेला वर्षारंभ होतो तर काही राज्यांत कार्तिक शुक्ल प्रतिपदेला वर्षारंभ होतो. अनेक मतभिन्नता आहे. कोणीही माघार घ्यायला तयार नाही. कधी कधी एकच गोष्ट दोन प्राचीन ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिली असल्याने कोणता ग्रंथ प्रमाण मानायचा हा प्रश्न येतो. अजूनही भारतातील सर्व राज्यातील पंचांगांमध्ये सुसुत्रता येणे गरजेचे आहे. पंचांगकर्त्यांची स्वत:ची वेधशाळा असावी असे लोकमान्य टिळकांना वाटत होते.
पंचांगगणित हे दृक् गणित असल्याने यात मनभिन्नता होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सूर्यबिंबमध्य, चंद्रबिंबमध्य आणि पृथ्वीमध्य विचारात घेऊन तिथीचे गणित केलेले असते.
=====================

Tuesday, December 6, 2022

जन्म-पुनर्जन्म

 अद्वैत तत्वज्ञानानुसार मृत्यूनंतर माणसाचे चैतन्य (म्हणजे आपण) कोठेही जात नाही. कारण मुळात चैतन्य हे सर्वव्यापी आहे. म्हणजेच आपल्याला पुनर्जन्म नाही. जर जन्मच नसेल तर पुनर्जन्म कसा असेल?

चैतन्याची मनात पडलेली प्रतिमा आपल्या अंत:करणाच्या अहंकार भागाशी तादात्म्य पावते आणि आपल्या चेतासंस्थेमार्फत सर्व शरीरात पसरते. ही चैतन्याची प्रतिमा चेतासंस्थेमार्फत देहात पसरत असल्याने आपल्याला आपला देह चैतन्यमय जाणवतो. ही प्रतिमा अंत:करणाच्या 'अहंकार' या भागाशी तादात्म्य पावत असल्याने आपल्याला ही चैतन्याची प्रतिमा म्हणजे 'आपला' आत्मा वाटते. एखाद्या स्वच्छ लोलकाशेजारी लाल जास्वदांचे फुल ठेवले तर लोलकाचा रंग लाल भासतो (याला शास्त्रात 'उपाधी' असे नाव आहे). खरे तर लोलक रंगहीनच असतो. परंतु लाल फुलाच्या सानिध्यामुळे तो लाल आहे असे भासते. तद्वतच मनाच्या सानिध्यामुळे मनात येत असलेल्या भावना - राग, लोभ, सुख, दु:ख - या आपल्या चैतन्यात उगम पावल्या आहेत असे आपल्याला वाटते. खरे तर त्या रंगहीन लोलकासारखे आपले चैतन्य निरंजन असते- त्यावर कोठलाही परिणाम झालेला नसतो. आपण म्हणजे आपले चैतन्य निर्विकारच असते.
आपल्या देहाच्या मृत्यूनंतर आपले सूक्ष्म शरीर अन्य देहात जाते. सूक्ष्म शरीर हे एकोणीस घटकांचे बनलेले असते. पाच ज्ञानेंद्रियांच्या (नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ) शक्ती, पाच कर्मेंद्रियांच्या (तोंड, पाय, हात, गुदद्वार, लैगिक इंद्रिये) शक्ती, पंचप्राण (प्राण, आपण, समान, उदान, व्यान), अंत:करणाचे चार भाग (मन, बुद्धी, अहंकार, चित्त) असे हे एकोणीस घटक आहेत. अंत:करणाच्या चार भागांसोबत आपण मिळवलेले ज्ञान, आपल्या वासना, कर्मे इत्यादी पुढील जन्मात जातात. मात्र आपण - म्हणजेच आपले चैतन्य कोठेही जात नाही. जसे एखादे स्वप्न आपल्या मनात घडते तसे हे जन्म आणि पुनर्जन्म आपल्या चैतन्यातच घडत असतात. जसे झोपेतून उठल्यावर (जागृतावस्थेची जाणीव झाल्यावर)आपले स्वप्न संपते तसेच आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूपाची -तुर्यावस्थेची-जाणीव झाल्यावर हे आपल्या सूक्ष्म देहाचे जन्म-पुनर्जन्माचे रहाटगाडे थांबते.
मला आणि आपणा सर्वांना या जन्मातच आपल्या ब्रह्मस्वरूपाची जाणीव होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
संतोष कारखानीस ठाणे

Monday, December 5, 2022

अनंत : अद्वैत वेदांताची संकल्पना

 वेदांतानुसार आपण अनंत आहोत. मात्र मायेच्या प्रभावामुळे आपल्याला आपण बद्ध झाल्यासारखे वाटते. 

ही  बद्धता तीन प्रकारची असते. 

१> एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी असेल तर ती अन्य ठिकाणी असणे शक्य नाही. म्हणजेच त्या वस्तूला स्थलाचे (space) बंधन आहे.  आपण आता आपल्या घरी आहोत, म्हणजेच अन्य ठिकाणी असणार नाही, रस्त्यावर असणार नाही. याला प्राचीन भाषेत 'देशपरिच्छेद:' असे म्हणतात. परिच्छेदाचा शब्दश: अर्थ 'कापणे' आहे. या अवकाशाचे विभाजन केले तर या ठिकाणी तुम्ही आहात. (किंवा तुमच्यामुळे या अवकाशाचे विभाजन झालेले आहे). जे देशापरिच्छेद करत नाही म्हणजेच एकाचवेळी सर्वठिकाणी असते (Omnipresent) त्याला 'देशापरिच्छेदशून्य' असे म्हणतात. अद्वैत वेदांतानुसार ब्रह्म हे  देशापरिच्छेदशून्य आहे.. 

२> दुसऱ्या प्रकारची बद्धता हे काळासंदर्भात असते. प्रत्येक वस्तू ही काही ठराविक काळातच अस्तित्वात असते. लहान कीटक काही काळ अस्तित्वात असतात, मानव कदाचित शंभर वर्षे  अथवा त्याच्या आसपासच्या काळापर्यंत अस्तित्वात राहू शकेल, तारे कदाचित काही कोटी वर्षे अस्तित्वात राहू शकतील. पण याला काही मर्यादा आहे. याला प्राचीन भाषेत 'कालपरिच्छेद:' असे म्हटले आहे. बुद्धाच्या मते ज्याची सुरुवात आहे त्याला अंतही आहे. जे कालाचे विभाजन करीत नाही, म्हणजेच अनंत काल उपलब्ध होते आणि राहणार आहे त्याला कालपरिच्छेदशून्य (Omnipresent) असे म्हटले आहे. अद्वैत वेदांतानुसार ब्रह्म हे कालपरिच्छेदशून्य आहे. 

३> तिसरी बध्दता ही नाम-रूपासंबंधी (Object) आहे.  एखादी वस्तू ही ती वस्तूच आहे आणि अन्य काहीही नाही. हे म्हणजे एखाद्या वस्तूला तिचे विशेषत्व देण्यासारखे आहे (Law of idendity). एखादी वस्तू 'अ' आहे याचाच अर्थ ती 'ब' 'क' इत्यादींपासून वेगळी आहे.  मी 'संतोष कारखानीस ' आहे याचाच अर्थ मी अन्य कोट्यवधी माणसांपासून वेगळा आहे.  मला - माझ्या या देहाला आधार कार्ड क्रमांक मिळाला की मी आपोआप अन्य देहांपासून वेगळा ओळखला जातो.  हा आहे 'वस्तूपरिच्छेद:'. एखादी गोष्ट वस्तुपरिचछेदशून्य असेल तर याचाच अर्थ अन्य कोठलीही गोष्ट या वस्तूपासून भिन्न नसेल. अर्थातच ही वस्तूपरिच्छेदशून्यता अद्वैताकडे निर्देश करते. 

म्हणजे जर एखादी गोष्ट या तीनही बध्दांतांच्या पलीकडे असेल तर ती स्थलातीत, कालातीत आणि अद्वैत असेल. हाच अद्वैत वेदांतानुसार 'अनंत' या शब्दाचा अर्थ आहे. जर एखादी गोष्ट अशी अनंत असेल तर तेथे दुसरी कोणतीही गोष्ट असणे शक्य नाही. ज्यावेळी आपल्याला आपल्या या अनंतस्वरूपाचा बोध होईल तेव्हा आपण या आयुष्यातील दु:खांच्या पलीकडे जाऊ. 

माझ्यासह आपणा सर्वांना आपल्या या अनंतस्वरूपाचा या जन्मताच बोध व्हावा ही परमेश्वराचरणी प्रार्थना.