Sunday, September 6, 2020

माणूसजन्म : डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई

पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई  

(सदरहू लेखात खालील पारिभाषिक संज्ञा वापरल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी मूळ इंग्रजी शब्द कंसात दिले आहेत.
· नरवानर Humans and Nonhuman Primates
· नर Human male
· नारी Human female
· वानर Nonhuman Primates
· माकड Monkeys
· कपी Apes)

पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्; असं करत करत, चौऱ्यांशी लक्ष योनीतून प्रवास केल्यावर मनुष्यजन्म प्राप्त होतो म्हणतात. पण जन्ममृत्यूचं हे चक्र नसून ही साखळी आहे; जननी आणि जठर काळाच्या ओघात जैसे थे राहिलेलं नाही; बदलत, बदलत गेलंय असं उत्क्रांतीशास्त्र सांगतं. मानवी शरीर, त्याची अचंबित करणारी रचना आणि आश्चर्यमुग्ध करणारे कार्य म्हणजे ह्या साखळीचा कित्येक पिढ्यांचा वारसा आहे. मनुष्यमात्रांच्या पृथ्वीवरील आगमनापूर्वी, काही लक्ष नव्हे, तर काही कोटी जीव इथे नांदून गेले आहेत. मागे, मागे, मागे जात राहिलो तर आपला वंश पहिल्यावाहिल्या सजीवापाशी पोहोचेल. पण इतकं मागे जाण्याऐवजी, इह संसारे आगमनाचा मानवी जन्मसोहळा इतका दुस्तर का?, माणसाच्या माद्या का आणि कशा वितात?; हे समजण्यासाठी थोडेसेच मागे गेलो तरी चालेल.

वरच्या वाक्यातले ‘माणसाच्या माद्या’ आणि ‘वितात’ हे शब्दप्रयोग तुम्हाला धक्कादायक किंवा असभ्य वाटतील पण वस्तुनिष्ठपणे विचार केला तर दोन्ही अगदी बरोबर आणि रास्त आहेत.

मनुष्य हा प्राणीच आहे आणि आपले खाणे, जुगणे, रतणे, प्रसवणे इतकेच काय वागणेही उत्क्रांतीचीच देन आहे. मनुष्याला पुनरुत्पादनासाठी फुटवे फुटत नाहीत (Asexual Reproduction) ते लैंगिक फलनातूनच (Sexual Reproduction) साधले जाते. माणसाला अंडी घालताच (Oviparity) येणार नाहीत. थेट पिल्लांना जन्म देणं (Viviparity) हेच मानवी औत्क्रांतिक भागधेय आणि हो माणूस हा स-स्तन प्राणी. त्यामुळे पिल्लांना अंगावर पाजणे आणि तेही फक्त माद्यांनी, हे तर मस्टच. याबरोबर संप्रेरके (Hormones), सरपटणाऱ्या (सरीसृप, Reptiles) पूर्वजांकडून; वार (Placenta), पिल्लावणाऱ्या (Viviparous) पूर्वजांकडून आणि जननमार्ग नर-वानर पितरांकडून आपल्याला वारसाहक्कानी प्राप्त आहे. या उत्क्रांती मंथनातूनच द्वीपाद चाल, मोजकी संतती, पिल्लांचा निगुतीने सांभाळ, ‘रक्त-मूल’ अशा प्रकारची वार आणि मोठाच्या मोठा मेंदू ही वैशिष्ठ्ये तयार झाली आहेत. (Hemochorial म्हणजे रक्त-मूल प्रकारच्या वारेत, आईच्या रक्तात बाळाच्या वारेची मुळे तरंगत असतात. आई आणि बाळाच्या रक्ता दरम्यान फक्त तीनच पदरांचा पापुद्रा असतो)


हां, तर मी काय सांगत होतो, माणसाच्या माद्या वितात त्या काही विशिष्ठ पद्धतीने. माणसाचं (Humans) आणि माकडांचं (Monkeys) नातं डार्वींननी स्पष्ट केलेलंच आहे. आपण चुलत भावंड आहोत. म्हणजे माकडापासून माणूस उत्क्रांत झाला असं नाही. तर जसे आपले आणि आपल्या चुलत भावंडांचे आजोबा एकच होते तसे माणसाचे आणि माकडाचे पूर्वज एकच होते. पण माकडांपासून फारकत घेतल्यावर माणसाच्या फांदीला गोरीला, चिम्पॅंजी अशा कपिकुळाच्या फांद्या फुटल्या. (चित्र क्र १) माणसाच्या होमो या प्रजातीत (Genus) इतरही काही भाईबंध होते. होमो हॅबिलीस, होमो निअंडरथॅलेसीस इत्यादि. पण हे ‘इतर सगळे’ काळाच्या उदरात लुप्त झाले. वंशखंड झाला त्यांचा. माणूस, होमो सेपीएन, तेवढा टिकला. नुसता टिकलाच नाही तर निसर्गाच्या नाकावर टिच्चून त्याचा वंश फुलला, फळला, फळफळला. सारी पृथ्वी त्यानी पादाक्रांत केली आणि कमाल म्हणजे ह्या साऱ्याची तीव्र जाणीव, जिज्ञासा त्यात उत्क्रांत झाली. आसपासच्या सृष्टीसोबतच स्वतःकडे इतक्या कुतुहलाने आणि कौतुकाने पहाणारा मनुष्य एवढा एकच प्राणी.

हां, तर मी काय सांगत होतो, मानवी माद्या वितात त्यांची काही खासियत आहे. एक तर माणसांत बाळंतपण खूपच अवघड आहे, वेळ खाऊ आहे, शक्तिपात करणारे आहे. इतके की कुणाच्या मदतीविना, कोणी ‘सोडवल्या’विना माणसाच्या मादया सुखरूप वितील अशी शक्यता कमी. नारींच्या मानानी माकडी, वानरी आणि कपी माद्या सहज वितात. हे असं आहे आणि हे असंच आहे ह्याला काही जीवशास्त्रीय, औत्क्रांतिक कारणे आहेत.


माणसाच्या मादया वितात तेंव्हा पिल्लाचा प्रवास मादीच्या जननमार्गातून, एका अरुंद बोगद्यातून होतो. आपल्यापैकी सीझरने जन्मा घातलेले वगळता, सर्वांना हा प्रवास करावा लागला आहे. हा प्रवास अगदी अद्वितीय आहे. जननमार्ग म्हणजे योनिमार्ग. योनि म्हणजे जणू भरपूर ताणता येईल अशी इलॅस्टिकची नळी आहे. (चित्र क्र २) हिच्या आतल्या टोकाला गर्भाशय आहे आणि बाहेरच्या टोकाशी बाह्यांग. कमरेच्या हाडांच्या कडीतून योनीमार्गाची ही नळी आरपार जात असल्याने, ताणले जाण्याला अर्थात कमरेच्या हाडांची मर्यादा आहे. योनीमार्ग ताणला जात असल्याने हाडांच्या कडीच्या आतील माप हेच जननमार्गाचे माप. हीच्या मागच्या बाजूला माकड हाड आहे. हे सुमारे सहा इंच लांब आणि पुढच्या बाजूचे हाड जेमतेम दीड इंचाचे. (चित्र क्र ३) पण हा प्रवास पिल्लाचं अंग पिळवटून टाकणारा आहे. पिळवटून म्हणजे शब्दश: पिळवटून टाकणारा. ह्याचे कारण म्हणजे हा बोगदा सरळसोट नाही. त्याला थोडा पीळ आहे. उभ्या आणि आडव्या अश्या दोन्ही अक्षांवर पीळ आहे. ह्या वळणानुसार बाळाचा प्रवास व्हावा लागतो. मूलत: ह्या बोगद्यात शिरायची जागा लांबटगोल असते. हा लंबगोल पुढूनमागे चपटा असतो आणि बाजूबाजूला ताणलेला. बाहेर यायची जागाही

(बाह्यांग) लंबगोल असते; पण ही बाजूबाजूने चेपलेली असते आणि पुढून मागे चांगली ताणलेली असते. म्हणजेच ह्या बोगद्याचा लांबट व्यास काटकोनात (९००) वळलेला असतो. शिवाय या बोगद्याच्या प्रवेशाचे तोंड आणि एक्झिटचे तोंड समोरासमोर नसतात. आत शिरताना पार्श्वदिशेला, माकडहाडाच्या दिशेला, जाणारा मार्ग आतल्याआत ५५०त वळून, बाहेर पडताना पुढच्या दिशेला तोंड करुन असतो. म्हणजे बाळाचे मुटकुळे ह्या अरुंद घाटमार्गातून (उभ्या अक्षात) नव्वद अंशातून पिळून आणि (आडव्या अक्षात) पंचावन्न अंशातून वळून यायला पाहीजे. (चित्र क्र ४) बाळ कळेगणिक खाली, खाली, आणि शेवटी बाहयांगातून बाहेर ढकलले जाते. पण वाटेत इतके आळोखेपिळोखे द्यायचे म्हणजे मामला अवघड होणारच.

आणखी एक भानगड असते. बाळाचे डोके चेंडू सारखे गोल गरगरीत नसते. ते अंडाकार, निमुळते असते. हे डोक्याचे अंडे निमुळत्या दिशेने बाहेर येणे सुकर. अंडे आडवे आले तर दुष्कर. जर बाळ नतमस्तक (Flexed) असेल तर हनुवटी छातीशी आणि नाकाचा शेंडा त्याच्या पायाच्या दिशेला राहील. अंडाकृती डोक्याचे मागच्या टाळूचे निमुळते टोक जननमार्गत शिरेल. जर बाळानी मान वर केली तर परिस्थिति बिनसेल. जन्मापासूनच मान वर करून न पहाणे किती महत्वाचे आहे पहा!!


वानरींचा (Nonhuman Primates) जननमार्ग हा नारींच्या मानानी सरळसोट असतो. (थोडासा एका दिशेने चेपलेला) वानरीसूतांचे डोकेही त्यात सहज बसेल असे (जर्रा चेपलेले) असते. बाकी एकूणच ऐसपैस जागा असल्याने चिंपांझीणी वगैरे झटक्यात बाळंत होतात. बाळ सुळकन् बाहेर येते. वेळही बराच कमी लागतो. वेदनाही कमी होत असाव्यात. तोंडातून सहसा ब्र सुद्धा निघत नाही. फार किंचाळलं वगैरे तर ती मादी आणि पिले कोणाच्या तरी भक्ष्यस्थानी पडायची शक्यता जास्त. त्यामुळे उत्क्रांती दरम्यान सहनशक्ती आणि सुकर प्रसूती असं दोन्ही घडत गेलं.


नारींत आणि वानरींत मूल जन्मताना डोक्याकडून बाहेर येते. पायाळू होणे, म्हणजे डोक्याऐवजी आधी पाय किंवा ढुंगण पुढे येणे. दोघींतही, बाळाला आणि बाळंतीणीला, हे त्रासदायक ठरते. कुठेही, कधीही, प्रवेश करताना आधी ढुंगण पुढे करणे असभ्यच की!! शिवाय मानवी पिल्लू जन्मतः आईच्या गुदद्वाराकडे तोंड करुन जन्माला येतं. बाकी ओरांगउटांग, मार्मोसेट, बबून अशा बहुतेक वानरींत उलटं असतं. पिल्लू आईच्या मूत्रमार्गाकडे तोंड करुन बाहेर येतं. थोडक्यात वानरी, प्रसूत होताना, खाली वाकून आपल्या पिल्लाचं तोंड पाहू शकतात. नारींना हे ‘मुहं दिखाई’चं सुख नाही. पण याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे वानरी आपल्या आपण बाळाच्या डोक्याला आधार देऊन प्रसंगी ते धरून बाहेर ओढून घेऊ शकतात. ह्या अवस्थेत आधार दिल्यास बाळाचे डोके अधिकाधिक नतमस्तक होते. त्याचा निमुळता भाग योनीमुखाशी येतो. नारी असं करू शकत नाहीत. (चित्र क्र ५) तसा प्रयत्न केलाच तर अंडाकार डोक्याचा निमुळता भाग पुढे येण्याऐवजी रुंद भाग पुढे येईल. बाळाने ‘मान वर केली’ (Extended Neck) असा अर्थ होईल. बाह्यांगाला मोठीच इजा होईल.

त्यामुळे मनुष्याच्या मादीला बाळंतपणात कोणीतरी दिमतीला असावं लागतं. डॉक्टर किंवा दाई तरी हवी; किमान आई तरी हवी. त्यामुळे आज माणसाच्या मुली डिलिव्हरीसाठी माहेरी येतात. गोरीलाच्या मुली येत नाहीत. सुईण ही अगदी आदीम गरज आहे. वेश्या किंवा वकिली हा आद्य व्यवसाय नसून सुईण हा आद्य व्यवसाय आहे. आदि-मातांची ही गरज आदि-सुईणी पुरवत आल्या आहेत. त्यांच्या लुडबुडीने काही थोडे भले होत होते. ही लुडबूड उत्क्रांतीधारेत उपकारक ठरत होती. सुईणपण, दाईपण माणसाच्या वागणुकीत कोरली जात होती. ‘ज्ञानी राखीजे अलिप्तता; अवधान दिजे, धरी अपेक्षा; करी कदापी न उपेक्षा, जन्मवेळी’। (अध्याय १८, ओवी २७)*; (Masterly inactivity with watchful expectancy) हे आधुनिक प्रसूतीशास्त्राचे ब्रीद आहे. पण आदि सुईणींना हे शिकवणार कोण? त्या आपल्या त्यांच्या अंतःप्रेरणेने बायका सोडवत होत्या.
(* ही ओळ माझ्याच, अद्याप एकच ओवी लिहून झालेल्या, आगामी ग्रंथातील आहे. गैरसमज नसावा.)

कळा वाढाव्यात म्हणून ह्या पोट चोळतात. पोटावर दाबून, प्रसंगी पोटावर स्वार होऊन, बाळ बाहेर येण्यास मदत करतात. मूल पायाळू असेल तर ते फिरवण्याचे प्रयोग सुइणींनी केले आहेत. विविध प्रकारे बाह्यांगमर्दन करून, तेले लावून जननमार्ग सैल आणि बुळबुळीत करण्याचे प्रयत्न ज्ञात आहेत. पाणमोट फोडणे, पिशवीचे तोंड ताणणे, विटप-छेद (बाह्यांग छेदणे, Episiotomy)केलेले आहेत. प्रसवेशी संग केला असता वीर्यामुळे प्रसूती जलद होते असेही एक प्राचीन निरीक्षण आहे. सुईणींनी ह्यालाही उत्तेजन दिलेले आहे. इतकंच काय, सर्व आदिम संस्कृतीत उदर-जननाच्या (Caesarean birth) कथा आहेत. बाईला सोडवण्यासाठी केलेत तसे बाळाला ‘रडवण्यासाठी’ ह्या सुईणींनी अनेक उपाय केले आहेत. बाळाला उलटे धरणे, फटके मारणे, गार/गरम पाण्याचे हबके मारणे, चोळणे असे अनेक. काही गैर, काही दुरुस्त.

हे प्रकार शतकानुशतके नव्हे, सहस्त्रानुसहस्त्रके चालू आहेत. अशा प्रकारे सहजीवाला सहकार्य करायला लावणारं हे अवघड बाळंतपण उत्क्रांतीच्या ओघात निपजलंच कसं?

उत्क्रांती शास्त्रानुसार इथे सक्षम ते टिकतात. ‘सक्षम’ म्हणजे मोठे होऊन पुढच्या पिढीला जन्म देऊ शकणारे. उत्क्रांतीच्या भाषेत बहुतेकदा ते तेवढेच सक्षम. म्हणजे बाळ-बाळंतीण सुखरूप राहतील अशी रचना, अशी क्रिया, अशी वागणूक उत्क्रांती दरम्यान पिढ्यानपिढ्या संक्रमित होत जाणार. ह्याच्या विपरीत रचना, क्रिया, वागणूक असणारे नर-वानर उत्क्रांतीच्या स्पर्धेत बाद ठरणार. त्यांचा वंशखंड होणार. थोडक्यात जी रचना आज दिसत्येय, जी क्रिया आज होत्येय, जी वागणूक आज प्रत्ययास येत्येय; ती तर औत्क्रांतिक पुण्यसंचिताचे नवनीत म्हणून आहे. वानरींत एवढी सुलभ असणारी प्रसूतीक्रिया नारींत इतकी अवघड का? तर ही सगळी स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची आणि भलामोठा मेंदू बाळगण्याची फळं भोगतोय आपण.

स्वतःच्या पायावर उभं रहायचं तर खुबे लांबलांब असलेले बरे. मग ते तसे उत्क्रांत झाले. पण मग जननमार्ग मागून पुढे असा अरुंद झाला आणि प्रसूती अवघड झाली. उभ्या देहाच्या वजनाची मदार आता माकडहाडाला पेलावी लागली. मग माणसांत माकडहाड जाड, जड आणि ठळक झाले. त्या भानगडीत ते जरा जननमार्गात सरकले आणि प्रसूती अवघड झाली.

त्याच वेळी माणसाचा मेंदूही मोठा मोठा होत होता. शेवटी तो अशा अवस्थेला पोहोचला की आता ह्याहून मोठा झाला तर बाळाचे डोके जननमार्गतून बाहेर येणेच अशक्य होईल. मग अशी बाळे जन्मालाच येणार नाहीत. ती मरतील. त्यांच्या आयाही अशा अडलेल्या बाळंतपणात मरतील.

मग उत्क्रांतीच्या ओघात यावर अनेक नामी तोडगे निघाले. रिलॅक्सिन ह्या संप्रेरकांच्या प्रेरणेने, माद्यांच्या कमरेचे सांधे किंचित सैल होऊ लागले. कमरेचे कडे किंचित विस्तारू लागले. माणसाच्या माद्या एकमेकींना, बाळंतपणात कंबर ढिली झाल्याचं सांगतात, ते काही खोटं नाही. माणसाच्या बाळाचे डोके जन्मसमयी लिबलिबीत राहू लागले. त्यामुळे डोक्याचा आकार अधिकाधिक निमुळता होऊन डोके जननमार्गाबाहेर येते. जन्मतः माणसाच्या पिल्लांची डोकी लांबोळकी, जिरेटोप घातल्यासारखी दिसतात ती यामुळेच. पुढेही चांगली दीड दोन वर्षाची होईपर्यंत कवटीची हाडे जुळून येत नाहीत. त्यात लिबलिबीत फटी रहातात. हाताला सुद्धा जाणवतात त्या. त्याला टाळू म्हणतात. झपाझप वाढणाऱ्या मेंदूला सामावून घ्यायला लवचिक कवटी बेस्ट. जन्मवेळी आईच्या कटीत मोठी कवटी मावूच शकणार नाही. त्यामुळे जन्मानंतर मेंदूची झपाट्याने वाढ (Encephalisation) हा औत्क्रांतिक बदल माणसांत घडून आला, मानववंशात सामावला गेला.

जन्मानंतरही मेंदूची झपाट्याने वाढ झाल्याचे फायदे तोटे दोन्ही झाले. वानरीच्या पिल्लांचा ५० ते ६०% मेंदू जन्मतः तयार असतो. नारीच्या पिल्लांचा जेमतेम २५%. म्हणजे मेंदू दृष्ट्या माणसाची पिल्लं, पूर्ण दिवसाची पण ‘अपुऱ्या वाढीची’ निपजतात (Secondary Altriciality). माकडीच्या किंवा वानरीच्या पिल्लांसारखी ती आपलीआपण आईला बिलगून धरू शकत नाहीत. मुठीत धरायला नारींच्या अंगावर वानरींसारखे केसही नसतात आणि नन्ह्यामुन्न्यांच्या बाळमुठीत तेवढं बळही नसतं. त्यांना सतत अंगाखांद्यावर वागवावं लागतं. पुढेही बराच काळ त्यांना वाढवावं लागतं, पढवावं लागतं, तेंव्हा कुठे ती हाताशी येतात.

मेंदू जसा जन्मानंतर वाढतो तशाच माणसातील अनेक गुंतागुंतीच्या जैवरासायनिक क्रिया, प्रतिकारशक्ती, वगैरेही ‘अपुऱ्या वाढीच्या’ असतात, कच्च्या असतात. जन्मानंतर त्या सावकाश आणि यथावकाश पिकतात. विविध अवयव सक्षम असण्याच्या दृष्टीने विचार केला तर माणसाच्या बाळाला अजून तीन ते सहा महीने गर्भवास हवा, असा निष्कर्ष निघतो. आपल्या निएनडर्थल भगिनींत एक वर्षाची गर्भावस्था असायची. पण मेंदू मोठा मोठा होत गेल्याने माणसांत नवव्या महिन्यातच प्रसूती आणि पुढे परावलंबी पण झपाट्याने वाढ असा सुवर्णमध्य उत्क्रांत झाला आहे. कसा ते पाहू या.

असं बघा; खरंतर आई आणि बाळ यांच्यात निम्मीच गुणसूत्र समान असतात. म्हणजेच आई आणि बाळ ही जनुकीय दृष्ट्या भिन्न भिन्न जीव असतात. त्यांचे रक्तगटही बरेचदा भिन्न असतात. भिन्न व्यक्तीचे रक्त, त्वचा, अवयव असं काही आपलं शरीर सहजासहजी स्वीकारत नाही. सहसा अशा परकीय पेशींचा नायनाट करण्याची यंत्रणा अगदी चोखपणे आपलं काम बजावत असते. यालाच प्रतिकारशक्ती म्हणतात. मग हा परका जीव आईच्या उदरात रुजतोच कसा? वाढतोच कसा? मूळ धरायच्या आत समूळ उच्चाटन व्हायचं, तिथे भरण, पोषण, पालन, संवर्धन कसं होतं? या प्रश्नाला अनेक उत्तरे आहेत.

कल्पना करा की आईची प्रतिकारशक्ती बाळाचे ‘वेगळे’, आईला ‘परके’ असे रेणु, म्हणजे मुख्यत्वे प्रथिने, पाहू शकते. अशी रेणु/प्रथिने नजरेस पडली की ती त्यांचा नायनाट करणार. म्हणजे गर्भपात होणार. आईच्या प्रतिकारशक्तीची दृष्ट लागू नये म्हणून बाळाला अनेक पातळ्यांवर संरक्षण असते. त्यातील एक महत्वाचा अवयव म्हणजे वार. ह्या वारेतून बाळाला हवे ते पोहोचवले जाते आणि नको ते परत घेतले जाते. वारेत आई आणि बाळाचे रक्त आमनेसामने येतं; पण एकमेकांत मिसळत नाही. रक्त वेगवेगळं ठेवणारा पापुद्रा अनेक पदरी असतो. अश्वकुळातील (Genus Equus) प्राण्यांत हा सहा पदरी असतो (Epitheliochorial Placenta). त्यामुळे मातेच्या प्रतिकारशक्तीच्या अपरोक्ष बाळ सुखेनैव वाढत असतं. त्या तट्टाला मोठेपणी लागणारी बरीचशी प्रथिन-सामुग्रीही गर्भावस्थेतच प्राप्त होते.

माणसांत असं नसतं. माणसांत वारेचा हा पापुद्रा अगदी पातळ, म्हणजे तीनच पदरी (Hemochorial) असतो. त्यामुळे आईच्या प्रतिकारशक्तीच्या डोळ्यावर येणार नाहीत एवढीच आणि अशीच प्रथिने माणसाच्या बाळात असतात. पचन, चलनवलन, संरक्षण इत्यादीसाठी लागणारी संपूर्ण सामुग्री जन्मानंतर यथावकाश निर्माण होते. कारण ह्या निर्मिती दरम्यान बाळाचे अनन्य असे रेणु निर्माण होतात. ते जर आईच्या प्रतिकारशक्तीच्या नजरेस पडले तर आफतच. त्यामुळे माणसाचे बाळ जन्मतः खूपच हतबल असतं. घोड्याचं बाळ जवळपास घोडा म्हणूनच जन्माला येतं पण माणसाच्या बाळाचा ‘एवढा मोठा घोडा’ व्हायला बराच वेळ लागतो.

पण ह्या निव्वळ तीनपदरी वारेचा एक मोठाच फायदा असतो. गर्भावस्थेत मेंदूच्या जलद वाढीसाठी त्याला सतत ग्लुकोजचा खुराक लागतो. ही ग्लुकोजची रसद पुरवायची तर त्याला अशी पातळ वारच हवी. सहा पदरी वारेतून मिळणाऱ्या ग्लुकोजवर, माणसाच्या मेंदूएवढा मेंदू, पोसलाच जाणार नाही. म्हणजे बलिष्ठ मेंदू आणि हतबल, परावलंबी, प्रदीर्घ, शैशव हे माणसाच्या बाळाचे औत्क्रांतिक प्रारब्ध आहे.

अर्थात जन्मानंतरही मेंदूला ग्लुकोजचा खुराक लागतोच. तो आता स्तन्य देऊन पुरवावा लागतो. ह्या स्तन्यातील घटकही प्राण्यागणिक बदलत जातात. सील, डॉल्फिन वगैरेंच्या पिल्लांत मेंदूची बरीचशी वाढ गर्भावस्थेतच पूर्ण झालेली असते. त्यांच्या दुधात साखर (दुग्धशर्करा Lactose) जवळपास नसतेच. माणसाचा मेंदू जन्मोत्तरही उत्तरोत्तर वाढणारा. त्याला भूक फार. त्यामुळे माणसाच्या मादयांच्या दुधात दुग्धशर्करा (Lactose) भरपूर. शर्करा हे इन्स्टंट फूड आहे तर चरबी हे साठवून वापरता येईल असे अन्न आहे. पिल्ले सतत आसपास असणाऱ्या माणसाच्या माद्या शर्करायुक्त दूध स्त्रवतात. जरा भुकेजली की यांची पिल्ले लगेच लुचतात. पिल्लांना सोडून लांब लांब जाणाऱ्या, सिंहिणी, हरिणी वगैरे चरबीयुक्त दूध स्रवतात. आई पुन्हा परत येईपर्यंत त्यांची भूक भागली पाहिजे ना. व्हेलच्या पिल्लांना ऊब राखायला भरपूर चरबीची गरज असते. व्हेलीणीच्या दुधात निम्मी चरबी असते. म्हणजे साय किती निघेल ते बघा!!

जन्मानंतर माणसाचा ‘माते-बाहेरचा-गर्भवास’ (Exterogestation) सुरू होतो. आईला ह्याची मोठीच किंमत चुकवावी लागते. वारेतून पोसण्यापेक्षा स्तन्यावर बाळ पोसणे तसे ‘अवघड’ आणि ‘महाग’ असते. पण हा वरवर आतबट्याचा वाटणारा सौदा अंतिमतः फायद्यात पडतो. कारण गर्भाशयात जे शक्य नसते ते इथे सुरू होते. गर्भस्थ जीव आता समाजस्थ होतो. मेंदू इथे दुधावर पोसला जातो तसा आसपासच्या पर्यावरणावरही पोसला जातो. वास, स्पर्श, दृष्टी आणि श्रवण अशा माध्यमातून; आई, बाबा, समाज यांच्या सान्निध्यातून, शिकत शिकत शेवटी माणसाचे पिल्लू भाषावधानी बनतं. उत्क्रांतीचं संचित ते बरोबर घेऊन आलेलं असतं; त्याला आता संस्कृतीचं संचित प्राप्त होणार असतं.

वानरी म्हणजे सुलभ प्रसूती आणि सबल पिल्लू. नारी म्हणजे अवघड बाळंतपण आणि अनघड पिल्लू. पण नारीचे पिल्लू आपल्या मेंदूच्या बळावर आज पृथ्वी व्यापून, सृष्टी समजावून घेत आहे. वानरीचे पिल्लू पिढ्यानपिढ्या जैसे थे आहे.

जीव सृष्टीतील सारेच जीव तसे एकमेवाद्वितीय. पण आपली मादी विते, म्हणजे त्यामागे इतके सगळे घडते, ही जाणीव, हे कौतुक, फक्त मनुष्यालाच प्राप्त होऊ शकते. सृष्टीतील काही अणुरेणू एकत्र आले आणि तुम्हांआम्हां हा मनुष्यदेह प्राप्त झाला. मग दुर्मिळ असा हा मनुष्यजन्म, पुनर्जन्माच्या पारलौकिक विवंचनेत वाया घालवायचा, का हे सृष्टीचे कौतुक जाणण्यासाठी सार्थकी लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.

Thursday, July 23, 2020

शुक्रवाराची जिवतीची कहाणी

ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी.
Image may contain: 1 person, standingआटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. “ अग अग सुईणी, मला नाळवारीसुद्धां एक मुलगा गुपचुप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन.” सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली.

गांवांत एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हां ही सुईण तिच्या घरीं गेली, तिला सांगूं लागली कीं, “बाई बाई, तूं गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखूं लागेल तेव्हां मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन.”

तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली, “बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरांत एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचींच दिसताहेत. तेव्हां आपल्या घरापासून तों तिथपर्यंत कोणास कांही कळणार नाहीं असं एक गुप्त भुयार तयार करावं.

आपल्यास कांहीं दिवस गेल्याची अफवा उठवावी. “मी तुम्हांस नाळवारीचा मुलगा आणून देईन.” असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला, आणि जसजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणं डोहाळ्याचं ढोंग केलं. पोट मोठं दिसण्याकरितां त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं. नऊ मास भरतांच बाळंतपणाची तयारी केली.

इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखूं लागलं. सुईणीला बोलावूं आलं त्याबरोबर “तुम्ही पुढं व्हा, मी येतें,” म्हणून सांगितलं. धांवत धांवत राणीकडे आली, पोट दुखण्याचं ढोंग करूं सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरीं आली. “बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहींस, नाहीं बांधलेस तर भय वाटेल.” असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली, मुलगा झाला.

सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला, आणि तिच्यापुढें ठेविला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगूं लागली. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्यें दुःखी झालीं. सुईण निघून राजवाड्यांत गेली.

राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊं लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणामासीं दर शुक्रवारीं जिवतीची पूजा करावी, आणि नमस्कार करून म्हणावं कीं, ‘जय जिवतीआई माते! जिथं माझं बाळ असेल, तिथं खुशाल असो.” असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमीं वागूं लागली.

इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशीं बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशीं ही न्हाऊन आपल्या अंगणांत राळे राखीत बसली होती. तेव्हां याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्रीं तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्रीं तिच्या घरीं आला. दारांत गाय-वासरूं बांधली होतीं. चालतां चालतां राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला. वांसराला वाचा फुटली. तें आपल्या आईला म्हणालं, “कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला?” तेव्हां ती म्हणाली, “जो आपल्या आईकडे जावयास भीत नाहीं, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय?” हें ऐकून राजा मागं परतला आणि घरीं येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली.

काशीस जाऊं लागला. जातां जातां एका ब्राह्मणाच्या इथें उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होतीं. पण तीं पांचवी-सहावीच्या दिवशीं जात असत. राजा आला त्या दिवशीं चमत्कार झाला. पांचवीचा दिवस होता. राजा दारांत निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणूं लागली, ‘ कोण ग मेलं वाटेंत पसरलं आहे ?” जियती उत्तर करिते, “ अग अग, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी कांहीं त्याला ओलांडूं देणार नाहीं.” मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचीं आईबाप चिंता करीत बसलीं होती. त्यांनीं हा संवाद ऐकला.

इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनीं निघून गेल्या. उजाडाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. “तुमच्यामुळें आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा.” अशी विनंती केली राजानं ती मान्य केली. त्याही रात्रीं याचप्रमाणं प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला.

इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशींत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळीं ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरीं जा. सार्‍या गांवांतल्या बायकापुरुषांस जेवायला बोलाव. म्हणजे याचें कारण समजेल.”

मनाला मोठी चुटपुट लागली. घरीं आला. मोठ्या थाटानं मामदं केलं.त्या दिवशी शुक्रवार होता. गांवांत ताकीद दिली. “घरीं कोणीं चूल पेटवूं नये. सगळ्यांनीं जेवायला यावं,” ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला. “मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन.” राजानं कबूल केलं. जिथं तांदुळाचं धूण होतं तें काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहींत. कारल्याच्या मांडवांखालून गेलीं नाहीं. दर वेळेस “जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असॊ,” असं म्हणे.

पुढं पानं वाढलीं. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढतां वाढतां ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढूं लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडांत उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. कांहीं केल्या उठेना. तेव्हां त्याची आई गेली. त्याची समजूत करूं लागली. तो म्हणाल, “असं होण्याचं कारण काय?” तिनं सांगितलं कीं, “ ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई.” असं सांगून सर्व हकीकत सांगितली.

नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धां आपण राज्य करूं लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

Tuesday, July 21, 2020

बुध-बृहस्पतींची कहाणी

ऐका बुधबृहस्पतींनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्याच्या घरीं रोज एक मामाभाचे भिक्षेला जात. राजाच्या सुना “आमचे हात रिकामे नाहींत” म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांस दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणं भिक्षेला आले. सर्व सुनांनीं सांगितलं, “असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले.” सर्वांत धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला. होतं तेव्हां दिलं नाहीं, आतां नाहीं म्हणून नाहीं. ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पायां पडली. त्यांना सांगूं लागली, “आम्हीं संपन्न असतां धर्म केला नाहीं ही आमची चुकी आहे. आतां आम्ही पूर्वीसारखीं होऊं, असा कांहीं उपाय सांगा,” ते म्हणाले, “श्रावणमासीं दर बुधवारीं आणि बृहस्पतवारीं जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पति प्रवासीं जाऊन घरीं येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुलीं काढावीं. संपत्ति पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावीं. त्यांची मनोभावें पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा. म्हणजे इच्छित हेतु पूर्ण होतात.” त्याप्रमाणे ती करूं लागली.

एके दिवशी तिला स्वप्न पडलं, “ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढतें आहें.” ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केला. इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाहीं म्हणून तेथील लोकांनीं काय केलं? हत्तिणीच्या सोंडेंत माळ दिली व तिला नगरांत फिरविलं, “ज्याच्या गळ्यांत माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल,” अशी दौंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळींनीं त्याला हांकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरविली. पुन्हा त्याच्याच गळ्यांत माळ घातली. याप्रमाणं तीनदां झालं. पुढं त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा तीं अन्न अन्न करून देशोधडीस लागल्याची खबर समजली.

मग राजानं काय केलं? मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारों मजूर खपूं लागले, तिथं त्याचीं माणसं आलीं. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्यें संतोष झाला. तिनं बुध-बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविलि. देवानं देणगी दिली, पण जावांनीं थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनांत ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातांत चांदीचं भांडं दिलं. तूप वाढूं सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनीं तें पाहिलं. त्याचा सन्मान केला. मुलंबाळं झाली. दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले.

जशी त्यांवर बुध-बृस्पतींनीं कृपा केली, तशी तुम्हां आम्हांवर करोत. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

Monday, July 20, 2020

मंगळागौरीची कहाणी

mangalagaur-kahaniआटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणालें, “आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.” असं बोलून बोवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितलं.

वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरंदारं आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटीं पुत्र नाहीं, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाहीं, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्माध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे.” त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपति आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरीं नेण्याकरितां घेतले. खालीं उतरून पाहूं लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं चार पांच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणूं लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे.” हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हें घडतं कसं ? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं.

उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपीं गेलीं. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प क-यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळीं उठून आईला तें वाण दे.” तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. कांही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बि-हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली, तों आंत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळयला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाहीं.” रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो ? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडो लोक येऊन जेवूं लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगूं लागला, “मला असं असं स्वप्न पडलं.” मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाहीं.” दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नव-यानं आंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असता. ही सगळी तिची कृपा.” सासर माहेरचीं घरचींदारचीं माणसं सर्व एकत्र झाली, आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.

तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरईं सुफळ संपूर्ण.

Sunday, July 19, 2020

प्रस्तावना : श्रावणातील कहाण्या

Image may contain: textमहाराष्ट्रात पूर्वीपासून श्रावणात कहाण्या सांगण्याची पद्धत आहे. या कहाण्यांतून अंधश्रद्धेची जोपासना हा मुख्य हेतू नव्हता तर समाजाला सामाजिक मूल्यांची जाणीव करून देवे हा प्रधान हेतू होता. मी शाळेत असताना माझ्या आजीला या कहाण्या त्या त्या सणाच्या दिवशी वाचून दाखवीत असे. आता आपला हा अमूल्य सामाजिक ठेवा लुप्त होऊ लागला आहे. म्हणून आपल्या आठवणी जगविण्यासाठी आणि नव्या पिढीला या ठेव्याची ओळख करून देण्यासाठी मी ही श्रावणातील कहाण्यांची लेखमाला आपल्या ग्रुपवर सुरु करीत आहे. सोमवारी यातील पहिली कहाणी असेल.
या कहाण्या मी लिहिलेल्या नाहीत तर आपल्या परंपरेतून आलेल्या आहेत. मी केवळ तुमच्यापर्यंत आणण्याचे काम करणारा भारवाही हमाल आहे.
#श्रावणातील_कहाण्या

क‍हाणी दिव्यांच्या आमावस्येची

Image may contain: indoorऐका दीपकांनो, तुमची कहाणी. एक नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा.
त्यांनी रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे. रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या आमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. ही घरांतून निघाल्यावर तें बंद पडलं.
पुढं अमावस्येच्या दिवशी राजा शिकार करून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार घडला. आपले गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गप्पा मारीत आहेत. कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हावचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत.
इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू? मी ह्या गावाच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला. तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा उदरांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी तिची फजिती झाली. सासू-‍‍दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणन मला हे दिवस आले. ती दरवर्षी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो! असं म्हणून त्या दिव्याने तिला आशीर्वाद दिला. 
घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरीं आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलें आहे काय? म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्‍या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करु लागली. जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो! साठा जन्माची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Wednesday, July 1, 2020

अपरोक्षानुभूती : भाग १

'अपरोक्षानुभूती' या अद्वैत वेदान्ताच्या दुसऱ्या प्रकरणग्रंथाच्या निरूपणाला आता  मी सुरुवात करीत आहे. वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्कचे मुख्य आचार्य स्वामी सर्वप्रियानंद यांच्या व्हिडीओ प्रवचनांचा आधार प्रामुख्याने या निरूपणाला आहे. 
वेद हा कदाचित माणसाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात जुना ग्रंथ आहे. कमीतकमी चार हजार वर्षे हा वेदांचा काळ समाजाला जातो. उपनिषदे वेदांचाच एक भाग आहेत. त्यांना 'वेदांत' असेही म्हटले जाते. वेदांत या शब्दाचे दोन अर्थ होतात. वेदांचा शेवटचा भाग हा एक अर्थ. पण अनेक उपनिषदे ही वेदांच्या मध्येच आलेली आहेत. त्यामुळे हा अर्थ नसावा. एखाद्या गोष्टीचे उच्चतम शिखर असाही 'अंत' शब्दाचा अर्थ होतो. उदा. 'सिद्धांत' . त्यामुळे वेदांचे उच्चतम शिखर असाही अर्थ होऊ शकतो. आणि तोच योग्य असावा. अद्वैत वेदान्ताचे मुख्य प्रवर्तक आद्य शंकराचार्य यांनी दहा अथवा अकरा उपनिषदांवर भाष्य केले आहे. भगवतगीतेचा उपनिषदे हा एक आधार आहे. उपनिषदातील अनेक कल्पना गीतेत जश्याच्यातशा येतात. तसेच उपनिषदातील सार ब्रह्मसूत्रांत आहे. भगवतगीता आणि ब्रह्मसूत्रांवरही शंकराचार्यांनी भाष्य केले आहे. म्हणूनच उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यांना 'अद्वैत वेदांताची प्रस्थानत्रयी'  असे म्हणतात. 
अद्वैत वेदान्ताच्या स्पष्टीकरणासाठी आद्य शंकराचार्य आणि नंतरच्या आचार्यांनी काही ग्रंथ लिहिले. त्यांना 'प्रकरणग्रंथ' असे नाव आहे. अपरोक्षानुभूती हा स्वत: शंकराचार्यांनी लिहिलेला प्रकरणग्रंथ आहे. शिवाय त्यावर अद्वैत वेदान्ताचे दुसरे मोठे आचार्य विद्यारण्यस्वामी (विजयनगर साम्राज्याचे प्रवर्तक) यांनी भाष्य लिहिले आहे. म्हणूनच या प्रकरणग्रंथाचे खूप महत्व आहे. 
यापूर्वी आपण द्रष्टा-दृश्य विवेक' या प्रकरण ग्रंथाचा अभ्यास केला आहे. 'अपरोक्षानुभती' हा ग्रंथ आपल्याला त्यापेक्षा खूप वरच्या पातळीवर घेऊन जातो. 
या ग्रंथाच्या सुरुवातीलाच अध्यात्म साधनेसाठी आवश्यक असलेल्या नियमांची माहिती देतो. त्याला 'साधनचतुष्टय' असे नाव आहे. त्यानंतर हा ग्रंथ 'मी कोण आहे' या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणजे आपले शरीर, मन नाही हे सर्वच ग्रंथ सांगत असतात. पण हा ग्रंथ आपण शरीर/मन का नाही याचे विस्तृत विवेचन करतो. 'आपण अध्यात्मिक अनुभवाच्या शोधात निघालेले मानवी जीव नाही तर मानवी अनुभवाच्या शोधार्थ निघालेले अध्यात्मिक जीव आहोत'  याची हा ग्रंथ जाणीव करून देतो. आपले स्थूल शरीर आणि आपले सूक्ष्म शरीर या दोन्हीपलीकडे आपण म्हणजेच आपले चैतन्य आहे. या चैतन्याचा प्रत्यक्ष परिचय अनुभवातून करून देणे हाच या ग्रंथाचा प्रधान उद्देश आहे. 'अपरोक्षानुभूती' या शब्दाचाच तोच अर्थ आहे. 
यानंतर हा ग्रंथ आपल्या भोवती पसरलेले विश्व हे सुद्धा ब्रह्मच आहे हे दाखवून देते. शेवटी हा ग्रंथ आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूपाची जाणीव होण्यासाठी पंधरा विविध उपाय (techniques) सुचवितो. प्रथमदर्शनी आपल्याला या पंधरा पायऱ्या वाटतात. पण प्रत्येक पायरी ही आपल्याला चैतन्याचा अनुभव करून देण्यास समर्थ आहे. 

Friday, June 19, 2020

मद्य वेद

*मद्य वेद:* (संदर्भ : हेमंत कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट)
भारतीय संस्कृतीत मद्य परंपरा खूप प्राचीन काळापासून समृद्ध आहे. विविध प्रकारची मद्ये तयार आणि सेवन केली जायची.
मद्यपान भारतात कधीच निषिद्ध नव्हते. फक्त ब्रिटिश सत्ता आणि पेशवाईचा काही काळ सोडला तर मद्यपान बंदी भारतात कधीच नव्हती. मद्यपान करणे हे तुच्छतेने पाहिले जात नव्हते. विविध मद्य निर्मिती विधी हे रिकाम्या वेळचा विरंगुळा नव्हता. म्हणूनच विविध मद्य प्रकार आणि त्यांचे गुण दोष यांची सविस्तर चर्चा आयुर्वेदात आहे. तसाच बहुतेक प्राचीन लिखाणात मद्यपान विधी मुक्तपणे, सहजतेने वर्णन केलेला आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे स्त्रियाही मद्यपान करत असत. उल्लेखनीय गोष्ट अशी, की, मद्य हे मर्यादित प्रमाणात घ्यावे हेही सांगितले आहे. अति मद्यसेवन हे फक्त आरोग्यच नव्हे तर दैनंदिन जीवन सुद्धा दूषित आणि नष्ट करते ही सूचनाही केलेली आहेच.
*या सर्व माहितीत अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आजच्या सारखी मद्याला निंदा नालस्ती सोसावी लागत नव्हती.* उत्तम प्रतीचे मद्य बनवण्याचे विधी, त्यांना विविध सुगंध देणे, त्यांचं सेवन करणे वगैरे माहिती विस्ताराने दिली आहे.
मद्याचे अगदी जुने उल्लेख सर्वात प्राचीन ज्ञात साहित्य जो ऋग्वेद, त्यात आहेत. त्यात सोम या नावानं मद्याचा उल्लेख आहे. या रसाचा *मद आणणे* हा गुण तत्कालीन लोकांना ठाऊक होता. *मद आणणारे ते मद्य.* त्यामुळे सर्व दैनिक कर्तव्ये संपवून घरी परतल्यावर तत्कालीन वैदिक लोक *श्रम परीहारा साठी यथेच्छ मद्यपान करीत.*
त्यानंतर महाभारत काळात इतर मद्य प्रकारांचे उल्लेख आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी आधी मद्य निर्मिती सुरू करत असत. त्याशिवाय योद्धे वीरश्रीने लढत नसत. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी दुर्योधनाने आधी मद्य निर्मिती सुरू करण्याची आज्ञा दिली होती. मद्याचे अनेक औषधी उपयोगही माहीत होते. मद्यपान हे श्रम परिहार म्हणून करणही संमत होतं. महाभारत हा ग्रंथ तत्कालीन समजुती, चालीरीती याबद्दल जास्त माहिती देतो. त्यानुसार मद्यपान निंदनीय नव्हतं. सहकुटुंब, मित्र आणि त्याचा परिवार यांच्या सोबतही मद्यपान, भोजन होत असे.
सगळं कसं ओळखीचं वाटतंय ना!! आजही मद्यपान या विषयाबद्दल याच धारणा आहेत. याला आपल्या पूर्वजांचा द्रष्टेपणा म्हणायचं की आपली परंपराप्रियता?
मद्य या पेयाबद्दल आयुर्वेदाचा अभिप्राय असा आहे: मद्य हे अग्नि दीपक, रूचीदायक, उष्ण, तुष्टी-पुष्टी दायक, मधुर गुणांचे आहे. (इथे मी अन्य अनावश्यक, दुर्बोध अन्य गुण उल्लेख टाळले आहेत.) स्वर, आरोग्य, प्रतिभा आणि त्वचेला कांतिदायक आहे. निद्रानाश आणि अतिनिद्रा यावर उपयुक्त आहे. कृश त्व आणि स्थूल पणा दोन्ही नष्ट करणारे आहे. *योग्य मात्रेत घेतल्यास वात कफघ्न आणि अधिक मात्रेत विषाप्रमाणे मारक आहे. नवीन मद्य त्रिदोष कारक तर जुने मद्य त्रिदोष नाशक आहे.* उन्हात फिरून आल्यावर, उष्ण आहार, चर्या तसच विरेचन केलेल्यांना मद्य वर्ज्य समजावे. अति संहत, अति स्वच्छ, गढूळ, दाट मद्य पिऊ नये. भूक लागली असताना मद्य प्राशन करू नये.
मद्याचा इतका सूक्ष्म अभ्यास अन्य कुठल्याही संस्कृतीत झालेला नाही.
आता भारतीय मदिरा प्रकार पाहूया.
*वारूणी:* हिला *प्रसन्ना* असंही म्हणतात. ही तांदूळ पीठ किंवा ताड/खजूर यांच्या पेंडीतील रसापासून तयार करतात. ही हृदयाला उत्तम; दमा, वांती, पोट फुगी, पडसे नाशक आहे.
या मदिरेचा सध्या उल्लेख हिमालय आयुर्वेद कंपनीच्या "Pure Hands" या sanitizer वरच्या घटक पदार्थांत आहे.
*वैभितकी*: ही बेहड्यापासून बनवलेली असते. ही सौम्य मादक आणि पथ्यकारक असते. ही पंडुरोग आणि कुष्ठ रोग असताना घेतली तरी चालते.
*यव सुरा*: ही यव म्हणजे बार्ली पासून करतात. ही मलावरोधक आणि त्रिदोष कारक असते.
*कौहली*: ही कोहळ्या पासून केलेली मदिरा.
*मधूलक*: ही मोहाच्या फुलांपासून केलेली मदिरा. ही कफ कारक आहे. कोणत्याही इतर फुलांच्या मदिरेलाही मधूलकच म्हणतात.
*मार्द्विक*: ही मदिरत मनुकांपासून बनवली जाते. ही हृदयाला उत्तम, मधुर, अल्प दोष कारक आणि कृमींचा नाश करणारी आहे.
*खार्जुर मद्य*: मार्द्वी क सारखेच गुण परंतु वात कारक आहे.
*शार्कर*: हे मद्य साखरेपासून बनवतात. हे मधुर, सुगंधी, हृदयाला उत्तम आणि सौम्य मादक असते.
*गौड*: हे मद्य गुळापासून बनते. हे मल, मूत्र आणि अपान वायू उत्सर्जक, उष्ण आणि पाचक आहे.
*शीधू*: हे उसाच्या रसापासून बनवलेलं श्रेष्ठ मद्य असतं. हे मेद, कफ विकार, सूज, उदर रोग यांचा नाश करतं.
याशिवाय मैरेयक, शंडाकी, सौविरक वगैरे मद्य प्रकार आहेत.
यात पूर्वी सांगितलेला "सोमरस" आणि "सुरा" असे दोन ठळक भेद आहेत. सोमरस सौम्य मादक आणि सुरा ही जास्त मादक. म्हणजे बहुधा आत्ताच्या वाईन आणि हार्ड ड्रिंक असा फरक असावा. यजुर्वेदात तर या दोन्हींचे कॉकटेल सुद्धा सांगितले आहे. सोमरस हे त्या काळी देवांचे मादक पेय तर सुरा ही मानवांचे मादक पेय होते.
Distillations प्रक्रियेचा उल्लेख वाजसनेयी संहितेत आहे. ही क्रिया हैहय क्षत्रिय काळात सुरू झाली असावी असं अभ्यासक म्हणतात. मद्यांची उत्तेजकता वाढवण्यासाठी त्यांची मिश्रणे करण्याची पद्धत वेद काळापासून भारतीयांना माहीत होती.
सुरा तयार करणारे वैश्य असत. त्यांना *शौंडिक* म्हणत. कारण नि: सारण यंत्रात तयार झालेली मदिरा त्याच्या सोंडेसारख्या मुखातून थेंब थेंब उतरते. या मद्याची साठवण पखाल आणि बुधले यांत करत होते.
हे तयार मद्य चषक किंवा सुरई सारख्या पात्रात ओतले जाई.
मद्यपान विषयक बराच पुरावा महाभारतात आढळतो. भारतीय लोक त्याकाळी मद्यपान निषिद्ध मानत नव्हते. बलराम मद्यासक्त होता आणि कृष्ण सुद्धा मर्यादेत मद्यपान करत असे.
एवढंच नव्हे तर याबाबतीत स्त्रियाही आसक्त होत्या. गोभिल गृह्य सूत्रात विवाहानंतर नाव वधूचे अंग भिजेल इतक्या मद्याचे तिच्यावर सिंचन करावे असा प्रघात सांगितला आहे.
कुलीन स्त्रियांच्या मनमुराद मद्य प्राशन प्रसंगांची अनेक वर्णने महाभारतात आढळतात. स्त्री-पुरुषांच्या मद्यपानात फरक एवढाच होता की चवीला गोड असणारी माध्वी, मधु माधवी अशी मद्ये स्त्रियांना विशेष आवडत. ऋषिकन्या देवयानी आणि राजपुत्री शर्मिष्ठा यांनी वण भोजनाच्या वेळी मधु माधवी मद्याचे सेवन केले. कृष्ण आणि अर्जुन वन विहाराला सपत्नीक गेले तेव्हा कृष्णानं अर्जुनाला विवाहानिमित्त भेट दिलेल्या सहस्र सुंदरीही त्यांच्या सोबत होत्या. द्रौपदी आणि सत्यभामा सुद्धा होत्या. या सर्व स्त्रियांनी बेभान होईल इतकं मद्य सेवन केलं. कोणी चालताना अडखळू लागल्या, कुणी मोठ्यानं हसू लागल्या, कोणी गायन नृत्य सुरू केलं, कुणी भांडू लागल्या... रावणाच्या स्त्रिया मद्यासक्त होत्या. अशोक वनात रामाची सीतेशी भेट झाली तेव्हा त्याने स्वहस्ते तिला मद्य प्यायला दिले. वाली ची विधवा पत्नी तारा सुग्रिवाकडे त्याची राणी म्हणून जाताना धुंदी येण्या इतके मद्य सेवन करून गेली. सोवळ्या मानलेल्या रामायणात हे उल्लेख आहेत, हे विशेष.
यानंतर कालिदास काळ येतो. या काळात प्रतिष्ठित वर्गातच नव्हे तर बहुजन समाजात, एवढेच नव्हे तर स्त्रियांत सुद्धा मद्यपानाची प्रथा होती. त्याहीपुढे, त्याच्या लेखनात मद्यपानाचा किंचितही निषेध आढळत नाही. धनिक लोक सुगंधी मद्ये सेवन करीत. मद्ये सुगंधित करण्यासाठी आंब्याचा मोहोर, नीलकमल पाकळ्या किंवा पाने, पाटलीची फुले वापरीत. स्त्रिया व्यसन म्हणून, सौंदर्यवर्धक म्हणून, कामोत्तेजक म्हणून, शिष्टाचार म्हणून किंवा प्रिय जनांच्या आग्रहामुळे मद्यपान करत असत. अग्निमित्राची राणी इरावती मद्यप्राशन करून झिंगल्याचे वर्णन मालविकाग्निमित्र काव्यात आहे. कुमारसंभवात शिव स्वतः मद्य प्राशन करतोच आणि पार्वतीला सुद्धा पाजतो.
वेद काळात लोक मद्यांचा उत्तेजक द्रव्य म्हणून उपयोग करत असत. तरतरी व मद येण्यासाठी, युद्धात वीरश्री येण्यासाठी, प्रतिभेच्या विकासासाठी, वक्तृत्व ओघवते होण्यासाठी सोमाचा (मद्याचा) उपयोग होतो असे ऋग्वेदात वर्णन आहे. वैदिक लिखाणात कोठेही सोम प्राशनाचा निषेध केलेला नाही. उलट पुरस्कार केला आहे.
इसवीसनाच्या सुरुवातीला स्मृती निर्माण झाल्या. त्यात मद्यपान बंदी ही ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन *द्विज वर्गांवर* लादली गेली. स्मृतींमध्ये निर्बंध घातले, कडक शिक्षा निश्चित केल्या. पण त्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. कारण हे निर्बंध आणि शिक्षा व्यवहार नव्हे तर केवळ नीती तत्वे अनुसरून केले गेले. यांचा प्रसार आणि अंमल राजसत्तेने कधीही केलाच नाही आणि बहुसंख्य प्रजेचा पाठिंबाही या निर्बंधाना कधीच लाभला नाही.
इतिहास काळात चिनी पंडित युआन श्वांग (ह्यू एन त्संग) हा सातव्या शतकात भारतात आला. तेव्हाच्या महाराष्ट्रबद्दल लिहितो: *युद्धाला जाताना सर्व सैनिक मद्यपान करून धुंद होतात आणि मग एकेक भालाईत दहा हजार शत्रू सैनिकांना भारी ठरतो. सम्राट हर्षवर्धन देखील या शूर लोकांचे राष्ट्र जिंकू शकला नाही.*
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात दिलेली नियंत्रणे अधिक यशस्वी ठरली कारण ती व्यवहार्य होती. त्यांना राजाचा पाठिंबा होता.
सर्व प्राचीन, मध्य युगीन संस्कृत आणि प्राकृत ललित साहित्यात नायक, नायिका, धनिक, वणिक, राजपुरूष आणि राज स्त्रिया आणि सामान्य जन देखील मद्यपान करून धुंद होत असल्याची वर्णने आहेत. फक्त पुराण कालीन स्मृतींत मद्यपानाचा कडक निषेध आहे, जो व्यवहारात कधीच यशस्वी ठरला नाही. मदिरा, सरक आणि सीधू किंवा शीधू ही इक्षु मद्ये म्हणजे ऊसापासून तयार केली जाणारी मद्ये होती असं काही अभ्यासक सांगतात. तर सरक हे द्राक्ष मद्य होतं असं काही अभ्यासक मांडतात. पूर्वी ग्रीक आणि रोमन व्यापारी भारताला द्राक्ष मद्य निर्यात करत, तर अरब व्यापारी खजूर मद्याची. दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्खननात रिकामे रोमन मद्य कुंभ सापडले आहेत. मधुक/मधुरस हे मोहाचं मद्य तर सुरा हे तांदळाचं मद्य. कदंब फुलांपासून कादंबरी, वारूणी आणि हलिप्रिया ही मद्ये तयार होतात.
(मद्याला प्राचीन काळी सुद्धा *कादंबरी* नाव होतं. वाचन संस्कार किती उच्च असतील ते पहा. आणि आपल्या मैत्रांगणात जे ज्येष्ठ, गुणश्रेष्ठ आहेत त्यांनीही अशीच *वाचन संस्कृती* श्रेष्ठ मानली आहे. हे आपले मित्र खरे द्रष्टे, तपोनिष्ठ. त्यांनाही आत्ताच्या काळात हाच विचार सुचला म्हणजे त्यांची तपश्चर्या विपुल आणि कडक असणार यात शंकाच नाही मला!)
मोहाच्या फुलांची मदिरा लवकर तयार होते आणि कडक असते.
सुगंधी मद्य संपन्न लोकांनाच सेवन करता येई. कारण ताज्या मद्याचा उग्र दर्प नष्ट होण्यासाठी ते अनेक वर्षे साठवावे लागते. ते वेळोवेळी तपासत स्वच्छ, निर्जंतुक ठेवावे लागते. त्यानंतर त्यावर अनेक वेळा सुगंध संस्कार करावा लागतो. अगदी प्राचीन काळापासून जुनी, मुरलेली मदिराच श्रेष्ठ गुणांची असते हे भारतीयांना ठाऊक होतं. प्रत्येक मद्याची रुचि, स्वाद आणि मादकता वेगवेगळी असते. मद्य जितके ताजे, तेवढे स्वस्त, मादक आणि कडक असते. ते घसा भाजत पोटी उतरते आणि तात्काळ धुंदी आणते. मद्य जेवढे जुने तितके ते महाग असते. त्याची मादकता संथ गतीनं ताबा घेते. त्याची ऊब सुखद असते, जळजळीत नसते. ताजे मद्य हे वावटळ जशी अचानक वेगात येऊन सर्व काही सोसाट्याने सर्व काही आकाशी उडवून नेते तसा परिणाम घडवते. तर जुनी मदिरा वाऱ्याच्या संगती अलगद तरंगणाऱ्या फूल किंवा पानासारखी अलगद गगनभरारी घेण्याची अनुभूती देतं. म्हणून रसिक मद्योपासक जुनी मदिराच निवडतात. जी मद्ये ताजी असताना जास्त कडक असतात, तीच जुनी झाल्यावर सौम्य, सेवनिय होतात.
मद्य सेवन हे ऋग्वेद काळी करोत्तर नावाच्या कातडी पात्रातून होई. नंतर चषक आले. माती, धातू आणि स्फटिक यांचे चषक असत. अजिंठा लेण्यात मद्यपान प्रसंग कोरले आहेत. त्यात एकटे, जोडीने मद्य प्राशन करणारे दिसतात तसच मद्य कुंभ आणि चषकही दिसतात. तसच प्रत्यक्ष या वस्तू उत्खननांत सापडलेल्या आहेत.
मद्यपान करायला त्या काळीही घराव्यतिरिक्त जागा होत्या. ते तत्कालीन *बार*. खेडोपाडी झोपडीत असणाऱ्या या गुत्त्याना पान कुटी म्हणत. म्हणजे पिण्यासाठी झोपडी. कौटिलीय अर्थशास्त्रात पानागारांचा उल्लेख आहे. पुन्हा अर्थ तोच: पिण्याचे ठिकाण. त्यात या ठिकाणी स्वतंत्र खोल्या, त्यांत बैठकी व गाद्या, पुष्प पात्रे आणि पाण्याचे घडे असावेत अशी त्यानं मान्यता दिली आहे.

तर अशी ही मद्य विषयक भारतीय संस्कृतीत असलेल्या धारणा आणि आचार यासंबंधी माहिती. आता यात मराठी माणूस म्हणून काही गोष्टी मनोरंजक वाटल्या.
सातव्या शतकात सुद्धा मराठी लोक पराक्रमाची कीर्ती जगभर राखून होते. आता त्यामागे मदिरा प्राशन असल्याचं किरकोळ कारण दिलंय म्हणा. पण दहा हजार शत्रू सैनिकांना न आटोपणारा पराक्रम? तोही एक *चिनी माणूस* सांगतोय!! आचार्य अत्र्यांच्या बोलण्यात "दहा हजार वर्षे" हा शब्द प्रयोग असण्याचा उगम कदाचित या आचारात असेल, कारण तेही मदिरेचे रसिक होते. शिवाय मद्यपान केल्याचे फायदे जे दिलेत ते आत्ताही रसिक मदिरा भक्त सांगतात. शब्द थोडे निराळे असतील, पण मूळ अर्थ तोच. तसाच, आजही अति मद्यपान केल्यावर प्राचीन भारतीयांनी वर्णन केलेलं वर्तनच बेभान मद्यपी करतो.
एकूणच आपले पूर्वज ज्ञानी आणि द्रष्टे होते पण रसिक होते. ते जीवन समृद्ध पद्धतीनं जगले. त्यांना उत्तम उपभोग आणि अतिरेक यांच्या मर्यादा ठाऊक होत्या. त्या काळात देखील मद्याचे विविध प्रकार, त्यांचे रंग व स्वाद, distillery, बार वगैरे गोष्टी इथे होत्या. तसच मद्यपान हीन मानत नसत. परंतु जबाबदारीने पिणे याला प्रतिष्ठा होती. एकांती मदिरा पान आणि अन्य विलास यांना हेटाळणी च्या दृष्टीनं पाहिलं जात नसे. कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात इतर लोक डोकावून अनाहुत उपदेश करत नसत. नैतिकता ही कुटुंब आणि समाज यांना उपद्रव होऊ नये या गुणाशी निगडित होती. फक्त मद्यपी लोक हे राष्ट्राच्या अर्थ व्यवस्थेचे खंबीर आधारस्तंभ होते का, याबद्दल खात्रीशीर माहिती मिळाली नाही. त्याबाबतीत आताच्या काळात आपण एक पाऊल पुढे आहोत.
इति मद्याख्यानम्..
सर्वे s पि सुखिन: संतु..

Sunday, May 31, 2020

पराभवाचे श्राद्ध १-- लेखक जयंत कुलकर्णी

फेसबुकवरून साभार : लेखक जयंत कुलकर्णी 

नमस्कार!

आज एक नवीन लेखमालिका सुरु करतोय. ‘‘पराभवाचे श्राद्ध‘‘

चिनने जे भारतावर आक्रमण केले त्याची ही कहाणी. नवीन पिढीला हे सांगणे आपले काम आहे. आपली नाचक्की झाली असली तरी कोणी तरी हे सांगायलाच हवे. आता परिस्थिती बदलली आहे आणि भारताने या आक्रमणापासून बरेच धडे घेतले आहेत. पण योग्य राजकारणी जर सत्तेवर नसले तर काय होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. यात वादाचे मुद्दे बरेच आहेत पण जर या लेखात काही खोटे लिहिले असेल तरच वाद होऊ शकतो नाही तर यातून शिकण्यासारखेच खूप आहे. असो..

हे याच महिन्यात लिहीले पाहिजे.

हे युद्ध संपल्यानंतर मी आमच्या शाळेत आलेल्या एका सेन्याधिकाऱ्याला विचारले होते की हा पराभव पं नेहरूंमुळे झाला का आपल्या सैन्यामुळे(ज. कौल.) झाला ? त्यांनी विचारले की तुला यातील काय माहीती आहे. मी सांगितले की मी हिमालयन ब्लंडर वाचलेले आहे. अर्थातच मला तेव्हा गप्प बसवण्यात आले. ते योग्यच होते. कारण प्रश्र्न वयाच्या दृष्टीने जरा आगाऊपणाचाच होता. पण मित्रांनो जेव्हा असा प्रसंग तुमच्यावर येईल तेव्हा तुम्ही मात्र गप्प बसू नका.

पराभवाचे श्राद्ध!

भारताच्या सैनिकी इतिहासातील सगळ्यात मोठ्या आणि अपमानास्पद पराभवाला या महिन्यात ५८ वर्षे पूर्ण होतील. हा पराभव कसा साजरा करायचा हे मला समजत नव्हते. शेवटी ही लेखमालिका लिहावी असे ठरवले.

या घटनेची आठवण म्हणून ब्रिगेडियर जॉन दळवी यांच्या “हिमालयन ब्लंडर” या पुस्तकातील काही पानांचे स्वैर भाषांतर आपल्यासमोर ठेवत आहे... ते “कडू” मानून घ्यावे. पण यात राजकीय प्रवास जास्त आहे. प्रत्यक्ष लढाई कशी झाली हे वाचायचे असेल तर बरीच पुस्तके उपलब्ध आहेत.

( लेखाची भाषा माझी आहे )

No photo description available.छायाचित्र -१

पहाटे ५ वाजता नेफामधील शांत नामका चू खोऱ्याला तोफांच्या आवाजाने जाग आली. काय होत आहे हे कोणालाच कळेना. चिनी तोफखाना धडाडला आणि मागोमाग चिनी पायदळाने आक्रमण केले. तीन तासातच त्या खोऱ्यातील लढाई संपली. संपणारच होती ती, कारण ती लढाई होती दोन अतुल्यबळ सैन्यामधली. आसामला जाणारे सर्व रस्ते आता त्यांना मोकळेच होते. या पहिल्या दणक्याचा फायदा चिन्यांनी उठवला नसता तर नवलच. त्यांनी सरळ १६० मैल भारताच्या भूमीवर मुसंडी मारली आणि २० नोव्हेंबरला ब्रह्म्पूत्रेच्या खोऱ्यात आक्रमण केले. सेला आणि बोमडिलाच्या संरक्षण व्यवस्थेच्या चिंधड्या उडवत त्यांनी काहीही विरोध न होता तवांगवर कब्जा केला. भारताचे याला उत्तर फारच केविलवाणे होते. त्या उंचीवर युद्धाचे प्रशिक्षण नसलेले, त्या उंचीवर लागणारी युद्धसामग्री नसलेले, त्या हवामानाची सवय नसलेले आणि दूर १६०० मैलावर असलेले पंजाबमधील सैन्य घाइघाईने जमा करण्यात आले आणि त्यांना राजकारण्यांनी मोठ्या आवेशाने ‘चिन्यांना सिमेबाहेर फेकून द्या’ असे आदेश दिले. खरे तर आपल्या राजकारण्यांनी हे सगळे सैन्य चिनी सैन्याच्या नरड्यात अलगद सोडून दिले असे म्हणायला हरकत नाही. कारण या सर्व हालचालीत ना ठाम योजना होती ना खोलवर संरक्षणाची तयारी होती. या चिन्यांच्या विजयाचा सगळ्यात मोठा धक्का बसला तो आपल्या राजकारण्यांना नाही, तर चिन्यांना. त्यांनी मारे मोठ्या युद्धाची तयारी ठवली होती. ३०,००० ते ५०,००० सैनिक या युद्धासाठी त्यांनी सिमेलगत तयार ठेवले होते. पूर्वचाचणी म्हणून चिन्यांनी ८ स्प्टेंबरला थागला भागात घुसखोरी करून आपल्या इच्छाशक्तीची परीक्षा घेतली होती. अर्थातच नेहमीप्रमाणे आपल्या राजकारण्यांनी सिमेवरच्या नेहमीच्या किरकोळ चकमकी म्हणुन त्याकडे दुर्लक्ष केले होते.

No photo description available.छायाचित्र २
No photo description available.छायाचित्र ३

या नेफामधील पराभवाने भारतातील जनता खडबडून जागी झाली. सत्ताधाऱ्यांना आणि संरक्षणदलाला हादरे बसले पण सगळ्यात नुकसान झाले ते भारतीय जनतेचे. जनता पराभूत मनोवृत्तीच्या गर्गेत कोसळली. त्यांचा त्यांच्या पुढाऱ्यांवरचा विश्वास उडाला. यातून बाहेर पडायला पूढे दोन युद्धे जावी लागली. (पण राजकारणाच्या दृष्टीकोनातून जनता काही शिकली आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल)

या चिनी आक्रमणाच्या अगोदर आपल्या सत्ताधाऱ्यांची ठाम कल्पना होती की चीनबरोबर युद्ध होणारच नाही. (अपवाद फक्त सरदार पटेलांचा. त्यांनी पं. नेहरूंना १९५० मधे पत्र लिहून याची स्पष्ट कल्पना दिली होती व चीनला युनोमधे सिक्युरीटी कौन्सीलमधे प्रवेश देण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत ते योग्य आहेत का याचा फेरविचार करायला सुचवले होते. हे पत्र आपल्याला आजही उपलब्ध आहे आणि ब्रि. दळवींच्या पुस्तकातही दिले आहे.) हिंदी-चीनी भाई भाई चा नारा जगप्रसिद्ध होता आणि जे काही किरकोळ मतभेद होते ते टिबेटच्या निर्जन भागाच्या ताब्याबद्दल होते. (ज्या ठिकाणी गवताचे पातेही उगवत नाही त्याबद्दल फार विचार करायची आपली तयारी नव्हती) या किरकोळ मतभेदांमुळे सिमेवर काही चकमकी उडतील पण सर्वंकश युद्ध ? छे ! ते शक्यच नव्हते. असा गोड समज आपला झाला होता.

या आक्रमणाने भारताला धक्का बसला आणि त्यातून ते कधीच बाहेर आले नाहीत. (अर्थात आता असे म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण आपण आता या धक्क्यातून पूर्ण सावरलेलो आहोत आणि धक्का देण्याची ताकद ठेऊन आहोत) हा धक्का राजकीय पातळीवर, युद्धनितीच्या पातळीवर, आंतरराष्टीय राजकारणाच्या पतळीवरही तेवढाच जबरी होता. हिमालयाच्या या दुर्गम भागात, त्या थंडीत, आणि उंचीवर आपली ना युद्धाची तयारी होती. ना आमची मानसिक तयारी होती ना शारीरिक. गाफीलपणाची ही हद्द होती. आमची हिमालयात युद्ध लढण्याची तयारीच नव्हती. या आक्रमणाला आमचे उत्तर गोंधळाचे व भावनीक होते.

तेव्हाचे आपले राष्ट्रपती श्री. राधाकृष्णन म्हणाले “ आम्ही (आपले पंतप्रधान, राजदूत, मंत्री इ.) दुधखूळे आहोत आणि निष्काळजी राहीलो हेच खरे”........ भारताच्या सर्वोच्चस्थानावर बसलेल्या या माणसाची ही कबूली सगळे काही सांगून जाते.

आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान पं नेहरू यांनी या आक्रमणाचे विश्लेषण “चीनने आमच्या पाठीत सुरा खूपसला” असे केले. पण शत्रूच्या समोर आपली पाठ करायची नसते हे ते सोयीस्कररित्या विसरले होते. आपल्या आकाशवाणीवरच्या भाषणात ते म्हणाले,

“ मला सांगायला दु:ख होते आहे की आमच्या सैन्याला सिमेवर माघार घ्यावी लागली आहे. चीनी सैन्याची प्रचंड संख्या, तोफखाना, आणि चिनी सैन्याने बरोबर आणलेली अवजड युद्ध सामग्री याच्यापुढे त्यांनी टिकाव धरला नाही.”

ही धाडसी पण खेदजनक कबूली आपल्या देशाच्या सर्वोच्च अधिकारावर असलेल्या व्यक्तीला द्यावी लागली यासारखी दु:खद घटना ती काय.......

त्या वेळचे संरक्षणमंत्री त्यांच्या भाषणात म्हणाले,

“चीनी सैन्य हे आपल्या सैन्यापेक्षा सर्वच बाबतीत वरचढ होते. संख्याबल आणि दारूगोळा यात आपल्यापेक्षा ते फारच सरस होते. आमच्या जुनाट शस्त्रे व कमी संख्या असलेल्या सैन्यदलाला त्यांनी सहज हरवले”.

आपल्या देशाचे संरक्षण व संरक्षणदल ही या माणसाची जबाबदारी होती.

या पराभवाचे खरे कारण हे होते की सत्ताधाऱ्यांना चीनशी युद्ध करावे लागेल असे स्वप्नातही आले नव्हते. या स्वप्नरंजनातच या पराभवाची कारणे दडलेली आहेत...

क्रमश:.....
जयंत कुलकर्णी.

सप्तचिरंजीव प्रस्तावना लेखक : अभिजित खेडकर

अभिजित खेडकर यांच्या फेसबुक पोस्टवरून साभार 

भारतीय प्राचीन इतिहासातल्या अनेक गूढ संकल्पना आणि गोष्टींच गूढ आजही हजारो वर्षांनंतर तसच कायम आहे. पुराणांमध्ये वर्णन केलेले दशावतार, त्यातही अजून न झालेला आणि हे कलियुग संपवणारा कल्की अवतार, समुद्र मंथनातून देवांनी प्राप्त केलेलं आणि दानवांना अप्राप्य झालेलं अमृत, त्याच तोडीची विलक्षण संजीवनी आणि सोमवल्ली वनस्पती, आणि जगातल्या कुठल्याही अन्य प्राचीन संस्कृतीत नसलेले, मृत्यू वर विजय मिळवून अमरत्वाच वरदान मिळालेले सप्त चिरंजीव...

‘अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।’

या श्लोकात वर्णन केल्यानुसार अश्वत्थामा, बळीराजा, व्यास महर्षी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे ते सात चिरंजीव आहेत. खरंतर, आपण सगळ्यांनी या सप्त चिरंजीवांबद्दल लहानपणा पासून ऐकलय, वाचलय. तरीही यांच्या बद्दलचे अनेक प्रश्न जे आपल्या सगळ्यांच्या मनात कधी न कधी तरी रुंजी घालून गेले असतील जसे, ह्या चिरंजीवांचं अस्तित्व नेमकं कशासाठी आहे? चिरंजीव सातच का? खरच, कुणाला असं अमर होता येतं का? यांना असा चिरंजीवी होण्याचं वरदान म्हणा, शाप म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा नेमका कुणी दिला? आणि जर हे चिरंजीव खरंच अस्तिवात असलेच तर आत्ता या काळात नेमके कुठे असतील, काय करत असतील?

ह्या सातही व्यक्ती एका काळातल्याही नाहीत. अश्वत्थामा, व्यास, कृपाचार्य हे महाभारत काळातले, बिभीषण आणि हनुमान रामायण काळातले, परशुराम रामायण पूर्व काळातले रामांच्या आधीचे अवतार आणि बळी तर वामन अवतारातला. बिभीषण आणि बळी तर चक्क असुर कुळातले, तरीही त्यांना हे वरदान मिळालं. परशुराम हे एकाचवेळी अवतारही होते आणि चिरंजीवीही. अश्वत्थाम्याला चिरंजीवीत्वाचा श्राप देणारे कृष्ण हे अवतार असून त्यांना मात्र मृत्यू आहे. अश्वत्थामा सोडून उर्वरित सहा जणांना चिरंजीवीत्व हे वरदान आहे, अश्वत्थाम्याला मात्र त्याने केलेल्या अक्षम्य पातकाचा परिणाम म्हणून मिळालेल्या मस्तकावरच्या सतत भळभळत्या जखमेमुळे हा श्राप आहे. परशुराम सोडले तर बाकीचे सगळे चिरंजीव त्या त्या काळातल्या कथेतले मुख्य नायकही नाहीत, काही जण तर बळी आणि अश्वत्थाम्या सारखे चक्क खलनायक हीआहेत.

या सगळ्यांना फक्त चिरंजीवीत्वाचं वरदान आहे, चिरतारुण्याचं नाही. मग प्रश्न उरतो कि असं गलितगात्र शरीर घेऊन वर्षानुवर्ष जिवंत रहाण्याचं नेमकं औचित्य तरी काय असेल, आणि उद्देश तरी काय असेल. कल्की पुराणात याचा उल्लेख सापडतो, कि जेव्हा कल्की अवतार होतो तेव्हा कल्की ला भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी हे सर्व चिरंजीव शम्भल ग्रामी येतात. असेही म्हंटले जाते कि या सातही जणांचा उद्देश कल्की अवताराला सहाय्य करणे, आणि कलियुगाचा अंत करून पुन्हा सत्युगाची स्थापना करणे असा आहे. या सगळ्याचं चिरंजीवीत्व हे अनादी काळापर्यंत नाही तर कलियुगाच्या अंतापर्यंत आहे, त्या नंतर त्यांच्या अस्तित्वाच प्रयोजन संपेल.

या पुढच्या सात भागात आपण एकेक चिरंजीवाची चर्चा करणार आहोत. त्या प्रत्येकाचा इतिहास तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच, पण त्यांच्या बद्दल असलेल्या वेगवेगळ्या किवंदती, आख्यायिका, भारतात आणि भारताबाहेरही त्यांच्या अस्तित्वाचे दाखले देणारे स्थान, घटना आणि कथांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात.

मी हि लेखमाला लिहितोय याचा अर्थ मला सगळ्याच गोष्टी परिपूर्णपणे माहिती आहेत असं अजिबात नाही, पण आपल्या सगळ्यांना या विषयात माहिती असलेल्या अनेक गोष्टी, संदर्भ कॉमेंट आणि लिंक च्या स्वरुपात नक्की पाठवा, कारण त्या जाणून घ्यायची माझीही खूप मनापासून इच्छा आहे. प्रत्येक शनिवारी या लेखमालेतला एक एक भाग प्रकाशित करण्याचा प्रयत्न असेल.

आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या आणि शुभेच्छांच्या अपेक्षेत...
आपला,

©अभिजीत खेडकर.

सप्तचिरंजीव १ महाबली लेखक : अभिजित खेडकर

#सप्त_चिरंजीव_१_महाबली लेखक अभिजित खेडकर ((फेसबुक पोस्टवरून)

सप्त चिरंजीवांच्या श्लोकात उल्लेख आल्याप्रमाणे प्रथम नाव अश्वथाम्याचं येतं, परंतू जन्म कालक्रमानुसार पुराणकाळातील बळी किंवा महाबली याचा या यादीत पहिला क्रमांक लागतो.

Image may contain: 2 peopleबळी हा विष्णुभक्त प्रल्हादाचा पुत्र विरोचन याचा मुलगा. दक्ष प्रजापतीच्या दोन कन्या दिती आणि आदिती यांचा विवाह कश्यप ऋषींशी झाला. दिती पासून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोन पुत्र झाले, त्यांच्या वंशाला दैत्य (दितीपासून झालेले) असे संबोधले गेले, तर आदिती चा पुत्र इंद्र उत्पन्न झाला, त्याच्या वंशाला देव संबोधले गेले. नृसिहांनी हिरण्यकश्यपू चा वध केल्यावर त्याचा पुत्र प्रल्हाद दैत्यांचा राजा झाला. प्रल्हादाचा पुत्र विरोचन याला बळी हा पुत्र झाला.

देवांचे गुरु बृहस्पती आणि दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांच्या परस्पर विरोधी तत्वज्ञानाचा परिपाक म्हणून देव आणि असुर यांच्यात झालेल्या देवासुर संग्रामात अनेक वेळा दैत्यांना पराभव पत्करावा लागला. समुद्र मन्थनातून निघालेल्या अनेक शक्तींच्या सहाय्याने इंद्राने बळीचा वध केला. देव अमृत मिळवून अमर झाले, पण शुक्राचार्यांनी आपल्या मंत्रबलाच्या सामर्थ्याने बळी ला पुन्हा जिवंत केले. बळीने ब्रम्हांची तपश्चर्या करून स्वतःला अधिक सामर्थ्यशाली बनवले. गुरु शुक्राचार्यांच्या सल्ल्यानुसार त्याने शंभर अश्वमेध यज्ञ पूर्ण करायचा संकल्प सोडून तिन्ही लोकांवर, म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यावर आपले राज्य स्थापित केले.

आपल्या सामर्थ्याच्या बळावर नव्याण्णव अश्वमेध यज्ञ पूर्ण करून शेवटच्या शंभराव्या यज्ञाची तयारी करीत असतांना विष्णूंनी वामन अवतार घेऊन त्याच्याकडून तीन पद भूमी दान मागितली. शंभराव्या यज्ञपूर्ती नंतर खरंतर त्याचं त्रैलोक्याचं राज्य अखंड काळापर्यंत अबाधित राहीलं असतं. परंतू दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवायचं नाही या भूमिकेमुळे म्हणा किंवा माझ्या दारी प्रत्यक्ष विष्णूला याचक म्हणून यावं लागलं या अहंकारामुळे म्हणा, त्याने शुक्राचार्यांच्या विरोधाकडे साफ दुर्लक्ष करून वामनाची मागणी पूर्ण केली. एका पदात स्वर्ग, दुसऱ्यात पृथ्वीचं राज्य देवांसाठी दान देऊन, तिसरं पाउल ठेवायला जागाच उरली नाही म्हणून स्वतःच्या मस्तकावर पाउल ठेऊन घेत स्वतः पाताळाचं राज्य स्वीकारलं. विष्णूंनी त्याच्या भक्तीवर आणि दानीवृत्तीवर प्रसन्न होऊन त्याला चिरंजीवित्वाचं वरदान दिलं आणि त्याच्या विनंती नुसार स्वतः त्याच्या पातालसाम्राज्याचे रक्षक म्हणून बळी चे द्वारपाल ही भूमिका स्वीकारली. हि कथा आपणा सर्वांनी लहानपणापासून ऐकलीये, वाचलीये.

No photo description available.या बळी चे म्हणजेच महाबली चे राज्य पूर्वे पासून पूर्ण दक्षिण भारतापर्यंत पसरलेले होते. दक्षिण भारतात त्याला महाबली चा अपभ्रंश म्हणून मावेली असेही संबोधिले जाते. दरवर्षी केरळ मध्ये ओणम हा उत्सव याच महाबलीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आपलं पाताळाचं राज्य सोडून महाबली आपल्या या प्रजेला दर्शन देण्यासाठी ओणम च्या वेळी खास केरळ मध्ये येतो अशी वदंता आहे. बळीला त्याची पत्नी वेदवल्ली हिच्या पासून सहा पुत्र होते, ज्यांच्या सहित तो या प्रदेशावर राज्य करत होता. त्यांची नावे अंग, वंग, कलिंग, सुम्ह, पौंड्र आणि आंध्र. यांच्याच नावाने पुढे त्यांची राज्ये बंगाल पासून ते आंध्रप्रदेशा पर्यंत वसवली गेली. यांच्या सोबतच बाणासुर नावाचाही एक पुत्र बळी ला होता असेही मानतात. या बाणासुराने आपल्या पित्याचा अपमान सहन न होऊन वामनाला विरोध केला, तेव्हा वामनाच्या रुपात असलेल्या विष्णूंनी त्याला पुढच्या मन्वंतरात पुढचा इंद्र हा बळी हाच असेल असेही वचन दिले.

No photo description available.महाबली हा स्वतः एक उत्कृष्ट कवीही होता. त्याने श्री विष्णूच्या स्तुतीपर लिहिलेले "हरीनाम माला स्तोत्र" हे अजूनही सुपरिचित आहे. पंडित जसराज यांनी गायलेले "ओम नमो नारायणा" हे सुप्रसिध्द भजन याच स्तोत्रातील आहे.

वामनाने जेव्हा बळी ला पाताळ लोकात जाण्याची आज्ञा केली तेव्हा तो त्याच्या जहाजात बसून दक्षिणपूर्व आशिया च्या बेटांना भेट देत ऑस्ट्रेलिया मार्गे पाताळात अर्थात दक्षिण अमेरिकेत पोहचला आणि तेथे पोहोचून त्याने आपल्या राज्याची स्थापना केली. या मार्गाचे वर्णन वाल्मिकी रामायणात किष्किंधा कांडात वाचायला मिळते. जेव्हा सुग्रीव सीतेला शोधण्यासाठी जे वानर सैन्य पाठवतो त्यात त्यांना तो या मार्गाचे सविस्तर वर्णन सांगतो. या वर्णनात पेरू देशातील अँडीज पर्वतावरचा हजारो फुट कोरलेला त्रिशुळाच्या आकाराचा तालवृक्ष, न्यूझीलंड मधील सुदर्शन नावाने वर्णन केलेला अतिशय रम्य असा पुकाकी तलाव, पॅसिफिक महासागरातल्या उकळत्या ज्वालामुखींच म्हणजेच रिंग ऑफ फायर च वर्णन अगदी तंतोतंत मिळत.

दक्षिण अमेरिकेतल्या अतिशय प्राचीन माया संस्कृतीचा मुळ पुरुष मयासुराने बळी साठी तेथे नवीन वसाहत वसवली. बळीचा राजमहाल हा तीन पुरांचा म्हणजेच तीन मोठ्या महालांचा बांधला, त्या मुळे त्याला त्रिभूवनांक म्हणजे तीन भुवनांचा स्वामी संबोधलं गेलं. तोच भाग आजही बोल्विया प्रांतात तियाहुनान्को (Tiahuanaco किंवा Tiwanaku ) या नावाने प्रसिध्द आहे. बळीने वेगवेळी सात नवी नगरे तेथील प्रजेसाठी वसवली त्याला नवतल (नवीन नगर) हे नाव रूढ झालं असं मानलं जात.

याच पेरू देशात वसणारी इंका हि अतिशय प्राचीन संस्कृती. त्या संस्कृती चा उद्गाता मानला जाणाऱ्या विराकोचा (Viracocha) ह्याची मूर्ती याच तीयाहुनान्को भागात कालासासाया (Temple of Kalasasaya) या मुक्त आकाशाखाली असलेल्या मंदिरात बघायला मिळते. इंका च्या प्राचीन साहित्यात उल्लेख केल्याप्रमाणे विराकोचा हा पॅसिफीक समुद्र ओलांडून लांब नौकांमधून हजारो वर्षांपूर्वी पेरू च्या समुद्र किनाऱ्यावर आला. त्याने त्या ठिकाणी मातीपासून प्रजेची निर्मिती केली. त्या प्रजेला कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान ह्या सारख्या अनेक गोष्टीत पारंगत बनवलं, एक प्रगल्भ संस्कृती उभी केली आणि काही कालावाधी नंतर पुन्हा कधीही परत न येण्यासाठी समुद्रावर चालत, ज्या दिशेकडून आला होता, त्याच दिशेने निघून गेला, अशी आख्यायिका त्याच्या बद्दल सांगितली जाते. या विराकोचाने आकाश (Hanan pacha), आंतरिक पृथ्वी अर्थात पाताळ (Uku pacha) आणि बाह्य पृथ्वी (Cay pacha) यावर प्रभुत्व मिळवलं होतं अस इन्काज मानतात.

ह्या विराकोचाचं बरचसं वर्णन महाबलीच्या कथेशी मिळतं-जुळतं आहे आणि विराकोचा हे नावही महाबली च्या पित्याशी म्हणजेच विरोचनाशी साधर्म्य दाखवणारं आहे. विराकोचा ज्या लांब बोटीतून पेरू च्या समुद्र किनाऱ्यावर पोहचला, तश्याच लांब बोटीतून आजही ओणम च्या सणाच्या वेळी केरळ मध्ये नौकानयनाची स्पर्धा हजारो वर्षांपासून आयोजित केली जात असते. अर्नामली भागात पंपा नदीत होणारी हि स्पर्धा ओणम च्या परंपरेचा एक खास भाग आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या एका भाषणात म्हटल्या प्रमाणे पाश्चात्य जनता हि विरोचानाची वंशज आहे हे वाक्यही या साधर्म्याला पुष्टी देतं. (Source: Talks with Vivekananda: Publisher- Advaita Ashram, Mayavati, Himalayas, January 1939.)

अर्थात या सगळ्या महाबली बद्दलच्या आख्यायिका असल्या तरी आधुनिक काळात कुणालाही महाबलीचं दर्शन झाल्याचा उल्लेख मात्र अजिबात सापडत नाही. "इडा पिडा टळो, बळीचे राज्य पुन्हा येवो" या जनभावनेच्या इच्छेतून, दिवाळीतल्या बलीप्रतिपदेच्या पूजनातून आणि ओणमच्या सणातून महाबली अजूनही आपल चिरंजीवित्व राखून आहे, हे तितकच खरं.

©अभिजीत खेडकर.
9420602780.

माहिती संदर्भ - गुगल, विकिपीडिया,
फोटो सौजन्य - गुगल.


सप्त चिरंजीव प्रस्तावना लिंक -
https://www.facebook.com/ekalabhi/posts/3028702153894310

Saturday, May 16, 2020

पंचांग - महिने

आपले पंचांग अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविले गेले आहे. ग्रेगेरीयान महिन्यांप्रमाणे आपले महिने हे कसेही (२८-२९-३०-३१ दिवसांचे) नसून त्याचा चंद्राच्या कलांशी म्हणजेच निसर्गाशी मेळ घातला आहे. पूर्वीच्या काळी रात्रीच्या अंधारात आकाश स्पष्ट दिसत असे. आपल्या पूर्वजांनी आकाशातील तारे सर्वसाधारणपणे स्थिर असतात तर ग्रह जागा बदलतात हे निरीक्षण केले होते. त्यांनी चंद्राच्या कलेवरून चांद्रमास ठरविले. परंतु चांद्रमास आणि ऋतू यांचे गणित बसविण्यासाठी वर्षाची सूर्याच्या गतिशी सांगड घालणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी वर्षाचे महिने ठरविताना सूर्य महिन्याच्या सुरुवातीला सूर्योदयाला कोणत्या राशीत आहे याची सांगड घातली. आकाशातील ताराकासमुहाचे अंदाजे सारखे बारा भाग पाडून (राशी) त्यातून दिसणाऱ्या आकारावरून त्यांना नावे दिली. सूर्य नव्या महिन्यात कोणत्या राशीत उगवतो याचे निरीक्षण केले आणि त्यावरून महिन्यांची नावे दिली. सूर्य कधी कधी लागोपाठ दोन महिने एकाच राशीत उगवतो. म्हणजेच हे दोन्ही महिने त्यामुळे एकाच नावाने ओळखले जातात. यातील पहिला महिना अधिक मास म्हणून ओळखला जातो. या पद्धतीने चांद्रमासाची सूर्यमासाबरोबर सांगड घातली गेली आणि आपले महिने आणि ऋतू यांचा मेळ बसला. मुस्लीम कॅलेंडरमध्ये असे न केल्याने त्यांचे महिने आणि ऋतू यांचा मेळ बसत नाही. चीनी पद्धतीत अशीच काही युक्ती करून चांद्रमास आणि सुर्यमास यांचा मेळ घातला आहे. तेथेही अधिक महिना असतो.
काही राशी थोडी लांब पसरलेल्या आहेत तर काही लहान जागेत सामावली गेली आहेत. जी थोडी लांब आहेत त्यामध्येच अधिक महिना येऊ शकतो. चैत्र ते अश्विन या मासातच अधिक मास येऊ शकतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो, पण मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाही. अधिक मास जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांतच येतो.
क्वचित सूर्य एका महिन्यात दोन राशी पुढे सरकतो. यावेळी एखादा महिना येताच नाही म्हणजेच क्षय मास येतो. क्षयमास आकाराने लहान राशी असलेल्या महिन्यातच, म्हणजे मार्गशीर्ष, पौष आणि माघ महिन्यातच येतो.अलीकडच्या काळात इ.स.१९८३मधला माघ महिना हा क्षयमास होता. या पुढचा क्षयमास हा इ.स.२१२३मध्ये येईल.

Friday, May 8, 2020

महाभारताच्या युद्धातील १८ दिवस


Ref रोहित चंद्रशेखर पाराशरे यांची Facebook पोस्ट 

असे मानले जाते की महाभारताचा युद्धात एकमेव जीवंत राहिलेला कौरव युयुत्सु होता आणि २४,१६५ कौरव सैनिक बेपत्ता झाले होते. लव आणि कुश यांच्या ५० व्या पिढीत शल्य जन्माला आले जे महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने लढले होते.
संशोधनानुसार जेव्हा महाभारताचे युद्ध झाले, तेव्हा श्रीकृष्णाचे वय ८३ वर्षांचे होते. महाभारताच्या युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांनी देहत्याग केला होता. याचा अर्थ ११९ वर्षांच्या वयात त्यांनी देहत्याग केला होता. भगवान श्रीकृष्ण द्वापार युगाचा अंत आणि कलियुगाची सुरुवात यांच्या संधिकालात विद्यमान होते. ज्योतिषीय माहितीनुसार कलियुगाचा आरंभ शक संवत च्या पूर्वी ३१७६ वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेला झाला होता. आत्ता शके १९३६ आहे. यावरून कालीयुदाची सुरुवात होऊन ५११२ वर्ष झाली.
कलियुगाची सुरुवात होण्यापूर्वी ६ महिने आधी मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीला महाभारताच्या युद्धाचा आरंभ झाला होता, जे १८ दिवस चालले होते. चला पाहूयात महाभारताच्या युद्धाच्या या १८ दिवसांच्या रोचक घटनाक्रम..

स्थान

महाभारत युद्धापूर्वी पांडवांनी आपल्या सेनेचा तळ कुरुक्षेत्राच्या पश्चिम क्षेत्रात सरस्वती नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या समंत्र पंचक तीर्थाच्या जवळ हिरण्यवती नदीच्या किनाऱ्यावर ठोकला. कौरवांनी कुरुक्षेत्राच्या पूर्व भागात तिथून काही योजने दूर एका सपाट मैदानावर आपला तळ ठोकला.
दोन्ही शिबिरात सैनिकांचे भोजन आणि जखमी सैनिकांच्या इलाजाची उत्तव व्यवस्था करण्यात आली होती. हत्ती, घोडे आणि रथांची वेगळी व्यवस्था होती. हजारो शिबिरांपैकी प्रत्येक शिबिरात मुबलक प्रमाणात खाद्य सामग्री, अस्त्र-शस्त्र, यंत्र आणि अनेक वैद्य आणि शिल्पी वेतन देऊन ठेवण्यात आले होते.

दोन्ही सैन्यात युद्धासाठी ५ योजने ४० किलोमीटरचा घेरा मोकळा ठेवण्यात आला होता.

कौरवांचे सहयोगी प्रांत होते – गांधार, मद्र, सिन्ध, काम्बोज, कलिंग, सिंहल, दरद, अभीषह, मागध, पिशाच, कोसल, प्रतीच्य, बाह्लिक, उदीच्य, अंश, पल्लव, सौराष्ट्र, अवन्ति, निषाद, शूरसेन, शिबि, वसति, पौरव, तुषार, चूचुपदेश, अशवक, पाण्डय, पुलिन्द, पारद, क्षुद्रक, प्राग्ज्योतिषपुर, मेकल, कुरुविन्द, त्रिपुरा, शल, अम्बष्ठ, कैतव, यवन, त्रिगर्त, सौविर आणि प्राच्य.

कौरवांकडून हे योद्धे लढले होते – भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, मद्रनरेश शल्य, भूरिश्र्वा, अलम्बुष, कृतवर्मा, कलिंगराज, श्रुतायुध, शकुनि, भगदत्त, जयद्रथ, विन्द-अनुविन्द, काम्बोजराज, सुदक्षिण, बृहद्वल, दुर्योधन आणि त्याच्या ९९ भावांसहित अन्य हजारो योद्धे.

पांडवांचे सहयोगी प्रांत होते – पांचाल, चेदि, काशी, करुष, मत्स्य, केकय, सृंजय, दक्षार्ण, सोमक, कुन्ति, आनप्त, दाशेरक, प्रभद्रक, अनूपक, किरात, पटच्चर, तित्तिर, चोल, पाण्ड्य, अग्निवेश्य, हुण्ड, दानभारि, शबर, उद्भस, वत्स, पौण्ड्र, पिशाच, पुण्ड्र, कुण्डीविष, मारुत, धेनुक, तगंण आणि परतगंण.

पांडवांकडून हे योद्धे लढले होते – भीम, नकुल, सहदेव, अर्जुन, युधिष्टर, द्रौपदीचे पाचही पुत्र, सात्यकि, उत्तमौजा, विराट, द्रुपद, धृष्टद्युम्न, अभिमन्यु, पाण्ड्यराज, घटोत्कच, शिखण्डी, युयुत्सु, कुन्तिभोज, उत्तमौजा, शैब्य आणि अनूपराज नील.

तटस्थ प्रांत – विदर्भ, शाल्व, चीन, लौहित्य, शोणित, नेपा, कोकण, कर्नाटक, केरळ, आन्ध्र, द्रविड इत्यादींनी या युद्धात भाग घेतला नव्हता.

नियम:

पितामह भीष्मांच्या सल्ल्याने दोन्ही पक्षांनी एकत्र होऊन युद्धाचे काही नियम बनवले.
१. प्रत्येक दिवशी युद्ध सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालेल. सूर्यास्तानंतर युद्ध होणार नाही.
२. युद्ध समाप्त झाल्यानंतर छल – कपट विसरून सर्वजण एकमेकांशी प्रेमाने वागतील.
३. रथवाला रथवाल्याशी, हत्तीवाला हत्तीवाल्याशी आणि पायदळ पायदळाशीच युद्ध करेल.
४. एका वीरासोबत एकच वीर युद्ध करेल.
५. भीतीने पळून जाणाऱ्या किंवा शरण आलेल्या लोकांवर अस्त्र-शस्त्राचा प्रहर केला जाणार नाही.
६. जो वीर निःशस्त्र होईल त्याच्यावर कोणतेही शस्त्र उचलले जाणार नाही.
७. युद्धामध्ये सेवकांचे काम करणाऱ्यांवर कोणीही शस्त्र चालवणार नाही.

पहिल्या दिवसाचे युद्ध

प्रथम दिवशी जेव्हा कृष्ण आणि अर्जुन आपल्या रथासोबत दोन्हीकडच्या सैन्याच्या मधोमध उभे होते आणि कृष्ण अर्जुनाला गीतेचा उपदेश करत होता, त्याच दरम्यान भीष्म पितामहांनी देखील सर्व योद्ध्यांना सांगितले की आता युद्ध सुरु होणार आहे. या वेळी ज्या कोणा योद्ध्याला आपली भूमिका बदलायची आहे तो या निर्णयासाठी स्वतंत्र आहे की त्याने कोणाच्या बाजूने युद्ध लढावे. या घोषणेनंतर धृतराष्ट्राचा पुत्र युयुत्सु डंका वाजवत कौरवांचे दल सोडून पांडवांच्या पक्षात निघून गेला. कृष्णाच्या उपदेशानंतर अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवून युद्धाची घोषणा केली.
या दिवशी १०,००० सैनिकांचा मृत्यू झाला. भीमाने दुःशासनावर आक्रमण केले. अभिमन्यूने भीष्मांचे धनुष्य आणि रथाचा ध्वजदंड तोडून टाकले. पहिल्या दिवसाअखेर पांडव पक्षाला भारी नुकसानीला सामोरे जावे लागले. विराट नरेशाचे पुत्र उत्तर आणि श्वेत हे शल्य आणि भीष्म यांच्याकडून मारले गेले. भीष्मांनी त्यांच्या कित्येक सैनिकांचा वध केला.
कोण मजबूत राहिले : पहिल्या दिवशी पांडव पक्षाला नुकसान जास्त झाले आणि कौरव पक्ष मजबूत राहिला.

दुसऱ्या दिवसाचे युद्ध

कृष्णाच्या उपदेशानंतर अर्जुन आणि भीष्म, द्रोणाचार्य आणि धृष्टद्युम्न यांच्यात युद्ध झाले. सात्यकीने भीष्मांच्या सारथ्याला जखमी केले. द्रोणाचार्यांनी धृष्टद्युम्नला अनेक वेळा हरवले अन त्याचे अनेक धनुष्य तोडले. भीष्मांनी अर्जुन आणि श्रीकृष्णाला अनेक वेळा जखमी केले. या दिवशी भीमाचे कलिंग आणि निषाद यांच्याशी युद्ध झाले आणि भीमाने हजारो कलिंग आणि निषाद मारून टाकले. अर्जुनाने देखील भीष्मांना भीषण संहार करण्यापासून रोखून धरले होते. कौरवांच्या बाजूने लढणारे कलिंगराज भानुमान, केतुमान, अन्य कलिंग वीर योद्धे मारले गेले.
कोण मजबूत राहिले : दुसऱ्या दिवशी कौरवांना जास्त नुकसान झाले आणि पांडव पक्ष मजबूत राहिला.

तिसरा दिवस:

Image may contain: text that says 'अर्धचंद्र व्यूह इस व्यूह को के तीसरे दिन ने कौरवों के व्यूह के प्रत्युत्तर में बनाया था'कौरवांनी गरुड आणि पांडवांनी अर्धचंद्राकार अशी व्यूहरचना केली होती. कौरवांकडून दुर्योधन आणि पांडवांकडून भीम आणि अर्जुन सुरक्षा करत होते. या दिवशी भीमाने घटोत्कचासोबत मिळून दुर्योधनाच्या सेनेला युद्धातून पळवून लावले. हे पाहून भीष्मांनी भीषण संहार करायला सुरुवात केली. श्रीकृष्णाने अर्जुनाला भीष्मांचा वध करण्यास सांगितले, परंतु अर्जुन उत्साहाने लढू शकत नव्हता, ज्यामुळे श्रीकृष्ण स्वतः भीष्मांना मारण्यास उद्युक्त झाला, परंतु अर्जुनाने त्याला प्रतिज्ञारूपी आश्वासन देऊन कौरव सेनेचा भीषण संहार केला. त्याने एका दिवसातच प्राच्य, सौवीर, क्षुद्रक आणि मालव क्षत्रिय गणांना मारून टाकले.
भीमाच्या बाणाने दुर्योधन बेशुद्ध झला आणि त्याचवेळी त्याच्या सारथ्याने रथ तिथून पळवून नेला. भीमाने शेकडो सैनिकांचा खात्मा केला. या दिवशी देखील कौरावांनाच जास्त नुकसान सोसावे लागले. अनेक प्राच्य, सौवीर, क्षुद्रक आणि मालव वीर योद्धे मारले गेले.
कोण मजबूत राहिले
: या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला.

चौथा दिवस:

चौथ्या दिवशी देखील कौरव पक्षाला भारी नुकसान सोसावे लागले. या दिवशी कौरवांनी अर्जुनाला आपल्या बाणांनी झाकून टाकले, परंतु अर्जुनाने सर्वांना मारून पळवून लावले. भीमाने तर या दिवशी कौरव सेनेत अक्षरशः हाहाःकार माजवला, दुर्योधनाने आपली गजसेना भीमाला मारण्यासाठी पाठवली, परंतु घटोत्कचाच्या सहाय्याने भीमाने त्या सर्वांचा नाश केला आणि १४ कौरव देखील मारले, परंतु राजा भगदत्तने लवकरच भीमावर नियंत्रण मिळवले. नंतर भीष्मांना देखील अर्जुन आणि भीमाने भयंकर युद्ध करून कडवी झुंज दिली.
कोण मजबूत राहिले : या दिवशी कौरवांना जास्त नुकसान झाले आणि पांडव पक्ष मजबूत राहिला.

पाचवा दिवस:

श्रीकृष्णाच्या उपदेशानंतर युद्धाला सुरुवात झाली आणि मग भयंकर कापाकापी सुरु झाली. दोनही पक्षाच्या सैनिकांचा मोठ्या प्रमाणावर वध झाला. या दिवशी भीष्मांनी पांडव सेनेला आपल्या बाणांनी झाकून टाकले. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी आधी अर्जुन आणि मग भीमाने त्यांच्याशी भयंकर युद्ध केले.
सात्यकीने द्रोणाचार्यांना भीषण संहार करण्यापासून रोखून धरले. भीष्मांनी सात्यकीला युद्धक्षेत्रातून पळवून लावले. सात्यकीचे १० पुत्र मारले गेले.

कोण मजबूत राहिले : या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला.

सहावा दिवस:

कौरवांकडून क्रोंचव्यूह तर पांडवांकडून मकरव्यूह आकाराची सेना कुरुक्षेत्रात उतरली. भयंकर युद्धानंतर द्रोणाचार्यांचा सारथी मारला गेला. युद्धात वारंवार होणाऱ्या पराभवामुळे दुर्योधन भडकून जात होता, परंतु भीष्म त्याचे धाडस वाढवत राहिले. शेवटी भीष्मांनी पांचाल सेनेचा भीषण संहार केला.
कोण मजबूत राहिले : या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला.

सातवा दिवस:

सातव्या दिवशी कौरवांनी मंडलाकार व्यूहरचना केली आणि पांडवांनी वज्र व्यूहाच्या आकृतीत सेना उतरवली. मंडलाकार व्युहात एका हत्तीच्या जवळ सात रथ, एका रथाच्या रक्षणासाठी ७ अश्वरोहक, एका अश्वरोहीच्या रक्षणासाठी ७ धनुर्धर आणि एका धनुर्धाराच्या रक्षणासाठी १० सैनिक लावण्यात आले होते. सेनेच्या मध्यभागी दुर्योधन होता. वज्राकारात दाही मोर्चांवर घमासान युद्ध झाले.
या दिवशीने अर्जुनाने आपल्या युक्तीने कौरव सेनेत पळापळ माजवली. धृष्टद्युम्नने दुर्योधनाला युद्धात हरवले. अर्जुन पुत्र इरावान याने विंद आणि अनुविंद यांना हरवले, भगदत्तने घटोत्कचाला आणि नकुल सहदेवाने मिळून शल्यला युद्धक्षेत्रातून पळवून लावले. हे पाहून पुन्हा एकदा भीष्मांनी पांडव सेनेचा भीषण संहार केला.
विराट पुत्र शंख मारला गेल्याने या दिवशी कौरवांचे मोठे नुकसान झाले.
कोण मजबूत राहिले : या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला.

आठवा दिवस:

कौरवांनी कासव व्यूह तर पांडवांनी तीन शिखरांचे व्यूह रचले. पांडव पुत्र भीमाने धृतराष्ट्राच्या ८ पुत्रांचा वध केला. अर्जुनाची दुसरी पत्नी उलूपी हिचा पुत्र इरावान याचा बकासुराचा पुत्र आष्ट्रयश्रंग (अम्बलुष) याने वध केला.
घटोत्कचाने दुर्योधनावर शक्तीचा प्रयोग केला परंतु बंगनरेशाने दुर्योधनाला बाजूला करून शक्तीचा प्रहर स्वतःवर झेलला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दुर्योधनाच्या मनात मायावी घटोत्कचाबद्दल भीती आणखी वाढली.
तेव्हा भीष्मांच्या आज्ञेने भगदत्तने भीम, युधिष्ठीर आणि अन्य पांडव सैनिकांना मागे हटवले. दिवसाच्या अंतापर्यंत भीमसेनाने धृतराष्ट्राच्या ९ पुत्रांचा वध केला.
पांडव पक्षाचे नुकसान : अर्जुनपुत्र इरावान मारला गेला.
कौरव पक्षाचे नुकसान : धृतराष्ट्राच्या १७ पुत्रांचा भीमाने वध केला.
कोण मजबूत राहिले : या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला आणि दोन्ही पक्षांना नुकसान सोसावे लागले. परंतु कौरवांना जास्त नुकसान सोसावे लागले.

नववा दिवस:

कृष्णाच्या उपदेशानंतर भयंकर युद्ध झाले ज्यामध्ये भीष्मांनी शौर्य दाखवत अर्जुनाला जखमी करून त्याचा रथ नष्ट केला. युद्धात भीष्मांनी चालवलेला भीषण संहार रोखण्यासाठी कृष्णाला शेवटी आपली प्रतिज्ञा मोडावी लागली. आपला रथ नष्ट झालेला पाहून श्रीकृष्णाने रथाचे चाक उचलून भीष्मांवर झडप घातली, परंतु ते शांत झाले. या दिवशी भीष्मांनी पांडव सेनेचा बहुतांश भाग नष्ट केला.

कोण मजबूत राहिले : कौरव.

दहावा दिवस:

भीष्मांनी मोठ्या प्रमाणावर पांडव सेनेचा खात्मा केल्याने पांडवांच्या पक्षात भीतीचे वातावरण पसरले, तेव्हा कृष्णाच्या सांगण्यावरून पांडवानी भीष्मांसमोर हात जोडून त्यांना त्यांच्या मृत्यूचे रहस्य विचारले. काही वेळ विचार करून भीष्मांनी उपाय सांगितला.
यानंतर भीष्मांनी पांचाल आणि मत्स्य सेनेचा भयंकर संहार केला. तेव्हा पांडव पक्षाने भिश्मांसमोर शिखंडीला युद्धाला उतरवले. युद्धक्षेत्रात समोर शिखंडी उतरलेला पाहून भीष्मांनी शस्त्र खाली ठेवले. त्याच दरम्यान अतिशय कंटाळलेल्या अर्जुनाने आपल्या बाणांनी भीष्मांवर वार केले. भीष्म त्या बाणांच्या शरशय्येवर झोपले. भीष्मांनी सांगितले की ते सूर्याचे उत्तरायण झाल्यावरच देह सोडतील, कारण त्यांना आपले वडील शांतनू यांच्याकडून इच्छामृत्यूचे वरदान प्राप्त होते.

पांडव पक्षाचे नुकसान : शतानीक
कौरव पक्षाचे नुकसान : भीष्म
कोण मजबूत राहिले : पांडव

अकरावा दिवस:

भीष्म शरशय्येवर पडल्यावर अकराव्या दिवशी कर्णाच्या सांगण्यावरून द्रोणाचार्यांना सेनापती बनवले गेले. अकराव्या दिवशी सुशर्मा आणि अर्जुन, शल्य आणि भीम, सात्यकी आणि कर्ण व सहदेव आणि शकुनी यांच्यात युद्ध झाले. कर्णाने देखील या दिवशी पांडव सेनेचा भयंकर संहार केला. दुर्योधन आणि शकुनीने द्रोणांना सांगितले की त्यांनी युधिष्ठिराला बंदी बनवावे म्हणजे युद्ध आपल्या आपण समाप्त होईल, तव्हा दिवसअखेर जेव्हा द्रोणांनी युधिष्ठिराला युद्धात हरवून ते त्याला बंदी बनवण्यासाठी पुढे झाले तेवढ्यात अर्जुनाने येउन आपल्या बाणांच्या वर्षावाने त्यांना रोखले. नकुल युधिष्ठिराच्या सोबत होता आणि आता अर्जुनही युधिष्ठिराचा सोबत आला. अशा प्रकारे कौरव युधिष्ठिराला पकडू शकले नाहीत.

कोण मजबूत राहिले : कौरव.

बारावा दिवस:

कालच्या युद्धात अर्जुनामुळे युधिष्ठिराला पकडता आले नाही त्यामुळे शकुनी आणि दुर्योधनाने अर्जुनाला युधिष्ठिरापासून जास्तीत जास्त लांब पाठवता यावे यासाठी त्रिगर्त देशाच्या राजाला त्याच्याशी युद्ध करून त्याला व्यस्त ठेवण्यासाठी पाठवले, त्याने तसे केले देखील, परंतु पुन्हा एकदा अर्जुन वेळेवर पोचला आणि द्रोण असफल राहिले.
झाले असे की जेव्हा त्रिगर्त अर्जुनाला दूर घेऊन गेले तेव्हा सात्यकी युधिष्ठिराचा रक्षक होता. परत आल्यावर अर्जुनाने प्राग्ज्योतिषपुर (ईशान्येचे एक राज्य) चा राजा भगदत्त याला अर्धचंद्राकृती बाणाने मारून टाकले. सात्यकीने द्रोणांच्या रथाचे चाक उडवले आणि त्यांचे घोडे मारले. द्रोणांनी अर्धचंद्र बाणाने द्रुपदा चा शिरच्छेद केला.
सात्यकीने कौरवांच्या अनेक उच्च कोटीच्या योद्ध्यांना मारले ज्यामध्ये प्रमुख होते जलासंधी, त्रिगर्तांची गजसेना, सुदर्शन, म्लेन्छांची सेना, भूरिश्रवा, कर्णपुत्र प्रसन हे होते. युद्धभूमीवर सात्यकीला भूरिश्रवाकडून कडवी टक्कर झेलावी लागली. प्रत्येक वेळी सात्यकीला कृष्ण आणि अर्जुनाने वाचवले.

पांडव पक्षाचे नुकसान : द्रुपद
कौरव पक्षाचे नुकसान : त्रिगर्त नरेश
कोण मजबूत राहिले : दोनही पक्ष.

तेरावा दिवस:

कौरवांनी चक्रव्युहाची रचना केली. या दिवशी दुर्योधनाने राजा भगदत्तला अर्जुनाला व्यस्त ठेवण्यास सांगितले. भगदत्तने पुन्हा एकदा पांडव वीरांना युद्धात पळवून लावले आणि भीमाचा पराभव केला आणि नंतर अर्जुनाशी भयंकर युद्ध केले. श्रीकृष्णाने भगदत्तचे वैष्णवास्त्र आपल्यावर झेलून अर्जुनाची रक्षा केली.
शेवटी अर्जुनाने भगदत्तच्या डोळ्यांची पट्टी तोडली ज्यामुळे त्याला दिसायचे बंद झाले आणि अर्जुनाने याच अवस्थेत त्याचा वध केला. याच दिवशी द्रोणांनी युधिष्ठिरासाठी चक्रव्यूह रचला ज्याला तोडणे फक्त अभिमन्यूला माहिती होते, परंतु त्यातून बाहेर पडणे त्याला माहिती नव्हते. तेव्हा अर्जुनाने युधिष्ठीर, भीम उत्यादिंना त्याच्यासोबत पाठवले परंतु चक्रव्यूहाच्या द्वारावर ते सर्व जयद्रथाकडून त्याला मिळालेल्या शिवाच्या वरदानामुळे अडवले गेले आणि केवळ अभिमन्यूलाच प्रवेश करता आला.
या लोकांनी केला अभिमन्यूचा वध : कर्णाच्या सांगण्यावरून सातही महारथी कर्ण, जयद्रथ, द्रोण, अश्वत्थामा, दुर्योध्दन, लक्ष्मण आणि शकुनीने एकाच वेळी अभिमन्युवर आक्रमण केले. लक्ष्मणाने जी गदा अभिमन्यूच्या डोक्यावर मारली तीच गदा अभिमन्यूने लक्ष्मणाला फेकून मारली. यामुळे दोघांचाही त्याच वेळी मृत्यू झाला.
अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी ऐकून अर्जुनाने सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला मारण्याची अन्यथा अग्नी समाधी घेण्याची प्रतिज्ञा केली.
पांडव पक्षाचे नुकसान : अभिमन्यू
कोण मजबूत राहिले : पांडव

चौदावा दिवस:

अर्जुनाची अग्नी समाधीची प्रतिज्ञा ऐकून कौरव पक्षात आनंदी आनंद पसरला आणि त्यांनी योजना बनवली की आज युद्धात जयद्रथाला वाचवण्यासाठी सर्व कौरव योद्धे आपल्या प्राणांची बाजी लावतील. द्रोणांनी जयद्रथाला वाचवण्याचे पूर्ण आश्वासन दिले आणि त्याला सेनेच्या मागच्या भागात लपवले.
युद्ध सुरु झाले. भूरिश्रवा सात्यकीला मारणार होता तेव्हा अर्जुनाने भूरिश्रवाचे हात कापले, तो जमिनीवर पडला आणि सात्यकीने त्याचा शिरच्छेद केला. द्रोणांनी द्रुपद आणि विराट यांना मारले.
तेव्हा कृष्णाने आपल्या मायाशाक्तीने सूर्यास्त केला. सूर्यास्त झालेला पाहून अर्जुनाने अग्नी समाधीची तयारी सुरु केली. लपून बसलेला जयद्रथ जिज्ञासेला वश जाऊन अर्जुनाला समाधी घेताना पाहण्यासाठी बाहेर येऊन हसू लागला. त्याच वेळी कृष्णाच्या कृपेने सूर्य पुन्हा दिसू लागला आणि त्याच वेळी अर्जुनाने सगळ्यांना धुडकावून लावत कृष्णाकडून करण्यात आलेल्या कृत्रिम सूर्यास्ताने बाहेर आलेल्या जयद्रथाला मारून त्याचे मस्तक त्याच्या वडिलांच्या मांडीवर पाडले.

पांडव पक्षाचे नुकसान : द्रुपद, विराट
कौरव पक्षाचे नुकसान : जयद्रथ, भगदत्त

पंधरावा दिवस:

द्रोणांची शक्ती वाढत चालल्याने पांडवांच्या पक्षात दहशत पसरली होती. पिता पुत्रांनी मिळून महाभारत युद्धात पांडवांचा पराभव जवळ जवळ निश्चित केला होता. पांडवांचा जवळ येणारा पराभव पाहून कृष्णाने युधिष्ठिराला कपटाचा सहारा घ्यायला सांगितले. या योजनेअंतर्गत युद्धात ही बातमी पसरवण्यात आली की अश्वत्थामा मारला गेला. पण युधिष्ठीर खोटे बोलण्यास तयार नव्हता. तेव्हा अवन्तिराज याच्या अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा भीमाने वध केला. यानंतर ही बातमी पसरवण्यात आली की अश्वत्थामा मारला गेला.
गुरु द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला या गोष्टीची सत्यता विचारली कारण त्यांना माहित होते की धर्मराजा कधीही खोटे बोलणार नाही. तेव्हा धर्मराजाने उत्तर दिले, की “होय, अश्वत्थामा मारला गेला, परंतु हत्ती.”
जेव्हा युधिष्ठिराच्या तोंडून “हत्ती” शब्द निघाला, त्याच वेळी श्रीकृष्णाने जोराने शंखनाद केला, ज्याच्या आवाजात द्रोणाचार्यांना युधिष्ठिराचा शेवटचा शब्द ऐकू आला नाही आणि आपला प्रिय पुत्र अश्वत्थामा याच्या मृत्यूची बातमी ऐकून ते हताश झाले आणि त्यांनी आपले शस्त्र त्यागले आणि युद्धभूमीवर डोळे बंद करून अत्यंत दुःखी अवस्थेत जमिनीवर बसले. हीच संधी साधून द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न याने निःशस्त्र असलेल्या द्रोणांचे तलवारीने मस्तक उडविले.

कौरव पक्षाचे नुकसान : द्रोण
कोण मजबूत राहिले : पांडव

सोळावा दिवस:

द्रोणांचा कपटाने वाढ झाल्यानंतर कौरवांचा सेनापती कर्णाला बनवण्यात आले. कर्णाने पांडव सेनेचा भयंकर संहार केला आणि नकुल व सहदेवाला युद्धात पराभूत केले, परंतु कुंतीला दिलेल्या वचनामुळे त्यांचे प्राण मात्र घेतले नाहीत. नंतर त्याने अर्जुनासोबतही भयंकर युद्ध केले.
दुर्योद्धानाच्या सांगण्यावरून कर्णाने अमोघ शक्तीचा वापर करून घटोत्कचाचा वध केला. ही अमोघ शक्ती कर्णाने अर्जुनासाठी राखून ठेवली होती परंतु घटोत्कचाला घाबरलेल्या दुर्योधनाने कर्णाला ती शक्ती वापरायला सांगितली. ही अशी शक्ती होती की तिचा वार कधीही रिकामा जाणार नव्हता. कर्णाने ती अर्जुनाचा वध करण्यासाठी राखून ठेवली होती.
याच दरम्यान भीमाचे दुःशासनाशी युद्ध झाले आणि त्याने दुःशासनाचा वध करून त्याच्या छातीचे रक्त प्रश्न केले आणि तेव्हा सूर्यास्त झाला.

कौरव पक्षाचे नुकसान : दुःशासन
पांडव पक्षाचे नुकसान : घटोत्कच
कोण मजबूत राहिले : दोन्ही पक्ष

सतरावा दिवस:

शल्यला कर्णाचा सारथी बनवण्यात आले. या दिवशी कर्णाने भीम आणि युधिष्ठिराचा पराभव केला पण कुंतीला दिलेल्या वचनामुळे त्यांचे प्राण घेतले नाहीत. नंतर त्याने अर्जुनाशी युद्ध सुरु केले. कर्ण आणि अर्जुन यांच्यात भयंकर युद्ध झाले. कर्णाच्या रथाचे चक जमिनीत धसले आणि कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने असहाय्य अवस्थेतील कर्णाचा वाढ केला.
यानंतर मात्र कौरवांचा उत्साह पूर्णपणे हरवून गेला. त्यांचे मनोबल ढासळले. मग शल्य प्रधान बनला, परंतु त्याला देखील युधिष्ठिराने दिवस अखेर मारले.
कौरव पक्षाचे नुकसान : कर्ण, शल्य आणि दुर्योधनाचे २२ भाऊ मारले गेले.
कोण मजबूत राहिले : पांडव.

अठरावा दिवस:

अठराव्या दिवशी कौरवांचे ३ योद्धे उरले होते – अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा. याच दिवशी अश्वत्थामाने पांडवांच्या वधाची प्रतिज्ञा केली. अश्वत्थामा आणि कृतवर्मा, कृपाचार्य यांनी रात्री पांडव शिबिरावर हल्ला केला. अश्वत्थामाने सर्व पांचाल, द्रौपदीचे पाच पुत्र, धृष्टद्युम्न आणि शिखंडी इत्यादींचा वध केला.
द्रोण कपटाने मारले गेल्याचे ऐकून अश्वत्थामा दुःखी आणि क्रोधीत झाला आणि त्याने ब्रम्हास्त्राचा प्रयोग केला ज्यामुळे युद्धभूमी स्मशानभूमीत बदलली. हे पाहून कृष्णाने त्याला कलियुगाच्या अंतापर्यंत रोगी अवस्थेत जिवंत भटकत राहण्याचा शाप दिला.
या दिवशी भीमाने दुर्योधनाच्या उरलेल्या भावांना मारून टाकले, सहदेवाने शकुनीला मारले आणि आपला पराजय ओळखून दुर्योधन पळून जाऊन सरोवराच्या स्तंभात जाऊन लपला. याच दरम्यान बलराम तीर्थयात्रेवरून परत आले. त्यांनी दुर्योधनाला निर्भय राहण्याचा आशीर्वाद दिला.
लपून बसलेल्या दुर्योधनाला पांडवानी ललकारल्यावर त्याने भिमाशी गदायुद्ध केले आणि जान्घेवर प्रहर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे पांडव विजयी झाले.

पांडव पक्षाचे नुकसान : द्रौपदीचे ५ पुत्र, धृष्टद्युम्न, शिखंडी.
कौरव पक्षाचे नुकसान : दुर्योधन.

शेवटी

काही यादव युद्धात आणि काही गांधारीच्या शापाच्या प्रभावाने आपसात युद्ध करून मारले गेले. पांडव पक्षाचा विराट आणि विराट पुत्र उत्तर, शंख आणि श्वेत, सत्याकीचे १० पुटे, अर्जुनाचा पुत्र इरावात, द्रुपद, द्रौपदीचे ५ पुत्र, धृष्टद्युम्न, कौरव पक्षाचे कलिंगराज भानुमान, केतुमान, अन्य कलिंग वीर, प्राच्य, सौवीर, क्षुद्रक आणि मालव वीर, कौरवांच्या बाजूने धृताराष्ट्राच्चे दुर्योधनासह सर्व पुत्र, भीष्म, त्रिगर्त नरेश, जयद्रथ, भगदत्त, द्रौण, दुःशासन, कर्ण, शल्य इत्यादी सर्व युद्धात मारले गेले होते.
युधिष्ठिराने युद्ध समाप्ती नंतर शिल्लक राहिलेल्या मृत सैनिकांचे (दोनही पक्षातील) दहन संस्कार आणि तर्पण क्रिया केल्या. या युद्धानंतर युधिष्ठिराला राज्य, धन, वैभव यांपासून वैराग्य आले. असे म्हटले जाते की युद्धानंतर अर्जुन आपल्या भावांसह हिमालयात निघून गेला आणि तिथेच त्यांचा देहांत झाला.

वाचलेले योद्धे – महाभारत युद्धानंतर कौरवांकडून ३ आणि पांडवांकडून १५ असे एकूण १८ योद्धे जिवंत राहिले होते. त्यांची नावे आहेत –

कौरव : कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा
पांडव : युयुत्सु, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, कृष्ण, सात्यकी इत्यादी.


Image may contain: text that says 'मण्डल व्यूह पितामह भीष्म ने यद्ध के सांतवे दिन कौरव सेना को इस तरह से सजाया था'
Image may contain: text that says 'कौंच व्यूह यद्ध के दसरे दिन ने इस तरह से पांडवो सेना सजाई थी'
Image may contain: textImage may contain: text that says 'चकव्यूह यही है प्रसिद्ध अभिमन्य की हत्या इसी में फंसाकर की गई थी'Image may contain: text that says 'चकशकट व्यूह की रचना द्रोण ने जयद्रथ को अर्जन से बचाने के लिए की थी'