Wednesday, November 28, 2018

मांडुक्य उपनिषद-७

आपण मागच्या भागात माणसाच्या चार अवस्था असतात हे पहिले.
१> जागृतावस्था
२> स्वप्नावस्था
३>सुषुप्ती
४> तुर्यावस्था

खरेतर तीनच अवस्था म्हणता येईल. पाटल्या, हार, अंगठी आणि सोने असे चार पदार्थ  नाहीत. पाटल्या, हार आणि अंगठी यातच सोने अंतर्भूत आहे हे आपल्याला सहज समजते. परंतु सोयीसाठी आपण या चार अवस्था मानू.

या उपनिषदाच्या १२ श्लोकांपैकी पहिल्या सात श्लोकात या चार अवस्थांचे विवेचन (आत्मविचार) आहे. मात्र तुर्यावस्थेचे केवळ पुस्तकी ज्ञान असून भागणार नाही, तर त्या अवस्थेच्या अनुभवातून ज्ञान झाले पाहिजे असे मांडुक्य उपनिषद आग्रहाने सांगते. आठव्या श्लोकापासून हे उपनिषद तुर्यावस्थेचे ज्ञान होण्यासाठी एक मार्ग सुचविते. हा मार्ग (ओंकारविचार) म्हणून ओळखला जातो.

Image result for om imagesओंकाराचा उच्चार योग्य प्रकारे केल्यास आपण तुर्यावस्थेचा अनुभव घेऊ शकतो असे मांडुक्य उपनिषद सांगते. ओंकारामध्ये साडेतीन मात्रा आहेत. 'अ ', 'उ ', 'म' आणि उच्चाररहित अर्धमात्रा. यातील 'अ ' हा जागृतावस्थेशी, 'उ' हा स्वप्नावस्थेशी तर ' म' हा सुषुप्तीशी संबंधित आहे. उच्चाररहित अर्धमात्रा आपल्याला तुर्यापर्यंत घेऊन जाते असे हे उपनिषद सांगते. ओमचा उच्चार करताना 'म' नंतर जी स्पंदने जाणवतात त्यावर ध्यान केले असता एका विलक्षण शांततेचा अनुभव येतो. हाच तो तुर्य.

ओंकारासंबंधी मांडुक्य उपनिषदाने  काय सांगितले आहे हे स्पष्ट होण्यासाठी आपण ज्ञानेश्वरमाउलींनी ओंकारासंबंधी काय सांगितले आहे ते पुढील लेखात पाहू.





Saturday, November 24, 2018

मांडुक्य उपनिषद-६

तुर्यावस्था म्हणजे काय हे समजण्यासाठी एक गोष्ट पाहू.

एका लहान मुलाने कधीही चित्रपट पहिला नव्हता. चित्रपट काय आहे याबद्दल त्याला उत्सुकता होती. त्याच्या वडिलांनी त्याला त्याबद्दल माहिती दिली. "तेथे एक पडदा असतो. त्यावर चित्रे येतात. ती हालचाल करताना दिसतात. पण ती खरी नसतात."

मुलाला नीटसे काही कळले नाही. शेवटी त्याच्या वडिलांनी त्याला चित्रपटाच्या थेटरमध्ये नेले. ते तेथे पोचले तेव्हा चित्रपट सुरु झाला होता. अंधारात कसेबसे वाट काढत ते त्यांच्या खुर्चीपर्यंत पोचले.

समोरच्या चित्रपटातील प्रसंग मुलाला खरे वाटत होते. ती  केवळ पडद्यावर हलणारी चित्रे आहेत हे त्याचे वडील त्याला समजावून सांगत होते. तेव्हा मुलाचा समज झाला की ती चित्रे पडद्यावर कोणीतरी काढलेली आहेत. पडद्यावर काढलेली चित्रे हलतात कशी, बोलतात कशी हेच त्याला कळत नव्हते. वडिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तो तयार नव्हता. मागील पडदा कोरा आहे, त्यावर चित्रे काढलेली नाहीत हे त्याचे वडील त्याला परत परत समजावून देत होते.

Related image मध्येच त्या चित्रपटात आगीचा प्रसंग आला. त्या मुलाला वाटले, आता तो पडदा जळणार. त्याच्या हे सर्व आकलनाबाहेर होते. शेवटी त्या चित्रपटाचे मध्यंतर झाले. दिवे लागले. वडिलांनी मुलाला तो पांढरा पडदा दाखविला. प्रोजेक्टर दाखवला. त्याच्या साहाय्याने पडद्यावर चित्रे कशी पडतात हे दाखविले. पडदा नसेल तर चित्रेच दिसणार नाहीत हेही त्या मुलाच्या लक्षात आले.

आपली तुर्यावस्था ही अशीच त्या चित्रपटाच्या पडद्यासारखी आहे. चित्रपटाच्या पडद्यावर दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटात कदाचित आगीचे प्रसंग असतील, पाणी असेल. पण त्यामुळे तो पडदा जळणार नाही की ओला होणार नाही. चित्रपटातील प्रसंग कोणताही असो, तो पडदा आहे तसाच राहील. पण जर तो पडदा नसेल तर चित्रपट दिसणार नाही. पडद्याच्या आधारानेच चित्रपट दिसेल. तुर्यावस्थेच्या आधारानेच जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती यांचा अनुभव आपण घेऊ शकतो. पण ते अनुभवताना होणाऱ्या सुखाचा, दु:खाचा, यातनेचा कोठलाही परिणाम तुर्यावस्थेवर होत नाही.

जसे त्या मुलाला लाईट लागल्यावर तो पडदा दिसला आणि नंतर त्या चित्रांच्या खोटेपणाची जाणीव झाली तसेच  आपल्याला आत्मज्ञान झाल्यावर तुर्यावस्थेची जाणीव होते. मध्यंतरात कोरा पडदा दिसल्यावर चित्रपटाच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाल्यावरही तो मुलगा पुढील चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकला , तसेच आत्मज्ञान झाल्यावरही आत्मज्ञानी पुरुष आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा आस्वाद घेऊ शकतो. किंबहुना तणावरहित अवस्थेत तो हा आस्वाद अधिक आनंदाने घेऊ शकतो.

पुढील लेखात आपण मांडुक्य उपनिषदाने प्रतिपादलेला ओंकारविचार काय आहे हे पाहू. 

मांडुक्य उपनिषद ८

आपण मागील लेखात मांडुक्य उपनिषदाने ओंकारासंबंधी काय सांगितले आहे ते पहिले. ते अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण हा ओंकारविचार ज्ञानेश्वरांनी कसा मांडला आहे पाहू. ज्ञानेश्वर हे काळाच्या दृष्टीने अधिक जवळ असल्याने त्यांचे म्हणणे कदाचित आपल्याला लौकर समजू शकेल.

ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी ज्ञानदेव प्रार्थना करतात. त्यात त्यांनी ओंकाराचे (शब्दब्रह्म) वर्णन केले आहे.

अकार चरण युगुल। उकार उदर विशाल।
मकर महामंडल। मस्तकाकारे।।
हे तिन्ही एकवटले। तेथ शब्दब्रम्ह कवळले।

ज्यावेळी आपण अकार उच्चारतो तेव्हा 'चरण युगूल' म्हणजे जेथे दोन पाय जुळतात तेथे आपले ध्यान हवे. हे स्थान मूलाधार चक्राचे आहे. मूलाधार चक्र हे पृथ्वीतत्वाशी, म्हणजेच सर्वात स्थूल गुणांशी जोडलेले आहे. जागृत अवस्था ही सर्वात स्थूल अवस्था आहे हे आपण पहिलेच. म्हणजेच 'अ' हा जागृत अवस्थेशी जोडलेला आहे. उच्चारण करताना दोन पाय जेथे जुळतात तेथे होत असलेल्या स्पंदनांवर आपले ध्यान हवे.

उकार हा उदराशी संबंधित आहे असे ज्ञानेश्वरमहाराज सांगतात. उदरापाशी, म्हणजेच बेंबीपाशी मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्र हे अग्नीतत्वाशी संबंधीत आहे. स्वप्नावस्था ही अग्नितत्वाशी संबंधीत असल्याचे मांडुक्य उपनिषद सांगते. स्वप्नावस्थेतील पुरुषास 'तेजस' असे नाव मांडुक्य उपनिषदाने दिले आहे तर स्वप्नावस्थेतील अभिमानी 'हिरण्यगर्भ ' या नावाने ओळखला जातो. स्वप्नावस्थेतील अनुभव येण्यास तेजाची आवश्यकता असते. म्हणूनच 'उ' हा स्वप्नावस्थेशी संबंधित आहे. 'उ' उच्चारताना बेंबीतील स्पंदनांकडे ध्यान हवे.

मकार हा महामंडलातुन यावा असे ज्ञानेश्वर म्हणतात. महामंडल म्हणजे 'गळा'. गळ्याच्या ठिकाणी विशुद्ध चक्र असते. हे चक्र आकाश तत्वाशी संबंधीत आहे. आकाशतत्व सर्वात तरल तत्व आहे.  सुषुप्ती ही आपली सर्वात तरल अवस्था आहे. म्हणूनच मकार हा सुषुप्तीशी संबंधित आहे. मकार उच्चारताना गळ्याकडे ध्यान हवे.

सर्वात शेवटची जी अर्धमात्रा आहे ती  'मस्तकाकारे' असे ज्ञानेश्वरमाउली म्हणतात. हा गळ्याकडून डोक्याकडे जाणाऱ्या स्पंदनांचा उल्लेख आहे. या अर्धमात्रेच्या उच्चारणाच्यावेळी जी स्पंदने जाणवतात तिच्यावर ध्यान हवे असे ज्ञानेश्वर सुचवितात. हीच ती  तुर्यावस्थेची जाणीव. ही जाणीव जेव्हा अधिकाधिक स्पष्ट होत जाते तेव्हा एक असीम शांतता अनुभवाला येते.

ओंकारसाधना करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ओंकार हा अत्यंत शांतपणे केला पाहिजे. दोन ओंकारांच्यामध्ये थांबून शरीराचा वेध घेतला पाहिजे.

ओंकाराचा असा उच्चार केल्यास आपण तुर्यावस्थेचा अनुभव घेऊ शकतो.

आकाराने सर्वात लहान पण समजण्यास जटिल अशा मांडुक्य उपनिषदांची तोंडओळख आपण करून घेतली. मांडुक्य उपनिषदांची ओळख करून देणे ही  माझ्यासाठी खूप कठीण गोष्ट होती. पण मी लिहिलेले आपण गोड मानून घेतल्याने मला उत्साह आला. धन्यवाद.

या लेखमालेतील मांडुक्य उपनिषदावरील हा शेवटचा लेख.

मांडुक्य उपनिषदाच्या ब्रह्मवाक्याचे स्मरण करून आपण मांडुक्य उपनिषदाच्या विवेचनाचा समारोप करू.

"अयम आत्मा ब्रह्म ।"  :  अर्थात "हा आत्मा ब्रह्म आहे."

Wednesday, November 21, 2018

मांडुक्य उपनिषद-५

आपण मागील एका लेखात शाश्वत सत्य म्हणजे काय पहिले. पहिल्या तीन अवस्थांचे अस्तित्व तुर्यावस्थेवर अवलंबून आहे, पण तुर्यावस्थेचे अस्तित्व कशावरही अवलंबून नाही. म्हणूनच आपण पाहिलेल्या गोष्टीमध्ये अष्टावक्र ऋषी जनक राजाला 'तेही असत्य, हे ही असत्य. राजा केवळ तूच सत्य' असे म्हणाले.

Image result for universe imagesआपल्या विश्वात पसरलेला चैतन्याचा सागर आपल्या शरीर-मनाला प्रकाशित करतो, चैतन्य देतो. शरीर-मनाचे क्लेश, दु:ख यातना याचा परिणाम या चैतन्य सागरावर अथवा तुर्यावस्थेवर होत नाही. या तुर्यावस्थेची जाणीव झाली की शरीर/मनाचे क्लेश-यातना यापासून आपण आपल्याला अलिप्त ठेऊ शकतो.

जसे सोने ही त्या तीनही दागिन्यांची स्वाभाविक अवस्था आहे तसेच तुर्यावस्था अन्य तीनही अवस्थांची स्वाभाविक अवस्था आहे. आपल्याला त्याची जाणीव नसते इतकेच. ज्या क्षणी आपल्याला त्याची जाणीव होईल त्या क्षणी आपण दु:ख-यातना यापासून अलिप्त  होऊ.

तुर्यावस्थेचे वर्णन करण्याला भाषेच्या मर्यादा येतात. एखाद्या गोष्टीचा अथवा साधर्म्य असलेल्या गोष्टीचा अनुभव असलेल्यालाच भाषेद्वारे आपण काही सांगू शकतो. उदाहरणार्थ आयुष्यात कधीही गोड न खाल्लेल्याला आपण साखरेची चव कशी असते हे शब्दात सांगू शकत नाही. फार तर 'छान वाटते' एवढेच सांगू. मांडुक्य उपनिषद म्हणूनच तुर्यावस्थेचे वर्णन करताना 'नेति नेति' प्रकारच्या भाषेचा उपयोग करते. म्हणजे तूर्य  असेही नाही आणि तसेही नाही.

तुर्यावस्था 'अव्यावाहारिक' आहे असेही हे उपनिषद सांगते. म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा काहीही उपयोग नाही. सोन्याचे दागिने घालून मिरविता येते. पण निव्वळ सोन्याचा असा काही उपयोग नाही. तरीही दागिने सोन्याशिवाय घडविणे शक्य नाही. तुर्यावस्थेचे काहीसे असेच आहे.

 तुर्यावस्था  समजून घेण्यासाठी आपण एका गोष्टीचा आधार पुढील लेखात घेऊ. 

Tuesday, November 20, 2018

मांडुक्य उपनिषद ४

मागील लेखात आपण माणसाच्या चार अवस्था आहेत हे पहिले.
१> जागृतावस्था : यात आपले चैतन्य बाह्यमुखी असते. आपल्या शरीराबाहेरच्या गोष्टींचा अनुभव घेण्याचा ते प्रयत्न करीत असते. यासाठी त्याला आपली पंचेंद्रिये आणि मन यांचा उपयोग होतो.
२> स्वप्नावस्था: यात आपले चैतन्य अंतर्मुखी होते. मनाच्या साहाय्याने बाह्य जगतात असणाऱ्या गोष्टींचे प्रक्षेपण करून स्वप्नातील पंचेंद्रियांच्या साहाय्याने ते अनुभव घेते.
३> सुषुप्ती: यात आपण गाढ झोपेत असतो. येथेही चैतन्य असते, पण या चैतन्याला प्रकट होण्यासाठी कोठलेही साधन (Object) नसते. चैतन्य हे प्रकाश किरणांसारखे असते. अंतराळात सर्वत्र प्रकाश भरून राहिलेला असतो. पण एखादी वस्तू असेल तरच त्यावर परिवर्तित झालेल्या प्रकाशामुळे आपल्याला त्या प्रकाशाचे ज्ञान होते. अंधाऱ्या आकाशात प्रखर झोत टाकला तरी आपल्याला त्याचे ज्ञान होणार नाही. वाटेत धुळीचे कण असतील तरच त्याचे  ज्ञान होईल. (उदा. धूमकेतूच्या शेपटीतील धुळीमुळे अंतराळातील प्रकाशाचे ज्ञान होते) सुषुप्तीमध्ये चैतन्य प्रकट होत नाही. पण ते अस्तित्वात असल्यानेच झोपेतून उठल्यावर शांत झोप लागली होती याचे ज्ञान होते. सुषुप्ती ही आपली बीजावस्था आहे. कारण उठल्यावर आपल्याला परत या विश्वाचे भान येते. म्हणजेच हे भान सुषुप्तावस्थेत बीजावस्थेत असते.

Related image
या तीन अवस्थांचे प्रत्येकी तीन भाग करता येतील. पुरुष, अभिमानी आणि द्रष्टा. जनकराजाच्या गोष्टीत स्वप्नावस्थेमध्ये जनक राजा लढाई करत होता, रस्त्यावरून जात होता, आक्रोश करीत होता. हा स्वप्नपुरुष-स्वप्नातील पुरुष-होय. जागा झाल्यावर त्याच्या लक्षात आले की हे सर्व स्वप्न होते, हे त्याच्याच मनाने निर्माण केलेले जग होते. हे जाणणारा झाला स्वप्नअभिमानी, हे सर्व स्वप्न माझेच आहे असा अभिमान (ego) असणारा. हे सर्व स्वप्न आणि जाग आल्यावर आलेले भान आपल्या चैतन्यात घडले. हे चैतन्य धारण करणारा तो स्वप्न द्रष्टा.

असाच प्रकार जागृतावस्थेतही असतो. जागृतावस्थेत आपण म्हणजे जागृत पुरुष. पण जेव्हा आपण आपली स्वत:ची ओळख विशाल करतो तेव्हा जागृत अभिमानी दिसतो. उदाहरणार्थ आपण जेव्हा भारत-पाकिस्तानची क्रिकेटस्पर्धा पाहतो तेव्हा अंतरंगात आपण भारताच्या विशाल समुदायाचा भाग होतो. एखादा माणूस जातीसाठी-धर्मासाठी काही विचार करतो तेव्हा तो त्या विशाल समुदायाचा भाग होतो. अशाच प्रकारे जेव्हा तो सर्व मानवजातीचा भाग होतो तो जागृतअभिमानी होतो. ज्या चैतन्यात हे घडते ते जागृत द्रष्टा होय. सुषुप्तावस्थेत सुषुप्त  अभिमानी  आणि द्रष्टा असतो. मात्र सुषुप्त पुरुष नसतो कारण चेतना बाह्यजगात प्रक्षेपित होत नसते.
या सर्व अवस्थांत द्रष्टा हा एकच असतो. तोच तुर्य म्हणता येईल.

जागृत पुरुष हा व्यवहारासाठी उपयुक्त असतो तर जागृत अभिमानी हा आनंद उपभोगतो. जागृत द्रष्टा हा मोक्षप्राप्तीसाठी उपयुक्त ठरतो.

चौथी तुर्यावस्था म्हणजे आपण ब्रह्मस्वरूप असल्याची जाणीव,  आपण विशाल चैतन्यसागर असल्याची जाणीव.
 मागील लेखातील उदाहरणात सोने जसे पाटल्या, हार, अंगठी अशा अनेक रूपात प्रकट होते, परंतु अंतरंगी ते सोनेच असते तसेच आपली तुर्यावस्था अन्य तीन अवस्थांमध्ये प्रकट होते. आपल्याला आपल्याला पाटल्या पाहिल्यावर ते सोने आहे याची जाणीव झटकन होत नाही, तसेच जागृतावस्था, स्वप्नावस्था अथवा सुषुप्तीमध्ये आपल्या तुर्यावस्थेची जाणीव नसते. पण या अवस्थांच्या पाठीशी तुर्यावस्था ठामपणे उभी असते. जसे सोने काढून घेतले तर पाटल्यांचे अस्तित्व राहात नाही तसेच तुर्यावस्थेशिवाय अन्य अवस्थांचे अस्तित्व उरत नाही. सोनाराला जसे कोठल्याही दागिन्यात सोनेच दिसते तसेच ज्ञानी (आपण ब्रह्मस्वरूप असल्याची जाणीव झालेल्या) पुरुषास कोठल्याही अवस्थेत तुर्यावस्थेचेच दर्शन होते.

पुढील लेखात आपण या तुर्यावस्थेची अधिक माहिती घेऊ.


Saturday, November 17, 2018

मांडुक्य उपनिषद -3

मागील लेखात आपण जनक राजाची गोष्ट पहिली. राजाला 'पडलेले भयंकर स्वप्न खरे की उठल्यावर अनुभवास येणारे राजवैभव खरे' हा प्रश्न पडला होता. त्यावर अष्टावक्र ऋषींनी स्वप्नातला अनुभव आणि जागृतावस्थेत अनुभव या दोहोंना असत्य ठरविले. मात्र राजाला 'केवळ तूच सत्य' असल्याचे प्रतिपादन केले.
खरे तर आपण जागृतावस्थेत अनुभवांना सत्य समजतो तर स्वप्नावस्थेतील अनुभवांना असत्य समजतो. म्हणूनच प्रथम आपण भारतीय अध्यात्मानुसार 'सत्य' म्हणजे काय हे समजून घेऊ.
भारतीय अध्यात्मानुसार जे चिरकाल टिकते तेच सत्य असते. ज्याचे अस्तित्व अन्य गोष्टींवर अवलंबून असते (dependent existence) ते असत्य समजले जाते. उदाहरणार्थ सोन्याच्या पाटल्या, सोन्याचा हार, सोन्याची अंगठी हे वेगवेगळे पदार्थ आहेत. परंतु तुम्ही सोनाराकडे ते गहाण ठेवायला गेल्यास त्याच्या दृष्टीने ते फक्त सोने आहे. सोन्याच्या पाटल्या वितळवून त्याचा हार बनविता येतो. अशावेळी पाटल्या नष्ट होऊन त्याचा हार होतो. परंतु 'सोने' तसेच राहते. सोने काढून  टाकल्यास हार राहणार नाही. परंतु हार काढून टाकल्यास (तो वितळविल्यास) सोने तसेच राहते. म्हणजेच हाराचे अस्तित्व सोन्यावर अवलंबून आहे, पण सोन्याचे अस्तित्व हारावर अवलंबून नाही (Absolute existence). या हाराच्या अवलंबित अस्तित्वाला (dependent existence) भारतीय अध्यात्माने 'असत्य' म्हटले आहे. या दृष्टीनेच जनकाला 'केवळ तूच सत्य' असे अष्टावक्र ऋषी सांगतात.
आपण आपल्या जागृतावस्थेमध्ये ज्याचा अनुभव घेऊ शकतो त्यालाच सत्य समजतो. म्हणूनच शंकराचार्यानीं त्याला व्यावहारिक सत्य म्हटले आहे तर अध्यात्मिक भाषेतील सत्याला शाश्वत सत्य अथवा अंतिम सत्य म्हटले आहे. शाश्वत सत्याची ही व्याख्या समोर ठेऊनच आपण मांडुक्य उपनिषदाचे विवेचन करणार आहोत.

Image result for तुर्यावस्थामाणसाच्या तीन अवस्था आपल्याला सहज ओळखता येतात.
१> जागृतावस्था
२>स्वप्नावस्था
३> गाढ निद्रा (सुषुप्ती)
मांडुक्य उपनिषदाच्या मते चौथी अवस्थाही अस्तित्वात आहे. त्याला मांडुक्य उपनिषद कोणतेही नाव न देता चौथी (चतुर्थ) अवस्था असेच म्हणते. आद्य शंकराचार्यांचे आजेगुरु गौडपादाचार्य यांनी या अवस्थेला 'तुर्यावस्था' असे नाव दिले आहे. 'तुर्य' याचा शब्दश: अर्थ चौथी असाच होतो. आज तुर्यावस्था हेच नाव प्रचलित आहे.

जागृतावस्था ही सर्वात स्थूल अवस्था आहे. जागृतावस्थेत आपल्या पंचेंद्रियांद्वारे आणि मनाच्या साहाय्याने आपण आजूबाजूस घडणाऱ्या घटनांचा अनुभव घेत असतो. स्वप्नावस्था ही अधिक तरल अवस्था आहे. यात आपले मन आपल्यासमोर घटना उभे करत असते आणि आपण त्या घटनांचा स्वप्नातील पंचेंद्रियांद्वारे अनुभव घेत असतो. स्वप्न पडत असताना हा अनुभव प्रत्यक्ष घेत आहोत असेच वाटते. गाढ निद्रेत स्वप्ने नसतात. मनाची कवाडे घट्ट मिटलेली असतात. कोणतेही दृश्य जगातले अनुभव येत नाहीत. मात्र झोपून उठल्यावर आपण गाढ निद्रेचा अनुभव घेतला हे सांगू शकतो. म्हणजेच आपण गाढ निद्रा "अनुभवत" असतो. या 'अनुभवण्यात' भौतिक गोष्टींचा समावेश नसल्याने पंचेंद्रियांची आवश्यकता नसते.
या अवस्थांच्या मधल्याही अवस्था असू शकतात. जागृतावस्थेत आपले मन भरकटून दिवास्वप्ने बघू शकतो. किंवा जागृतावस्थेत डुलक्या येऊ लागतात.
या तीनही अवस्थांमागे त्या अवस्थांना आधार देत तुर्यावस्था उभी आहे. तुर्यावस्थेसंबंधी पुढील लेखात आपण विस्ताराने विचार करणार आहोत.


Thursday, November 15, 2018

मांडुक्य उपनिषद २

मांडुक्य उपनिषद हे केवळ १२ श्लोकांचे आहे आणि ते सांगायचे आहे ते थेट सांगण्याचा त्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच हे उपनिषद अत्यंत महत्वाचे पण समजण्यास जाटील आहे हे आपण मागील लेखात पहिले.

हे उपनिषद समजण्यास सोपे व्हावे म्हणून एका गोष्टीने प्रारंभ करू.

जनक राजा एकदा आपल्या महालात निद्रा घेत होता. एक पहारेकरी आत आला आणि त्याने जनक राजाला त्याच्या शत्रूने अचानक हल्ला केल्याचे सांगितले. राजा लढाईची तयारी करू लागला. परंतु युद्धात त्याची हार झाली. शत्रूने  त्याचे राज्य घेतले आणि त्याला परराज्यात हाकलून दिले. सर्वस्व हरलेला जखमी अवस्थेतील जनकराजा गलितगात्र होऊन चालू लागला. शत्रुराजाच्या भीतीने त्याला कोणीही मदत केली नाही. अशावेळी तो एका अन्नछत्रात पोचला. तेथे अन्नासाठी गरीब, दरिद्री लोकांची रांग लागलेली होती. अत्यंत भुकेलेल्या अवस्थेत तो रांगेत उभा राहिला. त्याचा अन्न घेण्यासाठी नंबर येताच अन्नछत्रातील अन्न संपले. तेथील सेवकाने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. पण खूप आर्जवे केल्यावर त्या खिचडीच्या भांड्यातील खाली राहिलेली थोडी पेज सेवकाने राजाला दिली. जनकराजा ते पेजेचे भांडे मुखाला लावणार तोच एक घार येऊन त्याच्या भांड्याला धडकली आणि ती सर्व पेज मातीत मिसळली. जनक राजा दु:खाने आक्रोश करू लागला.

तोच एका सेवकाने राजाला झोपेतून उठविले  आणि आक्रोशाचे कारण विचारले. राजा जागा झाला . पण त्याला प्रश्न पडला की 'आता पाहत आहोत ते सत्य का मगाशी पाहिलेले सत्य". त्याने त्या सेवकाला प्रश्न विचारला 'हे सत्य का ते सत्य?'. त्या बिचाऱ्याला याचे उत्तर देता आले नाही. राजाने राणीलाही हा प्रश्न विचारला 'हे सत्य का ते सत्य?' तिला राजा काय विचारतो आहे तेच कळले नाही.  राजा आता वेडापिसा झाला. प्रत्येकाला तो हाच प्रश्न विचारू लागला.  राजसभा भरली. तेथेही तो सर्वांना हाच प्रश्न विचारू लागला. सभेचे कामकाज ठप्प झाले.

जनक राजाला वेड लागल्याची बातमी राजधानीत पसरली. अष्टावक्र ऋषींच्या कानावर हे गेले. ते दरबारात आले. जनक राजाने त्यांना तोच प्रश्न विचारला  ' हे सत्य का ते सत्य?' अष्टावक्र ऋषींनी उत्तर दिले, 'राजा, हेही असत्य आणि तेही असत्य.' राजा गोंधळात पडला. त्याने विचारले  'मग सत्य काय?' 'राजा, केवळ "तू" सत्य. तेव्हा पाहिलेले शत्रूराष्ट्राचे सैन्य, तुझी दारूण अवस्था आता आहे काय? म्हणूनच ते असत्य. आताचा दरबार तेव्हा होता काय? मग हे ही असत्य. पण राजा दोन्हीवेळी बघणारा तू मात्र होतास. म्हणून केवळ तूच सत्य'

पुढील लेखात या गोष्टीच्या अंतरंगात शिरून मांडुक्य उपनिषद समजून घेण्याचा प्रयत्न करू.