Monday, December 21, 2015

the-cultural-differences-between-east-and-west

प्राचीन भारतीय अंकगणित : डॉ भरत सरोदे,पुणे.


एक ‘ट्रिलियन’ म्हणजे किती ?

त्यात एकावर किती शून्ये येतात ?

थांबा ! थांबा !

सहस्र, कोटी किंवा शंभर अब्ज असे एकक वापरून सांगायचे नाही.

भारतीय दशमान पद्धत वापरून अथवा मराठी शब्द वापरून सांगायचे.

विचार करा.

जमतंय का ?

नाही जमत ना !

मग एकावर पन्नास शून्ये किंवा एकावर शहाण्णव शून्ये म्हणजे किती,

 हे सांगताच यायचे नाही.

 मग अशा संख्यांचा उच्चार तरी कसा करायचा ?

पण भारतीय अंकगणितात याला उत्तर आहे.

१. अंक हे सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक असणे
अतिप्राचीन भारतात गणितावर बरेच संशोधनझाले आहे.

त्याविषयी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार,

प्राचीन काळातील भारतियांनी गणितासाठीवापरलेल्या चिन्हांना ‘अंक’ म्हटले आहे.

हे अंक म्हणजे (१ ते ९ आणि ०) सध्याच्या दशमान पद्धतीचेजनक आहेत.

आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला.

 शून्य ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.

२. दशमान पद्धतीची संकल्पना
‘आसा' या वैदिक काळाच्या प्रारंभी असलेल्या वायव्य भारतातरहाणार्य
ा भारतीय गणिततज्ञांनी सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली.

अंकाच्या स्थानानुसारत्याची किंमत पालटेल, या ‘आसा' यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीचीदेणगी मिळाली.

अशा पद्धतीने लिहिलेले आकडे ‘हिंदासा’ नावाने ओळखले जाऊ लागले. साधारणतः वर्ष५०० मध्ये आर्यभट्टांनी दशमान पद्धती सगळीकडे रुजवली.

त्यांनी शून्यासाठी ‘ख' या शब्दाचा वापरकेला. नंतर त्याला ‘शून्य’ असे संबोधले गेले.

३. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक ऐकिवात असणे
इंग्रजीत संख्यांनासलग संज्ञा नाहीत.

 ‘थाऊजंड’,
‘मिलियन’,
‘बिलियन’,
‘ट्रिलियन’,
‘क्वाड्रिलियन’

अशा एक सहस्रांच्यापटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत.

 भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक अनेकदा ऐकिवातअसतात,

 उदा.

खर्व,
निखर्व,
पद्म,
महापद्म

 अगदी परार्धापर्यंत.

अर्थात आपण केवळ नावे ऐकून आहोत.

त्यानुसार नेमकी संख्या सांगणे शक्य होत नाही;

कारण त्याची आपल्याला सवयच नाही.

४. भारतीय दशमान पद्धतीनुसार असणारे आकडे
विविध कोशांमध्ये किंवा पुस्तकांत भारतीयदशमान पद्धतीनुसार खालीलप्रमाणे आकडे लिहिले जातात.

१ एक

१० दहा

१०० शंभर

१००० सहस्र

१०,००० दश सहस्र

१,००,००० लाख

१०,००,००० दहा लाख

१,००,००,००० कोटी

१०,००,००,००० दहा कोटी

१,००,००,००,००० अब्ज

१०,००,००,००,००० खर्व (दश अब्ज)

१,००,००,००,००,००० निखर्व

१०,००,००,००,००,००० पद्म

१,००,००,००,००,००,००० दशपद्म

१,००,००,००,००,००,००,०० नील

१०,००,००,००,००,००,००,०० दशनील

१०,००,००,००,००,००,००,००० शंख

१,००,००,००,००,००,००,००,००० दशशंख

५. एकावर शहाण्णव शून्य असणारी संख्या – दशअनंत !

आता यापुढील संख्या किती सांगता येईल का ?

प्रयत्न करून पहा.

एकावर शहाण्णव शून्य म्हणजे ही संख्या आहे दशअनंत;

पण ही संख्या मोजायची कशी ?

भारतीय पद्धतीत त्याचेही उत्तर आहे.

 अर्थात ते शब्द आता वापरात नाहीत.

या शब्दांची सूची कोणत्याही पुस्तकात आता उपलब्ध नाही. c

काही जुन्या पुस्तकांत त्यांचे संदर्भ आहेत.

अशाच एका    c  पुढील सूची पहा.

 एकं (एक),

दशं (दहा),

शतम् (शंभर),

सहस्र (हजार),

दशसहस्र (दहा हजार),

लक्ष (लाख),

दशलक्ष,

कोटी,

दशकोटी,

अब्ज,

दशअब्ज,

खर्व,

दशखर्व,

पद्म,

दशपद्म,

 नील,

दशनील,

शंख,

 दशशंख,

क्षिती,

 दश क्षिती,

क्षोभ,

दशक्षोभ,

ऋद्धी,

दशऋद्धी,

सिद्धी,

दशसिद्धी,

निधी,

दशनिधी,

क्षोणी,

दशक्षोणी,
कल्प,
दशकल्प,
 त्राही,
दशत्राही,
ब्रह्मांड,
दशब्रह्मांड,
रुद्र,
दशरुद्र,
ताल,
दशताल,
भार,
दशभार,
बुरुज,
दशबुरुज,
घंटा,
 दशघंटा,
मील,
दशमील,
पचूर,
दशपचूर,
लय,
दशलय,
 फार,
दशफार,
अषार,
दशअषार,
वट,
दशवट,
गिरी,
दशगिरी,
मन,
दशमन,
वव,
दशवव,
शंकू,
दशशंकू,
 बाप,
दशबाप,
बल,
दशबल,
झार,
दशझार,
भार,
दशभीर,
वज्र,
दशवज्र,
लोट,
दशलोट,
नजे,
दशनजे,
 पट,
 दशपट,
 तमे,
दशतमे,
डंभ,
दशडंभ,
कैक,
 दशकैक,
अमित,
दशअमित,
गोल,
दशगोल,
परिमित,
दशपरिमित,
अनंत,
दशअनंत.’

वर्ग संख्या ट्रिक्स
41 ते 50 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग :
41 चा वर्ग = 16  81
42 चा वर्ग = 17  64
43 चा वर्ग = 18  49
44 चा वर्ग = 19  36
45 चा वर्ग = 20  25
46 चा वर्ग = 21  16
47 चा वर्ग = 22  09
48 चा वर्ग = 23  04
49 चा वर्ग = 24  01
50 चा वर्ग = 25  00
वर्ग संख्यांच्या मांडणीकडे नीट लक्ष द्या
16,17,18,19,20,21,22,23,24,25  अशी चढत्या क्रमाची मांडणी तयार झालेली आहे, ती पहा. त्याचबरोबर
81,64,49,36,25,16,09,04,01,00 अशी उतरत्या क्रमाची 9,8,7,6,5,4,3,2,1,0 यांच्या वर्गाची मांडणी तयार झालेली आहे.
वरील दोन्ही मांडण्यांचा परस्पर संबंध ध्यानात ठेवणे सहज शक्य आहे.
51 ते 60 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग :
सोपी रीत
           51 ते 60 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग ध्यानात ठेवणे हा लेख वाचल्यानंतर सहज शक्य आहे.येथे केलेली मांडणी व थोडीशी स्मरणशक्ती वापरल्यास आपण कायमस्वरुपी 51 ते 60 चे वर्ग ध्यानात ठेवू शकतो व हवे तेव्हा आठवू शकतो.
        51 चा वर्ग =  26   01
        52 चा वर्ग =  27   04
        53 चा वर्ग =  28   09
        54 चा वर्ग =  29   16
        55 चा वर्ग =  30   25
        56 चा वर्ग =  31   36
        57 चा वर्ग =  32   49
        58 चा वर्ग =  33   64
        59 चा वर्ग =  34   81
        60 चा वर्ग =  36   00 (3500+100)
वरील मांडणीकडे लक्षपूर्वक पहा.
51 ते 59 च्या वर्गसंख्यांच्या मांडणीमद्ये 26,27,28,29,30,31,32,33,34 अशी क्रमवार चढती मांडणी तयार झालेली दिसते.त्याचबरोबर 01,04,09,16,25,36,49,64,81 अशी क्रमवार 1 ते 9 यांच्या वर्गाची चढती मांडणी दिसून येते.
60 च्या वर्गामद्ये क्रमवार पुढील साख्या 35 व क्रमवार पुढील 10 चा वर्ग 100 यांची बेरीज (3500+100= 36  00) अशी रचना तयार होते.
तसेच
91 चा वर्ग  82  81
92 चा वर्ग  84  64
93 चा वर्ग  86  49
94 चा वर्ग  88  36
95 चा वर्ग  90  25
96 चा वर्ग  92  16
97 चा वर्ग  94  09
98 चा वर्ग  96  04
99 चा वर्ग  98  01
100 चा वर्ग 100 00
अश्याप्रकारे आणखी निरीक्षणातून
सोप्या ट्रिक्स तयार करू शकतात .

लेख सौजन्य:डॉ  भरत  सरोदे,पुणे.

Wednesday, December 16, 2015

नियंत्रणमुक्त शिक्षण हेच महासत्ता बनवू शकेल : लेखक डॉ. विजय बेडेकर,

सोमवार, १६ नोव्हेंबर २०१५च्या इकॉनाॅमिक्स टाइम्सने पहिल्याच पानावर एक धक्कादायक बातमी छापली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ६ नोव्हेंबरच्या पत्रकाद्वारे भारतातल्या सुमारे दहा अभिमत किंवा स्वायत्त दर्जा असलेल्या उच्चशिक्षण संस्थांना, आपल्या नोंदणीकृत भौगोलिक परिसराव्यतिरिक्त स्थापन केलेल्या सर्व केंद्रांना बंद करण्याचा आदेश दिला. या दहा संस्थांमध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर), भुवनेश्वर येथील विज्ञान आणि संशोधनामध्ये काम करणारी होमी भाभा संस्था, मुंबईच्या नरसी मोंजीची बंगळुरू, हैदराबाद आणि शिवपूरची केंद्रे, बिट्स पिलानीची गोवा आणि हैदराबादमधील केंद्रे आणि अशाच महत्त्वाच्या काही संशोधन संस्थांचा या यादीमध्ये समावेश आहे.

आज भारतामध्ये सरकारी माध्यमातून हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करूनही यातल्या बहुतेक संस्थांचा शैक्षणिक दर्जा हा सुमार आहे. वर उल्लेख केलेल्या आणि यूजीसीने आक्षेप घेतलेल्या १० संस्थांचा मात्र याला अपवाद आहे. साहजिकच या संशोधन संस्थांना नवीन जागा शोधाव्या लागतात. अशा उच्च दर्जाच्या संशोधनाच्या सुविधा भारतासारख्या मोठ्या देशांमध्ये वेगवेगळे प्रांत आणि केंद्रांमध्ये करणे आवश्यक असते. या अपरिहार्य कारणाकरिता या संशोधन संस्था भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विकसित होत गेल्या. शिवाय यातल्या बहुसंख्य संस्थांमधील शिक्षण आणि संशोधन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. अणू आणि अंतराळ प्रकल्पांना या संशोधनांचा फार मोठा फायदाही झाला आहे. आयआयटी किंवा आयआयएम बुद्धिमान विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करतात, तर वर उल्लेखलेल्या संस्था प्रत्यक्ष संशोधनाकरिता या विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण करून देतात.
धोरणं जास्तीत जास्त पुरोगामी आणि प्रगतिशील दिसावीत म्हणून परीक्षा सोपी करणं, नापासांच्या मानसिक प्रकृतीची काळजी घेणे, गरीब, मागासलेले, दलित, स्त्रिया, ग्रामीण, शहरी या सगळ्या विशेषणांचा वापर करून समाजाला विभागण्यात येते आणि मग फुकटेपणाची खैरात करत हा धोरणांचा पाऊस पाडला जातो. आधी दिलेली आश्वासनं आणि धोरणांचं काय झालं? असा प्रश्न येथे विचारायचा नसतो. शिक्षकांचे पगार, पुस्तकांची छापाई, शैक्षणिक शुल्क, वर उल्लेखलेल्या सर्व घटकांचं आरक्षण, हे कमी पडतं म्हणून की काय, शाहू, फुले, आंबेडकर आणि आपल्या राजकीय सैद्धांतिक विचारांच्या जवळ असलेल्या व्यक्तींच्या जयंत्या आणि त्यांच्या नावांनी योजना यांचाही शिक्षणामध्ये समावेश असतो. तरीही आपले शिक्षण परिपूर्ण हाेत नसल्यामुळे नवीन धोरणांच्या घोषणांचा रतीब अखंडपणे चालू राहतो.
गेल्या साठ वर्षांत ही प्रक्रिया अव्याहतपणे चालू असल्यामुळे सगळ्याच शिक्षण प्रक्रियेचा विचका झाला आहे. परीक्षांचे निकाल ९० टक्क्यांच्या वर लागूनही शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत कुठलाच घटक समाधानी नाही. यामध्ये एका यंत्रणेचे मात्र चांगलेच फावले आहे, ते म्हणजे त्या त्या वेळचे राज्य आणि केंद्रातील शिक्षणमंत्री, त्यातूनच निर्माण झालेली प्रचंड नोकरशाही. मंत्री होण्याकरिता किंवा नगरपालिकांच्या शिक्षण विभागाचे सदस्य होण्याकरिता कुठल्याच किमान शैक्षणिक पात्रतेची अट अस्तित्वात नाही. शिक्षकाला, विद्यार्थ्याला, शैक्षणिक संस्थांना मात्र अनेक पात्रतांचे निकष आणि कायद्याची बंधने. यातूनच निर्माण होते ती बधीर आणि भ्रष्ट शिक्षण यंत्रणेतील नोकरशाही. सध्याच्या भारतातील बऱ्याच विद्यापीठांतील किंवा प्राथमिक शिक्षणाशी निगडित असलेल्या जिल्हा परिषदांमधील राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचार आणि बेजबाबदारपणा बघितल्यावर, आहे तो शैक्षणिक दर्जाही कमी नाही, असेच म्हणावे लागेल. आपल्या या सगळ्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्याकरिता मग दोषाचे धनी शोधण्याचे काम चालू होते. अर्थातच यामध्ये दोन घटक म्हणजे शिक्षक आणि शैक्षणिक संस्था यांच्या डोक्यावर हे खापर फोडण्यात येते.
भारताच्या शिक्षणाच्या संदर्भात १८८२ मध्ये मॅक्सम्युलरने केलेले निरीक्षण फार बोलके आहे. मॅक्सम्युलरने सांगितलेले शाळेबाहेरील शिक्षणाचे सर्व स्रोत आपण आज प्रदूषित करून टाकले आहेत. या सगळ्याच माध्यमांनी आपली निरागसता हरवली असून ती व्यापाराची केंद्रे झाली आहेत. सर्वच क्षेत्रांमध्ये आज अपवाद वगळता अनुकरणीय अशा चारित्र्यशील नेतृत्वाची दिवाळखोरी आहे.

शैक्षणिक धोरण म्हणजे जास्तीत जास्त नियंत्रण, हा विचार आता इतका दृढ झाला आहे की, त्यामुळे या प्रक्रियेतील सर्वच घटकांनी आपली स्वायत्तता हरवली आहे. भारताला एक महासत्ता बनवायचे असेल तर अशा स्वायत्त संस्थांची निर्मिती ही अपरिहार्य आहे. आपली विद्यापीठे काय किंवा संशोधनाचा दर्जा काय, संशोधनमूल्य आणि नावीन्य या दोन्हीही आघाड्यांवर ती अमेरिकन किंवा युरोपियन विद्यापीठांशी तुलना करू शकत नाही. तंत्रज्ञान, कौशल्य विकास किंवा नावीन्याच्या निर्मितीकरिता स्वायत्तता अपिरहार्य आहे. 
महाराष्ट्र राज्याच्या दोन लाख कोटी रुपये खर्चाच्या अर्थसंकल्पातील वीस टक्के म्हणजे ४०,००० कोटी रुपये शिक्षणाच्या नावाने खर्च केले जातात. अर्थात यातील ९० टक्के शिक्षक, प्राध्यापकांच्या पगारांवर खर्च होतात. या खर्चाच्या तुलनेत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांची कामगिरी फारच निराशाजनक आहे.
भारतातील सर्वात चांगल्या १० संशोधन संस्थांना आपली केंद्रे बंद करायला सांगणारा विद्यापीठ अनुदान आयोगाचा आदेश हा दुर्दैवीच नाही, तर नोकरशाहीच्या वसाहतवादी आणि अरेरावी मानसिक वृत्तीचे ते द्योतक आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या शिक्षणाशी निगडित असलेल्या नोकरशहांमध्ये हीच बधीरता दिसून येते. आज खरी गरज आहे ती राजकीय हस्तक्षेप, त्यातून निर्माण होणारी धोरणे आणि त्याचीच पुढची निर्मिती म्हणजे बधीर नोकरशहा यांच्यावर नियंत्रण आणण्याची. नियंत्रणमुक्त शिक्षण हेच भारताला महासत्ता बनवू शकेल.

  • डॉ. विजय बेडेकर,
  • प्रसिद्ध डॉक्टर आणि प्राच्यविद्येचे अभ्यासक, ठाणे
  • Dec 15, 2015, 07:28 AM Divyamarathi news paper

Saturday, December 12, 2015

बाबू गेनू

तयांचे व्यर्थ (!) बलिदान - हुतात्मा बाबू गेनू सैद ....एक अनटोल्ड फर्गोटन स्टोरी ......
१२ डिसेंबर १९३० रोजी मुंबईच्या कालबादेवीस्थित मँचेस्टर मिलमधून विदेशी वस्तू भरलेला ट्रक बाहेर पडत होता. मिलच्या बाहेरील चौकात स्वदेशीच्या भावनेने गोदी कामगारांचा मोठा जमाव जमला होता, या जमावाचा विदेशी कपडे घेऊन मिलबाहेर पडणारया कपड्यांना विरोध होता. हे सर्व जण स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते होते. ट्रक कर्कश्श हॉर्न वाजवत मिलच्या गेटबाहेर पडला आणि समोरच्या चौकात ट्रकला अडवले गेले. ट्रकचालकाला त्याच्या मालकाचे हुकुम होते, गाडी पुढे दामटण्याचे ! गोदी कामगारांनी घोषणा द्यायला सुरुवात केली.भारत माता की जय, वंदे मातरम् या गगनभेदी गर्जनांनी काळबादेवी परिसर दणाणून उठला होता व आंदोलनाची तीव्रता वाढत होती. आवाजाचा टप्पा वाढत गेला, हॉर्न देखील जोराने वाजत राहिला, ट्रकचालक ट्रक बंद करत नव्हता आणि ट्रकच्या समोर जमलेला जमाव मागे हटत नव्हता.अखेर त्या जमावाचे नेतृत्व करणारया तरुणाने ट्रकच्या पुढ्यात आडवी लोळण घेतली आणि आपला प्रखर विरोध दर्शविला. इंग्रज अधिकारी सार्जेण्टने ट्रकचा ताबा घेतला आणि या उद्दाम इंग्रजी ड्रायव्हरने तो ट्रक या २२ वर्षाच्या तरूणाच्या अंगावरून पुढे नेला.तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला. लगेच त्याला गोकुलदास तेजपाल रुग्णालयामध्ये दाखल केले आणि ४.३० वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर झाले. सळसळत्या रक्ताचा तो तरणाबांड मराठी पोर होता बाबू गेनू !पुढे सशस्त्र क्रांतिकारकांच्या काळात बाबू गेनूंचे 'अहिंसक अग्निदिव्य'- एखादा दिवा विझावा, तसे विझून गेले आणि आता तर त्यांच्या तसबिरीला एखाद्या पुष्पहाराचे दर्शन वर्षाकाठी होणे देखील दुरापास्त झाले आहे. १२ डिसेंबर १९३० रोजी मुंबईत काळबादेवी रोडवर झालेल्या सत्यागृह व प्रत्यक्ष बलिदानाच्या छायाचित्रासह बातम्या 'टाइम्स ऑफ इंडिया' व इतर दैनिकांमध्ये छापल्या होत्या, मात्र आजच्या मिडीयाला एक ओळ त्यांच्याविषयी छापणे टीआरपीच्या पिसाटस्पर्धेत अवघड वाटतेय ! किती हा दैवदुर्विलास !!
कुठलीही पार्श्वभूमी नसणारा आणि कसलाही भक्कम पाठिंबा नसणारा एखादा सामान्य माणूस काय करू शकतो याचे हे उत्कट उदाहरण आहे. मी एकटा काय करू शकणार ? एकट्याची किती ताकद असणार असले दुबळे प्रश्न त्यांच्या मनात कधी आले नसतील का ? बाबू गेनू हे मूळचे पुणे जिल्ह्यातील महाळुंगे पडवळ ता. आंबेगाव. एका अत्यंत गरीब घरात त्यांचा जन्म १९०८ साली झाला होता.त्यांच्या वडीलांचे नाव गेनबा सैद असे होते, तर आईचे नाव कोंडाबाई.बाबूंना तीन भावंडे होती, भीमा, कुशाभाऊ आणि नामी. एकूण चौघेजण, तीन भाऊ- एक बहीण. गावाकडच्या मातीत राबणारे हे एक कोरडवाहू शेतकरी कुटुंब होते. महाळुंग्याच्या सैदवाडीत त्यांचे पडवीवजा घर होते. या भावंडांपैकी कुशाभाऊंची महाळुंग्याच्या शाळेच्या रजिस्टरात नोंद सापडते. तीही '१०-८-१९०९ रोजी शाळेत घातले आणि ३०.४.१९१० रोजी नाव काढून टाकले' अशी त्रोटकच ! त्यांचा एक भाऊ भीमा दमेकरी होता. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट. दुष्काळी मुलुख आणि पोटापाण्याची उपासमार यामुळे या भागातील हजारो कुटुंबे मुंबईत पोट भरायला गेलेली. गिरणी कामगार, डबेवाले, कुल्फी मलई विकणारे, गोदीत हमाली करणारे 'माथाडी', क्रॉफर्ड माकेर्टात दलाली व हमाली करणारे असे कितीतरी 'जीव.' बाबू गेनूंचे मामा, चुलते अगोदरच मुंबईला गेलेले. बाबूंची आई कोंडाबाईने हीच वाट धरली. हा काळ १९२०-२५ च्या सुमाराचा. रशियन क्रांती यशस्वी होऊन लालतारा नुकताच उगवलेला. लोकमान्यांचे निधन होऊन नेतृत्व महात्मा गांधींकडे आलेले. तेंव्हा १९२१ साली नुकताच मुळशीचा ऐतिहासिक सत्याग्रह सुरू झालेला. १९२९ साली कोल्हापूरच्या छत्रपती श्री शाहू महाराजांचे निधन झाले. तर १९२५ साली पुणे नगरपालिकेत महात्मा फुले यांचा पुतळा उभारणीला विरोध करणारा ठराव मंजूर झाला. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला चवदार तळ्याचे पाणी पेटवले व पुढे १९३० सालात नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह झाला. हा सत्याग्रह ३-४ वर्षे सुरू होता. अशा आगळ्या वेगळ्या सामाजिक स्थित्यंतरातून काळ जात होता. या काळात गांधीजींच्या नेतृत्वाखाली अनेक लढे झाले. चौरीचुरा, सायमन गो बॅक, बारडोली, दांडीयात्रा हे त्यापैकी प्रसिद्ध लढे. याच काळात कामगार चळवळीला जोरदार गती मिळालेली होती. बाबू गेनू, प्रल्हाद राऊत, शंकर आवटे हे बालमित्र. तिथेही महाळुंग्याचे.त्यातूनच पुढे मजुरी करण्यासाठी आलेले बाबू गेनू आपल्या या मित्रांसह मुंबई येथे गिरणी कामगार म्हणून काम करू लागले.
नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्य करतानाच त्यांच्या मनात स्वातंत्र्याचा ध्यास भरला होता. सुरुवातीला मुंबईत बाबू गेनू यांनी मोदी विभागात काम केले. १९२४-२५च्या सुमारास बाबू गेनू काँग्रेसचे स्वयंसेवक बनले होते. त्यांचा स्वयंसेवक क्रमांक होता - ८१९४. काळबादेवी काँग्रेस कमिटीत प्रल्हाद राऊत नावाचे गृहस्थ अनेक वर्षांपासून पदाधिकारी होते. त्यांची बाबूंच्या विचारावर मोठीच छाप होती. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचे अंत:करण पेटलेले होते. सायमन परत जा' या मोहिमेत त्यांनी भाग घेतला व अटक करून घेतली. वडाळा येथे झालेल्या मीठ सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. लाठीमार सहन केला. तुरुंगवास पत्करला. मुंबईतील जातीय दंगलीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे काम केले. स्वातंत्र्य चळवळीतला त्यांचा सहभाग उत्तरोत्तर वाढत गेला आहे. हुतात्मे भगतसिंग, चंदशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, सुखदेव, शिवराम हरी राजगुरू इत्यादी क्रांतिकारकांची पिढी याच काळात उदयाला आली 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन' ही संस्था स्थापून त्यांनी जागोजाग सशस्त्र उठाव केले. हिंदुस्तान आमीर् हे नाव लोकप्रिय झाले. भगतसिंग-राजगुरू-सुखदेव फाशी गेले. म. गांधींना ते मानीत. मात्र, त्यांचे मार्ग सशस्त्र होते. 'बाबू गेनू सैद' यांनी म. गांधींच्या अहिंसाव्रताचे तंतोतंत पालन केले आहे. १९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले. पुढे गिरणी कामगार म्हणून काम करता करता स्वदेशी संकल्पना हे त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरले. तत्कालीन मुंबई कॉंग्रेसच्या वरिष्ठांनी स्वदेशी आंदोलनाच्या नेतृत्वाची जबाबदारीसुद्धा बाबू गेनू यांच्यावर टाकली होती.
१२ डिसेंबर १९३० रोजी स्वदेशीच्या उत्स्फूर्त भावनेने सामान्य कामगार असलेल्या बाबू गेनू यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये हौतात्म्य पत्करले. १३ डिसेंबर रोजी सोनापूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर हजारो देशभक्तांच्या उपस्थितीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. संध्याकाळी एसप्लेनेड मैदानावर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन करून श्रद्धांजली सभेत लीलावती मुंशी यांनी स्वदेशीचा वापर हीच बाबू गेनू यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार काढून श्रद्धांजली अर्पण केली.बाबू गेनूंच्या अंत्ययात्रेत व त्यानंतरच्या श्रद्धांजली सभेतील उपस्थितांच्या यादीत सर्वश्री कन्हय्यालाल मुन्शी, वीर नरीमन, युसूफ मेहरअली, शेठ जमनादास, भानुशंकर याज्ञिक, मदन शेट्टी इ. मंडळींची नावे वाचायला मिळतात. बाबू गेनूंच्या चितेला श्रीमती प्यारीबहन यांनी अग्नी दिल्याची नोंद आढळते. यापैकी कन्हय्यालाल मुन्शी यांनी 'भारतीय विद्या भवन' ही संस्था स्थापली होती. पुढे मुन्शींचे चरित्रही प्रसिद्ध झाले होते. त्यातही गेनुंचा उल्लेख त्रोटक आहे. युसूफ मेहेरअलींचे स्वातंत्र्य चळवळीवरील पुस्तक उपलब्ध आहे.या पुस्तकात 'बाबू गेनूं'च्या बलिदानाबद्दल नाममात्र दखल सोडून बाकी भाष्य शून्य आहे. म. गांधींच्या कानांवर बाबू गेनूंच्या सत्याग्रहाची हकीगत 'स्लोकंब' या स्वातंत्र्य चळवळीला साहाय्य करणाऱ्या इंग्रजाने घातल्याची नोंद आढळते. प्रत्यक्ष म. गांधी यांनी काय म्हटले ? यावर प्रकाश टाकण्यासाठी श्री.भालेराव यांनी महात्मा गांधी-स्लोकंब यांचा संवाद प्रसिद्ध केला आहे. मात्र, पुरावा दिलेला नाही. वास्तविक पाहता गेनुंच्या हौतात्म्यास जितके महत्व द्यायला पाहिजे होते वा त्याबाबत जितके औचित्य दाखवायला पाहिजे होते ते दिले गेले नाही हे सत्य आहे.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वदेशी संकल्पनेचे मोठे बलस्थान होते. स्वदेशीविषयी सामान्य माणसांमध्ये उत्सुकता होती. सामान्य माणूस सुद्धा स्वदेशी वापरण्यामध्ये गौरव अनुभव करत होता. कारण, देशामध्ये सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वदेशीसह सर्व चळवळीचे उद्दिष्ट स्वतंत्र हेच होते. तसेच स्वदेशीच्या माध्यमामधून समृद्ध करून स्वाभिमानी, स्वावलंबी राष्ट्र म्हणून गौरवाचे स्थान प्राप्त करण्याचे होते. त्यामुळेच गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीबरोबरच स्वदेशीचे रणशिंग फुंकले होते. त्यामधून तरुण वर्ग स्वदेशी चळवळीमध्ये सहभागी झाला आणि सामान्य कामगार असलेल्या बाबू गेनूने स्वदेशी आंदोलनामध्ये बलिदान स्वीकारले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गांधीजींच्या विचारांना तिलांजली देण्यात आली. पुढच्या काँग्रेसी राजवटीतच विदेशी कंपन्यांना खुली सूट देण्यात आली. आजच्या घडीला तर हजारोंच्या संख्येने विदेशी कंपन्या देशाचे आर्थिक शोषण करत आहेत. दुसरीकडे चीनी वस्तूंनी देखील आपल्या बाजारपेठावर मोठा हात मारल्याचे दिसत आहे.
'स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत' या लेखक ग. प्र. प्रधानांच्या ग्रंथात 'हुतात्मा बाबू गेनू' या शीर्षकाखाली १२ डिसेंबरची हकीकत दिली आहे. प्रधान स्वत: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आहेत. बाबू गेनूंचा बलिदान दिन त्यांना स्पष्ट आठवतो. त्यावेळी त्यांचा मुक्काम इंदापुरात होता. बाबू गेनूंच्या बलिदानाची बातमी कळताच सर्वत्र उत्स्फूर्त 'हरताळ' पाळला गेला. तेव्हा प्रधान प्राथमिक शाळेत होते. शाळेतील मुली-मुले रस्त्यावर आली. बाबू गेनूंच्या बलिदानामुळे स्वातंत्र्याचा मंत्र खेडोपाडी पोचला. अमानुष ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संतापाची लाट उसळली. सर्व देशभर उत्स्फूर्त हरताळ पाळला गेला. प्रधानांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या शेवटी मराठी तसेच इंग्रजी संदर्भ ग्रंथाची सूची दिली आहे. त्यातील उपलब्ध साहित्यातून बाबू गेनूंच्या समग्र जीवनपटावर प्रकाश टाकता येतो.
आजच्या घडीला विदेशी कंपन्यांमुळे कामगारांची समस्या आणि बेकारी, बेरोजगारीचा प्रश्‍न देशासमोर उभा आहे. देशात २५ ते ३० कोटी बेरोजगार तरुण क्षमता, बुद्धी असून सुद्धा बेरोजगार होऊन काबाडकष्ट करीत आहेत. देशातील बेकारी आणि बेरोजगारीच्या मुळाशी स्वदेशीचा विसर हे एकमेव कारण आहे. स्वदेशीचा वापर व विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यास हिंदुस्थानी कामगारांना, श्रमिकांना रोजगार मिळू शकतो. व्यापारामधून होणारे उत्पन्न म्हणजे शुद्ध नफा सुद्धा देशामध्येच राहतो. त्यामुळे देशहितासाठी आज स्वदेशी वस्तूचा वापर आवश्यक आहे. स्वदेशी वस्तूंबाबत योगी अरविंद यांचं सुंदर वचनआहे. योगी अरविंद म्हणतात-
‘स्वदेशी म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेची, राष्ट्राच्या इच्छाशक्तीची ओळख आहे. राष्ट्रासाठी त्याग करण्याची सिद्धता स्वदेशीतूनच प्रदर्शित होते. स्वदेशीमुळे स्वदेश अजिंक्य राहतो.’
योगी अरविंदांनी दाखविलेला स्वदेशीचा मार्ग बाबू गेनू यांनी प्रत्यक्ष जगून आपल्या बलिदानाने देशाला, समाजाला दाखविलेला मार्ग आहे.आजच्या काळात काहींना हा मार्ग पटणार नाही पण येणारया काळात याची महती सर्वांना खचितच पटेल.
साल २००८ मध्ये बाबू गेनूंची जन्मशताब्दी प्रसिद्धीचे ढोल बडवून साजरी केली गेली पण त्यानंतर पुढे काय घडले ? गेनुंच्या स्मृतिदिनी आज 'महाळुंगे पडवळ' व मुंबई येथे मोजके कार्यक्रम होत आहेत. मागे महाराष्ट्र सरकारने महाळुंग्याच्या विकासासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले होते. डिंभे धरणाला 'हुतात्मा बाबू गेनू प्रकल्प' असे नाव अगोदरच दिले गेले आहे. तेथे बाबू गेनू यांच्या नावे मोठ्या उद्यानाची योजना अजुनी साकारतेच आहे. बाबू गेनूंच्या घराची पडवी मूळ स्वरूपात डागडुजी करून साकारली गेली आहे. बाबू गेनू यांच्या छायाचित्राचे अनावरण मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते केले गेले होते. त्यांच्या जीवनावर राहुल सोलापूरकर यांनी चित्रपट काढण्यासाठी सादर केलेली योजनाही बारगळल्यात जमा आहे.गेनुंची जन्मशताब्दी राज्य सरकारने साजरी करून आपले कर्तव्य पार पाडल्याचे समाधान पदरी पाडून घेतले पण २००८ मध्ये तेंव्हा केल्या गेलेल्या घोषणा एव्हाना हवेत विरून गेल्या आहेत.
आपल्याकडे हुतात्म्यांचे वा शहिदांचे कार्यक्रम वा स्मृतीदिनानिमित्त, जयंतीनिमित्त काही कार्यक्रम - उपक्रम साजरे करताना राजकारणी मंडळी त्यांच्या भाषणात आणि पत्रकार मंडळी अशा घटनांचे वार्तांकन करताना एक वाक्य हमखास वापरतात. ते म्हणजे "तयांचे व्यर्थ ना हो बलिदान !" पार घासून घासून गुळगुळीत झालेले हे वाक्य फेकायचे म्हणून फेकलेले असते याची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. पण सर्व म्हणजे तरी कोण ? माझ्या तुमच्यासारखे नैमित्तिक देशभक्तीबाज पण अंतरीचे बधीर संवेदनाहीन सामान्य लोक ....
आज बाबू गेनू हयात असते तर त्यांनी हे वाक्य उच्चारणारया बाजारबुणग्यांना काय सुनावले असते ?
आम्ही त्यांचे नाव सडकेला दिले आहे, एखादा पुतळा उभारला आहे..फार तर एखादा सरकारी कार्यक्रम आणि तसबिरीला एखादा सरकारी हार व जोडीला घोषणांचा पाऊस या व्यतिरिक्त अजून काय देणार ?
- समीर गायकवाड .
हुतात्मा बाबू गेनूंच्या जीवनावर काही मुख्य पुस्तके-
'व्यर्थ न हो बलिदान' लेखक: प्रा. डी. डी. माने,
'सांडला कलश रक्ताचा' लेखक: वसंत भालेराव,
'क्रांतिरत्न हुतात्मा बाबू गेनू सैद, लेखक: जगजीवन बबनराव काळे.

Friday, November 20, 2015

प्रार्थना

हे परमेश्वरा...

मला माझ्या वाढत्या वयाची
जाणिव दे. बडबडण्याची माझी
सवय कमी कर.

आणि प्रत्येक प्रसंगी मी
बोललंच पाहिजे ही माझ्यातली
अनिवार्य ईच्छा कमी कर.

दुसऱ्‍यांना सरळ करण्याची
जबाबदारी फक्त माझीच व
त्यांच्या खाजगी प्रश्नांची
दखल घेउन ते मीच
सोडवले पाहिजेत अशी
प्रामाणिक समजूत माझी
होऊ देऊ नकोस.

टाळता येणारा फाफटपसारा
व जरुर नसलेल्या तपशिलाचा
पाल्हाळ न लावता
शक्य तितक्या लवकर मूळ
मुद्यावर येण्याची माझ्यात
सवय कर.

इतरांची दुःखं व वेदना
शांतपणे ऐकण्यास मला
मदत करच पण त्यावेळी
माझं तोंड शिवल्यासारखे
बंद राहुंदे. अशा प्रसंगी

माझ्याच निराशा, वैफल्यांचे
रडगाणे ऐकवण्याची माझी
सवय कमी कर.

केंव्हा तरी माझीही चूक
होऊ शकते, कधीतरी माझाही
घोटाळा होऊ शकतो,
गैरसमजूत होऊ शकते
ह्याची जाणीव माझ्यात ठेव.

परमेश्वरा,
अगदी शेवटपर्यंत माझ्यात
प्रेमाचा ओलावा, गोडवा,
लाघवीपणा राहू दे.
मी संतमहात्मा नाही
हे मला माहीत आहेच,
पण एक बिलंदर बेरकी
खडूस माणूस म्हणून मी
मरू नये अशी माझी
प्रामाणिक इच्छा आहे.

विचारवंत होण्यास माझी
ना नाही पण मला लहरी
करू नकोस. दुसऱ्याला
मदत करण्याची इच्छा
आणि बुद्धी जरूर मला दे
पण गरजवंतांवर
हुकूमत गाजवण्याची
इच्छा मला देऊ नकोस.

शहाणपणाचा महान ठेवा
फक्त माझ्याकडेच आहे
अशी माझी पक्की खात्री
असूनसुद्धा, परमेश्वरा,
ज्यांच्याकडे खरा सल्ला
मागता येइल असे मोजके
का होईना पण
चार मित्र दे.

एवढीच माझी प्रार्थना...

-पु.ल.देशपांडे

Wednesday, November 11, 2015

बळीराजा

उद्या बलिप्रतिपदा. बळीराजाच्या स्मरणाचा दिवस. बळीराजा हा प्रल्हादाचा नातू (प्रल्हादाचा मुलगा विरोचन याचा पुत्र). प्राचीन काळी मगध साम्राज्य हे असुरांचे भारतातील बलाढ्य साम्राज्य होते. मगध हे अत्यंत भरभराटीस आलेले आणि सामान्य जनता सुखात असलेले साम्राज्य म्हणून ओळखले जात होते. येथे अनेक कलांना आश्रय मिळाला. मगध’ हेच हजारो वर्षे भारतीय सत्तेचे केंद्र होते. जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ येथेच होते. तीन-चतुर्थांश भारत व्यापणारी मौर्यांसारखी साम्राज्ये येथेच निर्माण झाली. काही संशोधकांच्या मते येथेच काही वेद (प्रामुख्याने अथर्ववेद) रचले गेले. प्राचीन मगध साम्राज्याचे यज्ञपूजक राज्यांशी वैर होते. हिरण्यकश्यपू हा या मगध साम्राज्याचा पराक्रमी राजा. तो अन्यायी असल्याचे कोणतेही पुराण सांगत नाही. आपला मुलगा प्रल्हाद हा यज्ञसंस्कृतीकडे आकर्षित झाल्याने हिरण्यकश्यपू संतप्त झाला. यज्ञधर्मीय राज्यांकडून असुर हिरण्यकश्यपुला मारण्यात येऊन ते कृत्य अवताराच्या कोंदणात बसविण्यात आले आणि यज्ञसंस्कृतीकडे आकर्षित झालेल्या प्रल्हादाला गादीवर बसविण्यात आले. हा सांस्कृतिक कलह होता. त्याच्या नंतर हे राज्य वंशपरंपरेने विरोचन आणि त्यानंतर बळीकडे आले. बळीच्या राज्यात जनता सुखी होती. म्हणूनच बळीराजा सामान्य जनतेच्या स्मरणात आहे. त्याचे पूजन होते. ‘इडा पिडा टळो, आणि बळीचे राज्य येवो’ असे आजही खेड्यापाड्यात म्हटले जाते.
असुर हे शंकराचे भक्त असून त्यांच्या नीतिमत्तेच्या कल्पना प्रगत होत्या. ‘दिलेला शब्द पाळणे’ हा त्यांच्या नीतिमत्तेचा गाभा होता. याचाच गैरफायदा घेऊन बळीला पाताळात हाकलून दिले गेले. पाताळ म्हणजे दक्षिणेला असलेला प्रदेश (खंडे). हे सात पाताळ (सप्तपाताळ : अतल, सुतल, वितल, तलातल, महातल, रसातल, पाताल) होते. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका ही यातील काही पाताळे. मेक्सिको येथील संस्कृती, खाणे-पिणे आणि चेहरेपट्टी यात त्यांचे भारतीयांबरोबर विलक्षण साधर्म्य दिसते. बळीराजा मेक्सिकोत गेला असावा?
‘औंड्र’ हे बळीराजाचे वंशज. त्यांनी ओडीसा आणि आंध्र प्रदेशात इसवीसन पूर्व सहाव्या शतकात साम्राज्य स्थापन केले. या औंड्र शब्दावरून आंध्र हे नाव या प्रदेशाला मिळाले. आंध्रप्रदेशात यामुळेच प्राचीन शिवमंदिरांची रेलचेल आहे. या औंड्रांची एक शाखा सातवाहन या नावाने ओळखली जाते. सातवाहन महाराष्ट्रात आले. त्यांची पैठण ही राजधानी होती. (बंगालमधील सत्ताधीश पौंड्र हे या औंड्रांचे नातेसंबंधी.)
माझे आजोळ - ठाण्याच्या मुंबई रस्त्यावरील गुप्ते - हे परंपरेने बळीराजाचे वंशज (सातवाहनांचे वंशज??) म्हणून ओळखले जातात. बलिप्रतिपदेला त्यांच्याकडे कणकेचे साप-विंचू-घोण करून त्यांना काठीने प्रतीकात्मक मारतात. तसेच कणकेचे सैन्य करून हे सैन्य गुप्ते घराण्यातील पुरुषांना घरातील सवाष्णी देतात. नंतर बळीराजाची पूजा होते.
असुर संस्कृती ही प्रामुख्याने शिव- शक्ती उपासक असून वैदिक संकृती यज्ञप्रधान आहे. दोन्ही संस्कृतींची सरमिसळ होऊन आताची हिंदू संस्कृती निर्माण झाली आहे. ही सरमिसळ होताना येथे अनेकवेळा सांस्कृतिक संघर्ष झाले. यज्ञसंकृतीला विरोध झाला. याची नोंद काही दर्शनांत (बौध्ददर्शन, जैनदर्शन, चार्वाकदर्शन इ.) स्पष्टपणे आढळते. परंतु भारतीय मानस सहिष्णूवृत्तीवर पोसलेले असल्याने या संघर्षाने उग्र रूप (पश्चिमेला आढळते तसे) धारण केले नाही.
अतिबलाढ्य मगध असुर साम्राज्याच्या दानशूर, पराक्रमी, प्रजाहितदक्ष बळीराजाचा मी एक (आजोळकडून) वंशज आहे याचा मला अभिमान वाटतो.
**संदर्भ : ‘शोध असुरांचा’ संजय सोनवणी, किस्त्रीम २००८, १२९-१४४

Wednesday, October 21, 2015

विचार महात्मा गांधींचा ,एका सावरकर भक्ताच्या नजरेतुन.

अभिषेक देशपांडे  यांच्या facebook वरील लेखातून साभार

विचार महात्मा गांधींचा ,एका सावरकर भक्ताच्या नजरेतुन...............
--------------------------------------------------------------------------------------------------------

महात्मा गांधीचा विचार सर्वसाधारण हिंदुत्ववादी लोक मुस्लिमांचा प्रेमी ,पाकिस्तानचा जनक ,एक मूर्ख, हिंदुंचा शत्रु,अहिंसेचा अतिरेकी, ब्रह्मचर्याचे आणि खाण्यापिण्याचे खूळचट प्रयोग करणारा राष्ट्राचा शत्रु असा काहीसा करतात.

बहुतेक लोक मग गांधीजींच्या लिखाणाचा,वक्तव्याचा अभ्यास करतात.त्यातही हा सगळा गोंधळ वाढ्वायला "५५ कोटीचे बळी" अशी प्रचाराने भरलेली पुस्तके वाचतात आणि "मी नथुराम गोड्से बोलतो आहे" सारखी टाळ्या खेचणारी दुय्यम गल्लाभरु नाटके बघतात. महात्म्याचा अभ्यास आणि विश्लेषण करणे ही एक अशक्यप्राय गोष्ट होते. बहुतेक वेळा त्यांचे अभ्यासक चुकीचा रस्ता घेउन भूलभूलैयात फसतात.

महात्माजींच्या लिखाणाचा आणि वक्तव्याचा अभ्यास करतांना लोक बहुदा रिकाम्या हाताने परत येतात कारण ते "गांधीवाद" नावाचे तत्वज्ञान शोधायचा प्रयत्न करतात.पण असे काहीही तत्वज्ञान नाही आणि गांधीजी कूठल्याही राजकिय तत्वज्ञानाचा पुरस्कार करत नव्हते.महात्माजींचे बोलणे आणि लिहीणे हे सगळ्याना घेउन चालण्याच्या त्यांच्या पध्दतीमुळे त्या त्या प्रसंगाला अनुरुप असले तरी खूप वेळा विसंगत असायचे शब्दांचा धूम्र पडदा [Smokescreen] उभा करुन आपला खरा हेतु लपविण्यात महात्माजी हुशार असल्याने त्यांच्या लिखाणात गांधीवाद नाही.

हा शोध आणखी एका गोष्टीने अजुन अतिशय कठीण झाला आहे.महात्माजी वैयक्तीक आयुष्यात एक नंबरचे विक्षीप्त आणि चक्रम होते आणि हे ते स्वतः मान्य करतात. [“ I am the biggest crank around”] त्यांचे ब्रह्मचर्य, उपास,सर्वधर्म प्रार्थना सभा,शेळीचे दूध,खादी,सुत कातणे, वैद्यकीय उपचाराला नकार, ग्रामोद्योग आणि या विषयावरील त्यांच्या लिखाणाने अथवा पत्रकांनी एक प्रकारचे विनोदी किंवा अप्रीय चित्र बर्‍याच लोकांपुढे उभे रहाते.

एक दुःखाची गोष्ट म्हणजे महात्माजींचा वारसदार म्हणून त्यांच्यापेक्षाही चक्रम असणारे आचार्य आणि सर्वोदयी समजले जातात, ज्यांना गांधीजी तर धड समजले सुध्दा नाहीत.

मला स्वतःला या महान माणसाचे विश्लेषण करतांना एकच वर्णन ,एकच ध्येय जाणवते. भारताला स्वातंत्र्य मिळवुन देणे आणि त्या प्रक्रियेत देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला जागे करणे. हा खेड्यातला गरीब,अशिक्षीत माणूस त्याला आपल्या देशाची,त्याच्या स्वातंत्र्याची जाणिव करुन देणे आणि त्याला ह्या लढ्यात सहभागी करुन घेणे हे होते त्यांचे ध्येय.

गांधी ,नेहरु ,मौलाना आझाद, सरदार पटेल,नेताजी हे सगळेच इतिहासाचे गाढे अभ्यासक होते पण इतिहासाचा अभ्यास आणि त्यापासुन शिकणे ही महात्माजींची खासियत होती.

महात्माजीनी एका गोष्टीवर विचार केला की जातिव्यवस्थेमुळे सर्वसामान्य भारतीय हा कोण राज्यकर्ता आहे आणि कोण आपला/परका आहे याबद्द्ल उदासीन राहिला.राजे ,आक्रमक,परकिय आपापसात लढत होते पण सर्वसामान्य जनता या लढ्यात उतरत नसे.जनता नुसतीच भरडली जात असे. हा देश माझा आहे आणि हा नेता माझा आहे ही भावना भारतियांमध्ये अभावानेच होती. इतिहासापासुन गांधीजींनी शिकलेला “धडा क्रमांक एक” होता की हा सगळा झोपलेला समाज जागा करणे जरुरी आहे. ब्रिटीश भारतावर राज्य भारतीय पोलीस,सैन्य,भारतीय अधिकारी यांच्यातर्फे करत होते .ब्रिटीश फारच थोडे होते. हे सगळे भारतीय देशद्रोही नव्हते ,त्यांना देशाची जाणिव नव्ह्ती. महात्माजी नेहमी राणा प्रतापचे उदाहरण देत की तो स्वतः लढला पण बाकीचे राजपुत राजे मोगलांच्या बाजूने लढत होते आणि जनता उदासीन होती.

काही ब्रिटीश अधीकार्‍याना मारुन अथवा काही बाम्ब फोडुन काही साध्य होणार नाही कारण सशस्त्र उठाव करण्यासाठी जी सामाजिक जागृती लागते ती नसली तर ब्रिटीश हे क्रांतीकारक काही दिवसात गुंडाळतात.

गांधीजीनी ब्रिटीशांचा पूर्ण अभ्यास केला.ब्रितिशांचा एक महत्वाचा गुण अथवा अवगुण त्यांच्या लक्षात आला तो म्हणजे कायद्याबद्दलचा आदर.जर कायदा फाशीची सजा सांगत असेल तर ब्रिटीश न्यायसंस्था फाशी देईल पण जो मनुष्य "कायदेशीरपणाने" कायदा तोडेल त्याला कायद्यात असेल तेवढीच सजा मिळेल. १८५७ पासून ब्रिटीशांनी एक अत्यंत कठोर निती ठेवली होती की जी व्यक्ती अथवा संघटना सरकारविरुध्द शस्त्र उचलेल त्यांची पाळेमुळे खणून काढावयाची.खूनात प्रत्यक्ष भाग घेणार्‍यांना फाशी,आजुबाजुच्या लोकांना ,नियोजन करणार्‍यांना २५/५० वर्षे काळे पाणी आणि सरसकट सगळ्याची मालमत्ता जप्त करणे ,नोकर्‍यावरुन काढणे इ.

ज्यांच्यावर संशय आहे पण पुरावा नाही त्यांच्यावर दूसर्‍याच फालतू कारणाने खटला भरुन लांब कैद जसे लोकमान्य टिळकांवर अग्रलेखावरुन खटला भरुन ६ वर्षे मंडालेला पाठविले जिथे त्या थोर महामानवाची प्रकृती कायमची ढासळली.

या क्रांतीकारकांच्या चळवळी एक महिन्यात खणल्या जात असत आणि सर्वसामान्य जनता उदासिन असल्याने सगळे मग थंड थंड होत असे. तेंव्हा महात्माजींनी “दूसरा धडा” शिकला; तो होता की ब्रिटीशांविरुध्द राष्ट्र जागे होईपर्यंत लढा अहिंसेने चालवायचा.

महात्माजींचा स्वतःचा अहिंसेवर फारसा विश्वास नव्ह्ता.१९२१ च्या सत्याग्रहात महात्माजींनी ज्या मागण्या ब्रिटीशांसमोर ठेवल्या त्यात पहीलीच मागणी आहे "भारतियांना शस्त्र बाळगण्याची मनाई रद्द करा". १९४२चा लढा,काश्मीर,जुनागड इ.ठिकाणी कांग्रेसने शस्त्र वापरले पण महात्माजींनी त्याचा कधीही निषेधसुध्दा केला नाही.

महात्माजींनी अतिशय धूर्तपणाने अहिंसा हे शस्त्र म्हणून वापरले ,तत्व म्हणून नाही. आणि महात्म्याचे समर्थक आणि विरोधक दोघेही या शस्त्राला तत्व समजून त्याचा गवगवा,धिक्कार इ.करत बसले.पण या अहिंसेचा दिखावा त्यांनी अतिशय उत्कृष्टपणाने केला.त्याचे तत्वज्ञान दाखविले.ब्रिटिश यामुळे पूर्ण बुचकळ्यात पडले आणि त्यांना या माणसाला कसे आवरावे हा मोठाच यक्षप्रश्न झाला.

या शातंतापूर्ण सत्याग्रहात महात्माजींनी कांग्रस संघटना बांधली,लोक आणि समाज जागे केले ,हलवुन सोडले.. हा समाज जागा करावयाला त्यांनी साध्या साध्या आणि सोप्या गोष्टीवर लढा पुकारला आणि सत्याग्रह ,स्वदेशी,खादी या साध्या बाबी ज्यात लहानापासुन मोठे भाग घेउ शकत होते.

या साध्या माणसाने एक गोष्ट ओळ्खली की एकदा हा समाज जागा झाला की या समाजातल्या लोकांचेच भाउ,वडील,मुलगा इ.इ. लष्करात,पोलिसात, Governement मध्ये असतात आणि हा समाज जागा झाला की या सगळ्या संस्था हातात येण्यास वेळ लागत नाही. आझाद हिन्द फ़ौज,नाविक बंड इ. हा त्याचाच परिपाक असतो.

महात्माजी जेव्हा दक्षीण आफ़्रिका सोडुन १९१४साली भारतात परत आले तेंव्हा त्यांच्या या नवीन पध्दतीच्या आंदोलनाने बुचकळ्यात पडलेल्या तेथील जनरल जन स्मट्स याने लिहीलेल्या एका पत्रात तो कांहिसे हतबल होउन लिहीतो " हा संत आपल्या द. आफ़्रिकेचा किनारा सोडुन गेला आहे आणि माझी मनोमन प्रार्थना आहे का हा परत इथे येउ नये."

१९१४ ते १९१८ या चार वर्षात गांधीजीनी त्याकाळच्या रेल्वेच्या तृतीय वर्गाने देश पालथा घातला,ते महात्मा आणि नेते झाले नसल्याने फारसे कुणी त्यांच्याकडॆ लक्षही दिले नाही. या बरिस्टरचा वेश होता पागोटे,धोतर आणि बाराबंदी. या काळात त्यानी तळागाळातला समाज फार जवळून बघितला,त्यांच्या

बरोबर ते राहीले,जेवले आणि त्या सामान्य माणसाला जात-पात, दारिद्र्य,जमिनदार,राजे-रजवाडे ह्यांच्या पिळवणुकीखाली गांजलेला त्यांनी बघीतला,त्यांचा वेश देशी असल्याने तो गरीब त्यांच्याशी मोकळेपणाने बोलला.

त्यामुळे त्यांच्ये ह्र्दय त्या दरीद्रीनारायणाविषयी ज्या कळवळा,प्रेमाने आणि अनुकंपेने भरुन आले तसे तोपर्यंत कूठल्याही राजकीय नेत्याचे आले नसेल.

मुर्ख रूढी,जखडणारी जात-पात,दारिद्र्य आणि न परवडणारे सण,लग्नसमारंभ इ.नी दबलेला माणूस, स्त्रियांवर होणारे जुलुम इ. त्यांनी बघीतले आणि एक न भुतो न भविष्यती असा समाजसुधारक उभा राहीला,हा त्यांनी शिकलेला “ तिसरा धडा ” होता. सुधारकाची ही गांधिजींची भुमिका बव्हंशी दुर्लक्षीत राहीली आहे.

गांधीजी या सगळ्या प्रवासात आणि द. आफ़्रिकेत आपल्या समाजावर धर्माची असलेली लोखंडी पकड बघीतली. तेंव्हा गांधीजींच्या हेही लक्षात आले की लोकांना आपल्या कडे खेचुन घेण्यास त्यांना स्वामी बनणे अतिशय गरजेचे होते,धर्मावर हल्ला करण्याऎवजी हा तुमचा आमचा महात्मा सगळ्या ढोंगी स्वामींना संपवणारा ढोंगी स्वामी बनला. हा त्यांचा “४ था धडा” होता ,त्यांचे रूप , पंचा,सन्यासीपणा,दरिद्री राहाणी,प्रार्थना सभा,गीतेचे उदाहरण इ. पूर्णपणाने लोकांना पटवून गेले की हा देवाचा भक्त स्वामी आहे,चला चला रे सगळे नमस्काराला.

त्यांचा स्वतःचा देवाधर्मावर विश्वास नव्हता.त्यांची देवाची व्याख्या "सत्य हाच देव आहे आणि काम पूजा आहे " ही होती. त्यांचे सर्व पट्ट्शिष्य त्यांच्याप्रमाणे नास्तिक होते. महात्माजी कधी देवळात,स्वामीकडे अथवा पीर-दर्ग्यात दर्शन घेणे करायला गेल्याचे ऎकीवात नाही.पण सगळ्याना बरोबर घेउन चालायचे असल्याने ते कुणालाही दुखवत नसत.

उदा. त्यांना कोणीतरी विचारले "आपला चातुर्वणावर विश्वास आहे का?"त्यांचे उत्तर होते " माझा चातुर्वणावर पूर्ण विश्वास आहे.ही एक हिंदु धर्माची जगाला देणगी आहे पण माझा जन्मतः जात अथवा वर्ण ठरतो यावर विश्वास नाही,माझा रोटीबंदी[एकत्र जेवण्यावर बंदी] ,बेटीबंदी [आंतरजातिय विवाह], अस्पृशता,शिवाशिव, जाति,वर्णावर आधारित नोकरी अथवा काम यापैकी कशावरही विश्वास नाही आणि हे ह्या सर्व हिंदु धर्माला काळीमा लावणार्‍या मूर्खपणाचा नाश करणे हे माझे जीवनध्येय आहे."

पहीला भाग ऎकुन सनातनी हिंदु खूश आणि दूसरा भाग ते काय समाजसुधारणा करु पाहात होते ते स्पष्ट करतो.

गांधीनी भारत पालथा घालतांना हे ही बघीतले की खेड्यापाड्यातला अशिक्षीत माणूस सुट-बुटातल्या काळ्या साहेबाला घाबरतो आणि तो काळा साहेब जेंव्हा यस-फ़्यस करतो तेंव्हा त्याला कोणीतरी परग्रहावरचा साहेब वाटतो. हा त्यांचा “पाचवा धडा” होता ,त्यामुळे जेंव्हा गांधीजीनी त्यांची चळवळ चालु केली तेंव्हा त्यांनी आपल्या बरिस्टर,डाक्टर,ICS इ. नेत्याना भारतीय पोशाख घालण्याची सक्ती केली कारण त्यामुळे तो सामान्य भारतीय त्याला आपला आणि आपल्यातून आलेला नेता समजू लागला. त्यातही खादीसारखे कापड जे मळकट रंगाचे,सदा चुरगळलेले असे त्यामुळे ही एकात्मता पूर्ण झाली.

गांधीनी या सगळ्या काळ्या साहेबांना सांगितले की तुम्ही नेते आहात त्या खेड्यातल्या गरीबाचे आणि त्या गरिबाला पट्वुन दिले की हे तुमचे नेते आहेत.

गांधीजींना या त्यांच्या शांततापुर्ण सैन्याला गणवेश हवा होता ज्यामुळे ते कुठेही ओळखले जाईल.पण गणवेश ठेवला तर ब्रिटीश सरकार जागे झाले असते आणि त्यांनी कांग्रेस नष्ट करायला वेळ लावला नसता. महात्माजींनी हा प्रश्नसुध्दा त्यांच्या बुध्दीमत्तेने नीटसपणाने सोडवला. त्यांनी खादी हा गणवेश बनवला आणि आपला खरा हेतू लपविण्यासाठी त्यात चरखा,सुतकताई,किती सुत कातावे इ,इ, गोंधळ उभा केला.त्यामुळे ब्रिटीशांच्या डोक्यात एकच विचार आला " हा म्हातारा वेडा झाला ,सुत कातून स्वराज्य मिळविणार म्हणतो ,जाउ दे, कातू दे किती सुत काततो ते !!!"

अशा रीतीने कोणीही कांग्रेसवाला ओळखू येउ लागला.१९२२ नतंर महात्माजींनी खादीच्या बाबतीत फार गोंधळ घातला नाही कारण त्यांना जे हवे होते ते साध्य झाले होते.

ब्रिटीश शासन महात्माजींचे कौतुक करत नव्हते ,पण बुचकळ्यात जरूर पडले होते.जसे आपल्यासारख्या सुशिक्षित लोकाना आजही वाटते की गांधी मूर्ख किंवा वाईट होते तसेच सुरवातीला ब्रिटीशाना वाटले हा फाटका माणूस उपास करून,सत्याग्रह करून आणि चरखा चालवून काय करणार आहे .१९३१ पर्यंत त्याना हे कळले की काय करणार आहे तेंव्हा उशीर झाला होता. त्यांना त्यांच्या सत्य अहिंसेच्या बुरख्याआडून ओळखणारी माणसे होती जिना,लॉर्ड व्हवेल आणि चर्चिल ,आणि हीच माणसे त्यांच्या विरुद्ध यशस्वी झाली.

गांधीजीनी आपली संत /महात्मा अशी प्रतिमा अतिशय प्रयत्नपूर्वक बनविली होती.१८५७ पासून ब्रिटीशांनी एक अत्यंत कठोर निती ठेवली होती की जी व्यक्ती अथवा संघटना सरकारविरुध्द शस्त्र उचलेल त्यांची पाळेमुळे खणून काढावयाची.खूनात प्रत्यक्ष भाग घेणार्‍यांना फाशी,आजुबाजुच्या लोकांना ,नियोजन करणार्‍यांना २५/५० वर्षे काळे पाणी आणि सरसकट सगळ्याची मालमत्ता जप्त करणे ,नोकर्‍यावरुन काढणे इ. परंतु ब्रिटीशानी राजकीय पक्ष ,शांततापूर्वक सत्याग्रह ,चळवळी यावर बंदी घातली नव्हती.त्यामुळे गांधीजी आणि कांग्रेस याना सजा ह्या सात्याग्रहाबद्दल होत ज्या साधारणपणे १ महिना ते २ वर्षे तत्कालीन कायद्या प्रमाणे असत.

याला अपवाद फक्त १९२२ साली जेव्हा चोरीचोरामुळे कि जिथे जमावाने २४ पोलिसाना जिवंत जाळले बिटीश सरकारला महात्माजींच्या नाटकावरून विश्वास उडाला म्हणून त्याना ६ वर्षे सक्तमजुरी दिली ,महात्माजींचे नाटक इतके सुरेख होते की त्याना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाने ही सांगितले की आपल्यासारख्या महात्म्याला ही शिक्षा सुनावताना मला फार दुख होत आहे. पुढे त्यांचे apendix चे operation झाल्याने त्याना २ वर्षात सोडले .

आता जरा त्यांच्या चार शिष्योत्तमांकडे एक कुतुहल म्हणून एक नजर टाकु यात .

१९१६ मध्ये ते बिहारला गेले तिथे ते राजेंद्रबाबुंच्या घरी गेले.[ डा. राजेंद्रप्रसाद भारताचे पहीले राष्ट्रपती.] राजेंद्रबाबुंच्या चपराश्याने महात्माजींना घरात घेतले नाही,कारण त्याला हा धोतर नेसलेला गबाळा माणूस साहेबांनी सांगितलेले बरिस्टर गांधी असतील हे खरे वाटले नाही. आता राजेंद्रबाबु हे त्याकाळातले सुटाबुटातले स्वर्णपदक विजेते वकील.त्यात वैयक्तीक आयुष्यात ते अतिशय कर्मठ उपासतापास,सोवळेओवळे पाळणारे कायस्थ ब्राम्हण होते.

गांधीजींनी चंपारण्यात जाउन सत्याग्रहाची छावणी टाकली तेंव्हा राजेंन्द्रबाबु कार्य करण्यापेक्षा या विक्षीप्त माणसाबद्दलच्या कुतुहलाने तेथे गेले. महात्माजींना फ़क्त दोन दिवस लागले की राजेंद्र्बाबुंनी सुट्बुट त्यागून आयुष्यभरासाठी धोती-कुर्ता पेहनला. या कर्मठ कायस्थ ब्राह्मणाने आपले सोवळे-ओवळे त्यागुन सर्वांबरोबर एका पंगतीत जेवणे सुरु केले.

त्यांनतंर पाळी आली अतिशय तिक्ष्ण,फटकळ वल्लभभाई पटेलांची. वयाच्या ३६ वर्षी सरदार पटेलांनी इंग्लडला जाउन लंड्न मध्ये Middle Temple Inn मध्ये नाव नोंदविले .त्यांनी ३६ महिन्याचा अभ्यासक्रम ३० महिन्यात संपविला आणि स्वर्णपदक घेउन ते वर्गात पहिले आले. वल्ल्भभाई लंडनहुन येउन अहमदाबादला वसले.तिथे त्यांनी मित्रांच्या सांगण्यावरुन निवडणुक लढवून अहमदाबादचे स्वछता कमीशनर झाले आणि रोज ब्रिटीशांशी भांडू लागले. पुर्ण सुट/बुट ,हातात सिगार ,रोज सध्यांकाळी क्लब मध्ये जाउन व्हिस्की आणि पत्ते हे त्यांचे आयुष्य होते.बरिस्टर म्हणून ते फ़ार पैसे कमवत होते. वल्लभभाई इतके लहरी होते की त्यांचे शर्ट आणि त्याच्या त्याकाळी निघणार्‍या कालर या धोब्याला धूण्यासाठी अहमदाबादहून मुंबईला जात.

एका संध्याकाळी अहमदाबाद क्लबमध्ये पत्ते खेळत बसले असताना क्लबच्या हालमध्ये महात्माजींचे भाषण होते ,वल्लभभाईंनी जायला नकार दिला त्यांचे मित्र पाश्चीमात्य सुटातल्या दादासाहेब मांवलणकरांना ते म्हणाले," तो गांधी वेडा आहे असे सत्याग्रह करुन आणि सामाजिक चळवळी चालवुन काय स्वातंत्र्य मिळते का? आपण गेलो तर ते एक ताट हातात देउन गहु निवडायला बसवतील.”

शेवटी त्यांच्याबरोबर पत्ते खेळणारे सगळेच उठून गेल्याने सरदार नाईलाजाने हातात सिगार घेउन भाषणाला गेले. अर्थातच एका आठवड्यात त्यांनी सुट-बुट आणि बरीस्टरी त्यागली आणि ते सरदार पटेल बनुन लढ्यात उतरले आणि पुढे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान झाले. सरदारांनी एका मुलाखतीत सांगितले " मी जिथे आहे आणि जे काम करत आहे त्याचे कारण मला बापू [महात्मा गांधी] या जागी ठेवुन गेले.आम्ही सगळे त्या साबरमतीच्या वेड्याचे पिसे [भ्रमिष्ट ]आहोत ,आम्हाला तुम्ही काय सुधाराल?"

स्वतः दादासाहेब मावळणकर गांधी जादुमधून सुटले नाहीत ,त्यांनी सगळे त्यागून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. ते कांग्रेसचे जेष्ठ नेते झाले आणि स्वातंत्र्यानंतर लोकसभेचे पहिले सभापती झाले.

सुभाषचंद्र बोस मट्रीकच्या [H.Sc.] परिक्षेत बोर्डात १९११साली पहिले आले. १९२२ साली ते केंब्रीजमधुन B.A. झाले. ते I.C.S.परीक्षा दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि I.C.S.चा राजिनामा देउन भारतात येउन महात्माजींना चित्तरंजन दास यांच्या बरोबर भेटले आणि स्वतःला राष्ट्रकार्याला वाहुन घेतले. त्यांनतर ते सदैव महात्माजींच्या अंतरवर्तुळात होते,महात्माजींना राष्ट्रपिता ही पदवी सुभाषबाबुंनी रेडियो बर्लिनवरुन भाषण करतांना दिली. कांग्रेसने स्वातंत्र्यानंतर जी मिश्र अर्थव्यवस्था राबवली त्याचे जनक नेताजी बोस होते.

मौलाना अबुल कलम आझाद ह्यांचे आजोबा १८५७ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून पळून मक्केला राहिले. तिथे मौलानांनी कुराण,हादिस,शरियत इ.चे शिक्षण घेतले. ते पुश्तु,टर्कीश,अरेबिक,पर्शीयन,उर्दु ,बंगाली,हिंदी आणि इंग्रजी भाषा जाणत होते. ते मौलाना वयाच्या १५व्या वर्षी झाले ,साधारण वयाच्या २५ व्या वर्षी लोक होतात. ते १२ व्या वर्षी कलकत्याला आले तेथे ते बरीच उर्दु मासिके चालवत होते. या काळात त्यांनी इंग्रजीचा शिक्षक ठेवला आणि अरबी,पर्शियन आणि इंग्रजी बायबलचा तौलनिक अभ्यास करुन स्वतःला इंग्रजी शिकविले. आणि त्यांनी स्वतःला पाश्चीमात्य तत्वज्ञान, इतिहास इ. इंग्रजीतून शिकविले. ते गांधीजींना १९१९ साली भेटले आणि सर्वस्वाने त्यांचे झाले. खादी त्यांनी आयुष्यभर वापरली.स्वतंत्र भारताचे ते पहिले शिक्षणमंत्री होते. त्यांचा फार मोठा सह्भाग University Grants commission, IIT, IIM, Sahitya Akademy साठी आहे.

या चौघांची उदाहरणे देण्याचे कारण म्हणजे गांधीजींच्या आतल्या वर्तूळातले लोक सगळे उच्चशिक्षीत, हुशार ,अतिशय वाचन केलेले आणि विचार करणारे असे होते बहुतेकांचा देवावर विश्वास नव्हता,बुध्दीवादावर होता.

हे असे लोक गांधिजीच्या विचाराने भारले गेले,सर्व त्यागून स्वातंत्र्यलढ्यात उतरले. १९१८ साली गांधीजी त्यांना दारिद्र्य,हालअपेष्टा,तुरुंगवास याशिवाय काही देउ शकत नव्हते. त्यामानाने ६/८ वर्षाच्या लहान मुलांना घेउन आणि त्यांचे विचार लहानपणीच घडवणे हे तर तसे सोपे आहे.

हे सगळे २५ पासुन ४० वर्षाचे अतीशय बुध्दीमान लोक होते, अशा लोकांना प्रभावित करणारा हा महात्मा काय असेल याचा विचार करा.अशा या माणसामध्ये काहीतरी असेलच की, तो हिंदुत्ववादी कल्पनेप्रमाणे मूर्ख तर नसणार.

स्वा. सावरकरांचा एक भक्त म्हणून मला कुठेतरी थोडा हेवा, थोडी असुया जरुर वाटते कारण परदेशी कापडाची होळी करतांना १९०६ मध्ये स्वातंत्र्यवीर सही रस्त्यावर होते,त्यांच्यात तेवढी बुध्दी ,तेवढी क्षमता नक्कीच होती.

जर स्वा.सावरकरानी रस्ता आणि विश्लेषण बरोबर पकडले असते तर १९१० सालीच हे नेतृत्व त्यांच्या नशिबी होते.

एक आठवण देउन हा लेख संपवितो.गांधीजी एकदा रविन्द्र्नाथ टागोरांकडे शांतिनिकेतनात गेले होते ,हे दोघे महापुरुष सकाळी उठून प्रातःकाळचे चालण्यास निघाले. सगळीकडे फुले,झाडे बहरुन आली होती आणि पक्षी चिवचिवत होते.गुरुवर्य टागोरांनी महात्माजींना विचारले

" महात्माजी तुमच्या या सत्याग्रह,कायदा तोडा,झिंदाबाद इत्यादीमध्ये अशी सुंदर सकाळ हे चिवचिवणारे पक्षी आणि त्या पक्षांना बघुन कविता स्फुरणारा माझ्यासारखा कवी याला काही जागा आहे का?"

महात्माजींचे उत्तर होते " कवीवर्य मी चिंता करतो अशा स्वांतत्र्याची की ज्यात या पक्षांना रात्री झोपायच्या आधी पोट्भर खायला मिळेल म्हणजे ते व्यवस्थीत झोपतील आणि सकाळी उठून तुमच्यासारख्या कवीवर्यांसाठी अतीव आनंदाने गातील की तुम्हाला युगप्रवर्तक कविता सुचतील.

पुढच्या लेखात आपण गांधीजीनी कांग्रेस एखाद्या राजकारण्याप्रमाणे साम,दाम,दंड,भेद वापरुन कशी ताब्यात घेतली आणि लोकजागृतीला कशी सुरवात केली,तसेच खिलाफत चळवळ, मोपला बंड, १९२१ चा सत्याग्रह ,चौरीचौरा इ. पाहु.

Thursday, October 1, 2015

कर्म सिद्धांत

कर्म सिद्धांताबद्दल अनेकवेळा बोलले/लिहिले जाते. तथाकथित पुरोगामी विचारवंतांचा तर तो टिंगल करण्याचा विषय झाला आहे. हिंदू धर्माविषयी आस्था असलेल्या लोकांनाही कर्म सिद्धांत नीटसा कळला नसल्याने ते त्याचे लंगडे समर्थन करतात आणि त्यामुळे कर्म सिद्धांत अधिकच हास्यास्पद बनतो. पुरोहितांनी या कर्म सिद्धांताचा वापर चातुर्वर्ण्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि उच्च वर्णीय लोकांची महती वाढविण्यासाठी केला.

कर्म सिद्धांताचा उहापोह गीतेत झाला आहे. काही उपनिषदे त्याचा उल्लेख करतात. 'अष्टावक्र गीतेत' कर्मचा स्पष्ट उल्लेख नसला तरी मुक्त होण्याचा मार्ग सांगितला आहे. गौतम बुद्धाने या जीवनातील दु:खावर उपाय शोधताना अनेक प्रयोग केले. त्यातून तथागाताला जे ज्ञान झाले त्यात कर्म सिद्धांताला  महत्व आहे. परंतु कदाचित त्या काळापर्यंत कर्म सिद्धांताचे पुरोहितांकडून  विकृतीकरण झाले होते. म्हणूनच याला त्याने 'कर्म' नाव न देता 'संस्कार' (पाली भाषेत 'संखर') असे नाव दिले. तथागताने 'भवचक्र' ('भव' म्हणजे 'होणे'. 'भवचक्र' म्हणजे परत परत जन्म घेणे ) कसे चालते हे सांगताना या संस्कारांची किंवा कर्माची त्यामागे  काय भूमिका असते हे स्पष्ट केले आहे. गौतमाचा आग्रह प्रत्यक्ष अनुभूतीवर होता. ही अनुभूती मिळविण्यासाठी आणि त्याद्वारे दु:खातून आणि भवचक्रातून सुटका होण्यासाठी बुद्धाने विपश्यना (विपस्सना) ध्यानाचा मार्ग सांगितला आहे. विपश्यनेत प्रगती केल्यावर ही संस्कार (कर्म) साठविण्याची प्रवृत्ती, तिचा जीवनावर होणारा  परिणाम याची स्पष्ट अनुभूती होते.

बुद्धाने सांगितलेला सिद्धांत अगदी सरळ, सोपा आहे.

  1. आपल्या सहा इंद्रियांपैकी कशावर (पाच इंद्रिये आणि मन) बाह्य गोष्टीचा स्पर्श होतो. उदा, डोळ्याला काहीतरी दिसते, त्वचेला स्पर्श होतो, कानावर आवाज पडतो, जिभेवर चवीची जाणीव होते, नाकाला वास येतो, मनात विचार येतात. आपली ही इंद्रिये ही केवळ ती संवेदना ग्रहण करण्याचे काम करतात.
  2. ही संवेदना मेंदूपर्यंत पोचल्यावर मेंदूचा एक हिस्सा जागृत होतो आणि त्या संवेदनेचे विश्लेषण करतो. आपल्या पूर्व-स्मृतीतून अशी संवेदना या पूर्वी कधी झाली होती काय हे आठवितो.
  3. ही आठवण झाल्यावर मेंदूचा दुसरा हिस्सा काम करू लागतो आणि ही पूर्वी संवेदना सुखद होती का दु:खद याची चाचपणी करतो. 
  4. यावेळी पूर्वीचे संस्कार (कर्मे) जागृत होतात आणि वेगाने मनाच्या पृष्ठभागावर येऊ लागतात. हे संस्कार सुखद असतील तर संपूर्ण शरीरावर सुखद तरंग अनुभवास येतात, दु:खद असेल तर दु:खद तरंग अनुभवास येतात. हे सुखद तरंग काही काळच टिकतात. परंतु नंतर सुखद तरंगांच्या इच्छेमुळे परत दु:खच वाट्याला येते.
  5. हे संस्कार किती खोल आहेत त्यावर हे सुखद/दु:खद तरंग किती प्रमाणात जाणवतात हे अवलंबून असते. या संस्कारांचा प्रभाव शरीरावर क्षणमात्र असतो, परंतु असे संस्कार एकापाठोपाठ जागृत होतात आणि बराच काल ही अवस्था टिकते. 
  6. हे संस्कार शरीरावर प्रकट झाल्यावर आपण अनवधानाने प्रतिक्रिया देतो. हे संस्कार आपल्या अंध प्रतिक्रियेमुळे वृद्धिंगत होतात, त्यांना बळ मिळते आणि ते परत अंतर्मनात खोलवर जातात. पुन्हा संधी मिळताच ते उफाळून वर येतात. प्रतिक्रिया न दिल्यास त्यांची उर्जा संपते (निर्जरा होते) आणि ते नष्ट होतात.
  7. हे संस्कार देहाच्या (रूपस्कंद) पुढील क्षणाला सतत जन्म देतात. आणि आपल्याला देहाचे सातत्यीकरण जाणवते.
  8. माणसाच्या मृत्युच्या क्षणी यातील एखादा संस्कार (इच्छा) डोके वर काढते आणि हे संस्कारांचे (पूर्वसंचीत कर्मांचे ) गाठोडे एका शरीराला (रूप स्कंद) जाऊन चिकटते आणि नवा जन्म (भव) मिळतो. याला भवचक्र म्हणतात.  हा मृत्युच्या क्षणी जागा झालेला संस्कार आपले पुढील आयुष्य कसे असेल हे ठरवितो.
विपश्यनेत ध्यानात खोलवर गेल्यावर हे पूर्वसंस्कार जागृत कसे होतात आणि आपण नकळत त्याला प्रतिक्रिया करून त्यांचे सामर्थ्य कसे वाढवितो हे स्पष्ट जाणवते. संस्कार जागृत झाल्यावर त्याला प्रतिक्रिया न करणे आपल्या हातात असते. त्यामुळे पूर्वसंस्कार (कर्मे) निर्जरा होऊन नष्ट होतात आणि मानसिक शांतता अनुभवास येते. हा वैयक्तिक अनुभव असल्याने त्याचे सामाजीकरण होऊ शकत नाही आणि तथाकथित पुरोगामी याची खिल्ली उडवू शकतात.

सुखद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पुण्यकर्म म्हणता येईल तर दु:खद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पापकर्म म्हणता येईल. पुण्यकर्म आणि पापकर्म हे एकमेकांना Cancel करीत नाहीत. पुण्यकर्म आणि पापकर्म यांना पांढऱ्या आणि काळ्या दगडांची उपमा देता येईल. माणूस या पुण्यकर्म आणि पापकर्म या दगडांनी भरलेली झोळी घेऊन फिरत असतो. काळ्या आणि पांढऱ्या दोन्ही प्रकारच्या दगडांना वजन असते आणि ते नेताना तो माणूस थकून जातो.

ध्यान हे संस्कारांना प्रतिक्रिया न देण्याची प्रक्रिया आहे. त्याचा कोठल्याही देवाशी, परमेश्वराशी संबंध नाही. हे प्रक्रिया शिकण्यासाठी काही प्रकारच्या ध्यानात देवाचा/ परमेश्वराचा उपयोग केलेला असतो. संस्कार जागृत होतात तेव्हा सावध राहून प्रतिक्रिया न दिल्यास अंतर्मनात दडलेले (अनुशय) संस्कार वेगाने बह्य्मानावर येतात आणि प्रतिक्रिया न दिल्याने त्यांची निर्जरा होते.

ज्यावेळी सर्व कर्मसंस्कार शून्य होतात तेव्हा माणूस कैवाल्यावस्थेस/मुक्तावस्थेस पोचतो. जर कोठलेही काम करताना मनाच्या समतोल अवस्थेत असलो, म्हणजेच चांगले/वाईट, हर्ष/दु:ख याच्या पलीकडे जाऊन मन समतोल असेल तर नवी कर्मे निर्माण होत नाहीत. म्हणूनच साधूने/संताने काही केले तरी त्याला पाप/पुण्य लागत नाही असे म्हणतात. ध्यानाच्या सहाय्याने अशा समतोल अवस्थेपर्यंत पोचता येते.

कर्मसंस्कारांचा हा अर्थ ध्यानात घेऊन गीता अथवा उपनिषदे वाचल्यास त्याचा अर्थ उमगतो आणि ती निरर्थक पोपटपंची ठरत नाही.

कर्माचा अर्थ थोड्या शब्दात सांगण्याचा हा माझा प्रयत्न होता. मला कल्पना आहे की यातून जिज्ञासूंना अनेक नवे प्रश्न निर्माण होतील. हे प्रश्न येथे मांडल्यास मी माझ्या परीने समाधान करण्याचा प्रयत्न करेन. मात्र माझ्या काही तथाकथित पुरोगामी मित्राना जिज्ञासेपेक्षा भिन्नविचारी व्यक्तीना मूर्ख ठरविण्याची सवय आहे. त्यांना मी उत्तर देणार नाही.

कर्माचा अर्थ बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अनुभवातून समजण्याचा प्रयत्न करा हे मात्र मी आवर्जून सांगेन.  

Wednesday, September 23, 2015

घरटे


कालच्या पावसात एक घटना घडली.

झाडावरचं एक घरटं वा-याने अचानक पडलं.
दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते.
त्याने तिला पंखानी जवळ घेतलं.
थरथरत्या पंखानी ती ही कुशीत शिरली.
'सकाळी बोलूयात', तो म्हणाला.
'हो', ती म्हणाली.
रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले.

सकाळी स्वच्छ प्रकाश पडला.
तो उत्साहानी म्हणाला,
'निघूयात? नव्यानी काड्या आणू'.
तिच्या डोळ्यात पाणी आलं.
'अग वेडे, "पाडणं" त्याच्या हातात आहे तर "बांधणं" आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत!
चल निघूयात".

आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली...

तो

दिवाणखान्यात बसून
चारचौघांच्या संगतीत
मी जेव्हा तुझे अस्तित्व नाकारतो
तेव्हा आकाशाचे एक दार
किलकिले करून
तू पाहतोस माझ्याकडे कौतुकाने
कुतुहलानेही,

आणि सगळे निघून गेल्यावर
ताऱ्यांच्या अंधुक प्रकाशात
तू उतरतोस माझ्या एकांतात
आणि समोरच्य़ा खुर्चीत बसून
म्हणतोस - अभिनंदन
तुझे विवेचन छानच होते

इतके की मलाही शंका आली
माझ्या अस्तित्वाची -
पण तरीही मला माहीत आहे
मला मानणाऱ्यांमध्ये
तू अग्रेसर आहेस
फक्त तुझा दिवाणखाना
तुझ्या काळजापासून
फार दूर आहे, ईतकेच.

-कुसुमाग्रज (मुक्तायन, पान ४५)

Saturday, September 19, 2015

एका संन्याशाच्या लंगोटीची गोष्ट

एक संन्याशी होता. संसारी जगाला व त्यातल्या कट्कटींना कंटाळून त्याने संन्यास घेतला होता. गाववस्तीपासून दुर रानात एकटाच जीवन कंठत होता. कसला संसार नाही, की कसल्या दगदगी नाहीत. थंडीवार्‍यापासून बचाव करणारी एक पर्णकुटी बांधून तिथेच वास्तव्य करीत होता. त्या रानात मिळतील ती फ़ळे कंदमुळे खाऊन गुजराण करत होता. जवळच्या एका तळ्यात अंघोळ करायची व तिथेच जाऊन पाणी प्यायचे. बाकी त्याला कशाची गरज नव्हती. जीवनावश्यक वस्तूही नव्हत्या त्याच्यापाशी. संसार म्हणायचा तर अवघ्या दोन लंगोट्य़ा. त्यातली एक अंगावर असे तर दुसरी अंघोळीनंतर धुवून वाळत घातलेली असे. तळ्यावर जाई तेव्हा त्याला संसारात गांजलेले लोक दिसत व त्यांची त्याला खुप दया येत असे. पण तेवढाच त्याला जनसंपर्क होता. जनसंपर्क म्हणजे संसारी जगाशी तेवढाच संबंध. त्या गावातल्या भोळ्याभाबड्या लोकांना इतके कष्टप्रद जीवन जगणार्‍या संन्याशाविषयी भितीयुक्त आदर होता. तो सिद्धपुरूष आहे की नुसताच गोसावडा आहे, अशी चर्चा दबल्या आवाजात चालत असे. पण कोणी त्याला तो कुठून त्या रानात आला किंवा कधीपासून संन्यास घेतला; असे पश्न विचारण्याचे धाडस केले नाही. कधी एखादी देवभोळी महिला किंवा पुरूष आडरानात जाऊन सणासुदीला घरच्या पक्वान्नाचे जेवणाचे ताट त्या संन्याशाला भक्तीभावाने देत असत. तेवढाच त्याचा संसारी जगाशी संबंध येत असे. संन्यास किती सोयीचा असतो ना? कसल्या म्हणून कटकटी नाहीत. असे गावातल्या संसारी लोकांना वाटत असे. पण म्हणून खरेच त्या संन्यासाला कुठलीच समस्या नव्हती का?
 त्याचे जीवन असे विनासायास चालु असताना एक बारीकशी समस्या त्याला भेडसावू लागली. गावातून कधीतरी येणारे पक्वान्नाचे जेवण खाऊन जे खरकटे तो संन्याशी जवळच फ़ेकून देत होता, त्याचा एक उकिरडा तिथे तयार होत गेला आणि त्यातल्या नासल्या कुजल्या अन्नाची विल्हेवाट लावण्याचे काम निसर्गाला करायची वेळ आली. अर्थात निसर्गाचे काम कुठला कायदा वा घटनेनुसार चालत नसते. त्याने सर्वच शक्यता व शंकांचे उपाय खुप आधीपासून काढून ठेवलेले असल्याने संन्याशाच्या समस्येचा उपाय आपोआप कार्यरत झाला. त्याने आपल्या पर्णकुटीच्या जवळपास जो उकिरडा निर्माण केला होता त्याची विल्हेवाट लावायला तिथे एका उंदराची नेमणूक झाली. म्हणजे तिथे वास काढत एक उंदिर येऊन थडकला. तिथेच एक बिळ जमीनीत पोखरून वास्तव्य करू लागला. आता  पोटपाण्याची सोय लागली आणि बिळाच्या रुपाने वास्तव्याला घर मिळाल्यावर त्या उंदराच्या जीवनात स्थैर्य आले होते. मग त्याने सुखी संसाराची स्वप्ने बघितली तर नवल कुठले? कारण त्याने संन्यास वगैरे घेतला नव्हता. संसार, संन्यास अशा मानवी संकल्पनांची बाधा त्याला झालेली नव्हती. त्यानेही एक सहचरी शोधून आणली आणि संन्याश्याच्या पर्णकुटीजवळच्या बिळात आपला संसार थाटला. लौकरच त्याच्या संसारात बहार आली आणि त्याचा त्रास बिचार्‍या संन्याशाला सुरू झाला.
   उंदराची पिल्ले बिळाच्या बाहेर पडून खेळूबागडू लागली. एकेदिवशी त्यांना एका नव्याच खेळण्याचा शोध लागला. त्यांना आसपासच्या रानातल्या नैसर्गिक वातावरणात न शोभणारी कापडी वस्तु दिसली आणि ती एका झुडूपावर लटकत होती, वार्‍याने उडत फ़डफ़डत होती. उंदराच्या पोरांसाठी ती नवीच वस्तू म्हणजे खेळणेच होते ना? त्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला आणि मग खेळून दमल्यावर असेल तिथेच ते कापड सोडुन बिळात विश्रांतीसा्ठी निघून गेली. हा ने्हमीचा प्रकार झाला. पण त्याचा त्या बिचार्‍या संन्याशाला मनस्ताप होऊ लागला. कारण रोज सकाळी आंघोळ केल्यावर वाळत घातलेली लंगोटी त्याला दुसर्‍या दिवशी सकाळी जागच्या जागी सापडेना. त्याने शेवटी दबा धरून शोध घेतला, तेव्हा त्याला जवळच उंदराने बिळ केल्याची व उंदिरच ही उचापत करीत असल्याचा शोध लागला. त्याचा बंदोबस्त कसा करावा ही त्याच्यासाठी समस्या तयार झाली. दिवसेदिवस त्या उंदरांच्या टोळीने उच्छादच मांडला आणि त्यांचा बंदोबस्त आवश्यक असल्याचे संन्याशाला जाणवले. त्याने गावातल्या जा्णकारांशी प्रथमच संपर्क साधून सल्ला घेतला तर त्याला खुप आश्चर्य वाटले. उपाय खुपच सोपा होता आणि आपल्यासारख्या तपस्व्याला तो का सुचला नाही, याचे त्या संन्याशाला वैषम्य वाटले.Image result for cat
   गावातल्या जाणत्यांनी त्याला एक मांजर पाळण्याचा सल्ला दिला. तेवढेच नाही तर त्याला एक मांजराचे पिल्लूसुद्धा भेट दिले. पण एकदोन दिवसापेक्षा अधिक काळ तिथे पर्णकुटीच्या परिसरात ते मांजर टिकेच ना. एकदोन दिवस झाले की मांजर गावात पळून जायचे. मग त्याला शोधत फ़िरायची वेळ संन्याशावर यायची. त्याचा तपोभंग होऊ लागला. पण जेवढा वेळ मांजर तिथे असायचे, तेवढा काळ उंदरांचा बंदोबस्त चांगला होत असे. पण हे मांजर टिकवायचे कसे? तेव्हा गावकर्‍यांनी सल्ला दिला, की मांजराच्या दूधाची व्यवस्था करायला हवी. त्यासाठी संन्याशाने म्हैस पाळणे आवश्यक होते. जागच्या जागी दूध मिळू लागले तर मांजर कशाला पर्णकुटी सोडून जाईल? संन्याशाला ती आयडीया पटली आणि गावकर्‍यांनीच त्याला एक चांगली दुभती म्हैस भेट देऊन टाकली. पण मांजराच्या दूधाची समस्या सुटली तरी म्हैस बांधायची Image result for buffaloकुठे आणि तिला चारायचे कधी; ही समस्या दोनच दिवसात समोर आली. तेव्हा पुन्हा संन्याशाला बुजूर्ग गावकर्‍यांचा सल्ला घ्यायची वेळ आली. त्यांनी त्यासाठी छान उपाय सुचवला आणि त्यातून सर्वच समस्या सुटून गेल्या. म्हशीचा संभाळ व दूध काढण्याचे काम करायला एक परित्यक्ता संन्याशाच्या वस्तीवर येऊन राहिल आणि त्या दोघांसाठी छोटीशी झोपडी गावकरी बांधून देतील असा तो उपाय होता. आठवड्याभरात तेही काम मार्गी लागले आणि उंदरांचा कायमचा बंदोबस्त होऊन गेला. आता संन्याशाची लंगोटी जागच्या जागी राहू लागली. उंदराची वर्दळ संपली. फ़ार कशाला संन्याशाला पाण्यासाठी तळ्याकडेही फ़िरकण्याची गरज उरली नाही. ती म्हशीचा संभा्ळ करण्यासाठी आलेली महिला पाणी भरत होती, स्वत:सा्ठी स्वयंपाक करताना संन्याशालाही दोन घास घालत होती. त्याच्या अंघोळीचे पाणी गरम करून देत होती. संन्याशाचे जीवन सुखात व्यतीत होऊ लागले होते. इतक्या आपुलकीने आपली सेवा करणार्‍या त्या महिलेबद्दल त्याच्या मनात स्नेहभाव निर्माण झाला नसता तरच नवल. आणि त्या स्नेहभावानेच तो संन्याशी कधी संसारी पुरूष होऊन गेला त्याचा त्याला किंवा गावकर्‍यांना पत्ता लागला नाही.
   एका पर्णकुटिच्या जागी चांगले शाकारलेले संसारी घर तिथे तयार झाले आणि तिथल्या अंगणातही मुले बागडू लागली. गावातल्या कुठल्याही घरात जशी भांडणे होतात व धिंगाणा होतो, तसाच तिथेही सुरू झाला आणि त्यात नवराबायकोच्या विसंवादाचाही भाग होताच. तपश्चर्या आणि संन्यास बाजूला पडला आणि कुठल्याही संसारी पुरूषाप्रमाणे तो संन्याशी गृहस्थ होऊन गेला होता. रोजच्या जीवनातील कटकटींना विटून गेला होता. ज्या महिलेविषयी स्नेहभावातून हे सर्व घडून आले, तिचा त्याला तिटकारा येऊ लागला. मग एकेदिवशी मोठेच भांडण जुंपले आणि ते ऐका्यला अवघा गाव गोळा झाला. तेव्हा संताप अनावर झालेला तो गृहस्थ आपल्या पत्नीला धमकी देत म्हणाला, "हे सर्व सोडून निघून जाईन, संन्यास घेईन." तेव्हा मात्र तिचा उसळलेला राग कुठल्या कुठे गायब झाला आणि मनसोक्त हसत ती उत्तरली, "मग हा संसार कशातून उभा राहिला? त्या तुमच्या संन्यासातूनच तयार झाला ना? साधी लंगोटी संभाळता येत नाही आणि संन्यासाच्या गप्पा कुणाला सांगता?" आपल्या सहचारिणीचे हे बोल ऐकल्यावर त्या गृहस्थाचे सर्व अवसान गळाले. हे वेगळे सांगायची गरज आहे काय? सुरूवात कुठून झाली होती? एका लंगोटीपासून ना? एका लंगोटीला उंदरांच्या तावडीतून वाचवताना तो संन्यासी कधी संसारी पुरूष होऊन गेला, त्यालाच काय पण गावकर्‍यांनाही कळले नव्हते. आणि एवढे झाल्यावर त्याने त्यातून सुटण्याचा उपाय कोणता काढला, तर पुन्हा लंगोटी नेसून संन्यास घेण्याचा. एक इवली लंगोटी सुद्धा कशी मोहाच्या जाळ्यात ओढत जाते त्याचा हा किस्सा.

Sunday, September 6, 2015

श्रीकृष्ण राण्या

श्रीकृष्णाविषयी असे म्हटले जाते की, त्यांच्या सोळा हजार एकशे आठ भार्या (पत्नी)होत्या. यामागचे कारण असे आहे की, नरकासुराच्या कारागृहात बंदी असलेल्या हजारो राजकुमारीकांना भगवान श्रीकृष्णाने मुक्त केल्यानंतर या सर्व राजकुमारीकांनी श्रीकृष्णाला पती मानले आणि श्रीकृष्णानेसुद्धा यांचा पत्नी रुपात स्वीकार केला. यामुळे यांच्या पत्नींची संख्या हजारांमध्ये आहे. परंतु भगवान श्रीकृष्णाच्या मुख्य 9 राण्या होत्या, ज्या पट्टराणी म्हणून प्रसिद्ध झाल्या. या सर्व राण्यांची एक रोचक कथा आहे.

राधा भगवान श्रीकृष्णाची प्रेयसी बनून राहिली परंतु श्रीकृष्णाच्या प्रमुख पट्टराणी रुपात सर्वात पहिले रुक्मिणी चे नाव घेतले जाते. या विदर्भ देशाच्या राजकुमारी होत्या आणि यांनी श्रीकृष्णाला आपले पती मानले होते. परंतु यांचा भाऊ रुक्मीला यांचे लग्न चेदी नरेश शिशुपालशी करण्याची इच्छा होती. यामुळे रुक्मिणीचे प्रेमपत्र वाचून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण करून त्यांच्याशी लग्न केले.

श्रीकृष्णाची दुसरी पट्टराणी देवी कालिंदी मानल्या जातात. या भगवान सूर्यदेवाच्या पुत्री आहेत. यांनी श्रीकृष्णाला पती रुपात प्राप्त करण्याची कठोर तपश्चर्या केली होती. यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने सूर्यदेवाकडे कालिंदीचा हात मागितला.

श्रीकृष्णाची तिसरी पट्टराणी मित्रवृंदा आहेत. या उज्जैनच्या राजकुमारी होत्या. भगवान श्रीकृष्णाने स्वयंवरात सहभागी होऊन मित्रवृंदाला आपली पत्नी बनवले होते.

श्रीकृष्णाच्या चौथ्या पट्टराणीचे नाव सत्या आहे. काशीचे नरेश नग्नज‌ित् यांच्या मुलीच्या लग्नासाठी एक विचित्र अट होती. त्या अटीनुसार जो व्यक्ती सात बैलांना एकाचवेळी वेसण घालेले तो सत्याशी लग्न करेल. श्रीकृष्णाने ही अट पूर्ण करून सत्याशी लग्न केले.

ऋक्षराज जांबुवंतची मुलगी जांबवंती श्रीकृष्णाची पाचवी पट्टराणी होती. स्यमंतक मण्यासाठी जेव्हा श्रीकृष्ण आणि जांबुवंत यांच्यामध्ये युद्ध झाले तेव्हा जांबुवंताच्या लक्षात आले की, श्रीकृष्णच त्यांचे आराध्य श्रीराम आहेत. त्यानंतर जांबुवंताने जांबवंतीचे लग्न श्रीकृष्णाशी केले.

श्रीकृष्णाच्या सहाव्या पट्टराणीचे नाव रोहिणी होते. रोहिणी गय देशाचे राजा ऋतुसुकृत यांची मुलगी होती. रोहिणीने स्वयंवरामध्ये श्रीकृष्णाला स्वतः पती रुपात स्वीकार केले होते.

श्रीकृष्णाची सातवी पट्टराणी होती सत्यभामा. ही सत्राजितची मुलगी होती. सत्राजितने प्रसेनची हत्या केल्याचा आणि स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप श्रीकृष्णावर लावला होता. श्रीकृष्णाने हे दोन्ही आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध केले आणि स्यमंतक मणी सत्राजितला परत दिला. त्यानंतर सत्राजितने सत्यभामा आणि श्रीकृष्णाचे लग्न लावून दिले.

श्रीकृष्णाच्या आठव्या पट्टराणीचे नाव लक्ष्मणा होते. स्वयंवरमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यात वरमाला घालून लक्ष्मणाने पती रुपात श्रीकृष्णाचा स्वीकार केला.

श्रीकृष्णाच्या नवव्या पट्टराणीचे नाव आहे शैव्या. राजा शैव्यची मुलगी असल्यामुळे तिला शैव्या म्हटले जाते.

आर्यांच्या मूर्तीपूजेचा उद्गाता कृष्ण

माझे महाभारतील अत्यंत आवडते व्यक्तिमत्व म्हणजे कृष्ण. तो खरा 'विकासपुरुष' होता. जरासंधाचे मगध राज्य
मथुरेच्या शेजारी होते. जरासंध लोभी आणि आक्रमक होता. त्याचे राज्य मथुरेपेक्षाअनेक पटींनी सामर्थ्यवान होते. त्यामुळे कृष्णाने वेळीच धोका ओळखून द्वारकेला यादवांचे स्थलांतर केले. आता मध्ये सामर्थ्यशाली आणि कृष्णाचे मित्र असे कुरु राज्य असल्याने जरासंधाचा धोका नव्हता. द्वारका हे एक उत्तम बंदर होते. मथुरेत गोपालक असणारे यादव आता व्यापारी बनले. परदेशांशी व्यापार करून द्वारका अल्पावधीतच सोन्याची झाली.........परंतु अल्पावधीत आलेली श्रीमंती नेहमीच धोकादायक असते. यादव या अल्पावधीत आलेल्या श्रीमंतीने दारू आणि अन्य व्यसनांत बुडाले आणि त्यांनी कृष्णाच्या समोरच आपला नाश ओढवून घेतला.
कृष्ण उत्तम राजानितीज्ञ होता. पश्चिमेपासून दूर पुर्वेपर्यंत त्याने स्वत: आणि पांडवांची लग्नसंबंध जुळवून सर्व राज्यांशी उत्तम संबंध जोडले. युद्धात प्रसंगी नीतिमत्तेशी तडजोड करून (उदा. धर्मराजाला द्वयार्थी बोलण्यास उद्युक्त करणे) पांडवांना युद्ध जिंकून दिले.
 मानसशास्त्र युद्धात किती महत्वाचे असते याची त्याला जाणीव होती. द्रोणाचार्यांना मानसिकदृष्ट्या खचविणे तर मानसिकदृष्ट्या खचलेल्या अर्जुनाला युद्धात उभे करणे यातून हे स्पष्ट होते. कर्णाला युद्धाच्या पूर्वी त्याचे जन्मरहस्य सांगून त्याला मानसिकदृष्ट्या खच्ची केले.
अत्यंत प्रबळ अशा यवन (राजा : कालयवन) आणि मगध (राजा : जरासंध) राज्यांनी एकाच वेळी मथुरेवर हल्ला केला. (यवन : उत्तरेकडून, मगध : दक्षिणेकडून) त्यावेळी त्याने वापरलेले युद्धतंत्र अप्रतिम होते.
सर्व यादवांना मथुरेहून सुरक्षित अशा द्वारकेला हलविणे आणि आपल्या सेनेसह युद्धाला सज्ज होणे.
जवळच्या डोंगरात मुचुकुंद राजा झोपला असल्याची आणि 'त्याला जो कोणी उठवेल तो भस्म होईल' असा वर इंद्राकडून मिळाल्याची आवई उठविणे, 
कालयवनला एकट्याने युद्ध करण्यास येण्याचे आव्हान देणे.
स्वत: घाबरून पळाल्याची बतावणी करत कालयवनाला आपल्या मागे त्या डोंगरात नेणे, 
आधीच पेरलेल्या स्फोटकांच्या (भू-सुरुंग?) सहाय्याने कालयवनाला उडवून देणे,
 मुचुकुंद राजाला उठविल्यामुळे कालयवन भस्मसात झाला झाले असे सांगणे
इंद्राच्या शापाने आपला राजा भस्मसात झाला हे कळल्यावर कोणती सेना युद्ध करण्यास तयार होईल?
          अति बलाढ्य शत्रूविरुद्ध लढताना यापेक्षा उत्तम रणनीती कोणती असू शकेल?

*कृष्ण महान तत्वज्ञानी होता. गीतेत सांगितलेले तत्वज्ञान कृष्ण मुक्तावास्थेला पोचलेला पुरुष होता याचीच साक्ष देते.

* कौरवांकडून पांडवांना मिळालेल्या खांडववनात बलिष्ठ नाग जमात राहत होती. तेथे राज्याची राजधानी वसावयाची तर नागांशी संघर्ष अटळ होता. म्हणून कृष्णाने नाग वंशाचाच संहार करायचे ठरविले. मात्र तो त्यात अपयशी ठरला. नाग-पांडव संघर्ष नंतर चार पिढ्या (अर्जुन, अभिमन्यू, परीक्षित आणि जनमेजय) चालला. खांडववनातील नागांचा संहार करताना कृष्णाने नागांचा सर्वोत्तम अभियंता मयासुराला अभय देऊन पांडवांसाठी राजवाडा बांधून घेण्याची समयसूचकता दाखविली.

* कृष्ण हा 'पूर्णावतार' होता. त्याने जे काही केले ते पूर्ण झोकून देऊन केले. त्यासाठी त्याने जनमताची लाज बाळगली नाही की देवांची भीती बाळगली नाही. आर्य निसर्गदेवता मानणारे होते. कृष्णाने प्रथमच 'गोवर्धन पर्वत' म्हणजे ऐहिक (Physical Objects) देवता मानण्यास सुरुवात केली. या दृष्टीने तो 'आर्यांमधील मूर्तीपूजेचा उद्गाता होता' असे म्हणता येईल.

Thursday, August 20, 2015

आकांत

कवी : संजय सोनवणी

माझ्या आक्रंदणा-या मित्रा,
जवळ ये
शांत बैस
तुझा आकांत
ज्यांच्यासाठी आहे
ते गप्प आहेत
बहिरे आहेत
पण ज्याविरुद्ध आहे
ते मात्र सैतानासारखे
तुझा आकांत दबवत आहेत.....

हरकत नाही
पण तू आकांतत रहा
मीही तुझ्या आकांतात
माझाही आकांत मिसळतो
निखळत्या ता-यांचा असेल तसा....
न ऐकणारे ऐको न ऐकोत
या सैतानी झुंडीला
आपण तोंड देवु...

तू एकाकी नाहीस
तुझ्या क्षीण आकांतात
माझाही क्षीण आकांत मिसळला
तर आकांत थोडा तरी
कानी पडेल....

आपल्याच लोकांच्या!

Wednesday, August 12, 2015

संत शिरोमणी नामदेव महाराज

Pravin Karkhanis यांच्या facebook post वरून साभार

संत शिरोमणी नामदेव महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठल-मंदिराजवळ , आपल्या आप्तेष्टांसह , कृष्ण -पक्ष त्रयोदशी , शके १२७२ म्हणजेच इंग्रजी दिनांक ३ जुलै १३५० या दिवशी , समाधिस्थ झाले अशी महाराष्टातल्या भाविकांची श्रद्धायुक्त समजूत असल्याने , यंदा .१२ ऑगस्ट रोजी त्यांचा , तिथीनुसार , समाधी-दिन ! " अमृताहुनी गोड नाम तुझे देवा , मन माझे केशवा का बा न घे " ही रचना , अथवा " चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती , झाले मज प्रती तैसे आता " हा अभंग , किंवा घराघरात म्हटली जाणारी " युगे अठ्ठावीस विटेवरी उभा , वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा " ही आरती ---या साऱ्या संत नामदेवांच्या आहेत . कीर्तन -परंपरा लोकप्रिय केली ती नामदेवांनीच . त्यांचा जन्म ,अनेकांच्या मते हिंगोली जवळ असलेल्या नरसी-बामणी या गावी झाला होता तर काहींच्या मते त्याच नावाच्या सातारा अथवा सोलापूर जवळच्या गावात ते जन्मले . संत नामदेव यांच्या बरोबर संत ज्ञानेश्वर यांनी बराच प्रवास केला होता . संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेताच संत नामदेव उत्तरेस निघून गेले . फिरता फिरता ते पंजाब प्रांतातल्या ' घुमान ' ला गेले . त्यांच्या अवती-भवती जमणाऱ्या लोकांना त्यांनी भक्ती-संप्रदायाकडे वळविले , प्रसंगी त्यांची सेवाही केली . लोकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा जडली .तब्बल बावीस वर्षे तीच त्यांची कर्मभूमी झाली ...........अलीकडेच मी " घुमान " येथील संत नामदेव गुरुद्वारात राहून आलो . नामदेवांची पंजाबी भाषेत लिहिलेली एकसष्ट पदे , शिखांच्या ' ग्रंथसाहेब ' या धर्मग्रंथात गुरुमुखी लिपीत समाविष्ट असल्याने ' बाबा नामदेव ' हे त्यांचे संत-पुरुष ठरले आहेत . मूर्ती-पूजा न मानणाऱ्या शीख-धर्मियांचा हा जगातला एकच गुरुद्वारा असा आहे , जिथे बाबा नामदेव यांची मूर्ती स्थापित केलेली आहे . अर्थात , येथे असलेले नामदेवांचे रूप अगदी वेगळेच आहे . ( फोटो पाहावा ) .... बाबा नामदेव यांनी इहलोकाची यात्रा , ' घुमान --पंजाब ' इथेच संपवली अशी त्यांची ठाम समजूत असल्याने संत नामदेवांची समाधी तिथेही पाहावयास मिळते . (फोटोत वर : मराठी माणसाला अभिप्रेत असलेले संत नामदेव आणि खाली शीख समाजाला अभिप्रेत असलेले बाबा नामदेव )



Sunday, August 9, 2015

पाया

पाया : कवी : विंदा करंदीकर : 'विरूपिका' मधून

(कविता आठवली तशी लिहिली आहे)

मित्रा, माझा आशावाद दोन पायांवर उभा नसून चारशे चाळीस पायांवर उभा आहे.
कसा ते ऐक,

तरुणांना भडकाविल्याच्या  आरोपाखाली सोक्रेटीसवर अथेन्सच्या न्यायालयात खटला झाला
आणि त्याला विषाचा प्याला घेण्याची शिक्षा झाली
(ती त्याने कशी भोगली ते प्लेटोला विचार, ते विषयांतर होईल)

पण सारे काही एवढ्यावरच संपलेले नाही.
त्या खटल्यातील पाचशे ज्युरींपैकी दोनशे वीस ज्युरींनी त्याला निर्दोष ठरविले.
(त्यांना कधीकधी भेटावेसे वाटते, पण ते विषयांतर झाले)

मित्रा, माझा आशावाद  सोक्रेटीसवरच्या दोन पायांवर उभा नसून
त्या दोनशेवीस ज्युरींच्या चारशे चाळीस पायांवर उभा आहे.

Saturday, August 8, 2015

संधीचे सोने

एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,

भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?
काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "
आणि मोठ्याने हसू लागला ....हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...

तो घरी गेला ....
त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "
" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?
म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!

मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...
रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे
मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातील सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातात सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..

आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळे मोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडते
मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही
न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ? असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या नाण्यांनी भरलेली होती ...हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..

मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल  तर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईन तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते

Tuesday, July 14, 2015

बकरा

एकदा एका शेतकऱ्यांचा घोडा अाजारी पडला. ईलाज करण्यासाठी डाॅक्टरला बोलावलं.
डाॅक्टरने त्याची व्यवस्थित तपासणी केली आणि म्हणाला "तुमचा घोड्याला गंभीर आजार आहे. आपण तीन दिवस त्याला औषध देऊन पाहू ,
ठिक झाला तर ठिक .अन्यथा आपल्या त्याला विषारी इंजेक्शन देऊन मारावं लागेल. कारण हा आजार तुमच्या दुसऱ्या प्राण्यांना होऊ शकतो."

हे सर्व शेजारी असलेला बकरा ऐकत असतो.
त्याची घोड्याची जिगरी दोस्ती असते
डाॅकटर औषध देतो अन् निघून जातो तसा बकरा घोड्याजवळ जातो व म्हणतो
"उठ मित्रा, जसा हालचाल करण्याचा प्रयत्न कर नाहीतर हे लोक तुला मारतील."

दुसऱ्या दिवशी पुन्हा डाॅक्टर येतो आणि घोड्याला औषध पाजून निघून जातो.
डाॅक्टर गेल्यावर पुन्हा बकरा घोड्याजवळ येतो अन् म्हणतो "मित्रा, धीर धर, हवं तर मी तुला मदत करतो जरा उभं राहण्याचा प्रयत्न कर.चल उठ"
तिसऱ्या दिवशी डाॅक्टर शेतकऱ्यांला म्हणाला

"नाईलाज आहे पण आता याला मारावंच लागले. यांचे शरीर औषधालाही साथ देत नाही."

जेव्हा डाॅक्टर निघून जातो तेव्हा बकरा घोड्याला कळकळीने प्रेरित करत म्हणाला "मित्रा, आता तुझ्यावर करा किंवा मरा अशी वेळ आलीय. जर आज तू काही प्रयत्न केला नाही तर उद्या तू जिवंत राहणार नाही. म्हणून उठ ,हिंमत कर आणि उठू शकतोयस तू उठ
घोड़ा हळू हळू हालतो
धडपडतो
पण कसाबसा ऊभा राहतो
बकरा त्याला प्रेरणा देत राहतो

ये ये ये
चक दे
शाब्बास,
शाब्बास शाब्बास
तु करू शकतोस
आणखी थोडासा
हां चाल , चाल जमतेय तुला
ले भारी
वाहव्वा
अाता जरा पळ
जमतेय तुला
जमेगा
बरोबर एकदम बरोबर
आता जोरात पळ."

घोड़ा मस्त पळायाला लागला
खिँकाळू लागला
ते ऐकून तेवढयात शेतकरी तेथे आला
आणि
पाहिलं की घोडा धावत आहे.
त्याला खूप आनंद झाला.
त्याच्या डोळ्यातून पानी वाहू लागले
तो घोड्या सोबत पळू लागला
त्याच्या सोबत बकरा पण पळत होता

शेतकाऱ्याने घरातील सर्वांना बोलावले
आणि मोठ्याने ओरडून म्हणाला
"अरे बघा बघा चमत्कार झाला
आपला घोडा ठीक झाला
पळू लागलाय
आज आपण आनंद साजरा करू."

घोड़ा खिंकाळतो
शेतकरी ओरडुन बोलतो वा बघा कसा आनंदी झालाय
बकरा बॅ बॅ करतो
शेतकरी त्याला आनंदाने उचलून नेतो
आणि बोलतो
याहू
"आज रात्री बकऱ्याच्या मटनाची पार्टी करू."

तात्पर्य : वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत नसतं की कोण काम करतं जो खरंच मनापासून काम करतो त्याचाच बकरा होतो.

Friday, July 10, 2015

आपली ऊर्जेची गरज किती?

आपली ऊर्जेची गरज किती?

दर डोई केवळ १ किलोवॅट एवढ्या ऊर्जेत चांगले जगता येईल?
प्रत्येकाला चांगल्या दर्जाची राहणी खात्रीने मिळण्यासाठी किती ऊर्जा लागेल?

हा एक मूलभूत प्रश्न आहे. ऊर्जा नियोजन करताना त्याचा विचार मुळात करावा लागतो. आजपर्यंतच्या या प्रश्नाकडे पुरेश्या गांभिर्याने लक्ष दिले गेले नाही. देशाला ऊर्जा किती हवी याचा अंदाज करण्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन किती हवे असा विचार करून अनुमान केले जाते. सकल राष्ट्रीय उत्पादन वाढले की प्रत्येक देशवासीयाच्या मूलभूत गरजा भागल्या जातील – याची खात्री देता येत नाही. त्यामुळे काहीजणांनी ऊर्जेचे अनुमान करण्यासाठी देशाची प्रगती जोखण्याचे काही विशिष्ठ निकष लावले आहेत किंवा हे निकष पूर्ण होतील अशा बाबींच्या वाढीचे निर्देशांक आधारासाठी घेतले आहेत. प्रगतीची चाचपणी करू शकणार्‍या अशा प्रकारच्या अनेक निकषांनी बनलेल्या चौकटीत – चांगल्या दर्जाचे राहाणीमान म्हणजे नेमके काय हे स्पष्ट करता येते.
“प्रयास” ऊर्जा गटाने या प्रश्नाबाबत एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. या शोधनिबंधात उर्जेच्या गरजेचा अंदाज  करणार्‍या विविध पद्धतींची तुलना केली आहे आणि ती सोदाहरण स्पष्ट केली आहे.
·         यात भारतीय नियोजन आयोगाने २००६ साली आणलेले एकात्मिक ऊर्जा धोरण आहे.

·         २०३२ सालच्या ऊर्जेच्या गरजेचा अंदाज करण्यासाठी
१) सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाढीचा दर आणि
२) सकल राष्ट्रीय उत्पादन व ऊर्जेचा वापर यातील लवचिकता, या दोन बाबींचा आधार घेतला आहे.

·         केंद्रिय विद्युत आयोगाने विद्युतशक्तीबाबत केलेल्या सर्वेक्षणावरही या शोधनिबंधात एक नजर टाकली आहे. आगामी २० वर्षांसाठी किती उर्जा लागेल याचे अनुमान करण्यासाठी हा आयोग सकल राष्ट्रीय उत्पादन आणि त्यातील संभवनीय बदलाचे रेखांकन यांवर भर देतो. वरील दोन्ही पद्धतींमध्ये - १००% घरांना वीजपुरवठा – अशासारखे समान सामान्य हेतू असले तरी विवक्षित वाढीचे लक्ष्य आणि ऊर्जावापर यात कोणताही थेट संबंध असल्याचे म्हटलेले नाही.
आणखी विशेष म्हणजे - विशिष्ट वाढीचे लक्ष्य आणि त्याच्याशी जोडलेला ऊर्जावापर – यांच्या केल्या गेलेल्या अभ्यासांचीही दखल या शोधनिबंधात घेतली आहे.
उदा. चांगल्या दर्जाची राहाणी कितपत साध्य झाली याचा निर्देशक असलेला मानवी विकास निर्देशांक. (एच डी आय.). याबाबत जगात सगळीकडे झालेल्या पहाण्यामध्ये - मानवी विकास निर्देशांक आणि दरडोई वीजवापर – यांच्या पातळीत सरळ संबंध असल्याचे दिसून आले आहे. या संबंधाच्या आधारे विजेच्या गरजेचा अंदाज आपल्याला हव्या त्या पातळीपर्यंत करता येतो. मानवी विकास निर्देशांकात काही लक्ष्ये अंतर्भूत नाहीत असा एक आक्षेप घेतला जातो. त्याशिवाय काही देशांमध्ये कमी प्रमाणात ऊर्जावापर करूनसुद्धा मानव विकास निर्देशांक वरच्या स्तरावर आलेला दिसतो. हा इतरांसाठी एक वस्तुपाठ ठरू शकतो.
२०१४ मध्ये भारतीय नियोजन मंडळाने - सर्वसमावेशक विकासासाठी कर्बनी पदार्थांच्या अल्प वापराची रणनीती – या विषयाबाबत एक अहवाल दिला, त्याचीही दखल या शोधनिबंधात घेतली आहे. या अहवालाच्या आधारे बनवलेल्या प्रतिरूपाद्वारे २०३० सालचा वीज आणि ऊर्जा यांच्या गरजेचा अंदाज करता येतो. या प्रतिरूपात १२व्या पंचवार्षिक योजनेत अपेक्षित केलेल्या ‘सर्वसमावेशक वाढ’ या धोरणाचा समावेश केला आहे तसेच शाश्वत आणि वेगवान वाढीसाठी आवश्यक वाटणार्‍या २५ गाभाभूत दर्शकांचाही समावेश केलेला आहे. गरीबी, रोजगार, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण यासारख्या गोष्टींमध्ये आकडेवारीत मोजता येतील अशी उद्दिष्ट्ये ठरवून दिली आहेत. त्यामुळे अध्ययन केवळ ऊर्जा आणि शक्तीक्षेत्रापुरतेच न राहाता पूर्ण अर्थव्यवस्था त्याच्या कवेत आलेली आहे. हे या प्रतिरुपाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या प्रतिरूपातील उद्दिष्टे अधिक आर्थिक आधार दिल्याने पूर्ण होतील असे दिसत असले तरी अधिक ऊर्जा पुरविण्याबाबत मात्र काही स्पष्टता दिसत नाही.
या शोधनिबंधात विकासाचे विशिष्ट उद्देश्य आणि खास त्यांच्यासाठी आवश्यक असणार्‍या ऊर्जेचा अंदाज करणार्‍या अभ्यासांचे परिक्षण करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या - उर्जा आणि पर्यावरणातील बदल - विषयक सल्ला देणार्‍या गटाने जगात सर्वांना चूल, उजेड, संपर्क आणि उत्पादन यांसाठी ऊर्जास्रोत उपलब्ध असावेत अशी भूमिका घेतली आहे.
‘दि पुअर पिपल्स एनर्जी आउटलुक’ यांनी ऊर्जेपासून वंचित असणार्‍यांच्या ऊर्जेच्या गरजेबाबत खुलासेवार लिखाण केले आहे आणि त्यांच्या सहा क्षेत्रातील उर्जेच्या गरजेचा, निकडीचा आणि हक्काचा ऊहापोह केला आहे, ही क्षेत्रे म्हणजे उजेड, अन्न शिजवणे आणि पाणी तापवणे, घरातील उबदारपणा, थंडावा, संपर्क आणि माहिती स्रोत उपलब्ध होणे आणि रोजंदारीसाठी ऊर्जा. या गरजांपैकी काहींबाबत या अभ्यासात मापन करण्याच्या पद्धती दिल्या आहेत.
विवक्षित साहित्य, वस्तू आणि सेवा-सुविधांच्या गरजा भागवून चांगल्या दर्जाची राहाणी मिळवी यासाठी लागणारी ऊर्जा किती याचा अंदाज करणार्‍या तीन अभ्यासांची दखल या शोधनिबंधात घेतली आहे.

1.       १९८० मध्ये अमूल्य रेड्डी आणि सहकार्‍यांनी एक नमुना समोर ठेवला, यात सर्व भारतीयींनी १९७० मध्ये युरोपात सर्वत्र उपलब्ध होती अशा - राहणीमानाच्या पातळीचा विचार केला आहे. अगदी प्रत्येकाला दर किलोमीटर प्रवासासाठी लागणार्‍या ऊर्जेचीही गणना घर चालवण्यासाठी लागणार्‍या ऊर्जेसोबत केली आहे. प्रत्येक बाबीसाठी लागणारी ऊर्जा आकड्यांनिशी देताना त्या काळात उपलब्ध असणार्‍या सर्वात किफायतशीर पर्याय गृहीत घरला आहे. दर डोई केवळ १ किलोवॅट एवढ्या ऊर्जेत हे साध्य होईल असे अमूल्य रेड्डी यांच्या गटाने दाखवून दिले आहे.

2.       अशाच प्रकारचा 2007 मध्ये चीनमध्ये झालेला एक अभ्यास या शोधनिबंधात पहायला मिळतो. झियानली झ्यू आणि जियाहुआ पान यांनी चीनमधील १.३ अब्ज लोकसंख्येपैकी ७५% लोक शहरी असल्याचे गृहीत धरून मूलभूत गरजांसाठी प्राथमिक व्यावसायिक ऊर्जेची आवश्यकता त्यांनी गणिते करून मांडली आहे.

3.       २००० वॅट सोसायटी – यांच्या नावाप्रमाणे दर डोई दर साल २ किलोवॅट ऊर्जेत आवश्यक गरजा भागवता येतील अशा स्वरूपाची ऊर्जा व्यवस्था या अभ्यासात मांडली आहे.

4.       नरसिंहराव यांचा अजून अपूर्ण असलेला एक अभ्यासही यात समाविष्ट आहे. त्यांच्या मते यासाठी एक सर्वसमावेशक अशी एक चौकट असू शकतो मात्र त्यात स्थलकालाप्रमाणे विशेष वेगळे असू शकतात. उदा. अन्नाची गरज हा त्या चौकटीतला एक वैश्विक घटक असला तरी अन्नासाठी लागणारी ऊर्जा वेगवेगळी असू शकते – अन्न शिजवण्याच्या पारंपारीक पद्धती, स्थानिक खाद्यसंस्कृती, शाकाहार – मांसाहार यावर अन्न या घटकापायी लागणारी ऊर्जा वेगवेगळी असेल.

या सर्व गोष्टींचा उहापोह करून २०३२ साली भारतात वीज आणि ऊर्जा किती लागेल याचा अंदाज प्रयास ऊर्जा गटाने केला आहे. मूलभूत गरजांवर आधारीत ऊर्जेचा अंदाज योग्य केला तरी ती ऊर्जा योग्य जागी आणि योग्य तितकी पोचवण्यात योग्य काळजी घेऊन अंमलबजावणी केली जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याखेरीज आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ऊर्जानिर्मितीचे शाश्वत मार्ग आणि निर्माण झालेल्या ऊर्जेचे समन्यायी वितरण – हे जगात सर्वत्र झाले तर चांगल्या दर्जाचे राहाणीमान सर्वांना मिळू शकेल असे या शोधनिबंधात म्हंटले आहे.



How Much Energy Do We Need:Towards End-Use Based Estimation For Decent Living
संशोधन क्षेत्र - ऊर्जा स्रोत आणि विकास

 Research Area:

  Energy Resources & Development
लेखक - श्रीपाद धर्माधिकारी, ऋतुजा भालेराव

Authors: Shripad Dharmadhikary, Rutuja Bhalerao

प्रसिद्धी दिनांक - मे २०१५

Publication Date: May, 2015

हा शोधनिबंध या क्षेत्रातील सर्व अभ्यासकांनी जरूर वाचावा आणि सर्वांना चांगले जीवनमान मिळवण्यासाठीच्या या प्रयासात आपले योगदान द्यावे.

Monday, June 29, 2015

कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ? : लेखक चिंतामणी कारखानीस

लेखक : चिंतामणी कारखानीस

सदर माझा लेख ठाण्याच्या 2010 साली कायस्थांच्या मेळाव्याच्या निमित्ताने कायस्थ विकास या मासिकात प्रसिद्ध झाला आहे . जरी यात तत्कालीन काही ब्राह्मण वृत्तींवर विखारी टीका केली असली तरी एकंदर ब्राह्मण समाजा बद्दल माझे मत चांगलेच आहे.माझे अनेक शिक्षक ब्राह्मण होते त्यांनी ब्राह्मण ब्राह्मणेतर असा भेद भाव केला नाही.इतिहास म्हणून या लेखा कडे पाहावे . आता परिस्थिती बदलली आहे.!!!!

चिंतामणी कारखानीस ----

कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?
बुद्धीचे किती युक्तीचे किती मानी अभिमानी ।
कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ।
संख्येने जरी अल्पही असलो कर्तृत्वाचा वसा ।
इतिहासाला ठेऊनी साक्षी घडवू इतिहासा ...... !

रंगो बापुजी गुप्ते !!!!!

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या गाथेत अनेक घराणी कामी आल्याचा उल्लेख आहे. छत्रपतींची इमानेइतबारे एकनिष्ठेने सेवा करण्यात ज्या दोन जाती इतिहास प्रसिद्ध आहेत त्यामध्ये महार समाज, ज्यांचा शिवाजी महाराज आदराने “नाईक” म्हणून उल्लेख करीत आणि दुसरा समाज कायस्थ प्रभूंचा होता. राजापूरचे बाळाजी आवजी चिटणीस, हिरडस मावळातील बाजी प्रभू देशपांडे आणि रोहीड खोरेकर देशपांडे नरस प्रभू गुप्ते या घराण्यातील पुरुषांनी स्वराज्याची सेवा हाच कुळधर्म मानला. मुत्सद्देगिरी, शौर्य आणि त्यागाची कमाल केली.

पुण्याची जहागिरी प्राप्त होताच शिवाजी राजांनी बारा मावळ प्रांत काबीज केले. बारा मावळातील देशमुख, दस्तकरुन जे पुंड आणि प्रजेला छळणारे होते त्यांना मारिले. देशमुख मराठा जातीचे होते आणि देशमुखीचा कारभार पाहणारे “देशपांडे” कायस्थ प्रभू होते. देशमुख व्यसनी, भांडखोर मानमरातब आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी मारामार्‍या, खून खराबा करणारे होते. मुसलमान सुभेदाराची मर्जी राखायची आणि वतन सांभाळून चैन करायची असा त्यांचा स्वभाव होता. ज्या देशमुखांनी शिवाजीराजांना प्रतिकार केला त्या देशमुखांना शिवाजीराजांनी अत्यंत चातुर्याने स्वत:कडे वळवून आणले. परंतु जे स्वराज्य स्थापनेच्या योजनेत सहभागी होत नव्हते. त्यांना कुठलीही नातीगोती आड येऊन न देता, दयामाया न दाखवता ठेचून मारले.

देशमुखांना स्वराज्याच्या कामी मिळवण्याच्या आधी शिवाजीराजांनी सर्वप्रथम मावळातील देशपांडे, जे कायस्थ प्रभू समाजाचे होते त्यांची सहानभूति मिळवली. स्वराज्याचा मनसुबा सर्वप्रथम पचनी पडला तो कायस्थ प्रभू देशपांड्यांना.

स्वराज्याच्या स्थापनेसाठी -पहिला कायस्थ प्रभू !!!!!!

स्वराज्य स्थापनेच्या कामी रायरेश्वरासमोर बेलभंडार उचलून शपथपूर्वक सामिल झाला. त्या कायस्थप्रभूचे नाव होते दादजी नरस प्रभू गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते हे दादजी नरस प्रभूंचे वंशज आहेत. मराठी स्वराज्याच्या कार्यात कायस्थांचा जो प्रचंड सहभाग होता त्याचे उगमस्थान म्हणजेच दादजी नरस प्रभू गुप्ते (देशपांडे) हेच आहेत.

दांदजी नरस प्रभूला हाताशी धरुन शिवाजी मावळात गोंधळ घालीत असल्याचा बातम्या खोपडे आणि जेधे यांनी विजापुरास कळविल्या. वजिराने एक धमकीचा खलिता दादजी देशपांड्याला पाठवला. या खलित्यात रायरेश्वराची शपथ आणि पेशजी किल्ल्यावरील ठाणे काबीज करुन शिवाजीला मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. शिवाजीला मदत केलीस तर विजापुरास नेऊन “गरदन मारु” अशी धमकी बादशहाच्या वजिराने दादजी प्रभूंना दिली होती.

शिवाजीराजांना या खलिताची बातमी येताच त्यांनी दादजींना धीर देणारे पत्र पाठवले. आपल्या भेटीला बोलावले. दादजींना स्वराज्य स्थापनेचे महत्व पटलेलेच होते. त्यांनी विजापुरच्या शहाच्या धमकीला भीक घातली नाही आणि हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत शिवरायांच्या मागे दादजी प्रभू (देशपांडे) गुप्ते हे ठामपणे उभे राहीले.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांच्या काळात दादजी प्रभूंची स्थिती हालाखीची झाली. शाहू आणि मातोश्री येसूबाई दिल्लीला बादशाही छावणीत सेवेला गेले. दादजींचा मुलगा कृष्णाजी शाहू महाराजांसोबत होता. या सर्व राजकारणाच्या धुमाळीत मुखत्यार नेमलेल्या शंकर नारायण सचिवाने दादजी प्रभूंचे वतन बळजबरीने खालसा केले. शिवाजी महाराजांचे लेखी वचन त्यांच्या मृत्यूनंतर साफ बुडवले. दादजीप्रभू राजाराम महाराजांची भेट घेण्यासाठी जिंजीला जात असतानाच रांगण्याच्या मुक्कामी दादजी प्रभू आणि राजाराम महाराजांची भेट झाली. दादजीने सर्व प्रकार राजाराम महाराजांच्या कानी घातला. महाराज संतापले. त्यांनी शंकर नारायण पंडीत सचिव यांना आज्ञापत्र पाठवले. परंतु शंकर नारायण यांनी राजाज्ञा जुमानली नाही.

याच दादजी प्रभूच्या वंशात रंगो बापूजी गुप्ते यांचा जन्म झाला. रंगो बापूजी गुप्ते यांच्या चरित्रावर भाष्य करणारे पुणेरी इतिहास संशोधक मात्र रंगोबापूजी आपल्या वाडवडीलांच्या वतनासाठी लढले असे चक्क खोटे लिहून रंगोबापूजींना मतलबी ठरवण्याचा डाव टाकीत होते. पुण्यातल्या पेशव्यांनी पेशवे पद मिळताच मराठी राज्याच्या धन्याची गळचेपी सुरु केली होती. पेशवाईचा अंत होईपर्यंत मराठेशाहीच्या छत्रपतींना कोंडीत पकडून स्वत: राज्याचा कारभार पाहण्याचा आणि नामधारी छत्रपतींना नामोहरम करण्याचे राजकारण पेशवे आणि पेशव्यांच्या हस्तकांनी केले. पेशव्यांचे “भाट” पुढे पेशव्यांचे सरदार झाले आणि छत्रपतींकडे दुर्लक्ष करुन पेशव्यांना मुजरे करु लागले. राजाशी नमक हरामी करुन पेशव्यांची मर्जी सांभाळणारे एकूण एक संस्थानिक छत्रपती शिवरायांच्या बेलभंडार्‍याच्या शपथेशी हरामखोरी करणारे निपजले. इतिहासातीले राजद्रोहाचे सत्य अनेक कादंबरीकार, नाटककारांनी बेमालूमपणे दडवले आणि स्वार्थी लोकांचा जयजयकार मराठी वाचकांनी आणि बु्दधीवंतांनी केला. याच बुद्धीवान नाटककारांनी मराठेशाहीचे खरे स्वामी जे छत्रपती त्यांना “नादान” ठरवून पेशवाईचा उदो उदो केला.

छत्रपती शिवरायांच्या काळात रंगो बापूजींच्या पूर्वजांना दिलेले टिचभर वतन हिराऊन घेऊन पुणेरी लाल पगड्यांनी स्वामी निष्ठा वांझोटी करण्याचा प्रयत्न केला. परंतू वतन गेले तरी रंगो बापूजी गुप्ते हे मराठ्यांच्या छत्रपतींच्या गादीशी एकनिष्ठ राहीले. शेवटचे छत्रपती सातारचे प्रतापसिंह महाराज यांचे राज्य खालसा होऊ नये यासाठी रंगो बापूजी इंग्रजांशी लढले. पेशवाईच्या अंता नंतर एकीकडे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद विकोपाला गेला असताना रंगो बापूजी मात्र मराठेशाहीच्या शेवटच्या छत्रपतींची गादी वाचविण्याच्या विवंचनेत होते. उतारवयात केवळ स्वामीनिष्ठेसाठी इंग्लंडच्या थंड हवेत हिंदूस्थानी पोशाख, रिवाज आणि धर्म पाळून रंगो बापूजी या कायस्थाने छत्रपतींची वकीली केली. इंग्लंडमध्ये मराठ्यांवरील होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सभा घेतल्या. अनेक इंग्रज लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. राणीकडे विनंती अर्ज केले. ६० हजार

सह्यांचे १०० अर्ज ब्रिटीश पार्लमेंटच्या दप्तरात दाखल केले. याच सुमारास त्यांनी ब्रिटनच्या न्यायव्यवस्थेचा अणि लोकशाहीचा अभ्यास केला. इंग्रजांच्या दडपशाहीच्या विरोधात इंग्रजांची मते बदलण्याचे काम रंगोबापूजींनी केले. या सुमारास पुण्याचे ब्राह्मण काय करीत होते ते पहाणे सुद्धा गरजेचे आहे.

पेशवाईत कायस्थांवर धार्मिक अन्याय मोठ्या प्रमाणात झाले. ब्राह्मण कायस्थांना अत्यंत तुच्छतेने वागवत असत. कायस्थांनी आपल्या मुलांची मुंज करु नये असा फतवा नारायणराव पेशव्यांच्या काळात काढला होता. सर्व ब्राह्मणांनी ही गोष्ट उचलून धरली. पुण्यातील सरदार आंबेगावकरांनी हा पेशव्यांचा फतवा जाहीर रित्या फाडला आणि जाळून टाकला. ॐ कारेश्वराच्या प्रांगणात घडलेली ही घटना पेशव्यांच्या कानावर गेली. पेशव्यांनी आंबेगावकरांना पकडण्याची आज्ञा दिली. आंबेगावकर बडोद्याला आश्रयास गेले परंतू पुण्यात मात्र पेशव्यांनी त्यांच्या घरादारावर गाढवाचा नांगर फिरवला.

ब्राह्मणांनी कायस्थांवर घातलेल्या निर्बंधाचा विरोध बळवंतराव मल्हार या हुशार कायस्थाने केला. कायस्थांचे उपनयन, विवाह, श्राद्ध वगैरे विधींवर ब्राह्मणांनी बंदी घातली होती. पुणे, सातारा, कर्‍हाड, सांगली भागात या बंदीमुळे कायस्थांची कार्ये खोळंबली होती. आम्हाला आमची वैदिक कार्ये करण्यासाठी ब्राह्मणांची गरज नाही हे बळवंतरावांनी ज्ञातीबांधवांना सांगितले. स्वत: अग्नीहोत्राची दीक्षा घेतली. कायस्थांच्या खोळंबलेल्या असंख्य लग्न-मुंजी कायस्थ समाजाच्या आचार्यांनी स्वत: लावल्या. या प्रकारामुळे ब्राह्मण खवळले. पुणेरी ब्राह्मणांनी प्रतापसिंग महाराजांकडे कायस्थांच्या विरोधात तक्रारी केल्या. महाराजांनी या तक्रारींना केराची टोपली दाखवली.

१९२८ साली मुंबईचा गव्हर्नर जॉन माल्कम हा छत्रपतींच्या भेटीसाठी सातार्‍याला आला होता. बाळाजीपंत नातू या मराठेशाहीचा झेंडा उतरवण्यास इंग्रजांना मदत करण्यार्‍या भटाने तातडीने सतारा, सांगली, कर्‍हाड, वाई, कोल्हापूर याठिकाणी पत्रे पाठवली, कायस्थ शुद्र आहेत त्यांना अग्नीहोत्र घेण्यापासून परावृत्त करावे या मागणीसाठी १० हजार ब्राह्मणांनी कोरेगाव तालुक्यातील तांदूळवाडी गावात असलेल्या जॉन माल्कमच्या तंबूला वेढा घातला. माल्कमच्या छावणीसमोर कायस्थांच्या विरोधात हे ब्राह्मण घोषणा देत होते. चिंतामणराव सांगलीकर जमावाचे नेतृत्व करीत होते. माल्कमच्या हुजर्‍यांनी ब्राह्मणांच्या ४ ते ५ प्रतिनिधींना आंत बोलावून घेतले. थत्ते, भडकमकर, आबा जोशी, चिमणराव पटवर्धन आत गेले. त्यांनी कायस्थांच्या विरोधात कागाळ्या केल्या. कायस्थांनी धर्म बुडवला असा कांगावा केला. तावातावाने भांडले. जॉन माल्कमनी मात्र आम्ही तुमच्या धर्माच्या बाबतीत निर्णय देणार नाही असे सांगून ब्राह्मणांना हाकलले.

रंगो बापूजी गुप्ते यांचा जन्म आणि मृत्यू या बाबत इतिहासात अधिकृत नोंदी सापडत नाहीत. परंतू मराठेशाही वाचवण्यासाठी रंगो बापूजींनी दिलेला लढा मात्र सर्वांच्या सदैव स्मरणांत राहील. इंग्लंड मधून भारतात परत आल्यावर इंग्रजांनी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अतोनात हाल केले होते. रंगो बापूजी अनेक वर्षे भूमिगत होते. ठाण्याच्या कडवागल्लीत त्यांनी वास्तव्य केले होते. इंग्रज अधिकारी त्यांना पकडण्यासाठी आले असता सोवळ्या विधवा बाईच्या वेषात इंग्रजांना गुंगारा दिला.

ठाण्यातील जांभळी नाक्याला महानगर पालिकेने ठराव संमत करुन “रंगो बापूजी गुप्ते चौक” हे नाव दिले. मध्यंतरीच्या काळात या चौकाला चिंतामणी चौक हे नाव पडले. श्री. सुधाकर वैद्य, शशी गुप्ते, दिनकर बक्षी या समाजधुरीणांना पुन्हा नव्याने या चौकास रंगो बापूजी गुप्ते हे नाव देण्यासाठी पाठपुरावा केला आणि श्री. दत्ता ताम्हणे व सतीश प्रधान यांच्या उपस्थितीत ९ जून २००७ या दिवशी पुन्हा या चौकाचे “श्री रंगो बापूजी गुप्ते चौक” असे नामकरण करण्यात आले. बाळाजी आवजी, बाजी प्रभू, दादजी प्रभू, रंगो बापूजींच्या स्मृतीस अत्यंत कृतज्ञतेने अभिवादन करीत आहोत.

चिंतामणी गंगाधर कारखानीस