Friday, December 10, 2021

पारंपरिक धान्य साठवण - विक्रम यंदे

 आदिवासीबहुल गावांतील समूहांनी पिढ्यानपिढ्या विकसीत केलेल्या धान्य, बियाणे साठवणुकीच्या विविध पद्बती.

महाराष्ट्र्रातील अनेक आदिवासी, दलित, भटके विमुक्त, शेतकरी-शेतमजुर, आदी शेती, वनांशी निगडीत ग्रामीण समूह पुढील वर्षभर पुरेल एवढे धान्य आणि आपली गावरान बियाणं सांभाळून ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धती वापरत आहेत.अकोला,सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये वास्तव्यास असलेला अादिवासी शेतकरी अाजही पारंपारिक पद्धतीने धान्य,बियाणे साठवून ठेवतो. अकोट तालुक्यातील अादिवासी गावांमध्ये बाबूंपासून तयार केलेल्या कणग्यांमध्ये जमिनीपासून काही उंचीवर अशी साठवणूक केली जाते. एक साधारण निरीक्षण आहे. मुख्य रस्त्यांपासून जेवढे आंतवर डोंगर-नदीखोऱ्यात जाऊ तेवढ्या या स्वरूपाच्या पारंपारिक पद्धती आजही वापरात असल्याचे दिसते.

औरंगाबाद जवळच्या खुल्दाबाद तालुक्यातील निरगुडी (ठाकरवाडी) या म्हैसमाळच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ठाकर, भिल आदिवासी वस्ती आणि अगदी कोकणातील सहयाद्रीच्या एखाद्या रांगेवर वसलेल्या उंचावरील गाव-वाडीत धान्य, बि-बीयाणे बांबूपासून केलेल्या व शेणाने सारवलेल्या कणगी, टोपलीत साठवलेले पाहण्यात आले आहे. कृषी अभियंता मुझुमदार यांच्या अभ्यासानुसार बिब्ब्याच्या तेलानं वलवलेल्या बांबू कोठ्या सर्वोत्तम ठरल्या ! त्या काही शतके टिकतात ! त्यात ठेवलेल्या धान्याला दोन तीन वर्षे कीड लागत नाही ! आदिवासी लोक जमिनींच्या छोट्या भागावर शेती करतात. त्यात अनेक प्रकारची धान्ये व कडधान्ये घेतली जातात. वर्षभरासाठी कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय ती साठवली जातात. वापरासाठीचे धान्य आणि पुढल्या वर्षी पेरण्यासाठी बियाणे वेगवेगळे साठवले जाते. बियाण्याला कधीही खाण्यासाठी हातही लावला जात नाही.

पूर्वीच्या काळी गावी विविध धान्यांची साठवण करण्यासाठी बांबूपासून तसेच गवतापासून तयार केलेल्या साधनांचा वापर केला जायचा. ती साधने म्हणजे कणग, तट्टा, फाटा, मुडी, बिवळा इत्यादी. बांबूच्या वस्तू बनविणे हे कौशल्याचं काम असायचं आणि हे काम गावातले काही लोक करायचे. या वस्तू ते भाताच्या (धान्य) मोबदल्यात विकायचे, तर मुडी आणि बिवळा ही गवताची बांधली जायची. हे काम घरातलाच पुरुष करायचा. मका, ज्वारीसारख्या धान्याची संपूर्ण कणसेच माळ्यावर पारंपरिक पद्धतीने टांगून ठेवतात. ती साधारणपणे चुलीच्या वरच्या भागात असतात. चुलीचा मंद धूर आणि उष्णतेमुळे कणसे ओलसर रहात नाहीत, त्यांना बुरशी- कीड लागत नाही. उंदीरही ही कणसे खात नाहीत. उन्हात वाळवलेले धान्य भरले की त्यामध्ये कडुनिंब, निर्गुडी, काळा कुडा इत्यादींची वाळलेली पाने मिसळतात. कणगीत वर्षभर लागणारी ज्वारी आणि गहु साठवत तर गुम्म्यात पुढच्या वर्षी लागणारे बियाणे टाकून कडू लिंबाची पाने,राख टाकून त्याचे तोंड लिंपित असत. सलदात पापड, कुरुड्या, सांडगे, शेवया इ पावसाळ्यात लागणारे पदार्थ ठेवत असत.अजूनही काही वाड्यात गुळाची,मिरच्यांची खोली असे नावे असलेल्या खोल्या आहेत.घरातील संख्या वाढत गेली आणि या खोल्या बेडरूम्स झाल्या पण नावं मात्र तीच राहिली.जे गावातील मोठी घराणी होती त्यांच्या वाड्यात/गढीत बळद किंवा पेव आहेत/होती.आता त्यांना अवकळा आली.कधीकाळी दुष्काळात याच पेवातील धान्य सर्व गावकऱ्यांना जगवणारे होते. कणगी,गुम्मे,बळद,पेव,सलद, हि पारंपारिक साठवण करणारे जिन्नस किंवा जागा आता राहिल्या नाहीत. कणगी,गुम्मे,सलद हे करण्याचे काम कैकाडी बांधव करीत असत.शेती ही व्यवसायिक नसून सालगुजार्नी करण्यासाठी होत असे त्यामुळे ही साधने फार उपयुक्त होती.शेती नगदी पिकांकडे सरकली आणि हि साधने कालबाह्य ठरली.

शहादा तालुक्यात गेली तीसेक वर्षे आदिवासींसोबत काम करणाऱ्या जनार्थ आदिवासी विकास संस्थेने विरपूर, भुते, पिंप्राणी, नागझिरी आणि कोटबांधणी या गावांतील जाणकार भिल, पावरा ग्रामस्थांशी संवाद साधून पारंपरिक ज्ञानाची नोंद केली आहे.
कमीत कमी साधनांत नैसर्गिक हवामानाचा उपयोग करून आदिवासी समाजाने काही सोप्या पण विलक्षण काढणी, प्रक्रिया व साठवण पद्धती शोधल्या आहेत. पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धती वापरून वनोपजाचा शाश्वत वापर केला जातो. शहादा तालुक्यात गेली तीसेक वर्षे आदिवासींसोबत काम करणाऱ्या जनार्थ आदिवासी विकास संस्थेने विरपूर, भुते, पिंप्राणी, नागझिरी आणि कोटबांधणी या गावांतील जाणकार भिल, पावरा ग्रामस्थांशी संवाद साधून पारंपरिक ज्ञानाची नोंद केली आहे.

गावच्या पारंपारिक पद्धतीने धान्य साठवणी आणि आठवणीची काही साधने...
ही तीन-साडेतीन हात उंच आणि दीड ते दोन हात रुंदीची असायची. अर्थात यापेक्षा लहान कणगीसुद्धा असायच्या. भात, तांदूळ, नाचणी इत्यादी धान्यांची साठवण करण्यासाठी वापरली जाणारी ही कणगी बांबूच्या पातळ बेळांनी विणली जायची. नवी कणग वापरण्यापूर्वी ती आतून बाहेरून शेणाने सारवून घेतली जायची. उन्हात चांगली वाळल्यावर तीत धान्य भरलं जायचं. भरून झाल्यावर कणगीच्या तोंडावर गवत पसरवून ते शेणाने लिंपलं जायचं. कणगीत खंडी-दोन खंडी भात मावायचं. त्यापेक्षा लहान कणगीला ‘कणगुल’ असं म्हटलं जायचं.
'कणगी' शेतकऱ्यांची लक्ष्मी जी आता कालबाह्य झालीय गावकडं काही ठिकाणीच हीच हल्ली दर्शन होतेयं.आता पुढच्या पिढीला ही फक्त चित्रात दाखवावी लागेल. धान्य साठवण्याची हिची गरज आता काळाने दुसऱ्या पर्यायांच्या वाट्याला दिली आहे. ही पीढिजात आणि पारंपारिक मापं तसेच साठवण पद्धती आता दिसेनासी झालीय. बळीराजाने सणासुधिला तीला कायम पूजली कारण कायम ती धान्याने भरलेली असावी. पूर्वी घरातील धान्याने भरलेल्या कनगी बघूनच मुलीला त्या घरात दिली जाई. कारण तेवढी त्यांची शेती आणि संपत्ती गनली जाई.
कणग्यांचे अनेक प्रकार आहेत त्यातील काही:

१. नैसर्गिक साधनांनी बनवलेल्या कणग्या :
बऱ्याच देशात आणि भारतात जेव्हा धान्याची साठवणूक मोठया कालावधी साठी करावी लागते तेव्हा ते धान्य हवेतल्या ओळसरपणामुळे कुजनार नाही ह्याची खास काळजी घ्यावी लागते. हे धान्य कोरड्या परिसरात आणि हवा लागेल आशा पद्धतीने साठवले जाते. त्यासाठी लाकडे, बांबू, काट्याकुट्या ह्यांच्या साहाय्याने मोठाल्या कणग्या बनवल्या जातात. वातावरणामुळे लाकडे काट्याकुट्या लवकर सडू शकतात म्हणून एक वर्षात ह्या कणग्या काढून नवीन बनवाव्या लागतात.
पण बांबूच्या कणग्या १२ ते १५ वर्ष चांगल्या साथ देतात. ह्या लाकडी कणग्या पण चौथऱ्यांसारख्याच ठेवल्या जातात. त्यांना जमिनीपासून थोडे वर उचलले जाते. जेणे करून धान्यातील ओलावा कमी करण्यासाठी, ह्यांच्या खाली देखील विस्तव/निखारे ठेवता येऊ शकतील. वरती छप्पर देखील असते पण ते पूर्ण बंद नसते. कणगीच्या आत शेतकऱ्याला उतरता येईल अशा प्रकारे ते छप्पर जर उंचीवर लावलेले असते.
२. छोट्या मातीच्या कणग्या :
कमी धान्याच्या साठवणुकी साठी लहान लहान मातीच्या कणग्या बनवल्या जातात. त्याच्या आतील बाजू शेणाने सारवलेली असू शकते. ह्याची तोंड निमुळते असते आणि झाकण म्हणून वाईन बॉटल चा कॉर्क ज्या लाकडाचा असतो त्या प्रकारचे लाकूड किंवा शेणाची गोलाकार झाकणे वापरतात. वरून कापड दाबून ते झाकण घट्ट बसवण्यात येते. तीळ, डाळी, कडधान्य किंवा तत्सम छोटी धान्ये ज्यांच्या मध्ये १२% किंवा त्याहून कमी ओलसरपणा असतो ती धान्ये कमी प्रमाणात साठवण्यास ह्या कणग्या उपयोगाला येतात.
३.शाडू मातीच्या मोठ्या कणग्या :

काही ‘शे’ किलो ते १० टन इतके धान्य मावण्यास उपयुक्त होतील अशा कणग्या म्हणजे मातीच्या मोठ्या कणग्या. ज्यांची ऊंची आणि रुंदी भरपूर असते. सहसा ह्या वर्तुळाकार असतात.
चौकोनी बनवल्यास त्यांना कोनांमध्ये तडा जाण्याची शक्यता असते म्हणून आकाराने गोलच आणि सिलेंड्रीकल असतात. ह्या कणग्यांच्या भिंतीची जाडी १५-२० सेंटीमीटर असते. ह्या कणग्या धान्य कोरडे ठेवण्यास मदत करतात. ह्याला आतून कप्पे बनवलेले असू शकतात. त्या कप्प्यांच्या भिंतींमुळे पडणारे कोन देखील मातीच्या लेपाने गोलाकार करून घेतले जातात. आतील भिंत गुळगुळीत असते. शाडू मातीने किडे, अळ्या ह्यांना आता अंडी घालण्यास थारा मिळत नाही. ह्या मजबूत असल्याने त्यावर चढून आतील धान्य काढण्यास शेतकऱ्याला सोप्पे जाते. ह्या कणग्यांवरील झाकण वाळलेल्या गवताचे असू शकते. ते उघडझाप करण्यास सुलभ असते. अशा प्रकारच्या कणग्या आफ्रिकेमध्ये आढळून येतात.
४. जमिनीखालील कणग्या :
भारतातील पूर्वापार चालत आलेल्या धान्य साठवणुकीच्या प्रकारातील हा एक महत्वाचा प्रकार म्हणजे जमिनी खालील कणग्या. जमिनीखाली भरपूर प्रमाणात धान्य साठवता येईल अशा परकरचे खड्डे कानून त्याला पक्क्या भिंती बनवून त्यावर लाकडी किंवा मातीचे झाकण लावता येते. ह्यात २०० टन धान्य देखील साठवता येते. जिथे कोरडे हवामान असते, पूर, अतिवृष्टीचा त्रास नसतो अशा प्रभागात हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. इतर साठवणुकीच्या साधनांपेक्षा जमिनीखालील कणग्यांच्या जास्ती फायदे आहेत.

तट्टा
तट्टय़ाला ‘साठी’ असंसुद्धा म्हटलं जायचं. हा रुंद बेळांनी विणला जायचा. याची लांबी-रुंदी साधारणपणे आठ-नऊ फूट बाय पाच-सहा फूट असायची. याच्या अरुंद बाजूची टोके एकत्र करून बांधली की पिंपासारखा मोठा आकार व्हायचा. जिथे तट्टा ठेवायचा असेल तेथे जमिनीवर गवताचा थर पसरवून त्यावर बांधून तयार केलेला तट्टा ठेवला जायचा मग त्यात धान्य भरलं जायचं. याचं तोंड कणगीसारखंच गवत पसरवून शेणाने लिंपलं जायचं. तट्टय़ाचा तळसुद्धा शेणाने लिंपला जायचा. तट्टा बहुधा सधन शेतकऱ्यांच्या घरीच असायचा.
करंड
‘करंड’सुद्धा बांबूपासूनच तयार केलेला असायचा. घट्टविणीचा आणि विरळविणीचा असे यात दोन प्रकार असायचे. घट्टविणीचा करंड हा बहुपयोगी असायचा तर विरळविणीचा करंड फक्त कांदे ठेवण्यासाठी वापरला जायचा. घट्टविणीच्या करंडाचा उपयोग प्रामुख्याने सुक्या मासळीचा साठा ठेवण्यासाठी व्हायचा. मासेमारीच्या वेळी पकडलेले मासे, खेकडे ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग व्हायचा. करंड हात सव्वाहात उंचीचा असायचा. त्याच्या गळ्यात दोरी बांधून तो काखेला लावता यायचा, तसाच टांगूनही ठेवता यायचा.

फाटा
‘फाटा’ म्हणजे मोठय़ा आकाराची पाटी. याचा आकार पाच-सहा टोपल्या धान्य मावेल एवढा मोठा असायचा. ते सारवलेलं असायचं. याचा उपयोग तात्पुरत्या धान्य साठवणी साठी तसेच धान्य वाहून नेण्यासाठी व्हायचा.
मडकी
‘मडकी’ ही घागरीएवढीच आणि घागरीसारखीच असली तरी तिचं तोंड घागरीच्या तोंडापेक्षा मोठं असायचं. ही भात शिजविण्यासाठी, शेक्यांची मुठली उकडण्यासाठी, अंडी उकडण्यासाठी वापरली जात असली तरी तिचा साठवणीसाठीही उपयोग व्हायचा. कैऱ्या खारवण्यासाठी त्या मडकीत मिठाच्या पाण्यात ठेवल्या जायच्या. यालाच ‘खारातले आंबे’ म्हटलं जायचं. कैऱ्या कापून वाळवून केलेली भेतकं, आंबटाचे गोळे ठेवण्यासाठीसुद्धा मडकीचा वापर व्हायचा. घरातली कोंबडी अंडी घालायला लागली की मडकीत अध्र्यापर्यंत तांदूळ भरून त्यात अंडी ठेवली जायची.
मुडी
भात, तांदूळ, नाचणी, कुळीथ यांसारख्या धान्यांची साठवण मुडीमध्ये करण्यात यायची. मुडी ही भाताची मळणी केल्यावर मिळणाऱ्या गवताची बांधली जायची. हे मोठं कौशल्याचं आणि काही वेळा ताकदीचंही काम असायचं. मोठय़ात मोठी मुडी ही दहा कुढवांची बांधली जायची. मुडी म्हणजे गवत आणि दोरी वापरून बियाण्यासाठीच्या धान्याची नैसर्गिकरीत्या साठवण करून ठेवण्याचं एक साधन. आमच्या प्रांतात (सिंधुदुर्गात) त्याला ‘बिवळो’ असंही म्हणत. पूर्वीच्या काळात कोकणातल्या प्रत्येक घरात धान्याच्या अशा मुड्या एकावर एक रचून ठेवलेल्या दिसत. त्या काळात आजच्या सारखी बियाणी बाजारातही नव्हती. ‘वालय’ आणि ‘बेळणा’ ह्या भाताच्या पारंपरिक जाती खूप लोकप्रिय होत्या. ह्या दोन्ही जाती ‘महान’ प्रकारातल्या होत्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या होत्या. या जातीच्या भाताच्या पाच पायली, दहा पायली, एक मण, दीड मण अशा प्रमाणात मुड्या बांधत असत. साधारणपणे एक मणापासून पुढची मुडी बांधण्यासाठी खूप ताकद लागत असे. एखाद्या मुडीतलं भात दोन-अडीच वर्षांपर्यंतही उत्तम स्थितीत राहिलेलं मी पाहिलं आहे.
बिवळा
बळद 

लहान मुडीला बिवळा म्हणत असले तरी हा बिवळा वेगळ्या आकाराचा असायचा. वरकसरीचं कुडू दीड कुडवापर्यंतचं धान्य तसंच काजूबिया ठेवण्यासाठी बांधला जायचा. हासुद्धा गवताचाच असायचा. खुंटीला टांगून ठेवण्यासाठी त्याला गवताचाच बंध असायचा. बिवळा बांधण्याचं काम स्त्रियासुद्धा करायच्या.

तनस
गवत ही जनावरांची वर्षभराची बेगमी असायची. या गवताचा साठा एका जागी ठेवणं आवश्यक असायचं. त्यासाठी गोठय़ाजवळच्या जागेत एक वीसेक हात उंचीचा खांब रोवला जायचा. त्याला सात-आठ हात उंचीचे तीन-चार टेकू लावले जायचे. त्या खांबांभोवती गवत अगदी पद्धतशीरपणे रचलं जायचं. यालाच ‘गवात भरना’ म्हटलं जायचं. गवत भरून झाल्यावर जी रचना तयार व्हायची तिला ‘तनस’ म्हटलं जायचं.
मुस्का
उभट निमुळत्या आकाराचे आणि निमुळत्या तोंडाचे बांबूपासून बनवले जाते. हे मुख्यत्वे तूर, उडीद, कुळीथचे बियाणे साठवण्यासाठी वापरले जाते. बियाणे साठवताना राखेचा वापर केला जातो. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा भागात याचा वापर केला जातो.
माच
पावसाळ्यासाठी लागणारी लाकडं (सरपण), शेणी आणि गुरांसाठी लागणाऱ्या करडाची (रानगवत) साठवण त्यासाठी खास माच रचून एखाद्या पडवीत किंवा खोपीत केली जायची.
टिपरी
बांबूचे लांब व रुंद पोकळ पेर एका बाजूने बंद राहतील अशा प्रकारे कापतात. काकडी, राजगिरा, दुधी भोपळा, तांबडा भोपळा इत्यादींचे बियाणे टिपरीत साठवतात. यात सुमारे १०० ग्राम ते एक किलोपर्यंतचे बियाणे आठ महिने टिकते.
टोपली
बांबूची इंग्रजी U आकाराची टोपली विणून तिला शेणाने लिपतात. यात अळू, करांदे इत्यादी कंद साधारण आठ महिन्यांपर्यंत साठवतात. टोपलीत कंद ठेवून भात पिकाच्या पेंढ्याने/तनसाने टोपली भरून टाकतात वरून शेण आणि मातीने लिंपून घेतात. ही टोपली घरात अंधाऱ्या ठिकाणी ठेवतात.
झिल्ले
झिल्ले हे कणगीसारखेच पण लहान आकाराचे बांबूपासून बनवलेले असते. याची २०० ते ३०० किलो साठवणूक क्षमता असते. यामध्ये नाचणी तसेच तांदूळ साठवणूक केली जाते. यात आठ महिन्यांपर्यंत धान्य ठेवले जाते.
पेव
म्हणजे जमिनीत खोदलेला खड्डा. हा लिंपून घेतलेला असायचा. यातही धान्य साठवायचे. हे पेव वरूनही लिंपून घेत असतं. धान्य काढून घ्यायच्या वेळेला.. हे पेव फोडूनच धान्य काढले जाई. आजही सांगली कोल्हापूर भागात असे पेव पाहायला मिळतात. खोलवर काळी माती असणाऱ्या भागात दगडांची वाण असल्यामुळे पांढऱ्या मातीचा घरांसाठी उपयोग केलेला असे . सधन कुटुंबात पक्की घरे बांधण्यासाठी बैलगाड्यांमधून दूर अंतरावरून दगडे आणून बराच काळ बांधकामात घालवल्यासच ते पूर्ण होई . गोदाकाठी पिकणारे बहुतांशी धान्य म्हणजे शाळू ज्वारी , जमीनदार कुटुंबामध्ये उत्पादनाची क्षमता असे शंभर पोत्यांपासून ते हजार पोत्यांपर्यंत असे . ज्वारी धान्याची विशेषता म्हणजे ते ओलसर जागेत ठेवता येत नाही आणि जिथे ठेवले जाते तिथे अतिशय उष्णता निर्माण होते.
ज्वारीची गुणवत्ता टिकून रहावी व चोरांपासून संरक्षण म्हणून पारंपरिकरीत्या शेतातच ते धान्य सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी भू अंतर्गत व्यवस्था केलेली असे. या तळघराला " पेव ' असे संबोधले जाई ज्याला आजच्या भाषेत शीतगृह असा शब्द वापरता येईल . जमिनीत खोल पाया वजा खड्डा खोदून तो पूर्वीच्या पांढऱ्या मातीने पक्का लिंपून घेतलेला असे . छताची बाजू नांगर / औतास अडकणार नाही एवढ्या खोलीवर पूर्वीच्या माळवदा प्रमाणे मातीने भक्कम करून घेतलेला असे. त्यात उतरताना फक्त एक माणूस लिफ्ट प्रमाणे खाली उतरण्याएवढी जागा फक्त खुली असे ज्यावर मोठा जाड पत्रा टाकून ती बंद करून त्यावर पुन्हा काळी माती टाकून झाकली जात असे.
बऱ्याच वेळेस पेवाचे ठिकाण शोधताना नजर चुक होऊन ते शोधूनही सापडत नसे. असे होईल केव्हा पारंपारिक युक्तीचा अवलंब करून , माणसा परीस जनावरे बरी या म्हणीचा उपयोग करून घेत ! जुने बैल गाडीला जुंपून त्यात एखादे मालाचे पोते टाकायचे व गाडी हाकत शेताकडे नेली की बैल बरोबर पेवाच्या जागेवर जाऊन उभे रहात ! मग तिथे उकरल्यानंतर गुप्त तळघराचे दार उघडे केले जात असे . ठराविक वेळ ते उघडे ठेवून पेटवलेला कंदील त्यात दोर लावून खाली पोहरा प्रमाणे आत सोडून पहावा लागे. जर कंदील विझला नाही तर आतील विषारी वायु बाहेर पडून आत उतरण्यास भिती नाही असे अनुमान ठरवले जाई . पूर्वी काहीजण बेधडक उतरल्याने त्यांचा आत गुदमरून मृत्यू झाल्याची काही उदाहरणे लोकांसमोर होती. मग आत उतरलेला माणूस टोपले भरून छिद्रातून वर ज्वारी द्यायचा व वरच्या लोकांनी ती पोत्यांमधे भरून गाडीत टाकून घरी न्यायची अशी ही अफलातून सुरक्षितता त्या काळात अवलंबली जायची ! आपल्या पुर्वजांचे तसेच गावातील मोठी घराणी त्यांच्यातही वाड्यात, गढीत बळद किंवा पेव होत्या.
बळद म्हणजे घराच्या भिंतीला तिन्ही बाजूंनी मातीच्या विटांचे आयताकृती बांधकाम करून बनवलेली उभट रचना होय. यामध्ये मुख्यत भात/साळची साठवणूक केली जाते. याची उंची ५ ते ७ फुटांपर्यंत असून यामध्ये ५०० किलो ते १००० किलोपर्यंत साठवणूक क्षमता असते. बलदमध्ये ३ वर्षापर्यंत भात/साळ टिकते.
बलदच्या समोरील बाजूस एक लहानसे छिद्र ठेवलेले असते. ज्यायोगे आतील धान्य काढून घेता येते. हे छिद्र शेणमातीच्या मिश्रणाने बंद केले जाते. बलदचा वरचा भागसुद्धा शेणमातीचे मिश्रणाने लिंपून बंद केला जातो आणि शक्यतो तो शेवटपर्यंत उघडला जात नाही. अशा हवाबंद रचनेमुळे ठेवलेले धान्य ओलावारहित आणि कीडमुक्त राहते. अकोले तालुक्यातील कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड परिसरात आजही बलद वापरात आहेत.
बियाणे_साठवणुकीसाठी_दुधीचा_वापर
परिपक्व होऊन व्यवस्थित सुकलेल्या दुधी भोपळ्याला एका बाजूने भोक पाडून त्याच्या आतला गर, तंतू व बिया काढून टाकले जाते. यामध्ये अंबाडी, माठ, भेंडी, खुरासणी, करडई इत्यादीचे बीज राखेत मिसळवून साठवले जाते. दुधीची उघडी बाजू बांबूच्या ठोकळ्याने किंवा मका कणसाचा बुचासारखा वापर करून बंद केली जाते.
झाडांच्या_पानांपासून_पेट्या
नाचणीवर्गीय भरडधान्याची परिपक्व कणसे तसेच साफ केलेले नाचणीचे बियाणे साठवणुकीसाठी साग करवळ, पेटार, चामेलच्या पानापासून पेटीच्या आकाराचे बनवलेले साधन म्हणजे पेट्या. पाने विशिष्ट प्रकारे गुंडाळून त्यामध्ये बियाणे किवा कणसे भरून अंबाडीच्या सालीने बांधले जाते. पेट्या छताला टांगून ठेवतात. यात १ किलो ते ५ किलो र्यंत बियाणे ठेवले जाते.
पूर्वी कोकणातील प्रत्येक घरामध्ये लाकडी किंवा दगडी व्हाईन असायची. या व्हायनीचा उपयोग भात सडण्यासाठी केला जात असे. तसेच मिरच्या कुटण्यासाठी व गरम मसाल्याचे सामान या व्हायनाद्वारे कुटले जात असे. व्हायनात कुटण्यासाठी मुसळीचा उपयोग केला जायचा. ही मुसळ लाकडाची बनवली जात असे. खाली लोखंडाची रिंग बसवली जायची. अशी व्हायने आता फक्त जुन्या घरांमध्येच आपल्याला क्वचित दिसून येतात. आता या व्हायनाची जागा भात सडण्याच्या व मसाला कुटण्याच्या गिरणींनी घेतली आहे.घिरट - जात्यासारखी गोल सुमारे एक मीटर ते सव्वा मीटर व्यास असणारे दगडी घिरट असायचे. या घिरटाचा आतील भाग विशिष्ट प्रकारे कोरून खडबडीत केला जात असे. वरच्या बाजूला भात टाकण्यासाठी मध्ये पोकळ जागा ठेवली जात असे. याचा उपयोग भात भरडण्यासाठी केला जात असे. पूर्वी गिरणीचा शोध लागला नव्हता. त्यावेळी घिरटाचा उपयोग करून भात भरडले जायचे. हे भरडलेले भात नंतर व्हाईनात सडून वापरले जायचे. गिरणींच्या शोधामुळे या घिरटाचा वापर करणे बंद झाले. आता कोकणात क्वचित ठिकाणी अडगळीत टाकलेली घिरट आपल्याला दिसून येते.
शेर/पायली
वस्तूची मोजमाप करण्याचे साधन म्हणजे शेर/पायली. शेर आणि पायली अशी ही दोन लाकडी भांडी पूर्वी गहू, तांदूळ मोजण्यासाठी वापरली जात. मोठा असेल ती पायली आणि त्याखालोखाल शेर असायचा.
टेंभरु/तेंदूपत्ता फळ पिकविण्याची पद्धत
काही आदिवासी अजूनही तेंदुफळाचा आहारात वापर करतात. टेंभूरचे कच्चे फळ तोडून आणतात. जवळ-जवळ दोन खड्डे खोदून एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्यात धूर जाईल अशा पद्धतीने जोडतात. एका खड्ड्यात भाताचा पेंढा आजूबाजूला लावून टेंभुराचे फळ ठेवतात. वरून माती टाकून भाजून टाकतात. दुसऱ्या खड्ड्यातून शेणाच्या गोवऱ्या लावून धूर पहिल्या खड्ड्यात जाऊ देतात. असे तीन ते चार दिवस सकाळ संध्याकाळ धूर देतात. मग नंतर पिकलेले फळ काढून खातात.
अंबाडीचा_पाला व खाटी_फुले
अंबाडी रोपाचा पाला व अंबाडी फळांवरच्या पाकळीसारखे लाल आवरण ( स्थानिक भाषेत खाटी फुले) आदिवासींच्या आहारात बऱ्यापैकी वापरली जातात. फुले विशिष्ट हंगामात येतात त्यामुळे वर्षभर वापरासाठी त्याची विशिष्ट प्रकारे साठवण केली जाते.
अंबाडीचा पानांना व फळांच्या लाल आवरणाला (खाटी फुले) अलगद काढून उन्हात सुकवले जाते. बांबूच्या टोपलीत सागाची चांगली पाने आतल्या बाजूला ठेवून, पाला किंवा खाटी फुले टोपलीत पूर्ण भरून सागाचे पाने वाकवून बांधतात. टोपलीप्रमाणे सागाचा पोटा तयार होतो. त्यानंतर टोपली काढून घेतात. त्या पोटाला घराच्या आडाला किवा दांडीला बांधतात.
हिवाळ्यात, उन्हाळ्यात जेव्हा खाटी भाजी खाण्याची इच्छा असेल तेव्हा त्या सागाच्या पोटाला एक छिद्र पाडून पाला किवा खाटे फुले काढून घेतात. नंतर त्या छिद्राला कपड्याचा बोळा लावून देतात. अशा पद्धतीने साठवण करून ठेवतात.

कडाया किंवा भुत्या ( Sterculina urens) हे जंगलात सापडणारे पांढऱ्या खोडाचे वैशिष्ट्यपूर्ण झाड. झाडाच्या सालीपासून दोरही तयार करत असत. लोक सांगतात की, ५० वर्षांपूर्वी दुष्काळाच्या काळात या झाडाचा डिंक विकून आपला ते उदरनिर्वाह करत होते. डिंक देऊन त्याबदल्यात खाण्याच्या वस्तू घेत होते. डिंक काढण्याची पद्धत म्हणजे झाडाला आदल्या दिवशी दोन तीन ठिकाणी कुऱ्हाडीने घाव घालायचे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर जाऊन डिंक गोळा करायचा. यासाठी लोक कधीकधी दोन दिवस जंगलातच मुक्काम करायचे. अस्वल आणि वाघाच्या भीतीमुळे ते झाडावर रहायचे.
आता धान्य साठवण करून ठेवण्याइतपत शेतीही कुणी करत नाही. दीड-दोन खंडी भात पिकवणारा शेतकरी आज ‘मोठा’ शेतकरी समजला जातो. याशिवाय गावोगावी भात भरडण्याच्या मोठमोठ्या गिरण्या उपलब्ध असल्याने धान्याची साठवणही कुणी करत नाही; मात्र बालपणी पाहिलेल्या नि उपभोगलेल्या वस्तू कालौघातही पटकन विसरता येत नाहीत. तसेच कोकणातल्या खेडय़ांचंही झपाटय़ाने शहरीकरण होत आहे.यातलं आता आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही. धान्य साठविण्यासाठी पारंपारीक ऐवजी आता फायबरची भांडी सुद्धा वापरतात.

कोकणच्या ग्रामीण भागात पूर्वी सर्व प्रकारची धान्ये साठविण्यासाठी बांबूपासून तयार केली जाणारी साधने वापरली जात होती. याच बरोबर धान्य म्हणजेच विशेषता भात भरुन ठेवण्यासाठीलाकडी कोठाराचा वापर होत असे . बदलत्या काळात बांबूची ही साधने दृष्टीआड झाली असून त्यांची जागा प्लास्टिक आणि फायबरच्या भांड्यांनी घेतली आहे . काळाबरोबर होत जाणारे बदल जरी गरजेचे असले तरीही जुन्या परंपरा आणि कला दृष्टीआड करणारे आहेत हे नाकारून चालणार नाही . ग्रामीण भागातील वळप कारागिरांची कमी झालेली संख्या हे देखील यामागील महत्वाचे कारण आहे .
बांबू मधील माणा या जातीच्या बांबू पासून बिळसे काढून त्याद्वारे परडी,हारे,गोवरहारे,कणगी, कोंबड्यासाठी जाळी असणारे विशिष्ट आकाराचे हारे , सुपं , रोवळ्या आदि वस्तू मोठ्या प्रमाणावर बनविल्या जात . ग्रामीण भागात प्रत्येक घरात एका व्यक्तीला ही वळप कला अवगत असायची . घरातील अन्य माणसांनी अन्य कामासाठी मदत केली की, वळपाचे मुख्य काम वळप कारागीर करत असे . सर्वांच्या मदतीने घरात आवश्यक असणाऱ्या वस्तू घरच्या घरी तयार होत असत . कोकणात सर्वत्र घरपरड्यात बांबू सहज उपलब्ध होत असल्याने त्यासाठी देखील पैसे मोजण्याची गरज भासत नसे. लागवडीच्या पध्दती बदलल्या आणि काहीसा उष्ण असणाऱ्या बांबूच्या जागी फळं देणाऱ्या झाडांची लागवड करण्यात आली आणि सहजी उपलब्ध होणारा बांबू शोधून आणण्याची परिस्थिती निर्माण झाली. घरोघरी असणारे वयोवृद्ध वळप कारागीर निवर्तल्या नंतर त्यांच्या कडून सुशिक्षित होणाऱ्या पुढच्या पिढीने ही कला आत्मसात न केल्याने या कलेत खंड पडला. याबरोबरच भातासह अन्य कडधान्ये साठविण्यासाठी आता मोठ्या आकाराची प्लॅस्टिक अथवा फायबरची भांडी परवडणाऱ्या किंमतीत सहज उपलब्ध होत असल्याने बांबू पासून तयार केल्या जाणाऱ्या साठवण साधनांचा वापर जवळपास संपूष्टात आला आहे. सध्या सूपं आणि रोवळ्या यांचा घरोघरी अजूनही वापर सुरु असल्याने आठवडा बाजारच्या दिवशी या वस्तू विक्रीसाठी आणल्या जातात . मात्र याचे दर आता गगनाला भिडले आहेत. कुटूंब विस्तारल्यानंतर शेतीची विभागणी झाल्याने धान्य साठविण्यासाठी लाकडी कोठारची असणारी गरज संपूष्टात आली. याबरोबरच लाकडी कोठार ठेवायचे म्हणजे तेवढी जागा उपलब्ध करणेही अशक्य झाल्याने घराघरात लाकडी कोठारांच्या जागी फायबरची निळी पिंप उभी असल्याचे पाहायला मिळते . वाळवीचे प्रमाण वाढले असल्याने बांबूची ही जूनी साधने वाळवी पुढे तग धरु शकत नाहीत. यासाठी दणकट आणि कायम स्वरुपी टीकाऊ अशा प्लॅस्टिक आणि फायबरच्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. पूर्वी सहज उपलब्ध होणारा बांबूतील माणा हा प्रकार आता शोधावा लागत आहे. याबरोबरच एका माण्यासाठी ऐंशी ते शंभर रुपये मोजावे लागतात . एक मोठा हारा बनवायचा झाला तर पूर्ण एक दिवस लागतो आणि यासाठी दोन बांबूची गरज भासते . दिवसाला एका व्यक्तीचा ५०० रुपये रोज धरला आणि हाताखालच्या कामगाराला ३०० रुपये दिले तर , बांबूपासून एका मोठ्या हाऱ्याच्या निर्मितीचा खर्च बरोबर एक हजार रुपयांच्या घरात जातो. जर दोनशे रुपये कमीतकमी नफा मिळवायच्या हेतूने जर मोठ्या हाऱ्याची किंमत १२०० रुपये सांगितली तर घेणारे चेष्टा करतात. या उलट फायबरचे एक पिंप सहाशे ते सातशे रुपयांना सहज विकत मिळते . यामुळेच बांबूच्या पारंपारिक साठवण वस्तूंचा वापर आता संपूष्टात आला आहे. आठ पंधरा दिवस चालणारे खळे गेले थ्राशर्स, हार्वेस्टर मशीन गावोगावी आल्या आणि राशीही इन्स्टंट होऊ लागल्या.गावात वाहने भरपूर झाली म्हणून खळ्यातून माल थेट यार्डात पोहचू लागला आणि साठवण करणारी साधने कालबाह्य ठरत गेली.गॅस आल्यामुळे वर्षभर लागणारे सरपण आणि गोवऱ्या रचून केलेले उडवेहि गायब झाले.
अशा अभ्यासांचे खुप महत्व आहे. पण त्याचवेळी नवे तंत्रज्ञान आणि शिक्षण जसजसे अशा ठिकाणी पोचत जाईल तस तश्या निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या पद्धती लोप पावत जाणार आहेत. ही सर्व प्रक्रिया घडताना दिसत आहे. शिक्षणाचे महत्व खुपच आहे. पण हे पारंपारिक ज्ञान-अनुभव, पद्धती हे जरी नष्ट होत असले तरी त्याचे सर्व प्रकारचे documentation, अभ्यास करण्यात येथील विद्यापीठं कमी पडत आहेत असेच म्हणावे लागत आहे.
"बायफ" संस्थेने अशा पद्धतींचा ठाणे जिल्ह्यापासून गडचिरोली जिल्ह्यातील पार आतल्या गावापर्यंतच्या अशा पद्धतींचा अभ्यास केला आहे.
सवाल हाच आहे हा इतिहास-वस्तू-सर्जनशील संस्कृती कशी जपायची? वा तिचे खरं म्युझियम कसे उभारायचे? जेणे करून हा खरा इतिहास नोंदविला जाईल.
"गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी.. "प्रमाणे ज्यांना माहीत नाही त्यांना प्रत्ययाचा आणि माहीत आहे त्यांना पुनप्र्रत्ययाचा अनुभव देण्यासाठी विविध माध्यमांतून ह्या लेखाचे संकलन केले आहे.
विक्रम यंदे, मुंबई
9833988166
ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशन

Friday, December 3, 2021

अद्वैत वेदांत : माया

परवाच्या माझ्या अद्वैत वेदान्ताच्या पोस्टवर काही मित्रानी प्रतिक्रिया व्यक्त केली की 'हे सर्व सैद्धांतिक दृष्ट्र्या पटते, पण अनुभवाला येत नाही. याला कारण काय असावे? यावर उपाय काय?' हे विश्व म्हणजे ब्रह्म आहे हे आपण मागील लेखात पहिलेच. आसपासचे विश्व सत्-चित्-आनंद रुपी ब्रह्म आहे. पण ते सहज लक्षात येत नाही. कारण त्यावर मायेने 'पांघरूण' टाकलेले असते. याच 'माया' संकल्पनेचा आपण आज विचार करणार आहोत. माया ही संकल्पना समजण्यास थोडी कठीण आहे. पण आपल्या वाचकांना ती समजेल असा विश्वास आहे. मायेचे पांघरूण म्हणजे काय आणि त्या आडून डोकावणारे ब्रह्म कसे ओळखायचे हे या लेखात पाहू.

आसपास आपल्याला अनेक वस्तू दिसतात, अनेक जीव दिसतात, आपले शरीर दिसते, आपल्या मनाची जाणीव होते, आपल्या चैतन्याची जाणीव होते. त्यामुळे हे सर्व खोटे आहे असे म्हणायला आपण धजावत नाही. आसपास जे विश्व दिसते ते खोटे आहे असे अद्वैत वेदांतही म्हणत नाही. आपल्या जाणिवेच्या विविध पातळ्या आहेत. त्यातील व्यावहारिक पातळीवर आसपास दिसणाऱ्या वस्तू, माणसे ही खरीच आहेत. परंतु वेगळ्या पातळीवरून पाहिल्यास हे विश्व आभासी आहे असे हे तत्वज्ञान सांगते. जाणिवेच्या या विविध पातळ्यांचे विवेचन मांडुक्य उपनिषदांत आले आहे. तो मोठा विषय आहे. त्यासंबंधी आपण एका स्वतंत्र लेखात विचार करू.  या लेखात केवळ माया, मायेचे पांघरुण आणि त्या पांघरुणाआडून डोकावणारे ब्रह्म याचाच विचार करू. 

एक सोन्याचा नेकलेस आहे. त्यातून सोने काढले तर त्या नेकलेसला अस्तित्व नसेल. तो वितळविला तर सोने उरेल, नेकलेस राहाणार नाही. त्या सोन्यापासून आपण पाटल्या बनवू शकू. याचाच अर्थ तो नेकलेस अथवा पाटल्या हे वस्तूत:  केवळ सोने आहे. नेकलेस अथवा पाटल्या हे त्या सोन्याला दिलेले रूप आहे. त्या रुपामुळे आपल्याला ते व्यवहारात वापरता येते. त्या सोन्याला आपण 'नेकलेस' अथवा 'पाटल्या' हे नाव दिलेले आहे. या नाम-रुपामुळे आपल्याला मूळचे सोने असलेले 'नेकलेस' आणि 'पाटल्या' वेगळे भासतात. त्यांचा व्यवहारात वेगळा 'उपयोगही' करून घेता येतो. परंतु खोलवर पाहता ती एकच वस्तू आहे - ते केवळ सोने आहे. तसेच हे विश्व म्हणजे सत्-चित्-आनंद रुपी ब्रह्म आहे. त्यावर मायेने नाम-रूपाचे पांघरूण टाकले आहे. 

मायेच्या या पांघरूण टाकण्याच्या शक्तीला 'आवरण शक्ती' असे नाव आहे. मायेची ही आवरण शक्ती ब्रह्मरूपी विश्वावर नाम-रूपाचे पांघरूण टाकत असली तरी ब्रह्माला पूर्णपणे झाकू शकत नाही. यातून ब्रह्म डोकावत असतेच. अंधारात दोर (रज्जू) पडलेला असताना तो साप समजून आपण घाबरतो. पण या काल्पनिक सापाचा आकार, लांबी त्या दोराकडून आलेली असते. ती झाकली जात नाही. तो दोर आहे ही वस्तुस्थिती झाकली जाणे ही झाली 'आवरण शक्ती'. परंतु तेथे साप नसताना तो आहे असा भास होणे हे झाले 'विक्षेप शक्ती'चे उदाहरण. माया ही ब्रह्माची एक शक्ती आहे. तिच्यात 'आवरण शक्ती' आणि 'विक्षेप शक्ती' या दोन शक्ती अंतर्भूत आहेत. 

या विश्वातील प्रत्येक गोष्टीत 'सत्' म्हणजेच अस्तित्वरुपी ब्रह्म आहेच. जसे नेकलेसमधून सोने काढून घेतले तर तो नेकलेस राहणार नाही तद्वतच एखाद्या गोष्टीतून अस्तित्व काढले तर ती वस्तू राहणार नाही. जसा नेकलेस हा नाम-रूपाचे आवरण घातलेले सोने आहे तसेच हे विश्व हे नाम-रूपाचे आवरण घातलेले ब्रह्मच आहे.

विश्वाचे हे ब्रह्मरूपी स्वरूप आपल्या लक्षात येण्यासाठी अत्यंत स्थिर चित्ताची आवश्यकता आहे. चित्त स्थिर करण्यासाठी ध्यानमार्ग आणि भक्तिमार्ग हे दोन मार्ग सांगितलेले आहेत. यापैकी कोणत्याही मार्गाने चित्ताची स्थिरता प्राप्त करता येते. जसजसे चित्त स्थिर होत जाईल तसे काही क्षण या विश्वरूपी ब्रह्माची जाणीव होऊ लागते. हळूहळू हा कालावधी वाढत जातो.

पण काही जणांचे चित्त भक्तिमार्गाने अथवा ध्यानमार्गाने प्रवास करूनही स्थिर होऊ शकत नाही. याचे कारण म्हणजे मनाची मलिनता. मलीन मन असताना चित्त कधीही स्थिर होऊ शकत नाही. ही मनाची मलिनता दूर करण्यासाठी अनेक पद्धती सांगितल्या गेल्या आहेत. राजयोगात यमनियम आहेत. गीतेत 'कर्मयोग' आहे. कोठलीही अपेक्षा न ठेवता समाजसेवा केली तरी मनाची मलिनता दूर होते.

आपल्या सर्वांना मायेचे आवरण बाजूस सारून या विश्वाचे ब्रह्मस्वरूप अनुभवास येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

ईशावास्योपनिषदातील शांतीमंत्राने या प्रदीर्घ लेखाची सांगता करूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

*************************************************


अद्वैत वेदांत

अद्वैत वेदांत हे दर्शन अन्य कोणत्याही दर्शनापेक्षा अथवा पाश्चात्य धर्मांपेक्षा क्रांतिकारी आहे. हे दर्शन आपल्याला देव कोठे अन्य ठिकाणी (स्वर्ग, देऊळ, चर्च, मशीद  इत्यादी) असल्याचे सांगत नाही, देव तुम्हाला भविष्यात भेटण्याची (मृत्यूनंतर, काही कर्मकांडे केल्यावर, प्रार्थना केल्यावर) हमी देत नाही. देव तुमच्यासाठी काही सुख भविष्यात देईल असे अमिष दाखवीत नाही, तुम्ही काही कर्मकांडे न केल्यास दु:खाचे डोंगर कोसळतील अशी भीती दाखवीत नाही.  हे दर्शन तुम्हाला काही अलौकिक अनुभव देण्याची हमी देत नाही. तुमच्या नेहमीच्या अनुभवाचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करून प्रथम आपण ब्रह्म असल्याचे दाखवून देण्याचे काम हे दर्शन करते. नंतर केवळ आपणच नव्हे तर हे विश्व ब्रह्म  असल्याचे हे दर्शन दाखवून देते. आसपासचे विश्व ब्रह्म असून त्यावर मायेने नाम-रूपाचे पांघरूण घातलेले आहे. या नाम-रूपाआडून सत्-चित्-आनन्द रुपी ब्रह्म डोकावत असते. हे ब्रह्माचे स्वरूप ओळखायचे कसे हे ही हे दर्शन शिकविते. म्हणूनच मला हे दर्शन क्रांतिकारी वाटते. 

आजवर मी अद्वैत वेदांतासंबंधी बरेच लिहिले आहे. परंतु ते प्रामुख्याने या दर्शनाच्या विविध प्रकरण ग्रंथांच्या ((Introductory Text) टिपणी (नोट्स) या स्वरूपात होते. प्रथमच मी या विषयावर स्वतंत्रपणे लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. विषयाचा आवाका प्रचंड आहे. हा विषय संक्षिप्तपणे आणि तरीही सामान्यांना समजेल अशा भाषेत मांडणे ही तारेवरची कसरत आहे. पण सध्याचे युग हे अति जलद युग आहे. कोणालाही मोठे ग्रंथ वाचण्यास अथवा विस्तृत विवेचन वाचण्यास वेळ नाही. म्हणून हा प्रयत्न करून बघणार आहे. 

अद्वैत वेदांत दर्शन हे सहा प्रमुख हिंदू दर्शनांपैकी सर्वात अर्वाचीन दर्शन आहे. भारत बौद्ध दर्शनाच्या प्रभावाखाली जात असतानाच आद्य शंकराचार्यांनी अद्वैत हिंदुत्वाचा प्रसार करून भारतीय जनतेला उपनिषदांची नव्याने ओळख करून दिली. जरी आद्य शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताची शास्त्रशुद्ध मांडणी प्रथमच केली असली तरी त्यापूर्वी त्यांचे आजेगुरु (गुरूंचे गुरु) गौडपादाचार्य यांनी त्यांच्या मांडुक्यकारिका (मांडुक्य उपनिषदावरील टीका) या ग्रंथातून या दर्शनाची बीजे रोवली होती. 

सहा प्रमुख दर्शनांत पूर्वमीमांसा (अथवा मीमांसा) आणि उत्तरमीमांसा (अथवा वेदांत ) ही दोन दर्शने आस्तिक दर्शने मानली जातात. आस्तिक याचा अर्थ वेदप्रामाण्य मानणारी दर्शने. ही दोन दर्शने वेदप्रामाण्य मानणारी असली तरी त्यांच्यात खूप फरक आहे. यज्ञयाग आणि अन्य पूजाविधींच्या साहाय्याने देवतांना प्रसन्न करून घेणे आणि त्याद्वारे भौतिक आणि पारलौकिक सुखे मिळविणे हा पूर्वमीमांसकांचा (मीमांसकांचा) उद्देश आहे. म्हणूनच वेदातील तत्वज्ञानाचा भाग -अर्थात उपनिषदे- मीमांसक दुय्यम समजतात. या उलट वेदान्तिक आणि त्यातही अद्वैत वेदान्तिक उपनिषदांना महत्व देतात, तर वेदातील कर्मकांडाला दुय्यम महत्व देतात. 

अद्वैत वेदांत उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवतगीतेवर आधारलेले आहे. त्यांना अद्वैत वेदांतात 'प्रस्थानत्रयी' म्हणतात. १०८ प्रमुख उपनिषदांपैकी दहा (अथवा अकरा .. याबद्दल मतभेद आहेत) उपनिषदांवर आद्यशंकराचार्यांनी टीका लिहिली आहे. म्हणून ही दहा उपनिषदे प्रमुख मानली जातात. या दहा उपनिषदातही 'मांडुक्य उपनिषद' हे महत्वाचे आहे. हे सर्वात लहान उपनिषद असून अर्थवाही आहे. त्यावर अद्वैत वेदान्ताच्या अनेक भाष्यकारांनी टीका लिहिली आहे.