Wednesday, June 27, 2018

मेंदूचा default mode

डॉ. यश वेलणकर यांचा मनपूर्वक अभारासाहित पुनरप्रकाशीत

तुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे असे पाहिले आहे का..??🤔🤔

तशी शक्यता खूप कमी आहे. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग सतत काम करीत असतो. माणूस शांत बसलेला असतानादेखील हा भाग शांत होत नाही. हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि आपल्याला वरील सर्व आजार होतात...!!

आपण शांत बसलेले असताना देखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’असे नाव दिले आहे..!!

कॉम्प्युटर सुरू केला की याच मोडमध्ये तो सुरू होतो. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठराविक भाग असा असतो जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो..!!

डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो; पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की, या भागातील सक्रियता कमी होते असे त्यांनीच दाखवून दिले..!!

आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते, शरीर स्थिर असले तरी मन इतस्तत: भटकत असते..!!

आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे; पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नैराश्याचा शिकार होतो..!!

मेंदूतील या भागाला विश्रांती कधी मिळते, माहीत आहे..??🤔🤔

माणूस एखादी शरीर कृती लक्ष देऊन करू लागतो किंवा तो शरीराने काम करीत नसला तरी माइंडफुल असतो, सजग असतो त्यावेळी मात्र हा भाग शांत होतो आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क (टीपीएन)सक्रिय होते. श्रमजीवी माणसात ज्यावेळी त्यांचे त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष असते. त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडी विश्रांती मिळते..!!

कुंभार त्याचे मडके तयार करीत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील हा मोड बदलला जात असतो. कारण मडके करण्याच्या कृतीवर त्याला एकाग्र व्हावे लागते..!!

बुद्धिजीवी माणसात मात्र असे होत नाही, शिकवताना, हिशेब करीत असताना किंवा कॉम्प्युटरवर काम करीत असताना मेंदूत विचार असतातच. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटत असता त्यावेळी मेंदूतील विचार चालूच राहतात आणि डिफॉल्ट मोड काम करीतच राहतो. मग त्याला विश्रांती कशी मिळेल..??

सजगतेने आपण ज्यावेळी श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल जाणतो किंवा त्याक्षणी येणाऱ्या बाह्य आवाजावर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी डिफॉल्ट मोड शांत होतो. माणूस श्वासाचा स्पर्श जाणू लागतो त्यावेळी त्याच्या मेंदूतील टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क काम करू लागते...!!

आपल्या मेंदूच्या लँटरल प्री फ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते...!!

विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्ये आहे; पण सतत येणारे विचार मेंदूला थकवतात, तो थकवा दूर करण्यासाठी काही काळ हा "डिफॉल्ट मोड" बदलणे आवश्यक आहे..!!

त्यासाठीचा एक साधा उपाय करून पहा..!!

शांत बसा, एक हात छातीवर, दुसरा पोटावर ठेवा. तुम्ही काहीही करीत नसलात तरी तुमचे शरीर श्वासोच्छ्वास करते आहे. त्यामुळे छाती किंवा पोट हलते आहे. तुमचे सर्व लक्ष तुमच्या हातांवर ठेवा आणि नैसर्गिक श्वासामुळे छाती अधिक हलते आहे की पोट हे जाणा..!!

ज्यावेळी ही हालचाल समजते त्यावेळी तुमच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड शांत झालेला असतो, त्याला विश्रांती मिळत असते. जो श्वास तुम्हाला समजतो तो चांगला श्वास, गुड ब्रेथ..!!

असा गुड ब्रेथ मेंदूला ताजेतवाने करतो. दिवसभरात किमान तीन-चार वेळा श्वासाची हालचाल जाणायची असे ठरवता येईल??

अर्धा मिनिट, एक मिनिट, पाच - दहा श्वास, त्यावर लक्ष केंद्रित केलेत की मेंदूतील डिफॉल्ट मोडला विश्रांती मिळून तुम्ही ताजेतवाने व्हाल. किती साधा आणि सोपा उपाय आहे.!!

फक्त त्याची आठवण होणे थोडेसे अवघड आहे. दर दोन तासांनी काही सजग श्वास घ्यायचे असा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करून पहा आणि

.......!!👍👍👍

Friday, June 15, 2018

ईशावास्य उपनिषद -4

ईशावास्य उपनिषद हे 'कर्मयोग' सांगते हे आपण पहिल्या लेखात पहिले. गीतेतील कर्मयोगाचे हेच उगमस्थान असावे. या उपनिषदात अनेक परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्या नीट समजून घ्याव्या लागतात.
या उपनिषदात फलाची अपेक्षा न करता कर्म करावे असे सांगितले आहे. परंतु या जगात मृत्यूपर्यंत सकाम कर्म करावे लागते असे सांगत त्याचाही निषेध केलेला नाही. निष्काम कर्म अधिक चांगले हे मात्र सांगितले आहे. निष्काम कर्म आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून अर्थात भवचक्रातून सोडविण्यास उपयुक्त ठरते असे हे उपनिषद सांगते.
इंद्रियांच्या (आवश्यकतेपेक्षा अधिक) तृप्तीसाठी  कर्मे करणारा माणूस अंध:कारात जातो. परंतु केवळ अहंकाराच्या पूर्तीसाठी कर्मे करणारा माणूस घोर अंध:कारात जातो असे हे उपनिषद सांगते.
उपनिषद ब्रह्माच्या दोन रुपांसंबंधी सांगते. एक प्रकट रूप आणि दुसरे अप्रकट. या दोन्ही रूपांची आराधना केली जाऊ शकते. परंतु या दोन्ही आराधानेची फले वेगळी असतात. प्रकट रूपाची आराधना मृत्युपर्यंत फळे देते. परंतु अप्रकट रुपाची आराधना मृत्युनंतरही फले देते.
सत्य हे सुवर्णाच्या झाकणाने झाकलेले असते असे हे उपनिषद सांगते. सत्य समजून घ्यायचे असेल तर सुखदु:खापलीकडे जावे लागते. परंतु मनुष्य सुखाचा अनुभव सोडायला तयार नसतो. या अनुभवाची तो पुन:पुन: प्रतीक्षा करतो. हेच ते सुवर्णाने झाकलेले सत्याचे मुख. सुखाच्या अनुभवालाही दूर लोटून माणूस पुढे जातो तेव्हाच त्याला शाश्वत सत्याचा बोध होतो.
सर्व ईश्वराचेच आहे, 'माझे' म्हणण्यासारखे जगात काहीच नाही. म्हणून 'ममत्वाला' काहीच अर्थ नाही. 'मी' हा 'माझे' भावनेवर पोसलेला असल्याने 'मी'पणाही निरर्थक आहे हेच हे उपनिषद आग्रहाने सांगते.

Saturday, June 9, 2018

ईशावास्य उपनिषद -३

'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |' हे ईशावास्य उपनिषदातील पहिल्याच श्लोकात आलेले महत्वाचे सूत्र. पाश्चिमात्य पद्धतीत प्रथम निरनिराळे तर्क देऊन शेवटी आपल्याला काय म्हणायचे आहे तो निष्कर्ष म्हणून पुढे ठेवला जातो. पौर्वात्य पद्धत वेगळी आहे. येथे सुरुवातीलाच निष्कर्ष ठेऊन नंतर त्याचे निरुपण केलेले दिसते. पाश्चिमात्य पद्धत म्हणजे माणूस एक दिवा घेऊन वाटचाल करीत आहे. त्याला फक्त आपल्या पावलासमोरचे दिसते. अशी हळूहळू मार्गक्रमणा होत शेवटी निष्कर्षाला येतो. पौर्वात्य पद्धत म्हणजे एका क्षणी वीज चमकते. संपूर्ण आसमंत नजरेच्या टप्प्यात येतो. नंतर तो माणूस त्याचे वर्णन करतो. म्हणूनच या उपनिषदात जे सांगायचे आहे ते पहिल्याच श्लोकात सांगून हे उपनिषद त्याचे निरुपण करते.
'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |' याचा शब्दश: अर्थ 'जो त्यागतो तोच भोगतो' असा आहे. वरकरणी विरोधाभासी वाटणारे हे विधान आहे. हे उपनिषद अशाच विरोधाभासी विधानांनी परिपूर्ण आहे, म्हणूनच समजण्यास कठीण आहे. अनेकजण 'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |' या विधानाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावताना दिसतात. काहीजण याचा अर्थ आवश्यक तेवढ्याच गोष्टींचा निर्लेपपणे भोग घ्यावा असे सांगतात. काहीजणांच्या मते याचा अर्थ दुसऱ्यांच्या धनावर आपली दृष्टी ठेऊ नये असा आहे.
मला वाटते या सूत्राचा अर्थ त्याच श्लोकातील सुरुवातीच्या सूत्रात दडलेला आहे.
ईशावास्यमिदम् सर्वम् यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद् धनम् ।। १ ।।
हा तो पूर्ण श्लोक आहे. स्लोकाची सुरुवातच 'ईशावास्यमिदम् सर्वम्' या घोषणेने होते. जर सर्व विश्व हे ईश्वराचेच आहे, तर माझे काहीच रहात नाही. मग मी त्याग कसला करणार? आणि अन्य लोकांकडे असलेल्या धनाची अपेक्षा तरी कशी करणार? जर याच भावनेने आपण या जगात वावरलो तर आपल्यावर कसलेच दडपण/ताण येत नाहीत. मन हलके होते. जीवनातील आनंदाचा आपण पूर्णपणे उपभोग घेऊ शकतो. जर हे जीवन आहे तसेच स्वीकारले, 'अहोभावाने' (धन्यावादपूर्वक....ईश्वराला धन्यवाद देत) स्वीकारले तर आयुष्यात एक असीम शांतीचा जन्म होतो. या शांत मानसिकतेत आपण जे काही घडत आहे त्याचा आनंदाने उपभोग घेऊ शकतो.
एक झेन कथा आहे. एक माणूस एकदा एका झेन फकिराकडे गेला आणि विचारू लागला "मी एवढा अशांत आहे आणि आपण शांत आहात हे कसे काय?" तो फकीर म्हणाला "कारण तू अशांत आहेस आणि मी शांत आहे". तो माणूस म्हणाला "तुम्ही कसे शांत झालात हे सांगा". फकीर म्हणाला "तू अशांत कसा झालास हे प्रथम मला सांग." तो माणूस उत्तरला "मी असाच आपोआप अशांत झालो." साधू उत्तरला " मीही असाच आपोआप शांत झालो. मी स्वत: काहीच करत नाही. ईश्वराने जे 'दिले आणि दिले नाही' ते काहीतरी कारणासाठी असेल हे समजून मी त्याला धन्यवाद देतो. अशांती आली तर मान्य करतो की मी अशांत आहे. शांती आली तर तेही मान्य करतो. जर मी अशांतीत शांत होण्याचा प्रयत्न केला तर मी अधिक अशांत होईन. जे माझ्याकडे नाही ते मिळविण्याचा प्रयत्नच मला अशांत करेल."
'ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान' हे सांगताना संत तुकारामांना असेच काही म्हणायचे असेल काय?
या पुढील लेखात ईशावास्य उपनिषदातील अन्य काही श्लोक पाहू.

Wednesday, June 6, 2018

मंगेश पा(प)डगावकर

फार फार वर्षापुर्वी लिज्जत कंपनीच्या लक्षात आले की पावसाळ्यात पापडांची विक्री जवळ-जवळ होतच नाही. कंपनीचा आर्थिक डोलारा कोलमडू नये म्हणून एक तज्ज्ञ समिती नेमण्यात आली. या कमिटीने बरेच पापड फस्त केल्यावर उपाय सूचविला तो म्हणजे कविता पाडायचा ! लोक कविता वाचता-वाचता पापड खातील , त्यांना आपण अशी सवयच लावायची ! लिज्जतने तो अहवाल स्वीकारला व कविता पाडण्याचे कंत्राट कोणाला द्यायचे यासाठी एक उच्च स्तरीय समिती नेमली. अनेक पावसाळॆ कोरडे गेल्यावर एकदाचे या समितीने एक नाव नक्की केले ते म्हणजे पा(प)डगावकर !
लिज्जतने मग पाडगावकरांबरोबर करारच करून टाकला की पाडगावकरांनी पाउस पडताच एक कविता पाडायची, पावसाचे आगमन झाले रे झाले की लिज्जतने आपल्या पापडाच्या जाहिरातीत ती कविता वापरायची, अगदी दरवर्षी ! पहिल्याच वर्षी ही कल्पना चांगलीच चालली ! जाहिरात प्रसिद्ध झाल्या झाल्याच कंपनीचे सगळॆ पापड हातोहात खपले ! पाऊस, पापड व पाडगावकर हे समीकरण अगदी फिट्ट बसले. पुढच्या वर्षी तर पावसाने अटच घातली की आधी पाडगावरांना कविता पाडू दे मगच मी पडतो ! मग पुढची काही वर्षे आधी पाडगावकर पावसाला कवितेतून “ये रे ये पावसा “ म्हणायचे व पाऊस लगेचच धावून यायचा ! लोकसुद्धा याला सरावले. म्हणजे आधी जून महिना लागला की छत्री, रेनकोट यांची खरेदी सुरू व्हायची, आता लोक पाडगावकरांनी पावसाला साद घातली की मगच या खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले. खरे-खोटे पाडगावकर जाणोत पण या वस्तू विकणारे उत्पादक सुद्धा पाडगावकरांवर वॉच ठेवून स्टॉक बाजारात आणू लागत असे म्हटले जात असे. पाडगावकरांच्या पाऊस कवितेची लोकांना एवढी सवय झाली की लोक “आधी पडते पाडगावकरांची कविता, मग पडतो पाऊस” असे म्हणू लागले. ज्या भागात दुष्काळ पडतो त्या भागात सरकारच आपल्या खर्चाने पाडगावकरांच्या पाऊस कविता छापू लागली व मग तिकडे धो धो पाऊस कोसळू लागला. पुढे मग भारतातील सर्व प्रमुख भाषांत पाडगावकरांच्या पाऊस कवितांचे अनुवाद केले गेले व भारत “सुजलाम सुफलाम झाला” !
आता पावसाळा आला हे पावसात भिजलो तरी खरे वाटत नाही.
लिज्जतने याचा गंभीरपणे विचार करावा.

ईशावास्य उपनिषद -२

सर्व काही परमात्मा आहे, ईश्वर आहे या घोषणेने शांतीमंत्रानंतर या उपनिषदाची सुरुवात होते. जीवनात जे काही घडते, आपण जे काही करतो ते ईश्वर इच्छेनेच होते असा या घोषणेचा अर्थ आहे.  या जगात जगत असूनही कर्माने लिप्त न होण्याची कला हे उपनिषद शिकविते आहे. माणसाने शंभर वर्षे आनंदाने कोठल्याही कर्माने लिप्त न होता जगावे असे हे उपनिषद सांगते. जर परमेश्वराच्या चरणी तुम्ही स्वत:ला पूर्ण अर्पण केलेत तर त्या भावनेने आपण जे कराल त्याने कर्माचे लेप अंगाला चिकटत नाहीत.
माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याच्या इंद्रियांना अनेक गोष्टींचा स्पर्श होतो. यावेळी तो आपल्या पूर्वस्मृतींच्याद्वारा या स्पर्शाला प्रतिसाद देतो. डोळ्यांनी काही गोष्टी पाहतो. त्यावेळी पूर्वी पाहिलेल्या अशाच गोष्टींच्या आठवणीने तो रागावतो अथवा दु:खी होतो. असेच अन्य ज्ञानेंद्रियांना झालेल्या स्पर्शाने घडते. यातूनच नवी कर्मबंधने निर्माण होतात. जोवर आपण या जगात आहोत तोवर हे असेच चालू राहील. पण इशावास्योपनिषद यातून मुक्तीचा मार्ग दाखविते.
'मी' (अहंकार) आणि 'माझे' (ममत्व) यामुळे राग (लोभ), द्वेष आदी दोष माणसात येतात. त्यामुळेच कर्मबंधन माणसाला चिकटते आणि माणूस या जगात परत जन्म घेतो आणि 'भवचक्रात' अडकतो असे सर्वच उपनिषदांचे म्हणणे आहे. खरे तर 'माझे' ही भावना प्रथम निर्माण होऊन त्यातूनच 'मी' चा जन्म होतो. जर या 'माझे' असण्याचा आधारच काढून घेतला तर ममत्व निर्माण होणार नाही आणि पर्यायाने अहंकाराचा जन्म होणार नाही. जर या जगातील सर्व काही या ईश्वराने निर्माण केले आहे, त्याचेच आहे तर कोठलीही गोष्ट 'माझी' म्हणण्याला काहीच अर्थ रहात नाही. आणि मग कर्माचे लेपही बसणार नाहीत. इशावास्योपनिषाद हा अहंकारमुक्तीचा मार्ग दाखविते.
एकदा एक राजा रस्त्यावरून जात होता. त्याला एक गरीब माणूस डोक्यावर जड ओझे घेऊन जाताना दिसला. राजाला त्याची दया आली. त्याने त्या माणसाला रथात घेतले. तो माणूस ते ओझे तसेच डोक्यावर घेऊन बसला होता. ओझे खाली ठेवण्यास सांगितल्यावर तो म्हणाला 'राजाने मला रथात घेतले हेच खूप उपकार आहेत. आता या ओझ्याचे वजन मी रथावर का टाकू?"
आपली अशीच अवस्था झालेली असते असे  ईशावास्य उपनिषदाला म्हणायचे आहे. परमेश्वराने आपले ओझे वाहण्याची जबाबदारी घेतली आहे. हे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले तरी ते वाहणारा तोच परमेश्वर आहे. मग हे आपल्या चिंतांचे ओझे आपण आपल्या डोक्यावर का घ्यायचे?
पुढील लेखात आपण 'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |' या पहिल्या श्लोकात आलेल्या महत्वाच्या सूत्राचा मागोवा घेऊ.




Tuesday, June 5, 2018

ईशावास्योपनिषद - १

तेन त्यक्तेन भुञ्जीथाः |
या एका सूत्रातच या उपनिषदाला जे काही सांगायचे आहे ते सांगितलेले आहे. 'जो सोडतो तोच भोगतो' असा या सूत्राचा अर्थ आहे. आपण या सूत्राचा अर्थ नंतर विस्तृतपणे बघू.
शुक्ल यजुर्वेदाच्या कण्व शाखेच्या संहितेचा चाळिसावा अध्याय म्हणजे ईशावास्य उपनिषद होय. ह्या उपनिषदाचा मंत्र भागात समावेश होतो म्हणून ह्या उपनिषदाला जास्त महत्त्व आहे. सर्व उपनिषदांत ह्याला पहिले स्थान दिले जाते.
कर्म व ज्ञान या विरोधी द्वंद्वाचा समन्वय हा या उपनिषदाचा मुख्य विषय आहे. हे उपनिषद कर्मयोग सांगते असे आपल्याला म्हणता येईल. या उपनिषदाचा पहिला मंत्र "ईशावास्यमिदं" असा सुरू होतो म्हणून ह्याचे नाव ईशावास्योपनिषद् असे रूढ झाले. या संहितेला ईशोपनिषद, वाजसनेयी उपनिषद, मंत्रोपनिषद असेही म्हटले जाते. तसेच ते 'ईशावास्य' (ईश्वरच सर्व काही आहे) अशी घोषणा करते. म्हणूनही त्याला 'ईशावास्य उपनिषद' म्हणतात.

 खालील शांतीमंत्र हे उपनिषद सुरु होण्यापूर्वी येतो. या शांतीमंत्रात सर्वच उपनिषदांचे सार सामावलेले आहे.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

ते दूर असलेले (अदः) परब्रह्म पूर्ण आहे, तसेच हे (इदम् – इंद्रियगोचर) विश्वही पूर्ण आहे. पूर्ण असलेल्या परब्रह्मातून पूर्ण असलेल्या विश्वाचा उदय झाला आहे. एका पूर्णातून दुसरे पूर्ण काढून घेतल्यानंतर पूर्णच शिल्लक राहाते.ते दूर असलेले (अदः) परब्रह्म पूर्ण आहे, तसेच हे (इदम् – इंद्रियगोचर) विश्वही पूर्ण आहे. पूर्ण असलेल्या परब्रह्मातून पूर्ण असलेल्या विश्वाचा उदय झाला आहे.

खरेतर पूर्णवाद सांगणारे उपनिषद आणि शून्यवाद सांगणारा बुद्ध एकच गोष्ट सांगत आहेत. पूर्णवादात अन्य कोणी उपस्थित नसते आणि शून्यवादातही. अन्य दुसऱ्या कोणाच्या उपस्थितीशिवाय पूर्ण किंवा शून्य हे एकाच आहेत.

हे ब्रह्म पूर्ण आहे, त्यातून काहीही काढले तरी पूर्णच शिल्लक राहते. गणिती अथवा तार्किक बुद्धिवादाच्या विरोधी भासणारे हे विधान आहे. पण ते एका उदाहरणाने स्पष्ट करता येईल. हे ब्रह्म आणि त्याने निर्माण केलेले विश्व हे अमर्याद आहेत. त्यामुळे अमर्यादित गोष्टीतून काहीही काढले तरी ते अमर्यादितच राहणार. मनात फुलणारे प्रेम ही अशीच अमर्यादित भावना आहे. ते कोणालाही कितीही दिले तरी अमर्यादितच राहते.एका दिव्याने दुसरा दिवा पेटविला तरी पहिल्या दिव्याचा प्रकाश तेवढाच राहतो. अथवा आई मुलाला जन्म देते तरी ती आई पूर्ण आईच राहते.

ब्रह्म हे सत्य आहे आणि हे विश्व त्यावर आरोपित केलेले आहे. हे विश्व नष्ट झाले अथवा अशी अनेक विश्वे निर्माण केली (अनेक विश्वे एकाच वेळी अस्तिवात असू शकतील असे आधुनिक विज्ञान सांगते) तरी ब्रह्माला काहीच फरक पडणार नाही असा या शांतीमंत्राचा अर्थ आहे.

पुढील लेखात आपण या उपनिषदात काय सांगितले आहे ते पाहू.

Monday, June 4, 2018

प्रास्ताविक

वेद हा प्राचीन भारतीय ज्ञानसंपत्तीचा अमुल्य वारसा आहे. विषयाच्या दृष्टीने पाहिल्यास वेदांची तीन भाग ('कांड') करता येतात.  कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. वेदांच्या ज्ञानकांडाचे दुसरे नाव 'उपनिषद' आहे. विश्वाच्या उत्पत्तीचा आणि मूलतत्वाचा विचार हा उपनिषदांत केलेला आहे. उपनिषदांनी नेकाना भुरळ घातली. यात केवळ हिंदू नाहीत तर अन्य धर्माचेही लोक होते. शहजहानचा मोठा मुलगा आणि गादीचा वारस (जो नंतर औरंगजेबाकडून मारला गेला) 'दारा शुकोह' याने फारसीत उपनिषदांचे भाषांतर केले आहे. दारा शुकोहच्या या भाषांतराची नंतर युरोपियन भाषेत भाषांतरे झाली. त्यामुळे युरोपियन लोकांना त्याबद्दल माहिती झाली. नंतर मॅक्समुल्लर, शोपेनहर आदी पाश्चात्य विचारवन्तांनी उपनिषदांची खूप स्तुती केली. एकशे बारा उपनिषदे प्रसिद्ध आहेत. शंकराचार्यांनी त्यापैकी दहा-बारा उपनिषदांवर भाष्य केली आहेत.
आपण भारतीय दुर्दैवाने या अमुल्य ठेव्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. या लेखमालेत आपण काही उपनिषदांचा थोडक्यात अभ्यास करू.
उपनिषदांत अत्यंत थोड्या शब्दात ज्ञानाचे सार सांगण्याचा ऋषींचा प्रयत्न आहे. ती समजण्यास कठीण आहेत. विशेषत: ज्याची अध्यात्मात फार वाटचाल झालेली नाही अशांना ती कठीण वाटतात. म्हणूनच उपनिषदे अथवा ज्ञानकांड हा वेदांचा शेवटचा भाग आहेत. कर्म आणि उपासना यांच्या सहाय्याने माणसाने आपली अध्यात्मिक प्रगती करावी आणि पुरेशी अध्यात्मिक पातळी गाठल्यावर उपनिषदे समजणे सोपे जाईल असा तो विचार असावा. पण माझा अनुभव असा आहे की आपल्यापैकी अनेकांची वाटचाल मागील जन्मांत अधात्माच्या मार्गाने झालेली असते. त्यामुळे त्याना उपनिषदे समजण्यास कठीण वाटत नाहीत.
खरे तर उपनिषदे ही उच्च अध्यात्मिक उंची गाठलेल्या गुरूंकडून प्रत्यक्ष समोर बसून समजून घेणे योग्य आहे. त्यातील अनेक खाचाखोचा तेच समोरासमोर समजावून देऊ शकतात. परंतु सध्याच्या गतिमान जीवनात ते कठीण आहे. त्यामुळे मी ही उपनिषदांचा अभ्यास पुस्तके वाचूनच केला. आणि माझ्या अल्पशा बुद्धीला जे समजले ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.
उपनिषदातील ईश्वराचे स्वरूप आनंदमय आहे. हा जीव मुळात ईश्वर असल्याने त्याची सर्व धडपड आनंद मिळविण्यासाठीच असते. परंतु हा आनंद अंतर्यामी न शोधता बाह्य गोष्टील शोधण्यास सुरुवात केल्याने माणूस बंधनात पडतो. बंधन हे दु:खात लोटते. माणसाला आपल्या आनंदमय स्वरूपाचा बोध व्हावा ही उपनिषदांची धडपड आहे.
मी महाविद्यालयात शिकत असताना माझ्या एका जिवलग मित्राकडे त्याच्या नातेवाईकांचे ओशोंनी लिहिलेले 'उपनिषदांच्या गवाक्षातून' हे पुस्तक माझ्या हाताला लागले. त्यातून मला 'उपनिषद' या विषयात रस वाटू लागला. मी ओशोंची पुस्तके वाचू लागलो. यथावकाश माझी त्या मित्राच्या नातेवाईकांशी (ज्यांचे पुस्तक होते) ओळख झाली. ते माझे एकअध्यात्मिक मार्गदर्शक ठरले. हे आहेत ओशोंचे सुरुवातीपासूनचे शिष्य ठाण्याचे 'स्वामी आनंदऋषी'. ओशो आणि आनदऋषी यांचे बोट धरूनच मी ही मालिका लिहितो आहे.