Monday, March 27, 2017

शालिवाहन शक

Image result for गुढीपाडवाशालिवाहन शकाचा प्रारंभ गौतमीपुत्र शतकर्णी (शालिवाहन ) याने इसवी सन ७८ मध्ये केला. शकांवर मिळविलेल्या विजयाच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे संवत्सर चालू केले.

शक हे भारताच्या वायव्येला असणाऱ्या प्रदेशातील रहिवासी होते.  त्यांच्या बाजूलाच कुशाण हे टोळीपद्धतीने  राहणारे समूह होते.  कुशाणांच्या बाजूला असणाऱ्या हुण (हान?) वंशाच्या लोकांनी कुशाणांवर आक्रमण करून त्यांना हुसकावून लावले. कुशाणांनी शक वंशियांवर हल्ला करून त्यांचा प्रदेश बळकाविला. यामुळे विस्थापित झालेल्या शकांनी भारतावर हल्ले चालू केले. यावेळी भारतात गणराज्ये आणि छोटी राज्ये अस्तित्वात होती. त्यांचा शकांपुढे पाडाव लागला नाही आणि सिंध, गुजरात आणि राजस्थानात शंकांची राजवट सुरु झाली. शकांनी दक्षिण भारतावर हल्ल्याची तयारी सुरु केली.
राजा विक्रमादात्याने शकांचा पाडाव केला. आणि स्वत:चे शक चालू केले.
तरीही शाकांचा उपद्रव चालूच होता.  मग गौतमीपुत्र सातकर्णी याने शाकांचा पूर्ण पराभव केला आणि शके संवत्सर चालू केले.
त्यानंतर हुणांच्या त्रासाला कंटाळून कुशाणांनी भारतावर आक्रमण केले आणि कुशाण राजा कनिष्क भारताचा सम्राट बनला. कुशाण भारतीय संस्कृतीत सामावले गेले.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथे तसेच कंबोडिया येथे शालिवाहन संवत्सर पाळले जाते. १६३३ पर्यंत जावामध्येही शालिवाहन संवत्सर पाळले जात होते.

भारतीय अर्थव्यवस्था लेख ५

भारतीय प्राचीन अर्थव्यवस्था कृषीअर्थव्यवस्था नव्हती तर औद्योगिक भक्कम अर्थव्यवस्था होती हे आपण मागील लेखांत पहिले. भारताचा GDP जगाच्या तीस टक्के होता हे ही आपण पहिले. ब्रिटीश राजवटीने आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया खिळखिळा केला. आपली अर्थव्यवस्था कृषिप्रधान होती असा समाजही त्यांनी करून दिला. त्यामुळे तसेच पाश्चात्य अर्थव्यवस्थेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपण प्रगती करू शकलो नाही.
अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी पुढील बाबी आवश्यक असतात
1> कच्च्यामालापासून पक्क्यामालापर्यंत  वस्तू, माहिती आणि पैसे सर्व पातळ्यांवर योग्य प्रकारे पोचविण्याची व्यवस्था (Supply Chain Management)
2> उर्जेचा योग्यआकारे वापर
3> सुरक्षितता

प्राचीन भारताची Supply Chain Management किती भक्कम होती हे आपण आधीच्या भागात पहिले.

येथे उर्जेच्या वापराबाबतही अत्यंत उत्कृष्ठ व्यवस्था होती. बैल हा येथील उर्जेचा मुख्य स्त्रोत होता. येथील उष्ण हवेत उन्हातही चांगले काम करू शकतील अशी बैलांची वाणे विकसित केली गेली होती. चांगले काम करवून घेण्यासाठी अंडे चेपालेला बैल तर प्रजोत्पादनासाठी मोकळा सोडलेला वळू अशीही विभागणी होती.
शेतकऱ्याकडे एकाच बैलजोडी असेल तरीही तो त्यापासून वाहतूक आणि शेतीची सर्व कामे करून घेऊ शकत होता. आजूबाजूच्या रानातून बैलांना चारा मिळत होता, त्यांची विष्ठा शेतीला खात म्हणून उपयोगी होती. कमीत कमी प्रदूषण करून उर्जा मिळविणारी ही व्यवस्था होती.बैलांबरोबर स्वाभाविकच गायीही शेतकऱ्यांकडे असत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पौष्टिक आहाराचा प्रश्नही सुटत असे.

आपल्या प्राचीन राजांना सुरक्षिततेच्या प्रश्नाची जाणीव होती. भारताला नैसर्गिक संरक्षण लाभल्याने खैबर खिंडीव्यतिरिक्त येथे येण्यास वाव नव्हता. परंतु गेल्या हजार-दीड हजार वर्षात संरक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. अहिंसेच्या अतिरेकी कल्पना समाजात रुजल्याने हे झाले असावे. मिळविलेल्या संपत्तीचे रक्षण करता येत नसेल नसेल तर ही संपत्ती चोरांच्याच हातात जाते हा धडा आपण गेल्या हजार-पंधराशे वर्षात शिकलो.

या आपल्या प्राचीन समृद्ध अर्थव्यवस्थेतून आपण सध्याच्या काळासाठी काही धडे घेणार आहोत का?
पाश्चात्यांचे अंधानुकरण करून आपल्याकडे समृद्धी येणार नाही तर आपल्या समाजात रुजलेल्या कल्पनांचा उपयोग केला आणि समाजाला योग्य दिशेने नेले तरच येथे समृद्धी येऊ शकेल आणि नांदू शकेल.

याबद्दल आपल्याला काय वाटते? मी प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहे.

<<लेखमाला समाप्त >>

Saturday, March 25, 2017

भारतीय अर्थव्यवस्था : लेख ४

भारतीय अर्थव्यवस्था कृषिप्रधान नसून उद्योगप्रधान होती हे पहिल्या भागात पहिले. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न मुघल राजवटीच्या अंतापर्यंत (GDP) जगाच्या उतपान्नाच्या ३०% होता हे आपण दुसऱ्या भागात आकडेवारीनिशी पहिले. पंचक्रोशीची रचना आणि त्यातील नगर-खेडी यांचे संबंध हे तिसऱ्या भागात पहिले. आता नगरांची रचना आणि त्यांचा अर्थव्यवस्थेत असलेला सहभाग यांचा विचार करुया.
भारत हे अनेक छोट्या नगरांचे बनलेले राष्ट्र होते. ही नगरे प्रामुख्याने नदी किनाऱ्यावर वसली होती. (गंगेच्या किनाऱ्यावर ब्रिटीश आले तेव्हा साडेतीनशे नगरे होती) त्यामुळे नगरात मुबलक पाणी होते. जी नगरे नदीकिनाऱ्यावर नव्हती तेथे भरपूर मोठी तळी होती. त्यामुळे भूगर्भात भरपूर पाणी होते. विहिरींद्वारे या पाण्याचा उपसा होत असे.
नगरांमध्ये आपसात व्यापार होता. हा प्रामुख्याने जलमार्गाने होत असे. यामुळे ही वाहतूक कमी खर्चाची होती. जेथे नगरे नदीकाठाशी नव्हती ती परस्परांशी रस्त्याने जोडलेली होती. हे रस्ते थेट बंदरापर्यंत जात होते. या बंदरांतून परदेशांशी व्यापार होत असे. त्यामुळे येथील बंदरे भरभराटीस आली होती. भिवंडी, चौल, सोपारा ही महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे होती. घोडबंदर रोड येथे अरबी घोड्यांचा व्यापार चालत असे. येथील राजांना व्यापाराचे महत्व पटले होते. म्हणूनच बंदरापर्यंत जाणारे रस्ते सुस्थितीत असतील आणि दरोडेखोरांपासून सुरक्षित रहातील याची काळजी ते घेत असत. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला इंदोर-कल्याण रस्ता आजही राष्ट्रीय महामार्ग म्हणून वापरला जातो. नगरे अथवा बंदरांमधील वाहतुकीसाठी (रस्ते वाहतूक) अनेक बैलाच्या मोठ्या बैलगाड्या वापरल्या जात. ‘हिंदू’ कादंबरीमध्ये अशा बत्तीस बैलांच्या बैलगाड्यांचा उल्लेख आहे. या बैलगाड्या असलेल्या आणि आंतरराज्य वाहतुकीचा व्यवसाय असलेल्या जमाती येथे होत्या.
येथे खेड्यात कृषिमालाचे उत्पादन होत असे. शेतकरी आपल्या बैलगाडीतून हे उत्पादन जवळच्या नगरात देत असे. नगरात या मालावर प्रक्रिया होऊन त्यातील काही खेड्यात परत येत असे तर बहुतांश माल अन्य नगरात पुढील प्रक्रियेसाठी अथवा विकण्यासाठी जात असे. प्रक्रिया झालेला बराचसा माल परदेशात निर्यात होत असे. अशी ही निर्यातप्रधान अर्थव्यवस्था होती.
 पुढील भागात आपण या अर्थव्यवस्थेच्या काही विशेष अंगांकडे पाहू.

भारतीय अर्थव्यवस्था : लेख ३

भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान कधीच नव्हती तर येथे कृषिप्रधान आणि उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेचा सुंदर मेळ साधला गेला होता हे आपण आपल्या पहिल्या भागात पहिले. यामुळे आपली अर्थव्यवस्था जगात अत्यंत भक्कम गणली जात होती. मोगल काळापर्यंत आपले सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) जगाच्या उत्पन्नाच्या तीस टक्के होते हे आपण दुसऱ्या भागात आकडेवारीनिशी पहिले. या अर्थव्यवस्थेची अशी कोणती वैशिष्ट्ये होती की ज्यामुळे आपण हे साध्य करू शकलो हे या भागात पाहू.
प्राचीन भारताची रचना ही एक नगर आणि त्या भोवती पंचक्रोशीत वसलेली गावे अशी होती. म्हणजेच ही व्यवस्था ग्रामप्रधान नव्हती तर नागरी व्यवस्था होती. (आपल्या जुन्या गोष्टींची सुरुवात 'एक आटपाट नगर होते' अशीच होत असे हे अनेकांना आठवत असेल).
ही पंचक्रोशीत वसलेली गावे नगरांशी रस्त्याने जोडलेली असत. हा ग्रामीण भाग ते नगर अशी वाहतूक प्रामुख्याने बैलगाड्यांच्या सहाय्याने होत असे. नगरांना लागणारे कृषी साहित्य आजूबाजूच्या गावांतून येत असे. नगरे या मालावर प्रक्रिया करून तो विक्रीयोग्य बनवीत असत. शेतकरी स्वत:च्या बैलगाडीतून ही वाहतूक करीत असत.
शहरात निर्माण होणारा कचरा पंचक्रोशीतील ग्रामीण भागासाठी खत म्हणून सहज वापरता येत असे. कृषी मालाचा कचरा बैलाना खाणे म्हणून तेथेच उपयोगात आणता येई. नगरे आणि खेडी जवळ असल्याने कृषीमालाची नासाडी होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. नगरात निर्माण होणारे सांडपाणी तेथेच जिरवून विहिरीद्वारे पुनर्वापर होत असे. म्हणजेच नागरी संस्कृती असूनही सांडपाण्याचा निचरा, कचऱ्याची विल्हेवाट हे आज भेडसावणारे प्रश्न नव्हते.
लग्ने बहुदा पंचक्रोशीतच होत असत. त्यामुळे पंचक्रोशी (ज्यात नगर आणि त्याभोवतालची खेडी आली) हे एक अत्यंत घट्ट धाग्यांनी बांधलेले एकक होते.
या नगरांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि त्यांचे अर्थव्यवस्थेत असलेले स्थान यांचा पुढील भागात उहापोह करू.

भारतीय अर्थव्यवस्था : लेख २

या आधीच्या पोस्टमध्ये आपण आपल्या प्राचीन अर्थव्यवस्थेतून काही शिकता येते काय हे बघण्याचा मानस व्यक्त केला होता.
साहजिकच पहिला प्रश्न उपस्थित होतो, भविष्यकाळाकडे न बघता आपण आपल्या रम्य भूतकाळात का रममाण होत आहोत? वर्तमानातून पळ काढण्यासाठी ही सबब नाही ना?
आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की समाजाची मानसिकता वर्षानुवर्षे घडत असते. सामाजिक संबंध, नैतिकतेच्या कल्पना यांचा पगडा मनावर असतो असतो. या सगळ्यातूनच समाज घडत असतो आणि समाजाची आर्थिक-सामाजिक प्रगती होत असते. म्हणूनच इतिहासाचे महत्व असते.
भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील एक समृद्ध अर्थव्यवस्था होती. येथील समृद्धी पाहूनच आपल्यावर सतत एक हजार वर्षे अतिक्रमणे होत होती. अल्लाद्दीन खिलजीने देवगिरी येथून काहीशे हत्तींवर सोने लादून नेल्याचा उल्लेख आहे. प्रथम मलाही ही भाकडकथा वाटली. परंतु नंतर History of Gold चा अभ्यास करताना उलगडा झाला. युरोपमध्ये सरदारांमध्ये रेशमी कपडे वापरण्याची फॅशन आली होती. परंतु रेशमी कापड केवळ सोन्याच्या बदल्यात मिळत असे. यामुळे युरोपमधील सोने संपत आले. शेवटी ओटोमानसाम्राज्याच्या सम्राटाने या 'सोन्याच्या बदल्यात रेशीम' व्यापाराला बंदी घातली.
रेशमाच्या कापडाच्या निर्मितीचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र देवगिरीजवळील पैठण होते हे लक्षात घेतले तर देवगिरी साम्राज्याच्या संपन्नतेचा उलगडा होतो.
म्हणजेच भारतात सोन्याचा धूर निघत होता ही कविकल्पना नाही.
भारतीय अर्थव्यवस्थेचा मागोवा घेताना भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे (GDP) आकडे हाती आले.
(Ref: http://cgijeddah.mkcl.org/Web…/History-of-Indian-Economy.pdf)
Years 1000AD 1500AD 1600AD 1700AD
India 33,750 60,500 74,250 90,750
China 26,550 61,800 96,000 82,800
West Europe 10,165 44,345 65,955 83,395
World Total 116,790 247,116 329,417 371,369
म्हणजेच भारताचा GDP मोगल काळापर्यंत जगाच्या ३०% होता. परंतु इंग्रजांनी येथे पाय रोवल्यावर भारताची अर्थव्यवस्था उध्वस्त केली. एवढेच नाही तर आपल्या आर्थिक इतिहासाबद्दल आपल्याला भ्रामक समजुती करून दिल्या, आपल्याला आपल्याबद्दल न्यूनत्वभावना (Inferiority Complex) निर्माण केला.
आता आपण आपल्या दैदिप्यमान आर्थिक कालखंडाचा आढावा घेऊन त्यातील वैशिष्ट्ये शोधली पाहिजेत आणि त्याचा उपयोग सध्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कसा होईल हे पहिले पाहिजे.
आपण पुढील लेखात याचा उहापोह करू.

भारतीय अर्थव्यवस्था लेख १

आज शहरे बकाल आणि खेडी भकास झाली आहेत. आपले जीवनमूल्य वाढवायचे असेल तर शहरे खेडी यात समतोल साधला गेला पाहिजे. आपल्या प्राचीन व्यवस्थेने यात समतोल साधला होता. त्याकडे पाहून आपल्याला काही शिकता येईल.
'भारत हा कृषिप्रधान अर्थव्यवस्थेचा देश होता' ही आपली पाश्चात्य देशांनी करून दिलेली भामक समजूत आहे. कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेले देश कच्च्या मालाची निर्यात करतात आणि पक्का माल आयात करतात. भारतात अशी व्यवस्था (इंग्रज राजवटीचा काल सोडता) कधीच नव्हती. भारत हा पक्क्या मालाची निर्यात करणारा देश म्हणूनच ओळखला जात होता. येथील मलमलीला जगात प्रचंड मागणी होती. येथील रेशमाचे कापड पश्चिमेकडील देश सोन्याच्या बदल्यात घेत असत. यामुळे युरोपातील सोने संपत आले असल्याचे उल्लेख आहेत. येथे कच्च्या रेशमाची आयात चीनमधून केली जात असे आणि पक्के रेशमाचे कापड निर्यात होत असे. म्हणजेच हा कृषी अर्थव्यवस्था असलेला देश नव्हे. परंतु आपली इंग्रजांनी तशी समजूत करून दिल्याने आपल्या अर्थव्यवस्थेला आपण योग्य दिशा देऊ शकलो नाही. याचा परिणाम बकाल शहरे आणि भकास खेडी यात झाला. मग शेतकरी गरीब होत गेला, शेतकरी आत्महत्या करू लागला. कर्जमुक्ती/कर्जमाफी सारख्या तात्पुरत्या मलमपट्टीने (मूळ रोगावर इलाज न केल्याने) ही परिस्थिती अधिकच चिघळली.
आपल्या पूर्वजांनी ग्रामीण आणि नागरी अर्थव्यवस्थेमध्ये समन्वय कसा साधला होता, आताच्या परिस्थितीत त्यातून काही शिकण्यासारखे आहे काय हे पुढील पोस्टमधून पाहू.