Wednesday, June 6, 2018

मंगेश पा(प)डगावकर

फार फार वर्षापुर्वी लिज्जत कंपनीच्या लक्षात आले की पावसाळ्यात पापडांची विक्री जवळ-जवळ होतच नाही. कंपनीचा आर्थिक डोलारा कोलमडू नये म्हणून एक तज्ज्ञ समिती नेमण्यात आली. या कमिटीने बरेच पापड फस्त केल्यावर उपाय सूचविला तो म्हणजे कविता पाडायचा ! लोक कविता वाचता-वाचता पापड खातील , त्यांना आपण अशी सवयच लावायची ! लिज्जतने तो अहवाल स्वीकारला व कविता पाडण्याचे कंत्राट कोणाला द्यायचे यासाठी एक उच्च स्तरीय समिती नेमली. अनेक पावसाळॆ कोरडे गेल्यावर एकदाचे या समितीने एक नाव नक्की केले ते म्हणजे पा(प)डगावकर !
लिज्जतने मग पाडगावकरांबरोबर करारच करून टाकला की पाडगावकरांनी पाउस पडताच एक कविता पाडायची, पावसाचे आगमन झाले रे झाले की लिज्जतने आपल्या पापडाच्या जाहिरातीत ती कविता वापरायची, अगदी दरवर्षी ! पहिल्याच वर्षी ही कल्पना चांगलीच चालली ! जाहिरात प्रसिद्ध झाल्या झाल्याच कंपनीचे सगळॆ पापड हातोहात खपले ! पाऊस, पापड व पाडगावकर हे समीकरण अगदी फिट्ट बसले. पुढच्या वर्षी तर पावसाने अटच घातली की आधी पाडगावरांना कविता पाडू दे मगच मी पडतो ! मग पुढची काही वर्षे आधी पाडगावकर पावसाला कवितेतून “ये रे ये पावसा “ म्हणायचे व पाऊस लगेचच धावून यायचा ! लोकसुद्धा याला सरावले. म्हणजे आधी जून महिना लागला की छत्री, रेनकोट यांची खरेदी सुरू व्हायची, आता लोक पाडगावकरांनी पावसाला साद घातली की मगच या खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले. खरे-खोटे पाडगावकर जाणोत पण या वस्तू विकणारे उत्पादक सुद्धा पाडगावकरांवर वॉच ठेवून स्टॉक बाजारात आणू लागत असे म्हटले जात असे. पाडगावकरांच्या पाऊस कवितेची लोकांना एवढी सवय झाली की लोक “आधी पडते पाडगावकरांची कविता, मग पडतो पाऊस” असे म्हणू लागले. ज्या भागात दुष्काळ पडतो त्या भागात सरकारच आपल्या खर्चाने पाडगावकरांच्या पाऊस कविता छापू लागली व मग तिकडे धो धो पाऊस कोसळू लागला. पुढे मग भारतातील सर्व प्रमुख भाषांत पाडगावकरांच्या पाऊस कवितांचे अनुवाद केले गेले व भारत “सुजलाम सुफलाम झाला” !
आता पावसाळा आला हे पावसात भिजलो तरी खरे वाटत नाही.
लिज्जतने याचा गंभीरपणे विचार करावा.

No comments:

Post a Comment