नर व मादी यांतील जनुकीय ‘हितसंबंध’
[सूचना: १. मनुष्याबाबत सांस्कृतिक-अंग महत्त्वाचे असल्याने ही मांडणी ‘प्राकृतिकतेची पूर्वपीठीका’ एवढ्या मर्यादित अर्थानेच घ्यावी. २. या मांडणीतील ज्ञानाचे श्रेय रिचर्ड डॉकिन्स आणि मॅट रिडली यांचे आहे. ३. जीवशास्त्रीय क्षेत्रात संतुलने कसकशी बनत जातात याचा हा वैज्ञानिक खुलासा असून त्यात कोणत्याच प्रकारे मूल्यात्मक निवाडा किंवा पुरस्कार/धिक्कार अभिप्रेत नाही. हा लेख आजचा सुधारक आणि मनोविकास प्रकाशनच्या डार्विनवरील पुस्तकात पूर्वप्रकाशित आहे.]
स्वतःच्या प्रती काढल्या जाण्याची परंपरा अव्याहत राखणे हा जनुकांचा स्वभाव आहे. जनुके ज्या जीवाच्या केंद्रस्थानी वास्तव्य करीत असतात त्या जीवाची वर्तने ती प्रवर्तित करीत असतात. ही वर्तने अशी असतात की जेणेकरून त्या जीवातील जनुके पुढे चालू रहातील. जीवाची धडपड जणू काही जनुकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या कार्याची पूर्ती करण्यासाठी चालते. जीव ज्या तुंबळ जीवनसंघर्षात सापडलेला असतो (भक्ष्य-भक्षक, यजमान-परोपजीवी, समाईक भक्ष्यासाठी स्पर्धा, समाईक भक्षकापासून वाचण्याची स्पर्धा, नर-नर, मादी-मादी, नर-मादी, पालक-पाल्य, भावंडे-भावंडे, इत्यादींतील संघर्ष) त्यातील आव्हाने पेलत तो आपले जनुकीय कार्य पार पाडण्यात यशस्वी ठरतो की नाही, यावर त्यातील जनुके पुढे चालू रहातात की नाही हे ठरत असते. यशस्वी ठरणारी वर्तने जेव्हा पुढील पिढ्यांना यशोदायक-वर्तन-प्रवर्तक-जनुके प्राप्त करून देतात, तेव्हाच ही वर्तने स्थिरावतात. साहजिकच एकूण वर्तनांपैकी प्रजननविषयक वर्तनांना कळीचे स्थान प्राप्त झालेले असते.
यात जनुकांनी ‘सोपवलेली’ कार्ये कोणती? किंवा जनुक-प्रवर्तित स्वार्थ कोणते?
१) स्वतः टिकणे, भक्ष्य मिळवणे, भक्ष्यस्थानी न पडणे व आतून हल्ला करणाऱ्या परोपजीवींवर मात करणे.(किमान काही प्रजननसंधी मिळेपर्यंत तरी)
२) स्वतःसाठी संख्येने जास्त किंवा जास्त लाभदायक, अशा प्रजननसंधी मिळविणे.
३) स्व-अपत्यांची संख्या तरी जास्त ठेवणे किंवा संख्येने कमी पण जास्त टिकाऊ अशी स्व-अपत्ये निर्माण करणे.
४) स्व-अपत्यांना ज्याच्याकडून जास्त जोमदार जनुके मिळतील अशाच जोडीदाराला (अन्यलिंगीयाला) प्रजननसंधी देणे.
५) स्व-अपत्य संगोपनासाठी (पोषण, रक्षण इ.)लागणाऱ्या श्रमांत जोडीदाराकडून जास्तीत जास्त वाटा प्राप्त करणे.
६) ज्यांना स्व-जातीय अन्यलिंगीयांकडून पसंती/प्रजननसंधी मिळेल अशी स्व-अपत्ये निर्माण करणे.
वरील स्वार्थांमधले प्राधान्यक्रम हे प्रस्तुत जीव नर आहे की मादी यानुसार कसकसे भिन्न होतात ते आता पाहू.(द्विलिंगीय व एक-व्यक्ती-एक-लिंगीय, हाच प्रजनन-प्रकार आपण लक्षात घेऊ. इतर प्रकारची प्रजनने विषयमर्यादेस्तव सोडून देत आहोत.)
अंडी विरुध्द शुक्राणू
नर-मादी यातेल मूलभूत भेद शरीररचनेवरून किंवा कोणाच्या शरीरात गर्भधारणा होते यावरून करता येणार नाही. उदाहरणार्थ सी-हॉर्स या जलचरात मादी आपली अंडी नर-शरीरात घालते व तेथेच त्यांचे फलन होते! म्हणूनच तो तो जीव कोणत्या प्रकारच्या जननपेशी(गॅमेट्स) निर्माण करतो यावरूनच त्याचे लिंग ठरविणे शास्त्रशुध्द ठरते. नर-जननपेशी म्हणजे शुक्राणू व मादी-जननपेशी म्हणजे अंडी. या दोहोंत टोकाची विरोधी स्वरूपे उत्क्रांत झालेली आहेत. (अभिन्न-जननपेशी म्हणजेच आयसोगॅमेट्सची उत्क्रांती, परस्परविरोधी स्वरूपाच्या जननपेशीत कशी झाली, हा विषय विस्तारभयास्तव सोडून देत आहोत.) अंडी आणि शुक्राणू यांच्या स्वरूपांमधील विरोध पुढील कोष्टकात व्यक्त केलेले आहेत.
अंडी
|
शुक्राणू
|
१) मोठा आकार(पक्ष्यांत फारच मोठा)
|
१) अति-लहान आकार
|
२) बीज-भांडवल-अन्नसाठा + अर्धे (मादीनिर्मित) केंद्रक
|
२) शून्य अन्नसाठा + फक्त अर्धे नरनिर्मित केंद्रक
|
३) जड व अचल
|
३) हलके व शीघ्रचल
|
४) संख्या कमी (मर्यादित)
|
४) संख्या प्रचंड (प्रायः अमर्याद)
|
५)उत्पादनाचा वेग कमी व त्यामुळे (अल्प आयुर्मर्यादेत) स्वतःच्या क्षमतेपोटी प्रजननसंधी कमी
|
५) उत्पादनाचा वेग प्रचंड व त्यामुळे प्रजननसंधीबाबत स्वतःच्या क्षमतेपोटी मर्यादाच नाही
|
६) शुक्राणूला प्रवेश देण्या न देण्या चे काम अंड्यांकडे
|
६) अंड्यांपर्यंत पोहोचण्याचे काम शुक्राणूंकडे
|
७) मादीची दर अंड्यामागील अन्न-गुंतवणूक फारच जास्त. त्यामुळे अपव्यय झाल्यास मादीचा मोठाच तोटा
|
७) नराची दर शुक्राणूमागील अन्न-गुंतवणूक अगदीच नगण्य,त्यामुळे अपव्यय झाल्यास नराचा काहीच तोटा नाही
|
त्या त्या प्रजातीत, नर-मादी यांचे संख्याप्रमाण जरी तुल्य असले, तरी अंडी हाच दुर्मीळ व महागडा स्रोत असतो. अंडी अफलित रहाणे किंवा फलित पण अल्पजीवी ठरणे, यात प्रजनन प्रकल्पाचे मोठे नुकसान असते. याउलट शुक्राणू अफलित रहाणे वा फलित पण अल्पजीवी ठरणे यात प्रजातीचे काहीच नुकसान नसते. ही असममिती (आसिमेट्री) मादी-पक्ष्यांबाबत फारच जास्त असते. कारण त्यांची अंडी ही त्यांच्या शरीराचा बऱ्यापैकी अंश व्यापण्याइतकी मोठी असतात; शुक्राणूंच्या तुलनेत तर फारच मोठी. सस्तनप्राण्यांतही मूळ असममिती जरी पक्ष्यापेक्षा कमी असली तरी असममितीची दिशा तीच असते.
प्रत्येक व्यक्ती-जीवाला आपली एकूण धडपड/यत्नशक्ती कोणत्या कार्यात किती घालायची हे ठरवावे लागते, किंबहुना त्याच्याकडून ठरले जाते! जनुककेंद्री उत्क्रांतिशास्त्रात वर्तनांचे वर्णन करताना वापरलेले अकर्तृक प्रयोग(पॅसिव्ह व्हॉइसेस) हे वाच्यार्थाने घ्यावेत तर कर्तृक प्रयोग (म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइसेस) हे लक्षणार्थाने घ्यावेत असा नियम आहे. कारण-भाषित विवरण करणे हे फारच विस्तृत आणि जटिल बनते. संक्षेप व सोपेपणासाठी प्रयोजन-भाषा वापरण्याचा (---साठी अशी निवड करणे) प्रघात आहे. असो.
प्रजननसंधी प्राप्त करण्यासाठी किती धडपडायचे व प्रजासंगोपानार्थ किती, यात मादीचा कल स्वाभाविकपणे संगोपनाकडे जास्त तर नराचा कल प्रजननसंधी मिळवण्याकडे जास्त असतो. हे या मूळ असममितीमुळे घडते. एखादी वीण वाया जाणे हे मादीला (तिची जनुके पुढे चालविण्याच्या मूलभूत ‘स्वार्थानुसार’) फारच महाग पडणार असते. एका दिशेला कल असला की तो कल पिढी दर पिढी वाढत जाण्याची स्ववर्धक प्रक्रिया घडत असते. संगोपननिष्ठ माद्या त्यांची जनुके पुढे चालू ठेवण्यात जास्त यशस्वी ठरल्या की ‘तशी’ जनुके वाढून पुढील पिढीतील माद्या जास्तच संगोपननिष्ठ बनतात. तसेच जास्त संधींसाठी धडपडणारे नर हे नर म्हणून यशस्वी ठरले की की त्यांची ‘तशी’जनुके निवडली जाऊन नर अधिकाधिक तसे बनतात. अर्थात यावर नर-नर संघर्षाने व मादी-मादी संघर्षाने आणि विशेषतः नर-मादी संघर्षाने कशी वेसण बसते हे आपण पाहूच. पान जननपेशींच्या स्वरूपामुळेच नर हा ‘सक्रीय-याचक’ तर मादी ही ‘अक्रिय-अनुमती-दात्री’ असे बनतात हे निश्चित.
जोडीदार: अडकणारा आणि सटकणारा
जर का नर हा संगोपनात मदत करेल याची खात्री असेल, तर माद्यांनासुध्दा (नराप्रमाणे) जास्त संधी शोधायला नको असते असे नाही. पण त्यांना तशी खात्री मिळत नसते. मासे हा याला अपवाद आहे. कारण मादी मासे पाण्याच्या तळातच अफलित अंड्यांचे संच (क्लच) घालतात. फलन त्यांच्या शरीराबाहेर होणार असते. नर मासा जर लहरीनुसार शुक्राणू सोडत सुटला तर त्याचा जनुकीय तोटा होतो. शुक्राणू हे द्रवात गतिमान असतात. एरवी मादीशरीरातील द्रवात त्यांना नेमकी दिशा मिळाली असती. पण पाण्यात मात्र ते वेगाने सर्व दिशांना विखरून जात असल्याने ते क्लचपर्यंत पोहोचतील याची अजिबात शाश्वती नसते. याकरिता नर मासा हा अगोदर घातलेल्या क्लचवरजवळात जवळ जाऊन शुक्राणू सोडण्यास बाध्य असतो. तेवढ्या वेळात मादी गायब झालेली असते! प्रजेला नशिबावर सोडणे ही गोष्ट, ज्या जोडीदाराला ही प्रजा निश्चितपणे आपलीच आहे याची खात्री असेल त्याला, नक्कीच क्लेशकारक असते.
नर मासा, त्याने शुक्राणू सोडलेला क्लच ही त्याची प्रजा असणार आहे, हे माहीत असल्याने त्याला संगोपनार्थ तेथे थांबावेच लागते. याला म्हणायचे अडकणारा जोडीदार. आपल्या अन्य जोडीदार हा अडकणारा आहे याची खात्री पटलेला जोडीदार हा सटकणारा बनतो. म्हणजेच अन्य-लिंगीय जोडीदार संगोपन करणारच आहे याची खात्री, हीच स्वतः अन्यत्र संधी शोधण्याची मुभा ठरते. पाण्यामध्ये ही मुभा (म्हणजे क्लचेस घालत हिंडण्याची) मादीला मिळते! पण अन्यत्र तसे नसते.
मादी-पक्ष्यांची दर एकक अंड्यामागे पालकीय गुंतवणूक अंड्याच्या मोठ्या आकारामुळे खूपच जास्त असते. तसेच फलन हे मादी-शरीरात होत असते. अंडी उबवणे व पिलांना चारा आणोन घालणे यात वेळ आणि श्रम यांची प्रचंड गुंतवणूक लागते. पक्षाबाबत दोन्ही जोडीदारांनी श्रमात अगदी बरोबरीने वाटा उचलला तरी एकेकाच्या वाट्याला येणारे श्रम प्रचंड असतात. मादीच्या आयुष्यात थोड्याशाच विणी शक्य असल्याने माद्यांतील संगोपननिष्ठेकडे असणारा कल पक्षी-मादीत अधिकच तीव्र झालेला असतो. नर-पक्षी हा मूलतः ‘नर’ असल्याने त्याचा कल संगोपन-श्रमातून पलायनाकडे आणि इतर माद्यांच्या अनुराधनाकडे असतोच! म्हणूनच ‘अडकणारा’ जोडीदार बनण्याचा धोका माद्या-पक्ष्यांना असतो व हा धोका त्यांना पक्षी असण्यामुळे अजिबातच परवडण्यासारखा नसतो. यासाठीच नर-पक्ष्याची मूलतः असणारी‘नर’(म्हणजे उनाड) प्रवृत्ती वठणीवर आणून त्यांना जास्तीतजास्त कामात जुंपणे आवश्यक असते. यासाठी पक्षी-माद्यांना कडक धोरण अवलंबिणे भाग असते. (धोरण = जनुकीयरित्या यशस्वी ठरून स्थिरावणारे वर्तन). नरांकडून श्रम करवून घेण्याच्या धोरणाला आपण‘सदगृहस्थ निवड धोरण’ असे नाव देऊ.
सदगृहस्थ निवड धोरण
जननपेशींमधील वैधर्म्यामुळेच नर हा सक्रिय-याचक तर मादी ही अक्रिय-अनुमती-दात्री असते. पक्ष्यांत (व बऱ्याच सस्तन प्राण्यांतसुध्दा) कोणत्या नराला प्रजननसंधी द्यायची, याची निवड करण्यावरील नियंत्रण हे माद्यांकडेच असते. (सस्तन प्राण्यांमधील काही प्रजातीतील माद्या हा ‘अधिकार’ कसा गमावतात, हे आपण नंतर पाहणार आहोत.)
सदगृहस्थ म्हणजे निष्ठाळू आणि कष्टाळू असा नर! माद्या या शास्त्रज्ञाप्रमाणे प्रयोगशाळेत जनुकीय-रचना तपासू शकणार नसतात. त्यांना बाह्यवर्तनावरूनच परीक्षा करावी लागते. यासाठी माद्या कोणत्या क्लृप्त्या (अबोधपणे व किंचित सबोधपणे) वापरतात?
१. प्रियाराधन कालावधी शक्य तितका लांबवणे: यात नराच्या धीर धरण्याची परीक्षा होते. जो नर लवकरच कंटाळून अनुराधनाचा मोहरा ‘दुसरी’कडे वळवतो तो ‘नापास’ होतो. प्रियाराधनकाळ प्रदीर्घ असण्यात नरांचाही एक जनुकीय स्वार्थ साधला जात असतो. कारण “मी परापत्य पोषणात तर अडकत नाहीये ना?” ही नरांची एक स्वाभाविक (म्हणजे स्वतःचीच जनुके पुढे चालवण्याच्या स्वार्थाच्या संदर्भात) चिंता असते. माकडे, सिंह इत्यादीतील नर हे इतर नरांची अपत्ये मारून टाकतात. उंदरांमध्ये स्वतःचे एक व्यक्तीविशिष्ट रसायन सोडण्याची क्षमता असते. याचा गंध मादीने घेतला व व तिच्यात जर इतर उंदीर-नराचे गर्भ असले, तर गर्भपात होतो! या चिंतेमुळे पक्षी-नरदेखील प्रदीर्घ प्रियाराधनाला सहकार्य देत रहातात. अर्थात मादीच्या अनुमतीविना त्यांचा नाईलाजही असतोच.
२. आन्हिकवजा गोष्टी करवून घेणे: पसंतीस उतरण्यासाठी नराला अशा काही गोष्टी करून घ्याव्या लागतात की ज्यांचा थेटपणे जीवशास्त्रीय उपयोग काहीच नसतो. उदाहरणार्थ दुर्मिळ अशी पिसे किंवा तुरे शोधून आणून त्यांनी घरटे सजवणे! या गोष्टी केवळ अवघड असल्यामुळे त्यांचा ‘पण’ म्हणून उपयोग असतो.
३. नराकडून घरटे बांधून घेणे: यात नुसती परीक्षा नसून श्रमांची गुंतवणूक अगोदरच पदरात पडून घेणेही असते.
४. प्रियाराधनकाळात मादी पिलांची नक्कल करत चाऱ्यासाठी नाराकडे याचना करते व स्वतःला चारून घेते. मोठे अंडे बनविण्यासाठीचा (व अंड्यातलाही) अन्नसाठा हा नराची गुंतवणूक म्हणून वसूल केला जातो. यात टोकाचे उदाहरण म्हणजे कोळी व विंचू यांच्या काही प्रजातीत खुद्द नरच मादीच्या भक्ष्यस्थानी पडतो. म्हणजे त्याची जनुके पुढे चालू ठेवण्याचे श्रेय त्याला ‘मरणोत्तर’मिळते!
५. फसवे सदगृहस्थही असू शकतात. हे म्हणजे प्रियाराधन काळात निष्ठाळू/कष्टाळू पण पण प्रत्यक्ष संधी मिलातच उनाडपणा सुरू करणारे नर. हा धोका टाळण्यासाठी माद्या, आधीच्या विणीत ज्याने मीलनोत्तर संगोपन-श्रमही निष्ठेने केले होते त्याच (टेस्टेड) नराला पुन्हा पसंत करतात. यामुळे फसव्या सदगृहस्थांना पहल्या विणीच्याच काही संधी मिळतात. पण पुढील विणींमध्ये खऱ्या सदगृहस्थांनाच वाव मिळतो. यातूनच मुळात एका विणीपुरते असणारे ‘पेअर-बाँडिंग’ हे ‘मोनोगामी’कडे सरकते.
आखडूपणा/बेफिकीरी यांतील परवडणारे संतुलन
दोन्ही पालकांनी १००% श्रम घेतल्याखेरीज पिले जगणारच नाहीत ही अगदी टोकाची अट झाली. जी प्रजाती परिपूर्ण आदर्श असल्याखेरीज टिकणारच नसेल, ती वास्तवात टिकेल कशी? संगोपनात नराच्या श्रमाची आवश्यकता ही गोष्ट ‘असते तरी वा नसते तरी’ अशी दोन टोकाची नसून तिच्या विविध मात्रा(डिग्रीज) वास्तवात असतात. सदगृहस्थ निवडीसाठी माद्यांनी पत्करलेला आखडूपणा(कॉयनेस)देखील परिपूर्णनसतो. मादीसाठी संगोपन जरी जास्त महत्त्वाचे असले तरी तिला स्वतःला प्रजननसंधी मिळण्याची गरजही असतीच. मादी निवडकर्ती आणि नर उमेदवार असे जरी असले तरी सगळेच उमेदवार बाद ठरवून ‘पोस्ट रिकामी’ ठेवणेही शक्य नसते! आखडूपणाबाबत अतीच ताणणे कुठले आणि ढिलाई कुठली याचे नेमके मोजमाप माद्यांना माहीत असण्याचा प्रश्नच नसतो. त्यांच्यातील आखडूपणा यदृच्छया कमी किंवा अधिक असतो इतकेच.
आखडूपणा अजिबात नसणारी मादी म्हणजे बेफिकीर मादी असे आपण म्हणू. माद्यांमध्येही स्पर्धा असतेच! या स्पर्धेत बेफिकीर मादीला इतर माद्यांपेक्षा फायदा किंवा झुकते माप मिळणार असते. कारण ‘सदगृहस्थ’ म्हणून उत्क्रांत झालेला नर जरी जास्त प्रतीक्षा करूशकणारा असला तरी जर तीच गोष्ट त्याला लवकर मिळत असेल तर नको असते असे नाही. कारण नर हा मूलतः ‘नर’च असतो! माद्यांतील बेफिकीरीला झुकते माप मिळत गेले की त्यातून बेफिकिरीची जनुके प्रसारित होतील. त्यायोगे नरांतही उनाडपणाची जनुके प्रसारित झाल्यावाचून रहाणार नाहीत. एखादा कल हा तदनुषंगिक जनुकान्द्वारे अधिकच वाढवत नेणाऱ्या स्ववर्धिष्णू (क्युम्यूलेटिव्ह) प्रक्रिया अमर्यादपणे चालत नाहीत कारण त्या हमखास उलटा फटका खाणाऱ्या असतात. आत्ताच्या संदर्भात जर बेफिकीरीमुळे ओढवलेला‘एकटीने संगोपन’ हा भार पेलला नाही की ती मादी, (पिले मरून) जनुके पुढे पोहोचवण्यात अयशस्वीच ठरते आणि बेफिकीरी-प्रवर्तक जनुके घटू लागतात. म्हणजेच स्ववर्धक प्रक्रिया उलटते. स्वैरता वाढवणारी प्रक्रिया स्ववर्धक असते तशी उलट ताळ्यावर आणणारी प्रक्रियादेखील स्ववर्धकच असते! एकतर ताळ्यावर आणणारी प्रक्रिया सुरू व्हावी लागेल किंवा ती प्रजाती नष्ट तरी होईल. टिकून राहणाऱ्या प्रजाती या ताळ्यावर येऊनच (किंवा ताळ्यावर राहूनच) टिकलेल्या असतात.
पण ताळ्यावर म्हणजे नेमके काय? प्रजातीचे निष्ठा/स्वैरता गुणोत्तर हे संगोपनात नराच्या श्रमांची आवश्यकता किती असेल यानुसार स्थिरावेल. यालाच वर्तन-वैविध्याचे परवडणारे संतुलन(इव्होल्युशनरीली स्टेबल ‘स्ट्रॅटेजी’) म्हणतात.
निसर्गातला हा द्वंद्वात्मक तोल फक्त प्रजननसंधी या एकाच आघाडीला लागू असतो असे नसून तो सर्वच आघाड्यांवर लागू असतो. उदाहरणार्थ नर-नर संघर्षात जर सगळेच नर ‘जिंकू किंवा मरू’ या प्रवृत्तीचे असतील तर ती प्रजाती नष्ट पावेल. कारण वाचलेले सर्वच नको इतके जखमी झालेले असतील. सगळेच ‘भुंकू किंवा पळू’ प्रवृतीचे असतील तर काहीकाळ शांतता नांदेलही. मात्र त्यात एखादा जरी ‘जिंकू किंवा मरू’वाला शिरला की त्याला झुकते माप मिळत जाऊन तत्प्रवर्तक जनुके वाढू लागतील आणि या दोन प्रवृत्तीतला समतोल साधला जाईल. म्हणजेच जसे निष्ठा/स्वैरता याचे समुचित प्रमाण स्थिरावते तसेच लढाऊ बाण्यांचेही समुचित प्रमाण स्थिरावते. येथे ‘समुचित’चा अर्थ‘चांगला’ असा नाही. जेथून कुठल्याही दिशेने ढळल्यास तोटा वाढतो त्या बिंदूत प्रजाती अडकतात. काहीच तोटा नसतो असा हा बिंदू नसून तो तोटा सोसत रहावे लागते पण टिकता येते असा हा बिंदू असतो. टिकून असणे म्हणजे अगदी सुखात असणे असे अजिबात नाही.
नरोत्तम निवड धोरण(आकर्षणाधिष्ठित)
मत्स्यांत प्रायः मादीराज्य व पक्ष्यांत प्रायः समताराज्य असले तरी सस्तन प्राण्यांत त्यामानाने नरांचे फावते. अन्नाचा जितका सुकाळ मादी जितकी स्वावलंबी तितके नर चुकार! संगोपनात नराचे श्रम न लागण्यामुळे काही (विशेषतः सस्तन प्राण्यांपैकी) प्रजातीतील नरांनी सदगृहस्थ निवड धोरण पार उधळून लावले आहे. सदगृहस्थपणाच्या मात्रा कमीअधिक आहेत. माद्यांचा पहिला प्राधान्यक्रम जरी सदगृहस्थ हा असला तरी जर सदगृहस्थ उपलब्धच नसले किंवा सदगृहस्थपणाची मात्रा कमी असली, तर माद्यांचा दुसरा प्राधान्यक्रम डोके वर काढतो. मूळ ‘जनुकीय-स्वार्थ’ यादीतला स्वार्थ क्र.४ म्हणजे “ज्या नराकडून स्व-अपत्यांसाठी जोमदार जनुके मिळतील अशाच नराला संधी देणे” हा असतो. या स्वार्थानुसार माद्या जे धोरण अवलंबितात त्याला आपण नरोत्तम-निवड-धोरण असे नाव देऊ.
येथेही ‘धोरण’चा अर्थ स्थिरावणारे वर्तन असाच आहे. म्हणजे असे की मादीला तिच्या आवडीनुसार आपाततः आकर्षक वाटणारा नर जर जोमदार जनुके देणारा निघाला, तर जनुक प्रसारामुळे तत्सम वैशिष्ट्ये आकर्षक वाटणाऱ्या माद्या वाढत जातात, तत्सम वैशिष्ट्ये असणारे नर वाढत जातात आणि/किंवा नरांतील ती वैशिष्ट्ये वृद्धींगत होत जातात. मॅट रिडली यांनी या प्रकरणाला “मोराच्या पिसाऱ्याची कहाणी”असे शीर्षक दिलेले आहे. नरांचे सुशोभीकरण(ऑर्नमेंटलायझेशन) हा नरोत्तम-निवड-धोरणाचाच परिपाक असतो.
नरांचा ‘विविधगुणदर्शनाचा’ कार्यक्रम मधोमध चालू आहे आणि भोवती कोंडाळे करून माद्या तो पहात आहेत, असाही प्रकार( याला ‘लेक’म्हणतात) काही प्रजातींत आढळतो. यातून एखादाच किंवा दोन/तीन नरच निवडले जातात. एखाद्या मादीने(किंवा काही थोड्याच माद्यांनी) पुढाकार घेऊन ‘नरोत्तम’ निवडला की इतर माद्या तिचे अनुकरण करून त्यालाच निवडतात. पुढाकार घेणाऱ्या मादीला आकर्षक वाटलेले लक्षण जोमदार जनुके देणारे नसेलही.
‘गूज’ पक्ष्यांतले नर गळयाजवळच्या हवेच्या पिशव्या जास्तीत जास्त फुगवून दाखवतात. यातून जनुकीय दृष्ट्या लाभदायक असे काहीच मिळणार नसते. म्हणजेच आकर्षकतेचे नियम माद्यांमधील ‘अन्यानुकरण’ प्रवृत्तीमुळे निव्वळ फॅशन्स म्हणूनही रुळू शकतात. माद्यांमध्ये ही अन्यानुकरण प्रवृत्ती का निर्माण होते? मूळ स्वार्थ क्र.६ येथे लागू पडतो. “अशी स्वअपत्ये निर्माण करणे की ज्यांना स्वजातीय अन्यलिंगीयांकडून पसंती मिळेल.” कारण नातवंडे मिळण्यात जनुकीय स्वार्थ साधला गेल्याची पक्की खूण असते. एखाद्या मादीला व्यक्तिशः कोणते वैशिष्ट्य आकर्षक वाटते यापेक्षा सामान्यतः तिच्या प्रजातीतील माद्या कोणते वैशिष्ट्य निवडतात याचा दबाव तिच्यावर असतो. हा दबाव तिच्या पुत्राला माद्या मिळतील की नाही या ‘चिंते’मुळे असतो. याला सेक्सी-सन-आर्ग्युमेंट म्हटले जाते.
नरांचे सुशोभीकरण हे माद्या मिळण्याच्या दृष्टीने जरी सोयीस्कर असले तरी नराच्या आत्मरक्षणाच्या दृष्टीने धोक्याचेच ठरू शकते. गुंताड्याची शिंगे असलेले सांबर ध्यानात घेऊ. लढण्यासाठी टणक आणि टोकदार अशी दोनच शिंगे पुरेशी असतात. डोक्यावर शिंगांचा पसारा वागवत पळून जायची वेळ आली तर झाडात पसारा अडकून ते सांबर कोणाच्या तरी भक्ष्यस्थानी पडण्याचीच शक्यता अधिक. सुशोभीकरण फारच अडचणीचे ठरून काही प्रजाती नष्ट देखील झालेल्या आहेत. नराला सुशोभीकरणाची अडचण किंवा भार होणे याला एनकंबरन्स म्हणतात. हा एनकंबरन्स जर प्रत्यक्ष घात करण्याइतपत जास्त नसला तर तोच उलटपक्षी जोमदार जनुकांचे लक्षण असू शकतो. एनकंबरन्स असूनही हा नर भक्षकांपासून स्वतःला वाचवू शकला हा त्याच्यात जोमदार जनुके असल्याचा पुरावा नव्हे काय?
लांब शेपटीचे आकर्षण हे असेच आहे. शास्त्राभ्यासकांनी प्लॅस्टिकची खोटी लांब शेपूट चिकटवली तरी तो नर मादीप्रिय ठरल्याचे आढळून येते!
माद्यांना जास्त वयाच्या नराचे आकर्षण असते असेही आढळले आहे. याचे कारण असे की सामान्यतः आपली जनुके आपल्याला तारकच असली तरी आपल्यात काही मारक (सेमीलीथल व लीथल) जनुकेही असतात. अल्पवयात जागृत होणारी मारक जनुके जास्त वयाच्या नरात नसणार हा ठोकताळा सहजच पटणारा आहे.(कोणाचाही कोणताही पूर्वज कधीच बालपणीच मेलेला असू शकत नाही!) माद्यांमधील या वृत्तीमुळे प्रजातींचे आयुर्मानही वाढत गेलेले आहे.
आकर्षण कोणतेही असो, नरोत्तम-निवड-धोरणामुळे थोडेच नर निवडले जातात आणि बाकीचे वंचित रहातात. नर हा बऱ्याच माद्यांना संधी देऊ शकत असल्याने या धोरणाचा परिपाक म्हणून बहुगामीत्व (पॉलीगामी) प्रस्थापित होऊ लागते.
पराक्रमी नरोत्तम: माद्यांची आत्मघातकी निवड
माद्यांचे एकाच/थोड्याच नरांकडे बहुगामीत्व वाढल्याने बरेच नर वंचित रहातात. वंचितता टाळण्यासाठी अंशतः सदगृहस्थ बनणे हा उपाय काहीसा यशस्वी ठरतोदेखील. पण वंचितता प्रधान राहिल्याने नर-नर संघर्ष वाढणे अटल होते. यामुळे नुसती आकर्षकता पुरेशी रहात नाही. जोमदार जनुके असणे याचा अर्थ भक्षकांपासून वाचणे, भक्ष्ये मिळवणे, आतून हल्ला करणाऱ्या परोपजीवींपासून वाचणे एवढाच उरत नाही तर स्वजातीतील इतर नरांपासून वाचणे हा प्रश्न देखील उभा ठाकलेला असतो.
बहुगामी प्रजातीत निवडलेल्या नराला स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी, इतर नरांना पिटाळून लावणे, मारून टाकणे किंवा मारामारीत लोळविणे आवश्यक बनते. यातून आक्रमकतेची व बलदंडतेची जनुके स्थिरावू लागतात. उदाहरणार्थ एलेफंट-सील या प्रजातीत नराचे वजन हे मादीच्या वजनाच्या तिप्पट बनले आहे.
आकर्षणाचा मोहरा बलदंडतेकडे वळविण्याद्वारे माद्या त्यांचे ‘निवडकर्ती’ हे स्थान स्वतःहून गमावून बसतात. कारण पराक्रमी नरोत्तम आपले बल इतर नरांना पिटाळून लावण्यापुरते न वापरता माद्यांना वठणीवर आणण्यासाठीही वापरू लागतात! अशा ‘बलोपासक’ प्रजातीत पराक्रमी नरोत्तम हा टोळीपती व टोळीपिताही बनतो व पॉलीगामीबरोबर पॅट्रिआर्की (पितृराज्य) देखील प्रस्थापित होते.
पितृराज्य स्थापन झालेल्या प्रजातीत, जो नर राजेपद बळकावील(कमिंग टू प्राईड) त्या नराचा अनुनय करण्यात माद्यांचा जनुकीय स्वार्थ अडकला जातो. माद्या स्वतःहून पदच्युत राजापासूनचे गर्भ पाडून नव्या राजाचे स्वागत करण्यास, वेळ न दवडता सज्ज होतात!
अर्थात बलिष्ठता एकच गुण प्राण्याच्या एकूण स्वार्थासाठी कधीच पुरेसा नसतो. इतर बाबतीत जोमदार (उदाहरणार्थ आरोग्य, सांघिक-कामगिरी, संगोपननिष्ठा) जनुके ही सर्वात बलवान नसलेल्या नरांत उपलब्ध असू शकतात. अशा इतर सर्व नरांना संधी नाकारण्याने जनुकीय अपव्ययही होतो. शिवाय नर-नर संघर्षसुध्दा अपव्ययकारी असतोच. याचा प्रजातीला उलट फटका बसून ताळ्यावर आणणारी प्रक्रिया सुरू होते. याही बाबतीत ती ती प्रजाती टोकाच्या मक्तेदारीकडून काहीशा उदारतेकडे सरकते. राज्यकर्त्या नरांमध्ये इतर नराबाबत सहिष्णुता वाढते. नर-नर संघर्षात होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण व बलेतर गुण-प्रवर्तक जनुकांची गरज यानुसार संधीप्राप्त/वंचित नरांचे गुणोत्तर वाढते. यालाच रीझनेबल ऑपॉरचुनिटी रेशो असे म्हणतात.
संगोपननिष्ठा/आकर्षकता/बलिष्ठता या गोष्टी आपण जरी वेगळ्या काढून पाहिल्या तरी पत्यक्षात त्या त्या प्रजातीत तीनहीचे स्थिरतम मिश्रणच साधले गेलेले असते.
प्रोग्रॅम्ड टु बी सेल्फ-प्रोग्रॅमेबल
वरील मांडणी मनुष्याबाबत थेटपणे लागू करता येणार नाही. मनुष्याचे सांस्कृतिक अंग हे त्याच्या प्राकृतिक अंगापासून खूपच स्वायत्त बनलेले आहे. एकूणच जीवनसंघर्षातले सर्वच ‘पक्ष’ एकमेकावर भरपूर कुरघोड्या करीत असतात. आवश्यक वर्तनप्रकारांची व्यामिश्रता आणि जटिलता जसजशी वाढत जाते तसतसे जनुकांचे जीवावरील थेट नियंत्रण सुटून जनुकांना अधिकाधिक प्रमाणात मज्जासंस्था विकसित करावी लागते. यातून जीवांच्या अबोध सचेतनतेचा सबोध सचेतनतेकडे विकास होत गेलेला आहे.
मनुष्याच्या उदयानंतर उत्क्रांतीच्या घड्याळाशिवाय इतिहासाचे घड्याळही सुरू झालेले आहे. इतिहासाचे घड्याळ उत्क्रांतीच्या घड्याळापेक्षा वेगवान आहे. कारण अबोधपणे होत राहणाऱ्या निखळ संतुलनातून चालणाऱ्या उत्क्रांतीत शिकणे ही प्रक्रिया थेट मरूनचकरावी लागते. म्हणजे असे की सुयोग्य वर्तन करू न शकणारा जीव व्यक्तीशः मरतो. इतकेच नव्हे तर अरिष्टात सापडलेल्या एखाद्या प्रजातीला नेमके तारणारे नवघटन (म्युटेशन) यदृच्छया ‘लाभले’ नाही तर ती प्रजाती नष्ट होते. अनेक व्यक्ती-जीव मरूनच ‘तोल-साधलेले’व्यक्ती-जीव उरतात आणि अनेक प्रजाती नष्ट होऊनच तोल साधलेल्या प्रजाती उरतात. माणसांना मात्र चुकांपासून शिकण्यासाठी, चूक-प्रवर्तक-जनुक एकूण जनुकसंचातून लुप्त होईपर्यंत, थांबावे लागत नाही.
मज्जासंस्था निर्माण करून जनुकांनी जीव-प्रचालनावरील त्यांची थेट पकड ढिली केली व मज्जासंस्थाकडे सोपवली. माणसाच्या मेंदूने आत्मपरीक्षक जाणीव निर्माण करून मेंदूची थेट पकडही ढिली केली. जाणीवेला स्वायत्तता लाभलेल्या मनुष्याचे वर्णन प्रोग्रॅम्ड टु बी सेल्फ-प्रोग्रॅमेबल असे केले की विज्ञानाचे कारणमय जग आणि आपले संकल्पमय जग यांच्यात विसंगतीरहित-सह-अस्तित्व (कंपॅटिबिलिटी) येते. जनुककेंद्री उत्क्रांतीशास्त्र म्हणजे जनुक-नियतता-वाद(जेनेटिक डिटरमीनिझम) नव्हे. “जोपासिताद्वारे सहजातता”(नेचर व्हाया नर्चर) हे शीर्षक या दृष्टीने बोलके आहे. प्रश्न प्रकृतीबरोबर वहात जाण्याचा नसून प्रकृतीबाबतच्या जाणतेपणातून तिला ओलांडण्याचा आहे.
मनुष्यांतील नर-मादींची हंटर-गॅदरर(पुरुषांनी लांब जाऊन शिकार करणे आणि स्त्रियांनी वास्तव्यस्थानाच्या जवळपासचे वनस्पतीज अन्न जमवणे) झालेली जडणघडण खरे तर त्यांच्यात समता आणण्याला उपकारक अशी होती. शेतीच्या शोधानंतर लढाईत जिंकलेल्यांनी हरलेल्यांना गुलाम करणे व्यवहार्य बनले. यातून सरंजामी पितृसत्ताक व्यवस्था शक्य झाली. आधुनिकतेच्या उदयानंतर हे चित्र पुरतेच पालटले. या स्थित्यंतरानी स्त्री-परुष संबंधात येणारी परिवर्तने हा मोठाच विषय आहे. वरील मांडणी ही मनुष्याच्या कथेची नसून त्याच्या प्राकृतिक पूर्वपीठिकेची आहे. ती तेवढीच घ्यावी व स्त्री-पुरुषांना थेटपणे लावू नये.
मनुष्यावर जनुकीय दबाव नसतात असे नाही. पण हे दबाव मूळ स्वरूपात व्यक्त न होता सांस्कृतिकरीत्या बदललेल्या भावार्थांमध्ये व्यक्त होतात. उदाहरणार्थ नरांकडे निवड आली की ते शक्यतो सुप्रज मादीची निवड करीत असत. यातून यौवनाचे आकर्षण निर्माण होते आज आपण जे सौद्र्याचे आकर्षण म्हणतो ते मुळात यौवनाचे आकर्षण असते. अशी अर्थांतरे पुष्कळच शोधता येतात. मुख्य मुद्दा हा आहे की जीवोर्मींची ‘विषयांतरे’ जाणीवेने करता येतात आणि हाच तर संकल्प-स्वातंत्र्याचा आधार आहे.