Wednesday, October 12, 2022

लेणी

 ऐतिहासिक नाणेघाटला जाताय? तर आवश्य वाचाच.

मित्रांनो आपण जर जुन्नर तालुक्यातील जुन्नर ते नाणेघाट प्रवास करत असाल तर आपण लेख आवश्य एकदा वाचा व खालील ऐतिहासिक वारसा क्रमानुसार नक्कीच पहायला विसरू नका.
१) *माणमोडी बौद्ध लेणी समूह.*
किल्ले शिवनेरी च्या पुर्वेस पुर्व- पश्चिम पसरलेल्या डोंगररांगेस माणमोडी डोंगर असुन या डोंगरात तीन लेणी समूह पहायला मिळतात.
१)अंबा अंबिका लेणी समूह
२) भिमाशंकर लेणी समूह
३)भूतलिंग लेणी - समूह हा जुन्नरच्या मानमोडी डोंगरात आहे . मानमोडी लेणी समूहातील लेण्यांपैकी लेणे क्र . 40 हे भूत लेणी चैत्यगृह असून हे जुन्नरमधील सर्वात देखणे दर्शनी भाग असलेले आहे . चैत्यकमानीवर पंचफणाधारी नागराज , मनुष्यरूपातील गरुड शिल्प कोरले आहे . या शिल्पांना स्थानिक लोक भुते , तर त्यांच्या बाजूस असलेल्या स्तूपांना लिंग समजत . यावरून या लेण्यास ‘ भूत ' किंवा ' भूतलिंग ' असे नाव पडले असे म्हटले जाते .
२) *किल्ले शिवनेरी*
शिवनेर किंवा कुकडनेर या खोऱ्यामध्ये शिवनेरी हा प्राचीन किल्ला आहे . हा किल्ला महान मराठा राजा श्री. शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे . याच्या पायथ्याला जुन्नर गाव आहे . या दुर्गावर शिवाई देवीचे मंदिर , गंगाजमना टाकं , शिवकुंज , शिवजन्मस्थान इमारत आणि तिन्ही बाजूंना कोरीव लेणी आहेत . संपूर्ण देशातून असंख्य शिवप्रेमी व पर्यटक दर्शनासाठी वर्षभर या किल्याला भेट देतात .
३) तुळजाभवानी बौद्ध लेणी समूह
जुन्नर शहरापासून पश्चिमेस ४कि.मी अंतरावर आपणास हा तुळजाभवानी लेणी समूह पहायला मिळतो. महाराष्ट्रातील सर्वात प्रथम कोरलेला हा लेणी समूह असुन येथील १२ खांबावर तबकडीच्या आकाराची तरलेली लेणी ही विशिष्ट प्रकारची असुन ती इतरत्र कुठेही पहावयास मिळत नाही.
४) *किल्ले चावंड*
जुन्नरच्या पश्र्चिमेला नाणेघाट डोंगररांगेतील उत्कृष्ट कातळ अंड्यांची सुंदर भौगोलिक रचना असलेला अर्थात किल्ले चावंड हा गिरिदुर्ग आहे . किल्लूयावर पुष्करणी, सरकारी वाडा, धान्य कोठार व पाण्याच्या टाक्या आहेत. सप्तमातृका टाक्या पाहुन किल्याचा काही आगळावेगळा इतिहास असावा असे वाटते. किल्यावर चावंडा देवीचे मंदिर आहे . गडावरून कोकणातील विस्तृत प्रदेश पाहता येतो , माणिकडोह धरण, किल्ले हडसर, किल्ले निमगिरी आणि परीसराचे दर्शन सुरेख होते . हा गिरिदुर्ग जुन्नरचा महत्वाचा भू - वारसा आहे .
५) *कुकडेश्वर मंदिर* Kukadeshwar Temple
कुकडेश्ववर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी एक आहे . अखंड दगडात केलेले कोरीव काम आणि स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर तुलनेने अप्रसिद्ध आहे . नवव्या शतकातील शिलाहारवंशीय झंझ राजाने हे मंदिर बांधले . या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो . चुन्याचा वापर न करता एकावर एक दगड रचून हे मंदिर तयार केले गेले .
६) *ऐतिहासिक नाणेघाट*
नाणेघाट परिसर कोकणपट्टी आणि देश यांच्यामध्ये उभ्या असणाऱ्या सह्याद्रीतून माणसांची अन् वाणसामानाची ने - आण करण्यासाठी एका उत्तम घाटवाटेची निर्मिती सातवाहनांच्या साम्राज्याने नाणेघाटाच्या रुपात केली . या घाटमाथ्यावर ' नानाचा अंगठा ' नावाचा सुळका आहे . त्याला खेटूनच सुमारे ६० मी . लांबीचा अन् २ ते ५ मी . रुंदीचा नाणेघाट हा खोदीव नळीचा किंवा बोळीचा भाग आहे . त्याकाळच्या व्यापारी मालावर याठिकाणी जकात आकारली जात असे. त्यासाठी येथे लेण्या कोरलेल्या असुन त्याच लेणित २२०० वर्षांपूर्वी शिलाले कोरण्यात आला असून विविध दाणधर्माचा त्यात उल्लेख केला आहे व हाच शिलालेख मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा सर्वात मोठा पुरावा मानला जातो.
७) *किल्ले जीवधन* - वांदरलिंगी सुळका Jeevdhan Fort - Vandarlingi Pinnacle
जुन्नरच्या पश्र्चिमेला नाणेघाट डोंगररांगेतील मुकुटमणी अर्थात किल्ले जीवधन हा गिरिदुर्ग आहे . किल्लूयावर गजलक्ष्मीचं शिल्प आहे . गावकरी याला कोठी असे संबोधतात . किल्यावर जीवाई देवीचे मंदिर आहे . गडावरून कोकणातील विस्तृत प्रदेश पाहता येतो , वांदरलिंगी सुळक्याचे व नाणेघाटाचे दर्शन सुरेख होते . हा गिरिदुर्ग आणि सुळका जुन्नरचा महत्वाचा भू - वारसा आहे .
संपूर्ण लेख हा copyright ©️ असुन आपण संपूर्ण माहिती व नावासहीतच प्रसारीत करू शकता.
लेख/ छायाचित्रे - श्री रमेश खरमाळे, माजी सैनिक
मो. नं. ८३९०००८३७०