By
- ओंकार करंबेळकर
- बीबीसी मराठी प्रतिनिधी
Ref https://www.bbc.com/marathi/articles/c6pw91j9z1xo?fbclid=IwAR0-SJvj4Np5Wuosd88ws_33A6__Rb4dZmEY-gDd9fSKxw5VLo1zXtmFRaY
पेशव्यांनी मराठेशाहीच्या कारभाराची सूत्र हाती घेतली खरी. अगदी अटक, दिल्ली, उत्तर भारतामध्ये मराठी झेंडा रोवला. उत्तर दक्षिणेत, पूर्वेलाही दबदबा निर्माण केला. पण याच वैभवाचा अस्तही पेशवाईच्याच काळात झाला.
पहिल्या बाजीरावांनी तलवार हाती घेऊन शौर्याला सुरूवात केली.
शत्रूचा पाठलाग केला पण शेवटच्या बाजीरावाच्या काळात हेच दान उलटं पडलं.
शेवटच्या बाजीरावाला शत्रूला पाठ दाखवून पळत राहावं लागलं. याच बाजीरावांबद्दल आपण येथे माहिती घेणार आहोत.
आहे दीर्घायुषी पण...
दुसऱ्या बाजीरांवापर्यंत जाण्याआधी आपण पेशव्यांच्या घराण्यातील मुख्य व्यक्तींची आणि ते कोणानंतर पेशवे पदावर आले याची धावती उजळणी करू.
बाळाजी विश्वनाथ भट यांना छ. संभाजी महाराजांचे पुत्र म्हणजे सातारचे शाहू यांनी पेशवाईची वस्त्रं दिली.
त्यांना पहिले बाजीराव आणि चिमाजी अप्पा हे दोन पुत्र होते.
बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर पहिले बाजीराव पेशवे झाले.
पहिल्या बाजीरावांना नानासाहेब, समशेरबहादूर आणि रघुनाथराव असे तीन पुत्र होते. त्यांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशवे झाले.
नानासाहेबांना विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव असे तीन पुत्र होते. त्यातील विश्वासराव पानिपतच्या युद्धात कामी आहे. त्यामुळे नानासाहेबांनंतर माधवराव पेशवेपदी आले.
माधवरावांचा मृत्यू झाल्यानंतर नारायणराव पेशवे झाले. मात्र, नारायणरावांची शनिवारवाड्यातच हत्या झाली.
त्यामुळे काही काळ पहिल्या बाजीरावांचे पुत्र रघुनाथराव यांनी पेशवेपद काबिज केलं. पण थोड्याच अवधीत नारायणरावांचे पुत्र सवाई माधवराव पेशवे झाले.
रघुनाथरावांच्या एका पुत्राचे नाव बाजीराव रघुनाथ म्हणजेच दुसरे बाजीराव.
सवाई माधवरावांचा शनिवारवाड्यातच कारंजावर पडून मृत्यू झाल्यावर दुसरा बाजीराव पेशवेपदी आले.
तसं पाहाता पेशव्यांच्या म्हणजे भट घराण्यातील शूर पुरुषांना फारसं आयुष्य लाभलं नव्हतं.
पहिले बाजीराव यांना 39, चिमाजी अप्पांना 33, नानासाहेबांना 40, माधवरावांना 27, नारायणरावांना 18, सवाई माधवरावांना 21, रघुनाथरावांना 49 वर्षांचं आयुष्य लाभलं होतं. दुसरे बाजीराव याबाबतीत मात्र अत्यंत सुदैवी म्हणावे लागतील. त्यांना 76 वर्षांचं आयुष्य लाभलं.
पेशवाईचा उतरतीचा काळ, अस्त त्यांनी पाहिला किंबहुना त्या अस्तासाठी ते कारणही ठरले. पेशवाईच्या अस्तानंतर ते विजनवासासारखं आयुष्य पुण्यापासून लांब कानपूरजवळ बिठूर येथे जगले.
दुसरे बाजीराव पेशवे झाले
रघुनाथरावांना दुसरे बाजीराव, चिमाजीराव दुसरे हे पुत्र आणि अमृतराव हे दत्तकपुत्र होते.
दुसरे बाजीराव हे रघुनाथराव पेशवे आणि आनंदीबाई यांच्या पोटी 10 जानेवारी 1775 रोजी धार येथे जन्मले.
सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी यशोदाबाई यांनी नाना फडणवीसांच्या सल्ल्याने रघुनाथरावांचे कनिष्ठ पुत्र चिमाजी दुसरे यांना दत्तक घेतलं होतं. मात्र चिमाजी दुसरे हे यशोदाबाईंचे नात्याने चुलत सासरेच होते.
हे दत्तकविधान नाकारून आपणच पेशवे व्हावं यासाठी दुसऱ्या बाजीरावांनी खटपट सुरू केली. सर्वप्रकारचे प्रयत्न करुन त्यांनी ते मिळवलंही. हे दत्तक विधान अशास्त्रीय आहे हे सिद्ध करुन 1796 साली पेशवाई हातात घेतली.
दुसऱ्या बाजीराव यांच्या बालपणाचं वर्णन वाचलं की अत्यंत हट्टी आणि खोडकर स्वभावाचे ते असणार याचा प्रत्यय येतो. आनंदीबाईंनी लिहिलेल्या माहितीमध्ये त्यांच्या वर्तनाची झलक दिसते.
एकतर वयाच्या 8 व्या वर्षीच त्यांचे वडील म्हणजे रघुनाथराव पेशव्यांचं निधन झालं होतं. त्यापुढे वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत त्यांनी आपल्या आई आणि भावंडांसह नाना फडणवीसांनी दिलेल्या नजरकैदेतच काढली होती.
कधी आनंदवल्ली तर कधी कोपरगाव असा त्यांचा मुक्काम होता.
नाना फडणवीसांनी दुसऱ्या बाजीरावाच्या शिक्षणाची सोय नीट केली नाही, हा मुलगा आपल्या समोरच वाईट वागतो, त्याला मारावंही लागतं याची खंत आनंदीबाईंनी नमूद केली आहे. यास कोणी जपत नाही, मूल शहाणे होऊ नये असे साऱ्यांस वाटते, मूल नासून टाकले अशी वाक्यं आनंदीबाईनं लिहून ठेवलेली आहेत. दुसऱ्या बाजीरावाने आपली बालवधू भागीरथीबाईशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आनंदीबाईने त्याला मनाई केली. त्याला लहानखोर बाजीरावाने वाईट उत्तरही दिलं, तेव्हा त्याला चपराक आणि लाथा लगावल्याचं आनंदीबाईनं नमूद केलेलं आहे.
नाना फडणवीसांचा मृत्यू
त्यामुळे असं नजरकैदेतलं जीवन, रघुनाथरावांना पेशवेपद न मिळणं या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या आयुष्यावर नक्कीच प्रभाव पडला असणार.
नाना फडणवीसांमुळे हे असं जगणं जगावं लागलं. सवाई माधवरावांनंतरही आपल्याऐवजी आपल्या कनिष्ठ भावाला नानांनी पेशवेपद देणं हे सगळं नक्कीच त्रासदायक वाटत असणार. त्यानं नानांना कैदेत टाकून थेट नगरला पाठवलं.
पण नंतर इंग्रजांशी तोंड द्यायला कोणीच मुत्सद्दी तोडीचा नाही हे कळल्यावर एका वर्षात सुटकाही केली. नगरवरून सुटका झाल्यावर काही काळातच 13 मार्च 1800 रोजी नानांचा मृत्यू झाला.
'कंपनी सरकार' या पुस्तकात लेखक अ. रा. कुलकर्णी लिहितात, "नाना फडणीस, पेशवा आणि शिंदे यांना इंग्रजांबरोबर भांडण उकरून काढण्याच्या त्यांच्या प्रयत्नापासून त्यांना परावृत्त करीत होता. पण नव्या पेशव्याच्या काळात नाना कवडी किमतीचा झाला होता. त्यांना नानाचा शहाणपणाचा सल्ला नको होता, तर नानाच्या गाठी असलेला पैसा हवा होता. बाजीराव 22 वर्षांचा आणि त्याचा मित्र दौलतराव 18 वर्षांचा. दोघेही अपरिपक्व आणि राजकारणात नवखे होते. अशा परिस्थितीत ते सापडले असताना त्यांना नानाचा सल्ला नकोसा झाला होता."
नानांच्या मृत्यूनंतर...
नाना फडणवीसांचा मृत्यूमुळे महाराष्ट्रातला शहाणपणा आणि नेमस्तपणाही लयाला गेला असं कर्नल पामरनी म्हटलं होतं. आणि ते अगदीच खरं झालं.
नानांच्या मृत्यूनंतर पुण्यावर हक्क सांगायला शिंदे होळकरांमध्ये चढाओढ लागली. त्यातच विठोजी होळकरांना हत्तीच्या पायी देऊन दुसऱ्या बाजीरावांनी होळकरांचा राग ओढवून घेतला.
1802 पासून याचे परिणाम दिसून गेले. होळकरांनी थेट पुण्यावरच चाल केल्यावर पुण्यात कोलाहल माजला. बाजीरावानी पुणं आणि आपलं पद वाचवण्यासाठी इंग्रजांच्या मदतीची वाट धरली. त्यातूनच 1803 साली वसईचा तह झाला. त्याचवर्षी शिंदे आणि भोसले यांचे इंग्रजांशी युद्ध झालं आणि त्यात इंग्रजांचा विजय झाला. होळकरांना 1805 साली इंग्रजांशी तह करावा लागला.
शनिवारवाड्यावर युनियन जॅक
या घडामोडींमुळे इंग्रजांना पुण्यात प्रवेश मिळाला. परंतु पुण्यातील घडामोडी काही थंडावल्या नाहीत. बडोद्याच्या गायकवाडांचे दिवाण गंगाधरशास्त्री यांची पंढरपुरात हत्या झाली.
इंग्रजांचा रेसिडेंट माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने याचा आरोप बाजीराव आणि त्यांचा सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्यावर ठेवला. त्रिंबकजी डेंगळेंना अटक करुन ठाण्याच्या तुरुंगात ठेवलं पण तिथून ते पळून गेले.
यानंतर त्रिंबकजी आपल्यावर हल्ला करेल अशी सतत भीती एलफिन्स्टन आणि इंग्रजांना वाटत होती. त्याला आपल्याकडे स्वाधीन करा अशी मागणी एलफिन्स्टन सतत करत राहिला, त्यासाठी पुण्याला वेढाही दिला.
पण इंग्रजांच्या मनातली हल्ल्याची भीती कमी झाली नाही. त्यात इंग्रजांवर हल्ला करायचा की नाही यावर धरसोड भूमिका दुसऱ्या बाजीरावाने घेतलेली दिसते.
अखेर 1817 च्या नोव्हेंबर महिन्यात इंग्रज आणि मराठे यांची येरवड्यात लढाई झाली आणि इंग्रज विजयी झाले. त्यानंतर इंग्रजांनी पुण्यावर ताबा मिळवला. बाळाजीपंत नातूंनी शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकवला.
येरवड्यानंतरही इंग्रजांनी कोरेगाव, गोपाळ अष्टी, शिवनी इथं मराठ्यांचा पराभव केला. या लढायांमुळे पेशवाई आणि मराठी सत्तेचा सूर्य कायमचा अस्ताला गेला.
वसईच्या तहापासून सुरुवात झालेली सत्तेची संध्याकाळ अखेर 1818 साली रात्रीत रुपांतरित झाली.
त्रिंबकजी डेंगळे यांच्या या प्रयत्नांबद्दल इतिहासअभ्यासक आणि डेंगळे यांचे वंशज सुमित डेंगळे यांनी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली.
ते म्हणाले, “1811 नंतर त्रिंबकजी डेंगळे यांचं पेशवाईत प्रस्थ वाढलं. त्यांच्या सल्ल्यानचं दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाची योजना आखली. गडकिल्ल्यांच्या डागडुजी सुरू झाल्या, भांबुर्डा (आजचं शिवाजीनगर) इथं नवा तोफखाना सुरू झाला, नवनव्या माणसांच्या महत्त्वाच्या जागांवर नेमणुका व्हायला लागल्या, लष्करभरती सुरू झाली. शिंदे, होळकर, गायकवाड, नागपूरकर भोसले यांच्या दरबारात वकील पाठवले गेले. इतकचं नव्हे तर हैदराबादचा निझाम व पंजाबचा राणा रणजित सिंह यांच्या दरबार सुद्धा वकील रवाना केले गेले. मध्य भारतातील पेंढाऱ्यांशी संधान साधलं गेलं.
1815 च गंगाधरशास्त्री खूनप्रकरण हे एकाअर्थी तिसऱ्या आंग्ल मराठा युद्धाला तात्कालिक कारण ठरलं. तयारी फार पूर्वी पासून होती असचं म्हणावं लागेल.
एल्फिन्स्टननं वेळोवेळी गवर्नर जनरलला त्रिंबकजींबद्दल कळवलं. 1802 च्या वसईच्या तहाच्या सगळं विरुद्ध त्रिंबकजी करतोय असं एल्फिन्स्टन म्हणतो.
1802 च्या वसईच्या तहानं सगळं इंग्रज आणि बाजीराव यांच्यात ठीक चाललं होतं. त्रिंबकजींनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना भरीस घातलं. आपलं बाधित झालेलं सार्वभौमत्व पुन्हा मिळवू असं ते पेशव्यांना सांगत असायचे. मग पेशव्यांनी तसे प्रयत्न सुरू केले.
गंगाधरशास्त्री प्रकरणानंतर त्रिंबकजींना ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात येतं. वर्षभराने ते तिथून शिताफीनं पलायन करतात. खानदेशात भिल्ल, साताऱ्याजवळ शंभू महादेव डोंगररांगांत रामोशी व मातंग समाज संघटित करतात. याची खरी त्यावेळी लंडनपर्यंत दखल घेतली गेली. दहा हजारांची फौज याकाळात जमा होते. जी तिसऱ्या आंग्ल मराठा युद्धात कामाला येते.
अर्थात दुसऱ्या बाजीरावांत नेतृत्वगुण नव्हते. पण काय करणार. त्यावेळी जवळजवळ दोन तृतीयांश भारत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इंग्रजांच्या अमलाखाली होता. मराठेशाही होती. पण तीही एकसंध नाही. विकेंद्रित. सरदार स्वायत्त. बाकी काही असो दुसऱ्या बाजीरावांना उशिरा जाग आली. संघर्ष केला त्यांनी. तिसरं आंग्ल मराठा युद्ध हा भारतातील फार मोठा संघर्ष इंग्रजांविरुद्धचा. त्याचे नायक, दुसरे बाजीरावच.”
शरणागती
इंग्रजांकडून असा पराभव झाल्यावर दुसऱ्या बाजीरावानं इंग्रजांना शरण जाण्याचा निर्णय घेतला. बाजीरावांचं पेशवे पद जाऊन त्यांना पेन्शनीवर कानपूरजवळ ब्रह्मावर्त म्हणजे बिठूरला पाठवण्यात आलं. 1818 नंतर मृत्यू येईपर्यंत ते तिथंच राहिले. त्यांचा धाकटा भाऊ चिमणाजीला वाराणसी तर अमृतराव या दत्तक भावालाही उत्तर प्रदेशात पाठवण्यात आलं.
ब्रिटिश अधिकारी माल्कमकडे जून 1818 मध्ये दुसऱ्या बाजीरावाने शरणागती पत्करली. त्या शरणागतीच्या अटींबद्दल अ. रा. कुलकर्णी यांनी कंपनी सरकार या पुस्तकात लिहिले आहे.
ते लिहितात, माल्कमच्या 1 जून 1818च्या पत्रातील अटी सारांशाने अशा होत्या, “बाजीरावाने स्वतःसाठी आणि आपल्या वारसासाठी पुण्याच्या सरकारवरील सर्व हक्क, पदव्या आणि अधिकार याचे त्यागपत्र लिहून द्यावे, ब्रिटिश अधिकारी माल्कमला बाजीरावाने एक दिवसाचाही विलंब न लावता शरण यावे आणि त्याच्या निवासाची जी जागा त्याने निश्चित केली असेल तिकडे जावे. उदारपणे ब्रिटिश सरकार जे पेन्शन ठरवेल त्याचा स्वीकार करावा. त्रिंबकजी डेंगळे आणि दोन इंग्रजांचा खून करमाऱ्या गुन्हेगारांना ब्रिटिशांच्या स्वाधीन करावे आणि पुन्हा दक्षिणेत मराठी मुलखात जाण्याचा प्रयत्न करू नये.”
ते पुढे लिहितात, “तहाच्या अटी आणि बाजीरावाचे दरसाल 8 लाख पेन्शन ठरविण्यात माल्कमनेच पुढाकार घेतला. कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलला या अटी फारशा पसंत नव्हत्या. बाजीरावाला संपूर्णपणे निपटून काढण्याची संधी आली आहे ती घालवू नये, त्याला इतकी मोठी पेन्शन अथवा काही जहागीर देऊ नये अशा तो मताचा होता. बाजीरावानेही थोडी घासाघीस करुन पाहिली. पण माल्कमने जे मनाशी योजले होते ते पूर्ण तडीस नेले, आणि मराठी सत्ता कंपनीच्या पदरी पडली. केवळ हेकेखोरपणा आणि मूर्खपणामुळे बाजीराव एवढ्या मोठ्या सत्तेला मुकला होता. इतिहासात कदाचित असे हे एकमेव उदाहरण असावे.”
खासगी जीवन
दुसऱ्या बाजीरावानी एकूण 11 लग्नं केली होती. त्यातील 1818 पूर्वी 6 आणि बिठूरला गेल्यावर 5 लग्नं केली. मात्र त्यांचे सर्व पुत्र आणि अनेक मुली अगदीच बालवयात मृत्युमुखी पडली. त्यामुळे त्यांनी धोंडोपंत (नानासाहेब), सदाशिवराव (दादासाहेब), गंगाधरराव (बाळासाहेब). पांडुरंग रावसाहेब यांना दत्तक घेतलं होतं.
शनिवारवाड्यात नारायणरावांचा मृत्यू झालेला असल्यामुळे दुसऱे बाजीराव इतर वाड्यांत राहात शुक्रवार, बुधवार, विश्रामबाग असे वाडे त्यानी बांधले. कोथरुड, फुलशहर, पाषाण अशी पुण्याजवळची ठिकाणं तयार केली होती. गुहागर, नाशिक, माहुली, वाई इथं वाडे बांधले होते.
पुण्यात असताना बाजीरावांचं आयुष्य अगदीच विलासी असल्याचं दिसून येतं. ऐतिहासिक गोष्टी या पुस्तकातील वर्णनानुसार त्याचा अंदाज येतो.
त्यात म्हटलं आहे, ’वाड्यांत दोनतीनशे बायका नित्य न्हावयास येत असत. त्यांनी सकाळी न्हावयाचा समारंभ करावा, तो प्रहर दिवसपर्यंत चाले! नंतर जेवावयाची तयारी झाल्यावर इच्छेस येईल त्या वाड्यात बाजीरावाची स्वारी जात असे. पंक्तीभोजनाचे समयीं सर्वकाळ बायका जवळ बसलेल्या असावयाच्या.’
अशा वर्णनांतून उत्तर पेशवाईतल्या विलासी वागण्याचा अंदाज येतो. काही लोकांना खुशमस्कऱ्यांना दुसरे बाजीराव कृष्णाचे अवतार वाटत. ते परत येतील अशी आशाही वाटे.
याच काळात पुण्यात बावनखणी नावांची कलावंतिणींची वसाहत तयार झाली होती.
अ. रा. कुलकर्णी यांनी पुण्याचे पेशवे या पुस्तकात पेशवेकालीन पुणे या प्रकरणात काही कलावंतिणींची नावंही दिली आहेत. सिवशानी, आनंदी तेलंगी, मिठा नायकीण पुणेकर, चपटपिना औरंगाबादकर, सावनूरवाली पना, करिमी दादा पोतनिसांची, गुजराथणी नारायणदासवाल्या, मथी थेरकरीण, मती टोपीवाली, भवानी आंवडापुरवाली, फुंदन सातारकर, लालन सभाकुंवरची, सतनी सातारकर, पिरा नाईकिणीची, बसंती उजनवाली, जमना नाईकीण मुंबईवाली अशी अनेक नावे त्यात आहे. याची नोंद पुणे नगर संशोधन वृत्तमध्ये आहे.
कृष्णदास नावाचा शाहीर लिहितो,
बाजिराव महाराज अर्जी ऐकतो बायकांची
चल गडे! जाऊं पुण्याशी, हौस मोठी माझ्या मनाची
या चैत्रमासी आनंद करा हळदी कुंकुं गौरींचे
नार गेली गं! वाड्यांत इने भेट घेतली खाशाची
या नारीने जाऊन कसा लाविला लाग
पति आमुचे घरी बसले काही रोजगार सांह
हा सर्वस्वी देह केला अर्पण करुनि आण तुमची....
श्रावणमासी दाटी पुण्यामध्ये नागपंचमीची
शुक्रवार पेठेत बसुनि हाजिरी घेतो बायकांची
अशी जिची योग्यता पाहुनी पैठवण करि तिची
काळी सांवळी गोरीचा तोरा फार
उभे रस्त्याने चालले पहा जोडव्याचे ठणकार
नारिच्या बळावर साधुनिया दरबार
कोट्यानकोटी द्रव्य मिळविले हे फार
कृष्णदास म्हणे ऐसा स्त्रिया घरोघरीं असती....
या वर्णनातून तेव्हाच्या पुण्यात काय चाललं होतं याचा अंदाज येतो. असं वर्णन अनेक शाहिरांनी केलं आहे.
ब्रह्मावर्तातलं आयुष्य
ब्रह्मावर्त म्हणजे बिठूरमध्येही हे जीवन असंच सुरू राहिल्याचं दिसतं.
मराठी रियासतीच्या आठव्या खंडात याचं वर्णन दिलं आहे. घोडे, उंट, हत्ती, पालख्या, गाड्या, मनुष्यबळासह ही रवानगी झालेली होती. बाजीरावांच्या छावणीला बिठूरला 6 मैल परिघाची जागा मिळाली होती. बिठूरला त्यांनी उत्तर वाडा बांधला आणि तो भव्य आणि युरोपियन तऱ्हेने भरपूर शृंगारलेला होता. दिवाणखाने मोठमोठ्या आरशांनी व झुंबरांनी गच्च भरुन गेले होते. तसेच भरगच्ची पडदे, रेशमी व जरीचे गालिचे, अनेक मौल्यवान चिजा होत्या. सोन्या चांदीचीं भांडी, हत्तीघोड्यांचे सोन्यारुप्याचे अलंकार, हौदे, अंबाऱ्या, मेणे, रथ, पालख्या होत्या. कुत्री, हरणं, काळवीटंही पाळली होती.
बिठूरलाही ब्राह्मणभोजन आणि भरघोस दक्षिणा सुरूच राहिल्या.
झाशीची राणी
बिठूरला राहात असताना दुसऱ्या बाजीरावाने केलेली एक महत्त्वाची पारख म्हणजे मनकर्णिका तांबे या लहानग्या मुलीचा झाशीचे राजे गंगाधरपंत नेवाळकरांशी करुन दिलेला विवाह.
लक्ष्मीबाईंचं मूळ नाव मनकर्णिका तांबे असं होतं. त्यांच्या वडिलांचं नाव मोरोपंत तांबे होतं. दुसऱ्या बाजीरावांचे भाऊ चिमाजी यांच्याकडे मोरोपंत वाराणसीमध्ये काम करत होते.
वाराणसीमध्येच मनकर्णिका म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. परंतु चिमाजींच्या निधनामुळे त्यांना वाराणसी सोडून दुसऱ्या बाजीरावांकडे ब्रह्मावर्त म्हणजे कानपूरजवळच्या बिठूरला यावं लागलं.
मनकर्णिका बिठूरला सर्वांची लाडकी मुलगी होती. तेव्हा तिला छबेली असंही म्हणत. परंतु तेव्हाच्या रितीप्रमाणं 12-13 वर्षांची होऊनही मनकर्णिकेचं लग्न झालं नव्हतं.
शेवटी साधारण चाळीशी उलटलेल्या गंगाधरराव नेवाळकर या झाशीच्या राजाबरोबर तिचा विवाह झाला आणि तिचं नाव लक्ष्मीबाई असं झालं.
तिचा नेवाळकरांशी विवाह होण्यामध्ये दुसऱ्या बाजीरावांनी मोठी भूमिका बजावली होती.
अखेर
दुसऱे बाजीराव 1818 पासून 1851 पर्यंत मृत्यू येईपर्यंत बिठूरला राहिले. त्यांच्या मुलांनी झाशीची राणी, तात्या टोपे यांच्याबरोबर 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात नेतृत्त्व केलं. मात्र या बंडाच्या काळात नानासाहेब, बाळासाहेब मृत्यू पावले.
रावसाहेब यांना इंग्रजांनी बिठूरच्या वाड्यासमोर फाशी देण्यात आलं. तात्या टोपेंना फाशी देण्यात आली तर झाशीच्या राणीला ग्वाल्हेरमध्ये लढता लढता मृत्यू आला.
दुसऱ्या बाजीरावांच्या जीवनाबद्दल इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “दुसरा बाजीराव राज्यावर आला तेव्हा मुळात राज्याची परिस्थिती अत्यंत भीषण होती. कुणाचा कुणाला पायपोस नव्हता. साधारण मराठ्यांच्या राज्यातच सगळे एकमेकांच्या विरुद्ध होते अशी काहीतरी परिस्थिती होती. या सगळ्यांना एका सूत्रात बांधून ठेवेल असा महादजी शिंद्यांच्या सारखा द्रष्टा माणूस राहिला नाही. आणि दुसरा बाजीराव जेंव्हा पेशवा झाला तेंव्हा त्याने पहिल्या दिवशी जाहीर करुन टाकलं की मी या सगळ्या वैभवाचा उपभोग घेण्यासाठी या पदावर आलेला आहे. वसईचा तह झाला तेव्हाच मराठ्यांचं राज्य जाण्याची सुरुवात झाली होती.
आणि जर दुसरा बाजीराव कुचकामी होता तर इतर सरदारांनी छत्रपतींना सांगून त्याला हाकलून देऊन दुसऱ्या कुणालाही पेशवा करून राज्य वाचवायला पाहिजे होतं कारण शेवटी कुठल्याही पदापेक्षा राज्य वाचवणं अधिक महत्त्वाचं होतं.”
संदर्भ-
- पुण्याचे पेशवे- अ. रा. कुलकर्णी
- जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ- अ. रा. कुलकर्णी
- कंपनी सरकार- अ. रा. कुलकर्णी
- नाना फडणवीस यांचे चरित्र- वा. वा. खरे
- मराठी रियासत खंड-8-उत्तर विभाग-3- गोविंद सखाराम सरदेसाई