Thursday, October 1, 2015

कर्म सिद्धांत

कर्म सिद्धांताबद्दल अनेकवेळा बोलले/लिहिले जाते. तथाकथित पुरोगामी विचारवंतांचा तर तो टिंगल करण्याचा विषय झाला आहे. हिंदू धर्माविषयी आस्था असलेल्या लोकांनाही कर्म सिद्धांत नीटसा कळला नसल्याने ते त्याचे लंगडे समर्थन करतात आणि त्यामुळे कर्म सिद्धांत अधिकच हास्यास्पद बनतो. पुरोहितांनी या कर्म सिद्धांताचा वापर चातुर्वर्ण्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि उच्च वर्णीय लोकांची महती वाढविण्यासाठी केला.

कर्म सिद्धांताचा उहापोह गीतेत झाला आहे. काही उपनिषदे त्याचा उल्लेख करतात. 'अष्टावक्र गीतेत' कर्मचा स्पष्ट उल्लेख नसला तरी मुक्त होण्याचा मार्ग सांगितला आहे. गौतम बुद्धाने या जीवनातील दु:खावर उपाय शोधताना अनेक प्रयोग केले. त्यातून तथागाताला जे ज्ञान झाले त्यात कर्म सिद्धांताला  महत्व आहे. परंतु कदाचित त्या काळापर्यंत कर्म सिद्धांताचे पुरोहितांकडून  विकृतीकरण झाले होते. म्हणूनच याला त्याने 'कर्म' नाव न देता 'संस्कार' (पाली भाषेत 'संखर') असे नाव दिले. तथागताने 'भवचक्र' ('भव' म्हणजे 'होणे'. 'भवचक्र' म्हणजे परत परत जन्म घेणे ) कसे चालते हे सांगताना या संस्कारांची किंवा कर्माची त्यामागे  काय भूमिका असते हे स्पष्ट केले आहे. गौतमाचा आग्रह प्रत्यक्ष अनुभूतीवर होता. ही अनुभूती मिळविण्यासाठी आणि त्याद्वारे दु:खातून आणि भवचक्रातून सुटका होण्यासाठी बुद्धाने विपश्यना (विपस्सना) ध्यानाचा मार्ग सांगितला आहे. विपश्यनेत प्रगती केल्यावर ही संस्कार (कर्म) साठविण्याची प्रवृत्ती, तिचा जीवनावर होणारा  परिणाम याची स्पष्ट अनुभूती होते.

बुद्धाने सांगितलेला सिद्धांत अगदी सरळ, सोपा आहे.

  1. आपल्या सहा इंद्रियांपैकी कशावर (पाच इंद्रिये आणि मन) बाह्य गोष्टीचा स्पर्श होतो. उदा, डोळ्याला काहीतरी दिसते, त्वचेला स्पर्श होतो, कानावर आवाज पडतो, जिभेवर चवीची जाणीव होते, नाकाला वास येतो, मनात विचार येतात. आपली ही इंद्रिये ही केवळ ती संवेदना ग्रहण करण्याचे काम करतात.
  2. ही संवेदना मेंदूपर्यंत पोचल्यावर मेंदूचा एक हिस्सा जागृत होतो आणि त्या संवेदनेचे विश्लेषण करतो. आपल्या पूर्व-स्मृतीतून अशी संवेदना या पूर्वी कधी झाली होती काय हे आठवितो.
  3. ही आठवण झाल्यावर मेंदूचा दुसरा हिस्सा काम करू लागतो आणि ही पूर्वी संवेदना सुखद होती का दु:खद याची चाचपणी करतो. 
  4. यावेळी पूर्वीचे संस्कार (कर्मे) जागृत होतात आणि वेगाने मनाच्या पृष्ठभागावर येऊ लागतात. हे संस्कार सुखद असतील तर संपूर्ण शरीरावर सुखद तरंग अनुभवास येतात, दु:खद असेल तर दु:खद तरंग अनुभवास येतात. हे सुखद तरंग काही काळच टिकतात. परंतु नंतर सुखद तरंगांच्या इच्छेमुळे परत दु:खच वाट्याला येते.
  5. हे संस्कार किती खोल आहेत त्यावर हे सुखद/दु:खद तरंग किती प्रमाणात जाणवतात हे अवलंबून असते. या संस्कारांचा प्रभाव शरीरावर क्षणमात्र असतो, परंतु असे संस्कार एकापाठोपाठ जागृत होतात आणि बराच काल ही अवस्था टिकते. 
  6. हे संस्कार शरीरावर प्रकट झाल्यावर आपण अनवधानाने प्रतिक्रिया देतो. हे संस्कार आपल्या अंध प्रतिक्रियेमुळे वृद्धिंगत होतात, त्यांना बळ मिळते आणि ते परत अंतर्मनात खोलवर जातात. पुन्हा संधी मिळताच ते उफाळून वर येतात. प्रतिक्रिया न दिल्यास त्यांची उर्जा संपते (निर्जरा होते) आणि ते नष्ट होतात.
  7. हे संस्कार देहाच्या (रूपस्कंद) पुढील क्षणाला सतत जन्म देतात. आणि आपल्याला देहाचे सातत्यीकरण जाणवते.
  8. माणसाच्या मृत्युच्या क्षणी यातील एखादा संस्कार (इच्छा) डोके वर काढते आणि हे संस्कारांचे (पूर्वसंचीत कर्मांचे ) गाठोडे एका शरीराला (रूप स्कंद) जाऊन चिकटते आणि नवा जन्म (भव) मिळतो. याला भवचक्र म्हणतात.  हा मृत्युच्या क्षणी जागा झालेला संस्कार आपले पुढील आयुष्य कसे असेल हे ठरवितो.
विपश्यनेत ध्यानात खोलवर गेल्यावर हे पूर्वसंस्कार जागृत कसे होतात आणि आपण नकळत त्याला प्रतिक्रिया करून त्यांचे सामर्थ्य कसे वाढवितो हे स्पष्ट जाणवते. संस्कार जागृत झाल्यावर त्याला प्रतिक्रिया न करणे आपल्या हातात असते. त्यामुळे पूर्वसंस्कार (कर्मे) निर्जरा होऊन नष्ट होतात आणि मानसिक शांतता अनुभवास येते. हा वैयक्तिक अनुभव असल्याने त्याचे सामाजीकरण होऊ शकत नाही आणि तथाकथित पुरोगामी याची खिल्ली उडवू शकतात.

सुखद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पुण्यकर्म म्हणता येईल तर दु:खद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पापकर्म म्हणता येईल. पुण्यकर्म आणि पापकर्म हे एकमेकांना Cancel करीत नाहीत. पुण्यकर्म आणि पापकर्म यांना पांढऱ्या आणि काळ्या दगडांची उपमा देता येईल. माणूस या पुण्यकर्म आणि पापकर्म या दगडांनी भरलेली झोळी घेऊन फिरत असतो. काळ्या आणि पांढऱ्या दोन्ही प्रकारच्या दगडांना वजन असते आणि ते नेताना तो माणूस थकून जातो.

ध्यान हे संस्कारांना प्रतिक्रिया न देण्याची प्रक्रिया आहे. त्याचा कोठल्याही देवाशी, परमेश्वराशी संबंध नाही. हे प्रक्रिया शिकण्यासाठी काही प्रकारच्या ध्यानात देवाचा/ परमेश्वराचा उपयोग केलेला असतो. संस्कार जागृत होतात तेव्हा सावध राहून प्रतिक्रिया न दिल्यास अंतर्मनात दडलेले (अनुशय) संस्कार वेगाने बह्य्मानावर येतात आणि प्रतिक्रिया न दिल्याने त्यांची निर्जरा होते.

ज्यावेळी सर्व कर्मसंस्कार शून्य होतात तेव्हा माणूस कैवाल्यावस्थेस/मुक्तावस्थेस पोचतो. जर कोठलेही काम करताना मनाच्या समतोल अवस्थेत असलो, म्हणजेच चांगले/वाईट, हर्ष/दु:ख याच्या पलीकडे जाऊन मन समतोल असेल तर नवी कर्मे निर्माण होत नाहीत. म्हणूनच साधूने/संताने काही केले तरी त्याला पाप/पुण्य लागत नाही असे म्हणतात. ध्यानाच्या सहाय्याने अशा समतोल अवस्थेपर्यंत पोचता येते.

कर्मसंस्कारांचा हा अर्थ ध्यानात घेऊन गीता अथवा उपनिषदे वाचल्यास त्याचा अर्थ उमगतो आणि ती निरर्थक पोपटपंची ठरत नाही.

कर्माचा अर्थ थोड्या शब्दात सांगण्याचा हा माझा प्रयत्न होता. मला कल्पना आहे की यातून जिज्ञासूंना अनेक नवे प्रश्न निर्माण होतील. हे प्रश्न येथे मांडल्यास मी माझ्या परीने समाधान करण्याचा प्रयत्न करेन. मात्र माझ्या काही तथाकथित पुरोगामी मित्राना जिज्ञासेपेक्षा भिन्नविचारी व्यक्तीना मूर्ख ठरविण्याची सवय आहे. त्यांना मी उत्तर देणार नाही.

कर्माचा अर्थ बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अनुभवातून समजण्याचा प्रयत्न करा हे मात्र मी आवर्जून सांगेन.  

2 comments:

  1. Ewdhya sopya shabdat itki awghad mahiti mandlya baddal dhanyawad. Yatli thodi mahiti me Vipassana la gele hote tenva mala milali. Ani 'anubhuti' ne kharach kalala ki apan kharach wicharanna fakta wichar mhanun pahat nahi. We attach meaning to the thoughts and react to supposed good and bad thoughts, without considering them just as 'thoughts'. This is something one must experience and not understand only through intellect. Rather this cannot be understood by intellect. My question was about social significance of karma. In vipassana Sankhara is an individualistic process where you are to look inside yourself and practice vipassana. But what I wonder is that when a crime takes place, maybe a human acts accoedig to his/her impulse and previous sankharas but what about the victim? What is the significance of the sankharas of the victim? Karma also is applied to the cycle of birth and rebirth , which I do not quite understand.Because if all the souls that exist today have been existing since eternity, does it mean the population of earth has been this much since last billion years? I have many questions about this and it is difficult to ask them all. But it will be very interesting if you can reply on this. I am very keen to learn more about this.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण विपस्सना शिबिरात जाऊन आला आहात हे वाचून आनंद झाला. घरी रोज विपस्सना केल्यास आणि वर्षातून एकदा दहा दिवसांचे शिबीर केल्यास झपाट्याने प्रगती होऊ शकते.
      आपल्याला पुढील प्रश्न पडला आहे: 'एखाद्या गुन्ह्यात त्या गुन्ह्याचा बळी ठरलेल्याचा गुन्हा काय? त्याचा पूर्वकर्माशी काही संबंध आहे काय?'
      खरेतर कर्मचा संबंध अंतर्मनाशी आणि भावनाशी आहे. बाहेर घडणाऱ्या घटना या केवळ यदृच्छेने घडणाऱ्या आहेत, ज्याला प्राचीन धर्मशास्त्रात 'लीला' म्हटले आहे. लीला म्हणजे 'खेळ', जो कोठल्याही उद्देशाविना केलेला असतो. मात्र या घटनांचा उपयोग आपण आपल्या कर्मांचा साठा कमी करण्यासाठी करू शकतो. जर एखाद्या घटनेचा बळी असलेल्या माणसाने त्या घटनेला जबाबदार असलेल्या गुन्हेगाराबाबत द्वेषभावना जागविली तर द्वेषभावनेचे संवर्धन होईल. मात्र अशा प्रसंगी जर तो मनाच्या समतोल अवस्थेत राहिला तर मनातील द्वेषाच्या पूर्वसंस्कारांचे निर्मुलन होऊ लागेल.
      आपल्या पुनर्जन्माच्या शंकेविषयी : आपण प्रत्येक आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानीत आहात. परंतु बुद्धाने 'आत्मा' अस्तित्वात नसून आपण केवळ पंचस्कांदांचे गाठोडे आहे असे मानले. आणि आपण परमशून्यात विलीन होतो असे मानले. उपनिषदांनी आपण पूर्णामध्ये विलीन होतो असे मानले. अर्थात दुसऱ्याच्या अस्तित्वाशिवाय पूर्ण आणि शून्य हे एकच ठरतात. यावर आपल्या बुद्धीच्या मर्यादांमुळे आपण अधिक खोलात जाऊ शकत नाही. आपण विचार करताना 'तर्क' या मोजपट्टीचा आधार घेतो. दुर्दैवाने या गोष्टी तर्काच्या पलीकडील आहेत आणि त्या तर्काने मोजता येत नाहीत. (जसे वस्तूची घनता मोजपट्टीने मोजता येणार नाही). त्यामुळेच या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही अशी माझी भूमिका आहे.
      आपण सतत वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक क्षणी सहा इंद्रियांवर उमटणाऱ्या संवेदनांचा मागोवा घेत राहू. तेच आपल्यासाठी सध्या उपयुक्त आहे.

      Delete