Friday, June 15, 2018

ईशावास्य उपनिषद -4

ईशावास्य उपनिषद हे 'कर्मयोग' सांगते हे आपण पहिल्या लेखात पहिले. गीतेतील कर्मयोगाचे हेच उगमस्थान असावे. या उपनिषदात अनेक परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्या नीट समजून घ्याव्या लागतात.
या उपनिषदात फलाची अपेक्षा न करता कर्म करावे असे सांगितले आहे. परंतु या जगात मृत्यूपर्यंत सकाम कर्म करावे लागते असे सांगत त्याचाही निषेध केलेला नाही. निष्काम कर्म अधिक चांगले हे मात्र सांगितले आहे. निष्काम कर्म आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून अर्थात भवचक्रातून सोडविण्यास उपयुक्त ठरते असे हे उपनिषद सांगते.
इंद्रियांच्या (आवश्यकतेपेक्षा अधिक) तृप्तीसाठी  कर्मे करणारा माणूस अंध:कारात जातो. परंतु केवळ अहंकाराच्या पूर्तीसाठी कर्मे करणारा माणूस घोर अंध:कारात जातो असे हे उपनिषद सांगते.
उपनिषद ब्रह्माच्या दोन रुपांसंबंधी सांगते. एक प्रकट रूप आणि दुसरे अप्रकट. या दोन्ही रूपांची आराधना केली जाऊ शकते. परंतु या दोन्ही आराधानेची फले वेगळी असतात. प्रकट रूपाची आराधना मृत्युपर्यंत फळे देते. परंतु अप्रकट रुपाची आराधना मृत्युनंतरही फले देते.
सत्य हे सुवर्णाच्या झाकणाने झाकलेले असते असे हे उपनिषद सांगते. सत्य समजून घ्यायचे असेल तर सुखदु:खापलीकडे जावे लागते. परंतु मनुष्य सुखाचा अनुभव सोडायला तयार नसतो. या अनुभवाची तो पुन:पुन: प्रतीक्षा करतो. हेच ते सुवर्णाने झाकलेले सत्याचे मुख. सुखाच्या अनुभवालाही दूर लोटून माणूस पुढे जातो तेव्हाच त्याला शाश्वत सत्याचा बोध होतो.
सर्व ईश्वराचेच आहे, 'माझे' म्हणण्यासारखे जगात काहीच नाही. म्हणून 'ममत्वाला' काहीच अर्थ नाही. 'मी' हा 'माझे' भावनेवर पोसलेला असल्याने 'मी'पणाही निरर्थक आहे हेच हे उपनिषद आग्रहाने सांगते.

1 comment: