Monday, June 4, 2018

प्रास्ताविक

वेद हा प्राचीन भारतीय ज्ञानसंपत्तीचा अमुल्य वारसा आहे. विषयाच्या दृष्टीने पाहिल्यास वेदांची तीन भाग ('कांड') करता येतात.  कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. वेदांच्या ज्ञानकांडाचे दुसरे नाव 'उपनिषद' आहे. विश्वाच्या उत्पत्तीचा आणि मूलतत्वाचा विचार हा उपनिषदांत केलेला आहे. उपनिषदांनी नेकाना भुरळ घातली. यात केवळ हिंदू नाहीत तर अन्य धर्माचेही लोक होते. शहजहानचा मोठा मुलगा आणि गादीचा वारस (जो नंतर औरंगजेबाकडून मारला गेला) 'दारा शुकोह' याने फारसीत उपनिषदांचे भाषांतर केले आहे. दारा शुकोहच्या या भाषांतराची नंतर युरोपियन भाषेत भाषांतरे झाली. त्यामुळे युरोपियन लोकांना त्याबद्दल माहिती झाली. नंतर मॅक्समुल्लर, शोपेनहर आदी पाश्चात्य विचारवन्तांनी उपनिषदांची खूप स्तुती केली. एकशे बारा उपनिषदे प्रसिद्ध आहेत. शंकराचार्यांनी त्यापैकी दहा-बारा उपनिषदांवर भाष्य केली आहेत.
आपण भारतीय दुर्दैवाने या अमुल्य ठेव्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. या लेखमालेत आपण काही उपनिषदांचा थोडक्यात अभ्यास करू.
उपनिषदांत अत्यंत थोड्या शब्दात ज्ञानाचे सार सांगण्याचा ऋषींचा प्रयत्न आहे. ती समजण्यास कठीण आहेत. विशेषत: ज्याची अध्यात्मात फार वाटचाल झालेली नाही अशांना ती कठीण वाटतात. म्हणूनच उपनिषदे अथवा ज्ञानकांड हा वेदांचा शेवटचा भाग आहेत. कर्म आणि उपासना यांच्या सहाय्याने माणसाने आपली अध्यात्मिक प्रगती करावी आणि पुरेशी अध्यात्मिक पातळी गाठल्यावर उपनिषदे समजणे सोपे जाईल असा तो विचार असावा. पण माझा अनुभव असा आहे की आपल्यापैकी अनेकांची वाटचाल मागील जन्मांत अधात्माच्या मार्गाने झालेली असते. त्यामुळे त्याना उपनिषदे समजण्यास कठीण वाटत नाहीत.
खरे तर उपनिषदे ही उच्च अध्यात्मिक उंची गाठलेल्या गुरूंकडून प्रत्यक्ष समोर बसून समजून घेणे योग्य आहे. त्यातील अनेक खाचाखोचा तेच समोरासमोर समजावून देऊ शकतात. परंतु सध्याच्या गतिमान जीवनात ते कठीण आहे. त्यामुळे मी ही उपनिषदांचा अभ्यास पुस्तके वाचूनच केला. आणि माझ्या अल्पशा बुद्धीला जे समजले ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.
उपनिषदातील ईश्वराचे स्वरूप आनंदमय आहे. हा जीव मुळात ईश्वर असल्याने त्याची सर्व धडपड आनंद मिळविण्यासाठीच असते. परंतु हा आनंद अंतर्यामी न शोधता बाह्य गोष्टील शोधण्यास सुरुवात केल्याने माणूस बंधनात पडतो. बंधन हे दु:खात लोटते. माणसाला आपल्या आनंदमय स्वरूपाचा बोध व्हावा ही उपनिषदांची धडपड आहे.
मी महाविद्यालयात शिकत असताना माझ्या एका जिवलग मित्राकडे त्याच्या नातेवाईकांचे ओशोंनी लिहिलेले 'उपनिषदांच्या गवाक्षातून' हे पुस्तक माझ्या हाताला लागले. त्यातून मला 'उपनिषद' या विषयात रस वाटू लागला. मी ओशोंची पुस्तके वाचू लागलो. यथावकाश माझी त्या मित्राच्या नातेवाईकांशी (ज्यांचे पुस्तक होते) ओळख झाली. ते माझे एकअध्यात्मिक मार्गदर्शक ठरले. हे आहेत ओशोंचे सुरुवातीपासूनचे शिष्य ठाण्याचे 'स्वामी आनंदऋषी'. ओशो आणि आनदऋषी यांचे बोट धरूनच मी ही मालिका लिहितो आहे.


No comments:

Post a Comment