Friday, September 28, 2018

केनोपानिषद -१

उपनिषदांच्या मालिकेतील हे दुसरे उपनिषद. उपनिषदे हे भारतीय प्राचीन ज्ञानाने गाठलेले अत्युच्च शिखर म्हणता येईल. एकूण १०८ उपनिषदे आहेत. त्यापैकी १० महत्वाची मानली जातात. ही उपनिषदे महत्वाची मानली जाण्याचे कारण म्हणजे त्यावर आद्य शंकराचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत. उत्तर मीमांसा (वेदांत) दर्शन या दहा उपनिषदांवर आधारलेले आहे. या दहापैकी ईशावास्य उपनिषद आपण मागील लेखात पहिले. आता केन उपनिषद पाहू.

Image result for केनोपनिषदकेन उपनिषद ‘केन’ या शब्दाने सुरु होते. म्हणून त्याला केन उपनिषद म्हणतात. ईशावास्य उपनिषद हे ‘ईशावास्य’ शब्दाने सुरु होते म्हणून त्याचे नाव ईशावास्य उपनिषद आहे हे आपण मागील लेखात पहिले. परंतु सर्व उपनिषदांची नावे या पद्धतीने आलेली नाहीत. केन उपनिषद हे सामवेदाचा भाग म्हणून येते.
काही उपनिषदे मोठी आहेत, तर काही लहान आहेत. ईशावास्य उपनिषद सर्वात लहान आहे. त्यानंतर केन उपनिषदाचा क्रम लागतो. अत्यंत थोड्या शब्दात मोठा आशय सामावल्यामुळे ही उपनिषदे समजून घेण्यास कठीण वाटतात.

बहुतेक उपनिषदे प्रश्न-उत्तर स्वरूपात आहेत. केन उपनिषद हे ही शिष्याने विचारलेला प्रश्न आणि त्याला उत्तर याच स्वरूपात आहे. मात्र हा शिष्य आणि त्याला उत्तर देणारे गुरु यांचे नाव अज्ञात आहे. हा शिष्य अध्यात्मिक उंचीवर पोचलेला असावा हे त्याच्या प्रश्नावरून लक्षात येते.

मी विचार करतो, डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, तोंडाने बोलतो, जिभेने चव घेतो, स्पर्श अनुभवतो. पण माझ्या डोळ्यांनी बघण्यामागे कोणती शक्ती आहे, कामांनी ऐकण्यामागील शक्ती कोणती हा प्रश्न या शिष्याला पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधणे हा या उपनिषदाचा मुख्य हेतू आहे. जर या सर्व गोष्टी म्हणजे केवळ मेंदूतील रासायनिक प्रक्रिया असतील तर जिवंत माणूस आणि मेलेला माणूस यात काय फरक आहे? हे शरीर तर केवळ एक यंत्र आहे, मग या यंत्राला जाणून घेणारे, Analysis करणारे कोणी यामागे आहे काय हा तो प्रश्न आहे. माझ्या समोरचा एक पंखा फिरत आहे, दुसरा फिरत नाही. दोन्ही पंखे एकाच प्रकारच्या सामुग्रीपासून बनलेले आहेत. मग एक फिरत आहे आणि दुसरा बंद आहे असे का? एक दिवा बंद आहे, दुसरा प्रकश देतो आहे असे का? फिरणाऱ्या पंख्यामागे, प्रकाशणाऱ्या दिव्यामागे कोणती शक्ती काम करत आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. पंख्यामागे, दिव्यामागे कार्यरत असलेल्या विद्युत शक्तीचा शोध घेण्यासारखा हा प्रयत्न आहे.

या प्रश्नाला गुरुजींनी काय उत्तर दिले हे पुढील भागात पाहू.

1 comment:

  1. निरूपणाचे छोटे छोटे भाग केल्यामुळे उत्सुकता वाढत जाते.

    आवडले....

    ReplyDelete