Saturday, September 29, 2018

केनोपानिषद २

या आधीच्या लेखात आपण केन उपनिषदात शिष्याने उपस्थित केले प्रश्न पहिले. मनाचे व्यापार कोण चालविते, डोळ्यांनी बघणारा कोण आहे, कानांनी ऐकणारा कोण आहे, वाणीने बोलणारा कोण आहे अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. अध्यात्मिक उच्च पातळीवर पोचलेल्या शिष्याचे हे प्रश्न आहेत.या प्रश्नांना उत्तर देताना उपनिषदातील ऋषी थोडे कोड्यातच उत्तर देतात. ब्रह्म मनाचे मन आहे, डोळ्यांचे डोळे आहे, कानांचे कान आहे असे उत्तर हे ऋषी देतात. एकच ब्रह्म अथवा चैतन्य सर्व विश्वाला चेतना देते. त्यामुळे मनाला, डोळ्यांना, कानांना चेतना देणारे हेच ते ब्रह्म आहे. ब्रह्म मनाला चेतना देते, हेच मन त्या चेतनेमुळे डोळ्यांना बघण्याची चेतना देते, कानांना ऐकण्याची चेतना देते, जिभेला बोलण्याची चेतना देते.
आपण मागील लेखात विचार केलेल्या उदाहरणात पंखा हा विजेमुळे फिरतो. याचा अर्थ ती वीज पंख्याबरोबर फिरत नाही. तीच वीज दिव्याला प्रकाशण्याची चेतना देते. हीच वीज रेफ्रिजरेटरमध्ये वस्तू थंड करण्याची चेतना देते तर हिटरमध्ये हवा गरम करण्याची चेतना देते. म्हणजेच एकाच शक्ती तिचे प्रत्यंतर अनेक रूपांत देते. असेच ब्रह्माचे आहे. एकच ब्रह्म अनेक रूपांत आपल्यासमोर प्रकट होते.
पण विजेसारखेच हे ब्रह्म आपल्याला दिसत नाही. वीज जशी अनेक रूपांत प्रकट झाल्यावर ती आहे हे कळते तसेच ब्रह्माचे प्रकटीकरण झाल्यावरच आपल्याला त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवते. आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपण ब्रह्माला पाहू शकत नाही, मनाने त्याची कल्पना करू शकत नाही. ब्रह्म हे अतिंद्रिय आहे. जो कोणी ब्रह्म समजल्याचा दावा करीत असेल त्याला ब्रह्म समजलेलेच नसते असे हे उपनिषद सांगते.
आपण ब्रह्मस्वरूपी आहोत. आपले मन अथवा शरीर हे ब्रह्माच्या अस्तित्वामुळेच प्रकट झालेले दिसते. असे हे सर्व विश्व व्यापून राहिलेले ब्रह्म आपल्या मनात, शरीरात प्रकट होते, त्याला प्रकाशित करते. या मनातच आपला अहंकार अथवा स्वत्वाची जाणीव उगम पावते. पण आपण खरे ब्रह्मस्वरूप आहोत. या ब्रह्मस्वरूपाची जाणीव झाल्यावर आपल्याला आपल्या ‘अमरत्वाची’ जाणीव होते. कारण हे शरीर/मन नाशवंत आहेत, पण ब्रह्म चिरंतन आहे.
यातून आपल्याला ब्रह्मासंबंधी पाच गोष्टी कळतात. त्याचा उहापोह पुढील लेखात करू.

1 comment: