Sunday, September 9, 2018

तक्षशिला


प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. यात्रेत आता पाहणार आहोत साहित्यात प्रतिबिंबित झालेली तीर्थस्थळे. त्यापैकी पहिली आहे पाकिस्तानमधील तक्षशिला नगरी. तक्षाने म्हणजे सुताराने लाकडावर कोरीवकाम करावे, तसे शिळांवर कोरीवकाम करून घडवलेली नगरी म्हणजे तक्षशिला!  .
 
तक्षशिला ही प्राचीन नगरी आपले नाते जोडते प्रभू रामचंद्राशी! हा प्रांत त्या काळात केकय म्हणून ओळखला जात होता. दशरथाच्या काळात या देशाचा राजा होता अश्वपती. अनेक अश्व असलेला, अश्वांचा स्वामी किंवा अश्वांचा व्यापार करणारा राजा असावा, असे त्याच्या नावावरून वाटते. याची कन्या कैकयी ही दशरथाची कनिष्ठ भार्या होती. युध्दशास्त्रात आणि राजकारणात पारंगत होती. एकदा कैकयीचा पुत्र भरत आजोळी गेला होता. त्या वेळी दशरथाने रामाला राज्याभिषेक करायचे ठरवले. अश्वपतीने कैकयीबरोबर लग्नात पाठवलेली हेर मंथरा, ही बातमी ऐकताच कामाला लागली. तिने कैकयीचे कान फुंकले. रामाला वनवास आणि भरतासाठी राज्य मागायला सांगितले. कैकयीने आपले ठेवणीतले वर मागितले. राम वनवासात गेला आणि दशरथ पुत्रवियोगाने मृत्यू पावला. त्या वेळी भरत केकय प्रांतातून निघून थेट अयोध्येस आला.

प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. यात्रेत आता पाहणार आहोत साहित्यात प्रतिबिंबित झालेली तीर्थस्थळे. त्यापैकी पहिली आहे पाकिस्तानमधील तक्षशिला नगरी. तक्षाने म्हणजे सुताराने लाकडावर कोरीवकाम करावे, तसे शिळांवर कोरीवकाम करून घडवलेली नगरी म्हणजे तक्षशिला!


पुढे भरताने रामासाठी चौदा वर्षे राज्य केले. राम परत आला. रामाला राज्याभिषेक होऊन तो अयोध्येचा राजा झाला. त्यानंतर भरताचे पुत्र तक्ष आणि पुष्कल हे भरताच्या आजोळी केकयला गेले. असे सांगितले जाते की तक्षने तक्षशिला नावाची एक नवीन नगरी वसवली, तर पुष्कलने पुष्कलावती नावाची नगरी वसवली. जवळच रामपुत्र लवने लवपुरी वसवली, तर कुशने कुशावती नावाची नगरी वसवली. आज या चारही नगरी पाकिस्तानमध्ये आहेत, ज्या तक्षिला, पेशावर, लाहोर आणि कुसूर या नावांनी ओळखल्या जातात.

तक्षशिला, पुष्कलावती, लवपुरी आणि कुशावती या नगरींची नाळ अयोध्येशी जोडली होती एका प्राचीन महामार्गाने. या महामार्गाचे नाव होते - उत्तरापथ. रामायणात या पथाचे नाव येत नाही, पण केकय ते अयोध्या हा प्रवास वेगाने करता येण्यासारखा होता हे कळते, त्या अर्थी हा मार्ग तेव्हा अस्तित्वात असावा. उत्तरापथवरील तक्षशिला ही एक अतिशय समृध्द नगरी होती. या नगरीद्वारे उत्तर भारत Silk Roadला जोडला गेला होता. Silk Roadने चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे तक्षशिला भरभराटीस आली होती. मौर्यांच्या काळात उत्तरापथ पाटलीपुत्रपर्यंत पोहोचला. कुषाण, गुप्त, हर्षवर्धनपासून शेरशहा सुरीने आणि नंतर इंग्रजांनी या मार्गाचा विकास केला. वाजपेयींच्या काळात हा रस्ता सुवर्ण चतुष्कोनचा भाग म्हणून विकसित केला गेला.

आज हा महामार्ग चट्टग्राम (चित्तगाव - Chittagong)पासून काबुलपर्यंत जाणारा Grand Trunk Road म्हणून ओळखला जातो. हा आशियातील सर्वात प्राचीन आणि सर्वात लांब महामार्ग आहे.

रामाशी नाते सांगणारी तक्षशिला, महाभारतातील कृष्णाशीसुध्दा नाते सांगते. तक्षक नागाच्या दंशाने हस्तिनापूर नरेश परीक्षिताचा मृत्यू झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठी परीक्षिताचा पुत्र जनमेजय याने तक्षशिला येथे सर्पसत्र केले होते. या यज्ञात व्यासांचे शिष्य वैशंपायन आले होते. त्या वेळी जनमेजय राजाने त्यांना आपल्या पूर्वजांची कथा सांगण्याची विनंती केली. वैशंपायनांनी व्यासलिखित महाभारताचे आख्यान सांगितले. महाभारताची सुरस, रोमांचकारक आणि अमर कथा पहिल्यांदा सांगितली गेली ती तक्षशिला नगरीत. पांडवांच्या विजयाचे, कृष्णाच्या नीतीचे आणि भगवंताच्या गीतेचे अलौकिक शब्द प्रथम उमटले ते तक्षशिलेला!

बौध्द साहित्यात तक्षशिला नगरीचा उल्लेख गांधारची राजधानी म्हणून येतो. आज तक्षशिलेला अनेक स्तूपांचे अवशेष पाहायला मिळतात. त्याबद्दल पुढील लेखांमधून विस्ताराने जाणून घेऊ.

तक्षशिला हे व्यापाराचे केंद्र होते, तसेच विद्येचेही केंद्र होते. येथील विद्यापीठाची ख्याती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. ग्रीस, रोम, पर्शिया, मध्य आशिया, चीन, इंडोनेशिया, कंबोडिया येथून आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी येथे येत असत. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांनाच शिकायला मिळत असे. गणित, ज्योतिष, अर्थशास्त्र, वैद्यक शास्त्र, व्याकरण आदी विषय येथे शिकवले जात. एका वेळी 10,000 विद्यार्थी येथे राहून शिक्षण घेऊ शकतील अशी व्यवस्था होती. तक्षशिलेच्या विद्यापीठात शिकलेले आणि शिकवणारी काही भारतीय रत्ने म्हणजे व्याकरणकार पाणिनी, आयुर्वेदाचार्य चरक आणि अर्थशास्त्रज्ञ चाणक्य.

या नगरीवर मौर्य, यवन, कुशाणपासून गुप्तांपर्यंत अनेक राजघराण्यांनी राज्य केले. साधारण पाचव्या शतकात तक्षशिलेवर हूणांनी केलेल्या स्वारीनंतर इथला व्यापार मंदावला, बौध्द मठ ओस पडू लागले आणि विद्यापीठही लयास गेले. सातव्या शतकात शवान झांग आला, तेव्हा त्याने या नगरीत पडक्या वास्तू पहिल्या होत्या. हळूहळू ही नगरी अगदीच विस्मृतीत गेली. हजार-बाराशे वर्षांचा काल लोटला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अलेक्झांडर कनिंगहॅमने चिनी प्रवासी शवान झांगचा वृत्तान्त वाचून तक्षशिला नगरी शोधली. इथे उत्खनन केल्यावर तक्षशिलामध्ये वेगवेगळया काळातील अवशेष मिळाले. नवाश्मयुगापासून ते कुशाणकाळापर्यंतचे अवशेष पाहायला मिळतात. इथली विविधता, प्राचीनता, भव्य अवशेष, देदीप्यमान भूतकाळ, प्राचीन जगतावरील प्रभाव या सर्वांमुळे आज पाकिस्तानमधील तक्षिला ही एक World Heritage Site आहे

Ref http://www.evivek.com/Encyc/2018/9/5/2295301

No comments:

Post a Comment