Tuesday, July 14, 2015

बकरा

एकदा एका शेतकऱ्यांचा घोडा अाजारी पडला. ईलाज करण्यासाठी डाॅक्टरला बोलावलं.
डाॅक्टरने त्याची व्यवस्थित तपासणी केली आणि म्हणाला "तुमचा घोड्याला गंभीर आजार आहे. आपण तीन दिवस त्याला औषध देऊन पाहू ,
ठिक झाला तर ठिक .अन्यथा आपल्या त्याला विषारी इंजेक्शन देऊन मारावं लागेल. कारण हा आजार तुमच्या दुसऱ्या प्राण्यांना होऊ शकतो."

हे सर्व शेजारी असलेला बकरा ऐकत असतो.
त्याची घोड्याची जिगरी दोस्ती असते
डाॅकटर औषध देतो अन् निघून जातो तसा बकरा घोड्याजवळ जातो व म्हणतो
"उठ मित्रा, जसा हालचाल करण्याचा प्रयत्न कर नाहीतर हे लोक तुला मारतील."

दुसऱ्या दिवशी पुन्हा डाॅक्टर येतो आणि घोड्याला औषध पाजून निघून जातो.
डाॅक्टर गेल्यावर पुन्हा बकरा घोड्याजवळ येतो अन् म्हणतो "मित्रा, धीर धर, हवं तर मी तुला मदत करतो जरा उभं राहण्याचा प्रयत्न कर.चल उठ"
तिसऱ्या दिवशी डाॅक्टर शेतकऱ्यांला म्हणाला

"नाईलाज आहे पण आता याला मारावंच लागले. यांचे शरीर औषधालाही साथ देत नाही."

जेव्हा डाॅक्टर निघून जातो तेव्हा बकरा घोड्याला कळकळीने प्रेरित करत म्हणाला "मित्रा, आता तुझ्यावर करा किंवा मरा अशी वेळ आलीय. जर आज तू काही प्रयत्न केला नाही तर उद्या तू जिवंत राहणार नाही. म्हणून उठ ,हिंमत कर आणि उठू शकतोयस तू उठ
घोड़ा हळू हळू हालतो
धडपडतो
पण कसाबसा ऊभा राहतो
बकरा त्याला प्रेरणा देत राहतो

ये ये ये
चक दे
शाब्बास,
शाब्बास शाब्बास
तु करू शकतोस
आणखी थोडासा
हां चाल , चाल जमतेय तुला
ले भारी
वाहव्वा
अाता जरा पळ
जमतेय तुला
जमेगा
बरोबर एकदम बरोबर
आता जोरात पळ."

घोड़ा मस्त पळायाला लागला
खिँकाळू लागला
ते ऐकून तेवढयात शेतकरी तेथे आला
आणि
पाहिलं की घोडा धावत आहे.
त्याला खूप आनंद झाला.
त्याच्या डोळ्यातून पानी वाहू लागले
तो घोड्या सोबत पळू लागला
त्याच्या सोबत बकरा पण पळत होता

शेतकाऱ्याने घरातील सर्वांना बोलावले
आणि मोठ्याने ओरडून म्हणाला
"अरे बघा बघा चमत्कार झाला
आपला घोडा ठीक झाला
पळू लागलाय
आज आपण आनंद साजरा करू."

घोड़ा खिंकाळतो
शेतकरी ओरडुन बोलतो वा बघा कसा आनंदी झालाय
बकरा बॅ बॅ करतो
शेतकरी त्याला आनंदाने उचलून नेतो
आणि बोलतो
याहू
"आज रात्री बकऱ्याच्या मटनाची पार्टी करू."

तात्पर्य : वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत नसतं की कोण काम करतं जो खरंच मनापासून काम करतो त्याचाच बकरा होतो.

Friday, July 10, 2015

आपली ऊर्जेची गरज किती?

आपली ऊर्जेची गरज किती?

दर डोई केवळ १ किलोवॅट एवढ्या ऊर्जेत चांगले जगता येईल?
प्रत्येकाला चांगल्या दर्जाची राहणी खात्रीने मिळण्यासाठी किती ऊर्जा लागेल?

हा एक मूलभूत प्रश्न आहे. ऊर्जा नियोजन करताना त्याचा विचार मुळात करावा लागतो. आजपर्यंतच्या या प्रश्नाकडे पुरेश्या गांभिर्याने लक्ष दिले गेले नाही. देशाला ऊर्जा किती हवी याचा अंदाज करण्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन किती हवे असा विचार करून अनुमान केले जाते. सकल राष्ट्रीय उत्पादन वाढले की प्रत्येक देशवासीयाच्या मूलभूत गरजा भागल्या जातील – याची खात्री देता येत नाही. त्यामुळे काहीजणांनी ऊर्जेचे अनुमान करण्यासाठी देशाची प्रगती जोखण्याचे काही विशिष्ठ निकष लावले आहेत किंवा हे निकष पूर्ण होतील अशा बाबींच्या वाढीचे निर्देशांक आधारासाठी घेतले आहेत. प्रगतीची चाचपणी करू शकणार्‍या अशा प्रकारच्या अनेक निकषांनी बनलेल्या चौकटीत – चांगल्या दर्जाचे राहाणीमान म्हणजे नेमके काय हे स्पष्ट करता येते.
“प्रयास” ऊर्जा गटाने या प्रश्नाबाबत एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. या शोधनिबंधात उर्जेच्या गरजेचा अंदाज  करणार्‍या विविध पद्धतींची तुलना केली आहे आणि ती सोदाहरण स्पष्ट केली आहे.
·         यात भारतीय नियोजन आयोगाने २००६ साली आणलेले एकात्मिक ऊर्जा धोरण आहे.

·         २०३२ सालच्या ऊर्जेच्या गरजेचा अंदाज करण्यासाठी
१) सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाढीचा दर आणि
२) सकल राष्ट्रीय उत्पादन व ऊर्जेचा वापर यातील लवचिकता, या दोन बाबींचा आधार घेतला आहे.

·         केंद्रिय विद्युत आयोगाने विद्युतशक्तीबाबत केलेल्या सर्वेक्षणावरही या शोधनिबंधात एक नजर टाकली आहे. आगामी २० वर्षांसाठी किती उर्जा लागेल याचे अनुमान करण्यासाठी हा आयोग सकल राष्ट्रीय उत्पादन आणि त्यातील संभवनीय बदलाचे रेखांकन यांवर भर देतो. वरील दोन्ही पद्धतींमध्ये - १००% घरांना वीजपुरवठा – अशासारखे समान सामान्य हेतू असले तरी विवक्षित वाढीचे लक्ष्य आणि ऊर्जावापर यात कोणताही थेट संबंध असल्याचे म्हटलेले नाही.
आणखी विशेष म्हणजे - विशिष्ट वाढीचे लक्ष्य आणि त्याच्याशी जोडलेला ऊर्जावापर – यांच्या केल्या गेलेल्या अभ्यासांचीही दखल या शोधनिबंधात घेतली आहे.
उदा. चांगल्या दर्जाची राहाणी कितपत साध्य झाली याचा निर्देशक असलेला मानवी विकास निर्देशांक. (एच डी आय.). याबाबत जगात सगळीकडे झालेल्या पहाण्यामध्ये - मानवी विकास निर्देशांक आणि दरडोई वीजवापर – यांच्या पातळीत सरळ संबंध असल्याचे दिसून आले आहे. या संबंधाच्या आधारे विजेच्या गरजेचा अंदाज आपल्याला हव्या त्या पातळीपर्यंत करता येतो. मानवी विकास निर्देशांकात काही लक्ष्ये अंतर्भूत नाहीत असा एक आक्षेप घेतला जातो. त्याशिवाय काही देशांमध्ये कमी प्रमाणात ऊर्जावापर करूनसुद्धा मानव विकास निर्देशांक वरच्या स्तरावर आलेला दिसतो. हा इतरांसाठी एक वस्तुपाठ ठरू शकतो.
२०१४ मध्ये भारतीय नियोजन मंडळाने - सर्वसमावेशक विकासासाठी कर्बनी पदार्थांच्या अल्प वापराची रणनीती – या विषयाबाबत एक अहवाल दिला, त्याचीही दखल या शोधनिबंधात घेतली आहे. या अहवालाच्या आधारे बनवलेल्या प्रतिरूपाद्वारे २०३० सालचा वीज आणि ऊर्जा यांच्या गरजेचा अंदाज करता येतो. या प्रतिरूपात १२व्या पंचवार्षिक योजनेत अपेक्षित केलेल्या ‘सर्वसमावेशक वाढ’ या धोरणाचा समावेश केला आहे तसेच शाश्वत आणि वेगवान वाढीसाठी आवश्यक वाटणार्‍या २५ गाभाभूत दर्शकांचाही समावेश केलेला आहे. गरीबी, रोजगार, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण यासारख्या गोष्टींमध्ये आकडेवारीत मोजता येतील अशी उद्दिष्ट्ये ठरवून दिली आहेत. त्यामुळे अध्ययन केवळ ऊर्जा आणि शक्तीक्षेत्रापुरतेच न राहाता पूर्ण अर्थव्यवस्था त्याच्या कवेत आलेली आहे. हे या प्रतिरुपाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या प्रतिरूपातील उद्दिष्टे अधिक आर्थिक आधार दिल्याने पूर्ण होतील असे दिसत असले तरी अधिक ऊर्जा पुरविण्याबाबत मात्र काही स्पष्टता दिसत नाही.
या शोधनिबंधात विकासाचे विशिष्ट उद्देश्य आणि खास त्यांच्यासाठी आवश्यक असणार्‍या ऊर्जेचा अंदाज करणार्‍या अभ्यासांचे परिक्षण करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या - उर्जा आणि पर्यावरणातील बदल - विषयक सल्ला देणार्‍या गटाने जगात सर्वांना चूल, उजेड, संपर्क आणि उत्पादन यांसाठी ऊर्जास्रोत उपलब्ध असावेत अशी भूमिका घेतली आहे.
‘दि पुअर पिपल्स एनर्जी आउटलुक’ यांनी ऊर्जेपासून वंचित असणार्‍यांच्या ऊर्जेच्या गरजेबाबत खुलासेवार लिखाण केले आहे आणि त्यांच्या सहा क्षेत्रातील उर्जेच्या गरजेचा, निकडीचा आणि हक्काचा ऊहापोह केला आहे, ही क्षेत्रे म्हणजे उजेड, अन्न शिजवणे आणि पाणी तापवणे, घरातील उबदारपणा, थंडावा, संपर्क आणि माहिती स्रोत उपलब्ध होणे आणि रोजंदारीसाठी ऊर्जा. या गरजांपैकी काहींबाबत या अभ्यासात मापन करण्याच्या पद्धती दिल्या आहेत.
विवक्षित साहित्य, वस्तू आणि सेवा-सुविधांच्या गरजा भागवून चांगल्या दर्जाची राहाणी मिळवी यासाठी लागणारी ऊर्जा किती याचा अंदाज करणार्‍या तीन अभ्यासांची दखल या शोधनिबंधात घेतली आहे.

1.       १९८० मध्ये अमूल्य रेड्डी आणि सहकार्‍यांनी एक नमुना समोर ठेवला, यात सर्व भारतीयींनी १९७० मध्ये युरोपात सर्वत्र उपलब्ध होती अशा - राहणीमानाच्या पातळीचा विचार केला आहे. अगदी प्रत्येकाला दर किलोमीटर प्रवासासाठी लागणार्‍या ऊर्जेचीही गणना घर चालवण्यासाठी लागणार्‍या ऊर्जेसोबत केली आहे. प्रत्येक बाबीसाठी लागणारी ऊर्जा आकड्यांनिशी देताना त्या काळात उपलब्ध असणार्‍या सर्वात किफायतशीर पर्याय गृहीत घरला आहे. दर डोई केवळ १ किलोवॅट एवढ्या ऊर्जेत हे साध्य होईल असे अमूल्य रेड्डी यांच्या गटाने दाखवून दिले आहे.

2.       अशाच प्रकारचा 2007 मध्ये चीनमध्ये झालेला एक अभ्यास या शोधनिबंधात पहायला मिळतो. झियानली झ्यू आणि जियाहुआ पान यांनी चीनमधील १.३ अब्ज लोकसंख्येपैकी ७५% लोक शहरी असल्याचे गृहीत धरून मूलभूत गरजांसाठी प्राथमिक व्यावसायिक ऊर्जेची आवश्यकता त्यांनी गणिते करून मांडली आहे.

3.       २००० वॅट सोसायटी – यांच्या नावाप्रमाणे दर डोई दर साल २ किलोवॅट ऊर्जेत आवश्यक गरजा भागवता येतील अशा स्वरूपाची ऊर्जा व्यवस्था या अभ्यासात मांडली आहे.

4.       नरसिंहराव यांचा अजून अपूर्ण असलेला एक अभ्यासही यात समाविष्ट आहे. त्यांच्या मते यासाठी एक सर्वसमावेशक अशी एक चौकट असू शकतो मात्र त्यात स्थलकालाप्रमाणे विशेष वेगळे असू शकतात. उदा. अन्नाची गरज हा त्या चौकटीतला एक वैश्विक घटक असला तरी अन्नासाठी लागणारी ऊर्जा वेगवेगळी असू शकते – अन्न शिजवण्याच्या पारंपारीक पद्धती, स्थानिक खाद्यसंस्कृती, शाकाहार – मांसाहार यावर अन्न या घटकापायी लागणारी ऊर्जा वेगवेगळी असेल.

या सर्व गोष्टींचा उहापोह करून २०३२ साली भारतात वीज आणि ऊर्जा किती लागेल याचा अंदाज प्रयास ऊर्जा गटाने केला आहे. मूलभूत गरजांवर आधारीत ऊर्जेचा अंदाज योग्य केला तरी ती ऊर्जा योग्य जागी आणि योग्य तितकी पोचवण्यात योग्य काळजी घेऊन अंमलबजावणी केली जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याखेरीज आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ऊर्जानिर्मितीचे शाश्वत मार्ग आणि निर्माण झालेल्या ऊर्जेचे समन्यायी वितरण – हे जगात सर्वत्र झाले तर चांगल्या दर्जाचे राहाणीमान सर्वांना मिळू शकेल असे या शोधनिबंधात म्हंटले आहे.



How Much Energy Do We Need:Towards End-Use Based Estimation For Decent Living
संशोधन क्षेत्र - ऊर्जा स्रोत आणि विकास

 Research Area:

  Energy Resources & Development
लेखक - श्रीपाद धर्माधिकारी, ऋतुजा भालेराव

Authors: Shripad Dharmadhikary, Rutuja Bhalerao

प्रसिद्धी दिनांक - मे २०१५

Publication Date: May, 2015

हा शोधनिबंध या क्षेत्रातील सर्व अभ्यासकांनी जरूर वाचावा आणि सर्वांना चांगले जीवनमान मिळवण्यासाठीच्या या प्रयासात आपले योगदान द्यावे.