Friday, November 20, 2015

प्रार्थना

हे परमेश्वरा...

मला माझ्या वाढत्या वयाची
जाणिव दे. बडबडण्याची माझी
सवय कमी कर.

आणि प्रत्येक प्रसंगी मी
बोललंच पाहिजे ही माझ्यातली
अनिवार्य ईच्छा कमी कर.

दुसऱ्‍यांना सरळ करण्याची
जबाबदारी फक्त माझीच व
त्यांच्या खाजगी प्रश्नांची
दखल घेउन ते मीच
सोडवले पाहिजेत अशी
प्रामाणिक समजूत माझी
होऊ देऊ नकोस.

टाळता येणारा फाफटपसारा
व जरुर नसलेल्या तपशिलाचा
पाल्हाळ न लावता
शक्य तितक्या लवकर मूळ
मुद्यावर येण्याची माझ्यात
सवय कर.

इतरांची दुःखं व वेदना
शांतपणे ऐकण्यास मला
मदत करच पण त्यावेळी
माझं तोंड शिवल्यासारखे
बंद राहुंदे. अशा प्रसंगी

माझ्याच निराशा, वैफल्यांचे
रडगाणे ऐकवण्याची माझी
सवय कमी कर.

केंव्हा तरी माझीही चूक
होऊ शकते, कधीतरी माझाही
घोटाळा होऊ शकतो,
गैरसमजूत होऊ शकते
ह्याची जाणीव माझ्यात ठेव.

परमेश्वरा,
अगदी शेवटपर्यंत माझ्यात
प्रेमाचा ओलावा, गोडवा,
लाघवीपणा राहू दे.
मी संतमहात्मा नाही
हे मला माहीत आहेच,
पण एक बिलंदर बेरकी
खडूस माणूस म्हणून मी
मरू नये अशी माझी
प्रामाणिक इच्छा आहे.

विचारवंत होण्यास माझी
ना नाही पण मला लहरी
करू नकोस. दुसऱ्याला
मदत करण्याची इच्छा
आणि बुद्धी जरूर मला दे
पण गरजवंतांवर
हुकूमत गाजवण्याची
इच्छा मला देऊ नकोस.

शहाणपणाचा महान ठेवा
फक्त माझ्याकडेच आहे
अशी माझी पक्की खात्री
असूनसुद्धा, परमेश्वरा,
ज्यांच्याकडे खरा सल्ला
मागता येइल असे मोजके
का होईना पण
चार मित्र दे.

एवढीच माझी प्रार्थना...

-पु.ल.देशपांडे

Wednesday, November 11, 2015

बळीराजा

उद्या बलिप्रतिपदा. बळीराजाच्या स्मरणाचा दिवस. बळीराजा हा प्रल्हादाचा नातू (प्रल्हादाचा मुलगा विरोचन याचा पुत्र). प्राचीन काळी मगध साम्राज्य हे असुरांचे भारतातील बलाढ्य साम्राज्य होते. मगध हे अत्यंत भरभराटीस आलेले आणि सामान्य जनता सुखात असलेले साम्राज्य म्हणून ओळखले जात होते. येथे अनेक कलांना आश्रय मिळाला. मगध’ हेच हजारो वर्षे भारतीय सत्तेचे केंद्र होते. जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ येथेच होते. तीन-चतुर्थांश भारत व्यापणारी मौर्यांसारखी साम्राज्ये येथेच निर्माण झाली. काही संशोधकांच्या मते येथेच काही वेद (प्रामुख्याने अथर्ववेद) रचले गेले. प्राचीन मगध साम्राज्याचे यज्ञपूजक राज्यांशी वैर होते. हिरण्यकश्यपू हा या मगध साम्राज्याचा पराक्रमी राजा. तो अन्यायी असल्याचे कोणतेही पुराण सांगत नाही. आपला मुलगा प्रल्हाद हा यज्ञसंस्कृतीकडे आकर्षित झाल्याने हिरण्यकश्यपू संतप्त झाला. यज्ञधर्मीय राज्यांकडून असुर हिरण्यकश्यपुला मारण्यात येऊन ते कृत्य अवताराच्या कोंदणात बसविण्यात आले आणि यज्ञसंस्कृतीकडे आकर्षित झालेल्या प्रल्हादाला गादीवर बसविण्यात आले. हा सांस्कृतिक कलह होता. त्याच्या नंतर हे राज्य वंशपरंपरेने विरोचन आणि त्यानंतर बळीकडे आले. बळीच्या राज्यात जनता सुखी होती. म्हणूनच बळीराजा सामान्य जनतेच्या स्मरणात आहे. त्याचे पूजन होते. ‘इडा पिडा टळो, आणि बळीचे राज्य येवो’ असे आजही खेड्यापाड्यात म्हटले जाते.
असुर हे शंकराचे भक्त असून त्यांच्या नीतिमत्तेच्या कल्पना प्रगत होत्या. ‘दिलेला शब्द पाळणे’ हा त्यांच्या नीतिमत्तेचा गाभा होता. याचाच गैरफायदा घेऊन बळीला पाताळात हाकलून दिले गेले. पाताळ म्हणजे दक्षिणेला असलेला प्रदेश (खंडे). हे सात पाताळ (सप्तपाताळ : अतल, सुतल, वितल, तलातल, महातल, रसातल, पाताल) होते. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका ही यातील काही पाताळे. मेक्सिको येथील संस्कृती, खाणे-पिणे आणि चेहरेपट्टी यात त्यांचे भारतीयांबरोबर विलक्षण साधर्म्य दिसते. बळीराजा मेक्सिकोत गेला असावा?
‘औंड्र’ हे बळीराजाचे वंशज. त्यांनी ओडीसा आणि आंध्र प्रदेशात इसवीसन पूर्व सहाव्या शतकात साम्राज्य स्थापन केले. या औंड्र शब्दावरून आंध्र हे नाव या प्रदेशाला मिळाले. आंध्रप्रदेशात यामुळेच प्राचीन शिवमंदिरांची रेलचेल आहे. या औंड्रांची एक शाखा सातवाहन या नावाने ओळखली जाते. सातवाहन महाराष्ट्रात आले. त्यांची पैठण ही राजधानी होती. (बंगालमधील सत्ताधीश पौंड्र हे या औंड्रांचे नातेसंबंधी.)
माझे आजोळ - ठाण्याच्या मुंबई रस्त्यावरील गुप्ते - हे परंपरेने बळीराजाचे वंशज (सातवाहनांचे वंशज??) म्हणून ओळखले जातात. बलिप्रतिपदेला त्यांच्याकडे कणकेचे साप-विंचू-घोण करून त्यांना काठीने प्रतीकात्मक मारतात. तसेच कणकेचे सैन्य करून हे सैन्य गुप्ते घराण्यातील पुरुषांना घरातील सवाष्णी देतात. नंतर बळीराजाची पूजा होते.
असुर संस्कृती ही प्रामुख्याने शिव- शक्ती उपासक असून वैदिक संकृती यज्ञप्रधान आहे. दोन्ही संस्कृतींची सरमिसळ होऊन आताची हिंदू संस्कृती निर्माण झाली आहे. ही सरमिसळ होताना येथे अनेकवेळा सांस्कृतिक संघर्ष झाले. यज्ञसंकृतीला विरोध झाला. याची नोंद काही दर्शनांत (बौध्ददर्शन, जैनदर्शन, चार्वाकदर्शन इ.) स्पष्टपणे आढळते. परंतु भारतीय मानस सहिष्णूवृत्तीवर पोसलेले असल्याने या संघर्षाने उग्र रूप (पश्चिमेला आढळते तसे) धारण केले नाही.
अतिबलाढ्य मगध असुर साम्राज्याच्या दानशूर, पराक्रमी, प्रजाहितदक्ष बळीराजाचा मी एक (आजोळकडून) वंशज आहे याचा मला अभिमान वाटतो.
**संदर्भ : ‘शोध असुरांचा’ संजय सोनवणी, किस्त्रीम २००८, १२९-१४४