Saturday, May 20, 2017

जुन्नर तालुक्यातील लेणी

Facebook वरील पोस्ट

https://www.facebook.com/Oturkar/posts/1248699398560194

जुन्नर तालुक्यातील 11 लेणी समुह एकूण 260 लेणी

लेण्यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला तालुका म्हणजे जुन्नर तालुका. जगात सर्वात जास्त लेणी असलेला तालुक्यात प्रथम क्रमांक लागतो तो जुन्नर तालुक्याचा. महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक प्रकारच्या कोरीव लेण्या पहावयास मिळतात. अशा लेण्यांची बांधणी अशा ठराविक ठिकाणीच का केली गेली ? असे प्रश्न नेहमीच विचाराधीन असल्याचे समजते. त्याला कारणही तसेच आहे ते म्हणजे तेथील हजारो वर्षे टिकाऊ असलेला खडक.म्हणूनच जवळ जवळ सगळ्याच लेण्या समकालीन असून त्या आज रोजी 2200 वर्षाच्या झालेल्या असून सुद्धा आपले आयुर्मान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत.

जुन्नर तालुक्यात एकूण 11 समुहात वेगवेगळ्या ठिकाणी लेणी कोरल्या गेलेल्या असून त्यांची एकूण संख्या 260 एवढी आहे. यामध्ये बौद्ध, जैन, शिलाहार राजा झंज, सातवाहन कालीन निर्मित लेण्या वेगवेगळ्या शिलालेखांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत आज पोहचत आहेत.

लेण्या कोरताना वापरण्यात आलेली औजारे कोणती असावीत, त्यांचा वापर एवढा सुक्ष्म पध्दतीने कसा केला गेला असावा, येथील खडकच लेणी कोरण्यायोग्य का आहेत, हा अंदाज कोणत्या मार्गाने वर्तविला गेला असावा व हा खडक हजारो वर्षेच का टिकाऊ असेल अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराचा शोध या वैज्ञानिक यूगात अद्याप लागलेला वाचावयास मिळत नाही. आजच्या आधुनिक युगात वेगवेगळ्या यंत्राच्या साह्याने हे सर्व करने खुप सोपे आहे. परंतु त्या काळात हे केल गेल असाव ? शेकडो ऊंचीचे मनोरे अनेक टनी वजनाच्या तोडीत कुठलेही क्रेन न वापरता बांधले गेले ते कसे? याला एकच उत्तर देता येईल पुर्वी प्रत्येक मनुष्य बुध्दी, युक्ती आणि शक्तीच्या त्रिवेणी संगमाचा योग्य वापर करून मनुष्य एकोपातुन बदल घडवून आणण्यासाठी खुपच प्रयत्नशील असे. याच प्रयत्नातुन त्यांनी घडवलेला इतिहास आजपण त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून अजरामर असलेला आपण पाहत आहोत व ते पाहत असताना आश्चर्य व्यक्त करत आहोत.

अलीकडच्या सन 1818 च्या काळात याच लेण्यांचे वास्तव्याचे विद्रुपीकरण करण्यासाठी इंग्रज राणीने अक्षरशः जी.आर काढले, लेणी व किल्ल्यांची सुंदरता मिटवण्याचा खोडसाळ प्रयत्न केला गेला. आज ते पाहत असताना राग अनावर होत आहे.

जुन्नर तालुक्यातील असलेले अकरा लेणी समुह पहावयास आपणाकडे कमीत कमी पाच दिवस वेळ असने
गरजेचे आहे. लेणी पाहण्याची सुरूवात आपण कोठून व कशी करावी की ज्या योगे आपल्या वेळेची बचत जास्त होईल व तो वेळ आपणास लेणी व जुन्नरला लाभलेला निसर्ग खजिना पाहण्यास उपयुक्त ठरेल. जवळ जवळ सर्व लेणी पाहताना आपल्याला जेवन, पाणी सोबत ठेवणे गरजेचे आहे. चला मग वळुयात का लेणी समुहाकडे?

1) अंबा अंबिका लेणी ( खोरे वस्ती )

जुन्नर शहराच्या जवळच 2.5 कि.मी अंतरावर उत्तरेस असलेल्या डोंगर रांगामध्ये 1.5 कि.मी अंतर विस्तार असलेल्या ही लेणी तिन समुहात पहावयास मिळतात. जाण्याचा मार्ग खोरे वस्ती मधुन दक्षिणेस 1 कि.मी अंतरावरच आहे. या लेणी जैनतिर्थनकार यांच्या कालखंडातील असुन तीनही लेणी समुह सुंदर अशा कोरीव कलाकृतीत पहावयास मिळतात. सर्व प्रथम दक्षिणेकडील लेणी समुह पाहुन नंतर जुन्नर शहराच्या दिशेला गेलेल्या पाऊलवाटेने चालत राहिले की याच पाऊल वाटेने दोन्ही समुह पहावयास मिळतात. या लेणी पाहण्यासाठी साधारणतः 3 तास लागतात.

2) किल्ले शिवनेरी लेणी ( जुन्नर )

किल्ले शिवनेरी तसा आपल्या परीचयाचा आहेच परंतु संपूर्ण किल्ला दर्शन घ्यायचे झालेच तर दोन दिवस लागतात. किल्यावर असलेल्या लेणी या पाच समुहात असून या बौद्ध कालीन आहेत. येथेच 2200 वर्षापुर्वी केलेली रंगाची कलाकृती कडेलोट जवळ असलेल्या लेणी मध्ये पहावयास मिळते.

किल्ले शिवनेरीच्या मध्यखडक सर्कल भागात पुर्वेकडून शिवाई देवी, साखळदंड, व कडेलोट कडे या भागात तीन लेणी समूह असून पश्चिमेस दोन लेणी समूह आहेत. त्यातील एक लेणी हत्ती दरवाजाच्या उत्तरेस अगदी शंभर मीटर अंतरावरच आहे. शिवाई देवी मंदिरापाशी असलेल्या लेण्यांपैकी एका शेवटच्या लेणी मध्ये माता शिवाई देवीचे मुळ वास्तव्य होते. परंतु पेशवाई कालखंडात आज असलेले शिवाईदेवी मंदिर उभारण्यात आले.

किल्ले शिवनेरीला लाभलेला संपूर्ण लेणी संग्रह अनुभवन्यासाठी आपणाकडे दिड दिवस तरी हवा. पायरी मार्गाने शिवाईदेवी लेणी व हत्ती दरवाजवळच्या लेणी पाहता येतात. संपूर्ण किल्ला चढून शिवकुंजापाशी आलात की शेजारीच पुर्वेकडून एक पाऊलवाट साखळदंडाकडे जाते त्याच वाटेने खाली उतरावे व तेथील लेणी पहावी. ती लेणी पाहुन झाली की तसेच कडेलोट पायथ्यकडे गेलेल्या पाऊलवाटेने चालत रहावे व तेथील लेणी पहावीत येथील लेण्यांमध्ये केलेली रंगरंगोटी 2200 वर्षापुर्वीच्या रंगाची जादु दाखवून देतात. या लेण्या पाहून परतीला लागावे व जुन्नर शहराच्या पश्चिमेस गेलेल्या रस्त्याने वरसुबाई माता मंदिर पासुन कडेलोट पायथ्यकडे गेलेल्या पाऊलवाटेने चालत चालत कडेलोट चा मध्य गाठावा. येथुनच उजव्या हाताला बुजलेली पाऊलवाट दिसते. त्या बुजलेल्या वाटेचा मार्ग काढत काढत पश्चिम लेणी समूह पहावा. हा मार्ग खुपच अवघड आहे. येथे स्वसंरक्षण ची काळजी घेणे खुप गरजेचे आहे.तेथील लेणी पाहावीत व पुन्हा परतीच्या मार्गने वरसुबाई माता मंदिर पासुन पश्चिमेस गेलेल्या कच्या वाटेने 2.5 कि.मी अंतरावर असलेल्या तुळजाभवानी लेणी समूहापाशी पोहचावे.

3) तुळजाभवानी लेणी ( पाडळी )

तुळजाभवानी लेणी अतिशय कमी डोंगर चढाई करून व थोड्या वेळातच अनुभवता येतात. येथील निसर्ग खुपच सुंदर असून समोरच किल्ले शिवनेरीचेरूप दर्शन घेता येते. लेणी दर्शन करून किल्ले चावंडकडे प्रस्थान करावे.

4) चावंड लेणी ( चावंड गाव )

चढाई साठी खुपच अवघड अशी या चावंड किल्ल्याची ओळख होती. परंतु आज या किल्ल्याची भटकंती अगदी वृद्ध पण करतात. कारण किल्ले संवर्धक शिवाजी ट्रेल व वनविभाग जुन्नर यांच्या वतीने किल्यावर सूंदर असे रेलिंगचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे भिती विसरून किल्ला चढून मध्यवर्ती असलेल्या पुष्करणी पाशी गेलात की उत्तरेस गेलेली पाऊलवाट सप्त मातृका पाण्याच्या टाक्या आणि नंतर पुढे लेणी समुहाकडे जाते. या लेण्या तत्कालीन व उपलब्धत खडक पहाता कोरलेल्या आहेत. त्या पहाव्यात व परतीच्या प्रवासाला लागावे व नाणेघाट मार्गे निघावे.

5) नाणेघाट लेणी ( घाटघर )

नाणेघाट येथील लेण्यांमध्ये जाण्यासाठी 100 मीटर उतरून खाली गेलात की डाव्या हाताला आपणास या लेण्यांचे दर्शन घडते. या लेणी मध्ये कोरलेली ब्राम्ही लिपीतील शिलालेख राणी नागणिकेच्या कुटुंबाची व पिता राजा सातवाहन यांच्या दानधर्माची ओळख करून देतो. याच लेखाच्या पुराव्यानेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला व झिरो अंकाच्या शोधाचा सर्वात मोठा पुरावा पण याच लेखात मिळतो. तसेच राणी नागणिका, पती, मुल व पिता यांच्या मुर्त्या कोरलेल्या होत्या आज फक्त त्या खुना दिसत असून वर नामोल्लेख शिलालेखाद्वारे समजतो. या लेणी पाहण्यासाठी खुप कमी वेळ लागतो. येथील निसर्ग न्याहाळतचपुढे सरकत रहावे व येथे मिळेल त्या ठिकाणी रात्री मुक्काम करावा. सकाळी लवकर उठून किल्ले जिवधनच्या कल्याण दरवाजा पाऊलवाट मार्गाने चढाईस सुरूवात करावी.

6) किल्ले जिवधन लेणी.

किल्ले जिवधनची चढाई करून वर आलात की तेथुनच किल्यावर जाण्यासाठी किल्याच्या मध्यभागी असलेली एक पाऊलवाट दृष्टीस पडते या पाऊलवाटेने किल्याच्या मध्यशिखरावर पोहचलात कि तेथून पुन्हा पुर्वेकडे खाली 200 मी उतरावे तेथेच डावीकडे आपणास ही धान्य कोठार म्हणुन लेणी दिसतात. तसेच पुढे खाली उतरून जुन्नर दरवाजा जवळील लेणी उजवीकडे असून या लेणीने पाण्याच्या टाकीचे रूप धारण केलेले आढळून येते. साधारण जिवधन किल्ला लेणी पाहण्यासाठी सुरूवातीपासून पुन्हा त्याच ठिकाणी पोहचण्याकरीता 5/6 तास लागतात. पर्यटक बंधूंना विनंती आहे की हे करत असताना आपणाकडे चढाई करीता रोप व पाणी असने गरजेचे आहे. आपला प्रवास परतीला लागावे. पुढील वाटचाल निमगिरी किल्ल्याकडे करावी.

7) निमगिरी लेणी ( निमगिरी गाव )

निमगिरी गावात गाडी पार्क करून तेथील स्थानिकांच्या मदतीने किल्ल्यावर जाण्यासाठी वाटेचा वापर करावा. किल्यावर पोहचलात कि उजवीकडे गेलेल्या पाऊलवाटेने पुर्वेकडे चालत रहावे. हीच पाऊलवाट आपणास प्रथम गजांत लक्ष्मीचे दर्शन घडवते. व येथुनच ही वाट उत्तरेस वळुन पडझड झालेल्या लेण्यांपर्यंत पोहचविते. लेणी समुह पाहुन झाला की पुन्हा परतीचा मार्ग धरावा व किल्ले हडसर साठी पेठेच्या वाडीत आपला प्रवास थांबवावा. येथील रहिवासी बांधवांच्या सांगितलेल्या मार्गाने किल्ले हडसर वर पोहचावे.

8) किल्ले हडसर ( लेणी )

बहुधा येथील लेणी पर्यटकांशी लपवाछपवीचा खेळ खेळताना ऐकवयास मिळतो. कारण हा लेणी समुह सहजा सहजी दिसून येत नाही. त्यामुळे अनेक पर्यटक ही लेणी न पाहताच माघारी येतात.

हा लेणी समुह पहावयाचा झाला तर किल्लायावर पोहचल्यास वर एक मोठा तलाव लागतो त्या तलावाच्या उत्तरेकडील पश्चिम कोपर्‍याच्या बरोबर 30 ते 40 मीटर उतारावरील अंतरावर हा लेणी समुह सपाट भाग असल्याने लपलेला पहावयास मिळतो. या लेण्यांचे अस्तित्वात जसेच्या तसे टिकून आहे. खुपच सुंदर असा हा देखावा आहे. लेणी दर्शन घ्यावे व आपला मुक्काम लेण्याद्री विनायक गिरीजात्मकाच्या चरणी करावा.

9)लेण्याद्री विनायक गिरीजात्मक लेणी ( लेण्याद्री )

सकाळच्या प्रहरी लवकरच उठून श्री. गिरीजात्मकाचे दर्शन घेऊन येथील लेणी भटकंती करावी येथे सर्वाधिक लेण्या असल्याची नोंद आहे. येथील लेणी पाहून याच डोंगर रांगेच्या उत्तरेस असलेल्या डोंगर रांगेकडे विचारना करून सुलेमान लेणी समुहाकडे हळुहळु पाऊलवाटेने निघावे.

10) सुलेमान लेणी ( लेण्याद्री )

या लेणी समुहाचे कोरीव काम अतिशय सुरेख असून या लेण्यांची देखरेख एक मुस्लिम वृद्ध अखेरच्या स्वासापर्यंत येथे करीत असल्याने त्यांचे नाव या लेण्यांनी अजरामर केले. तशा या लेण्या कालिणच असल्याचे उल्लेख मिळतात. या लेण्या प्रसिद्धीपासून खुपच वंचित राहीलेल्या असुन यांची सुंदरता खुपच कमी पर्यटकांनी अनुभवलेली आहे. येथील सुदरतेचे रंगरूप न्याहाळतच आपल्या निवारास्थानी पोहचुन गणेश खिंडीतून मढ, मढ खिंड व पुढे खिरेश्वर लेणी पाहण्यासाठी माळशेज घाटाकडील पिंपळगाव जोगा धरणाच्या सहा कि.मी पसरलेल्या भिंतीवरून निसर्ग रूप दर्शन घेत भिंत संपते तेथेच डावीकडे वळून खाली 50 मीटर अंतरावर गाडी उभी करून थांबावे.

11) खिरेश्वर लेणी

आपण उभे असलेल्या ठिकाणाहून उत्तरेस तोंड केले कि आपणास जवळच 100 मीटर अंतरावरच या लेणी पाहण्यासाठी मिळतात. येथे हा एकच लेणी समुह असून आपला जुन्नर तालुका लेणी समूह प्रवास येथेच थांबतो.

मित्रांनो वरील संपूर्ण माहिती ही प्रत्यक्ष अनुभव घेऊनच मी आपणापुढे मांडण्याचा प्रयत्न फक्त आपल्या सुविधांच्या माध्यमासाठी केला आहे. कारण आपणास तालुक्यात संपूर्ण लेणी समूह दाखवणारा मार्गदर्शक उपलब्ध होत नाही. त्यामुळे आपणास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व पर्यायाने आपला अमूल्य वेळ व पैसा खर्च होतो आणि आपल्या आशांची निराशा होते. आपण जुन्नर शहरात आलात तर मला संपर्क करून मार्गदर्शन घेतले तरीही चालेल मी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असेल ते ही विनामूल्य. कारण माझ्या मते हीच माझी शिव सेवा असेल.

छायाचित्र / लेखन - श्री.खरमाळे रमेश

( माजी सैनिक खोडद )

निसर्ग रम्य जुन्नर तालुका

No comments:

Post a Comment