Friday, April 24, 2020

गुरु

whatsapp वरून साभार 
तो धिटाईने वृद्ध गुरु समोर उभा होता. गुरु त्यांच्या अनुभवी नजरेने त्याचे निरीक्षण करत होते.
कोवळं वय. असेल साधारण नऊ दहा वर्षाचा. त्याला डावा हातच नव्हता. एका अपघाताने तो हिरावून घेतला होता म्हणे.
" तुला माझ्या कडून काय हवे आहे?" गुरूने त्या मुलाला विचारले.
"सर, मला तुमच्या कडून ज्युडो-कराटेची विद्या शिकायची आहे!"
शरीराला एक हातच नाही आणि ज्युडो शिकायचं आहे? अजब मुलगा दिसतोय.
"कशाला?"
"शाळेत मला मुलं त्रास देतात. थोटक्या म्हणून चिडवतात. मोठी माणस नको तितकी किंवा करतात. मला त्यांच्या या वागण्याचा त्रास होतो! मला माझ्या हिमतीवर जगायचंय! कोणाची दया नको. हात नसताना मला माझं रक्षण करता आलं पाहिजे!"
"ठीक! पण मी आता तो 'शिक्षण' देणारा गुरु राहिलो नाही. मी आता वृद्ध झालोय आणि आत्मचिंतनात मग्न असतो. तुला माझ्या कडे कोणी पाठवलं?"
"सर, मला एक हात नसल्याने खूप जणांनी त्यांच्या 'विद्यार्थी' म्हणून नाकारलं. त्यातल्याच एकाने तुमचे नाव सांगितले. 'तुला फक्त तेच शिकवू शकतील. कारण त्यांना खूप वेळ असतो आणि त्यांच्याकडे एकही विद्यार्थी नाही!' असे ते म्हणाले होते."
'तो उन्मत्त शिक्षक' कोण हे गुरूंनी तात्काळ ताडले. अश्या अहंकारी माणसानंमुळेच हि विद्या गुंड प्रवृत्तीच्या हाती गेली. याचे त्यांना नेहमीच वाईट वाटे.
"ठीक आहे. आज पासून तुला मी माझा 'शिष्य' करून घेत आहे. या शिष्यत्वाचे नियम तुला आज पहिल्यांदा आणि शेवटचे सांगतो. लक्षात ठेव. आपल्या गुरूवर पूर्ण विश्वास ठेवायचा. मी माझ्या लहरी प्रमाणे शिकवीन ते शिकून घ्यायचे. ज्युडो-कराटेहि खूप घातक विद्या आहे. तिच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो! म्हणून हि विद्या फक्त आत्मरक्षणासाठीच वापरायची. नेहमी नम्र रहायचे. समजले?"
"हो सर. समजले. मी आपल्या या आज्ञांचे पालन करीन."  ्मुलाने गुरूच्या पायावर डोके ठेवले.
आणि आपल्या एकुलत्या एक शिष्याच्या शिक्षणास त्यांनी आरंभ केला.
एकच डाव गुरूंनी त्याला शिकवला आणि तोच, तोच ते त्याच्याकडून करून घेऊ लागले. सहा महिने हेच चालू राहिले. एक दिवशी मुलाने गुरूचा चांगला मूड बघून हळूच विषय काढला.
"सर, सहा महिने झालेत. एकच मूव्ह तुम्ही माझ्या कडून करून घेत आहात. नवीन डाव असतीलच ना?"
"आहेत! अनंत डाव आहेत! ते आत्मसात करायला, तुला तुझं आयुष्य कमी पडेल! पण तुला मी शिकवतो आहे त्याचीच गरज आहे. आणि इतकेच तुझ्या साठी पुरेसे पण आहे!"
गुरुवचनावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला.
                                                                                                                                                    ०००
बरेच दिवसानंतर ज्युडोचे टुर्नामेंटस जाहीर झाले. गुरूंनी आपला एकमेव शिष्य यात उतरवला.
पहिले दोन सामने त्या शिष्याने सहज जिंकले!
पहाणारे आश्चर्यचकित झाले. एक हात नसलेला मुलगा जिंकलाच कसा? कोण गुरु असावा?
तिसरा सामना थोडासा कठीण होता, पण त्या मुलाची सफाईदार आणि वेगवान हालचालींनी तो हि सामना त्यानेच जिंकला!
आता त्या मुलाचा आत्मविश्वास बळावला. आपणहि जिंकू शकतो! हि भावना त्याला बळ देत होती.
बघता बघता तो अंतिम सामन्यात पोहंचला.
ज्या शिक्षकाने, त्या मुलास म्हाताऱ्या गुरुकडे पाठवले होते, त्या अहंकारी माणसाचा शिष्यच, त्या मुलाचा अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी होता!
प्रतिस्पर्धी त्या मुलाच्या मानाने खूपच बलवान होता. वयाने, शक्तीने, अनुभवाने सरस होता. या कोवळ्या वयाच्या पोराला तो सहज धूळ चारणारे हे स्पष्ट दिसत होते. पंचानी एकत्र येऊन विचार केला.
"हा सामना घेणे आम्हास उचित वाटत नाही. कारण प्रतिस्पर्धी विजोड आहेत. एक बलवान आणि एक दिव्यांग आहे. हा सामना मानवतेच्या आणि समानतेच्या दृष्टिकोनातून आम्ही थांबवू इच्छितो. प्रथम जेते पद विभागून देण्यात येईल! अर्थात दोन्ही प्रतिस्पर्धी यास तयार असतील तरच." मुख्य पंचाने आपला निर्णय जाहीर केला.
"मी या चिरगुट पोरा पेक्षा, मी श्रेष्ठ आहे यात दुमत असण्याचे कारण नाही. हे सगळ्यांना स्पष्ट दिसतच आहे. तेव्हा मला विजेता आणि या पोराला उपविजेता म्हणून घोषित करावे!" तो प्रतिस्पर्धी उग्रपणे म्हणाला.
"मी लहान असेन. तरी मला हे टाकलेले उपविजेतेपत नको आहे! माझ्या गुरूंनी प्रामाणिकपणे लढण्याचे शिक्षण दिलेले आहे. मी ठरलेला सामना खेळून जे माझ्या हक्काचे जेते पद आहे ते स्वीकारीन!" त्या लढवय्याने उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
जाणकारांच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या. कारण हे ओढवून घेतलेले संकट होते. थोडे कमी ज्यास्त झाले तर? आधी एक हात नाही अजून एखादा अवयव गमावला जायचा! मूर्ख मुलगा!
सामना सुरु झाला.
--- आणि सगळी मंडळी आश्चर्याने स्तिमित झाली. त्या एका अनमोल क्षणी त्या अपंग मुलाची जीवघेणी थ्रो केलेली किक, त्या बलवान प्रतिस्पर्ध्याला चुकवता आली नाही. तो रिंगणाबाहेर फेकला गेला. परफेक्ट थ्रो, परफेक्ट टाईमिंग, नेमका लावलेला फोर्स! अप्रतिम! केवळ अप्रतिम!
                                                                                                                                               ००००
गुरुगृही पोहंचल्यावर, त्या मुलाने आपल्या उजव्या हातातली विजयाची ट्रॉफी गुरुजींच्या पायाशी ठेवली. त्यांना पायावर डोके ठेवून आपली पूज्य भावना व्यक्त केली.
"सर, एक शंका आहे. विचारू?"
"विचार."
"मला फक्त एकच डाव/ मूव्ह येते. तरीही मी कसा जिंकलो?"
"तू दोन गोष्टी मुळे जिंकलास!"
"कोणत्या,सर?"
"एक तू घोटून, न कंटाळता केलेला सराव! त्या मुळे तुझा तो डाव 'सिद्ध' झाला आहे, आत्मसात झाला आहे! त्यात चूक होणे अशक्य आहे!"
"आणि दुसरे कारण?"
"दुसरे कारण हे, त्याहून महत्वाचे आहे. प्रत्यक डावाचा एक प्रतिडाव असतो! तसाच या डावाचाही एक उतारा डाव आहे!"
"मग तो, माझ्या अनुभवी प्रति स्पर्ध्यास माहित नव्हता का?"
"तो त्याला माहित होता! पण तो हतबल झाला, कारण -----कारण या प्रतिडावात, हल्ला करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचा डावा हात धरावा लागतो!"
आता तुम्हांसी समजले असेल कि, एक सामान्य, एक हात नसलेला मुलगा कसा जिंकला?
ज्या गोष्टीला आपण आपली कमजोरी समजतो, तिलाच जो आपली शक्ती बनवून जगायला शिकवतो, विजयी व्हायला शिकवतो, तोच खरा गुरु!
आतून आपण कोठे ना कोठे 'दिव्यांग' असतो, कमजोर असतो. त्यावर मत करून जगण्याची कला शिकवणारा 'गुरु' हवा आहे, किमान मला तरी.
आहे का तुमच्या पहाण्यात असा कोणी?

Monday, April 6, 2020

Kamikaze : जपानचा डिव्हाईन विंड


कालच्या दिवे उजळण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मला जपानच्या १५ ऑगस्ट १२८१ मध्ये घडलेल्या  'डिव्हाईन विंड' ची आठवण झाली.
मंगोल आक्रमक चेंगीझ खान याने चीनचा बराचसा भाग ताब्यात घेतला होता. चीनचा तो सत्ताधीश झाला आणि त्याने आपल्या राजवटीला युआन राजवट (Yuan Dynasty) म्हणजे 'प्रथम सुरुवात' (‘first beginning) असे नाव दिले. त्याचा नातू कुबलईखान हा आपल्या आजोबांसारखाच शूर आणि महत्वाकांक्षी होता. त्याने आपल्या राज्याच्या पश्चिमेला असलेले प्रदेश जिंकून घेतले. मात्र खैबरखिंड ओलांडून भारतभूमीवर आक्रमण करण्याचे धैर्य त्याच्याकडे नव्हते. मग त्याने आपले लक्ष पूर्वेकडे वळविले. केवळ शंभर मैलांवर असलेला जपान त्याला खुणावत होता. त्याने आपणास शरण येण्यासाठी  अनेक खलिते जपानच्या सम्राटास पाठविले. परंतु जपानच्या बलाढ्य लष्कराच्या प्रामुख्याने (शोगुन shogun) हे खलिते राजापर्यंत पोचूच दिले नाहीत. आता मात्र कुबलईखान चिडला. पण जपानचे आरमार अत्यंत बलाढ्य होते. या आरमाराने पूवी कुब्लाईखानाला चांगली लढत देऊन पिटाळून लावले होते. त्यामुळे  कुबलईखानाने मोठी तयारी करूनच हल्ला करण्याचे ठरविले.
हा हल्ला करण्यासाठी मोठे आरमार जवळ असणे आवश्यक होते. त्यासाठी Kamikaze चीनमधील नौका तयार करणाऱ्या सर्वांना कामाला लावले.  कोणाही नौका तयार करणाऱ्याने दुसरे काम हातात घेऊ नये असे फर्मानाच काढले. चीनमधील मोठ्या नद्यांतून खूप वाहतूक होत असल्याने तेथे नौका तयार करणारे कारागीरही खूप होते. बघता बघता दीड वर्षात ४,४०० आरमारी जहाजांचा मोठा ताफा कुबलईखानाकडे तयार झाला. त्यावर त्याने ७०,००० ते १,४०,००० खलाशी आणि नौसैनिक नेमले. या शिवाय आता त्याच्याकडे चिनी लोकांकडूनच शिकलेली एक विद्या होती. त्याने बंदुकीची दारू वापरून बॉम्ब (जळते गोळे) तयार केले होते. हे गोळे फेकण्यासाठी मोठ्या लाकडी गलोली त्याने या जहाजांवर उभारल्या होत्या. आजवर असे अस्त्र कोणी वापरले नव्हते. अशा तयारीनिशी हल्ला केल्यावर जपानी सहज शरण येतील अशी कुबलईखानाल खात्री होती. १२८१च्या ऑगस्टमध्ये हे महाप्रचंड आरमार जपानवर हल्ला करण्यास हाकता समुद्रधुनीतून निघाले.
जपानमध्ये सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. किनाऱ्यावर त्यांचे पारंपरिक सामुराई योद्धे आपल्या पारंपरिक शस्त्रांसह गस्त घालीत होते. अचानक त्यांना क्षितिजावर शिडे दिसू लागली. शिडांची संख्या पाहून ते चक्रावून गेले. जपानवर आता खूप मोठा हल्ला होत आहे याची त्यांना खात्री झाली. तेवढ्यात त्यांच्यावर क्षितिजावरून जळत्या गोळ्यांचा मारा सुरु झाला. अजून हे जळते गोळे किनाऱ्यापर्यंत पोचत नव्हते. पण लवकरच या बोटी जवळ आल्या की ते पोचणार होते. जपानी लोकांकडे या शस्त्रावर उत्तर नव्हते. ते पारंपरिक शस्त्रांत प्रवीण होते.  त्याकाळी जपानमधील बहुसंख्य घरे (भूकंपापासून संरक्षण करण्यासाठी) लाकडाची होती. त्यामुळे या जळत्या गोळ्यांमुळे संपूर्ण जपान बेचिराख झाले असते. संध्याकाळ झाली. आता दुसऱ्या दिवशी सकाळी खूप मोठा हल्ला होणार हे स्पष्ट होते. जपानच्या सम्राटाने सर्व नागरिकांना देवळात जाऊन देवाची प्रार्थना आणि घंटानाद करण्यास सांगितले. ती  रात्र जपानचे सर्व नागरिक देवळात घंटानाद करीत होते. पूर्व दिशा उजळू लागली. गस्त घालणारे सामुराई योद्धे चिंतेने समुद्राकडे बघू लागले. पण आश्चर्य म्हणजे आता बोटींची शिडे दिसत नव्हती. रात्री खूप मोठे वादळ (टायफून) येऊन कुबलईखानाच्या आरमाराला जलसमाधी मिळाली होती. जपानी माणसे अत्यानंदाने परत देवळात गेली आणि घंटानाद करून देवाचे आभार मानू लागली. घंटानाद जपानच्या दशदिशांत भरून राहिला. त्या दिवशी आलेल्या वादळाला डिव्हाईन विंड (Kamikaze) या नावाने जपानी लोक ओळखतात. देवानेच हे वादळ पाठविले अशी त्यांची श्रद्धा आहे.
आपण आता त्यावेळी नक्की काय झाले होते ते पाहू. चीनमध्ये (आणि आपल्याकडेही) त्याकाळी बरीचशी वाहतूक नद्यांमधून होत असे. कुब्लाईखानाने ज्यांना बोटी बांधण्यास सांगितले ते बहुतेक नदीतील वाहतुकीसाठी बोटी तयार करणारे होते. नदी समुद्राच्या मानाने उथळ असते, तिच्यातील प्रबळ प्रवाहाला तोंड देऊन बोटींना मार्गक्रमण करावी लागते. त्यांना फारसा वादळाशी सामना करावा लागत नाही. म्हणून या बोटींचे तळ निमुळते असतात. याउलट समुद्रात जाणाऱ्या बोटींना प्रबळ प्रवाहांना तोंड द्यावे लागत नाही, मात्र वादळांशी सामना करावा लागतो. त्यामुळे या बोटींचे तळ सपाट असतात. परंतु बोटी बांधणाऱ्या लोकांना नदीतील बोटी तयार करण्याचे ज्ञान असल्याने त्यांनी निमुळत्या तळ्यांच्या बोटी बांधल्या.  नदीतील बोटी आणि समुद्रातील बोटी यांचे नांगरही  वेगळे असतात. परंतु या बोटींचे नांगर नदीतील बोटींसारखे होते. ते वादळात उखडले गेले. तसेच चिनी समुद्रात ऑगस्टमध्ये मोठी वादळे (टायफून) येतात. परंतु कुब्लाईखान जपानवर हल्ला करण्यास उतावीळ झाल्याने आणि तो आपल्या आरामाराबद्दल अतिविश्वासू असल्याने त्याने ऑगस्टमध्ये ही मोहीम काढली.
आता हे वादळ 'देवाने पाठविले' का 'कर्मधर्म संयोगाने त्याचवेळी वादळ आले' हे प्रत्येकाने आपल्या श्रद्धांनुसार आणि विचारांनुसार ठरवावे.