Monday, April 6, 2020

Kamikaze : जपानचा डिव्हाईन विंड


कालच्या दिवे उजळण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मला जपानच्या १५ ऑगस्ट १२८१ मध्ये घडलेल्या  'डिव्हाईन विंड' ची आठवण झाली.
मंगोल आक्रमक चेंगीझ खान याने चीनचा बराचसा भाग ताब्यात घेतला होता. चीनचा तो सत्ताधीश झाला आणि त्याने आपल्या राजवटीला युआन राजवट (Yuan Dynasty) म्हणजे 'प्रथम सुरुवात' (‘first beginning) असे नाव दिले. त्याचा नातू कुबलईखान हा आपल्या आजोबांसारखाच शूर आणि महत्वाकांक्षी होता. त्याने आपल्या राज्याच्या पश्चिमेला असलेले प्रदेश जिंकून घेतले. मात्र खैबरखिंड ओलांडून भारतभूमीवर आक्रमण करण्याचे धैर्य त्याच्याकडे नव्हते. मग त्याने आपले लक्ष पूर्वेकडे वळविले. केवळ शंभर मैलांवर असलेला जपान त्याला खुणावत होता. त्याने आपणास शरण येण्यासाठी  अनेक खलिते जपानच्या सम्राटास पाठविले. परंतु जपानच्या बलाढ्य लष्कराच्या प्रामुख्याने (शोगुन shogun) हे खलिते राजापर्यंत पोचूच दिले नाहीत. आता मात्र कुबलईखान चिडला. पण जपानचे आरमार अत्यंत बलाढ्य होते. या आरमाराने पूवी कुब्लाईखानाला चांगली लढत देऊन पिटाळून लावले होते. त्यामुळे  कुबलईखानाने मोठी तयारी करूनच हल्ला करण्याचे ठरविले.
हा हल्ला करण्यासाठी मोठे आरमार जवळ असणे आवश्यक होते. त्यासाठी Kamikaze चीनमधील नौका तयार करणाऱ्या सर्वांना कामाला लावले.  कोणाही नौका तयार करणाऱ्याने दुसरे काम हातात घेऊ नये असे फर्मानाच काढले. चीनमधील मोठ्या नद्यांतून खूप वाहतूक होत असल्याने तेथे नौका तयार करणारे कारागीरही खूप होते. बघता बघता दीड वर्षात ४,४०० आरमारी जहाजांचा मोठा ताफा कुबलईखानाकडे तयार झाला. त्यावर त्याने ७०,००० ते १,४०,००० खलाशी आणि नौसैनिक नेमले. या शिवाय आता त्याच्याकडे चिनी लोकांकडूनच शिकलेली एक विद्या होती. त्याने बंदुकीची दारू वापरून बॉम्ब (जळते गोळे) तयार केले होते. हे गोळे फेकण्यासाठी मोठ्या लाकडी गलोली त्याने या जहाजांवर उभारल्या होत्या. आजवर असे अस्त्र कोणी वापरले नव्हते. अशा तयारीनिशी हल्ला केल्यावर जपानी सहज शरण येतील अशी कुबलईखानाल खात्री होती. १२८१च्या ऑगस्टमध्ये हे महाप्रचंड आरमार जपानवर हल्ला करण्यास हाकता समुद्रधुनीतून निघाले.
जपानमध्ये सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. किनाऱ्यावर त्यांचे पारंपरिक सामुराई योद्धे आपल्या पारंपरिक शस्त्रांसह गस्त घालीत होते. अचानक त्यांना क्षितिजावर शिडे दिसू लागली. शिडांची संख्या पाहून ते चक्रावून गेले. जपानवर आता खूप मोठा हल्ला होत आहे याची त्यांना खात्री झाली. तेवढ्यात त्यांच्यावर क्षितिजावरून जळत्या गोळ्यांचा मारा सुरु झाला. अजून हे जळते गोळे किनाऱ्यापर्यंत पोचत नव्हते. पण लवकरच या बोटी जवळ आल्या की ते पोचणार होते. जपानी लोकांकडे या शस्त्रावर उत्तर नव्हते. ते पारंपरिक शस्त्रांत प्रवीण होते.  त्याकाळी जपानमधील बहुसंख्य घरे (भूकंपापासून संरक्षण करण्यासाठी) लाकडाची होती. त्यामुळे या जळत्या गोळ्यांमुळे संपूर्ण जपान बेचिराख झाले असते. संध्याकाळ झाली. आता दुसऱ्या दिवशी सकाळी खूप मोठा हल्ला होणार हे स्पष्ट होते. जपानच्या सम्राटाने सर्व नागरिकांना देवळात जाऊन देवाची प्रार्थना आणि घंटानाद करण्यास सांगितले. ती  रात्र जपानचे सर्व नागरिक देवळात घंटानाद करीत होते. पूर्व दिशा उजळू लागली. गस्त घालणारे सामुराई योद्धे चिंतेने समुद्राकडे बघू लागले. पण आश्चर्य म्हणजे आता बोटींची शिडे दिसत नव्हती. रात्री खूप मोठे वादळ (टायफून) येऊन कुबलईखानाच्या आरमाराला जलसमाधी मिळाली होती. जपानी माणसे अत्यानंदाने परत देवळात गेली आणि घंटानाद करून देवाचे आभार मानू लागली. घंटानाद जपानच्या दशदिशांत भरून राहिला. त्या दिवशी आलेल्या वादळाला डिव्हाईन विंड (Kamikaze) या नावाने जपानी लोक ओळखतात. देवानेच हे वादळ पाठविले अशी त्यांची श्रद्धा आहे.
आपण आता त्यावेळी नक्की काय झाले होते ते पाहू. चीनमध्ये (आणि आपल्याकडेही) त्याकाळी बरीचशी वाहतूक नद्यांमधून होत असे. कुब्लाईखानाने ज्यांना बोटी बांधण्यास सांगितले ते बहुतेक नदीतील वाहतुकीसाठी बोटी तयार करणारे होते. नदी समुद्राच्या मानाने उथळ असते, तिच्यातील प्रबळ प्रवाहाला तोंड देऊन बोटींना मार्गक्रमण करावी लागते. त्यांना फारसा वादळाशी सामना करावा लागत नाही. म्हणून या बोटींचे तळ निमुळते असतात. याउलट समुद्रात जाणाऱ्या बोटींना प्रबळ प्रवाहांना तोंड द्यावे लागत नाही, मात्र वादळांशी सामना करावा लागतो. त्यामुळे या बोटींचे तळ सपाट असतात. परंतु बोटी बांधणाऱ्या लोकांना नदीतील बोटी तयार करण्याचे ज्ञान असल्याने त्यांनी निमुळत्या तळ्यांच्या बोटी बांधल्या.  नदीतील बोटी आणि समुद्रातील बोटी यांचे नांगरही  वेगळे असतात. परंतु या बोटींचे नांगर नदीतील बोटींसारखे होते. ते वादळात उखडले गेले. तसेच चिनी समुद्रात ऑगस्टमध्ये मोठी वादळे (टायफून) येतात. परंतु कुब्लाईखान जपानवर हल्ला करण्यास उतावीळ झाल्याने आणि तो आपल्या आरामाराबद्दल अतिविश्वासू असल्याने त्याने ऑगस्टमध्ये ही मोहीम काढली.
आता हे वादळ 'देवाने पाठविले' का 'कर्मधर्म संयोगाने त्याचवेळी वादळ आले' हे प्रत्येकाने आपल्या श्रद्धांनुसार आणि विचारांनुसार ठरवावे. 

No comments:

Post a Comment