Wednesday, August 4, 2021

कुंडलिनी विद्या - १६

या लेखमालेतील हा शेवटचा लेख. खरेतर या विषयावर लेख लिहिण्याची माझी पात्रता नाही असे मी मानतो. म्हणूनच जरी गेली वीस वर्षे नियमित ध्यान करत असूनही आणि विपश्यनेची प्रत्येकी दहा दिवसांची नऊ शिबीरे केली असतानाही मी 'ध्यान कसे करावे' या विषयाला स्पर्श केला नव्हता. ध्यानाचे सुरुवातीचे टप्पे गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरांत (http://www.dhamma.org) चांगल्या पद्धतीने शिकविले जातात असे माझे मत आहे. त्यामुळे हे टप्पे तेथे जाऊनच शिकावे असे वाटते. पण गेले काही महिने लॉकडाउनमुळे माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना या शिबिराला जाताआले नाही. तसेच लॉकडाउनमुळे अनेकांना नैराश्य आले आहे.म्हणूनच मी या विषयावर लिहिण्याचे धाडस केले. विपश्यना विद्या दहा दिवसांच्या निवासी शिबिरातच शिकली पाहिजे, अन्य ठिकाणी शिकवू नये असा गोएंका गुरुजींचा एक दंडक आहे. तो मी या असाधारण परिस्थितीत मोडला याबद्दल त्यांची क्षमा मागतो. 

कुंडलिनी विद्या आत्मसात करण्याच्या तीन पायऱ्या आहेत हे आपण या लेखमालेत पाहिले. प्राणधारणा, विपश्यना ध्यान आणि कुंडलिनी ध्यान या त्या तीन पायऱ्या आहेत. पुढील पायरीसाठी प्रस्थान करण्यापूर्वी आधीची पायरी नीट आत्मसात करणे आवश्यक आहे. अनेक साधक कोठल्यातरी गुरूंकडे जाऊन सरळ तिसऱ्या पायरीला सुरुवात करतात आणि नंतर निराश होतात. कुंडलिनी विद्या ही काही वर्षांची अथवा काही जन्मांची साधना आहे. मागील जन्मात तुम्ही कोठपर्यंत पोचले होता हे साधनेला सुरुवात केल्यावरच कळू शकते. पण साधना केल्यावर आपण निश्चित पुढे जातो. 

आपल्याला या लेखमालेचा उपयोग झाला असेल ही आशा. मी ही तुमच्यासारखाच एक साधक आहे. आपण एकमेकांच्या साथीने ही कुंडलिनी विद्येच्या प्रवासास जाऊ. माझ्या पुढील साधनेसाठी आपल्या सदिच्छा माझ्या पाठीशी असू द्या ही प्रार्थना.

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥ 

Monday, August 2, 2021

कुंडलिनी विद्या - भाग १५

मागील लेखात आपण आज्ञा चक्रासंबंधी माहिती घेतली. आता आपण शेवटच्या चक्राकडे म्हणजेच सहस्राराकडे वळू. 

सहस्रार हे चक्र शिवाचे निवासस्थान आहे. याच शिवाशी मीलन होण्यासाठी कुंडलिनीची धडपड आहे. आपल्यासाठी या जीवनाचा खेळ याच कुंडलिनी-शिवाच्या मीलनासाठी चालला आहे. म्हणूनच कुंडलिनी जागृतीत या चक्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे चक्र आपल्या शरीराच्या सर्वात वरच्या टोकावर - टाळूच्या किंचित वर आहे. शरीराच्या बाहेरील हे एकमेव चक्र आहे. मूलाधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. परंतु आज्ञाचक्रापासून सहस्रारापर्यंत जाण्यासाठी एकही मार्ग नाही. म्हणूनच या चक्राला भेदण्यासाठी परमेश्वरी कृपेची आवश्यकता आहे असे समजले जाते. 

या चक्राच्या अधिपत्याखाली पिनल ग्लॅन्ड येते. ही ग्लॅन्ड मेलाटोनीन हे हार्मोन अत्यंत सूक्ष्म प्रमाणात स्रवते. या हार्मोनमुळे संपूर्ण शरीर तणावरहित होते. म्हणूनच हे चक्र भेदले गेल्यास सामुर्ण तणावरहित अवस्था जाणवते. कुंडलिनी ही शिवाच्या मिलनासाठीच प्रयत्न करीत असते. त्यामुळे हे चक्र भेदले गेल्यावर माणूस उन्मनी अवस्थेत जाण्याची शक्यता असते. यातून बाहेर येण्यासाठी कुल कुंडलिनी विद्या सांगितली गेली आहे. सहस्रारापासून मूलाधारचक्रापर्यंत क्रमाने ध्यान केल्यास कुंडलिनी परत तिच्या स्थानी म्हणजे मूलाधार चक्रात स्थिर होते. आवश्यक असेल तेव्हा ही शक्ती त्या त्या चक्रात प्रकट होते. म्हणूनच हे चक्र भेदले जाण्याआधी खालील सर्व चक्रे भेदली जाणे आवश्यक असते. घाई करून चालत नाही. 

पुढील लेख या लेखमालेतील शेवटचा लेख असेल.