Showing posts with label कुंडलिनी. Show all posts
Showing posts with label कुंडलिनी. Show all posts

Tuesday, January 2, 2024

कुंडलिनी चक्रे आणि ध्वनीची वारंवारिता (फ्रिक्वेन्सी)

 

आपण जे आवाज ऐकतो/बोलतो त्याच्या वारंवारितेचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. या वारंवारिता आपल्या कुंडलिनीच्या विविध चक्रांशी संबंधित आहेत. म्हणून कुंडलिनी ध्यानात विविध चक्रांवर ध्यान करताना या वारंवारितेच्या ओम ध्वनीचा नाद ऐकलं अथवा आपण या वारंवारितेने ओम ध्वनीचा जप केला तर ते चक्र कार्यंवित होऊ शकते. विविध वारंवारितेचे ओम ध्वनी you tube वर ऐकण्यास मिळू शकतात.


397Hz मूलाधार चक्र
417 Hz स्वाधिष्ठान चक्र
528 Hz मणिपूर चक्र
639 Hz अनाहत चक्र
741 Hz विशुद्ध चक्र
852 Hz आज्ञा चक्र
963 Hz सहस्रार

Wednesday, August 4, 2021

कुंडलिनी विद्या - १६

या लेखमालेतील हा शेवटचा लेख. खरेतर या विषयावर लेख लिहिण्याची माझी पात्रता नाही असे मी मानतो. म्हणूनच जरी गेली वीस वर्षे नियमित ध्यान करत असूनही आणि विपश्यनेची प्रत्येकी दहा दिवसांची नऊ शिबीरे केली असतानाही मी 'ध्यान कसे करावे' या विषयाला स्पर्श केला नव्हता. ध्यानाचे सुरुवातीचे टप्पे गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरांत (http://www.dhamma.org) चांगल्या पद्धतीने शिकविले जातात असे माझे मत आहे. त्यामुळे हे टप्पे तेथे जाऊनच शिकावे असे वाटते. पण गेले काही महिने लॉकडाउनमुळे माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना या शिबिराला जाताआले नाही. तसेच लॉकडाउनमुळे अनेकांना नैराश्य आले आहे.म्हणूनच मी या विषयावर लिहिण्याचे धाडस केले. विपश्यना विद्या दहा दिवसांच्या निवासी शिबिरातच शिकली पाहिजे, अन्य ठिकाणी शिकवू नये असा गोएंका गुरुजींचा एक दंडक आहे. तो मी या असाधारण परिस्थितीत मोडला याबद्दल त्यांची क्षमा मागतो. 

कुंडलिनी विद्या आत्मसात करण्याच्या तीन पायऱ्या आहेत हे आपण या लेखमालेत पाहिले. प्राणधारणा, विपश्यना ध्यान आणि कुंडलिनी ध्यान या त्या तीन पायऱ्या आहेत. पुढील पायरीसाठी प्रस्थान करण्यापूर्वी आधीची पायरी नीट आत्मसात करणे आवश्यक आहे. अनेक साधक कोठल्यातरी गुरूंकडे जाऊन सरळ तिसऱ्या पायरीला सुरुवात करतात आणि नंतर निराश होतात. कुंडलिनी विद्या ही काही वर्षांची अथवा काही जन्मांची साधना आहे. मागील जन्मात तुम्ही कोठपर्यंत पोचले होता हे साधनेला सुरुवात केल्यावरच कळू शकते. पण साधना केल्यावर आपण निश्चित पुढे जातो. 

आपल्याला या लेखमालेचा उपयोग झाला असेल ही आशा. मी ही तुमच्यासारखाच एक साधक आहे. आपण एकमेकांच्या साथीने ही कुंडलिनी विद्येच्या प्रवासास जाऊ. माझ्या पुढील साधनेसाठी आपल्या सदिच्छा माझ्या पाठीशी असू द्या ही प्रार्थना.

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥ 

Monday, August 2, 2021

कुंडलिनी विद्या - भाग १५

मागील लेखात आपण आज्ञा चक्रासंबंधी माहिती घेतली. आता आपण शेवटच्या चक्राकडे म्हणजेच सहस्राराकडे वळू. 

सहस्रार हे चक्र शिवाचे निवासस्थान आहे. याच शिवाशी मीलन होण्यासाठी कुंडलिनीची धडपड आहे. आपल्यासाठी या जीवनाचा खेळ याच कुंडलिनी-शिवाच्या मीलनासाठी चालला आहे. म्हणूनच कुंडलिनी जागृतीत या चक्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे चक्र आपल्या शरीराच्या सर्वात वरच्या टोकावर - टाळूच्या किंचित वर आहे. शरीराच्या बाहेरील हे एकमेव चक्र आहे. मूलाधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. परंतु आज्ञाचक्रापासून सहस्रारापर्यंत जाण्यासाठी एकही मार्ग नाही. म्हणूनच या चक्राला भेदण्यासाठी परमेश्वरी कृपेची आवश्यकता आहे असे समजले जाते. 

या चक्राच्या अधिपत्याखाली पिनल ग्लॅन्ड येते. ही ग्लॅन्ड मेलाटोनीन हे हार्मोन अत्यंत सूक्ष्म प्रमाणात स्रवते. या हार्मोनमुळे संपूर्ण शरीर तणावरहित होते. म्हणूनच हे चक्र भेदले गेल्यास सामुर्ण तणावरहित अवस्था जाणवते. कुंडलिनी ही शिवाच्या मिलनासाठीच प्रयत्न करीत असते. त्यामुळे हे चक्र भेदले गेल्यावर माणूस उन्मनी अवस्थेत जाण्याची शक्यता असते. यातून बाहेर येण्यासाठी कुल कुंडलिनी विद्या सांगितली गेली आहे. सहस्रारापासून मूलाधारचक्रापर्यंत क्रमाने ध्यान केल्यास कुंडलिनी परत तिच्या स्थानी म्हणजे मूलाधार चक्रात स्थिर होते. आवश्यक असेल तेव्हा ही शक्ती त्या त्या चक्रात प्रकट होते. म्हणूनच हे चक्र भेदले जाण्याआधी खालील सर्व चक्रे भेदली जाणे आवश्यक असते. घाई करून चालत नाही. 

पुढील लेख या लेखमालेतील शेवटचा लेख असेल. 

Saturday, July 24, 2021

कुंडलिनी विद्या भाग १३

मागील लेखात आपण पहिल्या तीन चक्रांवर (मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर) ध्यान कसे करायचे याची माहिती घेतली. आता पुढील चक्रांकडे वळू. 

खालील तीन चक्रे म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र ही आपल्या या जीवनातील गोष्टींशी संबंधीत आहेत. तर वरील तीन चक्रे म्हणजे विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार ही चक्रे दैवी गोष्टींशी संबंधित आहेत. अनाहत चक्र हे यामधील दोहोंचा सांधा जुळविणारे चक्र आहे. या दृष्टीने अनाहत चक्राचे महत्व आहे. प्राणाधारणा करताना आपण श्वासाचा उपयोग करतो हे आपल्याला माहीत आहेच. 

मणिपूर चक्राच्यावर हुदयाच्या पातळीत पाठीच्या कण्यात अनाहत चक्र आहे. या चक्रातून अनाहत नाद (कोठल्याही आघाताशिवाय निर्माण झालेला नाद) ऐकू येतो . हा नाद अत्यंत मधुर असा जाणवतो. हा नाद विश्वनिर्मितीचा नाद आहे असे मानतात. ख्रिश्चनिटी आणि सुफीझममध्येही या दैवी नादाला खूप महत्व दिलेले आहे. हे चक्र वायू या पंचमहाभूतांशी जोडले गेलेले आहे. दहा प्रकारचे जे वायू (प्राण, अप्पन, समन इत्यादी) आपल्या आयुर्वेदात सांगितले आहेत ते या चक्राशी संबंधित आहेत. हे वायू आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा दर्शवितात. आपल्या भाव-भावना या वायूंवर अवलंबून असतात. हे चक्र आपल्याला योग्य-अयोग्य गोष्टींची पारख करण्याची शक्ती देते. म्हणजेच आपला विवेक जागृत करते. तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुमची नीतिमूल्ये निश्चित करते. ही नीतिमूल्येच तुम्ही आता वरील चक्रांचे  भेदन करण्यास योग्य झालात का हे ठरविते आणि तशा तुम्हाला सूचना देते. ममता या चक्राशी संबंधित आहे.  आसपासचा निसर्ग आणि आपण एकाच असल्याची भावना हे चक्र भेदन केल्यावर निर्माण होते. हे चक्र आपल्या  रोगप्रतिकार शक्तीशीही संबंधित आहे.  या चक्राची व्याप्ती छातीपासून गळ्यापर्यंत आहे. या चक्रावर ध्यान करताना फुफ्फुसातील हालचाल स्पष्ट जाणवली पाहिजे. तसेच हृदयाची स्पंदने स्पष्टपणे कळली पाहिजेत. फुफ्फुसे आणि हृदय यांच्यातील संवेदना स्पष्ट कळल्यावर हृदयाच्या पातळीवर मणक्यात ध्यान करावे. अनाहत चक्र हे ऐहिक आणि दैवी चक्रांच्या मध्ये आहे. आपण या चक्राचा भेद केला की आपल्याला दैवी चक्रांचा भेद करत पुढे जायचे की पुनश्च ऐहिक चक्रांत जायचे हे ठरविण्याची एक संधी मिळते. काहीजण पुनश्च ऐहिक चक्रांत जाण्याचा निर्णय घेतात. अशा व्यक्तींना ऐहिक सुख भरपूर मिळते आणि ते त्यातच समाधानी असतात. 

अनाहत  चक्राच्या वर घशात विशुद्ध चक्र आहे. पंचमहाभूतांशी संबंधित असे हे शेवटचे चक्र. हे चक्र थायरॉईड ग्रंथीशी संबंधित आहे. थायरॉईड ग्रंथीचा आपल्या शरीरावर आणि मनावर किती मोठा परिणाम होतो हे आधुनिक विज्ञानही जाणते. पाठीच्या मणक्याचा शेवट जेथे होतो तेथे हे चक्र आहे. या दृष्टीने या चक्राचे महत्व आहे. या चक्रावर ध्यान केले असता गळ्यातून मेंदूत जाणाऱ्या रक्तप्रवाहाची स्पष्ट जाणीव होते. हे चक्र भेदण्याचा आणखी एक मार्ग आहे. जिभेच्या टोकाच्या संवेदना घेऊन हळू हळू जिभेच्या मागच्या टोकापर्यंत (पडजीभ) गेले की हे मागचे टोक घशाला चिकटलेले असते तेथपर्यंत संवेदना मिळविता येतात. हे चक्र आकाश तत्वाशी संबंधित असल्याने ते भेदले गेले की असीम शांततेचा अनुभव येतो. हे चक्र भेदले गेल्यावर आपले मन स्वार्थापासून मुक्त होते, विशाल होते, विशुद्ध होते. त्यामुळे मनाच्या अनेक आजवर अज्ञात राहिलेल्या शक्ती मोकळ्या होतात. हे चक्र आपल्या मेंदूला चालना देऊन बुद्धी तीक्ष्ण बनविते. हे चक्र अत्यंत शक्तिशाली असल्याने तसेच ते विशुद्ध स्वरूपात असल्याने ते पांढरा हत्ती (ऐरावत) या चिन्हाद्वारे दर्शविले जाते. (मूलाधार चक्र हे काळ्या हत्तीच्या चिन्हाद्वारे दर्शविले जाते. ही हत्तीद्वारे दर्शविलेली प्रचंड ऊर्जा आता शुद्ध स्वरूपात उपलब्ध झाली आहे हा त्याचा अर्थ आहे.) हे चक्र आकाश तत्वाशी संबंधित आहे. आकाश तत्व हे सर्वात सूक्ष्म तत्व आहे. ते तत्व वाणीशी संबंधित आहे. ऐकणे आणि आवाज काढणे या दोन्ही क्रियांशी संबंधित आहे. म्हणूनच हे चक्र भेदले गेल्यावर आवाज मृदू बनतो, आवाजात एक प्रकारची संमोहन शक्ती येते. हे चक्र भेदले गेल्यास निरनिराळे हार्मोन्स स्रवण्यात झालेल्या बदलामुळे दाढीमिशांचे आणि अंगावरील केस झपाट्याने वाढू लागल्याचाही अनुभव येतो. (हिमालयात काही व्यक्तिंना अंगावर भरपूर केस असलेले साधू भेटल्याचे आपण कधीकधी वाचतो.) अनाहत चक्र भेदले गेल्यावर आनंदाचा झरा आपल्या मनात वाहू लागतो. आपल्याला समाजासाठी काही कार्य करण्याची प्रेरणा मिळते. मणिपूर अथवा स्वाधिष्ठान चक्रातूनही कार्याची प्रेम मिळते. पण ही स्वाधिष्ठान चक्रातून मिळणारी प्रेरणा ही संपूर्ण स्वार्थविरहीत असते. या एकाच गोष्टीवरून आपण एखाद्याचे विशुद्ध चक्र भेदले गेले आहे काय याचा अंदाज बांधू शकतो. हे चक्र भेदले गेल्यावरच माणूस परमेश्वरापुढे संपूर्ण नतमस्तक होऊ शकतो. हे चक्र अनेक सिद्धींचे माहेरघर आहे. अर्थात सिद्धीच्या मागे लागून कधीही साधना करता येत नाही. हे चक्र ध्वनीशी संबंधित असल्याने बीजमंत्राच्या (हं) उच्चारणाचा हे चक्र भेदण्यास खूप उपयोग होतो. 

पुढील दोन चक्रांसंबंधी जाणून घेऊ पुढील लेखात. 

Wednesday, July 21, 2021

कुंडलिनी विद्या भाग १२

 मागील लेखात सांगितल्याप्रमाणे कुंडलिनी  विद्या आत्मसात करण्याचा हा तिसरा टप्पा खूप सोपा आहे. फक्त पहिले दोन टप्पे नीट आत्मसात केले पाहिजेत. त्यासाठी पुरेसा वेळ आणि संयम ठेवता आला पाहिजे. 
या सात चक्रांच्यामधील सर्वात खालचे चक्र म्हणजे मूलाधार चक्रापासून या ध्यानाला सुरुवात करा. पायाच्या बोटांपासून कमरेपर्यंत सर्व अवयवांची संवेदना बघा. गुदद्वाराची संवेदना बघा. गुदद्वाराच्या आत जेवढे शक्य आहे तेथपर्यंत मोठ्या आतड्याच्या संवेदना पहा. त्यानंतर पाठीच्या शेवटच्या मणक्याची संवेदना बघा. काही दिवस अशा प्रकारे ध्यान केल्यावर आपण या चक्राचा मंत्र  (लं )ऐकत अथवा म्हणत ध्यान करू शकता. या चक्राचा रंग डोळ्यापुढे आणू शकता. या चक्राचे ज्ञानेंद्रिय नाक असल्याने वासावर ध्यान करू शकता. आपल्याला या चक्रावर ध्यान करण्यासाठी अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आपल्या व्यक्तिमत्वाला योगय वाटेल अशा प्रकाराने हे ध्यान करता येईल. प्रत्येक चक्राचा  मंत्र आणि अन्य माहिती इंटरनेटवर अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. मला श्री. कमल नारायण सीठा (https://www.youtube.com/watch?v=qxonnL0UMeU) यांचे youtube वरील लेक्चर ऐकत ध्यान करणे छान वाटले. आपल्या व्यतिमत्वाला साजेसे youtube lecture आपल्याला शोधावे लागेल. 

या चक्राच्या ठिकाणाहून आपणास पुरेशा संवेदना मिळू लागल्या की पुढील चक्राकडे जावे. एक चक्र भेदण्यास काही महिने लागतात. घाई करू नये. 

त्यानंतरचे चक्र स्वाधिष्ठान चक्र आहे. आपली लैंगिक इंद्रिये ते साधारण बेंबीच्या थोडे खालपर्यंत या चक्राची व्याप्ती आहे. या भागातील संवेदना घेऊन लैंगिक इंद्रियांच्या किंचित वरच्या पातळीत पाठीच्या कण्यात संवेदना घ्याव्यात. मूलाधारचक्राप्रमाणेच या चक्राचे ध्यान करावे. 

या नंतर मणिपूर चक्र आहे. साधारण बेंबीच्या पातळीवर पाठीच्या मणक्यात हे चक्र आहे. बेंबीपासून छाती सुरु होईपर्यंतचा भाग या चक्राच्या कक्षेत येतो. बेंबीच्या आसपासचा भाग आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे.  संवेदना नीटपणे मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. पोटातील आतडी, जठर आणि अन्य इंद्रिये या चक्राच्या कक्षेत येतात. 

या नंतरची चक्रे पुढील लेखात. 

Saturday, July 17, 2021

कुंडलिनी विद्या भाग ११

आता आपण या लेखमालेच्या तिसऱ्या टप्प्याला - कुंडलिनी ध्यानाला - सुरुवात करीत आहोत. यापूर्वी अनेक गुरूंनी आधीचे पूर्वतयारीचे दोन टप्पे गृहीत धरून हे कुंडलिनी ध्यान शिकविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे कुंडलिनी ध्यान हे काहीतरी गहन आणि कठीण गोष्ट आहे अशी कल्पना जनमानसात रूढ झाली आहे. खरे तर पहिले दोन टप्पे मनापासून घाई न करता पार केले तर हा तिसरा टप्पा खूपच सोपा आहे. आपल्या हे लक्षात आले असेल की पहिले दोन टप्पे आत्मसात करणे फार कठीण नाही. त्यातील प्रत्येक टप्पा हा समजण्यास सोपा आहे. मात्र संयम हवा, येथे घाई अजिबात चालणार नाही. 

आधी सांगितल्याप्रमाणे कुंडलिनी ध्यानात काही चक्रांची संकल्पना केलेली आहे. ही चक्रे म्हणजे प्रत्यक्षातली चक्रे नसून आपले महत्वाचे चेतातंतू पाठीच्या मणक्यातून जेथून निघतात त्या जागा. हे चेतातंतू शरीराच्या काही महत्वाच्या अवयवांत जातात. तसेच त्यांचे दुसरे टोक मेंदूमध्ये जाते. हे दुसरे टोक मेंदूत जेथे जाते तेथे आपल्या मनाच्या काही घडामोडींवर नियंत्रण करणारी केंद्रे असतात. त्यामुळे या चक्रांवर ध्यान केले असता त्या विशिष्ट अवयवांवर तसेच मानसिकतेवर चांगला परिणाम होतो. मात्र आपण प्रत्यक्ष चेतातंतूंना कार्यक्षम करीत असल्याने हे ध्यान शांतपणे करावे लागते. घाईघाईत केल्यास वाईट परिणामही होऊ शकतो.

कुंडलिनी शास्त्रानुसार आपल्या शरीरात अशी अनेक चक्रे कल्पिलेली आहेत. मात्र यातील सात चक्रे महत्वाची आहेत. ही चक्रे खालपासून डोक्यापर्यंत क्रमाक्रमाने भेदत जायचे आहे. हा क्रमही महत्वाचा आहे. प्रत्येक चक्र भेदले जाताना आपल्या काही आंतरिक शक्ती/सिद्धी जागृत होतानाही कदाचित जाणवतील. सिद्धी प्राप्त झाल्याचे लक्षात आले तरी त्याकडे दुर्लक्ष करून त्याची वाच्यता कोणाकडेही न करणेच इष्ट. मग सिद्धींचे प्रदर्शन ही तर खूप दूरची गोष्ट झाली. या सिद्धी म्हणजे तपोभंग करणाऱ्या अप्सरांसारख्या मानल्या गेल्या आहेत. या सिद्धींमध्ये आपण गुंतून पडलो तर पुढील साधनेत खंड पडतो. आपला अहंकार जागृत होऊन आपण साधनेतून भ्रष्ट होऊ शकतो. आपली नजर आपल्या अंतिम उद्दिष्टावर असली पाहिजे. 

कुंडलिनी ध्यानासंबंधी आणखी काही जाणून घेऊ पुढील लेखात. 

Wednesday, July 14, 2021

कुंडलिनी विद्या - भाग १०

 आपण या लेखात विपश्यना ध्यानाच्या थोडे खोलात शिरू. 
विपश्यना ध्यानासाठी प्रथम एका पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करून एक एक बोट करत सर्व बोटे, तळपाय, पाऊल, घोटा, पोटरी, गुढगा. मांड्या, पृष्ठभाग अशा क्रमाने त्या पायातील संवेदना बघाव्या. नंतर दुसरा पाय बघावा. अशाच क्रमाने डोक्याच्या वरच्या बिंदूपर्यंत (टाळू) संवेदना बघाव्या. शरीराचा एकही भाग सुटता काम नये. या संवेदना बघताना मनाची स्थिरता महत्वाची  आहे. एखादी संवेदना परत व्हावी अशी अपेक्षा करावे अथवा एखादी संवेदना होऊ नये अशी अपेक्षा करणे यामुळे एकाग्रता भंग पावेल. विपश्यना होणार नाही. 
सर्व शरीराच्या संवेदना जाणवू लागल्या की शरीराच्या आतील संवेदनांची नीट जाणीव घ्यावी. यासाठी शरीराला छेदून जाणारी पद्धत वापरावी. म्हणजे छातीपासून सुरु करून शरीराच्या आतून पाठीपर्यंत संवेदना अनुभवाव्यात. तोंडाच्या आत जिभेच्या टोकापासून सुरुवात करून जिभेच्या दुसऱ्या टोकापर्यंत (पडजीभ) जावे. नंतर वरील बाजूला असलेल्या सर्व दातांच्या संवेदना अनुभवाच्या. मग खालील सर्व दातांच्या. तसेच डोळे, कान इत्यादी अवयवांच्या संवेदना आतून अनुभवाव्या. आपल्याला या स्पर्शाच्या संवेदनेबरोबरच आवाज, गंध, चव इत्यादी संवेदनांवरही ध्यान करायचे आहे. 

जर विपश्यना सुरु असताना मन विचलित होत आहे असे जाणवले तर काही काळ प्राणधारणेकडे यावे आणि मन स्थिर झाले की परत विपश्यना सुरु करावी. 

विपश्यनेच्या प्रगती झाली की संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह जाणवू लागेल. संपूर्ण शरीरात एकाच प्रकारची सुखद संवेदना जाणवू लागेल. संपूर्ण शरीर एकाच प्रकारे कंपन पावते आहे असे जाणवू लागेल. आपल्या विपश्यना ध्यानाची या पातळीपर्यंत प्रगती झाली की कुंडलिनी ध्यानाला सुरुवात करायची आहे. 
काहींना हा खूपच दूरचा पल्ला वाटेल. पण आपण नित्य नियमाने रोज ध्यान करू लागलो तर काही महिन्यांत अथवा वर्षात हा पल्ला गाठणे कठीण नाही. येथे सातत्य महत्वाचे आहे. काही जण मागील जन्मात खूप साधना करून आलेले असतात. अशांची प्रगती एका विशिष्ट टप्प्यापर्यंत अत्यंत वेगाने होते. कारण त्यांनी हा टप्पा मागील जन्मात गाठलेला असतो. परंतु आपण कोठल्या टप्प्यावर आहोत हे ध्यानाला सुरुवात केल्यावरच कळू शकते. म्हणूनच ही साधना खूप जटील, दूरवरची वाटत असली तरी कदाचित आपण यात पूर्वजन्मीच प्रगती केलेली असेल. जरी या जन्मी आपण उद्दिष्टांपर्यंत पोचू शकलो नाही तरी पुढील जन्मी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल. 

सातत्य आणि मनाची स्थिरता ही विपश्यना ध्यानात प्रगती करण्याची गुरुकिल्ली आहे. 

पुढील लेखात आपण कुंडलिनी ध्यानासंबंधी माहिती घेऊ. 

Monday, July 12, 2021

कुंडलिनी विद्या भाग ९

तुम्ही ध्यानाचा पहिला टप्प्यामध्ये म्हणजेच प्राणधारणेमध्ये गेल्या एका महिन्यात प्रगती केली असेल असे मी मानतो.  प्राणधारणेमुळे आपल्याला खूप शांतता अनुभवायला आली असेल. मनातील सतत चालणारे अनावश्यक  विचारांचे चक्र मंदावले असेल. शांत झोप लागत असेल. कौटुंबिक पातळीवर, कामाच्या ठिकाणावर आणि अन्य लोकांसोबतच्या संबंधात सुधारणा झाली असेल. ध्यानाला सुरुवात केल्यावर ताबडतोब दिसून येणारे हे फायदे आहेत. अर्थात आपले मुख्य उद्दिष्ट अजून खूप पुढे आहे. आपल्याला अजून खूप मार्गक्रमणा करायची आहे. पण या प्रवासातला आनंद मनमुराद उपभोगायचा आहे. आपल्याला एक महिना प्राणधारणा करूनही  हे फायदे अनुभवाला येत नसतील तर प्राणाधारणा करताना आपली कोठेतरी चूक होते आहे हे निश्चित. अशा व्यक्तींनी माझ्याशी कॉमेंटमधून अथवा मेसेज बॉक्सतर्फे संपर्क साधावा. 

आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे निघालो आहोत. हा टप्पा विपश्यना ध्यानाचा आहे. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे आपण पहिल्या टप्प्यात आपल्या ध्यानाचा पाया मजबूत केला. कमकुवत असलेला पायाच खचला तर त्यावर अगदी भक्कम बांधलेली इमारतही कोसळते. म्हणून मजबूत पाया सर्वात महत्वाचा.  आता भिंती, छप्पर उभे करायचे आहे. वादळात छप्पर उडून जाता कामा नये. एखादा भूकंपाचा धक्का बसला तरी भितींना तडे जात काम नयेत. कोठल्याही मानसिक वादळात अथवा मोठ्या मानसिक धक्क्यात आपण उन्मळून पडू नये असे आपले ध्यान असले पाहिजे. हेच काम विपश्यना करणार आहे. 

आपण या लेखात विपश्यना ध्यानचं विवेचनाचा सुरुवात करू. 'वास्तवाचा संपूर्ण स्वीकार' अशी ध्यानाची एक व्याख्या करता येईल. विपश्यना ध्यानात जाण्यासाठी आपले शरीर हे एक माध्यम म्हणून काम करते. आपल्या शरीराला पंचेंद्रियांद्वारे विविध संवेदना जावणतात, मनात विचार येतात. या सर्वांचा संपूर्ण स्वीकार म्हणजे विपश्यना ध्यान. 

विपश्यना ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी रोज किमान दहा मिनिटे प्राणधारणा  करावी. नंतर कोणत्याही एका पायापासून सुरुवात करावी. प्रथम पायाच्या अंगठ्याला  काय संवेदना मिळत आहेत ते पाहावे. कदाचित कसला स्पर्श जाणवत असेल, कदाचित काही वेदना जाणवत असेल अथवा अन्य काही संवेदना असेल. ही संवेदना नीट जाणून घ्या. मात्र या संवेदनेबद्दल नकार नको. म्हणजेच समाज वेदना असेल तर ती कधी जाईल या संबंधी विचार नको. जे आहे त्याचा स्वीकार करून दुसऱ्या बोटाकडे जावे. त्या पायाची सर्व बोटे, तळपाय, पाऊल, घोटा अशा क्रमाने संपूर्ण पायाच्या संवेदनांकडे बघावे. मग दुसऱ्या पायाच्या संवेदनांकडे बघावे. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने संपूर्ण शरीराच्या संवेदना जाणून घ्याव्यात. एकही अवयव अथवा शरीराचा लहानात लहान भागही यापासून सुटता कामा नये. पायापासून डोक्यापर्यंत संवेदना जाणून झाल्यावर उलट्या क्रमाने डोक्यापासून पायापर्यंत संवेदना जाणून घ्याव्यात. नंतर परत पायापासून डोक्यापर्यंत अशाप्रकारे हे ध्यान रोज किमान एक तास करावे. 

या सर्व ध्यानात मनाची स्थिरता महत्वाची आहे. कोणत्याही संवेदनेबद्दल अभिलाषा (ही संवेदना मला सारखी होत राहो) अथवा द्वेष (ही संवेदना कधी जाईल) नको. विपश्यनेबद्दल अधिक जाणून घेऊ पुढील लेखात. 

Friday, July 9, 2021

कुंडलिनी विद्या भाग ८

 एका लहानश्या मध्यंतरानंतर आपण परत या लेखमालेला सुरुवात करत आहोत. 

आपण सगळ्यांनी प्राणधारणेला सुरुवात केली  असेल. प्राणधारणा हा कोठल्याही ध्यानप्रकाराचा पाया आहे. रोज एक तास किमान एक महिना प्राणाधारणा केल्याशिवाय पुढील टप्प्याला सुरुवात करू नका. कुंडलिनी ध्यान हे शरीर-मन यात संवाद निर्माण करते. आपली चेतासंस्था (Nerves System) जागृत करते. म्हणूनच हे ध्यान करताना अत्यंत सावकाश टप्प्याटप्प्याने पुढे जायचे आहे. घाई केलीत तर शरीर-मनाला इजा होऊ शकते.  

प्राणधारणा हा पाया पुरेसा भक्कम झाल्यावर आपल्याला त्यावर बांधकामाला सुरुवात करायची आहे.  बांधकाम क्षेत्रात असलेल्यांना माहीत असेल, घराच्या बांधकामाचे तीन  प्रमुख टप्पे असतात. पाया हा पहिला टप्पा , भिंतीच्या-छत वगैरेचे बांधकाम हा दुसरा टप्पा आणि  फरशा  बसविणे, प्लम्बिंग-वायरिंग, रंगरंगोटी आणि बाकीची सजावट हा  झाला तिसरा टप्पा. तसेच या कुंडलिनी ध्यानातही तीन प्रमुख टप्पे आहेत. दुसरा टप्पा हा 'विपश्यना ध्यानाचा' आहे. विपश्यना  ध्यानाची पद्धत अत्यंत प्राचीन आहे. वेदांत तिचे उल्लेख आहेत. परंतु विपश्यना ही गुरूच्या सानिध्यातच शिकविली जात असल्याने तिचे विस्तृत वर्णन वेदात  नाही. गौतम बुद्धाने अत्यंत परिश्रमाने या विद्येच्या  बारकाव्यांचा शोध घेतला आणि सामान्य लोकांना ती शिकविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यासक्रम तयार केला. गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरांत (http://www.dhamma.org) विपश्यना विद्या या गौतम बुद्धाने आखून दिलेल्या पद्धतीने शिकविली  जाते. मी ही गोएंका गुरुजींच्या विपश्यना केंद्रात  प्रत्येकी दहा दिवसांची नऊ शिबीरे केली आहेत. आजवर मी कोणालाही विपश्यना शिकविण्याचे टाळत होतो. कारण हा विषय त्या शिबीरातच चांगला शिकविला जातो आणि समजतो असे .मला वाटते. पण सध्याच्या करोनाच्या संकटात शिबिरांत जाऊन ही विद्या शिकणे कठीण आहे. तसेच अनेकांना लॉकडाउन काळात मानसिक अस्थैर्याला तोंड  द्यावे लागत आहे. त्यांना ताबडतोब मदतीची गरज आहे. म्हणून मी हा विषय इंटरनेट माध्यमातून शिकवायला घेतला आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी  जमेल तेव्हा या शिबिरांत जाऊन यावे असे मी सुचवेन. 

यानंतर तिसरा टप्पा हा घराच्या सुशोभीकरणाचा म्हणजेच कुंडलिनी ध्यानाचा असेल. 


Saturday, June 26, 2021

कुंडलिनी विद्या भाग ७

 आपण 'प्राणधारणेचे' तीन टप्पे मागील काही भागात शिकलो. हा प्राणधारणेसंबंधी शेवटचा लेख. या पुढील लेख हे कुंडलिनी ध्यानासंबंधी असतील. आपण आता या लेखमालेच्या मध्यंतरात आलो आहोत. म्हणूनच या लेखानंतर आपण एक 'short break' घेणार आहोत. या काळात आपण आपली प्राणधारणेत प्रगती करणार आहोत. सुमारे एक आठवड्यानंतर आपण या लेखमालेच्या पुढील भागास सुरुवात करू. माझ्या ब्लॉगवर 'Follow By email' या भागात आपला email दिल्यास लेखमालेतील लेख प्रसिद्ध झाल्याबरोबर आपल्याला तसा email येईल. 

प्राणधारंणा ही कोठल्याही ध्यानाची पूर्वतयारी आहे. जरी आपल्याला कुंडलिनी ध्यानाकडे वळायचे नसेल आणि अन्य कोठले ध्यान (उदाहरणार्थ ब्रह्मयोग, विपश्यना, सहजयोग इत्यादी) करायचे असेल तर प्राणाधारणा उपयोगी आहे. दहा वर्षांपासून पुढील मुलांना प्राणाधारण शिकविल्यास त्यांची एकाग्रता वाढून अभ्यासालाही मदत होऊ शकते. 

प्राणधारणेतील मला लक्षात आलेली एक युक्ती तुम्हाला सांगतो. मात्र ही युक्ती नेहमीसाठी वापरात आणायची नाही. क्वचित एखाद्या दिवशी काही घटनांमुळे आपले मन खूप विचलित झालेले असते. अशावेळी ध्यान लागत नाही. प्राणाधारणा केली तरी मन श्वासावर टिकत नाही. अशा वेळी केवळ दोन-तीन श्वास आपला श्वास जोरात घ्यायचा आणि श्वासाचा स्पर्श नाकात अनुभवायचा. दोन तीन श्वासानंतर परत नैसर्गिक श्वासाकडे यायचे आणि श्वासाचा स्पर्श अनुभवायला सुरुवात करायची. आपल्याला जोरात श्वास घेताना जेथे स्पर्शाची अनुभूती येत होती त्याच ठिकाणी स्पर्शाची अनुभूती जाणवते आणि आपली प्राणधारणा सुरु होते. मन शांत होऊ लागते. 

आपण प्राणाधारणेत थोडी प्रगती केल्यावर प्राणधारणा आपल्या रोजच्या बसच्या-लोकल ट्रेनच्या प्रवासातही बसण्यास जागा मिळाल्यावर करू शकता. आजूबाजूच्या माणसांना आपण डोळे मिटून झोपला आहात असे वाटेल. 

आपल्या प्राणधारणेतील अनुभवांचे कॉमेंटमध्ये आदान-प्रदान करा. त्याने बाकीच्यांना फायदा होईल. येथे कोणीही गुरु नाही-कोणी शिष्य नाही. आपण सर्व सहाध्यायी आहोत आणि एकमेकांना मदत करतच आपल्याला वाटचाल करायची आहे. 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ'

जर कोणाला काही शंका विचारायच्या असतील तर कॉमेंट्समध्ये विचारू शकता अथवा माझ्या फेसबुक मेसेज बॉक्स मध्ये मला मेसेज करू शकता. 

शांतीमंत्राने प्राणाधारणेच्या या सत्राची सांगता करू. 

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

Monday, June 14, 2021

कुंडलिनी विद्या - भाग २




मागील लेखात आपण कुंडलिनी विद्येसंबंधात थोडी माहिती घेतली होती.  कुंडलिनी विद्या ही कुंडलिनी शक्तीला तिच्या स्थानापासून म्हणजेच मूलाधार चक्रापासून सहस्रारात वसलेल्या शिवापर्यंत नेण्याची विद्या आहे हे आपण पाहिले. हा प्रवास पाठीच्या मणक्यातून होतो. पाठीच्या मणक्यातून मज्जारज्जू (Spinal Chord) जातो. ही विद्या आपल्या मज्जारज्जूला आणि त्याद्वारे आपल्या मेंदूला कार्यान्वित  करण्याची विद्या आहे. अर्थातच आपल्या शरीर-मनावर परिणाम घडविणारी विद्या आहे. आपले शरीरस्वास्थ्य-मनोस्वास्थ्य टिकविण्याची विद्या आहे. कोणाला काही अद्भुत-अलौकिक अनुभव  घेण्यासाठी ही विद्या शिकायची असेल तर त्यांनी या वाटेला न जाणेच चांगले. कारण काही अदभूत अनुभवाच्या प्रतीक्षेत मूळ उद्देशावरून लक्ष उडून शरीर-मनाला काही धोका संभवू शकतो. जर कोणाला यातून काही अलौकिक वाटणारे अनुभव आलेच तर ते त्याने स्वत:जवळच ठेवावे, विसरून जावे. त्याची वाच्यता केल्याने अथवा सतत मनात घोळवत राहिल्याने (मन विचलित होऊन) कुंडलिनी परत खाली उतरून मन:स्वास्थ्य बिघडू शकते. एकदा वर  गेलेली कुंडलिनी परत खाली आल्यास त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. काही अध्यात्मिक गुरु काही काळानंतर वासनेच्या आणि अन्य चिखलात रुतलेले दिसतात. हा वर गेलेली कुंडलिनी परत खाली उतरण्याचा परिणाम असावा. 

कुंडलिनी विद्येचा अभ्यास करताना पाठीच्या सर्वात शेवटच्या मणक्यातून निघणारे मज्जातंतू (Nerves) प्रथम कार्यान्वित करायचे आहेत. यालाच पाठीच्या शेवटच्या मणक्यातील चक्र म्हणजे मूलाधार चक्र भेदणे असे नाव आहे. हे या चक्रातून निघणारे मज्जातंतू ज्या ज्या अवयवात जातात ते अवयव चांगल्या प्रकारे कार्यंवित होतात. पण याचा आणखीही एक महत्वाचा परिणाम होतो. या मज्जातंतूंचे दुसरे टोक मेंदूत जाते. मेंदूच्या या भागात काही मनोव्यापार नियंत्रित करणारी केंद्रे असतात. त्यावरही हे मज्जातंतू कार्यान्वित झाल्याचे सकारात्मक परिणाम दिसतात.

उदाहरणार्थ: स्वाधिष्ठान चक्रातून निघणारे मज्जातंतू लैंगिक अवयवांकडे जातात. आपल्याला माहीत आहे की लैंगिक आवेग हे तीव्र आणि आवरण्यास कठीण असतात. या मज्जातंतूंचे दुसरे टोक मेंदूतील आवरत्या न येणाऱ्या तीव्र भावना नियंत्रित करणाऱ्या भागात जाते. यामुळे या चक्रावर ध्यान केल्यास अति तीव्र भावनांवर (झटकन राग येणे इत्यादी) नियंत्रण मिळविता येते. तसेच या चक्रातून निघणारे काही मज्जातंतू लहान आतड्याच्या शेवटच्या भागाकडे आणि मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाकडे जातात. संतापी स्वभावामुळे शरीराच्या या भागाला इजा पोचू शकते. या चक्रावर ध्यान केल्यास (हे चक्र भेदले गेल्यास) स्वभाव शांत होतो आणि पोटाचे हे रोगही आटोक्यात येतात.

 मनोव्यापार उच्च पातळीवर नेणे आधुनिक वैद्यकीय शास्त्राला कठीण वाटते, पण कुंडलिनी विद्येच्या साहाय्याने ते साध्य करता येते. 

कुंडलिनी जागृतीच्या मार्गात असणारी चक्रे कोणती, त्याचा आधुनिक शास्त्राच्या परिभाषेत संबंध काय हे आपण पुढील लेखात पाहू. 


Sunday, June 13, 2021

कुंडलिनी विद्या- भाग १

 मध्यंतरी एकदा 'कुंडलिनी विद्या' अर्थात 'सप्तचक्रांवर' लिखाण सुरु केले होते. परंतु ती लेखमाला सुरु ठेवणे कार्यबाहुल्यामुळे जमले नाही. 


माझा कुंडलिनी शास्त्रावरील अभ्यास फार खोलवर नाही. ध्यान करताना लक्षात आले की खोलवर ध्यानात गेलो की  आपोआप सप्तचक्रांवर ध्यान लागते. म्हणूनच मग त्याचा अभ्यास करण्याचे ठरविले. इंटरनेटवरून बरीच माहिती मिळविली.  प्रत्यक्ष ध्यानात अनुभव घेतले आणि लिहिण्यास बसलो. 

कुंडलिनी शास्त्र हे आपल्या अतिप्राचीन सांख्य दर्शनावर आधारलेले आहे. सांख्य दर्शनात प्रत्येकाचा पुरुष स्वतंत्र मनाला गेलेला आहे. सभोवताली प्रकृतीचा खेळ चालू आहे आणि पुरुष तो खेळ अलिप्तपणे अनुभवतो. कुंडलिनी  शास्त्रात पुरुषाला शिव मानले आहे. प्रकृतीला कुंडलिनी शक्ती मानले गेले आहे. आणि प्रत्येक माणसासाठी हा शक्तीचा खेळ शक्तीच्या शिवसोबत मीलनासाठी चालला आहे असे मानले गेले आहे. 

कुंडलिनी शास्त्राप्रमाणे आपल्या डोक्याचवरील सर्वोच्च स्थान (टाळू) येथे शिवाचे वास्तव्य आहे. कुंडलिनी आपल्या पाठीच्या मणक्याच्या सर्वात खालच्या ठिकाणी वास्तव्य करीत असते. या कुंडलिनी शक्तीला तिच्या स्थानापासून क्रमाक्रमाने शिवापर्यंत आणणे ही कुंडलिनी साधना आहे. कुंडलिनीच्या स्थानापासून शिवाच्या स्थानापर्यंत हा प्रवास पाठीच्या कण्याच्या मार्गाने होतो. या मार्गात सात प्रमुख चक्रे अथवा स्थाने मानली गेली आहेत. ही चक्रे ओलांडत म्हणजे भेदत कुंडलिनीचा प्रवास होतो. 

ग्रंथ हेच माझे गुरु आहेत. ग्रंथांपर्यंत पोचण्याचे इंटरनेट हेच माझे साधन आहे. म्हणूनच ज्यांना या कारणामुळे माझे लेख वाचायचे नसतील त्यांनी कृपया या लेखांच्या वाटेला जाऊ नये.  त्यांनी माहिती मिळविण्यासाठी त्यांचे अन्य मार्ग शोधावेत. ही माझी अभ्यासाची पद्धत आहे. ते त्यांच्या पद्धतीने जाण्यासाठी मोकळे आहेत. 

हे शास्त्र समजावण्यासाठी जे साहित्य उपलब्ध आहे ते थोड्याफार सांकेतिक भाषेत आहे. त्यामुळे समजणे कठीण जाते. अनेक वेळा तर प्रत्यक्ष अनुभवानंतर या शास्त्रातील गूढ भाषेचा अर्थ लागतो.  मलाही अनेक वर्षांच्या ध्यानानंतर त्यातील थोड्याच संकेतांचा अर्थ कळला आहे. त्यामुळे या शास्त्रातील मी मोठा जाणकार आहे असा मी दावा करीत नाही. परंतु मला जेवढा अर्थ उलगडला आहे तेवढा आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचत त्यामुळे आपल्याला या शास्त्रात गोडी वाटेल आणि आपला प्रवास सुरु होईल. हे ज्ञान फक्त त्या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण कारण्याएवढेच असेल, कारण माझी झेप तेवढीच आहे. 

पुढील लेखात आपण हा विषय समजून घेण्यास सुरुवात करू.