'तुम्हाला खरंच मृत्यूचे रहस्य
जाणून घ्यावयाचे आहे?
तुमच्या काळजाच्या तळापासून
त्याचा शोध घेत नाही,
तोपर्यंत मृत्यूचे सौंदर्य व महात्म्य
तुम्हाला कसं समजू शकेल?
रात्री घुबडाला सारे काही दिसते.
पण दिवसा मात्र...
तो आंधळा असतो.
त्याला प्रकाशाची गुढता समजेल?
तुम्हाला जर खरोखर
मृत्यूचे अंतरंग जाणून घ्यायचे असेल,
तर तुम्ही तुमचे ह्रदय
जीवनासमोर संपूर्ण उघडे करा!
एक लक्षात घ्या,
नदी आणि समुद्र एकच असतात.
त्याचप्रमाणे जीवन आणि मृत्यू
एकच आहेत.
एकाच नाण्याच्या दोन बाजू!
तुम्हाला जर मृत्यूला जाणवायचं असेल,
तर त्यासाठी जीवनाला
नीट जाणून घ्यावं लागेल.
आपण सगळ्यांनी
एकमेकांना धरून राहायला हवे.
आपली मानसिकता बदलून
आपण हे समजून घ्यायला हवे की,
जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे
अथांग, अनंत असे काहीतरी आहे.
त्यासाठी आपल्याला
अफाट असे परिश्रम घ्यावे लागतील.
आपणा सर्वांना
मृत्यू हा गाठणार आहेच.
म्हणून म्हणतो,हे दु:ख असतानाच
त्याला नीट समजून घ्या.
ते पुढे ढकलू नका.
तुम्ही विमनस्क असतानाच
त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग
तुम्ही समजून घ्या.
त्या दु:खांला,
तुमचे काळीज कुरतडण्याची,
संधी देऊ नका.
एकटेपणामुळे तुमचे हास्य
लोप पावू देऊ नका.
त्याने वेदना झाली तरीही
मनापासून ते सगळे समजून घ्या.
तुमच्या मनातून
एकटेपणा,दु:ख काढून टाका.
तुम्ही स्वतःचे मन तपासून पहा.
तेव्हाच तुम्हाला कळेल की,
'मी'पणाच्या जाणिवेतून
मुक्त झाल्यावरच
आपल्याला जन्म आणि
मृत्युच्या पलीकडे जाता येते.
खलिल जिब्रानच्या 'प्राॅफेट' या ग्रंथातील
'मृत्यू' ही कविता
अनुवाद: जीवन बळवंत आनंदगांवकर
No comments:
Post a Comment