Sunday, July 21, 2024

गुरुपौर्णिमा

 आज गुरुपौर्णिमा. आपल्या अध्यात्मिक गुरूंना वंदन करण्याचा दिवस. मला माझ्या अध्यात्मिक प्रवासात अनेक गुरूंनी मार्गदर्शन केले. आजच्या दिवशी माझा अध्यात्मिक प्रवास उलगडून सांगावा असे वाटते. 

आमचे घर तसे अध्यात्मिक प्रभावाखाली नव्हते. माझ्या वडिलांचे शिक्षण त्यांच्या मामांच्या घरी राहून झाले. वडिलांचे मामा साम्यवादी विचारसरणीकडे झुकलेले होते. त्यांची मामी या ज्येष्ठ समाजवादी नेते मधू लिमये यांची सख्खी मेहुणी. त्यामुळे साथी मधू लिमये यांचा सहवास वडिलांना लाभला होता. मी दिवसातील बराच काळ माझ्या घराशेजारीच असलेल्या माझया आजोळी घालावीत असे. तेथे अध्यात्मिक वातावरण होते. त्यामुळे माझ्या मनावर बालपणी मिश्र संस्कार झाले. 

इयत्ता चौथी-पाचवीपासूनच देवळात जाऊन देवाकडे काही मागणे माझ्या मनाला पटत नव्हते. मी माझी मुंज करण्यालाही नकार दिला होता. शेवटी मी सातवीत असताना माझ्या पालकांच्या मताला मान देऊन माझ्या मुंजीला होकार दिला. पण जानवे दुसऱ्या दिवशी खुंटीला लावले. माझी मुंज लावणारे ठाण्याचे काका दुर्वे यांच्याशी मात्र माझे शेवटपर्यंत चांगले संबंध होते. मला अध्यात्मिक विषयात गोडी निर्माण झाल्यावर मी त्यांच्यासोबत अनेक वेळा अध्यात्मिक चर्चा करीत असे. 'हा मुलगाच माझी गादी चालविणार' असे ते नेहमी म्हणत असत. 

मी IIT मध्ये प्रवेश घेतल्यावर एक-दोन वर्षातच रोज संपूर्ण शरीर शिथिलीकरण करू लागलो. हे विपश्यना ध्यान असल्याचा उलगडा नंतर बऱ्याच वर्षांनी झाला. मी मागील जन्मातून विपश्यना घेऊन आलो होतो. तसेच माझ्या हॉस्टेलमधील खोलीमधून रोज सूर्योदय दिसत असे. सूर्य पिवळा दिसेपर्यंत मी रोज अनिमिष नेत्रांनी सूर्योदय बघत असे. हे सूर्य त्राटक असल्याचे नंतर समजले. अशा प्रकारे मी केवळ अंत:प्रेरणेने अध्यात्मात प्रगती करीत होतो. IIT मध्येच इलेक्टिव्ह म्हणून मी Indian Philosophy, Philosophy of Religion यासारखे विषय घेऊन त्याचा अभ्यास केला. तेथे या विषयांची मला गोडी लागली. यावेळी अतिशय तरुण असलेले IIT मधील प्राध्यापक भट (HSS Dept) यांनी या विषयात गोडी लावली. या सर्व विषयांत मला कायम A Grade मिळत असे. 

IIT मधून बाहेर पडल्यावरही रोज किमान एक तास मी शरीराचे संपूर्ण शिथिलीकरण करीत असे. या शिथिलीकरणामुळे मी माझ्या शरोरातीळ संवेदनांबाबत जागरूक बनलो होतो.  तीस वर्षांचा असताना मला बराच ताप आला होता. यावेळी मला माझ्या शरीरातील रक्तप्रवाह हळूहळू धीमा होत असल्याची जाणीव झाली. मी माझ्या शरीराकडे लक्ष देऊ लागलो. थोड्याच काळात मी माझ्या टाळूच्या मार्गाने शरीराबाहेर पडलो. मी माझ्या खोलीतच होतो. घरच्यांना मी कशालाच प्रतिसाद देत नाही याची जाणीव झाली. ते घाबरले. मला शेजाऱ्यांनी त्यांच्या कारमधून हॉस्पिटलमध्ये नेले. हे सर्व मी बघत होतो. हॉस्पिटलच्या वाटेवर असताना माझा पुढील प्रवास सुरु झाला. अनेक भीतीदायक गोष्टी घडत होत्या. पण मी अतिशय शांत राहून केवळ अनुभवत होतो. मग माझा एका अंधाऱ्या बोगद्यातून प्रवास सुरु झाला. अतिशय शांत अशी ती अवस्था होती. एवढी शांतता मी कधीच अनुभवली नव्हती आणि नंतरही अनुभवली नाही. बराच वेळ असा प्रवास केल्यावर मी त्या बोगद्याच्या बाहेर आलो. बाहेर पहाटेसारखा मंद प्रकाश होता. मी गोंधळून एका झाडामागे उभा राहिलो. समोरून अनेक ऋषी हातात कमंडलू घेऊन जात होते. अचानक मला आठवले की माझी पत्नी आठ महिन्यांची गर्भवती असून मला माझ्या बाळासाठी परत गेले पाहिजे. दुसऱ्याच क्षणी मी माझ्या शरीरात परत आलो. आता माझा ताप पूर्णपणे गेला होता. मला कोणता आजार झाला होता याचे निदान झालेच नाही. यानंतर पुढील चार दिवस मला अनेक अनुभव येत होते. हे अनुभव अद्वैत वेदान्ताच्या मांडणीशी सुसंगत होते असे नंतर अद्वैत वेदांताचा अभ्यास करताना लक्षात आले. या अनुभवांमुळे मी गोंधळून गेलो. माझ्या घरच्यांनी मला ठाण्यातील नावाजलेल्या एका मनोविकारतज्ज्ञाकडे नेले. पण त्याने मी मानसिकदृष्ट्या पूर्ण सुदृढ असल्याचे सांगितले. 

मी पूर्णपणे नास्तिक असल्याने हे अनुभव म्हणजे भास असावेत असे वाटत होते. दुसऱ्या बाजूला हे अनुभव एवढे ठोस होते की त्याला भास म्हणणे शक्य होत नव्हते. सुमारे अकरा वर्षे अशाच द्विधा मन:स्थितीत काढली. अचानक एका कार्यक्रमात ठाण्याच्या स्वामी आनंदऋषी यांची भेट झाली. सहज त्यांना माझ्या अनुभवाबद्दल बोललो. त्यांनी मला त्यांच्या घरी नेले. मला त्यांनीच लिहिलेले एक पुस्तक दिले. ते वाचून एक आठवड्याने माझी प्रतिक्रिया देण्यास सांगितले. हे पुस्तक म्हणजे ज्यांना मृत्यूसमीप अनुभव (Near Death Experience - NDE) आला आहे त्यांच्या अनुभवांचे संकलन होते. आश्चर्य म्हणजे बरेचसे अनुभव मला जसा अनुभव आला होता तसेच होते. मला माझ्या अनुभवांचे रहस्य उलगडू लागले होते. असे अनुभव सहजासहजी येत नाहीत. म्हणून स्वामीजींनी मला अनेक प्रश्न विचारले. त्यातून मी करत असलेले शरीराचे शिथिलीकरण म्हणजे 'विपश्यना ध्यान' असल्याचा उलगडा झाला. स्वामीजींनी मला लगेच गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिराला पाठविले. आजवर मी प्रत्येकी दहा दिवसांची नऊ विपश्यना शिबीरे केली आहेत. स्वामीजी ओशोंच्या पहिल्या काही शिष्यांपैकी. त्यांच्याकडे मला ओशोंच्या पुस्तकांचा खजिना वाचण्यास मिळाला. माझ्या अध्यात्मिक प्रवासास एक दिशा मिळाली. 

भारतीय अध्यात्मविषयी IIT मध्ये असताना गोडी लागली होती. ओशोंच्या पुस्तकांतूनही त्याविषयी माहिती मिळत होती. इंटरनेटवर शोध घेताना स्वामी सर्वप्रियानंदांची भाषणे मनाला भावली. त्यांच्या अद्वैत वेदान्ताच्या प्रवचनांतून मला सुमारे तीस वर्षांपूर्वी आलेल्या अनुभवांची नाळ जोडली गेली. अत्यंत तर्कशुद्ध असलेल्या प्रवचनांमधून मला अद्वैत वेदांताची सखोल माहिती मिळाली. दुसऱ्या बाजूला विपश्यना ध्यानाचा आधार घेऊन मी कुंडलिनी ध्यानाकडे वळलो. त्यातही काही अंशी प्रगती झाली. ध्यानात प्रगती होत  असतानाच मागील जनमातील काही प्रसंग आठवले. 

हा आहे माझा अध्यात्मिक प्रवास. मला विपश्यना ध्यान अंत:प्रेरणेने मिळाले. म्हणून मी योगीराज भगवान शंकरांना माझे आद्यगुरु मानतो. तसेच गोंधळलेल्या मला या प्रवासात मार्ग  दाखविला म्हणून स्वामी आनंदऋषी हेही माझे गुरु आहेत. तसेच ओशोंच्या पुस्तकांमुळे मला दिशा मिळाली, गोएंका गुरुजींमुळे मला विपश्यना ध्यानात खाचाखोचा समजल्या, स्वामी सर्वप्रियानंदांच्या प्रवचनांमधून मी अद्वैत वेदांत शिकलो. हे सर्व माझे अध्यात्माच्या प्रवासातील गुरु आहेत. त्यांना आजच्या दिवशी प्रणाम. 

No comments:

Post a Comment