आज गुरुपौर्णिमा. महाभारताचे रचयिता, वेदांचे संकलक कृष्ण द्वैपायन व्यास यांच्या नावाने ही पौणिमा ओळखली जाते. कृष्ण द्वैपायन व्यास हे व्यास परंपरेतील अठरावे आणि शेवटचे व्यास. सप्तचिरंजीवांपैकी एक आहेत. पराशर ऋषी आणि सत्यवती (मत्स्यगंधा - योजनगंधा) यांचा पुत्र. ते रंगाने कृष्ण असल्याने आणि त्यांचा जन्म एका बेटावर झाल्याने त्यांना कृष्ण द्वैपायन व्यास असे म्हणतात. वयाच्या आठव्या वर्षी ते हिमालयात तपश्चर्येला निघून गेले. जाताना आईला वचन देऊन गेले की कधीही आईने मनोमन आठवण करून बोलाविले तर आईच्या सेवेत हजर होईन. सत्यवतीने अंबिका आणि अंबालिकेसाठी नियोगासाठी बोलाविताच ते दिलेल्या वचनाप्रमाणे हजर झाले आणि कुरु वंशाला धृतराष्ट्र आणि पांडुराजा हे पुत्र आणि विदुर हा दासीपुत्र दिला.
Saturday, July 5, 2025
गुरुपौर्णिमा
महाभारतात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. शंतनू>विचित्रवीर्य-चित्रांगद.... स्वत: व्यास >धृतराष्ट्र, पांडू >कौरव-पांडव>अभिमन्यू> परीक्षित>जनमेजय अशा कुरु वंशाच्या सात पिढ्यांचा इतिहास त्यांनी लिहिला. कुरु वंश हा त्या काळाचा बलाढ्य राजवंश होता. भारतवर्षात झालेल्या महायुद्धांपैकी एक म्हणजे हे महाभारत त्याचा साद्यन्त इतिहास त्यांच्यामुळेच आपल्यापुढे आला. (आणखी असेच एक युद्ध त्यापूर्वी झाले होते, पण त्याहा फक्त संक्षिप्त उल्लेख वेदांत आढळतो). व्यासांचे एक शिष्य 'वैशंपायन' हे जनमेजयाच्या सर्पसत्राच्या समारोपप्रसंगी उपस्थित होते. जनमेजयाच्या विनंतीवरून त्यांनी महाभारत उपस्थितांना ऐकविले. त्यात भर पडून आजचे महाभारत आपल्यापुढे आले. पैल, जैमिन, वैशम्पायन, सुमन्तुमुनि इ त्यांच्या चार शिष्यांमार्फत आणि पुत्र शुकदेव यांच्यामार्फत त्यांनी महाभारत सर्वांपर्यंत पोचविले.
कृष्ण द्वैपायन व्यासांचे महत्वाचे कार्य म्हणजे वेदांचे संकलन. त्या पूर्वी वेद विखुरलेल्या अवस्थेत होते. अनेक ऋषींनी ध्यानस्थ अवस्थेत हे ज्ञान पुढे आणलेले होते (म्हणून त्यांना अपौरुषेय म्हणतात). त्यांचे व्यासांनी व्यवस्थित संकलन केले. त्याचे विषयानुरूप चार भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार भागांना त्यांनी क्रमशः पैल, जैमिन, वैशम्पायन आणि सुमन्तुमुनि यांना शिकविले. तसेच उपनिषदांचे सार असलेल्या ब्रह्मसूत्रांची निर्मिती केली.
मात्र काशी विश्वेश्वराने दिलेल्या शापामुळे त्यांना काशी सोडावी लागली अशी कथा प्रचलित आहे. त्यांचा आश्रम काशीपासून सुमारे पाच मैलांवर गंगातटी वसलेला आहे. व्यास हे चिरंजीव असल्याने आजही त्याठिकाणी येऊन ते आपल्या शिष्यांना ज्ञानदान करतात अशी श्रद्धा आहे.
आज गुरुपौणिमेला विश्वगुरू व्यासांना वंदन करण्याची प्रथा आहे.
Subscribe to:
Posts (Atom)