Wednesday, August 12, 2015

संत शिरोमणी नामदेव महाराज

Pravin Karkhanis यांच्या facebook post वरून साभार

संत शिरोमणी नामदेव महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठल-मंदिराजवळ , आपल्या आप्तेष्टांसह , कृष्ण -पक्ष त्रयोदशी , शके १२७२ म्हणजेच इंग्रजी दिनांक ३ जुलै १३५० या दिवशी , समाधिस्थ झाले अशी महाराष्टातल्या भाविकांची श्रद्धायुक्त समजूत असल्याने , यंदा .१२ ऑगस्ट रोजी त्यांचा , तिथीनुसार , समाधी-दिन ! " अमृताहुनी गोड नाम तुझे देवा , मन माझे केशवा का बा न घे " ही रचना , अथवा " चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती , झाले मज प्रती तैसे आता " हा अभंग , किंवा घराघरात म्हटली जाणारी " युगे अठ्ठावीस विटेवरी उभा , वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा " ही आरती ---या साऱ्या संत नामदेवांच्या आहेत . कीर्तन -परंपरा लोकप्रिय केली ती नामदेवांनीच . त्यांचा जन्म ,अनेकांच्या मते हिंगोली जवळ असलेल्या नरसी-बामणी या गावी झाला होता तर काहींच्या मते त्याच नावाच्या सातारा अथवा सोलापूर जवळच्या गावात ते जन्मले . संत नामदेव यांच्या बरोबर संत ज्ञानेश्वर यांनी बराच प्रवास केला होता . संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेताच संत नामदेव उत्तरेस निघून गेले . फिरता फिरता ते पंजाब प्रांतातल्या ' घुमान ' ला गेले . त्यांच्या अवती-भवती जमणाऱ्या लोकांना त्यांनी भक्ती-संप्रदायाकडे वळविले , प्रसंगी त्यांची सेवाही केली . लोकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा जडली .तब्बल बावीस वर्षे तीच त्यांची कर्मभूमी झाली ...........अलीकडेच मी " घुमान " येथील संत नामदेव गुरुद्वारात राहून आलो . नामदेवांची पंजाबी भाषेत लिहिलेली एकसष्ट पदे , शिखांच्या ' ग्रंथसाहेब ' या धर्मग्रंथात गुरुमुखी लिपीत समाविष्ट असल्याने ' बाबा नामदेव ' हे त्यांचे संत-पुरुष ठरले आहेत . मूर्ती-पूजा न मानणाऱ्या शीख-धर्मियांचा हा जगातला एकच गुरुद्वारा असा आहे , जिथे बाबा नामदेव यांची मूर्ती स्थापित केलेली आहे . अर्थात , येथे असलेले नामदेवांचे रूप अगदी वेगळेच आहे . ( फोटो पाहावा ) .... बाबा नामदेव यांनी इहलोकाची यात्रा , ' घुमान --पंजाब ' इथेच संपवली अशी त्यांची ठाम समजूत असल्याने संत नामदेवांची समाधी तिथेही पाहावयास मिळते . (फोटोत वर : मराठी माणसाला अभिप्रेत असलेले संत नामदेव आणि खाली शीख समाजाला अभिप्रेत असलेले बाबा नामदेव )



No comments:

Post a Comment