Wednesday, September 23, 2015

तो

दिवाणखान्यात बसून
चारचौघांच्या संगतीत
मी जेव्हा तुझे अस्तित्व नाकारतो
तेव्हा आकाशाचे एक दार
किलकिले करून
तू पाहतोस माझ्याकडे कौतुकाने
कुतुहलानेही,

आणि सगळे निघून गेल्यावर
ताऱ्यांच्या अंधुक प्रकाशात
तू उतरतोस माझ्या एकांतात
आणि समोरच्य़ा खुर्चीत बसून
म्हणतोस - अभिनंदन
तुझे विवेचन छानच होते

इतके की मलाही शंका आली
माझ्या अस्तित्वाची -
पण तरीही मला माहीत आहे
मला मानणाऱ्यांमध्ये
तू अग्रेसर आहेस
फक्त तुझा दिवाणखाना
तुझ्या काळजापासून
फार दूर आहे, ईतकेच.

-कुसुमाग्रज (मुक्तायन, पान ४५)

No comments:

Post a Comment