Sunday, September 6, 2015

श्रीकृष्ण राण्या

श्रीकृष्णाविषयी असे म्हटले जाते की, त्यांच्या सोळा हजार एकशे आठ भार्या (पत्नी)होत्या. यामागचे कारण असे आहे की, नरकासुराच्या कारागृहात बंदी असलेल्या हजारो राजकुमारीकांना भगवान श्रीकृष्णाने मुक्त केल्यानंतर या सर्व राजकुमारीकांनी श्रीकृष्णाला पती मानले आणि श्रीकृष्णानेसुद्धा यांचा पत्नी रुपात स्वीकार केला. यामुळे यांच्या पत्नींची संख्या हजारांमध्ये आहे. परंतु भगवान श्रीकृष्णाच्या मुख्य 9 राण्या होत्या, ज्या पट्टराणी म्हणून प्रसिद्ध झाल्या. या सर्व राण्यांची एक रोचक कथा आहे.

राधा भगवान श्रीकृष्णाची प्रेयसी बनून राहिली परंतु श्रीकृष्णाच्या प्रमुख पट्टराणी रुपात सर्वात पहिले रुक्मिणी चे नाव घेतले जाते. या विदर्भ देशाच्या राजकुमारी होत्या आणि यांनी श्रीकृष्णाला आपले पती मानले होते. परंतु यांचा भाऊ रुक्मीला यांचे लग्न चेदी नरेश शिशुपालशी करण्याची इच्छा होती. यामुळे रुक्मिणीचे प्रेमपत्र वाचून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण करून त्यांच्याशी लग्न केले.

श्रीकृष्णाची दुसरी पट्टराणी देवी कालिंदी मानल्या जातात. या भगवान सूर्यदेवाच्या पुत्री आहेत. यांनी श्रीकृष्णाला पती रुपात प्राप्त करण्याची कठोर तपश्चर्या केली होती. यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने सूर्यदेवाकडे कालिंदीचा हात मागितला.

श्रीकृष्णाची तिसरी पट्टराणी मित्रवृंदा आहेत. या उज्जैनच्या राजकुमारी होत्या. भगवान श्रीकृष्णाने स्वयंवरात सहभागी होऊन मित्रवृंदाला आपली पत्नी बनवले होते.

श्रीकृष्णाच्या चौथ्या पट्टराणीचे नाव सत्या आहे. काशीचे नरेश नग्नज‌ित् यांच्या मुलीच्या लग्नासाठी एक विचित्र अट होती. त्या अटीनुसार जो व्यक्ती सात बैलांना एकाचवेळी वेसण घालेले तो सत्याशी लग्न करेल. श्रीकृष्णाने ही अट पूर्ण करून सत्याशी लग्न केले.

ऋक्षराज जांबुवंतची मुलगी जांबवंती श्रीकृष्णाची पाचवी पट्टराणी होती. स्यमंतक मण्यासाठी जेव्हा श्रीकृष्ण आणि जांबुवंत यांच्यामध्ये युद्ध झाले तेव्हा जांबुवंताच्या लक्षात आले की, श्रीकृष्णच त्यांचे आराध्य श्रीराम आहेत. त्यानंतर जांबुवंताने जांबवंतीचे लग्न श्रीकृष्णाशी केले.

श्रीकृष्णाच्या सहाव्या पट्टराणीचे नाव रोहिणी होते. रोहिणी गय देशाचे राजा ऋतुसुकृत यांची मुलगी होती. रोहिणीने स्वयंवरामध्ये श्रीकृष्णाला स्वतः पती रुपात स्वीकार केले होते.

श्रीकृष्णाची सातवी पट्टराणी होती सत्यभामा. ही सत्राजितची मुलगी होती. सत्राजितने प्रसेनची हत्या केल्याचा आणि स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप श्रीकृष्णावर लावला होता. श्रीकृष्णाने हे दोन्ही आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध केले आणि स्यमंतक मणी सत्राजितला परत दिला. त्यानंतर सत्राजितने सत्यभामा आणि श्रीकृष्णाचे लग्न लावून दिले.

श्रीकृष्णाच्या आठव्या पट्टराणीचे नाव लक्ष्मणा होते. स्वयंवरमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यात वरमाला घालून लक्ष्मणाने पती रुपात श्रीकृष्णाचा स्वीकार केला.

श्रीकृष्णाच्या नवव्या पट्टराणीचे नाव आहे शैव्या. राजा शैव्यची मुलगी असल्यामुळे तिला शैव्या म्हटले जाते.

No comments:

Post a Comment