Sunday, September 6, 2015

आर्यांच्या मूर्तीपूजेचा उद्गाता कृष्ण

माझे महाभारतील अत्यंत आवडते व्यक्तिमत्व म्हणजे कृष्ण. तो खरा 'विकासपुरुष' होता. जरासंधाचे मगध राज्य
मथुरेच्या शेजारी होते. जरासंध लोभी आणि आक्रमक होता. त्याचे राज्य मथुरेपेक्षाअनेक पटींनी सामर्थ्यवान होते. त्यामुळे कृष्णाने वेळीच धोका ओळखून द्वारकेला यादवांचे स्थलांतर केले. आता मध्ये सामर्थ्यशाली आणि कृष्णाचे मित्र असे कुरु राज्य असल्याने जरासंधाचा धोका नव्हता. द्वारका हे एक उत्तम बंदर होते. मथुरेत गोपालक असणारे यादव आता व्यापारी बनले. परदेशांशी व्यापार करून द्वारका अल्पावधीतच सोन्याची झाली.........परंतु अल्पावधीत आलेली श्रीमंती नेहमीच धोकादायक असते. यादव या अल्पावधीत आलेल्या श्रीमंतीने दारू आणि अन्य व्यसनांत बुडाले आणि त्यांनी कृष्णाच्या समोरच आपला नाश ओढवून घेतला.
कृष्ण उत्तम राजानितीज्ञ होता. पश्चिमेपासून दूर पुर्वेपर्यंत त्याने स्वत: आणि पांडवांची लग्नसंबंध जुळवून सर्व राज्यांशी उत्तम संबंध जोडले. युद्धात प्रसंगी नीतिमत्तेशी तडजोड करून (उदा. धर्मराजाला द्वयार्थी बोलण्यास उद्युक्त करणे) पांडवांना युद्ध जिंकून दिले.
 मानसशास्त्र युद्धात किती महत्वाचे असते याची त्याला जाणीव होती. द्रोणाचार्यांना मानसिकदृष्ट्या खचविणे तर मानसिकदृष्ट्या खचलेल्या अर्जुनाला युद्धात उभे करणे यातून हे स्पष्ट होते. कर्णाला युद्धाच्या पूर्वी त्याचे जन्मरहस्य सांगून त्याला मानसिकदृष्ट्या खच्ची केले.
अत्यंत प्रबळ अशा यवन (राजा : कालयवन) आणि मगध (राजा : जरासंध) राज्यांनी एकाच वेळी मथुरेवर हल्ला केला. (यवन : उत्तरेकडून, मगध : दक्षिणेकडून) त्यावेळी त्याने वापरलेले युद्धतंत्र अप्रतिम होते.
सर्व यादवांना मथुरेहून सुरक्षित अशा द्वारकेला हलविणे आणि आपल्या सेनेसह युद्धाला सज्ज होणे.
जवळच्या डोंगरात मुचुकुंद राजा झोपला असल्याची आणि 'त्याला जो कोणी उठवेल तो भस्म होईल' असा वर इंद्राकडून मिळाल्याची आवई उठविणे, 
कालयवनला एकट्याने युद्ध करण्यास येण्याचे आव्हान देणे.
स्वत: घाबरून पळाल्याची बतावणी करत कालयवनाला आपल्या मागे त्या डोंगरात नेणे, 
आधीच पेरलेल्या स्फोटकांच्या (भू-सुरुंग?) सहाय्याने कालयवनाला उडवून देणे,
 मुचुकुंद राजाला उठविल्यामुळे कालयवन भस्मसात झाला झाले असे सांगणे
इंद्राच्या शापाने आपला राजा भस्मसात झाला हे कळल्यावर कोणती सेना युद्ध करण्यास तयार होईल?
          अति बलाढ्य शत्रूविरुद्ध लढताना यापेक्षा उत्तम रणनीती कोणती असू शकेल?

*कृष्ण महान तत्वज्ञानी होता. गीतेत सांगितलेले तत्वज्ञान कृष्ण मुक्तावास्थेला पोचलेला पुरुष होता याचीच साक्ष देते.

* कौरवांकडून पांडवांना मिळालेल्या खांडववनात बलिष्ठ नाग जमात राहत होती. तेथे राज्याची राजधानी वसावयाची तर नागांशी संघर्ष अटळ होता. म्हणून कृष्णाने नाग वंशाचाच संहार करायचे ठरविले. मात्र तो त्यात अपयशी ठरला. नाग-पांडव संघर्ष नंतर चार पिढ्या (अर्जुन, अभिमन्यू, परीक्षित आणि जनमेजय) चालला. खांडववनातील नागांचा संहार करताना कृष्णाने नागांचा सर्वोत्तम अभियंता मयासुराला अभय देऊन पांडवांसाठी राजवाडा बांधून घेण्याची समयसूचकता दाखविली.

* कृष्ण हा 'पूर्णावतार' होता. त्याने जे काही केले ते पूर्ण झोकून देऊन केले. त्यासाठी त्याने जनमताची लाज बाळगली नाही की देवांची भीती बाळगली नाही. आर्य निसर्गदेवता मानणारे होते. कृष्णाने प्रथमच 'गोवर्धन पर्वत' म्हणजे ऐहिक (Physical Objects) देवता मानण्यास सुरुवात केली. या दृष्टीने तो 'आर्यांमधील मूर्तीपूजेचा उद्गाता होता' असे म्हणता येईल.

No comments:

Post a Comment