Sunday, September 30, 2018

केन उपनिषद ३

केन उपनिषदासंबंधी मागील दोन लेखांत थोडी माहिती घेतली. आता ‘ब्रह्म’ (चैतन्य) या संदर्भात हे उपनिषद काय सांगते हे पाहू.

  1. मन आणि शरीर यापेक्षा चैतन्य हे वेगळे आहे. चैतन्य हे मन अथवा शरीरामुळे निर्माण झालेले नाही. आधुनिक विज्ञान चैतन्य हे शरीर अभिक्रियांचा परिपाक आहे असे मानते. परंतु उपनिषदांना हे मान्य नाही. 
  2. चैतन्य हे मन आणि शरीरापेक्षा वेगळे आहे. परंतु ते मन आणि शरीराला उर्जा (चेतना) पुरविते. चैतन्य हे मनाला प्रकाशित करते, चेतना देते. मन हे शरीराला चेतना देते असे उपनिषदे मानतात.  
  3. चैतन्य हे देह आणि मनापुरते मर्यादित नाही. चैतन्य हे सर्वव्यापी आहे. एखादी वस्तू, देह, मन काहीही नसेल तरीही तेथे चैतन्य आहेच. येथे प्रकाशाचे उदाहरण घेता येईल. अवकाशात सर्वत्र ताऱ्यांपासून आलेला प्रकाश असतो. 
  4. देह, मन इत्यादींचे अस्तित्व चैतन्याच्या अस्तित्वामुळेच कळू शकते. जसे काळोखात वस्तू असतात, परंतु प्रकाशाशिवाय त्यांचे अस्तित्व कळत नाही.
  5. जर देह आणि मन नसेल तेथे चैतन्य अस्तित्वात असेल, परंतु त्याचे अस्तित्व प्रकट होणार नाही. चैतन्याचे प्रकटीकरण होण्यास देह/मनाची आवश्यकता असते. अवकाशात सर्वत्र प्रकाश असतो. परंतु एखादी वस्तू त्याच्या मार्गात आली तरच त्या प्रकाशाच्या परावर्तनाने  (Reflection) त्या प्रकाशाचे अस्तित्व आपल्यास कळते. अन्यथा प्रकाश आहे हे कळणार नाही. तसेच काहीसे हे आहे. 

आपण म्हणजे हे सर्वव्यापी चैतन्य आहोत. म्हणूनच सर्वांभूती एकाच आत्मा आहे असे वेदांत दर्शन मानते. (सांख्य दर्शनापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. सांख्य दर्शन प्रत्येकाचा ‘पुरुष’ वेगळा आहे असे मानते.) अविद्येमुळे आपल्या मनात अहंकाराचा उगम होतो आणि आपण स्वत:ची ही चैतन्यरूपी ओळख विसरतो. या अविद्येचा नाश करून आपल्या चैतन्यस्वरूपाची जाणीव करून घेणे हे जीवनाचे इतिकर्तव्य आहे असे उपनिषदे मानतात.
केन उपनिषदाची आपण थोडक्यात ओळख करून घेतली. पुढील लेखात कठोपनिषदाची ओळख करून घेऊ.

1 comment: