Friday, October 19, 2018

किं प्रयोजनम्

माझा उपनिषदांचा अभ्यास आणि त्यावर लेखन चालू आहे. ईशावास्य उपनिषद आणि केन उपनिषद यांचा अभ्यास आणि त्यावर फेसबुक/Blog वर लेखन केले आहे. आता 'मांडुक्य उपनिषदाचा' अभ्यास  चालू आहे. सुमारे एक-दोन महिन्यात त्यावर लिहिता होईन.

पण माझ्या काही सुहृदांना मी या विषयावर का लेखन करीत आहे हा प्रश्न पडला आहे. म्हणून त्यासबंधी थोडे स्पष्टीकरण द्यावेसे वाटले. 'उपनिषदांच्या अभ्यासाने अथवा अध्यात्माच्या अभ्यासाने काही फायदा होतो काय?' हा तो मूलभूत प्रश्न आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात असा प्रश्न पडणे रास्तही आहे.

कोठलाही माणूस सतत दोनच गोष्टींमागे धावत असतो.
१> दु:ख अथवा यातना कमी व्हाव्यात
२> आनंदात राहावे

किंबहुना आनंद मिळविण्यासाठीच प्रत्येकाची धडपड चालू असते. मग तो कोट्याधीश असो अथवा रस्त्यावरील भिकारी असो. म्हणूनच वेदात आत्मा हा आनंदस्वरूपी असल्याचे म्हटले आहे. आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या निर्वाणषटकात "चिदानंद रूप: शिवोहम शिवोहम' असे आत्म्याचे वर्णन केले आहे.

अध्यात्माची सारी साधना हा आनंद मिळविण्यासाठी असते. आत्मा हा कायम आनंदात असतो. त्यामुळे आपल्याला आत्म्याचे हे स्वरूप 'अनुभवाला आले' की आपणही कायम आनंदात राहतो. जोपर्यंत आपल्याला आपले हे आत्मरूपी स्वरूप अनुभवाला येत नाही तोपर्यंत आपण आपल्या शरीराला, मनालाच स्वत:शी एकरूप केलेले असते. त्यामुळे शरीराला/मनाला होणाऱ्या सुखातच आपण आनंद शोधीत असतो, दु:खात आनंदापासून वंचित होतो. एकदा या आत्मस्वरूपाचा अनुभव आला की आपण आपल्याला आपले शरीर, मन यापासून वेगळे समजू शकतो. मग शरीराला/मनाला होणारे दु:ख/यातना आपला आनंद हिरावून घेऊ शकत नाहीत. आत्मस्वरूपाचा अनुभव आल्यावरही शरीराला/मनाला दु:ख-यातना होतातच. पण त्यापासून आपण अलिप्त असतो.

आत्मस्वरूपाविषयी 'पुस्तकी ज्ञान' मिळविणे आणि त्याचे स्वरूप 'अनुभवणे' या भिन्न गोष्टी आहेत.
हा आत्मस्वरूपाचा अनुभव येण्यासाठी अध्यात्मात तीन प्रमुख मार्ग सांगितलेले आहेत.
१> भक्तिमार्ग
२> ध्यानमार्ग
३> ज्ञानमार्ग

या तीन मार्गांसंबंधी आपण पुढील लेखात अधिक माहिती घेऊ.

No comments:

Post a Comment