Thursday, December 11, 2014

बच्चू

माझे बालपण अनेक व्यक्तींनी समृद्ध केले होते. त्यापैकीच बच्चू हा एक.
माझे बालपण माझ्या आजोळी ठाण्यातील जुन्या मुंबई रस्त्यावर फुलले. या रस्त्यावर जगात कोठेही शोधूनही सापडणार नाहीत अशा वल्ली राहत होत्या. त्यातील बच्चू हा 'स्वान्त सुखाय' चा कित्ता गिरवीत  राहणारा एक सदा आनंदी प्राणी. बच्चूला कुटुंब-नातेवाईक नव्हते. असले तरी आम्हा कोणाला माहित नव्हते. बच्चू रस्त्यावरील हनुमान मंदिराच्या छोट्या कठड्यावर झोपायचा, तेच त्याचे घर आणि कार्यशाळा. तो हरहुन्नरी होता. लोकांचे स्टोव्ह दुरुस्त करणे हा त्याचा मुख्य व्यवसाय. पावसाळ्यात छत्र्याही दुरुस्त करायचा. एखादे छोटे मशीन दुरुस्त करायला दिले की त्याला आनंद व्हायचा. त्याचे सर्व कौशल्य वापरून तो ते दुरुस्त करायचा.
लहान मुलांत तो रमून जायचा. मुलांबरोबर खेळणे त्याला आवडायचे. कधी आजीने स्टोव्ह दुरुस्त करायला त्याच्याकडे पाठविले की त्याला मुलांच्या घोळक्यातून आणावे लागायचे.
बच्चुकडे एक खास खेळणे होते. त्याच्याकडे एक चित्रपट दाखविणारा प्रोजेक्टर होता. तो बहुदा त्याने भंगारात मिळवून दुरुस्त केलेला असावा. या प्रोजेक्टर सिनेमा दिसायचा, पण आवाज यायचा नाही. बच्चू या प्रोजेक्टरसाठी फिल्म्सचे छोटी रोले मिळवायचा आणि सर्व मुलांना दाखवायचा. याचे तो काहीही पैसे घेत नसे. मुलांचा आनंद हीच त्याची बिदागी असे.
देवळाच्या छोट्या ओसरीवर फाटक्या कपड्यात राहणारा आणि तरीही सदैव आनंदी, कसलीही हाव नसणारा हा बच्चू संत पदाला पोचलेला एक महात्माच असावा.      

No comments:

Post a Comment