Monday, November 24, 2014

डॉ.लोहिया यांची विकासनीती भाग ३ : आपली पारंपारिक अर्थव्यवस्था

मागील भागात आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचे SWOT Analysis केले होते. ते लक्षात घेता आपली बलस्थाने आणि मर्यादा या पाश्चात्य देशांच्या बलस्थाने आणि मर्यादांपेक्षा पूर्णपणे भिन्न होत्या असे दिसून येईल. म्हणूनच आपली विकासनीती या देशांपेक्षा वेगळी (Unique) असणे आवश्यक होते.
महात्मा गांधी भारतातील रुजलेल्या स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेला आदर्श मानीत होते. स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेमुळे ग्रामीण भाग आपला विकास आपणच करू शकत होता. त्यात गावातील प्रत्येकाचा सहभाग होता. प्रत्येकाच्या डोक्यातून येणाऱ्या कल्पनांना त्यात वाव होता म्हणूनच ही व्यवस्था अधिक Creative होती. ग्रामपातळीवरील सहभागामुळे कायद्याचे पालन होणे आणि कायदा पालन न करणाऱ्यांना शिक्षा करणे सुलभ होते, न्यायव्यवस्था काटेकोर नसली तरी जलद होती. पर्यावरण रक्षण होत होते. गावातील पैसा गावातच रहात होता. उर्जा, पाणी इत्यादी संसाधानंचा जपून वापर होत होता.
या अर्थव्यवस्थेत जातीव्यवस्थेचा जन्म झाला. जातिव्यवस्थेमुळे समाजात स्थैर्य आले, एका पिढीकडून कौशल्ये दुसऱ्या पिढीकडे सहजतेने आणि पूर्णपणे हस्तांतरित होत होती. मुलांना आवश्यक ते शिक्षण सहजच घरीच मिळत होते. एका बाजूने ही अत्यंत Innovative व्यवस्था होती. परंतु त्यात काही खूप मोठे दोष शिरले होते. जन्माधिष्टीत जातिव्यवस्थेत उच्च-नीचतेची उतरंड तयार झाली होती. अस्पृश्यतेसारख्या भयानक रूढी समाजात स्थिर होऊ लागल्या होत्या. श्रमाला कमी प्रतिष्ठा मिळू लागली होती. एखाद्याला जातीव्यवस्थेने दिलेल्या कामाव्यतिरिक्त अन्य काम करावेसे वाटले तर ते सहज शक्य नव्हते. गांधीजींनी जातीव्यवस्थेचे हे स्वरूप ओळखले होते. सामाजिक/आर्थिक व्यवस्थेचा ढाचा कायम ठेऊन त्यातील हे दोष दूर करण्याचा उपाय गांधीजी त्यांच्या परीने शोधीत होते.
आपली अर्थव्यवस्था 'ग्रामीण अर्थव्यवस्था' कधीच नव्हती. ग्रामीण अर्थव्यवस्थेत प्रामुख्याने कच्च्या मालाचे उत्पादन होते आणि पक्का माल बाहेरून विकत घेतला जातो. आपली अर्थव्यवस्था ही ग्रामीण आणि नागरी अर्थव्यवस्थेचा उत्तम तोल राखणारी, निर्यातप्रधान अर्थव्यवस्था होती. येथे ग्रामीण भागात कच्चा माल पिकत होता. नगरांमध्ये त्यावर संस्कार होऊन तो भारतात विकला जात होता वा परदेशी निर्यात होत होता. रेशमाच्या वस्त्राच्या उत्पादनासाठी तर कच्चा माल चीनमधून येत असे आणि वस्त्रे बनवून तो माल पाश्चात्य राष्ट्रांना निर्यात होत असे. मसाल्यांच्या शेतीउत्पादनांवर प्रक्रिया करून तो माल निर्यात होत असे.
या नागरी-ग्रामीण अर्थव्यव्यस्थेला आधार देण्यासाठी येथील सुविधां (Infrastructure) अशाच विशेष प्रकारच्या असणे आवश्यक होते. आपल्या Creative पूर्वजांनी अशा सुविधांचे जाळेच तयार केले होते. येथे नगरे नदीच्या / समुद्राच्या काठावर वसली होती. प्रत्येक नगरच्या पंचक्रोशीत अनेक गावे होती. ही गावे त्यांच्या पंचक्रोशीतील नगरांना कच्च्या रस्त्याने जोडली होती. विविध नगरे एकमेकांना रस्त्याने अथवा जलमार्गाने जोडली होती. सर्व नगरांना जोडणारे मोठे रस्ते बंदरांना जोडले होते. बंदरावर परदेशी व्यापाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था होती. जहाज बांधणीचे शास्त्र प्रगत होते. रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी मोठे वृक्ष होते. रस्ते सुरक्षित राहावे यासाठी राजाची गस्त असे. डोंगरी भागातून बंदरापर्यंत येण्यासाठी केलेले नाणेघाटासारखे  रस्ते आजही याची साक्ष देतात. सिल्क रूट तर खुश्कीच्या मार्गाने युरोपला जोडत होता.
या नागरी-ग्रामीण अर्थव्यवस्थेचा तोल सांभाळताना पर्यावरणाचा तोल ही सांभाळला जात होता. ग्रामीण भागात कृषी उद्योग होते. कृषी उत्पादने पंचक्रोशीतील नगरांत बैलगाडीच्या सहायाने शेतकरी विकण्यास आणू शकत होता. नगरांत उत्पन्न होणारा कचरा नजीकच्या खेड्यातील शेतीसाठी कच्चा माल (खते तयार करण्यासाठी)  होता. नगरातील सांडपाणी नजीकच जिरविले जात होते, ते शेतीला उपयुक्त होते. नगरे-खेडी यांच्या साहचर्यामुळे लोकवस्तीचा भारही नागरांवर न पडता विभागाला जात होता.
नगरांत तयार झालेला पक्का माल रस्त्याच्या मार्गाने व्यापारी अन्य नगरांत/बंदरात नेत असत. त्यासाठी अनेक बैल असलेल्या बैलगाड्या असत. पानिपतच्या युद्धात अशा ३२ बैल असलेल्या गाड्यांनी सैन्याला रसद पुरविल्याचे उल्लेख आहेत. अंतर्गत वाहतुकीसाठी जलमार्गाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होत असे. म्हणूनच बारा महिने वाहणाऱ्या गंगा/यमुनेच्या तीरावर मोठ्या संख्येने नगरे वसली होती.
श्रमाची कामे करण्यासाठी प्रामुख्याने बैलांचा उपयोग होत असे. यासाठी बलवान बैल असलेली वाणे विकसित केली गेली होती. श्रम करणारे बैल मिळविण्यासाठी बैलांच्या खच्चीकरणाचे तंत्र विसासित केले गेले होते. याच वेळी बैलांचा वंश चालू राहावा, तो अधिक विकसित व्हावा म्हणून 'देवाला वळू सोडण्याची' प्रथा होती. दूध हे उप-उत्पादन होते. हे बैलांपासून उर्जा मिळविण्याचे तंत्र पर्यावरणाशी मैत्री करणारे होते.
या संपूर्ण व्यवस्थेत शहरांचा बकालपणा टाळला गेला होता आणि खेड्यातील शेतकऱ्याला त्याचा माल योग्य भावात विकला जाण्याची हमी होती. शेतीमाल विकणाऱ्या मधल्या दलालांची आवश्यकता नव्हती. ही एक आदर्श Supply Chain Management होती.
ही व्यवस्था शेकडो वर्षांपासून विकसित होत गेली होती. (श्रीकृष्णाने यादवांची वसाहत गोकुळातून हलवून द्वारकेला नेली आणि यादवांना दूध विक्रीच्या व्यवसायातून बाहेर काढून परदेशांशी व्यापार करणाऱ्या बंदरावर आणून वसविले. परदेश व्यापारामुळे द्वारका 'सोन्याची' झाली.) ही व्यवस्था इंग्रज येईपर्यंत नीट चालू होती. अहिल्याराणी होळकरांनी बांधलेला इंदोर पासून कल्याण बंदारापर्यंतचा रस्ता (NH222) याची साक्ष देतो. या व्यवस्थेमुळे इंग्रजांना येथे त्यांचा पक्का माल खपविणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी ही व्यवस्था खच्ची केली.
परंतु हजारो वर्षांपासून रुजलेल्या व्यवस्थेची पाळेमुळे शे-दीडशे वर्षात उखडणे इंग्रजांना शक्य नव्हते.  ही भक्कम पायावर विकसित झालेली अर्थव्यवस्था हाच आपला स्वातंत्र्यानंतरच्या प्रगतीचा पाया होऊ शकला असता. गांधीजींनी हे ओळखले होते. परंतु गांधीजींचे प्रमुख कार्य (Mission) वेगळे असल्याने तसेच ते अर्थतज्ञ नसल्याने ही वस्तुस्थिती ते योग्य शब्दात मांडू शकले नाहीत. परंतु डॉ. राम मनोहर लोहिया यांनी ते ओळखले होते. त्यांनी गांधीजींच्या कल्पनेला नव्या युगात कसे प्रत्यक्षात आणता येईल याचा विचार केला. 
डॉ. राम मनोहर लोहियांनी काय सुचविले होते ते पुढील भागात.

No comments:

Post a Comment