Saturday, August 20, 2016

कृष्ण : एक कुशल नेता

मागील वर्षी गोकुळाष्टमीच्या सुमारास 'विकास पुरुष' कृष्णाबद्दल माहिती घेतली. यादवांचे गोकुळातून द्वारकेच्या बंदरावर स्थलांतर हे त्यांना त्यांच्या गोपालनाच्या व्यवसायातून बाहेर काढून आयात-निर्यातीच्या व्यापारात आणण्यासाठी उपयुक्त ठरले आणि अल्पावधीतच द्वारका सोन्याची झाली.

कृष्णाचे युद्धतंत्रही अद्वितीय होते. दुर्योधनाने महाभारत युद्धात यादव सेना घेतली आणि कृष्ण अर्जुनाचा सारथी बनला. युद्धात सेनेपेक्षा नेतृत्व महत्वाचे ठरते हे अर्जुनाला पूर्णपणे माहित होते. दुर्योधनाने हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर घेतले पण त्या हार्डवेअर/सॉफ्टवेअरचा निर्माता अर्जुनाकडे ठेवला. या निर्मात्याला हे हार्डवेअर/सॉफ्टवेअर कसे जॅम करायचे याची माहिती असणार हे दुर्योधन विसरला.

या युद्धात बलरामाची सहानुभूती दुर्योधनाकडे होती. यादवांच्या सेनेचे नेतृत्व बलरामाने केले असते. अशा परिस्थितीत ही सेना पांडवांना भारी ठरू शकली असती. कृष्णाने बलरामाला पटवून दिले की ही युद्ध अधर्माने होणार आहे आणि त्याच्यासारख्या धार्मिक माणसाने त्यापासून दूर राहिले पाहिजे. बलराम त्यामुळे तीर्थयात्रेला निघून गेला.

युद्धापूर्वीच कृष्णाने पुर्वेपासुन पश्चिमेपर्यंत स्वत: आणि पांडवांना लग्नसंबंध जोडून आपलेसे करून घेतले होते. जरासंधाचे मगध हे अत्यंत बळकट साम्राज्य होते. भरतील अनेक राज्ये त्यांना खंडणी देत असत. अनेक राजांना जरासंधाने तुरुंगात ठेवले होते. कंस हा 'शूरसेन' या यादवांच्या संस्थानाचा राजा होताच, पण जरासंधाचा सेनापती होता. त्याला मारून कृष्णाने जरासंधाशी वैर घेतले होते. जरासंधाशी कृष्णाशी अठरा युद्धेही झाली होती आणि प्रत्येक युद्धात कृष्णाला काही प्रदेश गमवावा लागला होता (गोकुळ द्वारकेला हलविण्यामागे हे  ही एक कारण होते). मगध साम्राज्याशी युद्ध करणे शहाणपणा नसल्याने राजसूय यज्ञ प्रसंगी कृष्णाने जरासंधाला भीम अथवा अर्जुनाशी एकट्याने मल्लयुद्ध करण्याचे आव्हान दिले. कृष्णाला माहित होते की जरासंध अर्जुनाला आपल्यासामान लेखित नाही. अपेक्षेप्रमाणे त्याने भीमाशी मल्लयुद्धाचे आव्हान स्वीकारले आणि भीमाने त्यात जरासंधाला ठार मारले. कृष्णाने जरासंधाच्या मुलाला राज्यावर बसविले आणि एक प्रबळ साम्राज्य आपल्या मित्रांच्या यादीत जोडले. तसेच जरासंधाने बंदिवासात ठेवलेल्या राजांना सोडून दिले आणि त्यांना मित्र बनविले. याच राजसूय यज्ञात कृष्णाने जरासंधाचा तेव्हाचा (कंसानंतर झालेला) सेनापती जयद्रथ यालाही एकट्याला गाठून मारले.

राजसूय यज्ञापूर्वी झालेले प्रबळ यवन राजा (यवन प्रदेशातील राजा - सोबतचा नकाशा पहा) कालयवन  याचे  आक्रमण त्याने कसे थोपविले हे मागील लेखात विस्तृत लिहिले आहे.

कृष्णाचे हेरखातेही सक्षम होते. युद्धाला दहा दिवस लोटले तरी एकही पांडव ठार झाला नाही हे पाहून दुर्योधन अस्वस्थ झाला. त्याने कौरवांचे सेनापती पितामह भीष्म यांची भेट घेऊन निर्भत्सना केली. भीष्मांना पांडव जवळचे वाटत असल्यानेच ते मनापासून युद्ध करीत नाहीत असे वक्तव्य केले. यामुळे भीष्म व्यथित झाले. त्यांनी एका दिवसात सर्व पांडवांना ठार मरीन अथवा सेनापतीपद सोडेन अशी प्रतिज्ञा केली. आपल्या हेरांकरवी कृष्णाला हे कळताच तो चिंतीत झाला. भीष्मांच्या युद्धकौशल्याची त्याला कल्पना होती. तसेच 'भीष्मप्रतिज्ञा' ही  काय चीज असते हे ही त्याला माहित होते. त्याने द्रौपदीबरोबर भीष्मांना भेटण्याचे ठरविले. कौरवांच्या छावणीत हेरांचा सुळसुळाट असल्याने कोणालाही प्रवेश नव्हता. कृष्णाने एका गरीब शेतकऱ्याचा वेश घेतला. द्रौपदीलाही शेतकरणीचा वेश दिला. ते दोघे भीष्मांच्या छावणीत प्रवेश करू लागले. द्वारपालांनी त्यांना अडविले. कृष्णाने गयावया केल्या. परंतु द्वारपालाने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले. नंतर दया येऊन फक्त द्रौपदीला आत सोडले. आत भीष्म ध्यानस्त बसले होते. द्रौपदीने त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. इतक्या रात्री दुर्योधानाचीच पत्नी आली असणार असे समजून भीष्मांनी 'सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला. डोळे उघडल्यावर त्यांनी द्रौपदीला ओळखले. कोणाबरोबर इतक्या रात्री आलीस असे विचारल्यावर तिने 'एका शेतकऱ्याबरोबर' असे उत्तर दिले. परंतु भीष्मांनी ओळखले. त्यांनी छावणीबाहेर येऊन कृष्णाचे पाय धरले आणि सन्मानाने आत नेले. भीष्मांनी द्रौपदीला 'सौभाग्यवती भव' आशीर्वाद दिल्याने तो खोटा ठरणार नाही असे कृष्णाने भीष्माचार्यांना सांगितले. भीष्मांनी तर दुसऱ्या दिवशी सर्व पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा घेतली होती. आणि भीष्म हे पराक्रमात पांडवांना भारी ठरणारे होते. त्यामुळे कृष्णाने उपाय विचारला. तेव्हा शिखंडीआडून अर्जुनाने बाण सोडल्यास भीष्म प्रतिकार करणार नाहीत असे भीष्मांनी सांगितले. 'शिखंडी तारुण्यात येईपर्यंत स्त्री म्हणून वाढला. नंतर एका यक्षाने त्याला पौरुषत्व दिले. पण भीष्म त्याला 'स्त्री ' मानीत असल्याने ते शिखंडीवर बाण सोडणार नाहीत'  असे भीष्मांनी कृष्णाला सांगितले. या रहस्याचा वापर करून कृष्णाने भीष्मांना शरपंजरी केले.

यानंतर कौरवांचा सेनापती झालेल्या कर्णावर (तेव्हाच्या युद्धशास्त्राच्या नियमाविरुद्ध जावून) तो नि:शस्त्र अवस्थेत असताना आणि रथातून पायउतार झालेल्या अवस्थेत बाण सोडण्यास अर्जुनाला सांगितले.

त्यानंतर कौरवांचा सेनापती झालेल्या द्रोणांवर अश्वत्थामा गेल्याचे धर्माकडून वदवून ते नि:शस्त्र अवस्थेत प्रार्थना करीत असता दृश्द्युम्नामार्फत हल्ला करून मारले. यावेळी भीम आणि अन्य पांडव दृष्ट्द्युम्नावर धावून गेले. परंतु कृष्णाने त्यांना आवरले.

युद्धाच्या समाप्तीनंतर दुर्योधन हा एकाच कौरव जिवंत राहिला होता. कृष्णाने त्याला भीमाबरोबर गदायुद्धाचे आव्हान दिले. यात दुर्योधनाची जीत होते आहे असे दिसल्यावर त्याने भीमाला कमरेखाली गदा मारण्याची खुण केली आणि भीमाने दुर्योधनाला मारले. या अधर्माने झालेल्या गदायुद्धाने या युद्धाचा पंच असलेला बलराम खवळला आणि भीमाला मारण्यास धावला. परंतु कृष्णाने त्याला आवरले.

युद्ध केवळ पराक्रमाने नव्हे तर पद्धतशीर योजना आखून जिंकता येते याची जाणीव असलेला कृष्ण महाभारतात एक यशस्वी नेता म्हणूनच वावरतो.




No comments:

Post a Comment