Tuesday, December 2, 2025

चालचलाऊ गीता

 पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही ! धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग लेकांनो! होऊनिया रोग | मराना का! लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.'

कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा?
पहिल्याने तर टणाटणा | उडत होतास लढाया
मारे रथावरी बैसला | शंखध्वनि काय केला!
मग आताच कोठे गेला | जोर तुझा मघाचा?
तू बेट्या! मूळचाच ढिला | पूर्वीपासून जाणतो तुला;
परि आता तुझ्या बापाला | सोड्णार नाही बच्चमजी!
अहाहारे! भागूबाई! | म्हणे मी लढणार नाही;
बांगड्या भरा की रडूबाई | आणि बसा दळत!
कशास जमविले आपुले बाप? नसता बिचा-यांसी दिला ताप;
घरी डाराडूर झोप | घेत पडले असते!
नव्हते पाहिले मैदान | तोंवरी उगाच करी टुणटुण;
म्हणे यँव करीन त्यँव करीन | आताच जिरली कशाने?
अरे तू क्षत्रिय की धेड? आहे की विकली कुळाची चाड?
लेका भीक मागावयाचे वेड | टाळक्यात शिरले कोठुनी?'

अर्जुन म्हणे 'गा हरी! आता कटकट पुरे करी;
दहादा सांगितले तरी | हेका का तुझा असला?
आपण काही लढत नाही | पाप कोण शिरी घेई!
ढिला म्हण की भागूबाई | दे नाव वाटेल ते.'
ऐसे बोलोनि अर्जुन | दूर फेकूनि धनुष्य-बाण,
खेटरावाणी तोंड करून | मटकन खाली बैसला |
इति श्री चालचलाऊ गीतायाम प्रथमोध्यायः |

-कवी ज.के. उपाध्ये
ज.के. उपाध्ये यांच्या बद्दल थोडे !! ज.के. उपाध्ये हे एक मराठी कवी होऊन गेले. श्रीरामराज्याभिषेक’, ’जगन्मोहिनी’, ’अहिल्याकृत रामस्तुती’, ’द्रौपदीचा धावा’ यासारख्या भक्तीपर कविता त्यांनी लिहिल्या.
त्यांनी लिहिलेल्या ’चहाटळपणा’, ’कविते करिन तुला मी ठार’, ’चालचलाऊ गीता’, ’बावळट बाळू’ या विडंबनात्मक कविता विशेष गाजल्या !!

No comments:

Post a Comment